श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ६
मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति. १५७ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी क्षीराब्धिवासा ॥शेषशायी कमळहंसा ॥नभोदभवशोभा कमळाभासा ॥सुखविलासा रमेशा
॥१॥
हे करुणानिधे दयावंता ॥दीनबंधो दीनानाथा ॥पुढें रसाळ कवित्वकथा ॥बोलवीं की रसनेसी
॥२॥
मागील अध्यायीं रसाळ कथन ॥कीं बारामल्हार पवित्र स्थान ॥तेथें अष्टदैवत पिशाच मिळोन ॥युद्ध केलें नाथासी
॥३॥
यापरी बारामल्हार करुनि तीर्थ ॥कुमार दैवत करुनि कोकणस्थानांत ॥कुडाळ प्रांत आडूळ गांवांत ॥येऊनियां राहिला
॥४॥
तों ग्रामाबाहेर दुर्गालयीं ॥महाकाळिका दैवत आहे ॥तयाचे दर्शना लवलाहें ॥मच्छिंद्रनाथ पैं गेला
॥५॥
तें काळिकादैवत अति खडतर ॥मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ॥तें शिवहस्ताचें काळिकाअस्त्र ॥स्थापन केलें महीसी
॥६॥
त्या अस्त्रेंकरुनि दैत्य वधिले ॥म्हणोनि शिवचित्त प्रसन्न झाले ॥म्हणूनि काळिकादेवी वहिलें ॥वरदान घेई कां
॥७॥
वेधक कामना असेल चित्तीं ॥तें वरप्रदान मागें भगवती ॥येरी म्हणे अपर्णापती ॥मम कामना ऐकिजे
॥८॥
तव हस्तीं मी बहुत दिवस ॥बैसलें अस्त्रसंभारास ॥आणि जेथें धाडिलें त्या कार्यास ॥सिद्ध करुनि आलें मी
॥९॥
बहुत वृक्षांतें भंगितां क्षितीं ॥मी श्रम पावलें अंबिकाहस्ती ॥परी मातें विश्रांती ॥सुखवासा भोगू दे
॥१०॥
मग अवश्य म्हणूनि उमारमण ॥तेथें केलें तियेचें स्थापन ॥तें उग्र दैवत अति म्हणोन ॥अद्यापि आहे कलीमाजीं
॥११॥
त्या काळिकादर्शनासाठीं ॥चित्त व्यग्र होवोनि पोटीं ॥मार्ग लक्षूनि तयासाठीं ॥संचार करिता जाहला
॥१२॥
देवीप्रती करुनि नमन ॥म्हणे माय वो आश्वर्यपण ॥म्यां मंत्रकाव्य केलें निपुण ॥त्याजला साह्य होई तूं
॥१३॥
तरी माझें हस्तें विराजून ॥मम कवित्वविद्या गौरवून ॥तया ओपूनि वरदान ॥कार्या उदित होई कां
॥१४॥
ऐसें मच्छिंद्र बोलतां वाणी ॥क्षोभ चढला अंतःकरणीं ॥शिवहस्तें अस्त्रालागोनि ॥पूर्णाश्रम झालासे
॥१५॥
त्यात मच्छिंद्राचें बोलणें ॥त्या काळिकादेवीनें ऐकून ॥तेणें क्षोभलें अंतःकरण ॥प्रळयासमान जेवीं
॥१६॥
जैसा मुचकंद श्रमोनि निद्रिस्त ॥तैं काळयवन गेला तेथ ॥निद्रा बिघडतां क्रोधानळांत ॥प्रसर झाला त्या समयीं
॥१७॥
कीं प्रल्हाद पडतां परम संकटीं ॥विष्णुहदयीं क्रोध दाटी ॥प्रगट झाला कोरडे काष्ठी ॥राक्षसालागीं निवटावया
॥१८॥
तैसी काळिकाहदयसरिता ॥उचंबळली क्रोधभरिता ॥मच्छिंद्रालागीं महीसिंधुअर्था ॥मेळवूं पाहे लगबगें
॥१९॥
कीं क्रोध नोहे वडवानळ ॥मच्छिंद्र अब्धी अपारजळ ॥प्राशूं पाहे उतावळ ॥अर्थसमय जाणूनियां
॥२०॥
म्हणे नष्टा अनिष्टा पतिता ॥मी भवपाणी श्रमलें असतां ॥त्यांतचि मातें दुःखवार्ता ॥शिणवूं पाहसी पुढारा
॥२१॥
तुवां कवित्वविद्या निर्मून ॥मातें मागसी वरप्रदान ॥परी वर नोहे मजला विघ्न ॥करुं आलासी दुर्बुद्धे
॥२२॥
अरे मी आपला भोग सारुन ॥निवांत बैसलें सेवीत स्थान ॥तैं तूं मातें वरा गोंवून ॥शिणवूं पाहसी दुगत्मया
॥२३॥
तरी आतां मम लोचनीं ॥उभा न राहें जाय फिरोनि ॥नातरी आगळीक होतां करणी ॥शासनकाळ लाभसील
॥२४॥
मी शिवकरीचे अस्त्र ॥तव करीं राहीन काय विचित्र ॥कीं करीं कवळूनि नरोटीपात्र ॥भिक्षा मागे श्रीमंत
॥२५॥
किंवा पितळधातूची मुद्रिका रचिली ॥ते हिराहिरकणी वेढका घडली ॥तेवी तूतें कामना स्फुरली ॥सर सर माघारा
॥२६॥
कीं वायसाचे धवळारी ॥हंसबाळ करी चाकरी ॥तन्न्यायें दुराचारी ॥इच्छूं पाहे मम काष्ठा
॥२७॥
राव रंकाचे पंक्ती आला ॥आला परी श्रेष्ठता त्याला ॥कीं सिंधूचि कूपस्थानीं ठेला ॥नांदत कीं आवडीनें
॥२८॥
की दीपतेजाते पाहूनि वास ॥दीपतेजातें करी आस ॥तन्न्यायें शक्तिअस्त्रास ॥तंव करीं वसती प्रारब्धें
॥२९॥
आला विचारिता पांडित्यपण ॥तो अजारक्षका पुसेल कोठून ॥तन्न्यायें मूर्खा जाण ॥आलासी येथें दुरात्मया
॥३०॥
अहा प्रतापी विनतासुत ॥क्षीणचिलीट होऊनि मस्त ॥तयासीं समता करुं पाहत ॥तेवीं येथें आलासी
॥३१॥
अरे मी देव रुद्रकरी असतां ॥तंव करीं वसूं हें काय भूता ॥तूतें कांही शंका बोलतां ॥वाटली नाहीं दुरात्मया
॥३२॥
तरी असो आतां कैसें ॥येथोनि जाई लपवी मुखास ॥नातरी जीवित्वा पावसी नाश ॥पतंग दीपासम जेवीं
॥३३॥
याउपरी मच्छिंद्र म्हणे देवी ॥पतंग जळे दीपासवीं ॥परी तैसें नोहे माझे ठायीं ॥प्रताप पाहीं तरी आतां
॥३४॥
अगे मित्राबिंब तें असे लहान ॥परी प्रतापतेजें भरे त्रिभुवन ॥तेवीं तूतें दाखवून ॥वश्य करीन ये समयीं
॥३५॥
अगे प्रताप जेवीं पंडुसुतांनी ॥वायुसुतातें श्वेती दावुनी ॥अक्षयी ध्वजीं बैसवोनी ॥किर्ति केली महीवरी
॥३६॥
की अरुण मित्रापुढी जोड ॥तेवीं तूतें दावीन चाड ॥तरी दत्तपुत्र मी कोड ॥जगीं मिरवीन ये वेळे
॥३७॥
देवी म्हणे भ्रष्टा परियेसी ॥कान फाडुनि तूं आलासी ॥इतुक्यानें भयातें मज दाविसी ॥परी मी न भीं सर्वथा
॥३८॥
हातीं घेऊनि करकंकण ॥शेंदूर आलासी भाळीं चर्चुन ॥परी मी न भिईं इतुक्यानें ॥सर सर परता हे भ्रष्टा
॥३९॥
अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक ॥कीं धीवर जाण तुझा जनक ॥तरी तूं मत्स्य मीन धरुनि कौतुकें ॥निर्वाह करी बा उदराचा
॥४०॥
तरी तुज अस्त्रविद्या निपुण ॥कायसा व्हावी दारिद्रयाकारण ॥कीं अंधाचें जन्मचक्षुलावण्य ॥सर्वथा उपयोगी दिसेना
॥४१॥
कीं बहुरुपी मिरवी शूरपण ॥तरी तें खेळापुरतें निपुण ॥तें द्वंद्वजाळ सांभाळ सांभाळून ॥वेव्हार आव्हानी आपुला
॥४२॥
अरे मातें दाविसी उग्र रुप ॥दांभिका ठका महाप्रताप ॥अहंकृती मनाचें पाप ॥मनामाजी मिरवी कां
॥४३॥
तूतें वाटेल मी महाथोर ॥कीं वश्य केलीं भूतें समग्र ॥तैसा नोहे हा व्यवहार ॥शिवास्त्र मी असें
॥४४॥
उगवली दृष्टी करीन वांकुडी ॥पाडीन ब्रह्मांडांच्या उतरंडी ॥तेथें मशका तव प्रौढी ॥किमर्थ व्यर्थ मिरवावी
॥४५॥
अगा मशक धडका हाणी बळें ॥तरी कां पडेल मंदराचळ ॥तेवीं तूं मातें घुंगरडें केवळ ॥निजदृष्टीं आव्हानिसी
॥४६॥
मच्छिंद्र म्हणे देवी ऐक ॥बळीनें वामन मानिला मशक ॥परी परिणामीं पाताळलोक ॥निजदृष्टीं दाविला
॥४७॥
ऐसें ऐकतां भद्रकाळी ॥चित्तव्यवधान पडिलें क्रोधानळीं ॥मग प्रतापशिखाज्वाळामाळी ॥कवळूं पाहे मच्छिंद्रा
॥४८॥
मग परम क्रोधें त्यासी बोलत ॥म्हणे कवण प्रताप आहे तूतें ॥तो मज दावीं मशाक येथें ॥वामनकृत्यें बळी जेवीं
॥४९॥
मच्छिंद्र म्हणे बहु युद्धासी ॥मिरवलीस शिवकार्यासी ॥तें मज दावीं अहर्निशीं ॥परीक्षा घेईन मी तुझी
॥५०॥
अगा तरु वाढला गगनचुंबित ॥परी वातशस्त्रें उचंबळत ॥तेवीं तूतें तोचि पंथ ॥आज दृष्टी पडेल कीं
॥५१॥
अगे बहु जिंकिलें समरंगणीं ॥अभिमाननग वाढविला त्यांनी ॥परी प्रारब्धयोगेंकरुनी ॥छिन्नभिन्न होईल तो
॥५२॥
ऐसें ऐकतां भद्रकाळी ॥देती झाली सिंहा आरोळी ॥प्रगट होतां अंतराळी ॥ब्रह्मांड तेथें उजळले
॥५३॥
शब्द करी अति अचाट ॥कीं सहस्त्र विजूंचा कडकडाट ॥कीं अनंत अर्कउदयांत ॥महीलागीं मिरवला
॥५४॥
तें भद्रकाळी अस्त्र पूर्ण ॥येरी अस्त्र नोहे तें समयप्रदान ॥कीं देवदानवांचें मरण ॥महीलागीं मिरवतसे
॥५५॥
तें अस्त्र नोहे बोलतां वाणी ॥कीं मायाप्रळयींचा उदित अग्नि ॥सकळां शांतवूनि शून्यवदनीं ॥भक्षूनि राहे पंचभूतां
॥५६॥
ऐसी ते सकळ पूर्ण ॥कीं वासवशक्तीची भगिनी दारुण ॥पाहती झाली उर्ध्वगमन ॥तेजःपूज मिरवूनी
॥५७॥
जंव शब्द करितां अति अचाट ॥खचूनि पडती गिरिकपाट ॥वनचर पळतां न मिळे वाट ॥ठायीं ठायां दडताती
॥५८॥
अष्ट दिग्गज अष्ट दिक्पाळ ॥परम हडबडले शब्द तुंबळ ॥अति थडथडाट कांपे केवळ ॥महीलागीं मिरवतसे
॥५९॥
हेलावलें समुद्रजळ ॥हालावले सप्तपाताळ ॥मही म्हणे मी रसातळ ॥पाहीनसे वाटतें
॥६०॥
उरगनाथ सहस्त्रफणी ॥तोही उचली स्वमूर्धनी ॥वाहूं पाहे सकळा अवनी ॥रसातळ भोगातें
॥६१॥
ऐकूनि सबळ गडगडाट ॥वराह दत सांबरी नेटें ॥कूर्म पृष्ठी आपुली हाटे ॥महीलागीं देतसे
॥६२॥
ऐसें दाही दिशा झालें ॥मानव दानव सर्व गळाले ॥विकारा करुनि प्रगट वहिले ॥महीलागीं मिरवतसे
॥६३॥
सकळ झालिया हडबडाट ॥देव दचकले स्वर्गपीठ ॥सोडोनि राहोनि विमाना पेठ ॥अंतराळीं मिरवती
॥६४॥
अंतराळीं कडकडाट ॥करितां बोले मच्छिंद्रा नेट ॥म्हणे घाला येतसे अचाट ॥जीवित्व रक्षी जोगड्या
॥६५॥
तुवां व्यर्थ केली रळी ॥आतां महीची होईल रांगोळी ॥तरी तूं स्वगुरु येणें काळीं ॥स्मरणातें मिरवीं कां
॥६६॥
अगा जैसें वज्राखें करुन ॥बा नगाचे होत चूर्ण ॥तन्न्यायें तूं महीकारण ॥क्षीण करिसी जोगड्या
॥६७॥
अरे हा सकळ महीपाट ॥तो आज कालिका करी सपाट ॥तरी आतां काय पाहसी वाट ॥मिरविसी कैसा जोगड्या
॥६८॥
कीं धरा सबळ ती आंदोळली ॥यावरी तळीं भद्रकाळी ॥तरी मच्छिंद्रधान्याची पिष्टबळी ॥तां मिरवीन जोगड्या
॥६९॥
मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी ॥परी ते वृश्विककंटकाची खाणी ॥दंश करितां मजलागोनि ॥त्याला मारीन निश्चयें
॥७०॥
मग भस्मझोळी कुक्षीपुटी ॥करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥मंत्रअस्त्रातें आणोनि पोटीं ॥वासवशक्ती जपतसे
॥७१॥
मंत्रीं पाठ होतां भस्मचिमुटी ॥फेकिली तेव्हां गगनपंथीं ॥तंव ती तत्काळ वासवशक्ती ॥प्रगट झाली तेजस्वी
॥७२॥
जैसे सहस्त्र अर्क तेजाळ ॥कीं उदय पावला भडाग्निगोळ ॥काळिकाविधान तममंडळ ॥निरसावया जातसे
॥७३॥
काळिका कनककश्यपूजागीं ॥मानूनि प्रल्हाद मच्छिंद्र जोगी ॥स्तंभापरी भस्मचिमुटींत वेगीं ॥नरहरिरुपें प्रगटली
॥७४॥
कीं परम क्रोधी वडवानळ ॥भद्रकाळी ते समुद्रजळ ॥प्राशावया उतावेळ ॥गगनपंथें जातसे
॥७५॥
तें वासवास्त्र अर्क करीचें ॥भद्रकाळी अस्त्र शिवकरीचें ॥उमय ते सवार प्रतपनगरीचे ॥युद्धालागीं मिरवले
॥७६॥
कीं पाहणी पाहतां हरिहर ॥कीं एक मित्र एक चंद्र ॥वाचस्पतींचें माहात्म्य अपार ॥उशना कवि मिरवीतसे
॥७७॥
कीं एक मेरु एक मांदार ॥कीं वायु आणि वायुकुमार ॥तेवीं भद्रकाळी वासवास्त्र ॥गगनामाजी मिरवती
॥७८॥
कीं जेठियांमाजी जरासंघ ॥तया भिडला भीम प्रसिद्ध ॥कीं कपीमाजी सुग्रीव द्वंद्व ॥वालीलागी भिडतसे
॥७९॥
तन्न्यायें उभय शक्ती ॥युद्धा मिसळल्या गगनपंथीं ॥लोंबी झोंबी प्राणरहिती ॥करुं पाहती एकमेकां
॥८०॥
मग तो एकचि दणदणाट ॥झाला सबळ ब्रह्मांडस्फोट ॥विमानीं पळविती देवता वाट ॥चुकारपणीं मिरवतसे
॥८१॥
दोन्ही अस्त्रें बळवंत ॥एकमेकांतें प्रहार करीत ॥जेणें प्रहारें भयाभीत ॥दाही दिशा तैं होती
॥८२॥
परी ती काळी अस्त्रदैवत ॥तिणें ग्रासिलें वासवशक्तीतें ॥मग अति क्रूर होऊनि उन्मत्त ॥मच्छिंद्रावरी चालिली
॥८३॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥करीं कवळी भस्म चिमुटांत ॥मग एकादश शस्त्रातें ॥रुद्रमंत्र प्रयोगीं स्मरतसे
॥८४॥
जेणेंकरुनि एकादश रुद्र ॥प्रगट झाले महाभद्र ॥तेजःपुंज नक्षत्रचंद्र ॥काळिकास्त्र मिरवले
॥८५॥
तें महाप्रळयाकार ॥भयंकररुपी अनिवार ॥तें पाहतांचि काळिकास्त्र ॥मूक्तीलागी प्रवर्तली
॥८६॥
सकळां करुनि नमनानमन ॥स्तुतीस वाडोनि खणूनि रत्न ॥परम भक्ती सूक्तीचें कारण ॥श्रृंगारिलें रुद्रातें
॥८७॥
तें नवरत्नांचा सुगम श्रृंगार ॥भूषणीं मिरवितां एकादश रुद्र ॥शांत होऊनि महाभद्र ॥ऐलरुपी पावले
॥८८॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥वज्रास्त्र त्वरें प्रेरित ॥तया साह्य धृमास्त्र ॥महान्त तेवी मिरवतसे
॥८९॥
तेणेंकरुनि धुमधुमाकार ॥मावळला मित्र तारा चंद्र ॥तया संधतिं वज्रास्त्र ॥निजमस्तकीं भेदीतसे
॥९०॥
परी ती चपळ काळिका देवी ॥वज्रास्त्र धरिलें तिनें पायीं ॥आपटिती झाली शैलाद्रिमहीं ॥उत्तगदिशे कारणें
॥९१॥
तेणें घायें शैलाद्रि पर्वत ॥निमा चूर झाला नेमस्त ॥ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानांत ॥सह्याद्रि पर्वत नसेचि
॥९२॥
रामेश्वरापासूनि नेमस्त ॥आणि गुर्जरदेशपर्यंत ॥महाद्री आहे नांदत ॥पैल नसे महाराजा
॥९३॥
असो ऐसें वज्रास्त्र सरलें ॥आणि धूम्रास्त्र तें गिळिलें ॥तें पाहूनि मच्छिंद्र वहिलें ॥वाताकर्षण जपतसे
॥९४॥
तें सबळ वाताकर्षण ॥लाभले होतें मच्छिंद्राकारणें ॥जें शुक्रमंत्रपदान ॥संजीवनी लाधली
॥९५॥
कीं वसिष्ठा धेनु झाला लाभ ॥कीं तें विष्णूचें सुदर्शन मिळालें स्वयंभ ॥तेवीं देत सूक्तिकागर्भ सूक्तास्त्र मिळालें
॥९६॥
कीं यमालागीं यमन साधलें ॥कीं दमालागीं दमन लाधलें ॥तेवीं युक्ती मच्छिंद्र शोभले ॥देत सूक्तिकारत्न मिरविलें
॥९७॥
कीं वज्रास्त्रें शक्र विराजमान ॥कीं देवतां लाधलें अमृतपान ॥तेवीं दत्तानें सूतिकारत्न ॥मच्छिंद्रातें मिरविलें
॥९८॥
रत्नांत मंत्रावळी ॥देत कृपेची वरदवाळी ॥भस्मचिमुटी योजूनि ते काळीं ॥प्रोक्षितां झाला मच्छिंद्र
॥९९॥
तंव तें मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहात ॥प्रवेश होताचि वात कुंठित ॥सकळ देहाचा पै झाला
॥१००॥
तेणें देवी विकळ झाली ॥पूर्ण ॥कांहीं पळतां रानोरान ॥दचका पावती समुच्चयें जन ॥देव दानव विस्मित
॥१०३॥
असो ती आवरण अवस्था ॥महीं निचेष्टीत झाली माता ॥श्वेत नयनीं विकळ देहस्था ॥अवस्थेत मिरवली
॥१०४॥
प्राणरहित होऊं पाहे ॥मग वेगीं स्मरला उमाराय ॥ते वाग्भाट धावोनी तरुणोपाय ॥जाऊनि पोंचले कैलासा
॥१०५॥
जातांचि श्रवणद्वारीं बोभाट ॥सावध होय कैलासनाथ ॥की शिवकरींचें काळिकास्त्र अचाट ॥संकटातें पडियेलें
॥१०६॥
तो हदयीं पाहे विचारुन ॥मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन ॥मग नंदिकेश्वरीं सिद्ध होऊन ॥तया ठायीं पातला
॥१०७॥
येताचि देखे मच्छिंद्रनाथ ॥धावूनि लगबगीं अति त्वरित ॥चरणकमळीं कामनातीत ॥मूर्धकमळ अर्पीतसे
॥१०८॥
शिव उतरुनि नंदिकेश्वरीं ॥भाउकें कवळिला दशमकरी ॥भेटूनि हदय प्रेमलहरीं ॥आवळूनि धरितसे
॥१०९॥
म्हणे तान्हुल्या अति थोर ॥करुनि दाविला चमत्कार ॥मजकरींचे काळिकास्त्र ॥आजि जिंकिलें पराक्रमें
॥११०॥
नाथ म्हणे आदिनाथ ॥ही त्वत्कृपेची बोधसरिता ॥बद्रिकाश्रमीं राहूनि दत्ता ॥श्रुत केलें तुम्ही माते
॥१११॥
षण्मास महारजा रक्षूनि मातें ॥प्रसन्न रवि केला तुम्हीं दत्त ॥त्या प्रसन्न कुळाचें उदित ॥मातें ओपिलें कृपेनें
॥११२॥
शिव म्हणे वा अस्तु आतां ॥सावध करीं काळिकादैवता ॥नाथ म्हणे वरदहस्ता ॥मम मौळी स्पर्शावा
॥११३॥
माझें मागणें आहि किंचित ॥देऊनि स्वामीनीं करावें श्रुत ॥जैसा संजीवनीचे अर्थ ॥शुक्र कचा फळला असे
॥११४॥
मग सिद्ध सर्वेश वरदमौळी ॥म्हणे कोण कामना उचित झाली ॥तदनुअर्थ ये काळीं ॥लाभसी तूं वद वत्सा
॥११५॥
नाथ म्हणे पंचावन्ना ॥कवित्व करविलें सावरी सावरी पवित्रा ॥त्यातें वर देऊनि वरदपात्रा ॥काळीकास्त्र मिरवावें
॥११६॥
जैसें तव करीं बहुदिवस ॥वसूनि अमित केलें कार्यास ॥तेवीं माझे वक्त्रास ॥काळिकेनें वसावें
॥११७॥
जें जें कार्य लागे मातें ॥तदनुकार्य वाहावें सरतें ॥आणि पुढेंही मंत्रकार्यातें ॥उपयोग व्हावें जयासी
॥११८॥
ऐसें ये रीतीं वरदान्द ॥द्याल जरी प्रसन्न होऊन ॥तरी कामनासमाधान ॥निजदेही नांदेल
॥११९॥
अवश्य म्हणूनि उमारमण ॥काळिका त्वत्करीं ओपिन ॥परी या समयीं जीवित्वदान ॥काळिकेतें स्वीकारीं
॥१२०॥
यापरी मीही उमानाथ ॥त्वत्कार्यासी आहें उदित ॥ऐसें म्हणोनी करतळीं त्वरित ॥भाष घेतली मच्छिंद्रें
॥१२१॥
मग चरणी माथा ठेवूनी ॥भस्माचिमुटां घेऊनी ॥वातास्त्रमंत्रआकर्षण जपोनी ॥बोलतसे वैखरीं
॥१२२॥
पूर्णपाठ वैखरीसी होता ॥भस्मुचिमुटी फेंकी तत्त्वतां ॥तेणें हदगत होऊनि सर्वथा ॥काळिकादेवी उठली
॥१२३॥
उठूनि बैसली सावध होऊनी ॥दाही दिशा पाहे न्याहाळूनी ॥तो अकस्मात शूळपाणी ॥आपुले दृष्टीं देखिला
॥१२४॥
मग लगबगें येऊनी त्वरित ॥शिवपदीं मौळी सज्ज करीत ॥म्हणे महाराजा आदिनाथ ॥आजि जीवित्व त्वां दिधलें
॥१२५॥
जैसे होय सर्पसत्रास ॥तोही मिरविला आस्तिक त्यास ॥तेवी आज मम प्राणांस ॥रक्षिता झालासी आदिनाथा
॥१२६॥
कीं भस्मासुराच्या पवनवातीं ॥आपण पडिलां होतां व्यावृत्ती ॥तेथें रक्षणें विष्णुमूर्ती ॥कृपापात्रीं मिरविली
॥१२७॥
कीं शक्तिधातें सुमित्रासुत ॥पुढें होतां रघुनाथ ॥विकट होता हनुमंत ॥प्रसन्न त्यातें झालासे
॥१२८॥
कीं प्रल्हादाच्या कैवारासी ॥नरहरी धांवला अति उद्देशीं ॥तन्न्यायें आज तूं मजपाशीं ॥मिरवलासी कीं कृपेनें
॥१२९॥
ऐसें म्हणोनि काळिकादेवी ॥वारंवार लागे पायी ॥याउपरी म्हणे दक्षजांवई ॥मम मागणें आहे एक
॥१३०॥
देशील जरी कृपा करुन ॥तरी तुज देईन नागरत्न ॥देवी म्हणें उमारमण ॥अर्थ कोणता बोलवा
॥१३१॥
शिव म्हणे बहु दिवस ॥मम करीं विराजलीस ॥आतां येऊनि मच्छिंद्रदास ॥जगउपकारीं बसावें
॥१३२॥
हेंचि मागणें माझें आहे ॥तुवां कृपा करुनि मज द्यावें ॥हें वचन ऐकूनि महामाय ॥गदगदां हांसिन्नलीं
॥१३३॥
म्हणे महाराजा पायांपाशीं ॥मी म्हणवितें तुमची दासी ॥इतुकें गुह्य धरोनी मानसीं ॥दान मागतां हें काय
॥१३४॥
जिकडे धाडाल तिकडे जाईन ॥तुमची आज्ञा मज प्रमाण ॥इतुकें गुह्य धरोन ॥दान म्हणणें अनुचित हैं
॥१३५॥
जैसा वाचस्पती ज्ञानचाड ॥अजारक्षका पुसे कोड ॥तन्न्यायें मम प्रयुक्तीं ॥जल्पतां कीं महाराजा
॥१३७॥
कीं पीयूष मृत्युनिवारणास ॥स्तविता झाला बळीरस ॥कीं टक्याकरितां महापरिस ॥विनवीतसे धनाढ्याला
॥१३८॥
तन्न्याय अपर्णापती ॥गौप्य धरुनि करितां विनंती ॥परी हें श्लाघ्य सेवकाप्रती ॥कदाकाळीं साजेना
॥१३९॥
तरी आतां असो ऐसें ॥मान्य करीन स्वामिशब्दास ॥मग बोलावूनि मच्छिंद्रास ॥जननीं हदयीं कवळिला
॥१४०॥
म्हणे बा रे ऐक वचन ॥साबरीविद्या कविरत्न ॥जेथें येईल माझें नाम ॥तेथें साह्य मी असें
॥१४१॥
कवण अर्थी असो कैसें ॥मी प्रवर्तवूनि उच्चाराम ॥ऐसें करतल देऊनि भाष्य ॥समाधानीं मिरवलें
॥१४२॥
मच्छिंद्र आणि उमानाथ ॥देवीनें ठेवूनि तीन रात्र ॥मग स्नेहसंपन्न बोल बोलत ॥मच्छिंद्रनाथा ओडविलें
॥१४३॥
याउपरी शिवें देदीचा पाणी ॥मच्छिंद्रनाथाच्या कृपें ओपूनी ॥अति गौरवें शूलपाणी ॥स्वस्थानासी जातसे
॥१४४॥
मग मच्छिंद्र आणि उमानाथ ॥देवी बोळवूनि स्वस्थाना येत ॥शिव पावले कैलासांत ॥मच्छिंद्रनाथा भेटूनी
॥१४५॥
यापरी तेथूनि मच्छिंद्रनाथ ॥उत्तरपंथें गमन करीत ॥तो समुद्रतीरीं हरेश्वर दैवत ॥गदातीर्थी पातला
॥१४६॥
गदातीर्थी करुनि स्नान ॥येत हरेश्वरा दर्शनाकारणें ॥ते कथा वर्तेले रसाळ पूर्ण ॥पुढिले अध्यायीं वदूं आतां
॥१४७॥
शिवसुत वीरभद्र ॥महाजेठी प्रतापरुद्र ॥तयातें भेटतां नाथ मच्छिंद्र ॥समरंगणीं मिरवती
॥१४८॥
असो येऊनि त्या प्रसंगीं आतां ॥भावें पूजिली काळिका देवता ॥तरी पठणीं प्रसंग उपयोग बहुतां ॥मुष्टिनिवारणी पडेल
॥१४९॥
पुढें मंत्रपुष्टी दृष्टी ॥बाधा न करी तीर्थाचिया पाठीं ॥कुडेचेडजारणा लोटीं ॥मरणभीती बाधेना
॥१५०॥
हा अध्याय नित्य पठण करील ॥तो इतुक्या भयापासूनि सुटेल ॥आणि हा अध्याय गृहीं पाळींल ॥कधीही पीडा त्यासी न होय
॥१५१॥
आणि कोणासही जगा आंताता ॥काळीमुष्टीची बाधा होतां ॥त्यांतें प्रसंग श्रवणी पडतां ॥शम होईल ती मुष्टी
॥१५२॥
ऐसें गोरक्षाचें कथन ॥वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण ॥तरी जन हो विश्वास धरुन ॥ग्रंथ संग्रही पाळावा
॥१५३॥
हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी ॥तरी नोहे आहें अमृतसंजीवनी ॥पहा सिद्धाची वाग्वाणी ॥श्रीगोरक्षें कथियेली
॥१५४॥
तरी विश्वास धरुनि चित्ता ॥प्रचीत घ्यावी पठण करितां ॥नाहींतरी ग्रंथ उगाचि निंदितां ॥दोषामाजी पडाल कीं
॥१५५॥
याउपरी अर्थाअर्थी ॥उगेंचि निंदाल ग्रंथाप्रती ॥तयाचा निर्वश पावूनि क्षितीं ॥यमपुरीं वसे तो
॥१५६॥
तरी श्रोते भाविक जन ॥तुम्हां सांगतों एकचि वचन ॥भावविश्वासा करा रोहण ॥सकळ स्वार्थ पुरेल कीं
॥१५७॥
जे विश्वासावर स्वार झाले ॥ते सर्वस्वी तरुनि गेले ॥सत्यवचनीं जगीं मिरवले ॥संतवदनीं विश्वासुक
॥१५८॥
तरी जगामाजी धुंडीसुत ॥मालू नरहरीच्या वंशांत ॥विश्वासें झाला ब्रह्मीं व्यक्त ॥संतपदीं भावार्थ
॥१५९॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥षष्ठाध्याय गोड हा
॥१६०॥
शुभं भवतु श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार षष्ठाध्याय समाप्त ॥