श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ४०
श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीनाथा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥ मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥ तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥ स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥ इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥ हरिहरांची जिंकूनि कोटी ॥ पुढे लोभाची भेटी ॥ गमनकळा नारदहोटीं ॥ प्राप्त झाली महाराजा ॥३॥उपरी मनिकर्णिकेचें करुनि स्नान ॥ पुढें पातले पाताळभुवन ॥ घेवूनि बळीचा गौरव मान ॥ वामनातें भेटला ॥४॥भोगावतीची करुनि आंघोळी ॥ पुनः पातला भूमंडळीं ॥ यावरी कथा पुढें कल्होळीं ॥ नवरसातें वाढी कां ॥५॥ असो आतां रमारमण ॥ ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥ तरी पुढें श्रोतीं सावधान ॥ कथारस घ्यावा कीं ॥६॥इंद्र चरपटीनें जिंकला ॥ वैभवें मशकातुल्य केला ॥ तरी तो विस्मयवान खोंचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥मग जो गुरु वाचस्पती ॥ परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥ सहस्त्रनयन तयाप्रती ॥ घेवूनियां बैसलासे ॥८॥ देवमंडळांत सहस्त्रनयन ॥ घेवूनि बैसलासे कनकासन ॥ जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥ अति तेजें मिरवला ॥९॥ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥ मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥ हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥ नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥ या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥ तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥ परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥ परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥ तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥ अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥ म्हणाल ऐसें कासयान ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥ तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥ तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥ म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥ त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥ मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥ मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥उपरिचर जातां महीतळवटीं ॥ मच्छिंद्राची घेईल भेटी ॥ सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥ मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥२६॥तरी त्यातें पाचारुन ॥ कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥ विमानयानीं रुढ करुन ॥ पाठवावा महाराजा ॥२७॥यापरी मच्छिंद्रनाथ ॥ आला असतां अमरपुरींत ॥ गौरवोनि तुवां त्यातें ॥ तुष्टचित्तीं मिरवावा ॥२८॥तरी शक्ति तव सरितालोट ॥ मच्छिंद्र उदधिपोट ॥ संगमिता पात्र अलोट ॥ प्रेमतोय भरलें असे ॥२९॥तरी सुमुखाचें पडतां जळ ॥ कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥ तूतें ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणोनियां ॥३०॥मग तो मुक्त अविंधविधी ॥ लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥ मग तें रत्न कर्णविधीं ॥ स्वीकारी कां महाराजा ॥३१॥ ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥ परम तोषला सहस्त्रनयन ॥ मग रथीं मातली पाठवोन ॥ उपरिचरा पाचारी ॥३२॥ उपरिचर येतां वदे त्यातें ॥ म्हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेली करुं सोममखातें ॥ पूर्ण करीं आतां तूं ॥३३॥तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥ जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥ उपरी त्यातें सवें घेऊन ॥ जावें नवनाथमेळीं ॥३४॥मग ते आर्या भावार्थित ॥ मेळवोनि आणी अमरपुरींत ॥ सोममखाचें सकळ कृत्य ॥ तया हस्तें संपादूं ॥३५॥अवश्य म्हणे वसुनाथ ॥ तत्काळ विमानयानीं बैसत ॥ बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥ लक्षूनियां पातला ॥३६॥तों गोरक्ष धर्मनाथ ॥ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥ बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥ तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥ अवचटपणीं देखिला ताते ॥ मग उठोनि मौळी चरणातें ॥ समर्पीत महाराजा ॥३८॥मग नाथ वसु भेटून ॥ बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥ म्लानवाणीं कार्यरत्न ॥ अमरांचें सांगतसे ॥३९॥ म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥ अर्थ उदेला मखकोटी ॥ तरी आपण नवही जेठी ॥ साह्य व्हावें कार्यार्था ॥४०॥बहुतांपरी करुनि भाषण ॥ सर्वांचे तुष्ट केलें मन ॥ उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥ अवश्यपणीं वदविलें ॥४१॥मग जालंदर कानिफा चौरंगी ॥ मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥ गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥ आरुढ झाले विमानीं ॥४२॥गौडबंगाली हेलापट्टण ॥ प्रविष्ट झालें तैं विमान ॥ राव गोपीचंद मातेसी भेटून ॥ समागमें घेतली ॥४३॥उपरी विमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥ तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥ आरुढ केला विमानीं ॥४४॥तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥ विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥ तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥ जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥ महासिद्ध जो नाथ चरपटी ॥ अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥ सवें घेतला महाराजा ॥४६॥तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥ पहाते झाले विमानयानें ॥ तेथें रेवणसिद्ध बोधून ॥ आरुढ केला विमानीं ॥४७॥ असो नवनाथ परिवारासहित ॥ ते विमानयानीं झाले स्थित ॥ चौर्या॥यशीं सिद्धांसमवेत ॥ अमरपुरीं पातले ॥४८॥ विमान येतां ग्रामद्वारी ॥ सामोरा आला वृत्रारी ॥ परम गौरवोनि वागुत्तरीं ॥ चरणांवरी लोटला ॥४९॥सकळां करोनि नमनानमन ॥ नेत सदना सहस्त्रनयन ॥ आपुल्या आसनीं बैसवोन ॥ षोडशोपचारें पूजिले ॥५०॥
|