श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३७
श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंकजाक्षा ॥ आदिपुरुषा सर्वसाक्षा ॥ अव्यक्तव्यक्ता सर्वपरीक्षा ॥ महादक्षा रमावरा ॥१॥ मागिले अध्यायीं कथन ॥ करविलें वटसिद्धनागनाथजन्म ॥ उपरी सिद्धकळा पावून ॥ कोल्हापुरीं पातला ॥२॥ तेथें राहूनि लक्ष्मीआलयांत ॥ पुजारी करुनि हस्तगत ॥ सर्व सामग्री ओवरींत ॥ ऊनियां दाखविली ॥३॥ दाखवूनि म्हणें पुजार्यां सी ॥ सबळ पडल्या कनकराशी ॥ तरी ह्या सरतील ज्या दिवशीं ॥ तंववरी संतर्पण योजावें ॥४॥ योजावें तरी अन्यवर्ण ॥ कांहींच धरुं नये भिन्न ॥ सकळांलागीं करुनि पक्कान्न ॥ पंक्तीतें वाढावें ॥५॥ गांवामाजी सकळांकारणें ॥ पेटूं न द्यावा पाकीं अग्न ॥ द्विवेळा त्रिवेळा घालूनि भोजन ॥ तुष्ट करावें सकळातें ॥६॥ शेट सावकार राजा रंक ॥ सकळांसी आणूनि ओपावा पाक ॥ अंत्यजादि भुदेव लोक ॥ तुष्ट करावें सर्वांसी ॥७॥ ऐसें सांगूनि पुजार्याातें ॥ शीघ्र कामाठी आणवीत ॥ कार्ययोगें अपरिमित ॥ सकाम कामीं योजिले ॥८॥ उत्तम तिथी नेम करुन ॥ मांडव मंडप उभारुन ॥ पाकालागीं सज्ज करुन ॥ सर्व काम चालविलें ॥९॥ मग शिष्टाशिष्ट गृहीं धाडून ॥ तया दिधलें आमंत्रण ॥ येरीकडे पाक निर्माण ॥ करावया लाविलें ॥१०॥ आणि ग्रामद्वारीं टिळा लावून ॥ भोजनदवंडी ग्रामीं पिटून ॥ सर्व सामग्री सज्ज करुन ॥ काम चालीं चालविलें ॥११॥ शैव श्रावक आणि ब्राह्मण ॥ भेद चौर्याटयशीं देशांसमान ॥ देवाग्नी विप्र ऋषि ब्राह्मण ॥ पाक भिन्नभिन्न निर्मिती ॥१२॥ पंच द्राविड देश मुलतानी ॥ मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी ॥ हुसेनी पौंड्र मिळोनी ॥ देशजाती मिळाल्या ॥१३॥ असो भेदाभेद अन्यजाती ॥ षड्र मार्गानीं पाकविती ॥ खाज्या करंज्या कचुर मालती ॥ शिरा बुंदी करिताती ॥१४॥ पुरी पोळी क्षिप्रा बहुत ॥ चमचमीत भाज्या वरणभात ॥ पंचमधु त्यांत अपार घृत ॥ इच्छेसमान मिरवलें ॥१५॥ असो पाकाग्नि सिद्ध करुन ॥ चालते पंक्तीं सेविती अन्न ॥ पुन्हां क्षुधा लागल्या परतून ॥ येऊनि अन्न सेविती ॥१६॥ प्रथम पाक जातजाती ॥ तेथें नसे कांहीं अरुती ॥ कितीक वाढूनि गृहासी नेती ॥ भोजन करुनि मन माने ॥१७॥ कोणी कोरडेंचि उपटूनि नेती अन्न ॥ नेऊनि भरिती आपुलें सदन ॥ मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न ॥ सर्व झालें गांवांत ॥१८॥ राव रंक कुटुंबासहित ॥ अन्न सेवूनि होती तृप्त ॥ मग वन्ही इतुका दीपानिमित्त ॥ गृहोगृहीं मिरवला ॥१९॥ असो यापरी एक मास ॥ ग्राम सेवी सिद्धअन्नास ॥ यावरी कथा अत्रिसुतास ॥ कैसी वर्तली ती ऐका ॥२०॥ प्रथम दिनीं भिक्षेकारण ॥ गांवांत संचरे अत्रिनंदन ॥ कुश्वितरुपी विरुपवान ॥ भिक्षा मागे गृहोगृहीं ॥२१॥ तंव ते घरोघरींचे जन ॥ म्हणती गांवांत प्रयोजन ॥ होतें तेथे आम्हां जाणें ॥ कुटुंबादि भोजना ॥२२॥ तरी तूं सत्वरगती ॥ जाऊनि सारी कां आपुली भुक्ती ॥ व्यर्थ शीण कासायाप्रती ॥ वाईट कदन्न इच्छूनी ॥२३॥ उत्तम पक्क अन्न टाकून ॥ व्यर्थ कां शिणसी दरिद्रवान ॥ कामधेनूचे कासे आनन ॥ कांडणकोंडा कां भक्षावा ॥२४॥ कीं कल्पतरु बैसल्या ठायीं ॥ इच्छेसमान पदार्थ देई ॥ मग कां शिणावें धांवूनि पायीं ॥ मेळवावया भुक्तीते ॥२५॥ परीस असतां गृहालागून ॥ मच चाकरी कासया करावी हेमाकारण ॥ भाग्यें आतुडतां पीयुषपान ॥ मग वल्लीरसायण कां इच्छावें ॥२६॥ तेवीं तूं प्रकरण करिसी येथें सोडूनि सुधारसअन्नातें ॥ कदन्नाकरितां या गांवात ॥ हिंडतोसी मतिमंदा ॥२७॥ येपरी असों आम्ही गृहासी ॥ भोजना जातों आम्ही कुटुंबेंसीं ॥ पाक करावा कवणें अर्थेसीं ॥ तुजलागीं ओपावया ॥२८॥ ऐसीं घरोघरीं भाषणें ॥ होती दत्तात्रेयाकारणें ॥ मग मनांत म्हणे प्रयोजन ॥ जाऊनि पाहूं निजदृष्टीं ॥२९॥ ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥ तेथें पातला तपोनाथ ॥ उभा राहूनि पाकशाळेंत ॥ पाक लक्षांत आणीतसे ॥३०॥ तंव तो महाराज योगकारण ॥ देखतां ओळखी सिद्धिअन्न ॥ थोडें करितां नगसमान ॥ होय अपार न पचवितां ॥३१॥ एक पोळी पडतांचि लागली ॥ परी सहस्त्रही वाढियेली ॥ ऐशा चिन्हें ओळखिली ॥ सिद्धिकळा महाराजें ॥३२॥ मग तेथींच्या जनालागीं पुसत ॥ हें प्रयोजन एवढें कोण करीत ॥ येरु म्हणती महासमर्थ ॥ वटसिद्धनागनाथ करितो कीं ॥३३॥ ऐसें ऐकोनि अत्रिसुत ॥ खूण जाणली स्वचित्तांत ॥ कीं म्यां मुलासी सिद्धपदार्थ ॥ काशीक्षेत्रीं ओपिले ॥३४॥ तरी त्याचें नांव होतें यथार्थ ॥ वटसिद्धनागेश नागनाथ ॥ तरी तोचि काय आहे तेथें ॥ मोठेपणा मिरवावया ॥३५॥ त्यासी वर्षे लोटली वीस ॥ तरी झाला असेल स्थूळ देहास ॥ तरुणपणीं महंतीस ॥ वाढवावया टेकला ॥३६॥ टेकला परी मजकारणीं ॥ गोचर व्हावें ही इच्छा मनीं ॥ या गांवींचें संधान धरुनी ॥ संतर्पण मांडिलें ॥३७॥ हें गावीचें भिक्षास्थान ॥ भ्रष्ट करावें सिद्धिअन्न ॥ सकळ गांवींचा पाक वर्जून ॥ केला अर्थ मजकरितां ॥३८॥ तरी आतां असो कैसें ॥ आजिचा दिन करुं उपवास ॥ ऐसें योजूनि स्वचित्तास ॥ स्वामी तेथूनि चालिला ॥३९॥ चालिला परी आणिक जन ॥ पाचारिती बाळाकारण ॥ आपण जावें भोजन करुन ॥ तूं ऐसा कां जातोसी ॥४०॥ऐसें म्हणोनि हातीं धरिती ॥ पुन्हां पाकशाळे आणिती ॥ परी तो नायके योगपती ॥ गांवामाजीं संचरे ॥४१॥ मग कणधान्याची भिक्षा करीत ॥ लोक पुसतां त्यांतें वदत ॥ कीं आमुचा नेम भिक्षारहित ॥ अन्न सेवीत नाहीं जी ॥४२॥ ऐसें वदूनि सकळ लोकांत ॥ शुष्क अन्न मागूनि घेत ॥ काशीक्षेत्रीं जाऊनि त्वरित ॥ भोजनातें सारीतसे ॥४३॥ ऐसें रीतीं एक मास ॥ लोटूनि गेला सहजस्थितीस ॥ परी नागनाथ स्वचित्तास ॥ विचार करितां पैं झाला ॥४४॥ म्हणे लोटला एक मास ॥ स्वामी न दिसे आम्हांस ॥ मग बोलावूनि ग्रामस्थांस ॥ पुसतां झाला महाराज ॥४५॥ म्हणे गांवात कोणी येत ॥ अतिथ आहे भिक्षावंत ॥ तंव ते म्हणती सिद्धनाथ ॥ एक अतिथ येतो की ॥४६॥ तो येथींचें तुमचें अन्न ॥ न सेवी मागतो भिक्षाकदन्न ॥ आम्ही पुसतां म्हणतो नेम ॥ माझा ऐसा आहे कीं ॥४७॥ आम्ही सारितो येथें भोजन ॥ म्हणोनि न मिळे त्या पक्कान्न ॥ यास्तव कोरडे मागूनि धान्य ॥ नेत आहे महाराजा ॥४८॥ ऐसें बोलतां सकळ ग्रामस्थ ॥ त्यांसी म्हणे नागनाथ ॥ मागूं येतील जे गांवांत ॥ करा श्रुत मजलागीं ॥४९॥ त्यांसीं कांहीं न टाकून ॥ श्रुत करावें मजकारण ॥ मग मी जाऊनी ग्लानित वचनें ॥ भोजन घालीन तयांसी ॥५०॥
|