Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३१

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगत्पाळका ॥ जगत्पते वैकुंठनायका ॥ जगत्सृजका यदुकुळटिळका ॥ भक्तसखा तूं होसी ॥१॥ निखिलजीवन निर्विकारा ॥ विवेकरत्नवैरागरा ॥ शुद्धसत्त्वगुणगंभीरा ॥ रुक्मिणीवरदा दीनबधो ॥२॥ हे कृपार्णवा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं भक्तिसारग्रंथा ॥ मागिले अध्यायीं अनाथनाथा ॥ जन्म चौरंगीचा करविला ॥३॥ करविला परी त्याचें कथन ॥ राहिलें तें ग्रंथीं लेखन ॥ आतां करवीं जगज्जीवन ॥ पुढें वैखरी बैसूनियां ॥४॥ तरी गताध्यायीं सापत्नमाता ॥ लोटली तातें कामसरिता ॥ परी कृष्णागर प्राज्ञिक सुता ॥ बळेंचि नेलें पाचारुनी ॥५॥ करुनि जननीचा धिक्कारु ॥ सदना गेला होता कृष्णागरु ॥ येरी सखी जीवापारु ॥ पाचारिली होता कीं ॥६॥ तिये सांगूनि सकल वृत्तांत ॥ प्राणघातासी झाली होती उदित ॥ परी ती सखी प्रज्ञावंत ॥ देत मसलते तियेसी ॥७॥ म्हणे बाई वो भुजावंती ॥ ईश्वरकरणी प्रारब्धगती ॥ जैसे असेल तैसी पुढती ॥ घडून येईल भिऊं नको ॥८॥ परी तूतें सांगेन हित कांहीं ॥ तैसेचि धरुनि जीवीं ॥ नको कष्ट मानूं आपुले देहीं ॥ शयन शयनीं करी आतां ॥९॥ शयन शयनीं केलिया पूर्ण ॥ राव येईल पारधीहून ॥ आल्या सेवील तुझें सदन ॥ परी तूं उठू नको कीं ॥१०॥ मग तो राव पुसेल तूतें ॥ तंव तूं सोंग दावीं शोकाकुलतें ॥ रुदन करुनि वदें रायातें ॥ प्राणरहित होय मी ॥११॥ आतां काय ठेवूनि प्राण ॥ झाला नाहीं अबूरक्षण ॥ ऐसें बोलतां राव वचन ॥ पुढें तुजशीं पुसेल ॥१२॥ पुसतां वदे कीं प्रांजळवंत ॥ कृष्णागर तुमचा सुत ॥ कामुक होऊनि मम सदनांत ॥ स्पर्शावया धांवला ॥१३॥ धांवला परी यत्नेकरुन ॥ बळें दिधला मागें लोटून ॥ ऐसें होतां अनुचित प्राण ॥ कैसा ठेवूं महाराजा ॥१४॥ ऐशा परी आराधूनि युक्तीं ॥ क्रोंध उपजवीं रायचित्तीं ॥ क्रोधवश झालिया राय नृपती ॥ कलहें मुला सोडील कीं ॥१५॥ मग तो कदा ना म्हणे सुत ॥ त्वरें करील प्राणरहित ॥ मग तूं सदनीं आनंदभरित ॥ सुखलाभातें सेवीं कां ॥१६॥ अंगीं विपतरुचा कोंब चांग ॥ खुडूनि टाकिल्यानें मार्ग ॥ मग विषाचा शरीरीं लाग ॥ कोठूनि होईल जननीये ॥१७॥ आधीं ठेचिल्या उरगमुख ॥ मग कैंचें मिरवेल विषदुःख ॥ कंटकी धरिल्या वृश्चिक ॥ वेदनेतें मिरवेना ॥१८॥ कीं वन्हि असतां धूम्रा कार ॥ वरी सांडावे लगबगे नीर ॥ मग धांव सदनापर ॥ घेत नाहीं जननीये ॥१९॥ तरी कृष्णागराचा वसवसा ॥ तव हदयी मिरवे स्वबाळफांसा ॥ तरी राया सांगूनि ऐशिया लेशा ॥ दुःखसरिता लोटवीं ॥२०॥ तरी त्या उदकाचे आधीं वळण ॥ दुःखसरिते बांधावे बंधन ॥ बंधन बांधिल्या सजीवपणें ॥ सुखे पुढें मिरवीं कां ॥२१॥ ऐसी सांगूनि ती युवती ॥ गेली आपुल्या सदनाप्रती ॥ येरीकडे भुजावंती ॥ कनकमंचकीं पहुडली ॥२२॥ त्यजूनि अन्नोदक स्नान ॥ कैंचे श्रृंगार कुंकुमलेण ॥ सर्व उपचारांतें त्यजून ॥ विन्मुख तई पहुडली ॥२३॥ तों येरुकडे शशांगर ॥ पारधी खेळूनि काननभर ॥ चिंताब्धीची फोडूनि लहर ॥ सदना तदा जातसे ॥२४॥ नाना गजरें यंत्रस्थित ॥ चमूअब्धीचा लोट लोटीत ॥ क्षेत्रपातीं पूर्ण भरित ॥ चमृतोयें तेधवां ॥२५॥ यावरी राव तो पूर्ण ज्ञानी ॥ संचार करी आपुले सदनीं ॥ दृष्टीसमोर न देखितां राणी ॥ परिचारिके विचारीतसे ॥२६॥ म्हणे कोठे आहे भुजावंती ॥ सन्मुख कां न आली पारधीप्रती ॥ आजि चुकुर होऊनि चित्तीं ॥ निंबलोणा नातळली ते ॥२७॥ रायातें बोलती परिचारिका ॥ हे महाराजा सद्विवेका ॥ आजि राणी कवण दुःखा ॥ दुखावली कळेना ॥२८॥ तेणेंकरुनि शयनापाटी ॥ निजली आहे होऊनि कष्टी ॥ होतांचि शब्द कर्णपुटी ॥ सदनामाजी संचरला ॥२९॥ तों ती मंचकीं भुजावती ॥ राव देखूनि बोले युक्तीं ॥ म्हणे कां हो कवण अर्थी ॥ शयन केलें जिवलगे ॥३०॥ परी तई उत्तरा न देती ॥ कांहींच न बोले रायाप्रती ॥ जीवन आणूनि नेत्रपातीं ॥ अश्रु ढाळी ढळढळां ॥३१॥ तें पाहुनियां राव दयाळ ॥ चिंत्तीं दाटला मोहें केवळ ॥ मंचकीं बैसे उतावेळ ॥ हदयीं धरीं कांतेतें ॥३२॥ अश्रुधारा नेत्रपातीं ॥ राव पुसी स्वयें हस्तीं ॥ चुंबन घेऊनि लालननीतीं ॥ अंकावरी बैसवीतसे ॥३३॥ अंकीं बैसवोनि स्वदारारत्न ॥ हेम जडावया करी यत्न ॥ राव कोंदणी हाटकप्रयत्न ॥ अर्थरत्ना जोडीतसे ॥३४॥ म्हणे सुखसरिते ॥ कोठूनि भेदलें गढोळ चित्तीं ॥ दुःखघनाचा वर्षाव अमित ॥ कोणें केला तो सांग ॥३५॥ मी राव महीचा भूप ॥ मी बोलणारा दर्पसर्प ॥ ऐशा व्याघ्राचा करोनि लोप ॥ दिधलें माप दुःखाचें ॥३६॥ तरी ती कवण पुरुष नारी ॥ तूतें अन्य झाली भारी ॥ तरी मातें बोलूनि वैखरी ॥ निमित्तमात्र दावीं कां ॥३७॥ अगे सहज दिठवा होते ॥ दावीन त्यातें अर्कसुत ॥ या बोलाची सहज भ्रांत ॥ मानूं नको जिवलगे ॥३८॥ अगे प्रिय तूं मातें अससी ॥ कोण गांजील उद्देशीं ॥ हरिबाळातें जंबुकलेशी ॥ दुःखदरी मिरवेना ॥३९॥ अगे मशकाचेनि पाडा ॥ धडके उतरे गिरीचा कडा ॥ कीं रामरक्षे भूतवडा ॥ रक्षणिया बैसतसे ॥४०॥ तेवीं तूं माझी पट्टराणी ॥ कोण घालूं शके काचणी ॥ नाम दर्शवीं प्रांजळपणीं ॥ मग ऊर्वी न ठेवीं तयातें ॥४१॥ ऐसें ऐकतां राववचन ॥ हदयीं तोषली अर्थार्थी सघन ॥ म्हणे महाराजा तव नंदन ॥ भ्रष्टबुद्धी व्यापिला ॥४२॥ आपण गेलिया पारधीसी ॥ एकांत पाहूनि मम उद्देशीं ॥ येथें येऊनि स्मरलेशी ॥ हस्त माझा धरियेला ॥४३॥ धरिला परी निर्दयवंतें ॥ कामें ओढिता झाला हस्त ॥ म्हणे चालावें एकांतांत ॥ सुखसंवाद भोगावा ॥४४॥ मग म्यां पाहूनि कामिकवृत्ती ॥ हात आंसडूनि घेतला निगुतीं ॥ भयार्थ मानूनि आपुले चित्तीं ॥ सदनामाजी पावलें ॥४५॥ पळता कोणे झाली अवस्था ॥ उलथूनि पडलें महीवरती ॥ परी म्यां धरुनि तैशीच शक्ती ॥ आड कवाड पैं केलें ॥४६॥ मग तो छलबलत्वहीन ॥ होऊनि पाहे आपुलें सदन ॥ तस्मात् आतां आपुला प्राण ॥ ठेवीत नाहीं महाराजा ॥४७॥ भलतैसिया गरळांत ॥ घेऊनि करीन प्राण मुक्त ॥ परी धैर्य वरिलें तुम्हांकरितां ॥ तुमचा मुखेंदु पहावा ॥४८॥ मज वाटलें पारधीचें कानन ॥ अति तीव्र कर्कश भयाण ॥ त्यातूनि तुम्ही जीवंतपणें ॥ कैसे याल वाटलें ॥४९॥ ऐसेपरी धुसधुशीत ॥ संचार होतां हदयांत ॥ म्हणोनि महाराजा येथपर्यंत ॥ प्राण देहीं रक्षियेले ॥५०॥