अध्याय ७. कथासार
वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन
मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थी स्नान केले. इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता; तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. उभयतानी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कोठचे, पंथ कोणता, अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा ह्या देहाला मच्छिंद्र म्हणतात, नाथपंथ तो आमचाच आहे, शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथाने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला, हे एक नवीन पाखंड बंड मातवून असे काळे तोंड जगात मिरविता, हे तुम्हास योग्य नाही, यास्तव ह्या मुद्रा टाकून दे. न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील. वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण? अशी त्याची निंदाप्रचुर भाषणे ऐकून, मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले. तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला, अरे अधमा ! तुझ्या दर्शनाने मला स्नान करावयाला पाहिजे. आता निमूटपणे आपल्या कामास जा; नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील. ह्या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला, अरे मूर्खा ! आता तुझा प्राण घेतो पाहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हटले की, अरे पतिता ! उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस. अरे ! धनुष्यबाण काढून मला सोंग दाखवीत आहेस; परंतु या योगाने तू या वेळेस मरण मात्र पावशील. अरे ! असली बहुरूप्यांची सोंगे दाखविणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले. तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभरसुद्धा टिकाव धरणार नाहीत. आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते !
अशी त्या समयी उभयताची आवेशाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, राममंत्र तुला अपवित्र वाटला, म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावयास सांगतोस, पण इतके पक्के समज की, त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले. वाला (वाल्मीकि) तरला तोच मंत्र मला तारील. आता तू सावध राहा. असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले, ते दाही दिशा फिरू लागले. त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासमान भासला. तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला. इतक्यात मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला. नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोहि पाठोपाठ सोडला. ते पाहून मच्छिंद्रनाथानेहि आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र प्रेरिले. त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली. पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच, मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले. अशा रितीने ते दोघे वीर, अस्त्रे पेरून एकमेकांचा पाडाव करावयास पाहात होते. शेवटी ब्रह्मा, विष्णु, महेश यांनी युद्धस्थानी येउन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले. नंतर वीरभद्रास जवळ बोलावून त्याचे मच्छिंद्रनाथाशी सख्य करून दिले व हा नाथ कविनारायणाचा अवतार आहे असे सांगितले. मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला. त्याने बोलून दाखविले की, मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हतवीर्य केले. पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही. असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनकामना आहे म्हणून विचारिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मी साबरी विद्या साध्य केली आहे, तर तीस तुझे साहाय्य असावे. मग मंत्राबरहुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्हीहि साहाय्य आहो असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला.
नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की, तुझ्या विद्येस माझे पूर्ण साहाय्य आहे, माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन, असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले. नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने शापादप्यास्त्र, तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले. त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली की, मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतु आहे; तेवढी माझी मनकामना पुरवावी. ते त्याचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले.
मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसविले. त्याचे भोजन, निजणे, बसणे, उठणे, सर्व विष्णूबरोबर वैकुंठात होत होते. वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा आपण पूर्वजन्मी मेरुपर्वतावर घेतलेली समाधी पाहाण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतु विष्णूस कळविला. म्हणून त्याने त्यास तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणाची अशा समाधि दाखविल्या; त्या पाहून तो आनंद पावला.
मच्छिंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिला. तेथून त्यास शंकर कैलासी घेऊन गेले. तेथेहि तो एक वर्षभर राहिला. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला. तो तेथे तीन महिने होता. नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नारद येऊन त्यास सत्यलोकास घेऊन गेला. तेथे तो सहा महिने राहिला. पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहवुन घेतले. तो एकंदर सात वर्षे स्वर्गात राहून पाहुणचार खात होता. नंतर सर्वांना विचारून तो मृत्युलोकी यावयास निघाला, तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून अति आदराने मृत्युलोकी आणून पोचविले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला.
मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला. त्या ठिकाणी वज्रभगवतीचे स्थान आहे. तेथे त्याने तीनशेसाठ उष्णोदकाची कुंडे पाहिली, तेव्हा त्यास परम आश्चर्य वाटले. मग तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनीने यज्ञ केला. त्या समयी सर्व देव खाली आले होते. त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेविली. ते देव बारा वर्षे बारा दिवसपर्यंत येथे राहिले होते. यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले, पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत.
असा मजकूर ऐकल्यावर आपणहि कुंडे निर्माण करावी, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात येऊन त्याने त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुणमंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले. मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले, नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान करून तो वज्रादेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले. तेव्हा तिने त्यास शाबासकी देऊन एक महिना राहवून घेतले. नंतर तुला वज्राबाई का म्हणतात, असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारिले असता ती देवी म्हणाली वसिष्ठाच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता, पण सभेत जे ऋषि बसले होते, त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्राने 'शक्ति' मंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकिले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही. मग इंद्राने आपले वज्र मिळविण्यासाठी रामाची प्रार्थना केली. त्याने इंद्रास वज्र परत दिले. मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला 'वज्राबाई' असे नाव दिले. मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्याने प्राणप्रतिष्ठा करतेसमयी मला भोगावतीचे स्नान घातले होते. त्यावर आज झाले. पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस. ती ही की, त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षयी ठेविलीस, असो; तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन पुढे गेला.
|