Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २३

श्रीगणेशाय नमः जयजयाजी कमळानना ॥ दुष्टदानवअसुरमर्दना ॥ भक्तकामचकोरचंद्रानन ॥ यादवेंद्रा आदिपुरुषा ॥१॥ हे पयोब्धिवासा यदुकुळटिळका ॥ पुढें बोलवीं कथानका ॥ जेणें श्रोतियां चित्तदोंदिका ॥ आनंदाब्धि उचंबळे ॥२॥ मागिले अध्यायीं सौराष्ट्रग्रामीं ॥ गोरक्षानें मीननाथा मारुनी ॥ पुन्हां उठविलें परीक्षा देऊनी ॥ श्रीगुरुच्या भावने ॥३॥ मच्छिंद्रें धरुनि अज्ञानपण ॥ मीननाथासवे केलें रुदन ॥ परी गोरक्षाचें जाणीवपण ॥ परीक्षेंतें आणिलें ॥४॥ असो यापरी तेथूनि निघून ॥ मार्गी करीत चालिले गमन ॥ तों तैलंगदेशीं गोदासंगमन ॥ समुद्रतीरा पातले ॥५॥ गोदांसंगमीं करुनि स्नान ॥ आत्मलिंग शिवातें भावें पूजून ॥ तेथूनि गोदेचे तट धरुन ॥ पांश्वमदिशे गमताती ॥६॥ तों बारा लिंगांतील लिंग समर्थ ॥ आंवढ्या आणि परळी वैजनाथ ॥ तैं करुनियां सव्य गोदातीर्थ ॥ घेऊनियां चालिले ते ॥७॥ मार्गी चालितां गोदा सव्य ॥ तो वाल्मीकस्थान विपिनमय ॥ गर्भगिरि पर्वतप्राय ॥ येऊनियां तेथें पोचले ॥८॥ तें रान कर्कश अचाट ॥ गगनचुंबित तरु अफाट ॥ तयांमाजी तृण अफाट ॥ न मिळे वाट चालावया ॥९॥ व्याघ्र जंबूक शार्दूळ हरी ॥ वराह रीस काननातरीं ॥ हिंडती ते उन्मत्तापरी ॥ उग्र वेष दावूनियां ॥१०॥ जाळिया वेली कर्दळी सघन ॥ कीं जेथें रश्मींचें न पवे दर्शन ॥ कीं अर्कोदया लपे गगन ॥ ऐसा भास वाटतसे ॥११॥ बोरी बाभळ पळस शमी ॥ रातांजन कंदर्क्प अनेकनामी ॥ खैर हिंवर कंटकधामी ॥ काननांत तरु मिरवती ॥१२॥ एक तुराट्ट अर्की फुल्लाट ॥ वरकड तीक्ष्ण कंटकनट ॥ तेवीं कनकखंडजाळी अचाट ॥ पर्णकुटिका जैसा कीं ॥१३॥ तयांमाजी तृण उचित ॥ स्थावर तरु जाहले व्यक्त ॥ तेणें धरादेवींचें सहसा नितांत ॥ झाकिन्नले शरीर ॥१४॥ महा तें कानन सुरस ॥ वसन नेसविलें भूदेवीस ॥ हरितवर्णी कुसुमपदरास ॥ बुटलिंगी मिरवली ॥१५॥ म्हणाल कासया नेसली वसन ॥ तो परपुरुष दिनकर गगनीं ॥ म्हणूनि कुळवंत दारा लज्जेनें ॥ स्वशरेंरा लपवी ती ॥१६॥ म्हणूनि मित्रकांता जागा ॥ सांडूनि बैसल्या अंबुजभागा ॥ धरादेवीच्या लज्जित मार्गी ॥ लक्षूनियां रक्षिंले ॥१७॥ ऐसियापरी कानन अचाट ॥ दर्शन नोहे महीपाठ ॥ तेथें पाहूनि मच्छिंद्र सुभट ॥ मनामाजी दचकला ॥१८॥ दचकला परी कवण अर्थ ॥ कनकंवाटे जे होती भस्मझोळींत ॥ तस्कर कोणी हरतील तीतें ॥ म्हणूनि चित्तीं विस्मित ॥१९॥ तैसा नव्हे आणिक अर्थ ॥ गोरक्षाचा लोभी स्वार्थ ॥ पहावया परीक्षेंत ॥ मच्छिंद्रनाथ उदेला ॥२०॥ आपण घेऊनि अज्ञान ॥ पाहे गोरक्षाचें लक्षण ॥ नातरी प्रतापवान ॥ तस्करभय त्या नाहीं ॥२१॥ कीं ये तमाचा प्रतापजेठीं ॥ अर्का संचरे भय पोटीं ॥ कीं उदधीचीं बळी चंचुपुटीं ॥ लागतां कोप काय थरथराटे ॥२२॥ कीं मशकाचे उड्डाणें ॥ मंदराचळ व्यापेल कीं भयानें ॥ कीं सर्पकृत किंवा वृश्चिकदंशानें ॥ खगेंद्रा काय भय त्याचे ॥२३॥ तन्न्यायें मच्छिंद्रनाथ ॥ पाळूं न शके तस्कर तयातें ॥ परी श्रीगोरक्षाचें चित्त ॥ परीक्षेसी उदेलें ॥२४॥ कल्पूनि चित्तीं ऐसियापरी ॥ मग गोरक्षातें जती वागुत्तरीं ॥ बोलतां झाला काननांतरी ॥ पाचारुनि निकटत्वें ॥२५॥ म्हणे वत्सा ऐक बा कैसें ॥ उद्भट दिसे विपिन कर्कश ॥ तरी कांहीं भय अरण्यास ॥ नांदतें कीं तस्करीं ॥२६॥ परम पूर्ण व्यक्त तरुदाटी ॥ जेथें अर्क न पडे दृष्टीं ॥ ऐसिये काननीं कर्कश पोटीं ॥ मज भय आज संचरलें ॥२७॥ तरी बाळा प्रज्ञावंता ॥ आहे कीं नाही भय सांग आतां ॥ तस्करभयाची समूळ वार्ता ॥ काननांत न येवो या ॥२८॥ ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष विचार करी मनांत ॥ म्हने तस्करभय गुरुतें ॥ काय म्हणूनि उदेलें ॥२९॥ तया शब्दोदयाचा अर्थ ॥ श्रीगुरुजवळ असेल वित्त ॥ म्हणूनि हा शब्द उदयवंत ॥ झाला असेल निश्चयें ॥३०॥ तरी तो म्हणे ताता कैसे समजावें ॥ फुलावरुनि रुखा द्यावीं नांवें ॥ ऐसें शब्दावरुनि मान समजावें ॥ ओळखावें सुज्ञांनीं ॥३१॥ तस्मात् गुरुपाशीं वित्त ॥ आहे काय ऐसें विचारीत ॥ तरी या शब्दाची असे भ्रांत ॥ निरसूनि दुर करावी ॥३२॥ ऐसें योजूनि गोरक्षनाथ ॥ मौन धरोनि मार्गी चालत ॥ परी काननीं अधिकोत्तरांत ॥ भयानक दिसे पदोपदीं ॥३३॥ जंव जंव कानन भयानक दिसे ॥ तंव तंव गोरक्षा मच्छिंद्र पुसे ॥ म्हणे बा अरण्य बहु कर्कश ॥ पदोपदीं दिसतसे ॥३४॥ तरी तस्करभय येथें ॥ आहे कीं नाहीं सांग मातें ॥ परी गोरक्ष उत्तरातें ॥ काहींच तयातें न देई ॥३५॥ जैसा विश्वामित्र समर्थ ॥ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ ॥ स्तवितां तेणें दशरथातें ॥ परी उत्तर न देई कांहींच ॥३६॥ त्याचि न्यायें गोरक्ष मौन धरोनि ॥ गमतसेच सुपंथ अवनीं ॥ तों पुढें चालतां देखिलें पाणी ॥ संचळपणी स्थिरारावलें ॥३७॥ उदक पाहतां संचळवंत ॥ गोरक्षा वदे मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे बा गोरक्षा संचरत येथें ॥ उदक आहे नेटकें ॥३८॥ तरी माझी झोळी कक्षेंत घालून ॥ पुढें कांहींसे करीं गमन ॥ तों मीही येतो लगबगेंकरुन ॥ दिशा फिरुन पाडसा ॥३९॥ ऐसें म्हणतां मच्छिंद्रनाथ ॥ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास ॥ मग स्कंधीं वाहूनि मीननाथास ॥ कक्षीं झोळी घातली ॥४०॥ परी घालितां कक्षे झोळी ॥ वजनवस्त लागें हस्तकमळी ॥ मग मनांत म्हणे प्रतापबळी ॥ भय यांतचि नांदतसे ॥४१॥ ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ स्कंधी वाहूनि मीननाथ ॥ मच्छिंद्रा सोडूनि थिल्लरांत ॥ पुढें जात सच्छिष्य ॥४२॥ पुढें जातां शतपावलीं ॥ कक्षेतूनि भिक्षाझोळी काढिली ॥ त्यांत पाहतां देखिली ॥ वीट उत्तम हाटकाची ॥४३॥ पाहतांचि दृष्टीं कनकवीट ॥ म्हणे कीं फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट ॥ मग दाट लक्षूनि तृण अफाट ॥ झुगारिली वीट त्यामाजी ॥४४॥ त्या कनकविटेसमाकृती ॥ पाषाण पाहूनि गोरक्षजती ॥ झोळींत घालूनि कक्षेप्रती ॥ पुन्हां नेसवी झोळीतें ॥४५॥ कक्षे झोळी घालून ॥ स्कंधीं पुन्हां मीननाथ घेऊन ॥ लगबगोंनी मार्गगमन ॥ करीत असे नाथ तो ॥४६॥ सुपंथ लक्षितां तांतडीनें ॥ एक कोस गेला त्वरेंकरुन ॥ तों मच्छिंद्रनाथ दिशा फिरुन ॥ जात मागुता तांतडी ॥४७॥ पुढें जातसे गोरक्षनाथ ॥ मागूनि मच्छिंद्र लगबगा येत ॥ परी तो नाटोपे गोरक्षनाथ ॥ मार्ग क्रमितां मच्छिंद्रा ॥४८॥ परी इतुक्या नेटें भावें ॥ मार्ग मिळतां नाटोपावें ॥ तरी लघुशंकेलागीं धावें ॥ संगतसंगमीं मिळाल्या ॥४९॥ यापरी शौचा सर्वांशीं जावें ॥ लागत आहे सर्वानुभवें ॥ संगतसंगमी होऊनियां ठावे ॥ विसांवयासी महाराजा ॥५०॥