श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३६
श्रीगणेशाय नमः जयजयाजी भक्तरातका ॥ मम पूर्वजा ज्ञानार्का ॥ नरहरिनामें पुण्यश्लोका ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥ मागिले अध्यायीं कथन ॥ रेवणनाथातें अत्रिनंदन ॥ वरदचित्तें प्रसन्न होऊन ॥ सनाथ चित्तें केला असे ॥२॥ केला तरी प्रतापवंत ॥ परी सरस्वतीविप्राचा अभिप्राय हेत ॥ चित्तें करुनि केला शांत ॥ रेवणनाथ गेला असे ॥३॥ तरी आतां पुढें श्रोतीं ॥ परिसावें आवाहना ग्रंथ अर्थी ॥ रेवणनाथ कैलासाप्रती ॥ कैलासद्वारीं प्रगटला ॥४॥ दिसे जैस भास्कर ॥ कीं उदय पावला रोहिणीवर ॥ कीं सहस्त्र चपलांचा एकभार ॥ अंगकांति मिरवतसे ॥५॥ ऐसा महाराज तेजःपुंज ॥ ग्रामद्वारीं येतां भोज ॥ तंव ते शिवगण विजयध्वज ॥ रक्षणा असती द्वारांत ॥६॥ त्यांनी पाहूनि योगमूर्ती ॥ हटकोनि उभा केला क्षितीं ॥ म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती ॥ जातां कोठें महाराजा ॥७॥ येरु म्हणे रेवणनाथ ॥ नाम असे या देहातें ॥ विजयकरणीं भवभेटीते ॥ आम्हां जाणें आहे कीं ॥८॥ येरु म्हणती कवण कार्ये ॥ आम्हांलागीं शीघ्र सांगावें ॥ नाथ म्हणे विप्रतनय ॥ सत्य चोरिला शिवानें ॥९॥ तरी तयासी शिक्षा करुन ॥ घेऊनि जाईन विप्रनंदन ॥ ऐसें ऐकतां शिवगण ॥ परमचित्तीं क्षोभले ॥१०॥ म्हणती बाबा बोलसी वचन ॥ यांत आम्हांसी आलें समजोन ॥ तुमचा गुरु गंधर्व जाण ॥ आम्हांलागीं वाटतो ॥११॥ परी गंधर्वचा संस्कार ॥ पाहूं आला प्रहार ॥ तरी तो तेथेंचि करावा आदर ॥ फीर माघारा येथोनी ॥१२॥ ऐसें बोलती शिवगण त्यासी ॥ परम कोप चढला त्याचे मानसीं ॥ म्हणे गुरु गंधर्ववंशीं ॥ तरी तुम्हां दावितों ॥१३॥ अरे तुम्ही गंधर्वासमान ॥ फिरों नका रानोरान ॥ ऐसें म्हणोनि करें भक्तिबंधन ॥ भस्मचिमुटी कवळिली ॥१४॥ स्पर्शअस्त्र जपोनि होटीं ॥ फेंकिता झाला भस्मचिमुटी ॥ तेणें द्वारपाळ महीपाठीं ॥ खिळोनियां राहिले ॥१५॥ एक सहस्त्र तीन शत ॥ गण महीतें केलें व्यक्त ॥ उचलूं जातां स्वपदातें ॥ मही पदातें सोडिना ॥१६॥पद महीपासूनि कदा न सुटति ॥ म्हणोनि हस्त धरुनि काढूं जाती ॥ तेणें मही तें व्यक्त होती ॥ उभय हस्त गणांचे ॥१७॥ ऐसे एक सहस्त्र तीन शत ॥ ओणवे केले महीं व्यक्त ॥ मग सर्वालागीं बोले नाथ ॥ कोण गंधर्व सांगा रे ॥१८॥ ऐसे विपरीत करणी ॥ प्रविष्ट होतां त्या शिवगणीं ॥ हा वृत्तांत सकळ शिवभुवनीं ॥ शिवालागी समजला ॥१९॥ कैलासवासी शिवाचे गण ॥ त्यांनीं विपर्यास पाहून ॥ परम भयभीत चित्तीं होऊन ॥ शिवालागी दर्शविती ॥२०॥ उभे राहोनि शिवानिकट ॥ म्हणती महाराजा नीळकंठा ॥ एक मानव सुभट ॥ ग्रामद्वारीं पातलाहे ॥२१॥ तेणें एक सहस्त्र तीन शत ॥ द्वारगण केले महीव्यक्त ॥ करचरण दोन्ही ओणवे समस्त ॥ आरंबळती महाराजा ॥२२॥ ऐसी ऐकोनि शिवें मात ॥ कल्पांतभैरवां आज्ञापीत ॥ म्हणे कोण आला येथ ॥ शिक्षा त्यातें करा रे ॥२३॥ ऐसें ऐकतां शिववचन ॥ अष्टही मैरव प्रळयाग्न ॥ सवे घेऊनि शतकोटी गण ॥ ग्रामद्वारीं पातले ॥२४॥ तंव ते एक सहस्त्र तीन शत ॥ भैरवीं पाहिले महीव्यक्त ॥ मग परम कोपोनि पिनाकहात ॥ शर भया योजीतसे ॥२५॥ तें नाथें चपळपणीं पाहून ॥ पुनः शस्त्रअस्त्रांचे संधान ॥ तीव्र कल्पूनि शतकोटिगण ॥ तयांसी तेथ खिळियलें ॥२६॥ अष्टभैरव प्रतापदर्प ॥ कदा न गणिती अस्त्रप्रताप ॥ टणत्कारुनि शरचाप ॥ तीव्र अस्त्रे योजिती ॥२७॥ एक योजिती वातास्त्र प्रबळ ॥ एक योजिती प्रळयानळ ॥ एकीं नागास्त्र परम विशाळ ॥ विषधारा योजिलें ॥२८॥ एकीं धूम्रास्त्र योजिलें कठिण ॥ एकीं वासवशक्ति केली निर्माण ॥ एकीं ब्रह्मास्त्र शापवचन ॥ शापादपि योजिलें तें ॥२९॥ एकें वज्रास्त्र योजिलें सबळ ॥ जें सकळ अस्त्रां असें अतुळ ॥ वीरभैरव तों साधनीं चपळ ॥ विभक्त अस्त्र निर्मीतसे ॥३०॥ ऐसी योजूनि सायकमुष्टी ॥ शर सोडिते झाले जेठी ॥ मग अष्टास्त्रांते प्रतापकोटी ॥ अंबरातें मिरवलें ॥३१॥ तें पाहोनियां रेवणनाथें ॥ भस्मचिमुटी कवळूनि हातें ॥ एकदाचि उत्तीर्ण अष्ट अस्त्रातें ॥ मुखेंकरोनि जपिन्नला ॥३२॥ वातास्त्रावरी पर्वतास्त्र ॥ अग्निअस्त्रावरी जलदास्त्र ॥ नागास्त्रावरी खगेशास्त्र ॥ यापरी तो जल्पतसे ॥३३॥ धूम्रास्त्रावरी आदित्यनामी ॥ वासवशक्तीतें काळिका निर्मी ॥ शापादपि ब्रह्माखाणी ॥ स्तवनअस्त्र त्या ओपी ॥३४॥ वज्रास्त्रातें शक्रास्त्रे जपोन ॥ विभक्तास्त्र केलें निर्माण ॥ मोहन अष्टअस्त्रांचे निवारण ॥ एकाचि वचनें केलें तें ॥३५॥ असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रें जाऊन ॥ नाहीसें केलें अंबरांत जाण ॥ परी ती अष्ट अस्त्रें उकलोन ॥ भैरवांवरी पडियेली ॥३६॥ तेणें अष्टभैरव झाले जर्जर ॥ शिवालागीं सांगती हेर ॥ हे महाराज उमावर ॥ भैरव क्षीण झालेती ॥३७॥ तें ऐकोनि शिव चित्तीं ॥ सिद्ध गोसुत केला निगुतीं ॥ अव्हानोनि रोहिणीपती ॥ त्रिशूळ हातीं मिरवला ॥३८॥ चक्र खडग शर सायक ॥ अंकुश आणि डमरु देख ॥ शंख नरकपाळ हस्तीं एक ॥ नंदी वाग्दोर मिरवतसे ॥३९॥ ऐशीयेपरी भूषण ॥ कामांतक तो शस्त्र संजोन ॥ परम संतापे उभा राहोन ॥ बहु त्वरें धांवला ॥४०॥ तें पाहूनि रेवणनाथ ॥ चित्तीं म्हणे युद्ध कासया बहुत ॥ एकाचि अस्त्रें प्रतापवंत ॥ शिवालागीं करावें ॥४१॥ जल्पूनि अस्त्र वताकर्षण ॥ फुंकूनि देत भस्म जल्पून ॥ तें प्रविष्ट होतां तीव्रपण ॥ शिवश्वास आकर्षिला ॥४२॥ तेणेंकरोनि उमास्वामी ॥ विकळ झाला नंदीवरोनी ॥ धीर न धरवे महीलागुनी ॥ उलथोनिया पडियेला ॥४३॥ परम झाला गात्रीं विकळ ॥ शस्त्रें मुठीचीं सुटली सकळ ॥ मुखीं रुधिर लोटलें तुंबळ ॥ सरितापाठीं मिरवलें ॥४४॥ अष्टभैरव अष्टशस्त्रेंकरुन ॥ तेही पडले जर्जर होऊन ॥ तीव्र प्रहारें मूर्च्छा येऊन ॥ महीवरती मिरवती ॥४५॥ सकळ पडले शुद्धिरहित ॥ अष्टशस्त्रें तीं झालीं गुप्त ॥ परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत ॥ युद्ध पाहतां समजला ॥४६॥ मग ते परम तांतडीकरोन ॥ विष्णूसी ही जाणविती खूण ॥ परम अवस्थेसी ऐकून ॥ कमलापति धांविन्नला ॥४७॥ मनोवेगातें मागें टाकून ॥ शीघ्र पातला रमारमण ॥ नाथासन्मुख निकट येऊन ॥ हदयीं प्रीतीनें कवळीतसे ॥४८॥ हदयीं कवळूनि योगमूर्ती ॥ म्हणे महाराज तपःपती ॥ कवण कारणें विक्षेप चित्तीं ॥ कोपानळ पेटला ॥४९॥ येरी म्हणे पंकजाक्ष ॥ मी सरस्वतीविप्राच्या गृहीं प्रत्यक्ष ॥ असतां शिवें धाडूनि यक्ष ॥ पुत्र त्याचा मारिला ॥५०॥
|