Nav Nath Bhktisaar.....

 
कथासार - अध्याय :
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



अध्याय ३८ कथासार
चरपटीची जन्मकथा; सत्यश्रव्याकडे बालपण, नारदाचा सहवास

चरपटीच्या उप्तात्तीची अशी कथा आहे, कीं , पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयीं सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदिकरुन देवगण जमलेला होता, ज्या वेळीं पार्वतीचें अप्रतिमा लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उप्तन्न झाला. तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्य पतन पावलें. तेव्हां ब्रह्मादेवास संकोच वाटला. व त्यानें तें वीर्य टांचेनें रगडिलें; तें पुष्कळ ठिकाणीं पसरलें. त्यापैकीं एक बाजुस गेलें त्याचें साठ हजार भाग झालें व त्यापासुन साठ हजार वालखिल्य ऋषि निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकानें केर झाडुन काढिला त्यांत गेला. पुढें लग्नाविधींनंतर लज्जाहोमाचें भस्म व तो केर सेवकांनीं नदींत टाकुन दिला. त्यांत तें रेतहि वहात गेलें. पुढें तें एका कुशास ( गवतास ) अडकून तेथेंच त्यांत भरुन राहिलें तें तेथें बरेच दिवस राहिलं होतें त्यांत पिप्पलायन नारायणानें सचार केला. तोच हा चरपटीनाथ. हा मुलगा नऊ महिन्यांनीं बाहेर पडुन स्पष्ट दिसूं लागला.
सत्यश्रवा या नांवाचा ब्राह्मण पुनीत गांवांत राहात असे. तो सुशील व वेदशास्त्रांत निपुण होता. तो एकंदां भागीरथीतीरीं दर्भ आणावयास गेला असतां कुशाच्या बेटांत गेला. तेथें त्यानें त्या मुलास पाहिलें. तो मुलगा सूर्याप्रमाणें तेजस्वीं दिसत होता. त्यावेळीं सत्यश्रव्याच्या मनांत त्या मुलाविषयीं अनेक शंका येऊं लागल्या. असें हें तेज:पुंज बाळ कोणाचें असावें बरें ? उर्वशीं तर हें आपलें मुल टाकून गेली नसेल ना ? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथें घेऊन आल्या नसतील ? अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनांत येऊं लागल्या. तो मुलाकडे पाही, पण त्याला हात लावीना. आपण ह्यास घरीं घेऊन जावें. हा विचार त्याच्या मनांत येई; पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळें त्या मुलास तो उचलून घेईना. अशा तर्हेऊनें विचार करीत तो कांहीं वेळ तेयेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हालवुन रडत होता. थोड्याच वेळांत पिप्पलायान नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनीं त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जयजयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालों, असें मनांत आणिलें मुलाच्या अंगावर देव फुलें टाकीत तीं सत्यश्रवा काढी. देव एकसारखी फुलें टाकीत, पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत; यामुळें त्याच्या मनांत संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्च्याचा सर्व खेळ असावा असें त्यास वाटलें, मग तो जिवाची आशा धरुन दर्भ घ्यावयाचें सोडून चपळाईनें पळत सुटला. तें पाहून देव हसूं लागलें व सत्यश्रव्या पळूं नको, उभा रहा, असें म्हणूं लागलें. हें शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सूटला.
मग सत्यश्रवाची भीति घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा. म्हणुन देवांनीं नारदास पाठविल. नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्रव्यापुढें येऊन उभा राहिला. सत्यश्रवा भयानें पळत असल्यामुळें धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते. इतक्यांत ब्राह्मणरुपीं नारदानें त्यास उभें करून घाबरण्याचें कारण विचारलें तेव्हां त्यानें आपल्या मनांत आलेले सर्व विकल्प सांगितलें. मग नारदानें त्यास एका झाडाखाली नेलें व सावलींत बसुन स्वस्थ झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला. तसेंच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणी मुलास घरीं नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितलें. शेवटीं नारद त्यास असेंहि म्हणाला. कीं मीं जें तुला हें वर्तमान सांगितलें ते देवांचें भाषण असुन त्यावर भरंवसा ठेवुन मुलास घेऊन जा व त्याचें उत्तम प्रकारें संगोपन कर.
तरी पण माझें स्वर्गांत कसें कळलें हे सत्यश्रव्यास संशय उप्तन्न झाला व क्षणभर उभा राहूण तो पाहूं लागला. नारदाच्या कृपेनें देव त्याच्या दृष्टीस पडलें मग सत्यश्रव्यानें नारदास म्हटलें कीं, तूं सांगतोस ही गोष्ट खरी, मला येथुन देव दिवस आहेत; पण तुं आतां मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढूण माझ्या हातांत दे. हें त्याचें म्हणणें ब्राह्मणरूपीं नारदानें कबुल केलें मग तें दोघें भागीरथीच्या तटीं गेले. तेथें नारदानें परमानंदानें मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचें नांव चरपटीनाथ असें ठेवावयास सांगितलें हेंच नांव ठेवावें असें देव सुचवीत आहेत असेंहि त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरीं आला. सत्यश्रव्याची स्त्री चंद्रा परम पतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणावयस भागीरथीतीरीं गेलों होतो; देवानें आज आपणांस हा मुलगा दिला. याचें नांव चरपटी असें ठेवावें. त्याच्या योगानें देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले. असें सांगुन सर्व वृत्त थोडक्यांत त्यानें तिला सांगितला. तें ऐकून तिला परम हर्ष झाला. ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्तानें वंशवेल आपल्या हातीं आली, असें बोलून तिनें मुलास हृदयीं धरिले. मग तिनें त्यास न्हाऊं घालून स्तनपान करविलं व पाळण्यांत घालूंन त्याचें चरपटी असें नांव ठेवून ती गाणी गाऊं लागली.
पुढें तो मुलगा उत्तरोत्तर वाढ्त चालला. सातव्या वर्षी त्याची सत्यश्रव्यानें मुंज केली व त्यास वेदशास्त्रांत निपुण केलें. पुढें एके दिवशीं नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गांवांत आली. आंगंतुक ब्राह्मणाच्या वेषानें नारद सत्यश्रव्याच्या घरीं गेला. त्यानें चरपटीनाथास पाहिलें, त्या वेळेस त्याचें वय बारा वर्षाचं होतें. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासुन चरपटीची उत्पत्ती असल्यामुळें तो आपला भाऊ असें समजून त्याचा विशेष कळवळा येई . चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथुन निघुन बदरिकाश्रमास गेला व तेथें त्यानें शंकर, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ ह्यांची भेट घेतली. मग चौघेजण आनंदानें एकें ठिकाणीं बसलें असतां गोष्टी बोलतां बोलतां चरपटीचा मूळारंभापासुन वृत्तांत त्यांस नारदानें सांगितला. तो ऐकून शंकरानें दत्तात्रेयास सांगितलें कीं, तुमची मर्जी नवनारायणांस नाथ करुण्याची आहे; त्याअर्थीं चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावं त्यावर दत्तात्रेयानें म्हटलें कीं पश्चात्तपावांचुन हित करुण घेतां येत नाहीं; यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहतां येईल त्यावर नारदानें म्हटलें कीं, ही खरी गोष्ट आहे; आतां चरपटीस पश्चात्ताप होईल अशी व्यवस्था मी करितों. पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धतां करावी, इतकें दत्तात्रेयास सांगुन नारद पुनः त्या गांवीं सत्यश्रव्याकडे आला व त्यानें आपण विद्यार्थीं होऊन राहतो; मला विद्या पढवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रव्यानें त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला . नारदास तो कुलंब या नांवाने हांक मारी. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करूं लागले.
सत्यश्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशीं एका यजमानाकडे ओटीभरण होतें. म्हणुन त्यानें सत्यश्रव्यास बोलाविलें; परंतु सत्यश्रवा स्नानसंध्येंत गुंतल्यामुळें त्यानें चरपटीस पाटविलें व समागमें कुलंबास मदतीस दिलें होते. तो संस्कार चरपटीनें यथाविधि चालविल्यावर यजमानानें त्यास दक्षिणा देण्यासाठीं आणिली. त्यावेळीं कांहीतरीं कुरापत काढून व तंटा करून चरपटीचें संसारावरचें मन उडवावें असा नारदानें बेत योजून तो चरपटीस म्हणाला, तूं या वेळेस दक्षिणा घेऊं नकोस. कारण, दोघे विद्यार्थीं अजून अज्ञाआणा आहो; दक्षिणा किती घ्यावयाची हें आपणेंस समजत नाहीं व यजमान जास्त न देतां कमीच देईल. यास्तव घेतल्या वांचून तूं घरीं चल. मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हातीं घरीं कसा जाऊं ? तेव्हां नारद म्हणाला तूं घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाहीं. हें ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानापासुन युक्तीनें पुष्कळ दक्षिणा काढून घेतों. वाजवीपेक्षां जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठीं रांगे भरेल ? उलट शाबासकी देईल अशीं त्यांची भाषणे होत आहेत इतक्यांत यजमानानें थोडीशीं दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेविली. नारदानें आधींच कळ लावून दिली होती. तशांच दक्षिणाहि मनाप्रमाणें मिळाली नाहीं, म्हणुन चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्हीं मला ओळखिलें नाहीं. हें कार्य कोणतें, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्यायोग्य दक्षिणा किती द्यावयाची याचें तुम्हांस बिलकुल ज्ञान नाहीं. तें चरपटीचें भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुजा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ नसेल तर तो काय करील ? तेव्हां चरपटी म्हणाला, अनुकुलता असेल त्यानेंच असलीं कार्यें करण्यास हात घालावा ! अशा तर्हेकनें दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलाचाली सुरु झाली.
तें पाहून, चरपटीनें दक्षिणेसाठीं यजमानाशीं मोठा तंटा करून त्यानें मन दुखविल्याचें वर्तमान नारदानें घरीं जाऊन सत्यश्रव्यास सांगितलें आणि त्यास म्हटलें, चरपटीनें निष्कारण तंटा केला. यामुळें आतां हा यजमान मात्र तुमच्या हातांतुन जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीनें भांडून तुमचें बरेंच नुकसान केलें. आपण पडलों याचक; आर्जव करून व यजमानास खूष करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत. नारदानें याप्रमाणें सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला. तेथें दोघांची बोलाचाली चालली होती, ती त्यानें समक्ष ऐकीली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्यानें खाडकन त्याच्या तोंडांत मारली.
चरपटी अगोदर रागांत होताच, तशांच बापानें शिक्षा केली. या कारणानें त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चात्तापानें निघून गांवाबाहेर भगवतीच्या देवालयांत जाऊन बसला. नारद अंतसीक्षच, त्याच्या लक्षांत हा प्रकार येऊन त्यानें दुसऱ्या ब्राह्मणाचें रूप घेतलें व तो भगवतीच्या देवालयांत दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्यानें चरपटीजवळ बसून तुम्हीं कोण, कोठें राहतां म्हणुन विचारलें. तेव्हां चरपटीनें सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदानें बोलून दाखविलें कीं त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेड लागलेलें दिसतें. अविचारानें मुलगा मात्र हातांतला घालविला. त्या मुर्ख म्हाताऱ्याची बुद्धि चळली खचित आतां तूं त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करून अरण्यांत जा. ह्याप्रमाणें नारदानं सांगतांच, चरपटीस पूर्ण पश्चात्ताप होऊन त्यानें पुनः घरीं न जाण्याचें ठरविलें आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणानें त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठें तरी अन्य देशांत जाऊन विद्याभ्यास करून राहूं.
मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास आणावयासाठीं उठून बाहेर गेला. थोड्या वेळानें कुलंबाचा वेष घेऊन आला. नंतर सत्यश्रव्यापाशीं न राहतां अन्यत्र कोठं तरी जाऊन अभ्यास करून राहूं असा कुलंबाचाहि अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमतानें राहण्याचें ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबानें म्हटलें कीं, आतां आपण प्रथम बदरिकाश्रमास जाऊं व बदरी केदाराचें दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथें विद्याभ्यास करुं हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला.
मग ते दोघे बदरिकाश्रमास गेले. तेथें देवालयांत जाऊन त्यांनीं बदरीकेदारास नमस्कार केला. इतक्यांत दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथा प्रकट झाले. कुलंबानें ( नारदानें ) दत्तात्रेयाच्या पायां पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. चरपटीहि दोघांच्या पायां पडला व हें उभयतां कोण आहेत म्हणुन त्यानें कुलंबास विचारलें. मग कुलंबानें त्याची नावें सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटलें कीं, या देहाला नारद म्हणतात; तुझें कर्य करण्यासाठीं मीं कुलंबाचा वेष घेतला होता. हें ऐकून चरपटी नारदाच्या पायां पडून दर्शन देण्यासाठीं विनंति करुं लागला. तेव्हां नारदानें त्यास सांगितलें कीं, आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊं. परंतु गुरुप्रसादावांचुन आम्ही तुला दिसणार नाहीं. एकदां गुरुनें कानांत मंत्र सांगितला कीं, सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. तें ऐकून चरपटी म्हणाला, तुमच्याहुन श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढूं ? तरी आतां तुम्हीं मला येथें अनुग्रह देऊन सनाथ करावें. तेव्हां नारदानें दत्तात्रेयास सुचना केली. मग दत्तानें चरपटीच्या मस्तकावर हात ठेविला व कानांत मंत्र सांगितला. तेव्हां त्याचें अज्ञान लागलेंच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झालें. मग चरपटीनाथास त्यांचें दर्शन झालें. त्यानें तिघांच्या पायांवर मस्तक ठेविलें. ह्याच संधीस शंकरानेंहि प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला आणि विद्याभ्यास करवून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितलें. मग दत्तात्रेयानें त्यास सर्व विद्या पढविल्या; संपूर्ण अस्त्रविद्येंत वाकबगार केलें व तपश्चर्येंस बसविलें. पुढें नागअ श्वर्त्थी जाऊन बारा वर्षें राहून वीरसाधन केलें व नवकोटी सातलक्ष साबरी कवित्व केलें. मग त्यास सर्व देवांनीं येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्रीदत्तात्रेय गिरिनारपर्वतीं गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला. त्यानें रामेश्वर, गोकर्णमहाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरेश्वर, काशीं आदिकरून बहुतेक तीर्थें केली, त्यानें पुष्कळ शिष्य केले, त्यातुंन सिद्धकला जाणणारें नऊ शिष्य उदयास आले.