Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीशा ॥ रुक्मिणीवरा आदिपुरुषा ॥ पुंडलीकवरदा पुंडरीकाक्षा ॥ सर्वसाक्षी जाणता तूं ॥१॥ हे जगत्पालका जगन्नायका ॥ ब्रह्मांडावरी यादवकुळाटिळका ॥ आतां भक्तिसारीं दीपिका ॥ ग्रंथार्थदृष्टी मिरवावी ॥२॥ मागिले अध्यायीं सिद्धसाधन ॥ श्रीमच्छिंद्रनाथा आलें घडोन ॥ उपरांतिक भस्मदान ॥ सरस्वतीतें तेणें केलें ॥३॥ केले परी दैवहत ॥ तिनें टाकिलें गोमहींत ॥ परी फार ठकली अदैववंत ॥ अतिहीन प्रारब्धीं ॥४॥ घर पुसत लाभ आला ॥ तो निर्दैवपणें पदीं लोटिला ॥ कीं पुढें मांदुस येतां वहिल ॥ अंध होय आवडीनें ॥५॥ कीं अवचट लाधला चिंतामणी ॥ तो आवडी गोवी गोफणी ॥ कीं खडा म्हणोनि देतो झोंकोनी ॥ कृषिशेतीं टाकीतसे ॥६॥ कीं अवचट लाधतां पीयूषघट ॥ विष म्हणोनि करी वीट ॥ तेवीं विप्रजाया अदैवें पाठ ॥ नाडलीसे सर्वस्वीं ॥७॥ सहज काननीं फिरतां फिरतां ॥ जाऊनि बैसे कल्पतरुखालता ॥ परी दैवइच्छे भूत खाईल आतां ॥ तन्न्यायें नाडली ॥८॥ कीं कामधेनु गृहीं आली ॥ ती बाहेर बळेंचि दवडिली ॥ तन्न्यायें परी झाली ॥ नाडलीसे सर्वस्वें ॥९॥ किंवा बाण ढाळितां खेळींमेळीं ॥ निधान लाधला हस्तकमळीं ॥ तो गार म्हणोनि सांडिला जळीं ॥ महाडोहीं निर्दैवें ॥१०॥ कीं सहज आतुडे हातीं परीस ॥ खापर म्हणोनि टाकितसे त्यास ॥ कीं घरा आला राजहंस ॥ वायस म्हणोनि दवडिला ॥११॥ कीं हार देऊं देव उदित ॥ परी त्यासी भासलें परम भूत ॥ तन्न्यायें विप्रकांतेस ॥ घडोनि आलें महाराजा ॥१२॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ पूर्वसमुद्रीं जगस्त्राथ ॥ करोनि सेतुबंधा येत ॥ रामेश्वरदर्शनीं ॥१३॥ तो श्वेती येऊनि करी स्नान ॥ अवचट देखिला वायुनंदन ॥ क्लेशशरीरा जरा व्यापून ॥ सान शरीरी बैसला ॥१४॥ तया संधींत मेघ वर्षाव ॥ करिता झाला सहजस्वभाव ॥ दरडी उरकोनि गुहा यास्तव ॥ करिता झाला मारुती ॥१५॥ वरुनि वर्षाव पर्जन्य करीत ॥ येरु इकडे दरडी उकरीत ॥ तें पाहोनि मच्छिंद्रनाथ ॥ विस्मयातें पावले ॥१६॥पावला परी हटकोनि बोलत ॥ म्हणे मकंटा तूं मूर्ख बहुत ॥ आतां करिसी सदन निश्वित ॥ स्वशरीर रक्षावया ॥१७॥ पर्जन्य वर्षे विशाळधार ॥ यांत कधीं करसील घर ॥ जैंसे तस्करीं लुटलियावर ॥ दीपा तेल भरीतसे ॥१८॥कीं बाईल गेलिया झोंपा केला ॥ तैसा न्याय घडोनि आला ॥ कीं स्वसदनातें पावक लागला ॥ कूप खणी विझवावया ॥१९॥कीं ग्रीवे पडतां काळफांस ॥ मग वाचिता होय अमरस्तोत्रास ॥ कीं परम पीडितां तृषार्तास ॥ कूप खणूं म्हणतसे ॥२०॥ कीं हदयीं पेटला जठरानळ ॥ कामधेनूचें इच्छिती फळ ॥ किंवा मेघ ओसरल्या बीजें रसाळ ॥ महीलागीं पेरीतसे ॥२१॥ तन्न्यायें पर्जन्यकाळ ॥ सदन करिसी उतावीळ ॥ तस्मात् मूर्ख मर्कट वाचाळ ॥ मिरवूं आलासी पुढागं ॥२२॥ ऐसें ऐकोनि वायुनंदन ॥ म्हणे चतुर आहेस कोण ॥ येरु म्हणे जती पूर्ण ॥ मच्छिंद्र ऐसें मज म्हणती ॥२३॥ येरु ह्नणे तूतें जती ॥ कोणे अर्थी लोक म्हणती ॥ नाथ म्हणे प्रतापशक्ती ॥ आहे म्हणोनि वदतात ॥२४॥ यावरी बोले वायुसुत ॥ आम्ही आयिकतों जती हनुमंत ॥ तुम्ही नूतन जती महींत ॥ एकाएकीं उदेलां ॥२५॥ तरीं आतां असो कैसें ॥ मी मारुतीच्या शेजारास ॥ भावें राहोनि एक वेळेस ॥ वरिलें आहे महाराजा ॥२६॥ तेही कला सहस्त्रांशीं ॥ मातें लाधली महापरेशी ॥ ते तुज दावितों या समयासी ॥ तयापासाव जे प्राप्त झाली ॥२७॥ तरी त्या कळेचें निवारण ॥ करोनि दावीं मजकारण ॥ नातरी जती ऐसें नाम ॥ सोडोनियां जाई बां ॥२८॥ यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ कोणती कळा ती दावीं मातें ॥ तिचें निवारण श्रीगुरुनाथ ॥ करी जाण निश्वयें ॥२९॥ जैसा श्रीराम असतां शयनीं ॥ पाहे मारुती वृक्षावरोनी ॥ नाना पर्वत टाकी उचलोनी ॥ रामशरीरा योजोनियां ॥३०॥ परी रामें न सोडितां शयन ॥ सज्ज करुनि चापबाण ॥ सकळ पर्वतांकारण ॥ निवारण करी तो ॥३१॥ तन्न्यायें श्रीगुरुराज ॥ सकळ अर्थी पुरवील चोज ॥ सकळ ब्रम्हांडाचें ओझें ॥ नखाग्रीं धरील तो ॥३२॥ तेथें तुझी मर्कटा कथा ॥ किती असे दावी आतां ॥ फार करिसील पाषंडता झोकसील कवळीनें ॥३३॥ तरी आतां कां करिसी उशींर ॥ मर्कटा दावीं चमत्कार ॥ ऐसें ऐकतां वायुकुमर ॥ पूर्ण चित्तीं क्षोभला ॥३४॥ उड्डाण करोनि जाय एकांता ॥ तेथें धरी भीमरुपता ॥ न कळतां त्यातें सात पर्वतां ॥ उचलोनिया फेकिले ॥३५॥ नभमंडपीं ढगासमान ॥ पर्वत येतसे पंथीं गगन ॥ तें मच्छिंद्रनाथें दृष्टी पाहोन ॥ स्थिर स्थिर म्हणतसे ॥३६॥ वातप्रेरक मंत्रशक्ति ॥ वाटेंत कोंदली पर्वतीं ॥ तो येरीकडे आणिक मारुती ॥ दुसरा पर्वत फेकितसे ॥३७॥ तो दुसरा म्हणतां तिसरा येत ॥ चवथा पांचवा शतानुशत ॥ मग एकचि मंत्रे करोनि वात ॥ ठायींचे ठायीं रोधिला ॥३८॥ जैसे कंदुक बाळ खेळती ॥ मध्ये अटकतां परते पंथी ॥ तन्न्याय झाला पर्वती ॥ ठायींच्या ठायीं जाती ते ॥३९॥ येरीकडे वायुनंदन ॥ पर्वत परतता दृष्टी पाहोन ॥ पूर्ण क्षोभला जेवीं कृशान ॥ महाप्रळयकाळींचा ॥४०॥ मग महापर्वत एक विस्तीर्ण ॥ उचलोनि बाहुमस्तकीं अर्पून ॥ फेंकावा तो मच्छिंद्रनाथानें ॥ निजदृष्टीने देखिला ॥४१॥ मग अब्धिउदक घेऊनी ॥ वायुआकर्षणमंत्र म्हणोनि ॥ सबळ झुगारोनि पाणी ॥ वायुनंदन सिंचिला ॥४२॥ तेणें भरोनि शरीरीं वात ॥ चलनवलन सर्व सांडीत ॥ ऊर्ध्व झाले दोन्ही हात ॥ मौळीं पर्वत राहिला ॥४३॥ मग ते जैसी स्तंभावरी ॥ रचिली म्हणती द्वारकापुरी ॥ तेवी मारुती शिरावरी ॥ पर्वतातें मिरवीतसे ॥४४॥ खाली टाकावया न चले बळ ॥ जेवीं विरला हस्त विकळ ॥ पदीं चालावयाही बळ ॥ कांही एक न चाले ॥४५॥ तें पाहोनियां दीन बाळ ॥ हदयीं कवळी तात अनिळ ॥ मग प्रत्यक्ष होऊनि रसाळ ॥ सोडीं सोडीं बाळातें ॥४६॥ तैं अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ वातशक्ती ॥ संगीत झाली देइस्थिती ॥ मग समीप येऊनि नाथाप्रती ॥ धन्य धन्य म्हणतसे ॥४८॥ यावरी बोलता झाला अनिळ ॥ बा मारुती तुझे न चले बळ ॥ तुज मज आतीनिर्बळ ॥ बांधोनि केलें सिद्धानें ॥४९॥ जेणें तुझियां बापा बांधिलें ॥ त्यासी तुझें भय काय आले ॥ त्याचें आचरण तैसें झालें ॥ भक्तिशक्ति अघटित ॥५०॥