Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ८ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ८

श्रीगणेशाय नमः ॐ नमोजी गुरुराया ॥ भवच्छेदका पळवीं माया ॥ श्रीज्ञानेश्वरा सदयहदया ॥ मम किंचित नाम मिरविशी ॥१॥ अघा हे ज्ञानदिवटी ॥ आम्हा साधकां जे दिठी ॥ मिरवला आहेसी पूर्णकोटी ॥ हिनकारक महाराजा ॥२॥ तरी मागिले अध्यायीं कथन ॥ विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न ॥ आणि स्वर्गवासातें भोगून ॥ महीलागीं मच्छिंद्र उतरला ॥३॥ आणि वज्रावटिके वज्रभगवती ॥ तोपविलें स्नानाप्रती ॥ उष्णोदकीं भोगावती ॥ जगामाजी मिरविली ॥४॥ यापरी द्वारका करुनि तीर्थ ॥ गोमतीं स्नानविधी यथार्थ ॥ करुनियां द्वारकानाथ ॥ प्रसन्न चित्तीं आगळा ॥५॥ त्यावरी आला आयोध्येसी ॥ तरी श्रोतिया कथा परियेसीं ॥ स्नान करुनि शरयूतीरासी ॥ रामदर्शना जातसे ॥६॥ तों पशुपतराव तया ग्रामीं ॥ रामवंशांत पराक्रमी ॥ तो देवालयीं पूजेलागुनी ॥ आला होता संभारें ॥७॥ अपार सैन्य जें भोंवती ॥ सदनीं तुरंगमें रावती ॥ छत्रचामरें कळसदीप्ती ॥ लाजविती मानूतें ॥८॥ वाजी गज यांचे रंग आणिक ॥ तेहीं चपळ अलोलिक ॥ वाताकृती लक्ष एक तयाभोंवते फिरताती ॥९॥ सकळ वाजी श्रृंगारयुक्त ॥ जडित पाखरा हाटकवत ॥ रत्नकोंदणीं हार लखलखीत ॥ कीं नक्षत्रमणी मिरविले ॥१०॥ त्यांतही झळकत झालरीयुक्त ॥ गुणीं ओविले अपार मुक्त ॥ कोणी विराजत गंगावत ॥ शुभ्रतेजीं मिरवले ॥११॥ ग्रीवे माळा रत्नवती ॥ हाटकासी जे ढाळ देती ॥ रत्न नोहे तेजगभस्ती ॥ चमूलागी मिरवला ॥१२॥ पदीं पैंजण रुणझुणती ॥ कीं वीरांची वीरश्री वाचे वदती ॥ कीं शत्रुगणींच्या अपार पंक्ती ॥ ब्रीद म्हणती विभांडूं ॥१३॥ ऐशियापरी वाजी ते हौसे ॥ कीं चिंतल्या ठायीं दाविती वास ॥ अतिवातचपळगतीस ॥ सर सर म्हणती माघारा ॥१४॥ अगा ते वाजी न म्हणूं महीचे ॥ कीं इंदुबंधुरत्न उदधीचे ॥ विशाळ शुक्तीकापात्र अब्धीचें ॥ मुक्त करुनि आणिले ते ॥१५॥ याचकनीती विकासूनि अवनीं ॥ हत्ती मिरवती पृतनेलागुनी ॥ विशाळ गंडस्थळ दंतकदनी ॥ चूडे सुवर्ण मिरवलें ॥१६॥ हाटक व्यक्त त्यां भूषण ॥ हौदे अंबारिया देदीप्यमान ॥ कीं पृतनामहीचे नग ते पूर्ण ॥ भावनीं ऐसें पाहे कां ॥१७॥अपार सैन्य बहु संभार ॥ पाहतां उचलिले जे गिरिवार ॥ कीं पर्वत माथां तरुशृंगार ॥ तैशा पताका गजपृष्ठीं ॥१८॥ एकाहूनि एक अधिक ॥ महारथी ते युद्धकामुक ॥ दहा सहस्त्र रायासवें लोक ॥ युद्धकामुक असती ॥१९॥ परी युद्धशास्त्री चतुर सुगम ॥ कीं परशक्तीस देती दम ॥ ऐसे प्रतापीक स्तोम ॥ इंद्रसुखा आगळे कीं ॥२०॥ पायीचें पायदळ अपार ॥ वस्त्राभरणीं मंडिताकार ॥ छडीदार आणि चोपदार ॥ जासूद हलकारे मिरवती ॥२१॥ हेमभूषणीं मुक्तमाळा ॥ सकळ पाइकां झळकती गळां ॥ जडितरत्नीं अति तेजाळा ॥ हेमालंकार करकमळीं ॥२२॥ दाहीं अंगुळीं मुद्रिका गहन ॥ हेममुक्तें ते मिरवती श्रवण ॥ पहातेपणीं राणीवपण ॥ भार पडेल लोकातें ॥२३॥ असो ऐशी अपार संपत्ती ॥ मिरवला पाशुपत अयोध्यापती ॥ ते सकळ दाटी देवळाभोंवतीं ॥ राजीराजीने मिरवली ॥२४॥ त्यांत श्रीरामदर्शनाकारण ॥ जाता झाला योगद्रुम ॥ परी ते द्वारपाळ परम ॥ नाथालागीं बोलत ॥२५॥ परम पाप संचल्या तुंबळ ॥ तेव्हां मिरवे द्वारपाळ ॥ प्रथम धर्मालागी काळ ॥ अधर्मपरी मिरवतसे ॥२६॥ त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ॥ ते द्वारपाळ द्वाररक्षण ॥ आपण बुडुनि यजमाना ॥ बुडवूं पाहती निश्वयें ॥२७॥ महानष्ट जातां समोर ॥ कदा न म्हणती लहानथोर ॥ न भांड चित्तीं परम निष्ठुर ॥ वाचे कठोर बोलती ॥२८॥ सप्तजन्म तस्करनीती ॥ शत ब्रह्महत्या जया घडती ॥ तेव्हां तो पावे द्वारपाळ क्षितीं ॥ धर्मविनाश रायाचा ॥२९॥ ऐसियेपरी द्वारपाळ ॥ राजद्वारीं असती सकळ ॥ मच्छिंद्र जातां उतावेळ ॥ हटकूनि डंभ केली असे ॥३०॥ तीव्र वाचे बोलती वचन ॥ म्हणती कान फाडूनि बुद्धिहीन ॥ कोठें जासी तांतडीनें ॥ मतिमंदा हे मूर्खा ॥३१॥ हे भ्रष्टा तूतें कैसें कळेना ॥ कीं राव आला आहे दर्शना ॥ त्यात तूं जासी बुद्धिहीना ॥ सर परता माघारा ॥३२॥ ऐसें म्हणूनि निष्ठुर वचन हातीं ॥ लोटिलें मच्छिंद्रनाथाप्रती ॥ येणेंकरुनि परम चित्तीं ॥ विक्षेपातें पावला ॥३३॥ परी तो सर्वज्ञ संतापासी ॥ विवेक अर्गळा घाली त्यासी ॥ तो म्हणे सेवकांसीं ॥ संवाद करणें विहित नव्हे ॥३४॥ पतिस्वाधीन पतिव्रता ॥ कीं पात्रसोई वाहे सरिता ॥ तेवीं बुद्धि करुनि पाशुपता ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३५॥ कीं सुईमागें गुंतो जातां ॥ कीं मित्रामागें रश्मी येतां ॥ तदनुबुद्धि पाशुपता ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३६॥ कीं रत्नामागे सकळकळा ॥ माउलीसवें आव्हानूं बाळा ॥ तदनुबुद्धि अयोध्यानृपाळा ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३७॥ कीं माळी मळ्याचा योजूनि पंथ ॥ सयुक्त सोडी उदक आंत ॥ तदनुबुद्धि पाशुपत ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३८॥ ऐसिये शब्दां सदगुणवाणी ॥ बोधी सकळां विवेकखाणी ॥ बंधनीं निर्मूनि विक्षेप मनाचे चरणीं ॥ घालितां झाला महाराज ॥३९॥ परी बुद्धिप्रकरण ॥ अणिक सुचले तयाकारण ॥ कीं सेवकांतें काय बोलून ॥ शिक्षा देऊं राजातें ॥४०॥ एक राव आर्हा टितां ॥ संपूर्ण सेवकां दाटे व्यथा ॥ जेवीं गवसनी मित्रा घालितां ॥ रश्मी आतुडती सहजचि ॥४१॥ शरीरीं कोठें घालितां घाय ॥ परी सर्वोपरी दुःख होय ॥ तदनुशिक्षा योजितां राया ॥ दुःख मिरवी घृतनेते ॥४२॥ ऐसें योजूनि मच्छिंद्रनाथ ॥ भस्मचिमुटी कवळी हाता ॥ स्पर्शास्त्रमंत्रप्रयुक्ता ॥ रामनामीं जल्पला ॥४३॥ येरीकडे पाशुपत ॥ देवा बद्धांजुळी होऊनि प्रणत ॥ रामासन्मुख दंडवत ॥ महीं मस्तक ठेवीतसे ॥४४॥ तों स्पर्श मग येऊनि निकट ॥ करिता झाला अंगीं झगट ॥ झगट होतां महीपाठ ॥ भाळा सहज झालीसे ॥४५॥ राव उठूं पाहे क्षणीं ॥ परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी ॥ भाळपदादी उभयपणीं ॥ महीयुक्त झालीं तीं ॥४६॥ करितां यत्न बहुतांपरी ॥ परी विभक्त नोहे कदा धरित्री ॥ बहु श्रमला नानापरी ॥ उपाय कांहीं चालेना ॥४७॥ मग बोलावूनि सेवकमंत्री ॥ वृत्तांत सांगे झाल्यापरी ॥ म्हणे कदा न सोडी धरित्री ॥ व्यक्त झाली सर्वस्वें ॥४८॥ परी मंत्री बुद्धिमंत ॥ एकटाचि तेव्हां बाहेर येत ॥ सेवकां पुसे रळी मात ॥ कोणी कोणातें झाली कां ॥४९॥ मनांत म्हणे कोणी जाती ॥ आला असेल नगराप्रती ॥ गांजिल असेल राजदूतीं ॥ म्हणून क्षोभला असेल तो ॥५०॥