Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १८

श्रीगणेशाय नमः जयजयाजी करुणाकरा ॥ पंढरीअधीशा रुक्मिणीवरा ॥ भक्तपालका चकोरचंद्रा ॥ प्रेमपीयूषधारका ॥१॥ हे दीनबंधो दीनानाथ ॥ पुढें चालवीं भक्तिसारकथा ॥ मागिले अध्यायीं विरागता ॥ गोपीचंदा लाधली ॥२॥ असो पुढें आतां श्रोतीं ॥ अवधान द्यावें ग्रंथार्थी ॥ गोपीचंद सोडूनि ग्रामाप्रती ॥ वैराग्य आचरुं चालिला ॥३॥ मार्गी ग्रामोग्रामीं जात ॥ अहारापुरती भिक्षा मागत ॥ पुढें मार्गी गमन करीत ॥ वाचे जप करीतसे ॥४॥ परी गौडबंगाल देश उत्तम ॥ समाचार कळला ग्रामोग्राम ॥ कीं गोपीचंद राजा नरोत्तम ॥ योगींद्रनीति आचरला ॥५॥ गांवोगावींचे सकळ जनीं ॥ ऐकतां विव्हळ होती मायापूर्ण ॥ कन्येसमान केलें पालन ॥ सकळ प्रजेचे रायानें ॥७॥ आतां ऐसा राजा मागुती ॥ होणार नाही पुढतपुढती ॥ ऐसे म्हणोनि आरबंळती ॥ लोक गावींचे सकळिक ॥८॥ असो तो ज्या गांवीं जात ॥ त्या गावींचे लोक पुढें येत ॥ म्हणती महाराजांनीं राहावे येथ ॥ योग पूर्ण आचरावा ॥९॥ नाना पदार्थ पुढें आणिती ॥ परी तो न घे कदा नृपती ॥ भिक्षा मागुनि आहारापुरती ॥ पुढे मार्गी जातसे ॥१०॥ शेटसावकार मोठमोठे ॥ बोळवीत येती तया वाटे ॥ पुनः परता वागवाटें ॥ बोलतती रायासी ॥११॥ हे महाराजा तुम्हांवीण ॥ प्रजा दिसत आहे दीन ॥ जैसें शरीर प्राणविण ॥ नीचेष्टित पडतसे ॥१२॥ तैसी गति प्रजेसी झाली ॥ जरी तुम्ही जातां आमुची माउली ॥ तरी योग साधुनि पुनः पाउलीं ॥ दर्शन द्यावें आम्हातें ॥१३॥ अवश्य म्हणूनी नृपनाथ ॥ बोळवीतसे समस्त ॥ ऐसें रायासी गांवोंगांवीं होत ॥ अति गुंतीं चालावया ॥१४॥ असो ऐसें बहुत दिनीं ॥ स्वराज्याची सीमा उल्लंघूनी ॥ गौडबंगाल देश टाकूनि ॥ कौलबंगाली संचरला ॥१५॥ त्याही कौलबंगाललांत ॥ गांवोगांवीं हा वृत्तांत ॥ प्रविष्ट झाला लोकां समस्त ॥ चकचकिताती अंतरी ॥१६॥ म्हणती गोपीचंद रायासमान ॥ होणार नाहीं राजनंदन ॥ अहा गोपीचंद प्रज्ञावान ॥ धर्मदाता सर्वदा ॥१७॥ असो कौलबंगालींचा नृपती ॥ पौलपट्टण ग्रामीं वस्ती ॥ तेथें भगिनी चंपावती ॥ गोपीचंदाची नांदतसे ॥१८॥ तिलकचंद श्वशुर नामीं ॥ महाप्रतापी युद्धधर्मी ॥ जैसा गोपीचंद संपत्तीं उत्तमीं ॥ तैशाचि नीतीं तो असे ॥१९॥ गज वाजी अपरिमित ॥ शिबिका नाना दिव्य रथ ॥ धनभांडारें अपरिमित ॥ राजसदनें भरलीं तीं ॥२०॥ किल्ले कोट दुर्ग विशाळ ॥ कौलबंगाल देश सबळ ॥ तया देशींचा तो नृपाळ ॥ तिलकचंद मिरविला ॥२१॥ एक लक्ष सहस्त्रशत लक्ष ॥ सबळ पृतनेचा असे दक्ष ॥ परी ती पृतना नव्हे प्रत्यक्ष ॥ काळ शत्रूचा मिरवतसे ॥२२॥ तया गृहीं ती चंपावती ॥ सासुरवासिनी परम युवती ॥ नणंदा जावा भावांप्रती ॥ देवांपरी मानीतसे ॥२३॥ परमप्रतापी गर्जत काळ ॥ सासुसासरे असती सबळ ॥ तेथेंही वृत्तांत समस्तां सकळ ॥ गोपीचंदाचा समजला ॥२४॥ समजला परी करिती टीका ॥ म्हणती अहा रे नपुंसका ॥ ऐसें राज्य सोडोनि लेकां ॥ भीक मागणें वरियेलें ॥२५॥ अहा मृत्यू आला जरी ॥ तरी भिक्षाझोळी न वंचावी करीं ॥ क्षत्रिय धर्मदाय शरीरीं ॥ भीक मागणें नसेचि ॥२६॥ अहा जन्मांत येऊनि काय केलें ॥ क्षात्रकुळा दूषण लाविलें ॥ आमुचे मुखासी काळें लाविलें ॥ पिशुन केलें जन्मांत ॥२७॥ म्हणतील सोयरा तुमचा कैसा ॥ नपुंसक झाला वेडापिसा ॥ वैभव टाकूनि देशोदेशा ॥ भीम मागे घरोघरीं ॥२८॥ तो जन्मतांचि कां नाहीं मेला ॥ क्षत्रियकुळातें डाग लाविला ॥ आतां स्वमुखा दाविणें कशाला ॥ श्लाघ्य दिसेना आमुतें ॥२९॥ ऐसें आतां बहुतां रीती ॥ लोक निंदितील आम्हांप्रती ॥ अहा कैसी ती मैनावती ॥ सुत दवडिला तिनें हा ॥३०॥ अहा पुत्रा देऊनि देशवटा ॥ आपण बैसली राजपटा ॥ जालिंदर हातीं धरुनि गोमटा ॥ भ्रष्ट केलें राज्यासी ॥३१॥ श्रेया सांडूनि रत्नवाटी ॥ हातीं घेतली कैसी नरोटी ॥ कनक टाकूनि चिंधुटी ॥ भाळी बांधी प्रीतीनें ॥३२॥ अहा जालिंदर कोणता निका ॥ भिकार वाईट मिरवे लोकां ॥ हातीं धरिला समूळ रोडका ॥ डोई बोडका शिखानष्ट ॥३३॥ ऐसियाच्या लागूनि ध्यानीं ॥ घरासि लाविला आपुल्या अग्नी ॥ आतां काळें तोंड करुनी ॥ जगामाजी मिरवतसे ॥३४॥ अहा माय नव्हे ती लांब म्हणावी ॥ स्वसुत जिनें केला गोसावी ॥ लट्टाश्रमाच्या लागूनि पायीं ॥ विघ्न आणिलें राज्यांत ॥३५॥ आतां कोण तिचा बाप ॥ उभा राहिला बलाढ्य भूप ॥ राज्य हरुनि खटाटोप ॥ देशोधडी लावील कीं ॥३६॥ ऐसी वल्गना बहुत रीतीं ॥ एकमेक स्वमुखें करिती ॥ तें ऐकूनि चंपावती ॥ क्षीण चित्तीं होतसे ॥३७॥ मनींच्या मनीं आठवूनि गुण ॥ बंधूसाठीं करी रुदन ॥ नणंदा जावा विशाळ बाण ॥ हदयालागीं खोंचिती ॥३८॥ म्हणती भावानें उजेड केला ॥ कीर्तिध्वज उभारिला ॥ राज्य सांडूनि हात भिकेल ॥ ओढवितो लोकांसीं ॥३९॥ मायबंधूंनी दिवटा लाविला ॥ तिहीं लोकीं उजेड केला ॥ आतां उजेड इचा उरला ॥ हेही करील तैसेंचि ॥४०॥ अहा माय ती हो रांड ॥ जगीं ओढविलें भांड ॥ आतां जगीं काळें तोंड ॥ करुनियां मिरवते ॥४१॥ ऐसे दुःखाचे देती घाव ॥ हदयीं खोंचूनि करिती ठाव ॥ बोलणें होतसे शस्त्रगौरव ॥ दुःख विषमारापरी ॥४२॥ येरीकडे गोपीचंद ॥ पाहता पाहातां ग्रामवृंद ॥ पौलपट्टणीं येऊन शुद्ध ॥ पाणवठी बैसला ॥४३॥ हस्तें काढूनि शिंगीनाद ॥ वाचे सांगत हरिगोविंद ॥ परी स्वरुपामाजी प्रतापवृंद ॥ झांकला तो जाईना ॥४४॥ कीं अर्कावरी अभ्र तेवीं तो नृपनाथ ॥ पाणवठ्यातें विराजत ॥ तों परिचारिका अकस्मात ॥ चंपावतीच्या पातल्या ॥४६॥ त्यांनीं येतांचि देखिला नयनीं ॥ देखतांचि राव ओळखिला चिन्हीं ॥ मग त्या तैशाचि परतोनी ॥ राजसदना पैं गेल्या ॥४७॥ सहराया सकळांसी ॥ वृत्तांत सांगती त्या युवतींसी ॥ कीं गोपीचंद पाणवठ्यासी ॥ येवोनियां बैसला ॥४८॥ ऐसा वृत्तांत रायें ऐकून ॥ मग चित्तीं झाला क्षीण ॥ म्हणे मुखासी काळें लावून ॥ आमुचे गांवीं कां आला ॥४९॥ आला परी लोकांत ॥ करील आमुची अपकीर्त ॥ संचरोनि पट्टणांत ॥ भीक मागेल गृहोगृहीं ॥५०॥