Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १२

श्रीगणेशाय नमः जयजयाजी भगवंता ॥ पाळक नरहरीच्या सुता ॥ नरहरीरुपा कंदर्पताता ॥ अवतार अनंत मिरविशी ॥१॥ तरी आतां पुढें ग्रंथ ॥ बोलवीं बरवे रसभरित ॥ मागिले अध्यायीं मच्छिंद्रनाथ ॥ स्त्रीराज्यांत पै गेला ॥२॥ उपरी जालिंदराचा जन्म ॥ यज्ञकुंडीं उत्तमोत्तम ॥ उपरी पश्वात्तापेंकरुन ॥ पर्वतदरींत निघाला ॥३॥तेथें प्रगटूनि ज्वाळामाळी ॥ तो परम स्नेहाचे नव्हाळीं ॥ अंकी घेऊनि त्या काळीं ॥ जन्मकथा सांगितली ॥४॥ आहे इतुकी कथा श्रोतीं ॥ पूर्वाअध्यायीं संपली होती ॥ आंता पुढें अवधानाप्रती ॥ श्रवणार्थी मिरवावें ॥५॥ असो महाराज द्विमूर्धनी ॥ सकळ जन्माची कथा सांगोनी ॥ उपरी बोले कामना मनीं ॥ कोणती बाळा ती सांग ॥६॥ येरु म्हणे जी महाराज ॥ कामनाविरहित मन माझें ॥ आहे परी हितार्थ गुज ॥ सकळ जाणसी तूं ताता ॥७॥ या नरदेहाची झाली प्राप्ती ॥ तरी सार्थक ओपीं माझें हातीं ॥ नाहीं तरी आले तैसे जाती ॥ ऐसें न करी महाराजा ॥८॥ जैसा उदककुंभ साचार येथें ॥ तो मळ उसके जेथें तेथें ॥ परी तयाचा विस्तार महीतें ॥ कांहीं एक मिरवेना ॥९॥ तरी व्यर्थ जन्मूनि मरण ॥ कीं लोहकाराचे भाते भरुन ॥ कीं भाडाईत ग्रंथिक रचून ॥ व्यर्थ शीण वृषभातें ॥१०॥ तरी आतां ऐक ताता ॥ मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता ॥ तिहीं भुवनांभाजी सत्ता ॥ चिरंजीवित्व संपादीं ॥११॥ लोक म्हणती जालिंदर झाला ॥ परी मेला नाहीं ऐकिला ॥ ऐसें न करुनियां देहाला ॥ जगीं मिरवी हे ताता ॥१२॥ ऐसें ऐकूनियां ज्वलन ॥ मौळी तुकावोनि डोलवी ॥ मान ॥ म्हणे बाळाचे धन्य ज्ञान ॥ वयासमान नसे कीं ॥१३॥ मग त्वरें तो द्विमूर्धनी ॥ जालिंदरासी स्कंधीं वाहोनी ॥ अनसूयानंदनस्थानीं ॥ त्वरें जाऊनि पोहोंचला ॥१४॥ तव त्या महाराज अत्रिनंदनास ॥ अग्नीसी पाहोनि झाला हर्ष ॥ मग पुढें होऊनि हव्यवाहनास ॥ आलिंगिलें सुप्रेमें ॥१५॥ म्हणे महाराजा मम दैवता ॥ तेजःपुंज जेवी सविता ॥ कवण कामना वेधूनि चित्ता ॥ येथें आलासीं महाराजा ॥१६॥ मज आळशियावरी ओघ ॥ ओघिला गंगोदकीं चांग ॥ कीं क्षुधिता धेनु लागूनि माग ॥ पयापान करवीतसे ॥१७॥ कीं तमाचें होता वेष्टण ॥ अर्कं दिवटा आला होऊन ॥ कीं मृत्युसमयीं पीयूषपान ॥ पीयूषचि करवी आग्रहें ॥१८॥ तेवीं येथें झाली परी ॥ गंगा ओघिली आळशावरी ॥ मग बैसूनि निकट शेजारीं ॥ वर्तमान पुसतसे ॥१९॥ परी महाराजा द्विमूर्धन ॥ हा कोणाचा आहे नंदन ॥ येरी म्हणे पंचबाण ॥ शिवदेहीचा हा असे ॥२०॥ कीं शिवदेहीचा काम श्रेष्ठ ॥ म्यां दाहिला हें बोलती स्पष्ट ॥ परी जठरीं रक्षिला होता वरिष्ठ ॥ आजपर्यंत महाराजा ॥२१॥ मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडांत ॥ प्रगट केलें या देहातें ॥ तस्मात् महाराजा तुमचा सुत ॥ तूंचि आतां संगोपीं ॥२२॥ तरी यातें अनुग्रह देऊनी ॥ जगी मिरवीं सनाथपणीं ॥ हा चिरंजीव असो शिवकामनी ॥ मृत्यु कदा न पावो ॥२३॥ प्रमथ दशकर रेत वहिला ॥ मम जठरीं त्यावरी जन्मला ॥ तस्मात् श्रेष्ठ उभयपक्षांला ॥ चिरंजीव असो हा ॥२४॥ जैसा लाभल्या रस पीयुष ॥ उपरी संजीवनी साह्य त्यास ॥ मग तो निर्मय यमसदनास ॥ यमापाशीं मिरवेळ ॥२५॥ कीं घृतशर्करेची पडतां मिठी ॥ नको कोण म्हणेल या कडवटीं ॥ का चंद्रअर्काची झाली भेटी ॥ उजेड कांहीं दिसेना ॥२६॥ तेवीं शिवकाम माझें जठर ॥ ऐक्य झालिया श्रेष्ठाकार ॥ त्यांत नारायण नव साचार ॥ अंतरिक्ष संचरला ॥२७॥ याही उपरांतिक ऐका परी ॥ मौंजी विराजल्या स्वामीकरीं ॥ मग तें माहात्म्य कवणापरी ॥ जगामाजी काय वर्णावें ॥२८॥ आधीं सुवर्ण सोवळा दासी ॥ त्यावरी सुगलें हेमकर्णी ॥ जडित नवरत्न सुढाळ कोंदणीं ॥ तें कोण लेऊं म्हणेना ॥२९॥ कीं आधींच सुगंध मलयागार ॥ मृदमद झाला असे त्यावर ॥ त्यावरी शृंगारुनि सुंदर ॥ कोण उटी घेईना ॥३०॥ तस्मात् ऐशा झाल्या गोष्टी ॥ वरदकरीं तव गा तपोजेंठी ॥ मग जालिंदर महीपाठीं ॥ कीर्तिसूर्य मिरवेल ॥३१॥ परी ते पावकी रसाळ वचन ॥ वर्षते अमृतचन ॥ तेणें चातकमन ॥ तुष्ट झालें शरीरीं ॥३२॥ मग म्हणे जी महाराजा ॥ पुरवीन आतांचि काम तुझा ॥ परी द्वादश वर्ष विजयध्वजा ॥ मजपाशीं ठेवीं हा ॥३३॥ अवश्य म्हणूनि ज्वाळमौळी ॥ म्हणे रक्षणें आपणांजवळी ॥ परी मज देखतां हस्त मौळीं ॥ वरदकरणी मिरवावा ॥३४॥ मग तो सुपात्र अत्रिनंदन ॥ अंकीं घेत जालिंदर रत्न ॥ सकळ कळांतें सांगून ॥ विकल्पाते नुरवीतसे ॥३५॥ पहा हो कृपेची सदट नव्हाळी ॥ वरदहस्त स्पर्शितां मौळीं ॥ कर्णी ओपितां मंत्रावळी ॥ अज्ञान काजळी फिटलीसे ॥३६॥ परी मंत्राक्षर अंबुदाकार ॥ पूर्ण संचरता कर्ण पात्र ॥ मग ती मही पिकें विचित्र ॥ ब्रह्मपणें मिरवली ॥३७॥ मग तातचि तात अनुपम ॥ चराचरादि स्थावरजंगम ॥ एके रुपीं सनातन ॥ ब्रह्मप्राप्ती मिरवली ॥३८॥ ऐसा झालिया स्वतंत्र विचार ॥ मग करुनी दत्तासी नमस्कार ॥ महाराज तो वैश्वानर ॥ अदृश्यपणें मिरवला ॥३९॥ मग दत्तात्रेय आणि जालिंदर ॥ विराजले पर्वतगिरीदर ॥ मग प्रेमें अभ्यासीं चमत्कार ॥ दृश्यादृश्य कळतील ॥४०॥ मग सवें घेऊनि जालिंदरासी ॥ नित्य गमन करी महीसी ॥ स्नान करुनि भागीरथीसी ॥ विश्वेश्वरासी ॥ नमिताती ॥४१॥ तेथूनि भोजन पांचाळेश्वरी ॥ भिक्षा मागावी कोल्हापुरीं ॥ निद्रा जयाची मातापुरीं ॥ माहूरगड म्हणविताती ॥४२॥ असो ऐसे द्वादश वरुषांत ॥ नाना अस्त्रांसही घेत ॥ प्रवीण करी बाळा समर्थ ॥ विद्याभांडार भरुनिया ॥४३॥ जालिंदराचें दास्य पाहून ॥ घडिघडि आल्हाद पावे मन ॥ सकळ विद्येचें रत्न ॥ तयालागीं भूषणातें ॥४४॥ वातस्त्रादि जलदास्त्र ॥ अग्न्यस्त्र धूमास्त्र ॥ वाताकर्षणं कामास्त्र ॥ पर्वतास्त्र निवेदिलें ॥४५॥ वज्रास्त्र आणि वासवशक्ती ॥ नागास्त्र प्राणाहुती ॥ खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती ॥ मोहनास्त्र सांगितले ॥४६॥ निर्वाणास्त्रादि संजीवनी ॥ रुद्रास्त्र आणि प्रळयाग्नीं ॥ विरक्तास्त्र कामासनीं ॥ मोहनास्त्र सांगितलें ॥४७॥ दानवास्त्र देवास्त्र पूर्णतप ॥ काळास्त्र मिरविती यमादि दस ॥ स्तवनास्त्रगती उत्तम ॥ जिंकूं शके ब्रह्मांड ॥४८॥ कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र ॥ विभक्तास्त्र जारणास्त्र ॥ शापास्त्र आणि मरणास्त्र ॥ शरास्त्रही शिकविलें पैं ॥४९॥ ऐसा द्वादश वर्षात ॥ सकळाखीं प्रवीण केला नाथ ॥ आयुष्य भविष्य गमनार्थ ॥ सकळ विद्या निरुपिल्या ॥५०॥