Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ९ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ९

श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी जगदुद्वारा ॥ अवतारदीक्षाज्ञानेश्वरा ॥ अघटितमायावतारधरा ॥ भिंतीवाहना गुरुराया ॥१॥ रेड्यामुखीं वेदोच्चार ॥ करुनि तोषविले सकळ विप्र ॥ फोडोनि भगवदगीताभांडार ॥ सकळ जनां वाढिलें ॥२॥ ऐसा तूं कविमहाराज ॥ तरी मम कामनेचें धरुनि चोज ॥ ग्रंथार्थी विपुल सुरस ॥ वैखरीतें वदवीं कां ॥३॥ मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ दिधली भाक मच्छिंद्रास ॥ वर देऊनि वातचक्रास ॥ गमन करिता पैं झाला ॥४॥ आणि श्रीरामाची झाली भेटी ॥ तेणेंही वर ओपूनि शेवटीं ॥ पाशुपतरायाची रामाचे पोटीं ॥ कामना संतुष्ट केली मच्छिंद्र ॥५॥ असो आतां येथूनि मच्छिंद्रनाथ ॥ सप्त मोक्षपुर्यर पाहूनि त्वरित ॥ अयोघ्या मथुरा अवंतिका यथार्थ ॥ काशी काश्मिरी पाहिलीं ॥६॥ मिथिला प्रयाग गया सुग्ग ॥ तेथें नमूनि विष्णुपदास ॥ अन्य तीर्थे करुनि बंगालदेश ॥ चंद्रागिरीस तो पातला ॥७॥ गांवांत करितां भिक्षाटन ॥ तों सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण ॥ तयाचे दृष्टी पडतां सदन ॥ झालें स्मरण भस्माचें ॥८॥ मनांत म्हणे याच सदनीं ॥ पुत्रमंत्रसंजीवनी ॥ वरदभस्मी सिद्ध करुनी ॥ दिधली होती निश्वयें ॥९॥ तरी ती साध्वी विप्रजाया ॥ सरस्वती नामें होती जया ॥ सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या ॥ सुकृत होतें तियेचें ॥१०॥ तरी द्वादश वर्षे लोटल्यापाठीं ॥ पुन्हां मी येईन शेवटीं ॥ ऐसें वदोनि भस्मचिमुटी ॥ सरस्वतीतें दीधली असे ॥११॥ तरी त्या मायेचा शोध करुन ॥ पाहूं तियेचा वरदनंदन ॥ ऐसें हदयीं मच्छिंद्र आणून ॥ सदनामाजी प्रवेशला ॥१२॥ उभा राहूनि विप्रांगणीं । हे सरस्वति ऐसी पुकारी वाणी ॥ तंव ती ऐकूनि शुभाननी ॥ बाहेर आली अति त्वरें ॥१३॥ येतां देखिला योगद्रुम ॥ मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम ॥ म्हणे महाराजा भिक्षान्न ॥ झोळीमाजी स्वीकारीं ॥१४॥ मच्छिंद्र म्हणे वो शोभननी ॥ तव नाम काय तें ऐकूं दे कानीं ॥ येरी म्हणे सरस्वती अभिधानी ॥ लोकोपचारें मज असे ॥१५॥ उपरी मच्छिंद्र बोले तीतें ॥ नाम काय तव भ्रतागतें ॥ येरी म्हणे सर्व त्यातें ॥ दयाळपती म्हणताती ॥१६॥ नाथ म्हणे तुम्ही कवण जाती ॥ गौड विप्र म्हणे ती तैं सरस्वती ॥ ऐसें ऐकूनि खूण चित्तीं ॥ मिळाली तेव्हां नाथाच्या ॥१७॥ मच्छिंद्र म्हणे माये ऐक ॥ दावीं कोठे तव बाळक ॥ येरी म्हणे जी पुत्रमुख ॥ पाहिले नाहीं अद्यापि ॥१८॥ मच्छिंद्र म्हणे बोलसी कां खोटें ॥ म्यां वरदभस्माचीं दिधली चिमुट ॥ भस्म नोहे तें संजीवनीपीठ ॥ पुत्ररुपींचें दर्शवी ॥१९॥ दाखवी परी तो पुत्र कैसा ॥ अजरामर मागें सोडिला कैसा ॥ तेजःपुंज अन्यून अनिळ महेशा ॥ ऐसा पुत्र असेल कीं ॥२०॥ असो भस्मचिमुटी ऐकतां वाणी ॥ खूणयुक्त झाली नितंबिनी ॥ परी भस्मचिमुटीतें उकिरडाभुवनीं ॥ सांडिले अन्याय वाढला ॥२१॥ तेणेंकरुनि जाहली भयग्रस्त ॥ हदयीं संचरला कंपवात ॥ चित्तीं म्हणे आतां हा नाथ ॥ शिक्षा करील मजलागीं ॥२२॥ नेणों शापें करील भस्म ॥ कीं तोडील स्वशक्तीनें माझा काम ॥ कीं तरुरुप हो ऐसा शाप देऊन ॥ सांडूनि जाईल अवनीतें ॥२३॥ आधी मी अल्पबुद्धीपासुनी ॥ घेतल्या आहेत नितंबिनीवाणी ॥ कीं कानफाट्याची विपरीत करणी ॥ अविद्यार्णवी असती ते ॥२४॥ नाटक चेटक कुडे अपार कपट ॥ जाणती दुर्गुण परम पापिष्ट ॥ जाया पाहूनि उत्तम बरवट ॥ स्तुती करिती तियेची ॥२५॥ दिनमानपर्यत कुत्री ॥ उत्तम जया करिती रात्रीं ॥ मग शयनीं घेऊनि शेजपात्रीं ॥ भोग भोगिती दुरात्मे ॥२६॥ ऐसें पूर्वी मज श्रुत ॥ सखियामुखीं श्रवण केलें होतें ॥ परी तोचि बोल समस्त ॥ सत्य होऊं पाहतसे ॥२७॥ तरी आतां कपाळ फुटकें ॥ होणार ते होऊ शके ॥ कानफाट्या करुनि चेटकें ॥ दशा करील कीं माझी ॥२८॥ तरी यातें कवण उपाय ॥ कांहीं सुचेना करुं काय ॥ हा ओळख धरुनि समय ॥ साधूनि आला परतोनि ॥२९॥ ऐसे रीतीं मनीं जल्पत ॥ तरी गात्रें थरथरा कापत ॥ अत्यंत भयाचें भरुनि भरतें ॥ शुद्धि पात्रा सोडिलें तिनें ॥३०॥ यावरी नाथ म्हणे वो जननी ॥ पाहसी काय तूं पिशाचपणीं ॥ पुत्र कोठें तो दावी नयनी ॥ उशीर न लावीं वो माते ॥३१॥ ऐसिया बोलाची होतां दाटी ॥ मग विचारी हदयी गोरटी ॥ कीं यासी वदावी खरी गोष्टी ॥ वृत्तांत जितुका झाला तो ॥३२॥ खरेपणीं आहे वर्म ॥ मिथ्यावादी होय न शर्म ॥ दैवें अन्यायसाफी होऊन ॥ मुक्त होतसे तो प्राणी ॥३३॥ तस्मात् जी खरी सत्यनीती ॥ त्यांत साहते बहु असती ॥ पांचांमुखीं बदूनि श्रीपती ॥ मुक्त करी अन्यायीं ॥३४॥ तस्मात् राहो अथवा जावो प्राण ॥ पुढें येवो कैसें घडून ॥ परी सत्य वाचे खरें भाषण ॥ वृत्तांत झाला तैसा वदूं ॥३५॥ मग चरणीं ठेवूनि भाळ ॥ उभय जोडूनि करकमळ ॥ म्लानमुख दीन विकळ ॥ वृत्तांत सकळ निरोपी ॥३६॥ म्हणे महाराजा क्षमाशीळा ॥ आपण जो कां प्रसाद दिधला ॥ परी अन्याय मजपासूनि झला ॥ भस्म गारी सांडिलें ॥३७॥ सांडिलें म्हणाल काय म्हणून ॥ तरी विश्वासें व्यापिलें नव्हतें मन ॥ भस्मानें पुत्र होईल कोठून ॥ ऐसे म्हणून सांडिले ॥३८॥ शेजारी असती बोलती जन ॥ दारा म्हणती प्रज्ञावान ॥ खरें नाहे निरुपण ॥ केले विचित्र तुजलागी ॥३९॥ तेणें संशय आणूनि मनीं ॥ नेणों कैसी घडेल करणी ॥ जठरीं पेटला कोपवन्ही ॥ तरी आपणचि भोगावा ॥४०॥ अपत्याकरितां परम अहित ॥ परगृहीं मिरवावें कां यथार्थ ॥ म्हणोनि गौप्य धरिलें चित्तांत ॥ समस्ती बदलीसे ॥४१॥ जन्मांत आल्या परोपकार ॥ करावा हें शास्त्रनिर्धारं ॥ न घडेल तरी उपकार ॥ अनुपकार करुं नये ॥४२॥ उत्तम वृक्षाची करावी लावणी ॥ न धडे तरी न टाकावा खंडुनी ॥ धर्म करावा न मेदिनीं ॥ वारुं नये कवणातें ॥४३॥ आपण स्वतां तीर्थासी जावें ॥ न घडे तरी परा न वारावें ॥ विवाहकार्य कदा न मोडावें ॥ आपुली बुद्धी वेंचुनियां ॥४४॥ गौतमीं करुं जातां चोरी ॥ तेथें वेचूं नये वैखरी ॥ तस्करातें मारितां अधिकारी ॥ आड त्यातें होऊं नये ॥४५॥ सुतापाशी पित्याचे अवगुण ॥ सांगूनि न करावें मन क्षीण ॥ सुनेपाशीं सासू हीन ॥ म्हणूं नये कदाचि ॥४६॥ कूप तडाग मळे बागाईत ॥ करतां वारुं नये कवणातें ॥ कोणी कीर्तनासी असतील जात ॥ आड येऊं नयें त्यासी ॥४७॥ आपुली वैखरी वेचल्यांत ॥ होऊं पाहे पराचे अनहित ॥ तरी ते विचारुनि स्वचित्तांत ॥ मौनें कांहीं न बोलावें ॥४८॥ ऐसें जाणोनि सरस्वती ॥ सत्य बोलली ती युवती ॥ कीं महाराजा विश्वास चित्तीं ॥ ठसला नव्हता त्या वेळे ॥४९॥ ऐसिया युक्तीप्रयुक्तीकरुन ॥ भावाभावी दृष्टी वेंचून ॥ जेणें जनाचें होय कल्याण ॥ तोचि अर्थ करावा ॥५०॥