Nav Nath Bhktisaar.....

 
कथासार - अध्याय :
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



अध्याय १२. कथासार
जालंदरनाथास वरप्राप्ति; कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ति

अग्नीने जालंदरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतु आहे तो निवेदन कर. असे अग्नीचे भाषण ऐकून जालंदरनाथ म्हणाला की, तू सर्व जाणत आहेस, मी सांगितले पाहिजे असे नाही; तरी सांगतो ऐकावे. हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी ह्याचे काही तरी सार्थक होईल असे कर. नाही तर जन्मास येऊन न येऊन सारखेच, असे मात्र होऊ देऊ नको. माझी कीर्ति त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर. असा जालंदराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली.
मग हा जालंदर सर्वापेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नि त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेला. उभयतांच्या मोठ्या आदरसत्काराने भेटी झाल्या. नंतर दत्तात्रेयाने अग्नीला विचारले की, आज कोणता हेतु धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण? तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केला की, शंकराच्या देहातला काम म्या जाळिला, तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेविला होता. मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले. ह्यास तुमच्या पायांवर घालितो, याचे तुम्ही संरक्षण करावे. व ह्यास अनुग्रह देऊन सनाथ करून चिरंजीव करावे. मग दत्तात्रेयाने सांगितले की, मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतुप्रमाणे तयार करीन, परंतु ह्यास येथे बारा वर्षेपर्यंत ठेविले पाहिजे. हे ऐकून जालंदराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाला. शेवटी दत्ताने जालंदरास मांडीवर बसवून त्याच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्‍न चालविला. वरदहस्त मस्तकावर ठेविताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्नि दत्तास नमस्कार करून गुप्त जाला. मग जालंदरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे. तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई. व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करी. असो, अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रविद्येत जालंदर निपुण झाला. तसाच तो सर्व वेद, शास्त्रे, पुराणे, व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला.
अशा रितीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली. व ती सर्व दैवते जालंदरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येउन व जालंदरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येऊन व जालंदरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्तात्रेयाने अग्नीस सांगितले की, आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला. आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्यांच्यापासून वर देववावे. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखविली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते, त्याच दैवतांनी जालंदरास वर दिले. नंतर जालंदराने बदरिकाश्रमास जाऊन तेथे बारा वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलविल्या. नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा, विष्णु, महेश आदिकरून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पावून गेले.
पुढे बदरिकाश्रमी बदरिनाथाने (शंकराने) अग्नीस व जालंदरनाथास आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले. त्या वेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी - ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षांची असता तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले; तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला. तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासरसा वीर्यबिन्दु हिमाचलाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला. त्यात प्रबुद्धनारायणाने संचार केला. ह्या गोष्टीस युगेच्या युगे लोटली. तरी तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्धनारायणाचा अवतार-जन्म होईल, त्यास जालंदराने आपला शिष्य करावा. कानापासून जन्म आहे म्हणून 'कानिफा' असे त्याचे नाव पडेल. असे शंकराने सांगताच अग्नि म्हणाला, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहा, पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे. एरव्ही ही गोष्ट फार चांगली झाली की, माझ्या मुलास एक पाठबळ झाले.
ह्याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंदर व अग्नि यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले, तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला. तेव्हा शंकराने सांगितले की, हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवील; तर ह्यास आळवण्यासाठी कोणती युक्ति करावी? तेव्हा जालंदरने हिंमत धरून म्हटले की महराज ! माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरदहस्त ठेविला आहे; त्याचा चमत्कार आपण आता पाहाल ! प्रळयकाळचा काळहि जेरीस येऊन उगीच बसेल, मग ह्या हत्तीचा काय हिशेब आहे? असे म्हणून त्याने झोळीतून चिमटीभर भस्म घेतले आणि मोहनीअस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकिले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज, पण अगदी नरम पडला.
मग जालंदर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की, तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले अहे; आता हे समर्थ प्रबुद्धनारायणा ! तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस, म्हणूण तुझे नाव 'कानिफा' असे ठेविले आहे. आता सत्वर बाहेर ये. जालंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की, महाराज गुणनिधे ! स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालंदरास नमस्कार केला; त्या वेळी ती सोळा वर्षांची महातेजस्वी मूर्ति जालंदराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली. मग त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालंदरासहि नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुके घेतले. पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंदराने शंकरास विनंति केली.
अनुग्रह झाल्यावाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरूचे स्मरण करून जालंदरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले. मग चौघेजण बदरिकाश्रमास गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले, ते कानिफास द्यावे असे जालंदरास सांगून अग्नि गुप्त झाला. तेथे शंकर सहा महिने पावेतो त्यांना भेटत होते. सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये निपुण झाला. पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंदराने त्यास सांगितली नव्हती.
कानिफास अस्त्रे, दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंदरास सांगितले. मग जालंदराने हात जोडून प्रार्थना केली. की, कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली की, तुला आम्ही वरप्रदान दिले. कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकविली व अग्नीचीहि मीड पडली, यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले, पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत. या पुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे ! याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्या योगाने जालंदरास अति क्रोध आला. तो म्हणाला, माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही. आताच तुम्हास चमत्कार दाखवितो, असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडिली. तितक्यांचे जालंदराने निवारण केले. परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहात होते. जालंदरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही, असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केले. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले.
त्या समयी जालंदराने कामिनीअस्त्र सोडिले; तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. तेणेकरून देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटाक्षबाण सोडीत होत्याच. त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात; असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवहि चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले. कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले; इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊ त्यास नग्न केले व जालंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला. मग जालंदरनाथाने कानिफास इषाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चात्ताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यास कानिफा म्हणाला, मी गुरूच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट गुरूना सांगू नका. तो दरएक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ति पाहून देव समाधान पावले व त्यानी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रांत आम्ही सर्वप्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडास चिकटले. होते तेथून मुक्त झाले व अस्त्रेभूषणे सावरून जालंदरनाथाजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू, असा कानिफात वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालंदराने सर्वांस सांगितले की, पुढे मी साबरीकवित्व करणार आहे; त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी साह्य व्हावे. त्यास त्यानी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस बदरिकाश्रमात राहिले.