श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ८
मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध. १७५ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः ॐ नमोजी गुरुराया ॥भवच्छेदका पळवीं माया ॥श्रीज्ञानेश्वरा सदयहदया ॥मम किंचित नाम मिरविशी
॥१॥
अघा हे ज्ञानदिवटी ॥आम्हा साधकां जे दिठी ॥मिरवला आहेसी पूर्णकोटी ॥हिनकारक महाराजा
॥२॥
तरी मागिले अध्यायीं कथन ॥विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न ॥आणि स्वर्गवासातें भोगून ॥महीलागीं मच्छिंद्र उतरला
॥३॥
आणि वज्रावटिके वज्रभगवती ॥तोपविलें स्नानाप्रती ॥उष्णोदकीं भोगावती ॥जगामाजी मिरविली
॥४॥
यापरी द्वारका करुनि तीर्थ ॥गोमतीं स्नानविधी यथार्थ ॥करुनियां द्वारकानाथ ॥प्रसन्न चित्तीं आगळा
॥५॥
त्यावरी आला आयोध्येसी ॥तरी श्रोतिया कथा परियेसीं ॥स्नान करुनि शरयूतीरासी ॥रामदर्शना जातसे
॥६॥
तों पशुपतराव तया ग्रामीं ॥रामवंशांत पराक्रमी ॥तो देवालयीं पूजेलागुनी ॥आला होता संभारें
॥७॥
अपार सैन्य जें भोंवती ॥सदनीं तुरंगमें रावती ॥छत्रचामरें कळसदीप्ती ॥लाजविती मानूतें
॥८॥
वाजी गज यांचे रंग आणिक ॥तेहीं चपळ अलोलिक ॥वाताकृती लक्ष एक तयाभोंवते फिरताती
॥९॥
सकळ वाजी श्रृंगारयुक्त ॥जडित पाखरा हाटकवत ॥रत्नकोंदणीं हार लखलखीत ॥कीं नक्षत्रमणी मिरविले
॥१०॥
त्यांतही झळकत झालरीयुक्त ॥गुणीं ओविले अपार मुक्त ॥कोणी विराजत गंगावत ॥शुभ्रतेजीं मिरवले
॥११॥
ग्रीवे माळा रत्नवती ॥हाटकासी जे ढाळ देती ॥रत्न नोहे तेजगभस्ती ॥चमूलागी मिरवला
॥१२॥
पदीं पैंजण रुणझुणती ॥कीं वीरांची वीरश्री वाचे वदती ॥कीं शत्रुगणींच्या अपार पंक्ती ॥ब्रीद म्हणती विभांडूं
॥१३॥
ऐशियापरी वाजी ते हौसे ॥कीं चिंतल्या ठायीं दाविती वास ॥अतिवातचपळगतीस ॥सर सर म्हणती माघारा
॥१४॥
अगा ते वाजी न म्हणूं महीचे ॥कीं इंदुबंधुरत्न उदधीचे ॥विशाळ शुक्तीकापात्र अब्धीचें ॥मुक्त करुनि आणिले ते
॥१५॥
याचकनीती विकासूनि अवनीं ॥हत्ती मिरवती पृतनेलागुनी ॥विशाळ गंडस्थळ दंतकदनी ॥चूडे सुवर्ण मिरवलें
॥१६॥
हाटक व्यक्त त्यां भूषण ॥हौदे अंबारिया देदीप्यमान ॥कीं पृतनामहीचे नग ते पूर्ण ॥भावनीं ऐसें पाहे कां
॥१७॥
अपार सैन्य बहु संभार ॥पाहतां उचलिले जे गिरिवार ॥कीं पर्वत माथां तरुशृंगार ॥तैशा पताका गजपृष्ठीं
॥१८॥
एकाहूनि एक अधिक ॥महारथी ते युद्धकामुक ॥दहा सहस्त्र रायासवें लोक ॥युद्धकामुक असती
॥१९॥
परी युद्धशास्त्री चतुर सुगम ॥कीं परशक्तीस देती दम ॥ऐसे प्रतापीक स्तोम ॥इंद्रसुखा आगळे कीं
॥२०॥
पायीचें पायदळ अपार ॥वस्त्राभरणीं मंडिताकार ॥छडीदार आणि चोपदार ॥जासूद हलकारे मिरवती
॥२१॥
हेमभूषणीं मुक्तमाळा ॥सकळ पाइकां झळकती गळां ॥जडितरत्नीं अति तेजाळा ॥हेमालंकार करकमळीं
॥२२॥
दाहीं अंगुळीं मुद्रिका गहन ॥हेममुक्तें ते मिरवती श्रवण ॥पहातेपणीं राणीवपण ॥भार पडेल लोकातें
॥२३॥
असो ऐशी अपार संपत्ती ॥मिरवला पाशुपत अयोध्यापती ॥ते सकळ दाटी देवळाभोंवतीं ॥राजीराजीने मिरवली
॥२४॥
त्यांत श्रीरामदर्शनाकारण ॥जाता झाला योगद्रुम ॥परी ते द्वारपाळ परम ॥नाथालागीं बोलत
॥२५॥
परम पाप संचल्या तुंबळ ॥तेव्हां मिरवे द्वारपाळ ॥प्रथम धर्मालागी काळ ॥अधर्मपरी मिरवतसे
॥२६॥
त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ॥ते द्वारपाळ द्वाररक्षण ॥आपण बुडुनि यजमाना ॥बुडवूं पाहती निश्वयें
॥२७॥
महानष्ट जातां समोर ॥कदा न म्हणती लहानथोर ॥न भांड चित्तीं परम निष्ठुर ॥वाचे कठोर बोलती
॥२८॥
सप्तजन्म तस्करनीती ॥शत ब्रह्महत्या जया घडती ॥तेव्हां तो पावे द्वारपाळ क्षितीं ॥धर्मविनाश रायाचा
॥२९॥
ऐसियेपरी द्वारपाळ ॥राजद्वारीं असती सकळ ॥मच्छिंद्र जातां उतावेळ ॥हटकूनि डंभ केली असे
॥३०॥
तीव्र वाचे बोलती वचन ॥म्हणती कान फाडूनि बुद्धिहीन ॥कोठें जासी तांतडीनें ॥मतिमंदा हे मूर्खा
॥३१॥
हे भ्रष्टा तूतें कैसें कळेना ॥कीं राव आला आहे दर्शना ॥त्यात तूं जासी बुद्धिहीना ॥सर परता माघारा
॥३२॥
ऐसें म्हणूनि निष्ठुर वचन हातीं ॥लोटिलें मच्छिंद्रनाथाप्रती ॥येणेंकरुनि परम चित्तीं ॥विक्षेपातें पावला
॥३३॥
परी तो सर्वज्ञ संतापासी ॥विवेक अर्गळा घाली त्यासी ॥तो म्हणे सेवकांसीं ॥संवाद करणें विहित नव्हे
॥३४॥
पतिस्वाधीन पतिव्रता ॥कीं पात्रसोई वाहे सरिता ॥तेवीं बुद्धि करुनि पाशुपता ॥सेवक सेवा आव्हानिती
॥३५॥
कीं सुईमागें गुंतो जातां ॥कीं मित्रामागें रश्मी येतां ॥तदनुबुद्धि पाशुपता ॥सेवक सेवा आव्हानिती
॥३६॥
कीं रत्नामागे सकळकळा ॥माउलीसवें आव्हानूं बाळा ॥तदनुबुद्धि अयोध्यानृपाळा ॥सेवक सेवा आव्हानिती
॥३७॥
कीं माळी मळ्याचा योजूनि पंथ ॥सयुक्त सोडी उदक आंत ॥तदनुबुद्धि पाशुपत ॥सेवक सेवा आव्हानिती
॥३८॥
ऐसिये शब्दां सदगुणवाणी ॥बोधी सकळां विवेकखाणी ॥बंधनीं निर्मूनि विक्षेप मनाचे चरणीं ॥घालितां झाला महाराज
॥३९॥
परी बुद्धिप्रकरण ॥अणिक सुचले तयाकारण ॥कीं सेवकांतें काय बोलून ॥शिक्षा देऊं राजातें
॥४०॥
एक राव आर्हा टितां ॥संपूर्ण सेवकां दाटे व्यथा ॥जेवीं गवसनी मित्रा घालितां ॥रश्मी आतुडती सहजचि
॥४१॥
शरीरीं कोठें घालितां घाय ॥परी सर्वोपरी दुःख होय ॥तदनुशिक्षा योजितां राया ॥दुःख मिरवी घृतनेते
॥४२॥
ऐसें योजूनि मच्छिंद्रनाथ ॥भस्मचिमुटी कवळी हाता ॥स्पर्शास्त्रमंत्रप्रयुक्ता ॥रामनामीं जल्पला
॥४३॥
येरीकडे पाशुपत ॥देवा बद्धांजुळी होऊनि प्रणत ॥रामासन्मुख दंडवत ॥महीं मस्तक ठेवीतसे
॥४४॥
तों स्पर्श मग येऊनि निकट ॥करिता झाला अंगीं झगट ॥झगट होतां महीपाठ ॥भाळा सहज झालीसे
॥४५॥
राव उठूं पाहे क्षणीं ॥परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी ॥भाळपदादी उभयपणीं ॥महीयुक्त झालीं तीं
॥४६॥
करितां यत्न बहुतांपरी ॥परी विभक्त नोहे कदा धरित्री ॥बहु श्रमला नानापरी ॥उपाय कांहीं चालेना
॥४७॥
मग बोलावूनि सेवकमंत्री ॥वृत्तांत सांगे झाल्यापरी ॥म्हणे कदा न सोडी धरित्री ॥व्यक्त झाली सर्वस्वें
॥४८॥
परी मंत्री बुद्धिमंत ॥एकटाचि तेव्हां बाहेर येत ॥सेवकां पुसे रळी मात ॥कोणी कोणातें झाली कां
॥४९॥
मनांत म्हणे कोणी जाती ॥आला असेल नगराप्रती ॥गांजिल असेल राजदूतीं ॥म्हणून क्षोभला असेल तो
॥५०॥
मग त्यातें क्षोभ न येतां ॥क्षोभ वरिला श्रीभगवंता ॥तयाचे साधू जगीं छळितां ॥क्रोध नावरे देवासी
॥५१॥
महीं श्रेष्ठ तो अत्रिनंदन ॥परी उगेंचि क्षोभवूनि आपुलें मन ॥श्रीअंबऋषीचे केलें छळण ॥तरी न साहे दैवतें
॥५२॥
तेणें सुदर्शन लावूनि पाठीं ॥गर्भ सोसी आपण जगजेठीं ॥तस्मात् भक्त गांजिल्यापाठीं ॥कदा न राहवे देवातें
॥५३॥
भजनीं प्रेमा प्रल्हादबाळा ॥परम आवडे तमाळनीळा ॥दानवीं गांजितां उतावळा ॥कोरडे काष्ठी प्रगटला
॥५४॥
धर्महवनीं मंडूकबाळ ॥तप्तोदकीं केलें शीतळ ॥तस्मात् संकटीं भक्त प्रेमळ ॥कदा न राहवे देवातें
॥५५॥
रणीं होतां कडकडाट बहुत ॥पक्षिजोडा बाळें टाकूनि जात ॥बाळकांनीं स्मरतां रमानाथ ॥करिघंटा टाकी तयांवरी
॥५६॥
पारधी पक्षिप्राणहरणीं ॥व्याळरुप झाले चक्रपाणी ॥तस्मात् दासाचा छळ कोणी ॥कदाकाळीं करुं नये
॥५७॥
जळीं पदातें नक्र ओढी ॥कोणें दूतीं ॥गांजिली असेल हरिभक्ती ॥म्हणूनि लोभे सायक हातीं ॥हरीनें वरिला असेल कीं वृत्तांत तो प्रविष्ट झाला
॥६०॥
मंत्री वृत्तांत ऐकूनि कानीं ॥शोधूनि काढी मच्छिंद्रमुनी ॥धन्य मंत्री तो शोधप्रकरणी ॥अर्थपैशुन्य निवडिता
॥६१॥
अहो तो मंत्री नोहे मोहरा ॥अमृत घेऊनि सांडी मदिरा ॥कीं चिंत मणिराज अधीरा ॥राजचिंताहरणार्थ
॥६२॥
तन्न्यायें तो सुघडकरणी ॥त्वरें लागला मच्छिंद्रचरणी ॥मग म्हणे महाराजा औदार्यपणीं ॥कृपादान ओपावें
॥६३॥
तुम्ही संत ते स्नेहभरित ॥पूर्णशांतीचे भांडारयुक्त ॥औदार्य सांगतां नाहीं मित्र ॥अपराध क्षमा करावा
॥६४॥
मेघ जरी उदार म्हणावा ॥तोही समता न करी संतमाथा ॥मेव विसरे दातृत्वभावा ॥तेवी संत नोहे तो
॥६५॥
जरी परिसाची उपमा देऊं ॥तो लोहातेचि देत हाटकभाऊ ॥इतर धातूसी होत परिभवू ॥न चले शक्ती तयाची
॥६६॥
कल्पतरु जरी करावा समान ॥शुभासुभ दावी रत्न ॥तेवीं नोहे संतजन ॥शुभचिन्हेंचि वाछिती
॥६७॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥प्रसन्न झाले स्वचित्तांत ॥क्रोध आवरुनि होतां शांत ॥प्रसाद देऊं म्हणतसे
॥६८॥
मग करीं कवळूनि भस्म चिमुटी ॥विभक्त अस्त्र मंत्रपोटीं ॥कविराज जल्पतां होटीं ॥धरा चिमुटी सोडीतसे
॥६९॥
राव उठूनि बैसे धरित्री ॥वेगीं पाचारीतसे सुहितमंत्री ॥सर्वेचि येऊनि झडकरी ॥दूती राजाज्ञा निवेदिली
॥७०॥
पत्रिके बोलावूनि निकट दूत ॥विचारुनि घेतो राजक्षेमांत ॥तंव ते शुभवार्ता सांगत ॥कल्याणें राजा विराजला
॥७१॥
मग मच्छिंद्राचा धरुनि पाणी ॥मंत्री नेत तयालागुनी ॥प्रवेश होता तये क्षणीं ॥वृत्तांत रायातें निवेदला
॥७२॥
रायें ऐकूनि सकळ वृत्तांत ॥मच्छिंद्रचरणीं भाळ अर्पीत ॥अति गौरवें स्नेहभारीत ॥नाम पुसे तयाप्रती
॥७३॥
येरी म्हणे नरेंद्रपाळा ॥मज मच्छिंद्र म्हणती तान्हुल्या बाळा ॥रायें ऐकूनि वृत्तांत सकळा ॥मच्छिंद्रचरणीं प्रेरीतसे
॥७४॥
पूर्वी मच्छिंद्रकृतिरत्न ॥सांठवले श्रवणाकारणें ॥तेणेंकरुनि दर्शनभूषण ॥स्वीकारावयासी पहातसे
॥७५॥
ऐसी इच्छा अब्धांपाठीं ॥तो मच्छिंद्रचंद्र देखीला दृष्टी ॥मग परम मनीं आनंददाटी ॥चित्रपात्रीं हेलावली
॥७६॥
मग सुखासनें सिद्ध करुन ॥राजानें मच्छिंद्राचा हात धरुन ॥आपुले समास्थानीं नेऊन ॥कनकासनी बैसविला
॥७७॥
षोडशोपचारें पूजन ॥अर्पिता झाला तन मन धन ॥वरी परम आदरें भक्तिरत्न ॥मच्छिंद्रनाथ ओपीतसे
॥७८॥
सदा सर्वदा आसनीं शयनीं ॥गमनीं भोजनीं जोडूनि पाणी ॥निरंतर उभा सेवेलागुनी ॥अन्य कांहीं सुचेना
॥७९॥
ऐसिया भक्तीचा पाहतां पाठ ॥मच्छिंद्रकृपेचा लोटला लोट ॥म्हणे कोण नरेंद्र कामनालोट ॥कवण चित्तीं दाटतसे
॥८०॥
येरु म्हणे जी योगद्रुमा ॥मी सूर्यवंशीं पाशुपतनामा ॥रामअवलाद, कृशपत्नीधामा ॥अवलाद देह असे हा
॥८१॥
तरी वडील माझा विजयी ध्वज ॥श्रीराम अवतरे तेजःपुंज ॥मातें भेटवीं महाराजा ॥मित्रकुळाचा टिळक जो
॥८२॥
येरी म्हणे रे भाऊका दिठीं ॥आतां करितों तयाची भेटी ॥मग सभेबाहेरी तपोजेठी ॥राया घेऊनि येतसे
॥८३॥
उभा राहूनि राजांगणीं ॥धूमास्त्र मंत्र जल्पे वाणी ॥भस्मचिमुटी संजीवनी ॥अर्कावरी प्रेरितसे
॥८४॥
तेणें ध्रुव खगमंडळ संपूर्ण ॥धूम्रें भरुनि गेलें गगन ॥दिशांसह अर्क संपूर्न ॥झांकाळूनि पैं गेला
॥८५॥
धूम्रास्त्रानें भरले नयन ॥नेत्र पुसीतसे सारथी अरुण ॥धूम्र संचारोनि मुखाकारण ॥कासावीस होतसे
॥८६॥
तें पाहुनि सविताराज ॥म्हणे अस्त्रविद्ये धूम्र विराजे ॥क्षत्रिय कुळांतील नरेंद्र ओजें ॥तेणें प्रेरली ही विद्या
॥८७॥
मग तो महाराज जगलोचन ॥कवळूनि सायका चढवूनि गुण ॥वायुअस्त्र शर निर्मून ॥सोडिता झाला महाराजा
॥८८॥
तंव तो शर प्रतापवंत ॥लवकरी प्रगटवी स्थावर मारुत ॥तेणें मंदराचळ पर्वत ॥हालूं पाहती डगडगां
॥८९॥
गगनापासूनि महीपर्यंत ॥प्रगट झाला प्रळयवात ॥तरु उचंबळूनि नभीं भ्रमत ॥पक्षी जेवीं भूगोलातें
॥९०॥
ऐसा वात होतां प्रगट ॥धूम्रें फुटला दिशापाट ॥सदनालागीं निर्मळ वाटे ॥गमन करितां येईंना
॥९१॥
तें पाहूनियां योगद्रुम ॥जल्पता कितुलें ॥कीं मंदराचळचि दुजे उगवले ॥तेणें मार्ग कुंठित जाहले ॥वातचक्राचे महाराज
॥९३॥
मग ते अस्त्रीं नारायण ॥पर्वत पाहतां विशाळपणें ॥मग वज्रास्त्रसंधान ॥करिता झाला अर्क तो
॥९४॥
तंव वज्रास्त्र अतिकठिण ॥पर्वतमाथे गेले भेदून ॥तेणें घायें शतचूर्ण ॥त्वरें झाले नगराज
॥९५॥
पर्वत चूर्ण होतां निगुती ॥तें पाहूनि मच्छिंद्रजती ॥भ्रमीं अस्त्र योजूनि उपरती ॥मित्र भागीं सांडीतसे
॥९६॥
तें अस्त्र होतां स्पंदनी प्रविष्ट ॥वाजींसह अरुण झाला भ्रमिष्ट ॥सांडूनि रहाणीची नित्य वाट ॥स्यंदन नेती भलतीकडे
॥९७॥
तें पाहूनियां द्वादशनामी ॥ज्ञानशराच्या न उरल्या गुणऊर्मी ॥तेणें करुनि भ्रमें प्रकामी ॥नाशाप्रती पावतसे
॥९८॥
जैसा पेटला पावक ॥त्यावरी सोंपविलें सकळ उदक ॥मग तो उरे केवीं दाहक ॥तेवीं अर्का झालें असे
॥९९॥
कीं अज्ञानपण साधकाचें ॥श्रीसदगुरु निवारीत वाचें ॥अंगीं भूषण ज्ञानपणाचें ॥बोधगुनी गोवीतसे
॥१००॥
कीं सदनांत दाटला अंधार अपार ॥तो दीप उजळितां होतो दूर ॥तन्न्यायें श्रीभास्कर ॥ज्ञानेश्वरा प्रेरितसे
॥१०१॥
तेणें उडवूनि भ्रमिष्टपण ॥सुपंथसुपंथा करी गमन ॥तें मच्छिंद्रनाथें दृष्टी पाहोन ॥वाताकर्षण जल्पत
॥१०२॥
वातास्त्र आकर्षण सबळ ॥वायुचक्रीं भेदिलें तुंबळ ॥मग वाजींचे आणि सारथ्याचे तये वेळ ॥श्वासोच्छवास राहिले
॥१०३॥
आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण ॥तोही दाटला श्वासेंकरुन ॥वायुचक्री गेले आटून ॥रथ उलथोनि पडियेला
॥१०४॥
वायुचक्राचा ज्यासी आधार ॥तो आधार तुटतांचि सत्वर ॥स्वर्गाहूनि उर्वीवर ॥आंदळला स्यंदन तो
॥१०५॥
महीं आदळतां दिव्य रथ ॥खालीं पडला श्रीआदित्य ॥स्यंदनीं वाजी अति होत ॥कासाविस श्वासानें
॥१०६॥
परी महीं पडतां तेजोराशिपाळ ॥महीं मातला अति अनळ ॥तेणें दाहूं पाहे सकळ ॥महीवरले उदभिज्ज
॥१०७॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥जलदास्त्र स्मरे त्वरित ॥तेणेंकरुनि अपरमित ॥जलवृष्टी होतसे
॥१०८॥
परी आदित्य पडतां निचेष्टित ॥परम घाबरले स्वर्गदैवत ॥मग विमानयानीं होऊनि त्वरित ॥मच्छिंद्रापाशीं पातले
॥१०९॥
ब्रह्मा विष्णु आणि शिव ॥वरुण अश्विनी कुबेर देव ॥सुरवर अनादि सकळ गंधर्व ॥महीलागीं पातले
॥११०॥
सत्यलोक तपोलोक ॥अतळ वितळ सुतळादिक ॥संकटीं पडला एक अर्क ॥लागवेगीं धांविन्नले
॥१११॥
जैसे सकळ तरुवरतीं ॥चहूंकडूनि पक्षी येती ॥तन्न्यायें महीवरती ॥सकळ देव उतरले
॥११२॥
मग महाराजा क्षीराब्धिजांवई ॥धांवूनि मच्छिंद्र धरिला हदयीं ॥म्हणे हा आदित्य कोण न्यायी ॥संकटी तुवां योजिल
॥११३॥
याउपरी करुनि नमस्कार ॥विष्णूतें देत उत्तर ॥म्हणे महाराजा पाशुपतवीर ॥आदित्यकुळीं असे हा
॥११४॥
ऐसें असतां यथार्थ ॥वंशजासी न पाहे हा आदित्य ॥तस्मात् वडिलांची धर्मनीत ॥ऐसेपरी असावी कां
॥११५॥
जिया मातेने बालकांचे संगोपन ॥तिया रोषाची केली पखरण ॥मग ती माता काय म्हणून ॥लावेपरी मिरवावी
॥११६॥
स्वामी सेवकां अमित्र मानी ॥मग कार्य कैचे येत घडोनी ॥सदा संशयाची गवसणी ॥उभयचित्तीं मिरवतसे
॥११७॥
तस्मात् राय पाशुपती ॥नावडे या आदित्याप्रती ॥म्हणूनि ऐसा वैकुंष्ठपती ॥चर्याभाग रचियेला
॥११८॥
आणिक एक मम वागुत्तरासी ॥साबरीविद्या कवित्वराशी ॥सूर्यनामें मंत्र उपदेशी ॥प्रसन्न असावें अर्काने
॥११९॥
याउपरी आणिक आहे चोज ॥सूर्यवंशीं विजयध्वज ॥तो पाशुपतातें श्रीराम आज ॥भेटवावा महाराजा
॥१२०॥
ऐसेपरी कामना मनीं ॥वेधली आहे चक्रपाणी ॥पाशुपतरायाचे प्रेमवदनीं ॥गुंती पावलों भक्तीनें
॥१२१॥
नवराणिवासह माझा काम ॥पूर्णते आणा मेघश्याम ॥ऐसें बोलतां योगद्रुम ॥हरी उत्तरा स्वीकारी
॥१२२॥
म्हणे बा रे योगद्रुमा ॥सूर्यनामीं मंत्र ॥जगीं होतील प्रविष्ट पवित्र ॥तैं रवकष्टानें येऊनि मित्र ॥कार्य करील लोकांचें
॥१२४॥
ऐसें बोलूनि चक्रपाणी ॥करतळा कर देत वचनीं ॥म्हणे बा रे भास्कर मंत्रालागुनी ॥वरदाता झालासे
॥१२५॥
बा रे तव मंत्र लोकोपकार ॥नामस्मरणीं होतां नर ॥तेणेंचि पातक योग भद्र ॥सकळ जनांचे मिटतील
॥१२६॥
सहज सूर्यांचे वदतां नाम ॥सकळ पातकें होतील भस्म ॥तैंशांत मंत्रप्रयोग उत्तम ॥कार्यालागीं दुणावेल
॥१२७॥
नाममंत्रयुक्त प्रयोग ॥त्यावरी तव वाणी पवित्र अभंग ॥त्याहीवरती वरद चांग ॥प्रत्यक्ष दैवतें मिरवतील
॥१२८॥
तरी बा सोळा राशी पावलें ॥सुवर्ण जडावासी गमले ॥तें भूषण मोला चढलें ॥मान्य केवीं होईना
॥१२९॥
तरी या कामा कदा आळस ॥होणार नाहीं महापुरुष ॥आम्ही सर्व देत तव वचनास ॥उतरलों आहों महाराजा
॥१३०॥
वीरभद्राचे समरंगणी ॥आणि नागपत्रअश्वत्थस्थानीं ॥तूतें ओपूनि वरदवाणी ॥तुष्ट केलें आधींच
॥१३१॥
तरी आतां संशय ॥सांडूनि अर्का जीववावें ॥याचि रीतीं देव अवघे ॥गौरविती मच्छिंद्रा
॥१३२॥
जैसे एका चंद्रांबुसाठी ॥न्याहाळिती चकोर पाठी ॥तेवीं जगलोचना दिठीं ॥सकळ देव गौरविती
॥१३३॥
मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया ॥आधीं दावीन राम काया ॥तेव्हांचि समाधान तरी राया ॥मम चित्तांत ओसंगी
॥१३४॥
ऐसी ऐकतां मच्छिंद्रवाणी ॥सौमित्रासह सगुणी ॥प्रगट झाला कोदंडपाणी ॥दशरथतनय महाराज
॥१३५॥
मग राममूर्ती प्रगट होतां ॥शिवासी आनंद वाटला चित्ता ॥जयानें राया पशुपता ॥आनंदसरिता उचंबळली
॥१३६॥
मच्छिंद्रें देखतां कोदंडपाणी ॥भावे मस्तक ओपिलें चरणीं ॥रामें प्रेमें धरुनि वक्षःस्थानीं ॥मच्छिंद्रनाथ कवळिला
॥१३७॥
पाशुपतराव भाविक पूर्ण ॥तोही वंदी श्रीरामचरण ॥राम त्यातें हदयीं धरुन ॥धन्य वंश म्हणतसें
॥१३८॥
यावरी मच्छिंद्र जोडोन दोन्ही हस्त ॥नम्रोत्तरीं स्तवूनी रघुनाथ ॥गौरवोनि रामा बोधत ॥हे रघूत्तमा महाराजा
॥१३९॥
तव नामें अनंत असती ॥तेवी त्यांत रामनाम गंगा वसती ॥सर्वात श्रेष्ठ सीतापती ॥ग्रंथामाजी निवेदिलें
॥१४०॥
त्याही ग्रंथां नाहीं भिती ॥परी तव नामें शुभ ते असती ॥तेवी माझ्या कवित्वाप्रती ॥वदनपात्रीं विराजिजे
॥१४१॥
साबरीविद्येचें अपार वचन ॥मंत्रप्रयोगीं कवित्व पूर्ण ॥जेथें येईल तुझें नाम ॥तेथे कार्य करावें समग्र त्वां
॥१४२॥
तव नामीं होतां मंत्रोच्चार ॥तें त्वां कार्य करावें समग्र लवकर ॥तरी प्रांजळ चित्तीं देवीं कर ॥मम करी ओपावा
॥१४३॥
चित्ती असेल जरी अवमान ॥तरी सज्ज करीं कां कोदंडबाण ॥माजवोनि आतां समरंगण ॥नृत्य करु रणांगणीं
॥१४४॥
श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक ॥तूं तिहीं देवांचा वरदायक ॥श्रीदत्तात्रय प्रतापार्कं ॥अवतार तिघा देवांचा
॥१४५॥
आणि नरसिंह अवतार पूर्णब्रह्म ॥ते तुज वश्य आहेत योगद्रुमा ॥तेथें मी कां नसावें साह्यार्थकामा ॥साह्य असों तुज आतां
॥१४६॥
तुझ्या मंत्री माझें स्मरण ॥होतांचि कार्य करीन ॥बावनवीरांत सबळ आचरण ॥मंत्रप्रयोगीं दावीन मी
॥१४७॥
ऐसी वदूनि वरदवाणी ॥भाष देत मच्छिंद्रपाणी ॥मग म्हणे हे योगधामी ॥मज तुज ऐक्य असे की
॥१४८॥
तूं विष्णूचा अवतार ॥जो कविनारायण महाथोर तस्मात् तुझें शरीर ॥ऐक्यत्व असें या लोकीं
॥१४९॥
ऐसें बोलोनि कौसल्यासुत ॥धन्य म्हणवूनि ग्रीवा तुकावीत ॥यावरी बोले सावध आदित्य ॥वेगें करीं तपोराया
॥१५०॥
एक मित्रावांचूनि धरणी ॥झाली असे दीनवाणी ॥तरी योगींद्रा सुखधामीं ॥मम पूर्वजां मिरवीं कां
॥१५१॥
महीं पडला अंधकार ॥देव त्रास पावले समग्र ॥सकळ जगाचा व्यवहार ॥खोळंबला तपोराया
॥१५२॥
ऐसे ग्लानी सुढाळ वचन ॥श्रीराममुखीं ऐकोन ॥तें मच्छिंद्रहदयीं अपार ॥भूषण ॥चित्तशक्तीतें मिरविले
॥१५३॥
तेणें परम आनंदघृत्ती ॥प्रसन्न झाली चित्तभगवती ॥मग वातास्त्रमंत्र देहस्थव्यक्ती ॥प्रसादातें ओपीतसे
॥१५४॥
वातयुक्त अस्त्र पूर्ण ॥मुखीं जल्पतां मच्छिंद्रयोगिजन ॥मग सुटी पावोनि वाताकर्षण ॥सुखी केला आदित्य तो
॥१५५॥
मग सावध होऊनि महीं बैसत ॥दाही दिशा न्याहाळीत ॥तों अपार दृष्टी देखूनि दैवतें ॥सकळांलागीं पाचारी
॥१५६॥
सकळ दैवतें जाऊनि तेथ ॥नमिला महाराज प्रताप आदित्य ॥यावरी विष्णूलागीं पुसत ॥क्षत्रिय कोण ऐसा आहे
॥१५७॥
कीं वासना पुन्हा परतून ॥हरुं पाहत श्यामकर्ण ॥धन्य प्रतापी प्रतापगहन ॥आजि दावीं कां मजकारणें
॥१५८॥
तरी ऐसे प्रतिज्ञें लागून ॥कीं युगानुयुगीं असें प्रसन्न ॥तरी तयाचें मुखमंडन ॥मज भेटीतें आणावें
॥१५९॥
मग मच्छिंद्रातें देव पाचारिती ॥कीं तुज बोलावीतसे गभस्ती ॥मग चंद्राख जल्पूनि उक्ती ॥दर्शना जात मच्छिंद्र
॥१६०॥
मित्र दाहक तो अति सबळ ॥म्हणूनि चंद्रास्त्र जपला मच्छिंद्रबाळ ॥तें मागें पुढें परम शीतळ ॥चंद्रास्त्रीं मिरवीतसे
॥१६१॥
त्यांत जलदास्त्राचा वर्षाव ॥होवानि होत शीतल ठाव ॥ऐसंत योजूनि सविताराव ॥जाऊनिया नभियेला
॥१६२॥
सर्वातें देखूनि मच्छिंद्रनाथ ॥धन्य धन्य ऐसें म्हणत ॥कवण नामीं असे पुसत ॥ग्राम धाम जन्मादि
॥१६३॥
मग विष्णूनें मुळापासूनि कथा ॥नामधामादि सांगितली वार्ता ॥कविनारायण महीवरता ॥मच्छिंद्रनाथ मिरवतसे
॥१६४॥
येरी म्हणे माझा अंश ॥नवनारायण असती महीस ॥तयांचा अवतार शुभ आम्हांस ॥चांगुलपर्णी वाटला हा
॥१६५॥
तरी बा रे मच्छिंद्रनाथा ॥कवण कामनीं वेधली व्यथा ॥तें मज वदूनि वरदामृता ॥प्राशन करीं महाराजा
॥१६६॥
कृत त्रेता द्वापारयुग गेलें ॥परी ऐसें नाहीं केलें ॥धन्य तुझा प्रताप असे विपूल ॥धन्य गुरु तुझा तो
॥१६७॥
येरु म्हणे कर जोडोनी ॥मम वेधली कामना मनीं ॥साबरीविद्या कवित्वकरणी ॥कृपा करुनि दाविली
॥१६८॥
परी त्यातें वरद आपुला ॥असावा ऐसें वाटतें मनाला ॥तरी कृपा करुनि वर त्याला ॥दिधला पाहिजे महाराजा
॥१६९॥
मंत्रप्रयोगी तुझें स्मरण ॥होता व्हावें दृश्यमान ॥जगाचें कार्य मंत्रसाधन ॥स्वकष्टानें मिरवावें
॥१७०॥
ऐसी ऐकतां मच्छिंद्रवाणी ॥अवश्य म्हणे वासरमणी ॥मंत्रप्रयोग स्वयें घेऊनी ॥कार्य करीन जगाचें
॥१७१॥
ऐसें वदोनि जगलोचनी ॥भाष देत करतळींवचनीं ॥यावरी पाशुपतराया बोलावुनी ॥चरणावरी घातला
॥१७२॥
सूर्यवंशीं वीर्यप्रवाह ॥वंशमालिका सगुण सर्व ॥तुष्ट केला सविताराव ॥मच्छिंद्रानें ते समयीं
॥१७३॥
वंशमालिका ऐसी ऐकून ॥संतुष्ट झाला सवितानारायण ॥मग आपुला सिद्ध वरुनि स्पंदन ॥वातचक्रा आव्हानी
॥१७४॥
येरीकडे सकळ देव ॥विमानयानीं गेले सर्व ॥आपुलालें स्थान अपूर्व ॥पाहते झाले ते वेळां
॥१७५॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥कृपें आव्हानूनि पाशुपत ॥निघता झाला करुनि तीर्थ ॥राममूर्ती वंदूनिया
॥१७६॥
आतां पुढील अध्यायीं कथन ॥चंद्रागिरि पाहिला ग्राम ॥तेथें गवरांतूनि गोरक्ष काढून ॥पुन्हा तीर्थे करील कीं
॥१७७॥
नरहरिवंशीं घुंडीसुत ॥मालू हरीचा शरणागत ॥पुढिले अध्यायीं उत्तम कर्थेत ॥निवेदील श्रोतियांसी
॥१७८॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥अष्टमाध्याय गोड हा
॥१७९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥