Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३३

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी जगदुद्धारा ॥ कनकवर्णा नरहरि चतुरा ॥ ऐक्यत्वकारणें हरिहरां ॥ शक्य एक तुझेंचि ॥१॥तरी आतां कृपा करुनी ॥ ग्रंथ सुचवीं सुढाळ रत्नीं ॥ शुभ योगी श्राव्य भाषणीं ॥ स्वीकार करीं महाराजा ॥२॥ मागिले अध्यायीं मच्छिंद्रनंदन ॥ त्रिविकमदेहीं संचरुन ॥ गोरक्ष तीर्थस्नानाकारणें ॥ धाडिलसे मच्छिंद्रें ॥३॥ यापरी गोरक्षनाथ ॥ महीं भ्रमतां नानी तीर्थ ॥ तो गोदातटीं अकस्मात ॥ येऊनियां पोहोंचला ॥४॥ तों गोदातटीं भामानगर ॥ तया अरण्यांत गौरकुमर ॥ परम झाला क्षुधातुर ॥ जठरानलें करुनियां ॥५॥ ग्राम पाहतां तो अरण्यांत ॥ उदक एक योजन न मिळे तेथ ॥ तया स्थानी क्षुधाक्रांत ॥ अनल जैसा पेटला ॥६॥ मार्गी चालतां दिशा लक्षीत ॥ तों शेत देखिलें अकस्मात ॥ कृषिकर्म प्रांजळवंत ॥ पाहूनि सुमार धरियेला ॥७॥ तंव तो कृषीवल माणीकनामी ॥ वय दश वर्षे देहधर्मी ॥ मध्यान्हसमय साधूनी ॥ भोजनातें बैसला ॥८॥ पात्र घेतलें पुढें वाढून ॥ कवळ करावा जों मुखीं अर्पण ॥ तों अकस्मात गौरीनंदन ॥ आदेश शब्द गाजवी ॥९॥ तंव तो माणीक कृषि शेतीं ॥ ऐकूनि आदेश शब्दाप्रती ॥ योजिला कवळ ठेवूनि हातीं ॥ प्रेमें नमीत तयातें ॥१०॥ म्हणे महाराजा तुम्ही कोण ॥ किमर्थ घेतलें आडरान ॥ येरु म्हणे मी तपोधन ॥ क्षुधानळीं पेटलों ॥११॥ परम झालों तृषाकांत ॥ म्हणोनि होऊनि आलों अतिथ ॥ तरी सन्निध अन्न असेल तूतें ॥ भिक्षा आम्हां ओपावी ॥१२॥ ऐशी ऐकतां तयाची वाणी ॥ म्हणे महाराजा योगेंद्रमुनी ॥ निधान आहे मनोधर्मी ॥ पात्र वाढिलें भक्षावें ॥१३॥ मग तो उठोनि त्याचि वेळीं ॥ शीघ्र ओपी पत्रावळी ॥ आणि मृत्कुंभ भरोनि जवळी ॥ शीघ्र करी पुढारां ॥१४॥ मग तो गोरक्ष तपोधन ॥ हस्तपाद प्रक्षाळून ॥ अन्नपात्र पुढें घेऊन ॥ जठराहुती घेतसे ॥१५॥ पूर्ण झाल्या जठराहुती ॥ मग सहजचि तुष्ट झाला चित्तीं ॥ कीं रुखा होतां जलप्राप्ती ॥ लवणाकार पावतसे ॥१६॥कीं दरिद्याप्रती देतां धन ॥ मग कां न पावे तुष्ट मन ॥ कीं यथेच्छ मेळविता झाल्याकारण ॥ तोष शरीरीं मिरवेना ॥१७॥ तन्नाय कृषिनरेंद्रात्तमा ॥ घडूनि आलें तुष्टमहिमा ॥ मग प्रसन्न होऊनि चित्तद्रुमा ॥ वरदफळा दावी तो ॥१८॥ म्हणे कृषिका कवण काम ॥ मिरवला हो देहधर्मी ॥ येरु ऐकोनि म्हणे स्वामी ॥ आतां कासया पुसतां हो ॥१९॥ तरी महाराजा आटाआटी ॥ करावी प्रथम कार्यासाठी ॥ कार्य झालिया व्यर्थ चावटी ॥ अन्यासी कासया शिणवावें ॥२०॥ तरी आतां कार्य झालें ॥ पुढें योजीं शीघ्र पाउलें ॥ गोरक्ष म्हणे बोलशी बोल ॥ सत्य असती तुझे बा ॥२१॥परी तुवां मातें दिधलें अन्न ॥ तेणें मम चित्त झालें प्रसन्न ॥ तरी तव देहीं किंचित पण ॥ सत्य असेल वद मातें ॥२२॥ जे जे कामना असेल तूतें ॥ ती पूर्ण पावशी फळसहितें ॥ येरी ऐकूनि कृषी त्यातें ॥ ऐसें उत्तर देतसे ॥२३॥ म्हणे महाराजा महीपाठीं ॥ तुम्हीच हिंडतां भिकेसाठी ॥ ते तुम्ही मोह धरुनि पोटीं ॥ मातें काय द्याल जी ॥२४॥ भणंगापाशीं भणंग गेला ॥ तो काय देऊनि तृप्त झाला ॥ खडका उदकपान्हा बोला ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥ तुम्ही तेवी हिंडतां अन्नासाठी ॥ आम्हां काय देणार जेठी ॥ नाथ म्हणे इच्छातुष्टा ॥ आतां तुझी करीन बा ॥२६॥ येरी म्हणे पुरें बोलणें ॥ काय आहे तुम्हांस्वाधीन ॥ तरी आणिक तुजकारण ॥ लागत असेल तें माग ॥२७॥ नाथ म्हणे रे एक दान ॥ तुवां दिधल्या झालों प्रसन्न ॥ तरी कांहीतरी मजपासून ॥ मागूनि घेई कृषिराया ॥२८॥ येरु म्हणे उगला ऐस ॥ तुवां काय द्यावें आम्हांस ॥ तरी कांहीं न मागूं सुरस ॥ पंथ आपुला क्रमीं कां ॥२९॥ ऐसे बोलतां माणीकनामी ॥ गोरक्ष विचारी आपुलें मनीं ॥ आडबंग असती कृषिधर्मी ॥ सदा विपिनीं बैसूनियां ॥३०॥ तरी हा मातें म्हणतो माग ॥ परी त्याच्याचि हितार्थ करावा लाग ॥ ऐसें विचारोनि मनोवेगें ॥ तयालागीं बोलतसे ॥३१॥ म्हणे कृषिराया ऐक वचन ॥ तूं आम्हांसी म्हणशील देऊं देणें ॥ तरी मागें सरस वचन ॥ निश्चयें करुनियां बोलावें ॥३२॥ येरु म्हणे तापसा ऐक ॥ मातें दिससी महामूर्ख ॥ जो देणार आपुले आत्मसुख ॥ तो मागें सरणार नाहीं कीं ॥३३॥ अरे चंद्र असे शीतळपणीं ॥ तरी तो वर्षेल दाहकपणीं ॥ परी तो ढळणार नाहीं प्राणी ॥ मागें पाऊल कासया ॥३४॥ सविताराज तेजोदीप्ती ॥ तोही अंधकारीं करील वस्ती ॥ परी उदार तो औदार्याप्रती ॥ मागें पाऊल सारीना ॥३५॥ मही गेलिया रसातळीं ॥ परी औदार्यप्राप्ती महाबळी ॥ त्या कृपणत्व कदाकाळी ॥ अंगालागीं स्पर्शेना ॥३६॥ तरी कोणतें मागणें तूतें ॥ मागूनि घेईजे त्वरितें ॥ मी बोललों निश्चयातें ॥ निश्चय माझा पाहीं कां ॥३७॥ ऐशी बोलतां विपुल वार्ता ॥ गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता ॥ तरी मनाचे करणें मागूं आतां ॥ कैसा सांभाळील पाहू तो ॥३८॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ म्हणे मज दावीं कां विपिनपती ॥ जें जें आवडेल तुजे चित्तीं ॥ तें तूं न करीं महाराजा ॥३९॥ कांही एक इच्छील तुझें मन ॥ तें तूं न करणें हेंचि मागणें ॥ इतुकें देऊनि तुष्टपण ॥ बोळवीं कां कृषिराजा ॥४०॥ऐशीं वदतां तयाची वाणी ॥ अवश्य म्हणे कांषकर्मी ॥ हा धर्म आतां आपुले धर्मी ॥ अर्कअवधीं रक्षीन गा ॥४१॥ ऐशी तैशी देऊनि भाक ॥ तुष्ट केलें शरीरास ॥ असो गोरक्ष त्या विपिनास ॥ सांडूनियां चालिला ॥४२॥ माणिकनामी कृषी शेतांत ॥ मुक्त करिता झाला औत ॥ येठणें बांधूनि समस्त ॥ भार सकळ वाहातसे ॥४३॥ वृषभा मागें दिधलें लावून ॥ मौळीं घेत येठण उचलून ॥ मनांत म्हणे ग्रामासी जाऊन ॥ क्षुधाबल घालवावें ॥४४॥ इतुकी मनीं योजना होतां ॥ स्मरण झालें गोरक्षनाथा ॥ पुत्र कल्याण आणितां चित्ता ॥ मनाचें करणें उल्लंधावें ॥४५॥ मन इच्छीत असे घरीं जावया ॥ तरी आपण न जावें तया ठाया ॥ मग तेथेंचि उभा राहूनियां ॥ गाढ निद्रा करीतसे ॥४६॥ मौळीं येठणाचा भार ॥ घेऊनि उभा महीवर ॥ नेत्र झांकूनि चिंतापर ॥ हरिनामीं योजितसे ॥४७॥ मन इच्छी हालवूं अंग परी न हाले धडभाग ॥ स्थिर होऊनि संचरले ओघ ॥ वचनार्थ संपादी ॥४८॥ तरुपर्ण जे येती उडोन ॥ तेचि करीतसे भक्षण ॥ मनीं येतां सांठवण ॥ तेही त्याग पर्णीचे करीतसे ॥४९॥ मग सहजस्थितीं वायुलहर ॥ अकस्मात येतसे मुखावर ॥ तितकेचि प्राशन आहारपर ॥ अमल मन होतसे ॥५०॥