श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १७
श्रीगणेशाय नमः जयजयाजी वैकुंठाधीशा ॥ अलक्ष अगोचरा आदिपुरुषा ॥ पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा ॥ सनातना आदिमूर्ते ॥१॥ ऐसा स्वामी पंढरीअधीश ॥ बैसूनि मालूचे कवित्वपृष्ठीस ॥ भक्तिसारसुधारस ॥ निर्माण केला ग्रंथासी ॥२॥ तरी मागिले अध्यायीं कथन ॥ आनिफा पातला हेळापट्टण ॥ गोपीचंदाची भेटी घेऊन ॥ मैनावतीसी भेटला ॥३॥ तरी सिंहावलोकनीं तत्त्वतां ॥ मैनावती भेटूनि नाथा ॥ सकळ वृत्तांत सांगूनि सुता ॥ समाधानीं मिरविलें ॥४॥ असो गोपीचंद दुसरे दिनीं ॥ नाथाग्रहें शिबिरीं जाऊनि ॥ मौळी ठेवूनि नाथाचे चरणीं ॥ उभा राहिला सन्मुख ॥५॥ कानिफा पाहूनि राव दृष्टीं ॥ बोलता झाला स्ववाग्वटी ॥ श्रीजालिंदर महीपोटी ॥ कोठे घातला तो सांग पां ॥६॥ येरु म्हणे महाराजा ॥ ठाव दावितो चला ओजा ॥ तेव्हां म्हणे शिष्य माझा ॥ घेऊनि जावें सांगाती ॥७॥ ऐसी कानिफा बोलतां मात ॥ अवश्य म्हणे नृपनाथ ॥ मग सच्छिष्य घेऊनि सांगात ॥ तया ठायीं पातला ॥८॥ ठाव दाखवूनि सच्छिष्यासी ॥ पुन्हां आले शिबिरासी ॥ शिष्य म्हणती त्या ठायासी ॥ पाहूनि आलों महाराजा ॥९॥ मग रायासी म्हणे कानिफानाथ ॥ जालिंदर काढाया कोणती रीत ॥ येरु म्हणे तुम्ही समर्थ ॥ सकळ जाणते सर्वस्वीं ॥१०॥ बाळें आग्रहें करुं जाती ॥ परी तयांचा निर्णय कैशा रीतीं ॥ करावा हें तों नेणती निश्वतीं ॥ सर्व संगोपी माता ती ॥११॥ तेवीं माता पिता गुरु ॥ त्राता मारिता सर्वपारु ॥ तरी कैसे रीती हा विचारु ॥ आव्हानिजे महाराजा ॥१२॥ ऐसें बोलतां नृपनाथ ॥ मग बोलतां झाला गजकर्णसुत ॥ तुझे रक्षावया जीवित ॥ विचार माझा ऐकिजे ॥१३॥ कनक रौप्य ताम्रवर्ण ॥ पितळ लोहधातु पूर्ण ॥ पांच पुतळे करुनि आण ॥ तुजसमान हे राया ॥१४॥ ऐसी आज्ञा करितांचि नाथ ॥ प्रेरिले रायें ग्रामांत दूत ॥ हेमकार लोहकारासहित ॥ ताम्रकारका आणिलें ॥१५॥ जे परम कुशल अति निगुती ॥ लक्षूनि सोडिले हेराप्रती ॥ धातु ओपूनि तयांचे हातीं ॥ पुतळ्यांतें योजिलें ॥१६॥ मग ते आपुले धीकोटी ॥ पुतळे रचिती मेणावरती ॥ नाथालागीं दावूनि दृष्टी ॥ रसयंत्रीं ओतिले ॥१७॥ पाहोनि दिन अति सुदिन ॥ मग नृपासह पुतळे घेवोन ॥ पाहता झाला गुरुस्थान ॥ विशाळबुद्धी कानिफा ॥१८॥ गरतीकांठीं आपण बैसोन ॥ पुतळा ठेवोनि हेमवर्ण ॥ राजाहातीं कुदळ देवोन ॥ घाव घालीं म्हणतसे ॥१९॥ घाव घालितां परी लगबगां ॥ पुसतां स्वामी नांव सांगा ॥ सांगितल्यावरी अति वेगा ॥ गरतीबाहेर निघे कीं ॥२०॥ ऐसें सांगोनि प्रथम रायातें ॥ मग कुदळी दिधली हातातें ॥ उपरी चिरंजीवप्रयोगातें ॥ भाळीं चर्चिली विभूती ॥२१॥ पुतळा ठेवोनि मध्यगरतीं ॥ मागें उभा राहिला नृपती ॥ लवकर घाव घाली क्षितीं ॥ आंतूनि पुसे महाराज ॥२२॥ कोणी येवोनि घालिती घाव ॥ वेगीं वदे कां तयाचें नांव ॥ नृप म्हणे मी राणीव ॥ गोपीचंद असें कीं ॥२३॥ रायें सांगतांचि नाम ॥ निघाला होता गरतींतून ॥ श्रीजालिंदराचें शापवचन ॥ कणकप्रतिमे झगटले ॥२४॥ तीव्रशाप वैश्वानर ॥ व्यापिलें कनकपुतळ्याचें शरीर ॥ क्षण न लागतां महीवर ॥ भस्म होवोनि पडियेलें ॥२५॥ भस्म होतां कनकप्रतिमा ॥ दुसरा ठेविला उगमा ॥ तयाही मागें नरेंद्रोत्तमा ॥ पुन्हां गरतीं स्थापिलें ॥२६॥ रौप्यवर्णी पुतळ्यामागें ॥ राव उभा केला वेगें ॥ पुन्हा विचारिलें सिद्धियोगें ॥ कोण आहेस म्हणवोनि ॥२७॥ पुन्हां सांगे नृप नांव ॥ गरतीबाहेर वेगीं धांव ॥ जालिंदरशापगौरव ॥ जळ जळ खाक होवो कीं ॥२८॥ ऐसें वदतां शापोत्तर ॥ पुतळा पेटला वैश्वानरें ॥ तोही होवोनि भस्मपर ॥ महीलागीं मिरवला ॥२९॥ मग तिसरा लोहपुतळा पूर्ण ॥ तोही झाला शापें भस्म ॥ चवथा पांचवा गति दुर्गम ॥ त्याचिपरी पावला ॥३०॥ यावरी त्या नृपनाथा ॥ श्रीकानिफा झाला सांगता ॥ मातें वदोनि नाम सर्वथा ॥ नाथाप्रती सांगावें ॥३१॥ अवश्य म्हणोनि गौडपाळ ॥ लवकरी भेदी अति सबळ ॥ तो नाद ऐकूनि तपी केवळ ॥ विचार करीत मानसीं ॥३२॥ माझा क्रोध वडवानळ ॥ जाळूनि टाकील ब्रह्मांड समग्र ॥ तेथें वांचला त्रिलोचनकुमर ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३३॥ कृतांताचे दाढेआंत ॥ सांपडलिया सुटोनि जात ॥ न शिवे वैश्वानर मृत्य ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३४॥ महातक्षकानें दंश करुन ॥ वांचवूं शके कोणी प्राण ॥ केंवीं वांचला नृपनंदन ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३५॥ परम संकट पाहोनी ॥ प्राण उदित घेत हिरकणी ॥ तो वांचूनि मिरवे जनीं ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३६॥ उरग खगेंद्रा हातीं लागतां ॥ परी न मरे भक्षण करितां ॥ तेवीं झालें नृपनाथा ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३७॥ कीं मूषक सांपडल्या मुखांत ॥ त्यातें कदा न ये मृत्य ॥ तेवीं वांचला हा नृपनाथ ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३८॥ सहज उभा पर्वतानिकटी ॥ कडा तुटोनि पडला माथीं ॥ त्यांत वांचला ऐसें म्हणती ॥ हेंचि आश्चर्य वाटतसे ॥३९॥ ऐसा विचार मनांत ॥ करिता झाला जालिंदरनाथ ॥ चित्तीं म्हणे त्या भगवंत ॥ साह्य झाला रक्षणीं ॥४०॥ तरी आतां असो ऐसें ॥ वांचल्या अमर करुं त्यास ॥ ऐसें विचारुनि चित्तास ॥ मनीं गांठी दृढ धरिली ॥४१॥ येरीकडे कानिफनाथ ॥ हुंकार नृपासी देत ॥ तंव उभा स्वकरीं व्यक्त ॥ लवकरी मही भेदीतसे ॥४२॥ लवकरी घाव कानीं उठतां ॥ श्रीजालिंदर होय पुसता ॥ कोण आहेस अद्यापपर्यंत ॥ घाव घालिसी महीतें ॥४३॥ ऐकतां श्रीगुरुवचन ॥ रायाआधीं गजकर्णनंदन ॥ सांगूनि आपुलें नामाभिधान ॥ गोपीचंदाचें सांगतसे ॥४४॥ म्हणे महाराजा तपोजेठी ॥ मी बाळक कानिफा महीपाठी ॥ पहावया चरण दृष्टीं ॥ बहुत भुकेले चक्षू ते ॥४५॥ म्हणवोनि गोपीचंद नृपनाथ ॥ तुम्हां काढावया उदित ॥ ऐसी ऐकोनि सच्छिष्यमात ॥ म्हणे अद्यापि नृप वांचला ॥४६॥ तरी आतां चिरंजीव ॥ असो अर्कअवघी ठेव ॥ अमरकांती सदैव भाव ॥ जगामाजी मिरवो कां ॥४७॥ ऐसें वदोनि जालिंदरनाथ ॥ निजचक्षूनें पहावया सुत ॥ बोलता झाला अति तळमळत ॥ म्हणे महीतें विदारीं ॥४८॥ ऐसी आज्ञा होतांचि तेथें ॥ मग काढिते झाले वरील लिदीतें ॥ तंव ते मृत्तिका दशवर्षात ॥ महीव्यक्त झालीसे ॥४९॥ मग कामाठी लावूनि नृपती ॥ उकरिता झाला मही ती ॥ वरील प्रहार वज्रापती ॥ जावोनियां भेदलासे ॥५०॥
|