Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १० पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १०

श्रीगणेशाय नमः वक्रतुंड गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तवरदा हरिसी आर्ती ॥ मंगळमूर्ती गजानना ॥१॥जयजयाजी आदिनाथा ॥ मायाचक्रचालका अनंता ॥ सर्वाधीशा भगवंता ॥ साक्षात् अक्षय मोक्ष तूं ॥२॥तरी मागिले अध्यायीं निरुपण ॥ श्रीगोरक्षाचा पावोनि जन्म ॥ उपरी सेवूनि कनकगिरी ग्राम ॥ विद्यार्णवी तो केला ॥३॥तरी ती विद्या कोण कैसी ॥ सकळ कळा श्लोकराशी ॥ भविष्योत्तरपुराणासी ॥ निरोपितों श्रीश्रोतियां ॥४॥ श्लोक ॥ ब्रह्मज्ञान रसायन कविता ॥ वेद शास्त्र ज्योतिष तथा ॥ व्याकरण धनुर्धर ॥ जलतरंगता ॥ संगीत काव्य अकरावें ॥५॥ अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथा चार ॥ चतुर्दश विद्यांचा सागर ॥ पूर्णपणें भरलासे ॥६॥ टीका ॥ प्रथम सांगून ब्रह्मज्ञान ॥ स्वमुखीं केल्या परायण ॥ विश्व आणि विश्वंभर दोन भावचि ॥ ऐसा नुरविला ॥७॥ कीं बहुत जे अर्थप्रकार ॥ जीवजंतु चराचर ॥ तो ऐक्यमेळीं सकळ विस्तार ॥ मीच ऐसें भाविलें ॥८॥ कर्माकर्म सत्कर्मराशी ॥ त्या नुरल्याचि कोणीही बीजांकुराशीं ॥ वासना देऊनि योगफांसीं ॥ कामनेते नुरवितो ॥९॥ ऐशा एकमेळें करुन ॥ गोरक्ष झाला सनातन ॥ एवंच सकळ ब्रह्मज्ञान ॥ उपदोशिलें गुरुनाथें ॥१०॥ मग पूर्णपणाचें पात्र होऊनी ॥ वसुधेकल्प अव्यक्त भुवनीं ॥ सर्व आत्मरुप माननी ॥ तत्स्वरुपीं प्रगटेल ॥११॥ याउपरी वातापित्तकफहारक ॥ रसायनविद्या सकळिक ॥ किमया करणें धातु अनेक ॥ हातवटी सांगितली ॥१२॥ कवित्व रसाळ नवरस ॥ गणादि निरोपी दीर्घ र्हकस्व ॥ व्यक्त अर्थलिंगप्रकरणास ॥ व्यक्ताव्यक्त सांगितलें ॥१३॥ याउपरी वेदाध्ययन ॥ सूक्तऋचेंत केला प्रवीण ॥ दीर्घर्ह्स्वें छंदें निपुण ॥ स्वस्ति छंदीं अवघे गुण पैं केला ॥१४॥ ऋक् अथर्वण यजुर्वेद ॥ सामवेदादि सांगूनि प्रसिद्ध ॥ उपरि विद्या ज्योतिषसिद्ध ॥ परिपूर्ण सांगितली ॥१५॥ सारस्वत किरात कोश ॥ कौमुदी रघु हरिवंश ॥ पंच काव्यें मीमांस ॥ साही शास्त्रें निवेदिलीं ॥१६॥ यावरी धनुर्धरविद्यानिपुण ॥ सकळ शस्त्रीं केला प्रवीण ॥ तीं सकळ अस्त्रें कोण कोण ॥ नामें तयांचीं ऐकिजे ॥१७॥ वातास्त्र आणि जलदास्त्र ॥ उभीं उभी कामास्त्र ॥ वाताकर्षण बळ स्वतंत्र ॥ पर्वतास्त्र सांगितलें ॥१८॥ वज्रास्त्र वासवशक्ति ॥ नागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ॥ ब्रह्मास्त्रादि निवारणशक्ती ॥ रुद्रास्त्र सांगितलें ॥१९॥ विरक्तास्त्र दानवास्त्र ॥ पवनास्त्र आणि कालास्त्र ॥ स्तवन महाकार्तिकास्त्र ॥ स्पर्शविभक्तास्त्र निवेदिलें ॥२०॥ यावरी साबरीविद्या कवित्व ॥ प्रत्यक्ष करुनि सकळ दैवत ॥ तयांचा वरदपाणी निश्वित ॥ गोरक्षमौळीं मिरवला ॥२१॥ तीं दैवतें कोण कोण ॥ बावन्न वीर असती जाण ॥ नरक कालिका म्हंमदा उत्तम ॥ महिषासुर आराधिला ॥२२॥ झोटिंग वेताळ मारुती ॥ अस्त्रवीर मद्रपती ॥ मूर्तिमंत सीतापती ॥ वरदमौळीं स्पर्शीतसे ॥२३॥ परम जादरीं आलिंगून ॥ श्रीराम घेत चुंबन ॥ म्हणे होई सनातन ॥ कीर्तिध्वज मिरविजे ॥२४॥ यावरी प्रत्यक्ष गजवदन ॥ तोहि उतरला सहस्त्रकिरण ॥ गोरक्षातें अंकीं घेऊन ॥ वरदमौळी स्पर्शीतसे ॥२५॥ यावरी अष्टभैरव उग्र ॥ तेही पातले तेथें समग्र ॥ सिद्धभैरवादि काळभैरव सांग ॥ बाळभैरवादि पातले ॥२६॥ वीरभैरवादि गणभैरव ॥ ईश्वरभैरव रुद्रभैरव ॥ भस्मभैरवादि महादेव ॥ अपर्णापति पातला ॥२७॥ तेणें घेऊनि अंकावरतें ॥ मुख कुरवाळिलें वरदहस्तें ॥ खेळतां बाबर धांवोनि येती ॥ तेही देती आशीर्वचन ॥२८॥ मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी ॥ कुंड रंडा भालंडा यक्षिणी ॥ चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी ॥ वर गोरक्षा देती त्या ॥२९॥ यावरी प्रगटूनि जलदैवत ॥ तेव्हा त्यातें वर ओपीत ॥ कुमारी धनदा नंदा विख्यात ॥ देखता त्या गोमट्या ॥३०॥ लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला ॥ नववी दैवत प्रत्यक्ष विमला ॥ ऐशा जलदेवता येऊनि तत्काला ॥ वर ओपिती बाळातें ॥३१॥ यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी ॥ होऊनि वर ओपिती वरमादी ॥ आणिमा गरिमा विशाळबुद्धी ॥ महिमा प्रकामें पातली ॥३२॥ प्रथिमा प्राची वशित्वा सातवी ॥ तेवीं ती सिद्धी महादेवी ॥ सज्ज करुनि अस्त्रकार उभवी ॥ अष्टसिद्धी तत्काळ त्या ॥३३॥ असो बावन्न वीरांसहित ॥ श्रीराम सूर्य जाहला प्राप्त ॥ सर्वत्र ओपूनि मौळी हस्त ॥ विद्या करीं ओपिती ॥३४॥ असो वर देऊनि सद्विद्येसी ॥ सर्वत्र बंदिती मच्छिंद्रासी ॥ म्हणती महाराजा गोरक्षासी ॥ तपालागीं बैसवीं ॥३५॥ तपीं होआं अनुष्ठान ॥ तेणे बळ चढे पूर्ण ॥ मग ही विद्या तपोधन ॥ लखलखीत मिरवेल ॥३६॥ जैसें खडग शिकले होतां ॥ मग भय काय तें शत्रु जिंकितां ॥ तेवीं तपोंबळ आराधितां ॥ सामर्थ्य सत्ता वाढेल ॥३७॥ ऐसें वदोनि सकळ देव ॥ पाहते झाले आपुलाले गांव ॥ रामसूर्यादि महादेव ॥ बावन्न वीरादि पैं गेले ॥३८॥ यावरी इंद्र वरुण अश्विनी ॥ गणगंधर्वादि पातले भुवनीं ॥ वर देती तयालागुनी ॥ सकळ गेले स्वस्थाना ॥३९॥ याउपरी कोणे एके दिवशीं ॥ गोरक्ष घोकितां सद्विद्येसी ॥ मंत्रसंजीवनी पाठ मुखासी ॥ करीत बैसला होता तो ॥४०॥ जवळी नसतां मच्छिंद्रनाथ ॥ बैसला होता एकांतांत ॥ तों गांवचीं मुलें खेळत खेळत ॥ तया ठायीं पातलीं ॥४१॥ हातीं कवळूनि कर्दमगोळा ॥ मुलें खेळती आपुलें मेळां ॥ तों गोरक्षापासीं येऊनि आगळा ॥ बोल बोलती सकळीक ॥४२॥ म्हणती गोरक्षा ऐक वचन ॥ आम्हीं आणिला बहुत कर्दम ॥ तरी शकट करुनि दे उत्तम ॥ आम्हालागी खेळावया ॥४३॥ येरु म्हणे शकट मजसी ॥ करुं येत नाहीं निश्वयेंसी ॥ येत असेल तुम्हां कोणासी ॥ तरी करुनि कां घ्या ना ॥४४॥ ऐसें ऐकतां मुलांनी वचन ॥ करीं कर्दम कवळून ॥ आपुलालें करें करुन ॥ शकट रचिती चिखलाचा ॥४५॥ कर्दमचक्र काष्ठ व्यक्त ॥ शकट केला यथास्थित ॥ वरीं उदेलें कल्पनेंत ॥ शकटा सारथी असावा ॥४६॥ म्हणूनि कर्दम घेऊनि गोळा ॥ मुलें रचिती कर्दमपुतळा ॥ परी तो साधेना मुलां सकळां ॥ मग गोरक्षातें विनविती ॥४७॥ म्हणती गोरक्षा आम्हांप्रती ॥ साह्य देई शकटसारथी ॥ आम्हां साधेना कर्दमनीती ॥ तरी तूं करुनि देईं कां ॥४८॥ अगा तूं सगळ मुलांचे गणी ॥ वयोवृद्ध अससी प्राज्ञी ॥ तरी आम्हांसी सारथी करुनी ॥ सत्वर देई खेळावया ॥४९॥ ऐसें ऐकतां मुलांचें वचन ॥ म्हणे कर्दम आणूनि द्या देतों करुन ॥ परी ही वासना भविष्यकारण ॥ गोरक्षाते उदेली ॥५०॥