Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २७

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदुद्धारा ॥ विश्वव्यापका विश्वंभरा ॥ जगसृजित्या करुणाकरा ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥१॥ पूर्णब्रह्म सनातना ॥ पंढरीअधीशा रुक्मिणीरमणा ॥ पुढें ग्रंथरचनामहिमाना ॥ बोलवीं कां महाराजा ॥२॥ मागिले अध्यायीं निरुपण ॥ भर्तरी आणि दुजा विक्रम ॥ प्रेमसागरीं भक्ति प्रेम ॥ उभय सरिता लोटल्या ॥३॥ मग ते उभयतां एक दुर्गी ॥ ग्रास रक्षिती एक प्रसंगीं ॥ तों एके दिवशीं शुभमार्गी ॥ दैव उदया पातलें ॥४॥ मोक्षपुर्यां असती सप्तम ॥ तयांतील तें अवंतिका ग्राम ॥ तेथील नृपति नरेंद्रोत्तम ॥ शुभविक्रम विराजे ॥५॥ तया जठरीं ती सूक्ष्म वेली ॥ सकळ देहीं संचार पावली ॥ पावली परिभवें परतली ॥ संभव तो न ये सांगावया ॥६॥ ऐसी कन्या असें उदरीं ॥ तीही धाकुटी बरवंटावरी ॥ कीं लवणाब्धीची लहरी ॥ मदनबाळी शोभतए ॥७॥ नाम जियेचें सुमेधावती ॥ तीक्ष्णबुद्धि असे युवती ॥ परी चंद्रकला नक्षत्रज्योती ॥ सांग स्वरुपीं मिरवतसे ॥८॥ तंव कोणे एके दिवशीं ॥ बैसली होती रायापाशीं ॥ रायें परम लालनेसी ॥ अंकावरी घेतली ॥९॥ परम सौंदर्य मुखमंडन ॥ रायें कवळुनि घेतलें चुंबन ॥ उपरी कल्पने वेधले मन ॥ वराविषयीं ॥१०॥ मग सुमति मंत्री पाचारुनी ॥ बोलता झाला शुभविक्रम वाणी ॥ म्हणे सुमेधावती मम नंदिनी ॥ उपवर ती दिसतसे ॥११॥ तरी इतुके स्वामित्वपण ॥ पुरुष योजावा दिव्यरत्न ॥ यावरी मंत्री बोले वचन ॥ राजउक्ती ऐकूनियां ॥१२॥ म्हणे महाराजा सुरतयोग ॥ जराव्यापक सर्वाग ॥ ऐसिया काळीं विषयरंग ॥ सरसावला तुम्हांतें ॥१३॥ उदरीं नाहीं वंश संतती ॥ जरा व्यापिली शरीराप्रती ॥ तरी कामना एक वेधली चित्तीं ॥ सुमेधावतीकडूनियं ॥१४॥ तरी स्वआत्मजा लावण्यराशी ॥ दावितों पहा जया वरासी ॥ त्यांते स्थापूनि राज्यासनासी ॥ करावें सुरत वैभवातें ॥१५॥ मग तो वर जामातसुत ॥ उभयपणीं या जगांत ॥ मिरवूनि जरेतें सकळ हित ॥ संगोपील तुम्हांसी ॥१६॥ तरी ऐसिये मम वचन ॥ सिद्धार्थ करा आपुलें मन ॥ तरी सुत घ्यावा कन्या देऊन ॥ पुढिलिया सुखातें ॥१७॥ ऐसें मंत्री बोलतां वचन ॥ मान तुकावी शुभविक्रम ॥ म्हणे अवश्य ऐसोंचि करणें ॥ योजिलिया अर्थातें ॥१८॥ तरी प्राज्ञिक एक यांत ॥ गोष्ट सुचली आहे मातें ॥ आधीं योजूनि अधिकारातें ॥ वरी जामात मानवावा ॥१९॥ तरी प्राज्ञिक करावें ऐसें ॥ समारंभीं गजशुंडेस ॥ माळ ओपूनि राज्यासनास ॥ स्वामित्वपणीं मिरवावें ॥२०॥ मग तो सहज ईश्वरीसत्तें ॥ लोकांत मिरवेल महीपती ॥ कन्या अर्पूनि उपरांतीं ॥ सर्वसुखा ओपावें ॥२१॥ ऐसें बोलतां शुभविक्रम नृपती ॥ तेंचि मानलें मंत्रिकाप्रतीं ॥ मग शुभमाळा मंडपक्षितीं ॥ महोत्सव मांडिला ॥२२॥ पाहूनि दिन सुदिन मास ॥ उभारिलें मंडपास ॥ गुढ्या तोरणें पताकांस ॥ राजसदन शोभलें ॥२३॥ वस्त्राभरणीं कनककोंदणीं ॥ भूमीं मिरवला कुंजर रत्नी ॥ दिव्यमाळा शुंडी ओपूनी ॥ नगरामाझारी संचरला ॥२४॥ मागें मंत्री मानव विप्रांसहित ॥ चक्षुदीक्षा करी नृपनाथ ॥ तों दिव्यकुंजर घेऊनि माळतें ॥ नगरामाजी संचरला ॥२५॥ आधीं सभामंडपीचे जन ॥ दिग्गजें सर्व विलोकून ॥ उपरी नगरामाजी गमन ॥ करिता झाला कुंजर तो ॥२६॥ मग सकळ ग्रामीचे ग्रामजन ॥ पाहती ठाई ठाई उभे राहून ॥ तों ग्राम शोधीत दुर्गी येऊन ॥ विक्रमाते विलोकी ॥२७॥ गज येऊनि दुर्गानिकट ॥ उभा राहे न चाले वाट ॥ तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट ॥ सेवाधारी असती कीं ॥२८॥ गज खुंटतां पाहे नृपती ॥ खालीं पाचारी अष्टांप्रती ॥ एकामागें एक उतरती ॥ दुर्गपाययासत विशाळ ॥२९॥ तों सर्वामागूनि उतरतां विक्रम ॥ गज आनंदोनि धावे सप्रेम ॥ कुसुममाळा ग्रीवेलागून ॥ शुंडादंडे ओपिली ॥३०॥ माळा ग्रीवे ओपितां गज ॥ वाद्ये वाजती जाहले चोज ॥ गजस्कंधीं वाहूनि राज ॥ श्रृंगारमंडपी आणिला ॥३१॥ मग ओपूनियां कनकासन ॥ निकट रायें मंत्री बैसवून ॥ परी सहज चर्चा जातीलागून ॥ कुल्लाळशब्द निघाला ॥३२॥ तेणें करुनि राव चित्तीं ॥ कांहींसा झाला साशंकित ॥ मग मंत्रिका नेऊनि एकांती ॥ कुल्लाळशब्द दर्शवी ॥३३॥ म्हणें योजिल्या अर्थाप्रती ॥ भिन्न अर्पाया सुमेधावती ॥ आम्हां क्षत्रियां कुल्लाळजाती ॥ वर्ण भिन्न दिसतो हा ॥३४॥ ऐसें बोलता शुभविक्रमराव ॥ मंत्रांही व्यापिला संशयभावें ॥ परी तो सर्वज्ञ शोधार्णव ॥ राव घेऊनि वहिवटला ॥३५॥ सवें येऊनि मंडपाबाहेर ॥ त्या अष्ट सोबत्यां बोलावूनि बाहेर ॥ निकट बैसवूनि जातीविचार ॥ पुसतां झाला तयांसी ॥३६॥ ते म्हणती नेणों कोण जाती ॥ कुल्लाळ म्हणती विक्रमाग्रतीं ॥ परी याचा शोध कुल्लाळजातीं ॥ कवणालागीं पुसवा ॥३७॥ मग तो मंत्री परस्परें ॥ कमठा पाचारुनि वागुत्तरें ॥ एकांतीं नेऊनि परम आदरें ॥ जातिवृत्तांत पुसतसे ॥३८॥ मग तों कमठ मुळापासून ॥ सांगता झाला विक्रमकथन ॥ माता क्षत्रियकुळीं सत्यवर्म ॥ मिथुळापतीची दर्शवी ॥३९॥ याउपरी पिता सुरोचन ॥ दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न ॥ ऐसें ऐकतां वर्तमान ॥ मंत्री तोषमान होतसे ॥४०॥ मग कमठासी नेऊनि रायासमोर ॥ तेथेंही वदविलें वागुत्तर ॥ रावही ऐकूनि तें उत्तर ॥ परम चित्तीं तोषला ॥४१॥ तोषूनी मंत्रिका पुन्हा बोलत ॥ मंत्री म्हणे कमठ घेऊनि आंत ॥ मीच जातों महाराज्यांत ॥ तरी पाचरण पाठवा सत्यवर्म्यातें ॥४२॥ अवश्य म्हणे शुभविक्रमनृपती ॥ बोळविता झाला मंत्रिकाप्रती ॥ मग कमठ आणि मंत्री सुमती ॥ मिथुळेलागीं पातले ॥४३॥ राये सत्यवर्मे ऐकून ॥ सदनीं नेलें गौरवून ॥ मग कमठ मंत्री सत्यवर्म ॥ एकांतासी बैसले ॥४४॥ ते एकांती कमठ विचार ॥ सांगता झाला सविस्तर ॥ कीं सत्यवतीचें उदेलें जठर ॥ विक्रमफळ मिरवलें ॥४५॥ तरी आतां दैवेंकरुन ॥ पौत्रा लाभलें राजचिन्ह ॥ तरी संशयद्रुम आपण चालून ॥ मुळापासूनि खुडावा ॥४६॥ ऐसी सांगूनि सकळ कथा ॥ योगक्षेमाची सांगितली वार्ता ॥ स्वर्गवास गंधर्वजामाता ॥ झाल्यासह कथियेलें ॥४७॥ रायें ऐकूनि सकळ विस्तार ॥ चित्तसरिते आनंदपूर ॥ दाटोनि पृतनेसह संभार ॥ शुभविक्रमसंगमीं मिळाला ॥४८॥ भेटून सत्यवतीतें ॥ सकळ पुसूनि वृत्तांतातें ॥ मग शुभविक्रमरायाचे चित्तीं ॥ अंतीं पांग फिटला ॥४९॥ याउपरी सुघोषमेळी ॥ विक्रम अभिषेकिला राज्यनव्हाळीं ॥ मग राज्यपदीं तयें काळीं ॥ बैसविला महाराजा ॥५०॥