Nav Nath Bhktisaar.....

 
कथासार - अध्याय :
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



अध्याय १७ कथासार
जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट

मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीति नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजास विचारिले की, तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले. स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की, आता कोणत्या युक्तीने जालंदरमहाराजांस कूपाबाहेर काढितोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की, महाराज ! या बाबतीत मला काहीच समजत नाही; मी सर्वस्वी तुम्हांस शरण आहे, माता, पिता, गुरु, त्राता, सर्व तुम्ही आहात. मी आपला केवळ सेवक आहे. हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे. असे राजाने अति लीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की, राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ति सांगतो. प्रथम तू असे कर की, सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहुब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले. त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे, रुप्याचे, तांब्याचे, पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणिले.
नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ, गुरूस पुरून टाकिले होते तेथे गेला. तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला. त्या वेळी राजास सांगून ठेविले की, तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंदर गुरूने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर नीघ. ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीवप्रयोग सिद्ध करून विभूति राजाच्या कपाळास लाविली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता, आतून ध्वनि निघाला की, खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे. तो शब्द आतून निघाल्यानंतर, 'गोपीचंद राजा आहे, महाराज !' असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नि भडकून गेला. तो म्हणाला, 'गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो.' असे मुखातून शापवचन निघताच, सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले.
शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुनः खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की, माझा क्रोधवडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ! ह्यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षीत आहे ह्यात संशय नाही. ह्यास्तव आता राजास अमर करू असा जालंदरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की, अद्यापपावेतो तू खणीत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग. कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी ! मी बालक कानिफा आहे. आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे. ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनि उमटला की, गोपीचंद राजा अद्यापपावेतो जिवंत राहिला आहे; तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो !' असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली.
बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की, तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा ! मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले; तो माती दोहो बाजूस झाली. नंतर गुरु-शिष्यांची नजरानजर झाली. त्या वेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली ! मग जालंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की, या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला. इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले. तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की. 'प्रळयाग्नीतून तू आता चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा !' मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्यठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या. हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले.
नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की, तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल; योगमार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग. मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे; पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही. कारण, हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे. जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले.
त्या वेळी गोपीचंद राजाने मनात आणिले की, राज्यवैभव शाश्वत नाही. जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे, आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता, जसाच्या तसाच कायम ! ह्याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ! ह्याच्यापुढे राजाचीहि काय प्रौढी ! तर आता आपणहि ते अप्रतिम वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय. असा त्याने मनाचा पुर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की, गुरुमहाराज ! पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो, तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकताच जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले. त्या वेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चीक काढून जटांस लाविला. कौपीन (लंगोटी) परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली. शिंगी वाजविली, कुबडी, फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरूच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला.
गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चर्यैस जावयास सांगितले. त्या वेळी त्याने राजास उपदेश केला की, आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी. माई भिक्षा घाल, असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रितीने भिक्षेच्या मिषाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे.
मग गुरूची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावयाकरिता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली. त्या वेळी त्यांना इतके रडे लोटले की, त्या झालेल्या कल्होळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले. राजाचे गुण स्वरूप आदिकरून आठवून त्या दुःसह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका, करिती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले. त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वरसत्तेने जे व्हावयाचे होते ते झाले; पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा; कोठे तरी दूर जाऊ नका. आम्ही विषयसुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू, हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ; तेथे खुशाल रहावे. आम्ही सेवाचाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला. पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही; उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले.
परंतु, मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल. तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी, कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुनः असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांस सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल, कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील. धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील. घरोघर माझी आईबापे, भाऊ-बहिणी असतील, ती मजवर पूर्ण लोभ करतील. कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कांसोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण, निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम, निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी, फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी, भूचरी या दोन आदेय विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीहि तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष, मुक्ति ह्या शैलीचे मी भूषण मिरवीन.
असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता, मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी, फावडी त्यांना मारावयास उगारिल्या. ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली; तिनेहि तसेच सांगितले. मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरूने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर आंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला. राजास बोलवावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा, जालंदर व प्रधानादि लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले.
राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदिकरून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले. नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसहवर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.