श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २६
श्रीगणेशाय नमःजयजयाजी कमलापती ॥ सर्वसाक्षी आदिमूर्ती ॥ पूर्णब्रह्मा सनातनज्योती ॥ रुक्मिणीपते जगदात्मया ॥१॥ हे दीननाथा दीनबंधू ॥ मुनिमानसरंजना कृपासिंधू ॥ तरी आतां कथासुबोधू ॥ रसज्ञ शब्दीं वदवीं कां ॥२॥मागिले अध्यायीं कथन ॥ गंधर्व नामीं सुरोचन ॥ शक्रशापें गर्दभ होऊन ॥ सत्यवती वरियेली ॥३॥तरी ही असो मागील कथा ॥ सिंहावलोकनीं पहा आतां ॥ कमठ कुल्लाळ काननपंथा ॥ अवंतिके जातसे ॥४॥ गंधर्वगर्दभी संसार वाहोन ॥ स्वदारेसहित सत्यवतीरत्न ॥ मार्गी चालता मुक्कामोमुक्काम ॥ अवंतिके पातला ॥५॥ कुल्लाळगृहीं सदन पाहून ॥ राहते झाले समुच्चयेकरुन ॥ परी सत्यवतीतें सुढाळपणें ॥ कन्येसमान पाळीतसे ॥६॥ सकळ मोहाचें मायाफळ ॥ सत्यवतीतें अर्पी कुल्लाळ ॥ आसनवसनादि सकळ ॥ इच्छेसमान पाळीतसे ॥७॥तों एके दिवशीं सत्यवती ॥ म्हणे ताता कमठमूर्ती ॥ मम लग्नातें करुनि पती ॥ माझा मज दावीं कां ॥८॥येरी म्हणे वो अवश्य माय ॥ या बोलाचा फेडीन संशय ॥ मग रात्रीं अवसर पाहूनि समय ॥ गंधर्वापाशीं पातला ॥९॥म्हणे महाराजा पशुपती ॥ कामना वेधली जे तव चित्तीं ॥ ती फळासी येऊनि निगुती ॥ तुजलागी पावती झाली ॥१०॥तरी या अर्था सुलक्षण ॥ पुढें व्हावें मंगलकारण ॥ सत्यवती उत्तम रत्न ॥ वाट पाहे पतीची ॥११॥ तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन ॥ उभयीं मिरवावें समाधान ॥ ऐसें ऐकतां संकटवचन ॥ गंधर्वराज वदतसे ॥१२॥तरी असो अन्य विधीतें ॥ प्रविष्ट न व्हावें हें लोकांत ॥ तरी योजूनि असुरी लग्नांत ॥ सत्यवती स्वीकारुं ॥१३॥ म्हणे महाराजा कमठा ऐक ॥ मंगलविधी नसे एक ॥ आसुरीविधीपूर्वक ॥ हा सोहळा मिरवितसें ॥१४॥ऐसें बोलतां गंधर्वराव ॥ कमठ म्हणे आहे बरवें ॥ परी एक संधीं उदित भाव ॥ उदय पावला महाराजा ॥१५॥म्हणे संदेह कवण कैसे ॥ परी आपण वर्ततां पशू ऐसे ॥ तरी या मिषें संग मनुष्यें ॥ कैसी रीती घडेल कीं ॥१६॥तरी संदेह फेडूनि माझा ॥ प्रिय करावी आपुली भाजा ॥ ऐसे ऐकूनि कामठ चोजा ॥ उत्तरा उत्तर देतसे ॥१७॥तो म्हणे महाराजा कमठा ऐक ॥ रत्न सत्यवती अलोलिक ॥ ऋतुसमय सत्य दोंदिक ॥ श्रुत करावे आम्हांतें ॥१८॥ तुवां श्रुत केलिया दृष्टी ॥ दावीन आपुली स्वरुपकोटी ॥ गंधर्ववेषें इच्छा पाटीं ॥ पूर्णपणी आणीन कीं ॥१९॥सत्यवती उत्तम जाया ॥ चतुर्थदिनी एकांत ठाया ॥ तुष्ट करीन गंधर्वी काया ॥ वरुनिया महाराजा ॥२०॥ऐसी बोलतां गंधर्व वाणी ॥ तुष्ट झाला कमठ मनीं ॥ स्वधामात संचरोनी ॥ वृत्तांत कन्येसी निवेदिला ॥२१॥म्हणे माये वो सत्यवती ॥ कामना जे आहे तव चित्तीं ॥ ते ऋतुकाळीं कामाहुती ॥ गंधर्वराज ओपील गे ॥२२॥आपुल्या स्वरुपा प्रगट करुन ॥ करुं योजितों आसुरा लग्न ॥ तरी तेंचि वरुनि समाधान ॥ सुखालागीं पावशील ॥२३॥ऐसें सांगूनि कमठ कुल्लाळ ॥ शयनीं पहुडला उतावेळ ॥ ती निशा लोटूनि उदयकाळ ॥ गभस्तीचा पातला ॥२४॥तेही लोटल्या दिनोदिन ॥ समय पातला ऋतुकालमान ॥ चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन ॥ श्रुत करी गंधर्वातें ॥२५॥ म्हणे महाराजा गंधर्वनाथा ॥ योजिला समय आला आतां ॥ तरी उभय काम पूर्ण होतां ॥ स्वीकारावें महाराजा ॥२६॥ऐसें बोलता कमठ वाणीं ॥ वेष गर्दभी तत्क्षणी ॥ सोडूनि स्वस्वरुपा प्रगट करुन ॥ महीलागीं मिरवला ॥२७॥मिरवला परी जैसा गभस्ती ॥ वस्त्राभरणीं कनककांती ॥ कमठे पाहूनि चित्तसरतीं ॥ आनंदतोय हेलावे ॥२८॥ चित्ती म्हणे भाग्यवंत ॥ मजसमान नाही या माहीत ॥ स्वर्गवासी गंधर्व दैवत ॥ ममगृहीं वर्ततसे ॥२९॥ अहा ती धन्य सत्यवती ॥ बैसलीसे पुण्यपर्वती ॥ ऐसा स्वामी जियतें पती ॥ निजदैवें लाधला ॥३०॥ राहिला परी वर्णनासी मती ॥ नसे बोलावया अनुसंमती ॥ स्वर्गफळचि लागलें हाती ॥ सत्यवतीकारणें ॥३१॥ जैसें अमरां पीयूषदान ॥ आतुडले मंथनीं दैवेकरुन ॥ कीं दानवांत नवनिधिधन ॥ कुबेर लाधला पुण्यानें ॥३२॥ कीं शिवमौळींचे दृढासन ॥ दैवें लाधला रोहिणीरमण ॥ तेवीं गंधर्वसुरोचन ॥ सत्यवती ही लाधली ॥३३॥ कीं प्रत्यक्ष सूर्यनारायण ॥ पाठीं वाहे श्यामकर्ण ॥ तन्न्यायें दैवेंकरुन ॥ सत्यवती लाधली ॥३४॥ कीं अब्धिजा दारा कमला नामें ॥ विष्णूसी लाधली दैवेंकरुन ॥ तेवीं गंधर्वस्वामी सुरोचन ॥ सत्यवती लाधली ॥३५॥ ऐसा विस्मय कमठ पोटी ॥ करीत आहे हर्षे देठी ॥ मग भाळ ठेवूनि चरणसंपुटीं ॥ विनवणी करीतसे ॥३६॥ म्हणे महाराजा स्वर्गधामका ॥ अहा मी अबुद्ध असें या लोकां ॥ नेणूनि तव प्रतापआवांका ॥ कष्टविलें पापिष्ठें ॥३७॥ तव पृष्ठीं ते ग्रंथिका वाहूनी ॥ गर्दभ भाविला आपुले मनीं ॥ अहंमूढ मी अबुद्धखाणी ॥ आरोहण केलें पापिष्ठें ॥३८॥ अहा स्वामिया ऐसी कोटी ॥ असूनि मृत्तिका वाहिली पाठीं ॥ नेणूनि तूतें केलें कष्टी ॥ मीही दुरात्म्या पापिष्ठें ॥३९॥ अहा कर्म हें अनिवार ॥ आरोहतां तव पृष्ठीवर ॥ तैं दुरात्मा मुष्टिप्रहार ॥ करीत होतों पापिष्ठ ॥४०॥ तरी ऐसिया अपराधांसी ॥ क्षमा करीं गा दयाराशी ॥ ऐसें म्हणोनि पुन्हां चरणांसी ॥ निजमौळी अर्पितसे ॥४१॥ मग सुरोचन गंधर्व हात ॥ धरुनि कमठ सदनीं नेत ॥ म्हणे महाराजा स्वकांतेतें ॥ सांभाळावें सर्वस्वीं ॥४२॥ मग सुरोचन गंधर्वे एकांतासी ॥ पाचारिलें सत्यवतीसी ॥ येरी येतांचि षोडशोपचारेंसीं ॥ गंधर्वराज पूजियेला ॥४३॥ मग अति प्रीतीं संवादस्थितीं ॥ ऐक्य भावानें उभय रमती ॥ आसुरी विवाहकामार्थ रती ॥ तुष्ट चित्तीं मिरवला ॥४४॥ मिरवले परी त्याच रात्रीं ॥ गर्भ संभवला सत्यवती ॥ प्रारब्धयोगें पुत्रवंतीं ॥ जठस्थानीं राहिला ॥४५॥ यापरी गंधर्वराज ॥ म्हणतसे सत्यवतीभाज ॥ पुत्रसुखातें पाहिलें चोज ॥ स्वर्गवास करीन मी ॥४६॥ शक्रशापापासूनि कथा ॥ सत्यवतीतें होय सांगता ॥ कथा सांगूनि म्हणे आतां ॥ सुख क्षेमांत असावें ॥४७॥ तरी तुज आतां राजबाळी ॥ पुत्र उल्हासील येणें काळीं ॥ परी तो पुत्र महाबळी ॥ राज्यासनीं मिरवेल ॥४८॥ मिरवेल परी धर्मदाता ॥ विक्रम नामीं जगाविख्यात ॥ धैर्य राशि औदार्यवंत ॥ शक्रकर्ता मिरवेल ॥४९॥ ऐसा पुत्र तूं चूडामणी ॥ लाधसील वो शुभाननी ॥ मी तव ऋणापासूनी ॥ मुक्त झालों सर्वस्वीं ॥५०॥
|