Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०


श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २

श्रीगणेशाय नमः जयजयाजी मूळपीठवासिनी ॥ पुंडलीकाच्या गोंधळालागोनी ॥ भक्तवरदे भवानी ॥ उभी अससी माये तूं ॥१॥ संत गोंधळी विचक्षण ॥ कंठीं मिरवितां तुळसीभूषण ॥ तेचि माळा सुलक्षण ॥ जगामाजी मिरविसी ॥२॥ घालिती तुझा प्रेमगोंधळ ॥ कामक्रोधांचे देती बळ ॥ गीतसंगीत सबळ ॥ गुण गाती माये तुझे ॥३॥ असो ऐशा गोंधळप्रकरणीं ॥ संतुष्ट होसी माय भवानी ॥ तरी या ग्रंथगोंधळी येऊनी ॥ साह्य करी जननीये ॥४॥ मागिल्या अध्यांयी रसाळ कथन ॥ गणादि सकळांचे केले नमन ॥ उपरी मच्छिंद्राचें जनन ॥ यथाविधी कथियेलें ॥५॥ आतां पुढें श्रवणार्थी ॥ बैसले आहेत महाश्रोती ॥ तयांची कामना भगवती ॥ पूर्ण करावया येई कां ॥६॥ तरी श्रोतीं सिंहावलोकनीं कथन ॥ श्रीदत्तदेव आणि उमारमण ॥ भागीरथीविपिनाकारण ॥ पहात पहात चालिले ॥७॥ जैसे फलानिमित्त पक्षी ॥ फिरत राहती वृक्षोवृक्षीं ॥ त्याचि न्यायें उभयपक्षी ॥ गमन करिती तीरातें ॥८॥ सहज चालती विपिनवाटी ॥ तों मच्छिंद्र देखिला त्यांनीं दृष्टीं ॥ बाळतनू पाठपोटीं ॥ अस्थि त्वचा उरल्या पैं ॥९॥ जटा पिंगट नखें जळमट ॥ फंटकारी पादांगुष्ठ ॥ कार्पासमय झाली दृष्ट ॥ त्वचा लिपटली अस्थींसी ॥१०॥ सर्वांगे शिरा टळटळाट ॥ दिसती अवनी नामपाठ ॥ ध्वनिमात्र शब्द उठे ॥ चलनवलन नयनांचें ॥११॥ ऐसा पाहूनि तपोजेठी ॥ विस्मयो करिती आपुले पोटीं ॥ म्हणती ऐसा कलीपाठीं ॥ तपी नेणों कोणीच ॥१२॥ अहो विश्वामित्रप्रकरणी ॥ दिसतो तपी हा मुगुटमणी ॥ तपार्थ कामना अंतःकरणीं ॥ करणी कोण यातें उदेली ॥१३॥ मग दत्तासि म्हणे आदिनाथ ॥ मी स्थिरता राहतों महीं येथ ॥ तुम्हीं जाऊनि कामनेतें ॥ विचारावें तयातें ॥१४॥ कवणा अर्थी कैसा भाव ॥ उचंबळला कामार्णव ॥ तरी लिप्सेचा समूळ ठाव ॥ काय तोही पहावा ॥१५॥ येऊनि त्यापरी अत्रिनंदन ॥ शिवानंदसूक्तिक सुढाळ रत्न । श्रवणपुटीं स्वीकारुन ॥ तयापासीं पातला ॥१६॥ उभा राहोनि समोर दृष्टी ॥ म्हणे महाराजा तपोजेठी ॥ कवण कामना उदेली पोटीं ॥ तें वरदवरातें मिरवावें ॥१७॥ ऐसे वरदाचे वागवट ॥ मच्छिंद्र श्रवण करितां झगट ॥ नम्रभाव धरुनि प्रकट ॥ तयालागीं बोलत ॥१८॥ कर्णी शब्द पडतां सुखस्थिती ॥ दृष्टी काढोनियां वरती ॥ पाहता झाला दत्ताप्रती ॥ महाराज योगी तो ॥१९॥ भ्रूसंकेतें करोनि नमन ॥ दाविता झाला निजनभ्रपण ॥ जो कीम ईश्वरी आराधन - ॥ प्राप्तीलागी उदेला ॥२०॥ बोले महाराजा कृपासरिता ॥ तुम्ही कोण तें सांगावें आतां ॥ द्वादश वर्षे काननीं लोटतां ॥ मानव नातळे दृष्टीसी ॥२१॥ तरी त्वच्चित्त सदैव भवानी ॥ प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धें धरणीं ॥ तरी प्रसादनग अभ्युत्थानीं ॥ स्थापूनि जाई महाराजा ॥२२॥ ऐसें तयाचें वागुत्तर ॥ ऐकोनि तोषला अनसूयाकुमर ॥ म्हणे वा रे नामोच्चार ॥ दत्त ऐसें मज म्हणती ॥२३॥ जो व्याघ्रपदीं ऋषिजन्म ॥ अत्रि ऐसें तया नाम ॥ तयाचा सुत मी दासोत्तम ॥ महीलागीं आधारलों ॥२४॥ तरी असो ऐसी गोष्टी ॥ कवण कामना तुझ्या पोटीं ॥ उदेली जे तपोजेठी ॥ शब्दसंपुटीं मिरवीं कां ॥२५॥ येरु म्हणे वरदोस्तु ॥ कामना वरी एक भगवंतु ॥ ऐसें वदता झाला अतीतु ॥ पदावरी लोटला ॥२६॥ जैसी सासुर्याे बाळा असतां ॥ अवचट दृष्टी पडे माता ॥ हंबरडोनि धांवोनि येतां ॥ ग्रीवे मिठी घालीतसे ॥२७॥ किंवा अवचट वत्सा भेटतां गाय ॥ मग प्रेम लोटी चित्त सदैव ॥ तेणेंपरी मच्छिद्र मोहें ॥ पदावरी लोटला तो ॥२८॥द्वादश वर्षे तपाचे श्रम ॥ ते आजि फळले मानूनि उत्तम ॥ सांडोनि सकळ आपुला नेम ॥ पदावरी लोटला तो ॥२९॥ परी तपश्रमाचे बहुत क्लेश ॥ हदयीं गहिंवरले दुःखलेश ॥ नेत्रींचे झरे विशेष ॥ पदावरी लोटले तैं ॥३०॥ तेणें झालें पादक्षालन ॥ पुढती बोले करी रुदन ॥ हे महाराजा तूं भगवान ॥ महीमाजी मिरविशी ॥३१॥ रुद्र विष्णु विरिंची सदय ॥ त्रिवर्गरुपी देह ऐक्यमय ॥ ऐसें असोनि सर्वमय ॥ साक्षी महीं अससी तूं ॥३२॥ तरी येऊनि सर्वज्ञमूर्ती ॥ असोनि माझा विसर चित्तीं ॥ पडलासे किमर्थ अर्थी ॥ अपराध गळीं सेवोनियां ॥३३॥ ऐसें म्हणोनि वारंवार ॥ ग्लानींत करी नमस्कार ॥ क्लेशनगीचें चक्षुद्वार ॥ सरितालोट लोटवी ॥३४॥ तरी तो अत्यंत शांत दाता ॥ म्हणे बा हे न करी चिंता ॥ प्रारब्धर्मदराचळाची सरिता ॥ ओघ ओघील आतांचि ॥३५॥ मग वरदहस्ते स्पर्शोनि मौळी ॥ कर्णी ओपीत मंत्रावळी ॥ तेणें अज्ञानदशाकाजळी ॥ फिटोनि गेली तत्काळ ॥३६॥ जैसें माहात्म्य भारती ॥ उदयदृष्टी करितां गभस्ती ॥ मग अंधकाराची व्याप्ती ॥ फिटोनि जाय तत्काळ ॥३७॥ तेवी दत्त वरदघन ॥ वोळतां गेलें सकळ अज्ञान ॥ मग चराचर सकळ जीवन ॥ जैसें हेलावलें दृष्टीसी ॥३८॥ नाठवे कांहीं दुजेपण ॥ झालें ऐक्य ब्रह्मसनातन ॥ जैसें उदधी सरिताजीवन ॥ जीवना जीवनसम दिसे ॥३९॥ ऐसी झालिया जीवनसम दृष्टी ॥ आत्रेय धरिता झाला पोटीं ॥ म्हणे बा रे योगी धूर्जटी ॥ इंदिरावर कोठें तो सांग ॥४०॥ येरु म्हणे जी ताता ॥ ईश्वरावांचोनि नसे वार्ता ॥ जळीं स्थळीं काष्ठीं महीं पर्वता ॥ ईश्वर नांदे सर्वस्वीं ॥४१॥ ऐसें ऐकोनि वागुत्तर ॥ ग्रीवा तुकवी अत्रिकुमर ॥ मग सच्छिष्याचा धरोनि कर ॥ चालता झाला महाराज तो ॥४२॥ सहज चालतां चाले नेटीं ॥ आले आदिनाथ प्रेमदृष्टी ॥ मच्छिंद्र मूर्धकमळधाटी ॥ पदावरी वाहातसे ॥४३॥ शिवें पाहूनि मंददेहीं ॥ म्हणे हा पूर्वी नारायण कवी ॥ मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाहीं ॥ धरिला हदयीं तत्काळ ॥४४॥ मग त्रिवर्ग येऊनि त्या स्थानीं ॥ दत्तासी म्हणे पंचमूर्धनी ॥ या शिष्यातें अभ्यासोनी ॥ सकळ सिद्धी मिरवीं कां ॥४५॥ जें वेदकारणाचें निजसार ॥ जें सर्वोपकाराचें गुहागर ॥ सकळ सिद्धींचें अर्थमाहेर ॥ निवेदी तूं महाराजा ॥४६॥ जारणमारण उच्चाटण ॥ शापादपि निवारण ॥ शरादपि अस्त्रादिनिबर्हण मंत्रशक्ती त्या वरत्या ॥४७॥ जो जैसा कर्मविजे पाठ ॥ होती दैवतें वरती भेट ॥ वंशवरद वाक्पट ॥ मस्तकीं स्थापोनि जाताती ॥४८॥ वरुण आदित्य सोमस्वामी ॥ भौमशक्रादि यमद्रमी ॥ शिवशक्ति कामतरणी ॥ वर देऊनि उठविले ॥४९॥ विष्णू विरिंची कृपाकृती ॥ वरदबीजे देऊनि शक्ति ॥ ते मंत्र अंखें अपारगती ॥ हदयामाजी हेलावला ॥५०॥