श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३९
हस्तविभक्त होवूनि गदा ॥ पडती झाली क्षितीं आल्हादा ॥ पांचजन्य प्रियप्रद गोविंदा ॥ सोडूनियां मिरवत ॥५१॥ ऐसा होतां अव्यवस्थित ॥ तें पाहूनियां चरपटनाथ ॥ मग विष्णूजवळी येवूनि त्वरित ॥ निजदृष्टी विलोकी ॥५२॥ विलोकितां विष्णूलागुनी ॥ तों दृष्टीं पडला कौस्तुभमणी ॥ मग मनांत म्हणे आपणालागुनी ॥ भूषणातें घ्यावा हा ॥५३॥ ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ वैजयंतीसी काढूनि घेत ॥ गळां ओपूनि मौळीं ठेवीत ॥ रत्नमुगुट विष्णूचा ॥५४॥ शंखचक्र आदिकरुन ॥ हातीं घेतसे ब्रह्मनंदन ॥ गदा कक्षेमाजी घालून ॥ शिवापासीं पातला ॥५५॥ शिव पाहूनि निजदृष्टीं ॥ तों कपालपात्र आणिलें पोटीं ॥ तें घेवूनि झोळीं त्रिपुटी ॥ सोडूनियां चालिला ॥५६॥ चित्तीं गमनागमध्यान ॥ त्वरें पातला सत्यग्राम ॥ पितयापुधें शीघ्र येवून ॥ उभा राहिला चरपट ॥५७॥ पांचजन्य सुदर्शन ॥ सव्य अपसव्य कराकारण ॥ कक्षे गदा हदयस्थान ॥ कौस्तुभ गळां शोभवी ॥५८॥ तें पाहूनि नाभिसुत ॥ विष्णुचिन्हें भूषणास्थित ॥ मौळीं मुगुट विराजित ॥ अर्कतेजीं चमकूनिया ॥५९॥ ऐसे चिन्हीं पाहतां विधी ॥ मनीं दचकला विशाळबुद्धि ॥ म्हणे मुला काय त्रिशुद्धी ॥ केलें आहेसी कळेना ॥१६०॥मग चरपटाचा धरुनि हात ॥ आपुल्या अंकावरी घेत ॥ गोंजारुनि पुसत ॥ चिन्हें कोठूनी आणिली हीं ॥६१॥ येरु म्हणे ऐक तात ॥ सहज शक्राच्या कुसुमलतांत ॥ खेळत होतों पहात अर्थ ॥ मातें बनकरें तोडिलें ॥६२॥ मम म्यां कोपें बनकर ॥ मारुनि टाकिले महीवर ॥ तया कैवारें हरिहर ॥ झुंजावया पातले ॥६३॥ मग मी चित्तीं शांत होवून ॥ विकळ केले भवविभुप्राण ॥ तया अंगींची भूषणे घेऊन ॥ आलों आहे महाराजा ॥६४॥ ऐसी ऐकतां चरपटगोष्टी ॥ परम दचकला परमेष्ठी ॥ मग हदयीं धरुनि नाथ चरपटी ॥ गौरवीत बाळातें ॥६५॥ म्हणे वत्सा माझा तात ॥ आजा तुझा विष्णु निश्चित ॥ महादेव तो आराध्यदैवत ॥ मजसह जगाचा ॥६६॥ तरी ते होतील गतप्राण ॥ मग मही त्यांवांचून ॥ आश्रयरहित होवून ॥ जीवित्व आपुलें न चाले ॥६७॥ तरी बाळा ऊठ वेगीं ॥ क्लेश हरोनि करी निरोगि ॥ नातरी मज जीवित्वभागीं ॥ अंत्येष्टी करुनि जाई कां ॥६८॥ ऐसें बोलतां चतुरानन ॥ चित्तीं वेष्टला कृपेंकरुन ॥ म्हणे ताता उठवीन ॥ सकळिकां चाल कीं ॥६९॥ मग विधि आणि चरपटनाथ ॥ त्वरें पातले अमरपुरींत ॥ तों हरिहर अव्यवस्थित ॥ चतुराननें देखिले ॥१७०॥ मग प्रेमाश्रु आणूनि डोळां ॥ म्हणे वेगीं उठवीं बाळा ॥ वाताकर्षण चरपटें कळा ॥ काढूनियां घेतलें ॥७१॥ वातप्रेरकमंत्र जपून ॥ सावध केले सकळ देवजन ॥ उपरी जे कां गतप्राण ॥ संजीवनीनें उठविले ॥७२॥ सकळ सावध झाल्यापाठीं ॥ ब्रह्मा करीं धरुनि चरपटी ॥ विष्णुभवांच्या पदपुटीं ॥ निजहस्तें लोटिला ॥७३॥ परी विष्णुचिन्ह भूषणस्थित ॥ पाहूनियां रमानाथ ॥ कोण हा विधीतें पुसत ॥ तोही प्रांजळ सांगतसे ॥७४॥ मग जन्मापासूनि अवतारलक्षण ॥ विधी सांगे देवांकारण ॥ विष्णु सकळ वृत्तांत ऐकून ॥ ग्रीवेलागीं तुकावी ॥७५॥ मग म्हणे मम भूषणें ॥ वर्तलें नाही विभक्तपण ॥ माझाचि अवतार जाण ॥ चरपटनाथ आहे हा ॥७६॥ मग परमश्रेष्ठी हस्तेंकरुन ॥ चरपट आंगींचे काढूनि भूषण ॥ विष्णूलागीं देवून ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥७७॥ असो सकळांचे समाधान ॥ पावूनि पावले स्वस्थान ॥ चरपट अवतार पिप्पलायन ॥ सर्व देवालागीं समजला ॥७८॥ कपालपत्र शिवें घेवून ॥ गणांसह पावला स्वस्थान ॥ अमरपुरीं सहस्त्रनयन ॥ देवांसहित गेला असे ॥७९॥ मग विधीने चरपट करीं वाहून ॥ पाहतां झाला ब्रह्मस्थान ॥ येरीकडे नारद गायन ॥ करीत आला शक्रापाशीं ॥१८०॥ इंद्रालागीं नमस्कारुन ॥ म्हणे तुम्हां झाले थोर विघ्न ॥ येथें कोणता नारद येवून ॥ कळी करुन गेला असे ॥८१॥ आम्ही तुमच्या दर्शना येतां ॥ कळींचे नारद आम्हां म्हणतां ॥ तरी आजचि कैसी बळव्यथा ॥ कोणें दाखविली तुम्हांसी ॥८२॥ ऐसें नारद बोलतां वचन ॥ मनीं खोंचला सहस्त्रनयन ॥ चित्तीं म्हणे हेंचि कारण ॥ नारद आम्हां भंवलासे ॥८३॥ ऐसें समजूनि स्वचित्तांत ॥ कळीचे नारद कदा न म्हणत ॥ अल्प पूजनें गौरवीत ॥ मग बोळविलें तयासी ॥८४॥ येरीकडे चतुरानन ॥ गेला स्वस्थाना चरपटीसी घेवून ॥ तयामागें नारद येवून ॥ सत्यलोकीं देखिला ॥८५॥ यापरी पुढें खेळीमळी ॥ पर्वणी उत्तम पावली बळी ॥ मणिकर्णिकेसी सर्व मंडळी ॥ स्नानालागीं जातसे ॥८६॥ एकवीस स्वर्गीचे लोक समस्त ॥ मणिकर्णिकेसी आले बहुत ॥ तयांमाजी चरपटीनाथ ॥ विधी घेवूनि आलासे ॥८७॥ मग तात पुत्र करुनि स्नाना ॥ परतोनि आले स्वस्थाना ॥ याउपरी सहजस्थित होवून ॥ संवत्सर भरला असे ॥८८॥ नारदविद्या पूर्ण गमन ॥ मनीं चिंतितां पावे स्थान ॥ तया मार्गे गौरवून ॥ भोगावतीसी पातला ॥८९॥ विधिसुत चरपटनाथ ॥ गमन करीत महीं येत ॥ तेथेंही करुनि अन्य तीर्थ ॥ भोगावतीसी जातसे ॥१९०॥ करुनि भोगावतीचें स्नान ॥ सप्त पाताळ दृष्टीं पाहून ॥ बळिरायाच्या गृहीं जावून ॥ वामनातें वंदिलें ॥९१॥ बळीनें करुनि परम आतिथ्य ॥ बोळविला चरपटीनाथ ॥ यापरी इच्छापूर्ण नाथ ॥ भ्रमण करी महीसी ॥९२॥ ऐसी कथा ही सुरस ॥ कुसुममाळा ओपी त्यास ॥ कवि मालू श्रोतियांस ॥ भावेंकरुन अर्पीतसे ॥९३॥ नरहरीवंशी धुंडीसुत ॥ अनन्यभावें संतां शरणागत ॥ मालू ऐसे नाम देहाप्रत ॥ ज्ञानकृपें मिरवीतसे ॥९४॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकोनिचत्वारिंशत्ततिमोध्याय गोड हा ॥१९५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार एकोनचत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥
|