Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २९

श्रीगणेशाय नमः रुक्मिणीवरा कमलाकांता ॥ चाणूरमर्दना वसुदेवसुता ॥ कंसारी तूं जगत्राता ॥ वासुदेवा जगदीशा ॥१॥ शेषशायी हलधरभ्राता ॥ भावप्रिया सुदर्शनदर्शिता ॥ द्रौपदीलज्जारक्षणकर्ता ॥ पाठिराखा मिरवसी ॥२॥ जैसा पांडवांचा पाठिराखा ॥ तैसा मिरवसी मम दोंदिका ॥ भक्तिसारग्रंथ कौतुका ॥ वाग्वरदा म्हणविसी ॥३॥ मागिले अध्यायीं विरहस्थिती ॥ लाधली गाढत्वें भर्तरीप्रती ॥ पिंगलेकरितां स्मशानक्षिती ॥ पूर्ण तप आचरला ॥४॥ तया क्लेशाचे उद्देशीं ॥ मित्रावरुणी दत्तापाशीं ॥ श्रुत करुनि स्वस्थानासी ॥ येऊनियां पोहोंचला ॥५॥ इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ चित्तीं धरावी श्रोतेजनीं ॥ यापरी पुढें ग्रंथमांडणीं ॥ सिद्ध अवधानी असावें ॥६॥ असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथ ॥ ठेवूनि गोरक्ष करावया तीर्थ ॥ महीलागीं भ्रमत ॥ गिरनारप्रती पातला ॥७॥ तेथें भेटोनि दत्तात्रेयासी ॥ भावें नमिलें प्रेमराशीं ॥ श्रीदत्तें धरोनि हदयासी ॥ आनंदानें उचंबळला ॥८॥ श्रीकरपद्में मुखमंडन ॥ गोरक्षाचें कुरवाळूनि वदन ॥ निकट बैसविला हस्त धरोन ॥ अलाई बलाई घेतसे ॥९॥ मोहितवाणीं पुसतसे त्यातें ॥ म्हणे कोठें रे मच्छिंद्रनाथ ॥ तूं सोडूनि निरपेक्ष त्यातें ॥ महीलागीं भ्रमतोसी ॥१०॥ येरुं सांगे पुन्हां नमोन ॥ गर्भाद्रिपर्वती मच्छिंद्रनंदन ॥ राहिलासे स्वसुखेंकरुन ॥ जपजाप्यातें योजूनियां ॥११॥ मुहूर्तपणे स्वसुखासीं ॥ लाविलें असें तीर्थस्नानासी ॥ मग मी नानातीर्थउद्देशीं ॥ करीत आलों परियेसा ॥१२॥ ऐसा वदोनि वृत्तांत ॥ याउपरी बोले अत्रिसुत ॥ वत्सा कार्य लागलें मातें ॥ त्या कार्यातें संपादीं ॥१३॥ तरी म्हणसी कार्य कवण ॥ भर्तरी मम अनुग्रही नंदन ॥ तो स्वकांतेकरितां स्मशान ॥ द्वादश संवत्सर सेवीतसे ॥१४॥ अन्नोदकाचा त्याग करुन ॥ सेवोनि आहे तृणपर्ण ॥ कांता कांता चिंतन करुन ॥ द्वादश वर्षे बैसला ॥१५॥ तरी तुवां जावोनि तेथें ॥ सावध करीं युक्तिप्रयुक्ति ॥ सकळ दावीं अशाश्वत ॥ आपुले पंथीं मिरवावें ॥१६॥ त्यासी मीं अनुग्रह जेव्हां दिधला ॥ तेव्हांचि गुंतविला संकल्पाला ॥ कीं सोडूनि वैभवपंथाला ॥ नाथपंथीं मिरवेन मी ॥१७॥ तरी तया बोलासी जाण ॥ दिवस लोटूनि गेले पूर्ण ॥ मग जन्मापासूनि सकळ कथन ॥ भर्तरीच्या सांगीतलें ॥१८॥ समुचयगोष्ट ऐकूनि कथन ॥ मान तुकावी गोरक्षनंदन ॥ म्हणे महाराजा तव कृपेने ॥ कार्य सत्य करीन हें ॥१९॥ तव आज्ञा यापरी मातें असतां ॥ मग भर्तरी लोहातें आणीन कनकता ॥ ही अशक्य नसे मातें वार्ता ॥ अर्थ घडला सहजचि ॥२०॥ हें महाराजा तूं कृपाघन ॥ वर्षलासी मम देहकारण ॥ तैं भर्तरीतरुनें ज्ञानकण ॥ अनायासें कणसेंचि ॥२१॥ तव कृपा जवळी असतां ॥ मग भर्तरीक्षुधेची कामवार्ता ॥ ही अशक्य नसे मातें करितां ॥ तृप्त सिद्धीतें भिनवाया ॥२२॥ कीं तव कामकल्पतरु ॥ मम चित्तागणीं पावला विस्तारु ॥ तेथें भर्तरीहीनत्वविचारु ॥ दरिद्रातें उरेना ॥२३॥ तरी आतां बोलतों प्रमाण ॥ कार्य आपुलें करुनि देईन ॥ ऐसें म्हणोनि वंदोनि चरण ॥ शीघ्रगती निघाला ॥२४॥ व्यानअस्त्र जपोनि होटीं ॥ भाळी चर्चिली भस्मचिमुटी ॥ मग व्यानमंत्रे महीपाठी ॥ गमन करुं निघाला ॥२५॥ लवतां डोळ्याचें पातें ॥ क्षणें आला अवंतिकेप्रत ॥ पन्नास योजनें निमिषांत क्षितींत ॥ लंघोनिया पातला ॥२६॥ तों गोरक्ष येतां स्मशाननिकट ॥ दुरोनि पाहे भर्तरी नेट ॥ तों सर्वांग दिसे अटि कृशवट ॥ अस्थिगत प्राण देखिला ॥२७॥ मुखीं तितुकीच सहजध्वनी ॥ म्हणे राम हे बरवी केली करनी ॥ आम्हां उभयतांची तुटी करोनी ॥ पिंगला नेली जवळिके ॥२८॥ ऐसी सहजध्वनि ऐकोन ॥ पाहूनि तयाचें कृशपण ॥ परम चित्तीं हळहळोन ॥ चकचकाव मानीतसे ॥२९॥ चित्तीं म्हणे अहा कठिण ॥ राव आचरे परम निर्वाण ॥ अस्थिमय राहिला प्राण ॥ त्वचा व्यक्त होऊनियां ॥३०॥ तरी ऐसा विरह जयासी ॥ बाणलाहे पूर्ण मानसीं ॥ तो वरपंगी वाग्वरासी ॥ कदाकाळीं मानीना ॥३१॥ तरी यातें आम्ही जें बोलूं ॥ तें तें सकळ होय फोलू ॥ जैसा क्षुधेला वेळू ॥ पळवा तेथें मिरवेना ॥३२॥ जैसा खापरासी परीस भेटे ॥ व्यर्थ होय यत्नपाठ ॥ तेवीं बोधितां बोध अचाट ॥ व्यर्थपणीं मिरवेल ॥३३॥ कीं हिंगतरु अपार विपिनीं ॥ त्यांत मैलागरु स्थापिला वनीं ॥ तया सुगंध लिप्तदुर्गध वनीं ॥ कदाकाळी तुटेना ॥३४॥ कीं शर्करेचे आळीपाळीं ॥ शक्रावणाच्या वेष्टिल्या वेली ॥ परी त्या कटुत्वपणा सकळां ॥ मधुरपणा मिरवेना ॥३५॥ कीं चतुराननाचे हस्तकमळीं ॥ जन्मभर स्थापिलें दरिद्र भाळीं ॥ तैं व्यवसायेंकरुनि नव्हाळी ॥ कदाकाळीं चालेना ॥३६॥ तरी आतां विचार येतां ॥ योजावा कांही बोधरहिता ॥ ज्यातें जैसी कामना स्थित ॥ तैसी स्थिती वर्तावी ॥३७॥ कीं श्वपुच्छा चक्रवेढा ॥ नीट होण्या यत्न पाडा ॥ तेवीं राव झाला वेडा ॥ शब्दबोध चालेना ॥३८॥ जैसा जो तैसाचि होतां स्थित ॥ मग संतोष मिरवे चित्त ॥ संतोष मिरवल्या कार्य प्राप्त ॥ घडोनि येतें सकळिकां ॥३९॥ पहा राम शत्रु दानवां ॥ परी विभीपण मिरवला भिन्नभावा ॥ तेणेंकरुनि स्ववैभवा ॥ भंगूं दिलें नाहींच कीं ॥४०॥ कीं बळियारायाचें जिणें ॥ त्यासी मिरवला तो वामन ॥ मातृशत्रू फरशधर होऊन ॥ तातासमान वहिवटला ॥४१॥ तन्न्यायें करुनि येथें ॥ रायासी ओपावें सर्व हित ॥ संतोष मिरवोनि अत्रिसुता ॥ कीर्तिध्वज लावावा ॥४२॥ मग जाऊनि अवंतिकेंत ॥ कुल्लाळगृहीं संचार करीत ॥ एक गाडगें आणूनि त्यातें ॥ बाटली नाम ठेविलें ॥४३॥ उपरी रंग चित्रविचित्र ॥ देऊनि रोगणीं केलें पवित्र ॥ मग तें चमकपणीं पात्र ॥ तेजालागीं दर्शवी ॥४४॥ परो अंतरीं पात्र कच्चेपणीं ॥ वरी रंग दावी लखलखोनी ॥ जेवीं वाढीव ब्रह्मज्ञानी ॥ परी अंतरी हिगो ॥४५॥ बोलतां ज्ञानी विशेष ॥ कीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपास ॥ ऐसें भासलें तरी ओंफस ॥ तरी अंतरी हिंगो ॥४६॥ नव तें मडकें कच्चेपणीं ॥ वरी सुढाळ दिसे रंग सन्मुख तत्त्वतां ॥ ठेंचेचे निमित्त करुनि नाथ ॥ भूमीलागी पडतसे ॥४८॥ अंग धरणीं देत टाकून ॥ सोंग दावी मूर्च्छापणें ॥ त्या संधींत बाटली कवळून ॥ बाटलीलागीं न्याहाळी ॥४९॥ असो बाटली गेली फुटोन ॥ मग सोंग मूर्च्छेचें सांवरोन ॥ भंवतें पाहे विलोकून ॥ बाटली झाली शतचूर्ण ॥५०॥