Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०


श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १.

श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः ॥ ॐ नमो जी हेरंवमूर्ती ॥ वक्रतुंडा गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तसंकट वारीं गजानन ॥१॥ सदैव धवला श्वेतपद्मा ॥ विद्याभूषित कलासंपन्नधामा ॥ तुझ्या वंदितों पादपद्मा ॥ ग्रंथाक्षरां बोलवीं ॥२॥ तूं निश्वळ निरंजन निर्विकार ॥ परी भक्तरज्जुबंधनाधार ॥ प्रेमें संभवोनि मूर्ति साकार ॥ आम्हां दासां मिरविसी ॥३॥ तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा ॥ किंकिणीमंडिता ग्रंथादरा ॥ येऊनि स्वामी वदनसुंदरा ॥ मम रसनारस सेवीं कां ॥४॥ अगा अर्थ - लिंग - प्रकरण - र्ह्स्व - ॥ दीर्घ शृंगार धारणा सुरस ॥ छंद ताल नवरसरस ॥ ग्रंथामाजी आदरीं कां ॥५॥ हे गणाधिपते गणराज ॥ मी अबुध वर्णना आहे सहज ॥ परी कृपा करोनि सकळां भोज ॥ विकळ आपदा हरी आतां ॥६॥ हे मोरेश्वरा गणाधिपति ॥ सर्वविषयाधीशमूर्ती ॥ मंगळारंभी मंगळाकृती ॥ आरंभीं स्तुती पार्थितो ॥७॥ तरी सरस्वती कळामांदुस ॥ सवे घेऊनि वहनहंस ॥ या संतांगणीं येऊनि सभेस ॥ विराजावें महाराजा ॥८॥ जी मंगलदायक वाग्भवानी ॥ चातुर्थसरिता ब्रह्मनंदिनी ॥ ती महाशक्ती हंसवाहिनी ॥ येऊनि घेई महाराजा ॥९॥ जीचेनि कृपें वांकुडें दृष्टी ॥ वाचस्पतीच्या मिरवती कोटी ॥ ती माय तूं सवें गोरटी ॥ घेऊनि येई महाराजा ॥१०॥ असो ऐसें पाचारणवचन ॥ ग्लानित भावना सम्यक् पाहून ॥ ग्रंथासनीं मूर्तिमंत येऊन ॥ वरालागीं ओपिजे ॥११॥ सकळसिद्धी पूर्णपणा ॥ पावोत ऐशा विनीतवचना ॥ वरद मौळी हस्तकंजना ॥ र्शोनि ज्ञान मिरविलें ॥१२॥ म्हणे महाराजा कलोत्तमा ॥ सिद्धी पावेल काव्यमहिमा ॥ ऐसे बोलोनि सुशीलधामा ॥ रसने स्थापिली सरस्वती ॥१३॥ यापरी नमितों श्रीगुरुराज ॥ जो अज्ञानतमी सविता विराजे ॥ जो मोक्षपदातें वरवूनि काज ॥ साधकातें विराजवी ॥१४॥ तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी ॥ संजोगोनि बैसला मम पृष्ठीं ॥ लेखणी कवळोनि करसंपुटीं ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१५॥ वरदहस्तें स्पर्शोने मौळी ॥ फेडिली सकळ अज्ञानकाजळी ॥ यापरी तया बद्धांजुळी ॥ अनन्यभावें नमितों मी ॥१६॥जो नरहरिवंशीं विजयध्वज ॥ धुंडिराज नाम तयाचें साजे ॥ तोही पृष्ठीं बैसोनि सहज ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१७॥ आतां नभूं ज्ञानशक्ती ॥ जी सत्तामयी चिदभगवती ॥ अनन्यभावें चरणांवरती ॥ भाळ तिचिये अर्पोनियां ॥१८॥ यापरी नमितो श्रोते संत ॥ कीं तुमच्या गृहींचा मी अतीत ॥ तरी ग्रंथांतरीं सुरस नितांत ॥ प्रेमभरित दाटवा ॥१९॥ अहो प्राज्ञिक संत श्रोतीं ॥ प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती ॥ तुम्हां वर्णावया अबुध शक्ती ॥ मजमाजी केवीं मिरवेल ॥२०॥ परी धन्य तुम्ही भक्तिंवाडें ॥ स्वीकारितां बोल बोबडे ॥ जड बाळा उभवोनि कोडें ॥ जगामाजी मिरवितां ॥२१॥ कीं पहा जैसें कांचमण्यास ॥ सोमकांत नांव ठेविलें त्यास ॥ तेणोंचे शब्दें लाज सोमास ॥ वरवूनि बुंदां ढाळीतसे ॥२२॥ तेवीं तुमचा शरणागत ॥ नरहरि मालू धुंडीसुत ॥ तस्मात महंत श्रोते संत ॥ करा सरतें आपणांतरीं ९ ॥२३॥ यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथ ॥ वदविला तुम्हीं श्रद्धायुक्त ॥ आतांही ओपूनि वरद हस्त ॥ भक्तिसार वदवा हा ॥२४॥ जे संत झाले जगद्विख्यात ॥ तयांचें माहात्म्य वदविलें समस्त ॥ परी सारसार कथा ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यात ॥ जगामाजी स्थापिले ॥२६॥ तरी त्यांची सर्व कथा ग्रंथीं ॥ स्वीकारावया अवधान द्यावें श्रोतीं ॥ असो कलिप्रारंभीं रमापती ॥ नवनारायणां पाचारी ॥२७॥ उद्भवासी बैसवोनि सन्निध ॥ कनकासनीं यादववृंद ॥ तंव ते नवनारायण प्रसिद्ध ॥ प्रविष्ट झाले द्वारके ॥२८॥ कवि प्रथम हरि दुसरा ॥ अंतरिक्ष तृतीय होय चतुर ॥ महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर ॥ नारायण चतुर्थ तो ॥२९॥ पंचम महाराज पिप्पलायन ॥ सहावा आविर्होत्र नारायण ॥ सातवा द्रुमिल आठवा चमस जाण ॥ करभाजन नववा तो ॥३०॥ ऐसे नवनारायण महाराज ॥ द्वारकेंत पातले सहजासहज ॥ रमापतीचें पाचारणचोज ॥ दृश्य झाले धवळारी ॥३१॥ हरीनें पाहतांचि नारायण ॥ सोडिता जाहला सिंहासन ॥ परम गौरविले आलिंगून ॥ कनकासनीं बैसविले ॥३२॥ सकलवैभवभूषणाकार ॥ मेळवोनि सकळ अर्चासंभार ॥ सारिता झाला सपरिकर ॥ षोडशोपचारें पूजेसी ॥३३॥ हरिचा गौरव पाहोन ॥ बोलते झाले नारायण ॥ कवण अर्थी पाचारण ॥ आम्हांसी केलें श्रीरंगा ॥३४॥हरि म्हणे जो महाराजा ॥ कीं मनीं काम वेधला माझ्या ॥ कलींत अवतार घेणें ओजा ॥ तुम्हीं आम्हीं चलावें ॥३५॥ जैसे सम्रुच्चयें एकमेळीं ॥ राजहंस जाती उदधिजळी ॥ तेवीं तुम्हीं कृपाकल्लोळीं ॥ अवतारदीक्षा मिरवावी ॥३६॥ येरु म्हणती जनार्दना ॥ अवतार घ्यावा कवणे स्थाना ॥ कवण नामीं कवण लक्षणां ॥ जगामाजी मिरवावें ॥३७॥ यावरी बोले द्वारकाधीश ॥ कवि नारायण जो कां प्रत्यक्ष ॥ तेणें मच्छिंद्र होऊनि दक्ष ॥ जगामाजी मिरवावें ॥३८॥ यावरी हरी जो महादक्ष ॥ तो तंव शिष्य होऊनी प्रत्यक्ष ॥ महाराज नामें तो गोरक्ष ॥ जगामाजी मिरविजे ॥३९॥ यापरी अंतरिक्ष नारायण नाम ॥ तो जालिंदर मिरविजे प्रकाम ॥ तयाचा शिष्य भक्तिद्रुम ॥ प्रबुद्ध नामें कानिफा ॥४०॥ यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम ॥ मिरविजे जगीं चरपट नाम ॥ आविर्होंत्र जो योगद्रुम ॥ मिरविजे जगीं नामें नागेश ॥४१॥ यापरी द्रुमिल अतिसमर्थ ॥ जगीं मिरविजे भरतनाथ ॥ आणि चमस नारायण जगीं विख्यात ॥ रेवणनामें मिरविजे ॥४२॥ नववा जो करभाजन ॥ तो गहिनी ऐसें मिरविजे नाम ॥ ऐसे अवतार महीकारण ॥ दीक्षेप्रति मिरवावे ॥४३॥ म्हणाल एकटपणीं वास ॥ करणें सांगतां आह्मी कलीस ॥ तरी तुम्हांसवें अवतारास ॥ बहुत येतील महाराजा ॥४४॥ प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरस ॥ तो पुढें होईल तुलसीदास ॥ आणि शुक महाराज जो ब्रह्ममास ॥ कबीर भक्त होईल तो ॥४५॥ यापरी जो व्यास मुनी ॥ तो जयदेव होईल महाप्राज्ञी ॥ आणि उद्धव माझा प्राणाहुनी ॥ आवडता होईल नामा तो ॥४६॥ आणि भक्तिप्रौढी जांबुवंत ॥ तो नरहरि होईल नितांत ॥ प्रत्यक्ष जो बलराम भ्रात ॥ पुंडलीक होईल तो ॥४७॥ मीही प्रत्यक्ष जन्मोन ॥ ज्ञानदेव नामें मिरवीन ॥ आणि धवलारी जो पंचानन ॥ निवृत्तिनाथ होईल कीं ॥४८॥ आणि सत्यनाथ चतुरानन ॥ तो स्वनामीं मिरवील सोपान ॥ जी योगमाया मानसमोहन ॥ मुक्ताबाई विराजेल ॥४९॥ यापरी प्राज्ञक हनुमंत ॥ तो रामदास होईल महाभक्त ॥ आणि कुब्जा दासी मातें रमत ॥ जनी जनांत होईल कीं ॥५०॥