Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ११

श्रीगणेशाय नमः जयजयाजी इंदुशलाका ॥ मुगुटमणे सकळटिळका ॥ इंदिरापते विबुधजनका ॥ भक्तिमानसा विराजित ॥१॥ ऐसा धैर्यऔदार्यवंत ॥ पुढें बोलवी भक्तिसारग्रंथ ॥ मागिले अध्यायीं गहिनीनाथ ॥ जन्मोदय पावला ॥२॥ यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ ॥ महीचीं तीर्थे करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत पैं गेले ॥३॥इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ पूर्वाध्यायात कीजे श्रवणी ॥ असो गुरुशिष्य बद्रिकाश्रमीं ॥ शिवालया पातले ॥४॥ बद्धांजळी जोडोनि कर ॥ करिते झाले नमस्कार ॥ नमस्कार करुनि जयजयकार ॥ स्तुतिसंवादें आराधिलें ॥५॥ हे त्रिपुरारी शूळपाणी ॥ अपर्णावर पंचाननी ॥ रुंडमाळा चिताभस्मी ॥ दिव्यतेजभूषित तूं ॥६॥हे कामांतका दक्षतेजा ॥ भोळवट वरां देसी दानवां ॥ कैलासपते महादेवा ॥ सदाशिवा आदिमूर्ते ॥७॥ हे दिगंबरा जगजेटीं ॥ भाळीं गंगा मौळीं जटाजूटी ॥ नरकपाळ करसंपुटीं ॥ इंदुकळेतें मिरविशी ॥८॥ उरगवेष्टन कुरंगसाली ॥ व्याघ्रांबर वसनपाली ॥ गजचार्मादि मिति झाली ॥ परिधाना महाराजा ॥९॥ हे कैलासवासा उमापती ॥ दक्षजामाता आदिमूर्ती ॥ चक्रचालका मायाभगवती ॥ आम्हां दासां अससी तूं ॥१०॥ हे नीलग्रीवा आदिपीठ ॥ करुणकारा उत्तमा श्रेष्ठ ॥ स्वीकारुनि सर्व अरिष्ट ॥ सुख देसी देवांसी ॥११॥ हे भाळदृष्टित्रार्थनयनी ॥ डमरु त्रिशूळ विराजे पाणीं ॥ सदा प्रिय वृषभ वाहनीं ॥ भस्मधारणी महाराजा ॥१२॥हे स्मशानवासी वैराष्यशीळा ॥ नगजामात रक्षमाळा ॥ श्वेतवर्णा तमोगुणा आगळा ॥ वाहसी गळां राममंत्र ॥१३॥ हे सर्वाधीश विश्वपती ॥ भिक्षाटणी बहुत प्रीती ॥ जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटीं ॥ शुद्ध वीरगुंठी शोभतसे ॥१४॥ फरशांकुश डमरु हातीं ॥ लोप पापा पातोपातीं ॥ षडाननताता सुत गणपती ॥ विद्यालक्षणीं मिरविसी ॥१५॥ ऐसी स्तुति अपार वचनीं ॥ करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमीं ॥ स्तुति ऐकूनि प्रेमें उगमी ॥ प्रगट झाला महाराज ॥१६॥मग मच्छिंद्राचा धरुनि हस्त ॥ सप्रेम त्यातें आलिंगित ॥ निकट बैसवूनि पुसे त्यातें ॥ योगक्षेम कैसा तो ॥१७॥ गोरक्षातें घेऊनि जाळी ॥ मुख स्वकरें कुरवाळी ॥ म्हणे बा उदय येणें काळीं ॥ हरिनारायण झालासी ॥१८॥ ऐसें वदोनी आणिक वदत ॥ हें महाराज मच्छिंद्रनाथ ॥ हा तव शिवयोगें सुत ॥ तारक होईल ब्रह्मांडा ॥१९॥ म्यां पूर्वीच यातें पाहिलें होतें ॥ म्हणशील तरी कनकगिरीतें ॥ तुवां अभ्यासूनि सुतें ॥ आणिल दैवत घरातें ॥२०॥ श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत ॥ भैरव काळिका वीरांसहित ॥ पाचारितां मीही तेथ ॥ आलों होतों महाराजा ॥२१॥ तस्मात् पूर्वीची होय ओळखी ॥ म्हणवूनि गोरक्ष घेतला अंकीं ॥ परी आतां असो शेखी ॥ एक वचन ऐकिजे ॥२२॥ यातें विद्येतें अभ्यासिलें ॥ परी तपाविण विगलित ठेलें ॥ जैसें शत्रु जगत्रयीं झाले ॥ मग तें हीनत्व प्रतापा ॥२३॥ कीं जीवनाविण वृक्ष जैसा ॥ काळरुप भासे तैसा ॥ कीं तरुविण ग्राम जैसा ॥ बुभुक्षित लागतसें ॥२४॥ कीं नाकेंविण सुंदर नारी ॥ कीं विनातोय सरितापात्रीं ॥ कीं नक्षत्राविण शोभा रात्रीं ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥ तरी तपाविण लखलखीत ॥ विद्याभांडार न दिसत ॥ जैसा मानव परम क्षुधित ॥ विकळ शरीरीं मिरवतसे ॥२६॥ तरी आतां माझिया आश्रमीं ॥ तपा बैसवीं योगद्रुमी ॥ मग तपबळानें बलाढ्यगामी ॥ विद्याअस्त्रें मिरवेल हा ॥२७॥ याउपरीं मच्छिंद्रनाथ बोलत ॥ वय धाकुटें बाळ अत्यंत ॥ परी तप तीव्रक्लेशांत ॥ साहिलें जाईल कैसें जी ॥२८॥ येरु म्हणे वरदपाणी ॥ तुझ्या आहे मौळिस्थानीं ॥ तरी तपक्लेशावर कडसणी ॥ दुःख देणार नाहीं बा ॥२९॥ यापरी येथें नित्यनित्य ॥ मी समाचारीनें गोरक्षातें ॥ तूं निःसंशय सकलातें ॥ तपा गोरक्षा बैसवीं ॥३०॥ ऐसें वदतां आदिनाथ ॥ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत ॥ उत्तम आहे ऐसें बोलत ॥ अंगिकारिता पैं झाला ॥३१॥ तेथें आमुचें काय हरलें ॥ कीं जन्मांधा चक्षू आलें ॥ कीं सदैव हरिणीतें सांभाळिले ॥ एकटपणीं पावसांत ॥३२॥तेंवी तूं आणि तुझा दास ॥ येथें आश्रमीं करितां वास ॥ तेथें वाईट काय आम्हांस ॥ चिंता माझी निरसेल ॥३३॥ ऐसी शिवातें बोलूनि वाणी ॥ परी हर्ष न माये मच्छिंद्रमनीं ॥ जें योजिलें होतें अंतःकरणीं ॥ तेचि घडूनि पैं आलें ॥३४॥ फारचि उत्तमोत्तम झालें ॥ गोरक्षासी शिवें अंगिकारिलें ॥ आतां जाईल संगोपिलें ॥ अर्थाअर्थी बहुवसें ॥३५॥ मग उत्तम वेळा उत्तम दिवस ॥ ग्रहबळ जाणूनि नक्षत्रास ॥ उत्तम तिथी उत्तम मास ॥ पाहूनि तपा बैसविला ॥३६॥ लोहाचा करुनि कंटक नीट ॥ त्या अग्रीं योजूनि चरणांगुष्ठ ॥ वामपादा देऊनि कष्ट ॥ उभा राहिला गोरक्ष तो ॥३७॥ वायुआहारीं ठेवूनि मन ॥ क्षणिक अन्न त्यजून ॥ उपरी फळपत्रीं आहार करुन ॥ क्षुधाहरण करीतसे ॥३८॥ सूर्यमंडळीं ठेवूनि दृष्टी ॥ तपो करीतसे तपोजेठी ॥ तें मच्छिंद्र पाहूनि निजदृष्टीं ॥ परम चित्तीं तोषिला ॥३९॥ मग आदिनाथा विनवोनी ॥ मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी ॥ द्वादश वर्षांचा नेम करुनी ॥ गोरक्षातें सांगितले ॥४०॥ असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी ॥ येरीकडे बद्रिकाश्रमीं ॥ रात्रंदिवस बद्रिकाशूळपाणी ॥ जवळी जाऊनि बैसला ॥४१॥ वस्यें आपण आदिनाथ ॥ गोरक्षाचें दास्य करीत ॥ मागें पुढें राहूनि अत्यंत ॥ आल्या विघ्ना निवटीतसे ॥४२॥ असो यावरी मच्छिंद्रनाथ ॥ गया प्रयाग करुनि त्वरित ॥ काशी अवंतिका मिथुळासहित ॥ मथुरा काश्मिरी पाहिली ॥४३॥ अयोध्या द्वारका महाकाळेश्वर ॥ सोमनाथ करुनि तत्पर ॥ ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर ॥ घृणेश्वर पाहिला ॥४४॥ भीमाउगमीं भीमाशंकर ॥ आंवढ्या नागनाथादि पंढरपूर ॥ करुनि चौदा पीठें थोर ॥ भगवतीची पाहिली ॥४५॥ कार्तिक शेषाद्रि मल्लिकार्जुन ॥ सरितासरोवरीं अपार स्नान ॥ घडलें करितां महीतें गमन ॥ लोटलीं वर्षे द्वादशादि ॥४६॥ सकळ तीर्थे महीची करुन ॥ शेवटीं सेतुबंधीं जाऊन ॥ रामेश्वराचे चरण वंदून ॥ स्नाना गेला अब्धीसी ॥४७॥ तों श्वेतबंधीं वायुसुत ॥ जाऊनि नमी मच्छिंद्रनाथ ॥ परी मच्छिंद्रा पाहतां मकरध्वजतात ॥ आल्हादला चित्तीं बहुत तो ॥४८॥ परमप्रीतीं लबडसवडी ॥ मच्छिंद्रहस्त धरुनि ओढी ॥ हदयीं आलिंगूनि परम आबडीं ॥ निकट बैसवी महाराजा ॥४९॥ म्हणे बा तूं योगद्रुमानें ॥ कोणीकडे केलें येणें ॥ चोवीस वर्षी तुझें दर्शन ॥ आजि झालें महाराजा ॥५०॥