Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १९

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदगुरुराजा ॥ सर्वज्ञ विजयभोजा ॥ भवाब्धी भवसरिते काजा ॥ साधका नौका अससी तूं ॥१॥ हे पूर्णब्रह्मानंदकंदा ॥ पुढें बोलवीं भक्ती अतिमोदा ॥ तुझी लीला अगाधा ॥ भक्तिसारग्रंथातें ॥२॥ मागिले अध्यायीं वदविलें गहन ॥ गोपीचंदाचें उदार कथन ॥ बद्रिकाश्रमीं तप करुन ॥ तीर्थाटनीं निघाला ॥३॥ याउपरी ऐकिजे श्रोतीं ॥ सिंहावलोकनीं विश्रांती ॥ गोरक्ष कानिफाचे युक्ती ॥ स्त्रीराज्यांत जातसे ॥४॥ मार्गी चालतां मुक्कामोमुक्काम ॥ सदा श्रीगुरुचें आठवी नाम ॥ ग्रामांत करुनि भिक्षाटन ॥ पुढें मार्ग क्रमीतसे ॥५॥ ऐसिया स्थिती गौडबंगाल ॥ सांडूनि सांडिला बंगालकौल ॥ पुढें जात स्त्रीराज्यांत वहिला ॥ सीमेपर्यंत पातला ॥६॥ परी विचारी स्वमनांत ॥ श्रीगुरुराज आहेत तेथ ॥ राज्यवैभव बहु सामर्थ्य ॥ संपत्तीचे मिरवतसे ॥७॥ ऐसें वैभवमानी सुखप्रकरणीं ॥ मातें ओळखील कैसा कोणी ॥ श्रीमंतापुढें हीनदीन ॥ मान्यत्वातें मिरवेना ॥८॥ जेवीं अर्कापुढें खद्योत ॥ हीन दीन अति दिसत ॥ तेवीं मज कंगालवंताते ॥ कोण तेथें ओळखतील ॥९॥ मेरुपुढें मशकस्थिती ॥ कोणें वर्णावी कवण अर्थी ॥ कीं पुढें बैसल्या वाचस्पती ॥ मैंद वल्गना मिरवीना ॥१०॥ कीं हिरातेजपडिपाडा ॥ गार ठेवूनि पुढां ॥ परीसपालटा देतां दगडा ॥ योग्यायोग्य साजेना ॥११॥ सुवर्ण मिरवे राशी सोळा ॥ तेथें दगडाचा पाड केतुला ॥ तेवीं मातें संपत्ती मिरवला ॥ ओळखील कैसा तो ॥१२॥ असो याउपरी दुसरे अर्थी ॥ मम नाम कळतां मच्छिंद्राप्रती ॥ परम द्वाड लागेल चित्तीं ॥ सुखसंपत्ती भोगितां ॥१३॥ जैसें जेवितां षड्रस अन्न ॥ तैं कडुवट सेवी कोण ॥ तेवीं मच्छिंद्र संपत्तीचें टाकून ॥ जाईल कैसा वैरागी ॥१४॥ यापरी आणि अर्था ॥ मम नाम श्रीगुरुलागीं कळतां ॥ नेणों कल्पना वरुन चित्ता ॥ वर्तेल घाता माझिया ॥१५॥ मग तयाच्या सवें विद्यारळी ॥ करावी आपण बांधूनि कळी ॥ हें तों गोड येणें काळीं ॥ मजप्रती भासेना ॥१६॥ज्या स्वामीचे वंदितों चरण ॥ तयासीं विद्येची रळी खेळेन ॥ हें योग्य मातें नव्हे जाण ॥ अपकीर्ति ब्रह्मांडभरी ॥१७॥ ऐसे तर्कवितर्क करितां ॥ श्रीगोरक्ष मार्गी रमतां ॥ तों वेश्याकटक देखिलें तत्त्वतां ॥ स्त्रीराज्यांत जाती त्या ॥१८॥ तों सकळ वेश्यांची मुख्य कामिनी ॥ गुणभरिता कलिंगानाम्नीं ॥ तिचें स्वरुप वर्णितां वाणी ॥ रतिपति आतळेना ॥१९॥ जिचें पाहतां मुखकमळ ॥ शशितेजाहूनि अति निर्मळ ॥ परम लज्जित चपळा केवळ ॥ होऊनि ढगीं रिघताती ॥२०॥ जिचा नेत्रकटाक्षबाण ॥ तपस्व्यांचें वेधीत मन ॥ मग विषयें लंपट अपार जाण ॥ कवण अर्थी वर्णावे ॥२१॥ ऐसियेपरी सुलक्षण दारा ॥ चातुर्यकलिका गुणगंभीरा ॥ जिचे नाम साजोतरा ॥ कीं हिरा गारा मिरवती ॥२२॥ जिचे सुस्वर विपुल गायन ॥ ऐकतां खालती गंधर्व करिती मान ॥ अप्सरा परम लज्जित होऊन ॥ सेवा इच्छिती जियेची ॥२३॥ ऐशापरी ती कलिंगदारा ॥ जात स्त्रीदेशांत अवसरा ॥ तैं अवचित तीतें गोरक्ष उदारा ॥ देखता झाला निजदृष्टीं ॥२४॥ मग तो जवळा योगद्रुम ॥ जाऊनि पुसे तियेचें नाम ॥ येरी म्हणे कलिंगा उत्तम ॥ नाम असे या देहा ॥२५॥ येरु म्हणे कवणार्थी ॥ जातां कोणत्या ग्रामाप्रती ॥ कलिंगा म्हणे स्त्रीदेशाप्रती ॥ जाणें आहे आमुतें ॥२६॥ राव मैनाकिनी पद्मिनी ॥ सकळ स्त्रियां देशस्वामिनी ॥ तियेतें नृत्यकळा दावूनी ॥ वश्य करणें आहे जी ॥२७॥ ती राजपद्मिनी वश्य होतां ॥ अपार देईल आमुतें वित्ता ॥ यापरी कामना योजूनि चित्ता ॥ गमन करितों आम्ही कीं ॥२८॥ ऐसा वृत्तांत ऐकूनि युवतीं ॥ हदयी विचारी योगपती ॥ कीं इचीच शुद्ध धरुनि संगती ॥ प्रविष्ट व्हावें त्या स्थानीं ॥२९॥ मग सहजस्थितीनें गमना ॥ आव्हानूनि दृष्टीं राजसदना ॥ गुप्तवेषें श्रीगुरुकामना ॥ अवगमूनि घ्यावी तों ॥३०॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ बोलता झाला तिये युवती ॥ म्हणे मी येतों तुमच्या संगतीं ॥ न्याल तरी कीं कृपेनें ॥३१॥ येरी म्हणे नरेंद्रोत्तमा ॥ येऊं पाहसी संगतीं आम्हां ॥ तरी कुशळपणीं काय तुम्हां ॥ भोंवरिली विद्या जे ॥३२॥ येरु म्हणे करुनि गायन ॥ तुम्हांसवें चातुर्य मानून ॥ आणि मृदंगवाद्य वाजवीत ॥ कुशळपणें नेटका ॥३३॥ येरी म्हणे गाणें वाजविणें ॥ येतसे चातुर्यवाणें ॥ तरी प्रथमारंभीं आम्हां दाविणें ॥ कैसे रीतीं कुशळत्व ॥३४॥ येरु म्हणे जी काय उशीर ॥ आतांचि पहावा चमत्कार ॥ हातकंकणा आदर्शव्यवहार ॥ कामया पाहिजे दृष्टीतें ॥३५॥ कीं स्पर्शतां शुद्ध अमरपण ॥ होय न होय केलिया पान ॥ कीं स्पर्शिल्या परिसोन ॥ न होय भ्रांती मिरवेल काय ॥३६॥ तरी आतां या ठायीं ॥ मम विद्येची परीक्षा घ्यावी ॥ ऐसें ऐकतांचि कलिंगा महीं ॥ सदनाहूनि उतरली ॥३७॥ महींतळीं घालूनि आसन ॥ सारंगी देत आणून ॥ म्हणे नवरसे कुशळत्वपण ॥ कळा दावी कोणती ॥३८॥ ऐसी ऐकून तियेची गोष्टी ॥ करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ गंधर्वप्रयोग होटीं ॥ जल्पूनि भाळीं चर्चीतसे ॥३९॥ चर्चूनि दाही दिशा प्रेरीतसे ॥ आणि चतुर्थवाद्यातें स्पर्शीतसे ॥ ऐसें झालिया हुंकार देतसे ॥ गावें वाजवावें म्हणूनियां ॥४०॥ तरी कामनीं तरु पाषाण ॥ जल्पती गंधर्वासारखें गायन ॥ तंतवितंत सुस्वरी वादन ॥ वाजवी वाद्य चतुर्थ हो ॥४१॥ आपुलें आपण वाद्य वाजवीती ॥ पाषाण तरु गायन करिती ॥ हें पाहूनि कलिंगा युवती ॥ आश्चर्य करी मानसीं ॥४२॥ स्वमुखीं ओपूनि मध्यमांगुळी ती ॥ विस्मय करी आपुल्या पोटीं ॥ चित्ती म्हणे हा नरधूर्जटी ॥ ईश्वरतुल्य भासतसे ॥४३॥ जो पाषाणतरुहातीं गायन ॥ करवीत गंधर्वां सरी आपण ॥ तयालागीं स्वतां गायन ॥ अशक्य काय करावया ॥४४॥ जो पाषाणी पिवळेपण ॥ करुं जाणे लोहाचें सुवर्ण ॥ तयालागीं परिसमणी ॥ करावया अशक्य म्हणावें कीं ॥४५॥ जेणें बुरट गौतमीकांसेखालीं ॥ सर्व पदार्थी मही उद्धरिली ॥ त्यातें कामधेनु निर्माया भली ॥ परम अशक्यता न बोलावी ॥४६॥ कीं कोणत्याही वृक्षाखालीं ॥ कामना पुरवी सकळी ॥ ते कल्पतरुमेळीं ॥ आनायासें शोभतसे ॥४७॥ तन्न्यायें वृक्षपाषाणीं ॥ आणिली ज्यानें गंधर्वमांडणी ॥ तो स्वतः सिद्ध कुशलपणीं ॥ गाणार नाहीं कां बोलावें ॥४८॥ तरी आतां असो कैसें ॥ आपणचि रहावें याचे संगतीस ॥ ऐसा विचार करुनि स्वचित्तास ॥ बोलती झाली विव्हळा ॥४९॥ म्हणे महाराजा सदगुणाकरिता ॥ मी दीन किंकर अनाथा ॥ ऐसा काम उदेला चित्ता ॥ तरी सिद्धार्थ आव्हानीं ॥५०॥