Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २४

श्रीगणेशाय नमः जयजयाजी निरंजना ॥ अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ॥ पूर्णब्रह्मा मायाहरणा ॥ चक्रचाळका आदिपुरुषा ॥१॥ हे गुणातीता सर्वत्रभरिता ॥ गुणरुपा लक्ष्मीकांता ॥ मागिले अध्यायीं रसाळ कथा ॥ मच्छिंद्रोत्सव दाविला ॥२॥ एका सुवर्णविटेसाठीं ॥ कनकगिरी करी गोरक्षजेठी ॥ आतां मम वाग्वटी ॥ भर्तरी आख्यान वदवीं कां ॥३॥ तरी श्रोते ऐका कथन ॥ पूर्वी मित्ररश्मी करितां गमन ॥ वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन ॥ अस्ताचळा जातसे ॥४॥ तों उर्वशी विमानासनीं ॥ येत होती भूलोकअवनी ॥ तंव ती दारा मुख्यमंडनीं ॥ मदनबाळी देखिली ॥५॥ देखतांचि पंचबाणी ॥ शरीर वेधलें मित्रावरुणी ॥ वेघतांचि इंद्रियस्थानीं ॥ येऊनि रेत झगटलें ॥६॥ झगटतांचि इंद्रिय रेत ॥ स्थान सोडूनि झालें विभक्त ॥ विभक्त होता पतन त्वरित ॥ आकाशाहूनि पैं झालें ॥७॥ परी आकाशाहूनि होतांचि पतन ॥ वातानें तें विभक्तपण ॥ द्विभाग झालें महीकारण ॥ येऊनियां आदळलें ॥८॥ एक भाग लोमश आश्रमा ॥ येऊनि पावला थेट उत्तमा ॥ घटीं पडतांचि तनू उत्तमा ॥ आगस्तीची ओतली ॥९॥ यापरी दुसरा भाग ॥ तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग ॥ येतांचि कैसा झाला वेग ॥ तोचि श्रवण करा आतां ॥१०॥ कौलिक घेऊनि पात्र भर्तरी ॥ मिक्षोद्देश धरुनि अंतरीं ॥ निघता झाला सदनाबाहेरी ॥ वस्तीपर्यटण करावया ॥११॥ परी कौलिक येतांचि बाहेर ॥ भर्तरी ठेवूनि महीवर ॥ बंद करीतसे सदनद्वार ॥ कवीटाळें देऊनियां ॥१२॥ परी भर्तरी ठेविली अंगणांत ॥ तों आकाशांतूनि रेत त्यांत ॥ येऊनियां अकस्मात ॥ भाग एक आदळला ॥१३॥ तों इकडे कौलिक ऋषी ॥ टाळे देऊनि गृहद्वारासी ॥ येऊनि पाहे भर्तरीसी ॥ तों रेत व्यक्त देखिलें ॥१४॥ रेतव्यक्त देखतांचि पात्र ॥ अंतःकरणीं विचारी तो पवित्र ॥ चित्तीं म्हणे वरुणीमित्र ॥ रेत सांडिलें भर्तरीं ॥१५॥ तरी यांत धृमीनारायण ॥ अवतार घेईल कलींत पूर्ण ॥ तीन शत एक सहस्त्र दिन ॥ वर्षे लोटलीं कलीचीं ॥१६॥ इतकीं वर्षे कलीची गेलिया ॥ धृमींनारायण अवतरेल भर्तरीं या ॥ तरी आतां भर्तरी रक्षूनियां ॥ ठेवूं आश्रमीं तैसीच ॥१७॥ मग ती भर्तरी रेतव्यक्ती ॥ रक्षिता झाला आश्रमाप्रती ॥ त्यास दिवस लोटतां बहुतां ॥ पुढें कलि लागला ॥१८॥ मग तो कौलिक ऋषी ॥ गुप्त विचारितां प्रगट देशीं ॥ भर्तरी नेऊनि मंदराचळासी ॥ गृहाद्वारीं ठेविली ॥१९॥ गृहाद्वारीं ठेवूनि पात्र ॥ तो अदृश्य विचरे पवित्र ॥ तों कलि लोटतां वर्षे तीन सहस्त्र ॥ एकशतें तीन वर्षे ॥२०॥ तों द्वारकाधीशअंशें करुन ॥ भर्तरींत संचरला धृमीनारायण ॥ जीवित्व व्यक्त रेताकारण ॥ होतांचि वाढी लागला ॥२१॥ वाढी लागतां दिवसेंदिवस ॥ पुतळा रेखित चालिला विशेष ॥ पूर्ण भरतां नवमास ॥ सिद्ध झाला तो पुतळा ॥२२॥ परी मधुमक्षिकेनें पात्रांत ॥ मधूचें जाळें केले होतें ॥ तयाचे संग्रहें व्यक्त ॥ बाळ वाढी लागला ॥२३॥ वाढी लागतां मधुबाळ ॥ नवमास लोटतां गेला काळ ॥ परी तो देहें होता स्थूळ ॥ भर्तरी पात्र मंगलें ॥२४॥ बहुत दिवसांचे पात्रसाधन ॥ झालें होतें कुइजटपण ॥ त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन ॥ पर्वत कोसळता लोटले ॥२५॥ कोसळतां परी एक पाषाण ॥ गडबडीत पातला तें स्थान ॥ परी पावतांचि पात्रासी झगडोन ॥ भर्तरी भंग पावली ॥२६॥ भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत ॥ तेजस्वी मिरवले शकलांत ॥ मक्षिकेचे मोहळ व्यक्त ॥ तेहीं एकांग जाहलें ॥२७॥ मग त्यांत निर्मळपणीं बाळ विरक्त ॥ मिरवों लागलें स्वतेजांत ॥ जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त ॥ निर्मळपणीं मिरवतसे ॥२८॥ कीं स्थिरावल्या जैसे जीवन ॥ तळा बैसलें गढूळपण ॥ तें बाळ भर्तरी शुक्तिकारत्न ॥ विमुक्त झालें वेष्टणा ॥२९॥ परी कडा कोसळला कडकडीत ॥ शब्द जाहले अति नेट ॥ तेणेंकरुनि मक्षिका अचाट ॥ भय पावोनि पळाल्या ॥३०॥ येरीकडे एकटें बाळ ॥ शब्दरुदनीं करी कोल्हाळ ॥ तेथें चरे कुरंगमेळ ॥ तया ठायीं पातल ॥३१॥ तयांत गरोदर कुरंगिणी ॥ चरत आली तये स्थानीं ॥ तों बाळ रुदन करितां नयनीं ॥ निवांत तृणीं पडलेंसे ॥३२॥ तरी अफाट तृण दिसे महीं ॥ त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ॥ चरत येतां हरिणी तया ठायीं ॥ प्रसूत झाली बाळ पैं ॥३३॥ प्रसूत होतां बाळें दोन्ही ॥ झालीं असतां कुरंगिणी ॥ पुनः मागें पाहे परतोनी ॥ तों तीन बाळें देखिलीं ॥३४॥ माझींच बाळे त्रिवर्ग असती ॥ ऐसा भास ओढवला चित्तीं ॥ मग जिव्हा लावूनि तयांप्रती ॥ चाटूनि घेतलें असे ॥३५॥ परी तो खडतरपणी दोन्ही पाडसें तीतें ॥ संध्याअवसरीं झगडलीं स्तनातें ॥ परी हें बाळ नेणे पानातें ॥ स्तन कवळावें कैसे तें ॥३६॥ मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस ॥ चहूंकडे ठेवूनि चौपदांस ॥ मग वत्सलोनि लावी कांसेस ॥ मुख त्याचें थानासी ॥३७॥ ऐसे लोटतां कांहींएक दिवस ॥ तों तें रागूं लागलें महीस ॥ मग ते मृगी लावूनी थानास ॥ संगोपन करीतसे ॥३८॥ ऐसें करवोनि स्तनपानीं ॥ नित्य पाजी कुरंगिनी ॥ आपुले मुखींची जिव्हा लावूनी ॥ करी क्षाळण शरीरासी ॥३९॥ पाडसें ठेवूनि तया स्थानीं ॥ चरूं जातसे विपिना हरिणी ॥ घडोघडी येतसे परतोनी ॥ जाई पाजूनि बाळातें ॥४०॥ ऐसें करितां संगोपन ॥ वर्षे लोटलीं तयातें दोन ॥ मग हरिणामध्येंचि जाऊन ॥ पत्रें भक्षी वृक्षांची ॥४१॥ परी त्या वनचरांचे मेळीं ॥ विचारितां सावजभाषा सकळी ॥ स्पष्ट होऊनि त्या मंडळीं ॥ त्यांसमान बोलतसे ॥४२॥ हस्तिवर्ग गायी म्हैशी व्याघ्र ॥ जंबुक लांडगे हरिण भयंकर ॥ शार्दूळ रोही गेंडा सांबर ॥ भाषा समजे सकळांची ॥४३॥ सर्प किडे मुंगी पाळी ॥ पक्षी यांची बोली सकळी ॥ तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं ॥ देत असे सकळांसी ॥४४॥ ऐसियापरी वनचर - रंगणी ॥ प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ॥ जिकडे जिकडे जाय हरिणी ॥ तिकडे तिकडे जातसे ॥४५॥ ऐसें पांच वर्षेपर्यंत ॥ हरिणीमागें तो हिंडत ॥ तों एके दिवशीं चरत ॥ हरिणी आली त्या मार्गे ॥४६॥ काननीं चरतां मार्गे नेटें ॥ तो बाळही आला ते वाटे ॥ तों मार्गी सहस्त्रीपुरुष भाट ॥ मग त्या वाटे तीं येती ॥४७॥ त्या भाटा जयसिंग नाम ॥ कांता रेणुका सुमध्यम ॥ परी उभयतांचा एक नेम ॥ एकचित्तीं वर्तती ॥४८॥ प्रवर्तती परी कैसे अलोटीं ॥ शत्रुमित्र ऐक्यदृष्टीं ॥ कीं धनदघातका मोह पोटीं ॥ समानचि वर्ततसे ॥४९॥ तन्न्यायें पुरुषकांता ॥ प्रपंचराहाटीं वर्तत असतां ॥ तों सहज त्या मार्गे येतां ॥ तया ठायीं पातले ॥५०॥