Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १३

श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी त्रिभुवनेशा ॥ मच्छकच्छवराहनरसिंहवामनवेषा ॥ भार्गव राघव द्वारकाधीशा ॥ पूर्णब्रह्मा सर्वज्ञा ॥१॥ हे गुणातीता सकळगुणज्ञा ॥ अव्यक्तव्यक्ता सर्वज्ञा ॥ पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा ॥ बौद्ध कलंकी आदिमूतें ॥२॥ मागिले अध्यायीं केलें कथन ॥ श्रीजालिंदरा होऊनि जन्म ॥ तप आचारोनि अत्रिनंदन ॥ संपादिला गुरुत्वीं ॥३॥ तो समर्थ अत्रिसुत ॥ प्रसन्न झाला सद्विद्येंत ॥ तयावरुतें सकळ दैवत ॥ गौरविलें पावकें ॥४॥ स्कंधीं वाहूनि द्विमूर्धनी ॥ पृथक् दैवतें स्थानीं स्थानीं ॥ सत्य लोकांदि अमरा पाहूनी ॥ वैकुंठादि पाहिलें ॥५॥ पाहिलें इंद्र चंद्रस्थान ॥ मित्र वरुण गंधर्वा भेटून ॥ सुवर्लोक भुवलोंक तपोलोकादि पाहून ॥ वरालागीं आणिलें ॥६॥ यक्ष राक्षस किन्नरांसहित ॥ गणगंधर्वादि गौरवूनि समस्त ॥ वश केला जालिंदरनाथ ॥ अस्त्रविद्येकारणें ॥७॥ याउपरी कानिफा कर्णोदय ॥ होऊनि शक्ती ॥ प्रसन्न केलें वराप्रती ॥ उपरी गेले स्वस्थाना निगुती ॥ आश्रम बद्रिका सांडूनि ॥९॥ परी उमावर आणि रमावर ॥ कानिफा आणि जालिंदर ॥ बद्रिकाश्रमीं राहूनि स्थिर ॥ करिती विचार तो कैसा ॥१०॥ एकमेकां बोलती हांसून ॥ आठवूनि देवतांचें विमुंडमुंडन ॥ प्रसन्न झाले विटंबून ॥ बुद्धिहीन हे कैसे ॥११॥ परी धन्य जालिंदर मिळाला यांसी ॥ अवस्था दारुण महांसी ॥ पूर्वी भिडले अपार राक्षसांसी ॥ परी ऐसा मिळाला नाहीं त्यां ॥१२॥ उफराटे नग्नदेही ॥ अधो पाहत होते मही ॥ ऐसे उचित कदा देही ॥ मिळाले नाहीं तयांसी ॥१३॥ ऐसें बोलोनि उत्तरोत्तर ॥ हास्य करिती वारंवार ॥ मेळवूनि करास कर ॥ टाळी पिटिती विनोदें ॥१४॥ असो ऐसी विनोदशक्ती ॥ यावरी बोले उमापती ॥ हे महाराजा जालिंदरा जती ॥ चित्त दे या वचनातें ॥१५॥ नागपत्रअश्वत्थस्थानीं ॥ पूर्ण यज्ञआहुती करोनी ॥ प्रथम कवित्वा रचोनि ॥ वरालागीं साधावें ॥१६॥ वेदविद्या मंत्र बहुत ॥ अस्त्रिविद्या प्रतापवंत ॥ परी ते महीवरी पुढें कलींत ॥ चालणार नाहीं महाराजा ॥१७॥ मग मंत्रशक्ती उपायतरणी ॥ कांहींच न मिळे लोकांलागुनी ॥ मग ते दुःखप्रवाहशमनीं ॥ सकळ लोक पडतील ॥१८॥ तरी सिद्ध करुनि आतां कविता ॥ आवंतिजे नागाश्वत्था ॥ सकल विद्या करुनि हाता ॥ कानिफातें ओपिजे ॥१९॥ या कानिफाची उदार शक्तिस्थिती ॥ मिरवत आहे दांभिकवृत्ती ॥ तरी बरवी आहे कार्याप्रती ॥ पुढें पडेल महाराजा ॥२०॥ हा अपार शिष्य करील पुढती ॥ विद्या वरितील याच्या हातीं ॥ मग ती प्रतिष्ठा लोकांपरती ॥ सर्व जगीं मिरवेल ॥२१॥ पूर्वी सांबरी ऋषीनें मार्ग ॥ काढिला आहे शुभयोग ॥ परी थोडकी विद्या चांग ॥ महीलागीं पुरेना ॥२२॥ तरी शतकोटी सांबरीगणा ॥ महीतें मिरवावें शुभवचना ॥ सकळास्त्रांची आणूनि भावना ॥ महीलागी मिरवावी ॥२३॥ तरी या कवितेची वांटणी ॥ मिरवावी नवनाथलागुनी ॥ कोणती कैसी गतीलागुनी ॥ सांगतों मात ते ऐका ॥२४॥ पूर्वी मच्छिंद्रानें धरुनि लक्ष ॥ काव्य केलें आहे प्रत्यक्ष ॥ तेहतीस कोटी पंचाण्णव लक्ष ॥ मंत्रविद्युल्लता मिरविल्या ॥२५॥ यापरी गोरक्षगोष्टी होटीं ॥ मिरवेल नव लक्ष बारा कोटी ॥ पंच कोटी एक लक्ष शेवटीं ॥ मीननाथ मिरवेल ॥२६॥ नव कोटी सात लक्ष ॥ चर्पटनाथ करील कीं प्रत्यक्ष ॥ सात कोटी चार लक्ष ॥ भरतरीनाथ करील कीं ॥२७॥ तीन लक्ष दोन कोटी ॥ रेवणनाथ करील शेवटीं ॥ एक लक्ष एक कोटी ॥ वटसिद्धनाथ करील कीं ॥२८॥ चौतीस कोटी बारा लक्ष ॥ श्रीजालिंदरानें करावें प्रत्यक्ष ॥ सहा कोटी आठ लक्ष ॥ कानिफानें मिरवावें ॥२९॥ अशुभप्रयोग गोरक्षरहाटी ॥ स्थापूनि योजावे शतकोटी ॥ पुढें लोकां साधनजेठी ॥ होणार नाहीं महाराजा ॥३०॥ म्हणूनि ऐसें योजूनि साधन ॥ मंत्रप्रयोगीं करावें प्रवीण ॥ तें न करितां सकळ जन ॥ सुख होईल रोगांतें ॥३१॥ तरी हे जनउपकारासाठीं ॥ जीवा करावी आटाआटी ॥ तुम्हातें सागावी ऐसी गोष्टी ॥ नोहे सर्वज्ञ आम्हांते ॥३२॥ ही कलीची विद्या कलिसंधान ॥ मिरवित आहे पूर्वीपासून ॥ तुम्ही नवनाथ अवतार घेऊन ॥ विद्या वर्तवीत असतां कीं ॥३३॥ तुम्ही जाणणार भविष्योत्तर जाणोनि नाथा ॥ तूं देवासीं केली वार्ता ॥ कानिफातें वर देतां ॥ बोलिलासी हिता महाराजा ॥३५॥ तरी आतां आळस सांडूनि ॥ जेवी मिरवावें कवित्वरत्न ॥ जारण मारण उच्चाटन ॥ कवित्वरचनीं मिरवावें ॥३६॥ ऐसें सांगूनि उमानाथ ॥ कानिफाविषयीं आणिक सांगत ॥ यासी बैसवूनि पूर्ण तपास ॥ समर्थपणें मिरवीं कां ॥३७॥ ऐसें सांगता उमावर ॥ अवश्य म्हणे जालिंदर ॥ मग वर देऊनि रमावर ॥ जाता झाला वैकुंठीं ॥३८॥ मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥ द्वादश वर्षे राहूनि तेथ ॥ चाळीस कोटी वीस लक्षांत ॥ उभें चरित्र रचियेलें ॥३९॥ तें आदिनाथें कवित्व पाहोन ॥ पूर्ण झालें समाधान ॥ मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन ॥ सिद्धीमार्गी पावावें ॥४०॥ मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥ जाऊनि पाहिला नागाश्वत्थ ॥ पूर्ण आहुती हवन तेथ ॥ करुनि तोषवी वीरांतें ॥४१॥ सूर्यकुंडाचें आणुनि जीवन ॥ बावन्न वीरा करी सिंचन ॥ प्रसन्न करुनि त्यांचें मन ॥ वरालागी घेतलें ॥४२॥ यापरी पुनः परतून ॥ पाहते झाले बद्रिकाश्रम ॥ मग कानिफांते तपा बैसवून ॥ लोहकंटकी मिरविला ॥४३॥ श्रीआदिनाथाच्या साक्षीसी ॥ कानिफा बैसवून पूर्ण तपासी ॥ श्रीजालिंदर तीर्थस्थानासी ॥ जाता झाला पुसून ॥४४॥ त्याचि ठायीं बद्रिकाश्रमांत ॥ कानिफा आणि श्रीकृष्णनाथ ॥ तप करिती भागीरथीतीरांत ॥ तीव्र काननी बैसूनियां ॥४५॥ उभय ठाव असे विभक्त ॥ एकमेका नसे माहीत ॥ असो येरीकडे जालिंदरनाथ ॥ नानाक्षेत्रीं हिंडतसे ॥४६॥ परी क्षेत्रीं जातांचि आधीं काननीं ॥ भारा बांधिला तृण कापूनी ॥ निजमौळी त्वरें वाहुनी ॥ क्षेत्रामाजी संचरे ॥४७॥ परी तो मौळी भारा घेतां ॥ सुख न वाटे अनिळचित्ता ॥ मग संचरोनि भयहतां ॥ वरच्यावरी धरीतसे ॥४८॥ म्हणाल पवनासी काय कारण ॥ वरचेवरी धरावया तृण ॥ तरी जालिंदर अग्निनंदन ॥ अग्निपिता तो असे ॥४९॥ परी पौत्राची करुनी ममता ॥ म्हणूनि भारा धरी वरुता ॥ असो जालिंदर क्षेत्रीं येतां ॥ तृण गोधना सोडीतसे ॥५०॥