श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी करुणाकरा ॥ पंढरीशा रुक्मिणीवरा ॥ दीनबंधो दयासागरा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥ तूं दयाळ विश्वंभर ॥ बहुधा अर्थी हें चराचर ॥ भरण करिसी जन्म दिल्यावर ॥ कामनेतें लक्षुनी ॥२॥ तरी मम कामनेचा अर्थ ॥ कीं ग्रंथाक्षरें व्हावीं रसभरित ॥ तरी ग्रंथांतरी भराभर उदित ॥ विश्वंभरा होई कां ॥३॥ मागिले अध्यायीं उत्तम कथन ॥ रेवणनाथाचा झाला जन्म ॥ सहनसारुकें कृषिकर्म ॥ बोलूनियां दाविलें ॥४॥ दाविलें परी दैवें करुन ॥ अवचट देखिला अत्रिनंदन ॥ जो शंकरसेवक तयालागून ॥ तेंचि प्राप्त होतसे ॥५॥ हिरातेज गूढ स्थानालागुनि ॥ दडे तरी तया काढी हिरकणी ॥ भेटीलागीं येत धांवोनी ॥ लोहालागीं चुंबक ॥६॥ कां हंसपक्षी भक्षणांत ॥ कदा न भक्षी मुक्ताविरहित ॥ जरी गुंतला पिंजर्यां त ॥ परी तेंचि भक्ष्य भक्षीतसे ॥७॥ तेवीं रेवण योगमूर्ती ॥ मार्गीच भेटला अवचटगती ॥ दुग्धालागीं शर्करा निश्वितीं ॥ लवण कांहीं मिरवेना ॥८॥ असो ऐसा अवसर त्यांत ॥ घडला परी अबुद्धिवंत ॥ सिद्धिकळा घेऊनि चित्तांत ॥ अत्रिसुत दवडिला ॥९॥ दत्तें केलें शहाणपण ॥ किंचित कळा त्या दाखवून ॥ रक्षूनि आपुलें सकळ भूषण ॥ गेला निघूनि महाराजा ॥१०॥ जेवीं मर्कटा चणे देऊनि ॥ मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी ॥ तेवीं अत्रि आत्मज करणी ॥ करुनि गेला महाराजा ॥११॥ येरीकडे रेवणनाथ ॥ वृषभ ठेवूनि स्वशेतांत ॥ येऊनियां सिद्ध आउत ॥ करिता झाला महाराजा ॥१२॥ सकळ शेत झाल्यापाठीं ॥ नागदोर कवळूनि करसंपुटीं ॥ आउतमागीं फिरत जेठी ॥ गायनातें आरंभिलें ॥१३॥ आरंभिलें परी दत्तवचन ॥ मंत्रप्रयोगें गाय गायन ॥ दत्तमहिमा ऐसें म्हणून ॥ वृषमातें बोलतसे ॥१४॥ येरी महिमा ऐसें वचन ॥ सहज बोले प्रयोगानें ॥ परी महिमासिद्धि प्रत्यक्षपणें ॥ प्रगट झाली ते ठायीं ॥१५॥ सिद्धि येऊनि आउतापाशी ॥ म्हणे कामना कोण तुजसी ॥ येरु म्हणे तव नामासी ॥ श्रुत मातें करीं कां ॥१६॥ येरी म्हणे मी सिद्धि पूर्ण ॥ देहधारी महिमान ॥ ऐसें ऐकतां उत्तमोत्तम ॥ दत्तबोल आठवला ॥१७॥ जेव्हां सिद्धि दत्त देता ॥ ते सिद्धीची सकळ वार्ता ॥ सांगोनियां रेवणनाथा ॥ गेला होता महाराजा ॥१८॥ कीं हा प्रयोगितां मंत्र ॥ महिमा नामें सिद्धि पवित्र ॥ प्रत्यक्ष होईल तुजपुढें प्राप्त ॥ कामनेते पुरवावया ॥१९॥ मागणें जे आर्थिक कामना मनीं ॥ तूं तीस दाखवीं बोलूनी ॥ मग तितुके कार्यालागुनी ॥ सकळ कामना पुरवील ॥२०॥ म्हणसील काय आहे प्रताप तिचा ॥ तरी वदतां न ये आपुले वाचा ॥ सकळ भोग जो महीचा ॥ प्राप्त करील क्षणार्धे ॥२१॥ कानन तरु पाषाणपर ॥ जितुके असतील महीवर ॥ तितुके कल्पतरु साचार ॥ करुनि देईल क्षणार्धे ॥२२॥ आणि तुळवट जेथ पाषाण खाणी ॥ तपाची दावी अपार करणी ॥ की परीस तेवीं चिंतामणी ॥ करुनि दावी क्षणार्धें ॥२३॥ वसन भूषण धनकनकराशी ॥ अपार दावी नगाऐसी ॥ जें जें वर्तेल स्वकामनेसी ॥ तो तो अर्थ पुरवील बा ॥२४॥ ऐसें सांगूनि अत्रिआत्मजें ॥ ओपिलें होतें मंत्रबीज ॥ ऐसें श्रुत होतां सहजें ॥ दाटला होता गर्वानें ॥२५॥ परंतु निःस्पृह होता आनंदभरित ॥ हांकीत होता शेतांत आउत ॥ मंत्रप्रयोगीं विचारीत ॥ सहजस्थिति केलीसे ॥२६॥ परी महिमासिद्धि भेटतां त्यातें ॥ अधिक झाला आनंदभरित ॥ म्हणे सत्पंथ सांगोनि दत्त ॥ गेला असे महाराजा ॥२७॥ मग हातीचा सोडूनि आउतदोर ॥ तीतें बोलता होय उत्तर ॥ म्हणे शेतीं पैल असे तरुवर ॥ छायेकरुनि वेष्टिला ॥२८॥ तरी त्या शीतळ छायेतें ॥ कणाच्या राशी अपरिमित ॥ कनक करीं एक क्षणांत ॥ चमत्कार दावीं कां ॥२९॥ दृष्टीं पडतां कनकराशी ॥ मग मी म्हणेन सिद्धि तुजसी ॥ मग जे कामना होईल देहासी ॥ ते मी तुजला सांगेन ॥३०॥ तरी हे ऐसें परीक्षावचन ॥ आधीं दावीं मजकारण ॥ जैसा मोहोरा सूत गुंडोन ॥ अग्नि रक्षी परीक्षे ॥३१॥ कीं पक्षिकुळातें हंसदृष्टीं ॥ परीक्षे ओपी पयतोयवाटी ॥ कीं परिसा पारख पाषाणथाटीं ॥ लोह मिरवी कनकातें ॥३२॥ तेवीं आतां परीक्षापण ॥ दावी मिरवूनि अपार सुवर्ण ॥ तेणें मग संशयविरहित होवोन ॥ गोड होईल चित्तातें ॥३३॥ ऐसें बोलतां रेवणनाथ ॥ सिद्धि आश्चर्ये हास्य करीत ॥ म्हणे महाराजा एक क्षणांत ॥ कनकधनें भरीन सकळ मही ॥३४॥ मग सहज आणूनि कृपादृष्टीं ॥ विलोकीतसे महीपाठीं ॥ तों नगासमान कनकधनथाटी ॥ अपार राशी मिरवल्या ॥३५॥ तें पाहूनि रेवणनाथ ॥ म्हणे माते तूं आहेसी सत्य ॥ तरी आतां संन्निध मातें ॥ येथूनियां रक्षीं कां ॥३६॥ तूं सन्निध असतां सर्व काळ ॥ पुरविसी सकळ इच्छाफळ ॥ ऐसें बोलतां ती वेल्हाळ ॥ बोलती झाली तयातें ॥३७॥ म्हणे सन्निध राहीन आतां ॥ परी गुप्त वर्तेन जगाकरितां ॥ तुवां न धरावी दर्शनस्पृहता ॥ कार्य तुझें करीन मी ॥३८॥ मग अवश्य म्हणे रेवणनाथ ॥ कार्यसंबंधी असावें उदित ॥ मग कनकधनराशी गुप्त ॥ अदृश्य सिद्धि मिरवली ॥३९॥ त्यावरी सायंकाळपर्यत ॥ शेतीं प्रेरिलें समग्र आउत ॥ मग गुरांसवें येऊनि गोठंगणांत ॥ वृषभांतें बांधिलें ॥४०॥ रात्रीं करुनी शयनीं शयन ॥ तों उदय झाला द्वितीय दिन ॥ मग मनांत म्हणे ब्रह्मनंदन ॥ व्यर्थ कां कष्टें कष्टावें ॥४१॥ शेतीं सायंकाळपर्यंत ॥ संवत्सर हांकावें आउत ॥ तरी आतां कष्ट केउतें ॥ व्यर्थ शरीरा शिणवावें ॥४२॥ निधान असतां आपुले हातीं ॥ दैन्य भोगावें कवणें अर्थी ॥ परीस लाधला धनप्राप्ती ॥ मेळवूं कां जावें देशांतरा ॥४३॥ सुरसुरभी असतां घरीं ॥ तक्र मागावें घरोघरीं ॥ चिंतामणी ग्रीवेंमाझारी ॥ असतां चिंता कां भोगावी ॥४४॥ ऐशा कल्पना आणूनि चित्तीं ॥ सोडोनि दिधलें जाणें शेतीं ॥ तो दिन येत प्रहरमिती ॥ सहनसारु बोलतसे ॥४५॥ म्हणे वत्सा सोडूनि आउत ॥ गृहीं बैसलासी कवणे अर्थे ॥ येरू म्हने जाऊनि शेतांत ॥ काय ताता करावें ॥४६॥ कष्ट करितां रात्रंदिवस ॥ काय मिरवले फळास ॥ येरू म्हणे धान्य खावयास ॥ पिकवावें पाडसा ॥४७॥ शेत पिकलिया अपार कर्णी ॥ मग सुख भोगूनि अवनीं ॥ नातरी भ्रांति खावयालागुनी ॥ पुढे होईल बाळका ॥४८॥ ऐसें ऐकूनि तातवचन ॥ म्हणे कष्टें पिकवावें शेतीं अन्न ॥ तरी आपुले गृहीं काय न्यून ॥ म्हणोनि आतां कष्ट करावे ॥४९॥ येरु म्हणे बा आपुल्या गृहासी ॥ काय आहे न कळे मजसी ॥ नित्य स्थापूनि येरयेरा कोरड्यासी ॥ दिवसपरी लोटीतसें ॥५०॥
|