Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २०

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीराया ॥ भोक्तया षडगुणऐश्वर्या ॥ ऐसी सोसूनि अपार माया ॥ सकळ कळा तुझेनि ॥१॥ घटपटतन्तु आकाशन्याय ॥ सर्व तंवचि ब्रह्म होय ॥ ऐसे असूनि निराळा राहे ॥ अव्यक्त व्यक्ती पावुनी ॥२॥ कीं अपार घटी अपार तरणी ॥ व्यापून ऐक्य दिसे गगनीं ॥ त्याचि न्यायें मोक्षदानी ॥ व्याप्त असे सर्वांतें ॥३॥ तरी पूर्णब्रह्म नाथवेष ॥ करुणानिधि पंढरीचा अधीश ॥ माय कनवाळु जगान्निवास ॥ भक्तवत्सल नटलासे ॥४॥ तरी हे दीनबंधो भक्तव्यापका ॥ पुंडलीकवरदायका ॥ आतां पुढें रसना दोंदिका ॥ भक्तिसार वदवीं कां ॥५॥ मागिले अध्यायीं रामदर्शन ॥ आणि द्वितीयीं अंजनीनंदन ॥ गोरक्षालागीं भेटून ॥ अदृश्यपणीं मिरविले ॥६॥ असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ ॥ येरीकडे अंजनीसुत ॥ शृंगमुरडा जाऊनि त्वरित ॥ सानवेषें नटलासे ॥७॥ गुप्तवेषें राजसदन ॥ पाहता झाला अंजनीनंदन ॥ एकांतसदनीं मैनाकिण पदमिण ॥ मंचकावर पहुडली ॥८॥ सुखनिद्रा शयनीं असून ॥ परिचारिका गेल्या उठोन ॥ ऐसी एकांतसंधी पाहून ॥ धवळारी तैं संचरला ॥९॥ चपळपणीं तो मंचकाजवळी ॥ जाऊनि बैसला प्रतापबळी ॥ कीलोतळा पद्मिणी कमळी ॥ करपात्रीं धरियेली ॥१०॥ व्यक्त होतां करकमळ ॥ सावध झाली कीलोतळा वेल्हाळ ॥ तों दृष्टीं देखिला अंजनीबाळ ॥ चरणावरी लोटली ॥११॥ कीलोतळा आणि मैनाकिनी ॥ तृतीय नाम जिये पद्मिणी ॥ यापरी श्रोते बोलती कल्पनीं ॥ कवणें अर्थी हीं नामें ॥१२॥ तृतीयं अभिधाना ती दुहिता ॥ झाली असे कवण अर्था ॥ मग त्या कल्पनीं वाक्सरिता ॥ व्यक्ती घेणें मिरवली ॥१३॥ ऐसा पाहूनि श्रोतियां आदर ॥ बोलता कवि सादर ॥ तृतीय भिन्न भिन्न प्रकार ॥ कैशा रीतीं ऐका त्या ॥१४॥ तरी पर्वतांमाजी मंदरगिरी ॥ जंबुद्वीप त्याची प्रथम पायरी ॥ यापरी सिंहलद्वीपाची दुसरी ॥ मेरुमंदार आहे कीं ॥१५॥ यापरी सिंहलद्वीपभुवनीं ॥ स्त्रिया जितुक्या असती पद्मिणी ॥ त्यांत ही मुख्य मैनाकिनी ॥ स्वरुपवंती मिरवतसे ॥१६॥ तों एके दिवशीं अभ्यंग करुनि ॥ उभी राहिली धबळारी जाऊनी ॥ ते सहज दृष्टीं दिशागमनीं ॥ आकाशातें पहातसे ॥१७॥ हस्तीं झगटती कबरीभार ॥ तों वर दृष्टी जाऊनि गोचर ॥ उपरीचवसु विमानावर ॥ आरुढ होऊनि जातसे ॥१८॥ विमानारुढ झाला होता ॥ तों वसन एकांगें झालें तत्वतां ॥ आवेशें बाहेर लिंग दर्शतां ॥ असावध बैसलासे ॥१९॥ विमानावरी गवाक्षद्वार ॥ त्यांतूनि दिसे अवयव समग्र ॥ तों मैनाकिनी पाहूनि नेत्रें ॥ हांसे खदखदां ते काळीं ॥२०॥ तें ऐकूनि वसुनाथ ॥ विक्षेपोनि बोलता झाला तीतें ॥ म्हणे पापिणी परपुरुषातें ॥ पाहूनिया हासलीस ॥२१॥ तरी ऐसी जारिणी वरती ॥ धरुनि राहसी स्वगृहाप्रती ॥ माझेविषयीं कामशक्ती ॥ उदभवली म्हणूनि हांसलीस ॥२२॥ तरी मी नोहें तैसा भ्रष्ट ॥ सकळ वसूमाजी श्रेष्ठ ॥ इंद्रियदमनीं एकनिष्ठ ॥ पूर्णतपा साधीतसें ॥२३॥ तरी मम अभिलाष धरुनी ॥ गदगदां हांससी पापिणी ॥ तरी पुरुष विनोदे स्वस्थानीं ॥ जाऊनियां पडशील ॥२४॥ स्त्रीदेशांत स्त्रीकटकीं ॥ वस्ती होईल तुझी शेखी ॥ मग कैंचा पुरुष ते लोकीं ॥ दृष्टीगोचर होईल ॥२५॥ ऐसें बोलता वसु अंतरिक्ष ॥ परम लाजली पद्मिणी सुलक्ष ॥ परी पदच्युत शब्द ऐकतां प्रत्यक्ष ॥ स्तुतिसंवादा व्यापिली ॥२६॥ म्हणे महाराजा वसुनाथा ॥ अपराध झाला विषम आतां ॥ अपराधाचें विवरण करितां ॥ बोलतां न ये आम्हांसी ॥२७॥ परी हा असो प्रारब्धयोग ॥ कदा न सुटे आचरला भोग ॥ तरी उश्श्याप देऊनि आतां चांग ॥ स्वपदातें स्थापावें ॥२८॥ तुम्ही वसु सर्वप्रकारें ॥ भरलां आम्हां शांतिभांडारे ॥ परम कनवाळू इंद्रियें साचारें ॥ योगदमनीं मिरवला ॥२९॥ तरी उश्श्याप देऊनि मातें ॥ करीं महाराजा पदाश्रित ॥ मग अंतरिक्ष षाहूनि ढळाळिते ॥ उश्शापातें बदलासे ॥३०॥ म्हणे पद्मिणी ऐक वचन ॥ स्त्रीराज्यांत कीलोतळा स्वामीण ॥ तेथें आयुष्य सरल्या पूर्ण ॥ तैं पदीं वससील तूं माये ॥३१॥ परी मज भावें निवेदिलें चित्त ॥ तरी महीं मिरवेल माझा सुत ॥ तो तुज स्वीकारुनि होईल रत ॥ मच्छिंद्रनाथ म्हणोनियां ॥३२॥ तो रत झालिय अंगसंगीं ॥ पुत्र लाभसील रेतप्रसंगीं ॥ मीननाथ हें नाम जगीं ॥ प्रसिद्ध मिरवेल महीतें ॥३३॥ तो पुत्र झालिया तूतें शेवटीं विभक्ती होईल मच्छिंद्र जेठीं ॥ मग तूं स्वपदा येऊनि गोरटी ॥ भोग भोगीं स्वर्गीचा ॥३४॥ याउपरी बोलली मैनाकिनी ॥ पुरुष नाहीं कां तया भुवनीं ॥ सकळ स्त्रिय दिसती अवनीं ॥ काय म्हणोनी महाराजा ॥३५॥ तरी पुरुषावांचूनि संतती ॥ कोठूनि होतसे नसूनि पती ॥ येरु म्हणे येऊनि मारुती ॥ भुभुःकार देतसे ॥३६॥ उर्ध्वरेता वायुनंदन ॥ वीर्य व्यापितसे भुभुःकारेकरुन ॥ मग उत्पत्ति उदयजन्म ॥ तेथें होतसे शुभानने ॥३७॥ बाळतनु जो पुरुषधारी ॥ मृत्यु पावे तो भुभुःकारीं ॥ तितुक्याविण अचळनारी ॥ महीवरी विराजती ॥३८॥ ऐसें वदता अंतरिक्ष मात ॥ मम बोले पद्मिणी जाऊन त्वरित ॥ हे महाराजा मच्छिंद्रनाथ ॥ येईल कैसा त्या ठाया ॥३९॥ प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ॥ ऐसी चर्चा तेथें असून ॥ कैसा येईल तव नंदन ॥ मम भोगार्थ महाराजा ॥४०॥ अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी ॥ तूं कीलोतळेचे उपरी जाऊनि ॥ बैसोनि उपरी तपमांडणीं ॥ अराधावा मारुती ॥४१॥ प्रसन्न झालीया वायुनंदन ॥ मग मुक्त करील त्या भयापासून ॥ परी तुज सांगतों ती खूण ॥ चित्तामाजी रक्षावी ॥४२॥ प्रसन्न होईल जेव्हां मारुती ॥ मागणे करिजे अंगसंगती ॥ मग तो संकटीं पडूनि क्षिती ॥ मच्छिंद्रातें आणील ॥४३॥ तरी हा रचूनि दृढतर उपाय ॥ मिरवत आहे मारुती भय ॥ तरी तयाचे हस्तें साधावें कार्य ॥ मच्छिंद्रातें आणोनी ॥४४॥ याउपरी बोले पद्मिणी युवती ॥ रामचरणीं श्रीमारुती ॥ कैसें मातें द्यावी गती ॥ ऐसें म्हणावें महाराजा ॥४५॥ परी ऐसिये बोलप्रकरणी ॥ मारुतीच मिरवला विषयध्वनी ॥ मग तव सुत मच्छिंद्र कोठूनीं ॥ येथें येईल महाराजा ॥४६॥ ऐसें अंतरिक्ष ऐकतां वचन ॥ म्हणे विषयोपद्रवरहित वायूनंदन ॥ ब्रह्मचर्यव्रतातें लोटून ॥ रतिसुखातें मिरवेल ॥४७॥ तरी हा संशय सोडूनि गोरटी ॥ अर्थ धरिजे इतुका पोटीं ॥ मच्छिंद्रा लाहसील येणे कोटीं ॥ हनुमंतेकरुनियां ॥४८॥ ऐसें सांगूनिया अंतरिक्ष ॥ स्वस्थाना गेला वसु दक्ष ॥ येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष ॥ स्त्रीराज्यांत प्रवर्तली ॥४९॥ शृंगार मुरडा राजपट्टणीं ॥ भ्रमणकरितां ती पद्मिणी ॥ तो ते चर्मिकेचे सदनी ॥ सहजस्थिती पातली ॥५०॥