श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३९
श्रीगणेशाय नमः जयजयाजी आदिनाथा ॥ कर्पूरवर्णा उरगभूषिता ॥ बोलवीं पुढें ग्रंथार्था ॥ नवरसादि कृपेनें ॥१॥ मागिले अध्यायीं केलें कथन ॥ चरपटीचा होऊनि जन्म ॥ दत्तदीक्षा पुढें घेऊन ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥ उपरी एकादश नाथांपासून ॥ चौर्याचयशीं सिद्ध झाले पूर्ण ॥ तयांचे सांगितले नाम ॥ यथाविधीकरुनियां ॥३॥ एक गहनी वेगळा करुन ॥ बहात्तर आठांनीं केले निर्माण ॥ उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण ॥ बारा सिद्ध निर्मिले ॥४॥ एकूण चौर्यानयशीं सिद्ध पूर्ण ॥ पुढें आतां ऐका कथन ॥ चरपटी करी तीर्थाटन ॥ कथा कैसी वर्तली ॥५॥ गया प्रयाग काशीहून ॥ जगन्नाथ मल्लिकार्जुन ॥ फणिपर्वत रामेश्वर करुन ॥ कुमारीदैवत पाहिलें ॥६॥बारा मल्हार हिंगलाज ॥ बारा लिंगे तेजःपुंज ॥ सप्त मोक्षपुर्यात पाहोनि सहज ॥ महीप्रदक्षिणा घातली ॥७॥ सकळ महीचें झाले तीर्थ ॥ गुप्त प्रगटे अत्यदभुत ॥ परी एक राहिले इच्छिलें तीर्थ ॥ स्वर्गपाताळ तीर्थात ॥८॥ करुनि मणिकर्णिकेचें स्नान ॥ सकळ स्वर्ग यावें पाहून ॥ उपरी पाताळभुवनीं जाण ॥ भोगावती वंदावया ॥९॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ गेला बद्रिकाश्रमाप्रती ॥ तेथें नमूनि उमापति ॥ पुढें चालिला महाराजा ॥१०॥ व्यानप्रयोगीं भस्मचिमुटी ॥ चर्चूनियां निजललाटा ॥ तेणेंकरुनि वातगतीं ॥ गमनातें दावीतसे ॥११॥ मग आदित्यानामी मंत्र जपून ॥ प्रत्यक्ष केला नारायण ॥ तो मागें पुढें सिद्ध होऊन ॥ मार्गापरी गमतसे ॥१२॥ कीं मनयोगाचा धीर धरुनि करीं ॥ चरपट लंघी महेंद्रगिरी ॥ शैल्यबर्फलहरी ॥ अंगीं झगट करीतसे ॥१३॥ सवितातेज अति अदभुत परम तीव्र दाहाते करीत ॥ तेणेंकरुनि बर्फगणांत ॥ वितळपणीं मिरवत ॥१४॥ जैसें पर्जन्यकाळीं महीं ॥ वितळे मित्रतेजप्रवाहीं ॥ त्याचि न्यायें ते समयीं ॥ हिमाचलकण वहिवटले ॥१५॥ ऐसी करुनि गमनस्थिती ॥ लंघूनि गेला स्वर्गाप्रती ॥ तों प्रथम शृंगमारुती ॥ सत्यलोका पाहिलें ॥१६॥ जातांचि गेला विधिसभेंत ॥ चतुराननाचें चरण वंदीत ॥ वंदूनियां जोडूनी हस्त ॥ सन्मुख उभा राहिला ॥१७॥ विधि पाहूनि चरपटासी ॥ म्हणे कोण आला योगाभ्यासी ॥ ऐसें बोलतां घडीसीं ॥ नारद उभा तैं होता ॥१८॥ तो तयाच्या सन्मुख होऊन ॥ म्हणे महाराजा चतुरानन ॥ मग मूळापासून जन्मकथन ॥ तयापासीं वदला तो ॥१९॥ ऐकूनि विधि सर्व वत्तांत ॥ आनंदला अति अदभुत ॥ मग चरपटाचा धरुनि हस्त ॥ अंकावरी घेतला ॥२०॥ हस्तें मुख कुरवाळून ॥ क्षणोक्षणीं घेत चुंबन ॥ म्हणे बाळा तुझें येणें ॥ कैसें झालें स्वर्गासी ॥२१॥ येरी म्हणे जी ताता ॥ नारदें ओपिलें दत्तहस्ता ॥ तेणें वरदपाणी माथां ॥ ठाऊक केला बाळासी ॥२२॥ मग सकळ चरपटीतें विद्यार्णव ॥ वैखरीपत्रें आणूनि ठेव ॥ त्यावरी मोदानें कमलोदभवें ॥ श्रवणपात्रीं भरलासें ॥२३॥ तो कुशल विद्यारत्न ॥ श्रवणशक्तीं कीं सांठवण ॥ परम आल्हादें आनंदन ॥ पुन्हां चुंबन घेतसे ॥२४॥ यावरी बोले चतुरानन ॥ बाळा कामना वेधली कोण ॥ येरु म्हणे तव दर्शन ॥ मनीं वाटलें हो तात ॥२५॥ यापरी होतां कामना चित्तीं ॥ तेथेंचि वेधली कृपामूर्ती ॥ कीं मनकर्णिका स्नाना निगुतीं ॥ भोगावती पहावी ॥२६॥ यावरी बोले कमलोदभव ॥ बा रे एक संवत्सर येथें असावें ॥ त्यांत पर्वणी आल्यासी अपूर्व ॥ स्नानासी जाऊं सकळिक ॥२७॥ ऐसें बोलतां कमलोदभवतात ॥ अवश्य म्हणे चरपटीनाथ ॥ यापरी राहतां सत्य लोकांत ॥ बहुत दिन लोटले ॥२८॥ परी चरपट आणि नारदमुनी ॥ वर्तती एकचित्तें खेळणीं ॥ चैन न पडे एकावांचुनी ॥ एकमेकां क्षणार्ध ॥२९॥ यापरी कथा पूर्वापारेसीं ॥ नारद जातसे अमरपुरीसी ॥ तों ॥ सहस्त्रचक्षु देखतां त्यासी ॥ विनोदउक्तीं पाचारी ॥३०॥ देखतांचि हा तपोवृंद म्हणे यावें कळीनारद ॥ ऐसे शक्राचे ऐकूनि शब्द ॥ मुनी क्षोभ पावला ॥३१॥ चित्तीं पेटतां कोपाग्नी ॥ अंतरीं जल्पे नारदमुनी ॥ म्हणे तोही समय तुजलागुनी ॥ एक वेळं दाखवीन ॥३२॥ऐसें म्हणून स्वचित्तांत ॥ नारद जातां आपुल्या स्थानाप्रत ॥ यासही लोटले दिन बहुत ॥ परी शब्द चित्तांत रक्षीतसे ॥३३॥ तों सांप्रतकाळीं चरपुटमुनी ॥ विद्यापात्र प्रळयाग्नी ॥ तें पाहूनि जल्पे नारद मुनी ॥ इंद्र आहुतीं योजावा ॥३४॥ ऐसे कामरत्नीं इच्छाधामीं ॥ रक्षीत असतां देवस्वामी ॥ तों एके दिवशीं श्रवणउगमीं ॥ श्रृंगारिला चरपट तो ॥३५॥ म्हणे बांधवा ऐक वचन ॥ कामें वेधलें माझें मन ॥ कीं अमरकुसुमवाटिकाश्रम ॥ पाहूं क्रीडेकारणें ॥३६॥ चरपट म्हणे अवश्य मुनी ॥ चला जाऊं येचि क्षणीं ॥ ऐसा विचार करोनि मनीं ॥ अमरपुरीं चालिले ॥३७॥ मार्गी चालतां चरपटनाथ ॥ शांतपणें महीं पाऊल पडत ॥ तें पाहूनि कमलोद्भवसुत ॥ चरपटातें बोलतसे ॥३८॥ म्हणे सखय जाणें येणें ॥ आहे परम लंबितवाणें ॥ तरी गमन ऐसे चालीनें ॥ घडोनि कैसें येईल ॥३९॥चरपट म्हणे आम्ही मानव ॥ आमुची हीच चाली काय करावें ॥ तुम्हांपाशी असे चपल उपाव ॥ तरी तेणेंकरुनि मज न्यावें कीं ॥४०॥ नारदें ऐसे शब्द ऐकून ॥ कार्यकामनीं मोहित मन ॥ मग मार्गालागी स्थिर होऊन ॥ गमनकळा अर्पिली ॥४१॥ जो महादभुत कमलापती ॥ तेणें दिधली होती नारदाप्रती ॥ ती प्रारब्धबळें चरपटाप्रती ॥ लाधली असे अवचितीं ॥४२॥ ती गमनकळा कैसी स्थित ॥ इच्छिल्या ठाया ती नेत ॥ आणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांत ॥ दृष्टीपुढें बैसतो ॥४३॥ आयुष्य भावी वर्तमान ॥ गुप्तकृत्ये झाली होऊन ॥ कोण्या ठायी वसे कोण ॥ सकळ दृष्टी पडतसे ॥४४॥ ऐसी कळा ती गमनस्थिती ॥ चरपटाते होतां प्राप्ती ॥ मग हदयीं सरिताभरतीं ॥ तोय आनंदाचें लोटलें ॥४५॥ मग उभय एके कलेंकरुन ॥ मार्गी करिते झाले गमन ॥ एकासारखा एक चंडकिरण ॥ स्वर्गालागीं मिरवले ॥४६॥ मग लवतां डोळियाचें पातें ॥ मनोवेगीं अपूर्व असत ॥ गगनचुंबित मार्गे अमरक्षितींत ॥ कुसुमवाटिकेंत पातले ॥४७॥ तंव तेथें नाना तरु विस्तीर्ण ॥ गगनचुंबित विशाल वन ॥ ज्यांच्या कुसुमसुगंधेंकरुन ॥ अमोघ पाषाण मिरवती ॥४८॥ सहस्त्र योजन कानन समस्त ॥ झाले आहे गंधव्यक्त ॥ ते पाहूनियां चरपटनाथ ॥ परम चित्तीं आल्हादें ॥४९॥ मग कुसुमवाटीं करितां गमन ॥ खेळती नाना क्रीडावचनें ॥ खेळतां खेळतां येती दिसुन ॥ पीयूषफळे त्या ठाया ॥५०॥
|