Nav Nath Bhktisaar.....

 
कथासार - अध्याय :
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



अध्याय ६. कथासार
मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति

बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविल. कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिकादैवत आहे, त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिकादैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरप्रदान देण्यास तयार झाले. तेव्हा तिने वर मागून घेतला की, आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली, आता मला येथे विश्रांति घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की, मातोश्री ! मी मंत्रकाव्य केले आहे, त्यास तुझे साह्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्वविद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी. अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली. अगोदर त्या अस्त्रास (देवीस) श्रम झाले होतेच, तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की, अरे नष्टा, पतिता, मला फार श्रम झाले आहेत, असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस? तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस; पण तेणेकरून मला तू विघ्न करावयास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले; असे असता, दुरात्म्या! मला त्रास देण्यास आला आहेस, तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो. नाही तर तुला शिक्षा करीन. अरे ! शंकराच्या हातातील अस्त्र, ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय? अरे, मला बोलाविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून निमूटपणे चालता हो; नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील. हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की, मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको. अगे ! सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करिते, त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा. तेथे अंबा म्हणाली, भष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळास शेंदुर लावून येथे येऊन मला भिववीत आहेस, पण मी या तुझ्या धमकावणीला भिणार नाही. अरे ! तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे. अरे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करावयाचा, ते सोडून का दिलेस? तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की, मी थोर प्रताप दाखवून भुतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन. पण मी तशापैकी नव्हे, हे तू पक्के समज. मी विषअस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन, तर सारे ब्रह्मांड पालथे घालुन लोळवून टाकीन. तेथे तू आपला कसचा दिमाख दाखवितोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला मशकासमान समजत होता; परंतु त्यालाच परिणामी पाताळलोक पाहावा लागला ! हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला. ती त्यास म्हणाली, तुजमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखीव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की, तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाख मला दाखवीत आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखीव.
याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली. इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की, जोगड्या, आता आपला प्राण वाचीव. तू आपल्या गुरूचे स्मरण कर. कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो, तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे, ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल? अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला, तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हावयाचे नाही. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासवशक्तिमंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदीप्यमान वासवशक्ति तत्काळ प्रगट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकाअस्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती. झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली. हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रगट झाले. ते भयंकर व अनिवार प्रळय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले. तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुति केली; तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र, धूम्रास्त्र ही सोडिली; परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना. कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकिले व वज्रास्त्र शैलाद्रि पर्वतावर आपटले. तेणेकरून तो पर्वत फुटून गेला. याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुनः वाताकर्षणास्त्राची योजना केली. त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती. दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिकादेवीवर प्रवेश केला; तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले. इतक्यात देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली, ते पाहून देव दानवांनासुद्धा मोठा विस्मय वाटला.
कालिकेचे प्राण जाऊ लागले, तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले. हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे, तसे त्याच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले. शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायांवर मस्तक ठेविले. मग शंकराने त्यास दाही हातांनी पोटानी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की, बदरिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र-अस्त्रविद्यादि सर्व शिकविले, तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय. त्यावर शंकराने म्हटले, तूर्त ते असो, तू प्रथम कालिकादेवीस सावध कर. तेव्हा नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारिल्यावर त्याने मागणे मागितले की, जशी शुक्राचार्याने संजीवनीविद्या कचास दिली, त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्ये केली, तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेहि मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे. असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधानवृत्तीने राहीन. तेव्हा शंकराने सांगितले की, तू कालिकेस जीवदान देऊन उठव, तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करितो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. मग वातास्त्रमंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. तो शंकरास तिने पाहिले. मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्याची स्तुति केली.
मग शंकराने तिला सांगितले की, माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतु आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की, माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास साह्य व्हावे, हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर. हे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली. मी तुमच्या पायाची दासी आहे; असे असता आर्जव केल्यासारखे करून मजजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञा प्रणाम आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले. तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला साह्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर ह्यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले. चौथे दिवीस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरस गेला.