श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २२
श्रीगणेशाय नमः जयजयाजी कमळाकांता ॥ कमळानाभा कमलोद्भवपिता ॥ कमळपत्राक्षा दुःखहर्ता ॥ पुढें ग्रंथ रसाळ बोलवी ॥१॥ भक्तिसारग्रंथ हा रत्न ॥ बोलवीं श्रोत्यांकारण ॥ मागिले अध्यायीं गोरक्षनंदन ॥ मच्छिंद्र घेऊनि गेला असे ॥२॥ नेला तरी किलोतळा ॥ बुडालीसे सांगडी ॥ शोकाब्धींजळा ॥ तैं उपरिचवसू तरणि आगळा ॥ काढावया पातला ॥३॥ स्थावरबोधाची बांधूनि सांगडी ॥ शोकाब्धींत घातली उडी ॥ शब्दार्थी मारुनि बुडी ॥ धैर्यकांसे धरियेलें ॥४॥ धरिल्यावरी बाहेर काढुनि ॥ म्हणे माय वो सावधानी ॥ शोक सांडी अशाश्वत गहनी ॥ शाश्वत नाहीं कांहींच ॥५॥ पाहतेपणीं जें जें दृश्य ॥ तें आभासपणीं पावें नाश ॥ तूं शोक करिसी शब्दप्राप्तीस ॥ श्लाध्य तूतें लागेना ॥६॥ तूं कोठील मच्छिंद्र कोण ॥ स्वर्ग भूमीचा झाला संगम ॥ योग तितुका भोगकाम ॥ सरुनि गेला जननीये ॥७॥ तूं अससी स्वर्गवासिनी ॥ मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥ परी प्रारब्धें सहजयोगेंकरुनीं ॥ गाठीं पडली उभयतां ॥८॥ पडली परी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥ परी प्रारब्धें तूं आपुलें स्वहित निश्चित ॥ सांभाळीं कीं जननीये ॥९॥ तूं झालीस पदच्युत ॥ तरी तें सांभाळी निश्चित ॥ तरी आतां मानूनि व्यक्त ॥ होऊनि चाल जननीये ॥१०॥ तूं पातलिया सिंहलद्वीप ॥ मग मच्छिंद्रयोगें स्थावरकंदर्प ॥ पूर्ण होईल शुद्धसंकल्प ॥ मच्छिंद्र दृष्टीं पाहूनियां ॥११॥ द्वादश वर्षे झालिया पूर्ण ॥ तूतें भेटवीन मच्छिंद्रनंदन ॥ मीननाथादि तपोधन ॥ गोरक्ष दृष्टीं पाहसील तूं ॥१२॥ म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन ॥ काय पडेल त्या कारण ॥ सिंहलद्वीपीं पाकशासन ॥ महामख आरंभील ॥१३॥ तेव्हां विष्णु विरेंची रुद्र ॥ तया स्थानी येती भद्र ॥ सकळ देवादिक मित्र चंद्र ॥ एका ठायीं मिळतील ॥१४॥ ते नवनाथादि प्रतापवंत ॥ ऐक्य करील शचीनाथ ॥ गहिनी गोपीचंद भर्तरि सहित ॥ एक्या ठायीं मिळतील ॥१५॥ तरी आतां शोक कां व्यर्थ ॥ सांडी प्रांजळ करीं चित्त ॥ विमानारुढ होऊन त्वरित ॥ सिंहलद्वीपीं चाल कीं ॥१६॥ ऐसें ऐकोनि मैनाकिनी ॥ महाराजा श्वशुरप्राज्ञी ॥ द्वादशवर्षे मच्छिंद्र नयनी ॥ दावीन ऐसें म्हणतसां ॥१७॥ तरी मखमंडप पाकशासन ॥ करी अथवा न करो पूर्ण ॥ जरी मज दावाल मम नंदन ॥ तरी मज भाष्य द्यावी कीं ॥१८॥ भाष्य दिधल्या अंतरपुटीं ॥ विश्वासरत्ना रक्षीन पोटीं ॥ मग हे शोक दरिद्रपाठी ॥ चित्त सांडील महाराजा ॥१९॥ ऐसें बोलतां मैनाकिनी ॥ श्वशुर हास्य करी आननीं ॥ मग करतळभाष्य देऊनी ॥ संतुष्ट केलें सुनेतें ॥२०॥ यावरी बोले कीलोतळा ॥ मातें नेतां स्वर्गमंडळा ॥ परी नृपपणीं या स्थळा ॥ कोणालागी स्थापावें ॥२१॥ येरु म्हणे ऐक वचन ॥ सवें सेवेसी आहेत क्रियावान ॥ दैर्भामा उत्तम नामानें ॥ राज्य तीते ओपीं कां ॥२२॥ मग अवश्य म्हणे मैनाकिनी ॥ दैर्भामा राज्यासनीं ॥ बैसविली अभिषेक करुनी ॥ राज्यपदीं तेधवा ॥२३॥ राज्यीं ओपूनि दैर्भामा ॥ मिळती झाली विमानसंगमा ॥ परी सकळ देशींच्या शैल्या रामा ॥ शोकाकुळ झाल्या कीं ॥२४॥ म्हणती माय वो शुभाननी ॥ तुम्ही जातां आम्हांसी टाकुनी ॥ आम्हां पाडसांची हरिणी ॥ दयाळू माय अससी तूं ॥२५॥ असो ऐशा बहुधा शक्ती ॥ शैल्या शोकाकुलित होती ॥ मग तितुक्यां समजावूनि युक्तीं ॥ विमानयानीं आरुढली ॥२६॥ दैर्भामेसी नीतिप्रकार ॥ सांगूनि युक्ती समग्र ॥ यथासमान प्रजेचा भार ॥ सांभाळी कां साजणीये ॥२७॥ जेथील तेथें हित फार ॥ तैसे केलें गोचर ॥ मग विमानीं आपण सश्वशुर ॥ स्वर्गमागें गमताती ॥२८॥ असो विमान पावे द्वीपाप्रती ॥ पदा स्थापिली ते युवती ॥ मग तो उपरिचर सहजगती ॥ आपुल्या स्थाना सेविती ॥३०॥ त्याचि न्यायें उपरिदक्षें ॥ आणि कीलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष ॥ शाषमोचन सायंकाळास ॥ स्थाना पावली आपुल्या ॥३१॥ कीं अब्धीचें अपार जीवन ॥ व्यापी महीतें मेहमुखाने ॥ परी तें पुन्हां सरिक्षाओघानें ॥ ठायींचे ठायीं जातसे ॥३२॥ त्याचिया न्यायें स्नुषा श्वशुर ॥ पावते झाले स्वस्थानावर ॥ परी तैं इकडे नाथ मच्छिंद्र ॥ गौडबंगाली पातला ॥३३॥ मीननाथ स्कंधीं वाहून ॥ मार्गावरी करिती गमन ॥ तों शैल्येंदेशसीमा उल्लंघून ॥ गौडबंगालीं पातले ॥३४॥ मार्गी लागतां ग्राम कोणी ॥ त्या ग्रामांत संचरोनी ॥ गोरक्ष भिक्षा आणी मागुनी ॥ उदरापुरती तिघांच्या ॥३५॥ ऐसेपरी निर्वापण ॥ मार्गी करिताती गमन ॥ तों कौलबंगाला सांडून ॥ गौडबंगाली पातले ॥३६॥ मार्गी चालता सहजस्थिती ॥ तो कनिफा पूर्वी भेटला तयांप्रती ॥ तेथें पातल्या त्रिवर्गमूर्ती ॥ गमन करितां मार्गातें ॥३७॥ तेथें येताचि गोरक्ष जेठी ॥ स्मरण झालें तयाचे पोटीं ॥ कीं अच्युतवृक्षापुटीं ॥ कानिफाची भेटी झालीसे ॥३८॥ झाली परी हें उत्तम स्थान ॥ महायशस्वी पुण्यवान ॥ मातें दाबिले श्रीगुरुचें चरण ॥ जैसे चुकल्या वत्सासी ॥३९॥ प्रत्यक्ष माझी मच्छिंद्रराणी ॥ गेली होती आदिपट्टराणी ॥ मी पाडस रानोरानी ॥ निढळ्यावाणी लागतसे ॥४०॥ कीं मज वत्साची गाउली ॥ सहज रानी चरावया गेली ॥ शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ॥ ती भेटविली रायानें ॥४१॥ मग स्कंधी होता नाथ मीन ॥ तथालागी मही ठेवून ॥ दृढ पायीं केलें नमन ॥ नेत्रीं अश्रु लोटले ॥४२॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ बोलता झाला गोरक्षातें ॥ म्हणे बाळा अश्रुपात ॥ निज चक्षूंसी कां आले ॥४३॥ ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ मग सकळ दुःखाचे मंडण ॥ तें गोरक्षचित्तीं प्रविष्ट होऊन ॥ नेत्रीं नीर अपार लोटलें ॥४४॥ सांगू जातां मुखानें ॥ तो कंठ आलासे भरुन ॥ मग क्षण एक तया स्थानीं बैसून ॥ स्थिर चित्त पैं केलें ॥४५॥ जैसे आकाशीं अभ्र दाटतां ॥ पुन्हां निर्मळ होय तत्त्वतां ॥ तैसें दुःख मोह चिंत्ता ॥ टाकून निर्मळ पैं केले ॥४६॥ मग बद्रीकाश्रमापासूनि कथन ॥ दुःखव्यावृत्ति अतिगहन ॥ कानिफा भेटीपर्यंत वदून ॥ ठाव पशस्वी म्हणतसे ॥४७॥ याचि ठायीं कानिफाभेटी ॥ झाली मातें कृपा जेठी ॥ तुमची शुद्धी तद्वान्वटी ॥ येथेंचि लाधली महाराजा ॥४८॥ तरी हें स्थान पुण्यवान ॥ तुमचे दाविले मज चरण ॥ तरी हे स्थान धनवंत पूर्ण ॥ चुकलें धन मज दिधलें ॥४९॥ दुःखसरिते प्रवाहें वेष्टी ॥ बुडतां वांचविले देउनि पृष्ठी ॥ कीं दुःख व्याघ्राच्या आसडूनि होटी ॥ माये भेटी केली असे ॥५०॥
|