श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३०
श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदुद्धारा ॥ पंढरीअधींशा रुक्मिणीवरा ॥ सर्वसाक्षी दिगंबरा ॥ पुढें ग्रंथ बोलवी कां ॥१॥ मागिले अध्यायीं अनुसंधान ॥ भर्तरीस आले विरक्तपण ॥ गोरक्षजतीचे समागमें करुन ॥ गिरनार अचळा पोंचला ॥२॥ पोंचला परी रात्रदिन ॥ लेऊनि स्नेहाचें अपार रत्न ॥ तेणेंकरुनि उभयतां जाण ॥ सुशोभित पैं झालें ॥३॥ यावरी गोरक्ष तीन रात्री ॥ राहता झाला गिरनारपर्वती ॥ मग पुसूनी श्रीदत्ताप्रती ॥ मच्छिंद्राकडे चालिला ॥४॥ चालिला परी अत्रिसुत ॥ म्हणे बाळा गोरक्षनाथा ॥ मच्छिंद्रवत्स मम देहातें ॥ भेटला नाहीं बहुत दिवस ॥५॥ तरी तयाचे भेटी माझे चक्षु ॥ परम भुकेले योगदक्षु ॥ तरी त्या आणूनि मज प्रत्यक्षु ॥ भेटवीं कां जिवलगा ॥६॥ ऐसी ऐकतां दत्तात्रेयवाणी ॥ भेटवीन म्हणे गोरक्षमुनी ॥ मग श्रीदत्तात्रेयचरणां नमूनी ॥ निघता झाला गोरक्ष ॥७॥ श्रीमच्छिंद्रनाथमार्ग धरुन चालता झाला गोरक्षनंदन ॥ येरीकडे रायाकारण ॥ काय करी महाराजा ॥८॥ नाथदीक्षा देऊनि त्यासी ॥ मौळीं स्थायीं वरदहस्तासी ॥ चिरंजीवपद देऊनि त्यासी ॥ अक्षय केला महाराजा ॥९॥ जोंवरी कल्याण असे धरित्री ॥ चिरंजीव केला राव भर्तरी ॥ ऐसें वचन वागुत्तरीं ॥ प्रसादाते ओपिलें ॥१०॥ याउपरी अभ्यासास ॥ प्रारंभी नेमिला भर्तरीदास ॥ ब्रह्मज्ञान रसायनास ॥ कविता वेद सांगितला ॥११॥ ज्योतिष व्याकरण धनुर्धर ॥ जलतरणादि संगीतोत्तर ॥ वैद्य अश्व रोहिणी अपार ॥ गाढ आधींच होता तो ॥१२॥ कोकशास्त्रादि नारक - कळा ॥ चातुर्थभाष्य बोल रसाळा ॥ मीमांसादि पातंजला ॥ प्रवीण केला महाराजा ॥१३॥ यापरी वैद्यशास्त्र गहन ॥ सांगता झाला अत्रिनंदन ॥ वातास्त्रादिक जलद पूर्ण ॥ अग्निअस्त्र सांगितलें ॥१४॥ कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण ॥ वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ति दारुण ॥ नागास्त्र खगेंदास्त्र अस्त्रजीवनीं जीवन ॥ ब्रह्मास्त्रादि उपदेशी ॥१५॥ देवास्त्र काळास्त्र आणि मोहन ॥ रुद्राक्ष विरक्तास्त्र आते निपुण ॥ निर्वाण अस्त्रादि दानवप्रवीण ॥ रतवनास्त्रादि सांगितली ॥१६॥ कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र ॥ विभक्तास्त्रादि मानवअस्त्र ॥ विहंगम प्लवंगम कामिनीअस्त्र ॥ सकळ अस्त्रादि उपदेशी ॥१७॥ यावरी शस्त्रविद्या सघन ॥ पूर्वी होता राव निपुण ॥ त्रिशूळ फरश अंकुश मान ॥ धनुष्य तोमर असिलता ॥१८॥ परज मुदगर बरसी ॥ मांडूक चक्रें गदा उद्देशीं ॥ दारुकयंत्रे शस्त्रेंसीं बरसी ॥ कुठारादिकीं प्रवीण ॥१९॥ ऐसा शस्त्रविद्येकारण ॥ पूर्वीच होता राव प्रवीण ॥ त्यावरी अस्त्रविद्यारत्न ॥ गुरुमुखें लाधला ॥२०॥ मग ते विद्येसी अर्थ शेवटीं ॥ कीं कोंदण विराजे रत्नतगटी ॥ मग त्या हेमावटी ॥ मोल काय बोलावें ॥२१॥ कीं सुगंधित मलयागार ॥ त्या मिश्रित झालें मृगमदकेशर ॥ मग त्या गंधातें वागुत्तर ॥ कवण अर्थी बोलावें ॥२२॥ असो विद्यासंपन्न ॥ भर्तरीतें करुनि अत्रिनंदन ॥ उपरी साबरी व्यक्त करुन सदनातें पाठवी ॥२३॥ नाग पन्नग उभय ठायीं ॥ सकळ दैवतें तया प्रवाहीं ॥ मित्र कुंडासनीं वेढूनी महीं ॥ पाठवीत महाराजा ॥२४॥ मग तेथें जाऊनि भर्तरीनाथ ॥ साधिलें सकळ बावन्न वीरांतें ॥ जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत ॥ त्याचि क्लेशा वरियेलें ॥२५॥ मग सकळ देव करुनि प्रसन्न ॥ पाहती श्रीगुरुचे चरण ॥ मग सवें घेऊनि अत्रिनंदन ॥ बद्रिकाश्रमीं पातला ॥२६॥ तेथें बैसवूनि पूर्ण तपासी ॥ मग घेऊनि गिरनारपर्वतासी ॥ राहते झाले सुखवस्तीमी ॥ मच्छिंद्रमार्ग विलोकीत ॥२७॥ तों येरीकडे गोरक्षनाथ ॥ पहाता झाला गर्भगिरी पर्वत ॥ परम आवडीं आनंदभरित ॥ मच्छिंद्रातें भेटला ॥२८॥ उपरी चरणीं ठेवूनि माथां ॥ म्हणे महाराजा आनंदभरिता ॥ तुमच्यां भेटीची क्षुधा नितांत ॥ कामानळू दाटला ॥२९॥ तरी तयाची घेऊं भेटी ॥ आनंदें होड दाटला पोटीं ॥ जैसी इंदूची अर्णवा गांठी ॥ प्रेमें लहरी उचंबळे ॥३०॥ कीं सोमातें कुमुदपती ॥ भेटी चुंबक काम वांच्छिती ॥ तन्न्यायें त्रिविधमूर्ती ॥ कामिनली भेटसी ॥३१॥ ऐसी गोरक्षकाची ऐकतां वाणी ॥ तोहि पडला कामवेष्टणी ॥ म्हणे वत्सा माझा स्वामी ॥ पाहूं ऐसें वाटतसे ॥३२॥ मग कांहीं दिवस तेथें राहून ॥ करिते झाले उभय गमन ॥ वैदर्भदेशींचा मार्ग धरुन ॥ गमत असती उभयतां ॥३३॥ तों कौंडिंण्यपुरीं सहज ग्रामांत ॥ करुं गेले उभय भिक्षेतें ॥ तों तेथींच शशांगर नृपनाथ ॥ कोपलासे स्वसुता ॥३४॥ कोपला परी चौहटआंत ॥ दूताहातीं ओपूनी सुत ॥ खंडित करुनि पदहस्त ॥ चौहटातें टाकिला ॥३५॥ यावरी श्रोते कल्पना घेती ॥ राव कोपला सुतावरती ॥ तो कोप तया कवण अर्थी ॥ सुतावरी पेटला ॥३६॥ तरी हे कविज्ञ महाराजा ॥ दावा सकळ निर्णयचोजा ॥ गूढत्व ठेवूनि ग्रंथी भोजा ॥ प्रांजळपणीं असावा ॥३७॥ ऐसें ऐकतां श्रोत्यांचें वचन ॥ कवि म्हणे घ्या अनुसंधान ॥ तेथींचा राव शशांगर नाम ॥ प्रज्ञावंत धार्मिक ॥३८॥ धैर्य औदार्य बाळ संपत्तीं ॥ सत्वस्थ यश करी कांतीं ॥ ऐसा असूनि शशांगर नृपती ॥ परी संतति नसे त्या ॥३९॥ संतति नसे तेणेंकरुन ॥ राव पेटला चित्तीं उद्विग्न ॥ न आवडे वैभव राज्यकारण ॥ छत्रसिंहासन नावडे ॥४०॥ नावडे आसन वसन शयन ॥ नावडे अन्नोदकादि पान ॥ नावडे चातुर्यभोगादि गायन ॥ कळाकुशळ गुणस्वी ॥४१॥ सदा विराजूनि एकांतस्थानीं ॥ वंशलतेची करी घोकणी ॥ तों एके दिवशीं मंदाकिनी ॥ कांता बोले रायातें ॥४२॥ म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ धाक धरितां संततिकामा ॥ परी लल्लाटरेषेच्या विधिउपमा ॥ नसल्या व्यर्थ कां धाक ॥४३॥ तरी सर्वज्ञा सहजस्थितीं ॥ चित्त मिरवा प्रांजळवृत्तीं ॥ व्यर्थ कांचणी शरीराप्रती ॥ न भंगूं द्यावें अनलातें ॥४४॥ राया वडवानळ चिंताक्लेश ॥ शरीरा साहूनि हरी प्रज्ञेस ॥ प्रज्ञेविण संसार ओस ॥ होत आहे महाराजा ॥४५॥ ऐसें बोलतां मंदाकिनी ॥ परी राया बोध न वाटे मनीं ॥ चित्तदरीं व्यग्र कांचणी ॥ संसारवल्ली सोडीन ॥४६॥ दिवसानुदिवस अति थोर ॥ नावरे चिंतावैश्वानर ॥ मग एके दिवशीं अति निष्ठुर ॥ शिव आराधूं बैसला ॥४७॥ मंत्रिकातें पाचारुन ॥ वैभव केलें त्यां स्वाधीन ॥ सवें स्वल्प दूत घेऊन ॥ दक्षिण दिशे चालिला ॥४८॥ रामेश्वरा काम वरुन ॥ जात शिवातें करुं प्रसन्न ॥ तों मार्गी चालतां कृष्णासंगम ॥ तुंगभद्रीं भेटला ॥४९॥ तेथें राहता मुक्कामासां ॥ शयन करितां निशीसी ॥ दशकर पंचानन स्वप्नासी ॥ येऊनिया बोलतसे ॥५०॥
|