श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३२
श्रीगणेशाय नमः जयजय जगदुद्धारा ॥ जगदाश्रिता रुक्मिणीवरा ॥ दीनबंधो दयासागरा ॥ वीरा सुरवरा तूं एक ॥१॥ तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा ॥ सुरवरांप्रती जैसा मघवा ॥ तरी आतां कृपार्णवा ॥ ग्रंथादरीं येईं कां ॥२॥ मागिले अध्यायीं कथन ॥ चौरंगी बैसे तपाकारण ॥ उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन ॥ गिरनारगिरीं पोचले ॥३॥ पोचले परी आनंदभरित ॥ प्रेमें वंदिला मच्छिंद्रनाथ ॥ पुढें पाहतांचि अत्रिसुत ॥ आनंदडोहीं बुडाला ॥४॥ मच्छिंद्रातें कवळूनि हदयीं ॥ म्हणे माझी आलीस गे आई ॥ चक्षु मीनले तुझे ठायीं ॥ मार्ग पाहें पाडसापरी ॥५॥ जैसें इंदूचें आगमन ॥ तिकडेचि हेलावे समुद्रजीवन ॥ तेवीं तुझे मार्गेकरुन ॥ चक्षू वेधले माझे बा ॥६॥ तरी आतां असो कैसें ॥ माझें मला भेटलें पाडसें ॥ तरी वत्सा सांडूनि आम्हांस ॥ जाऊ नको पुढारां ॥७॥ ऐसी धृति वृत्ति मती ॥ ऐक्य झाली उभयव्यक्ती ॥ जैसें जळ जळाप्रती ॥ ऐक्य होय मेळवितां ॥८॥ मग नाना गोष्टी विचारप्रसंग ॥ तीर्थगमनादि योगसंयोग ॥ दुःखसुखादि सकळ प्रयोग ॥ एकमेकां निवेदिले ॥९॥ आसन वसन भोजन शयनीं ॥ सदा सन्निध मच्छिंद्रमुनी ॥ जैसें अर्भका तान्हूले मनीं ॥ माय नातळती होईना ॥१०॥ ऐसे मोहाचिये परी ॥ षण्मास लोटले तैं गिरीं ॥ यापरी गोरक्ष सदनांतरीं ॥ तीर्थस्थानीं जल्पतसे ॥११॥ मग तो श्रीदत्ताकारण ॥ म्हणे महाराजा अत्रिनंदन ॥ तीर्थ केलें साधुदर्शन ॥ करावया महाराज ॥१२॥ तरी आम्हां आज्ञा द्यावी ॥ आतां लंघूनि येतों मही ॥ मही धुंडाळल्या संगमप्रवाहीं ॥ साधु मिरवती महाराजा ॥१३॥ तरी याचि निमित्ताकारणें ॥ आम्ही घेतला आहे जन्म ॥ सकळ जगाचें अज्ञानपण ॥ निवटावया महाराजा ॥१४॥ ऐसें बोलतां गौरसुत ॥ दत्त ग्रीवा तुकावीत ॥ आणि पुढील जाणूनि भविष्यार्थ ॥ अवश्य म्हणे पाडका ॥१५॥ मग परमप्रीतीं स्नेहेंकरुन ॥ बोळविता झाला उभयांकारण ॥ येरीं उभयें करुनि नमन ॥ पर्वताखाली उतरले ॥१६॥ मार्गी चालती उभय जण ॥ परी त्या पर्वता क्षणोक्षण ॥ पाहे मच्छिंद्रनंदन ॥ म्हणे प्राण अंतरला ॥१७॥ प्रेमाक्षु ढाळी नयनीं ॥ पुढें ठेवी पदालागुनी ॥ ऐसें चालतां तया अवनीं ॥ दुरदुरावा पडला असे ॥१८॥ मग मार्ग धरुनि काशीपुरी ॥ चालते झाले ते अवसरीं ॥ मुक्कामोमुक्काम लंघितां धरित्री ॥ प्रयागस्थानीं पातलें ॥१९॥ तों त्या गांवीं मूर्तिमंत ॥ औदार्यराशि प्रतापादित्य ॥ त्रिविक्रम नामें नृपनाथ ॥ धर्मप्राज्ञी नांदतसे ॥२०॥ गज वाजी रथ संगतीं ॥ जयाची सेना अपरिमिती ॥ तरी अधर्मनाशार्थ निगुतीं ॥ सैन्यसिंधू मिरवला ॥२१॥ भद्रासनी तो राजेश्वर ॥ जयाची संपत्ति औडंबर ॥ पाहूनि लाजती अमर ॥ हा एक प्रभू म्हणती ते ॥२२॥ ऐसियेपरी राजसंपत्ती ॥ परी उदरी नाहीं संतती ॥ तैशांत देहीं जरा निगुती ॥ प्राप्त झाली बळत्वें ॥२३॥ परी तो राजा सुगम प्राज्ञ ॥ परोपकारी अपार ज्ञान ॥ मूर्तिमंत जयाचें संधान ॥ पाळीत असे नेटका ॥२४॥ तयाचे राज्यांत बावन्न वर्ण ॥ कोणी न देखों अकिंचन ॥ संत आलिया करिती पूजन ॥ सकळ जगीं मिरवतसे ॥२५॥ चौदा विद्यांमाजी कुशल ॥ जैसा दुसरा मूषकपाळ ॥ हीनदीनांची माय कनवाळ ॥ आणि काळ तत्काळ शत्रुचा ॥२६॥ सकल गृहीं देशावर ॥ त्या राजाचा परोपकार ॥ त्यामुळे मिरवती सकळ नर ॥ चिंताविरहित सुखानें ॥२७॥ असो ऐसे तेजस्थिती ॥ तया देशीं पावले निगुती ॥ तेथें सकळ नारीनर क्षितीं ॥ विजयवचनीं गर्हिवरले ॥२८॥ यापरी तयाची गृहस्वामिनी ॥ जिये मिरवती ज्ञानखाणी ॥ पतिव्रता सौदामिनी ॥ षडर्णवगुणी गुणस्वी ॥२९॥ कीं राव तो उत्तम धवळार ॥ तैं दिसती ती स्तंभाकार ॥ कीं संसारमहीचा हांकणार ॥ अनंतरुपीं नटलासे ॥३०॥ ऐसेपरी राजयुती ॥ परी जरा पाहूनि रायाप्रती ॥ तेणें भयार्त होऊनि चित्तीं ॥ चिंतेमाजी पडली असे ॥३१॥ म्हणे रायाचे सकळ अवसान ॥ जिंकूनि नेलें आहे जरेनें ॥ नेणों दिवस येईल कोण ॥ संगतीसी सोडावया ॥३२॥ ऐसीं चिंता व्यापिली चिंत्तीं ॥ तों रायासी भरली आयुष्यभरती ॥ तप्त शरीरी पाहूनि वृत्ती ॥ गमन करी परत्र ॥३३॥ प्राण सांडूनि शरीरातें ॥ गेला असें निराळपंथें ॥ महीं उरलें असे प्रेत ॥ झाला आकांत राज्यांत ॥३४॥ पवित्रनामी रेवती ललना ॥ अट्टहास करी शोकरुदना ॥ तेचि रीतीं इतर जनां ॥ दुःखप्रवाह लोटला असे ॥३५॥ आठवूनि त्रिविक्रमरायाचे गुण ॥ परम आक्रंदती जन ॥ म्हणती पुनः या रायासमान ॥ होणार नाहीं दूसरा ॥३६॥ ऐसे अट्टहास्यें घरोघरीं जन ॥ नारीनरादि दुःखसंपन्न ॥ तये संधींत गांवी येऊन ॥ नाथ तेथें पातले ॥३७॥ तें क्षेत्र महान प्रयागस्थान ॥ उभय संचरती त्याकारण ॥ तो गृहोगृहीं दुःखनिमग्न ॥ शोकाकुलित मिरवले ॥३८॥ कोणी शरीर टाकीत अवनीं ॥ कोणी पडले मूर्च्छा येऊनी ॥ कोणी योजूनि हदयीं पाणी ॥ धबधबा पिटिती ते ॥३९॥ कोणी येऊनि पिशाचवत ॥ इकडून तिकडे धांव घेत ॥ अहां म्हणूनि शरीरातें ॥ धरणीवरी ओसंडिती ॥४०॥ कोणी धरणीवरी आपटिती भाळ ॥ रुधिरव्यक्त करुनि बंबाळ ॥ अहा त्रिविक्रमराव भूपाळ ॥ सोडूनि गेला म्हणताती ॥४१॥ ऐसियेपरी एकचि आकांत ॥ नारीनरादि बोलती समस्त ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ परमाचित्तीं कळवळला ॥४२॥ सहज चालतां तेथ पथ ॥ ठायीं ठायीं उभा राहात ॥ त्या रायाचे गुण समस्त ॥ आठवूनि रडताती ॥४३॥ धर्मज्ञानिक रायाचे गुण ॥ मोहकपणीं होतां श्रवण ॥ तंव ते वेळीं तो मच्छिंद्रनंदन ॥ मोहदरींत रिघतसे ॥४४॥ मनांत म्हणे धन्य पुरुष ॥ जयासाठीं जग पिसें ॥ जाहलें आहे तस्मात यास ॥ राव उपकारी वहिवाटला ॥४५॥ तरी हा ऐसा भलेपणीं ॥ राव मिरवला आहे अवनीं ॥ तरी यातें पुनः आणोनी ॥ देहंगत करावा ॥४६॥ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥ पाहें रायाचें आयुष्य भरत ॥ तंव तो राव तितुकियांत ॥ निरामयीं पोंचला ॥४७॥ राव नुरलासे जिवितपणीं ॥ मिळाला ऐक्यें ब्रह्मचैतन्यीं ॥ ऐसें देखतां अजीवितपणीं ॥ मग उपाय ते हरले ॥४८॥ कीं मुळींच बीजा नाहीं ठाव ॥ मग रुखपत्रीं केवीं हेलाव ॥ तेवीं जीवितपणीं राणीव ॥ नातुडपणीं उतलीसे ॥४९॥ मग स्तब्ध होऊनि मच्छिंद्रनंदन ॥ परतता झाला ग्रामातून ॥ परी मच्छिंद्राहूनि गौरनंदन ॥ कळवळला स्वचित्तांत ॥५०॥
|