श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ५
मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी. १५६ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी यदुकुळटिळका ॥भक्तिपंकजाच्या सदैव अकी ॥मुनिमानसचकोरपाळका ॥कृपापीयूषा चंडा तूं
॥१॥
भाविक प्रेमळ भक्त परी ॥तयामचा अससी पूर्ण कैवारी ॥बाळप्रल्हादसंकटावरी ॥कोरडे काष्ठीं प्रगटलासी
॥२॥
करविंशतिप्रताप सघन ॥संकटीं घातले देव तेणें ॥तदर्थ सकळ रविकुळपाळण ॥अवतारदीक्षा मिरविसी
॥३॥
देवविप्रांचें संकट पाहून ॥मत्स्यकुळातें करी धारण ॥मग उदधीतें गगन दावून ॥शंखासुर धरियेला
॥४॥
तेवींच दैत्य दुमदुमा करीत ॥अवतार कच्छ झाला मिरवीत ॥उदधी मंथूनि शंखा ॥तोषवीत ॥महाराज कृपार्णव
॥५॥
राया बळीची उद्दाम करणी ॥स्वरुप मिरवी खुजटपणी ॥संकट पडतां सुरगणी ॥फरशधर झालासे
॥६॥
अपार भक्तप्रेमा सघन ॥त्यांत स्थिरावले पंडुनंदन ॥शिशुपाळ - वक्रदंतकंदन ॥वसुदेवकुशीं मिरवला
॥७॥
असो ऐसा भक्तिप्रेमा ॥तूतें आवडे मेघश्यामा ॥तरी भावभक्तिच्या उगमा ॥पुढें ग्रंथ बोलवीं
॥८॥
मागिलें अध्यायीं केलें कथन ॥हिंगळाज क्षेत्रीं मच्छिंद्रनंदन ॥अष्टभैरव चामुंडा जिंकून ॥दर्शन केलें अंबेचें
॥९॥
तरी श्रोते सिंहावलोकनीं ॥कथा पहा आपुले मनीं ॥बारामल्हारमार्ग धरुनी ॥जाता झाला मच्छिंद्र
॥१०॥
तो बारामल्हारकाननांत ॥मुक्कामा उतरला एका गांवांत ॥देवालयीं मच्छिंद्रनाथ ॥सुखशयनीं पहुडला
॥११॥
तों रात्र झाली दोन प्रहर ॥जागृत आहे नाथ मच्छिंद्र ॥तंव काननी दिवट्या अपार ॥मच्छिंद्रनाथें देखिल्या
॥१२॥
इकडूनि जाती तिकडूनि येती ॥ऐशा येरझारा करिती ॥तें पाहूनि नाथ जती ॥म्हणे भुतावळें उदेलें
॥१३॥
तरी यातें करावें प्रसन्न ॥समय येत हाचि दिसून ॥कोण्या तरी कार्यालागून ॥उपयोगीं श्रम पडतील
॥१४॥
तरी त्यातें आतां शरणागत ॥प्रसन्न करुनि घ्यावें भूत ॥श्रोते म्हणती कार्य कोणतें ॥भूतास्वाधीन असेल कीं
॥१५॥
तरी ऐसें न बोलावें या वेळे ॥भूत श्रीराम उपयोगी आलें ॥राक्षसाचें प्रेत नेलें ॥समरंगणीं सुवेळे
॥१६॥
तेव्हां अमृतदृष्टीकरुन ॥उठवी श्येन कपिरत्न ॥तेवीं तुळसीसी प्रसन्न ॥भूत झालें कलींत
॥१७॥
तरी लहानापासूनि थोरापर्यंत ॥समयीं कार्य घडूनि येत ॥पहा अर्णवा झुरळें निश्वित ॥वांचविलें म्हणताती
॥१८॥
तन्न्यायें कल्पूनि चित्तीं ॥नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी ॥मग अंबिकाअस्त्र स्पर्शशक्ती ॥प्रेरिता झाला तेचि क्षणी
॥१९॥
तें अस्त्र प्रेरितां भूतगणीं ॥होतां स्पर्श कुरुमेदिनीं ॥मग पद घरी आंवळूनी ॥सुटका नाहीं पदातें
॥२०॥
जेवीं युद्ध कुरुक्षेत्रांत ॥मही धरीतसे कर्णरथ ॥चक्रें गिळूनि करी कुंठित ॥गमनसंधान करुं नेदी
॥२१॥
तन्न्यायें स्पर्शशक्ती ॥करी भूतपदा धरा व्यक्ती ॥चलनवलन मग त्या क्षितीं ॥कांहीएक चालेना
॥२२॥
जैसे तरु एकाचि ठायीं ॥वसती अचळप्रवाहीं ॥तन्न्यायें भूतें सर्वही ॥खुंटोनियां टाकिली
॥२३॥
तयां भूतांचें वियोगानिमित्ते ॥कीं वेताळा भेटी जाणें होतें ॥सर्व मिळोनि येतां क्षितींत ॥जमोनियां येताती
॥२४॥
तंव ते दिवशीं झाले कुंठित ॥वेताळभेटीच राहिली अप्राप्त ॥येरीकडे वेताळ क्षितींत ॥अनंत भूतें पातलीं
॥२५॥
तो दक्षभूतांचा बळी वेताळ ॥पाहे अष्टकोटी भूतावळ ॥तों न्यूनपणीं सर्व मंडळ ॥दिसून आलें तयातें
॥२६॥
मग अन्य भूतातें विचारीत ॥शरभतीरींची भूतजमात ॥आली नाहीं किमर्थ ॥शोध त्यांचा करावा
॥२७॥
अवश्य म्हणोनि पांच सात ॥गमन करिते झाले भूत ॥शरभतीरीं येऊनि त्वरित ॥निजदृष्टीं पहाती
॥२८॥
तंव ते मंडळी महीं व्यक्त ॥उभी असे बळरहित ॥जैसा एका ठायींचा पर्वत ॥दुसर्यां ठायीं आतळेना
॥२९॥
मग त्या मंडळानिकट येऊन ॥पुसते झाले वर्तमान ॥तुम्ही व्यक्त महीलागून ॥काय म्हणोनि तिष्ठलां
॥३०॥
येरी म्हणती अनेक जे भेद ॥महीं उचलोनि देतां पद ॥कोण आला आहे सिद्ध ॥तेणें कळा रचियेली
॥३१॥
मग ते पाहे कळा ऐकून ॥पर्वता चालिले शोधालागून ॥गुप्तरुपें वस्तींत येऊन ॥मच्छिंद्रनाथ पाहिला
॥३२॥
बालार्ककिरणीं तेजागळा ॥शेंदूर चर्चिलासे भाळा ॥तयामाजी विभूती सकळा ॥मुखचंद्रें चर्चिली
॥३३॥
कर्णी मुद्रिका रत्नपाती ॥कीं वस्तीत पातल्या रत्नज्योती ॥हेमगुणी गुंफोनि निगुती ॥कवरींभारीं वेष्टिला
॥३४॥
ललाट अफाट मिशा पिंगटा ॥वटदुग्धानें भरल्या जटा ॥सरळ नासिका नेत्रवाटा ॥अग्रीं समदृष्टी पहातसे
॥३५॥
अर्कनयनीं विशाळ बहुत ॥उग्रपणीं उदय दावीत ॥पाहतां वाटे कृतांत ॥नेत्रतेजें विराजला
॥३६॥
स्थूळवट बाहुदंड सरळ ॥आजानुबाहू तेजाळ ॥कीं मलविमल करुनि स्थळ ॥बहुवटीं विराजले
॥३७॥
मस्तकीं शोभली दिव्य वीरगुंठी ॥कंथा विराजे पाठपोटीं ॥त्यावरी ग्रांवेसी नेसल्या दाटी ॥ज्ञानशिंगी मिरवीतसे
॥३८॥
बाहुवटें हनुमंत ॥वीरकंकण करीं शोभत ॥कुबडी फावडी घेऊनि हातांत ॥बोधशौलिका विराजे
॥३९॥
जैसा तीव्र बारावा रुद्र ॥कीं सरळ योगियांचा भद्र ॥जैसा नक्षत्रगणीं चंद्र ॥तेजामाजी डवरतसे
॥४०॥
ऐसें पाहूनि एक भूतीं ॥मनामाजी करितां ख्याती ॥येणेंचि व्यक्त केलें क्षितीं ॥भूतगणा वाटतसे
॥४१॥
मग ते होऊनि संदेहस्थ ॥नाथासी म्हणती भूतें पतित ॥जाऊं द्या स्वामी करा मुक्त ॥आपुलाल्या कार्यासी
॥४२॥
नाथ म्हणे सर्व गुंतले ॥तुम्ही मुक्त केवीं राहिले ॥येरु म्हणे पाठविलें ॥समाचारा वेताळे
॥४३॥
तरी महाराजा करीं मुक्त ॥जाऊं द्या वेताळनमनार्थ ॥यावरी त्यांसी म्हणे नाथ ॥सोडणार नाहीं सहसाही
॥४४॥
तुमचा वेताळ आदिराणीव ॥जाऊनि त्यातें त्वरें सांगावें ॥येरु म्हणती मग अपूर्व ॥भलें नोह महाराजा
॥४५॥
वेताळ खवळता बाबरदेव ॥हे महाबळाचे असती अष्टार्णव ॥ब्रह्मांड जिंकूनि कंदुकभाव ॥महीं खेळती महाराजा
॥४६॥
नवनाग जैसे सबळी ॥तयां माजी फोडितां कळीं ॥तयांसवें कोणी रळी ॥केली नाहीं आजन्म
॥४७॥
देव दानव गंधर्व असती ॥तेही वेताळ बलाढ्य म्हणती ॥तस्मात् स्वामी तयांप्रती ॥श्रुत करुं नोहे जी
॥४८॥
येरु म्हणे संपादणी ॥येथें काय करितां दाऊनी ॥तुमचा वेताळ पाहीन नयनीं ॥बळजेठी कैसा तो
॥४९॥
ऐसी ऐकूनी भूतें मात ॥म्हणती अवश्य करुं श्रुत ॥मग जाती जेथ तो वेताळ भूत ॥तयापाशीं पातले
॥५०॥
राया वेताळासी करुनि नमन ॥सांगते झाले वर्तमान ॥म्हणती महाराजा भूतांसी विघ्न ॥जोगी एक आहे कीं
॥५१॥
तेणें खेळूनि मंत्रशक्ती ॥महीं व्यक्त केली जमाती ॥शेवटीं म्हणतो हेचि गती ॥तुम्हां करीन महाराजा
॥५२॥
ऐसें ऐकूनि पिशाचराव ॥परम क्षोभला विकृतिभाव ॥म्हणे आतां अष्टका सर्व ॥भूतावळ मेळवा
॥५३॥
मग भूतभृत्य जासूद हलकारे ॥जाते झाले देशांतरा ॥अर्बस्थान पंजाब गुर्जरा ॥बंगालादि पातले
॥५४॥
माळवी मेवाड तेलंगण ॥कर्नाटकी देश दक्षिण ॥कुंडाळ कैकाड विलंबवचन ॥सप्तद्वीपींचे पातले
॥५५॥
सकळां श्रुत करुनि गोष्टी ॥पाठविती सकळ भूतथाटी ॥अष्टराणीव एक एक कोटी ॥समारंभा पातले
॥५६॥
अष्टराणीव तयांचें नांव ॥महावीर विद्याकारणीं सर्व ॥म्हंमद म्हैषासुर धुळोवान गर्वे ॥बाबर झोटिंग पातले
॥५७॥
मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणोनि वीरांत त्याचा संचार ॥तोही एक कोटी भार ॥घेऊनियां मिळाला
॥५८॥
असो ऐसे कोटीभार ॥उतरले जैसे गिरिवर ॥महाभद्र तो आग्या वेताळवीर ॥येऊनियां पोहोंचला
॥५९॥
सकळ वेताळापाशीं येऊन ॥कथिते झाले सिद्धगमन ॥मग सकळ सांगूनि वर्तमान ॥समारंभीं चालिले
॥६०॥
येऊनि शरभतीराप्रती ॥अष्टही कोटी कोल्हाळ करिती ॥तेणें दणाणी अमराक्षती ॥आणि पाताळी आदळतसे
॥६१॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥करीं कवळी विभूतिपात ॥आराधूनि मंत्रशक्तीतें ॥लखलखीत पैं केलें
॥६२॥
स्मरणगांडीव विभूती शर ॥सज्ज करिती अति तत्पर ॥परी सर्वाचा प्रताप पहावया स्थिर ॥महीं विराजे उगलाचि
॥६३॥
परी वज्रास्त्रमंत्र जपून ॥भोवतें वेष्टिलें रेषारंगण ॥आणि मस्तकीं वज्रासन ॥वज्रशक्ती मिरवीतसे
॥६४॥
तेणेंकरुनि भूतांचा प्रवेश ॥लिप्त नोहे आसपास ॥परी भूतावळ्या स्मशानास ॥वर्षाव करिती आगळा
॥६५॥
जैशा पर्जन्याच्या धारा ॥वर्षाव करिती अपार अंबरा ॥परी वज्रास्त्र सबळ मौळिभारा ॥कदाकाळीं मानीना
॥६६॥
त्यांत अष्ट पिशाचनृपाळ ॥स्वरुपेंकरुनि अति विशाळे ॥तरु टाकिती उपटूनि बळें ॥पर्जन्यधारांसारिखे
॥६७॥
परा तें वज्रास्त्र मौळी ॥तया न गणिती तये काळीं ॥तरु संचवूनि पर्वतमौळी ॥पर्णकुटी ती जाहली
॥६८॥
ऐसा संचरतां तरुभार ॥काय करिते झाले समग्र ॥कोरडे काष्ठादि तृण अपार ॥तयावरी सांडिती
॥६९॥
सकळ करुनि महाकहर ॥सांडिते झाले वैश्वानर ॥तें पाहूनि नाथ मच्छिंद्र ॥जलदास्त्र प्रेरीतसे
॥७०॥
भूतें सांडिती वैश्वानर ॥तरु कडकडती ज्वाळपर ॥ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर ॥पक्षिकुळ जीवजंतु
॥७१॥
ऐसी पाहतां पावकथाटी ॥परी जलदास्त्रें केली दाटी ॥उदधी मिरवूनि आकाशापाठी ॥शांत केला पावक तो
॥७२॥
यापरी मच्छिंद्रनाथ ॥पावकास्त्र प्रेरिता झाला विभूतिमंत्र ॥तेणें अग्नि प्रदीप्त करीत ॥भूतगणीं मिरवीतसें
॥७३॥
परी तो दृश्य अदृश्य जाणोनी ॥प्रळयाग्नि पाहती गुप्त होऊनी ॥मग पहा उदधितोया सांडोनी ॥आकाशांत मिरवूं त्या
॥७४॥
परी तो विझेना मंत्राग्न ॥मग मच्छिंद्रें जलदास्त्र प्रेरुन ॥शांत केला द्विमूर्धन ॥अस्त्रमंत्रें करुनियां
॥७५॥
शांत होताचि मंत्राग्नी ॥महीं उतरली भूतगणीं ॥मग स्पर्शास्त्र जल्पोनी ॥भूतांगणीं कल्पीतसे
॥७६॥
तेणेंकरुनि अष्टकोटी ॥मही व्यक्त झाली एकथाटी ॥जैसी पूर्वी भूतांते राहटी ॥तेंचि झालें सर्वांस
॥७७॥
परी अष्टजन जे तयांचे नृप ॥महाबळी प्रतापदर्प ॥ते स्पर्शास्त्र न गणती माप ॥स्वबळें मिरविती
॥७८॥
परी स्पर्शास्त्रें एकचि केलें ॥अदृश्य सकळ तेज खंडूनि धरिलें ॥हें तों नेणोनि निकट आले ॥मच्छिंद्रातें आकळावया
॥७९॥
परी भोवतें आहे वज्र संपन्न ॥लाग न चाले कांहीं तेणें ॥परी परम बलाढ्य वेताळसंधान ॥निकट अंगें पातले
॥८०॥
परी भोंवते आहे वज्रास्त्र ॥तेंचि गिळूनि गेला मुखपात्र ॥हें मच्छिंद्र पाहतां अति विचित्र ॥वासवास्त्र सोडीतसे
॥८१॥
वासवास्त्र होता प्रगट ॥उभयतांची झाली झगट ॥जैसे जेठी लागूनि येत पाठ ॥लोंबी झोंबी खवळले
॥८२॥
एकमेकां महीं पाडिती ॥तेणें दणाणा उठे क्षिती ॥अष्टसमुद्र हेलावती ॥खळबळती नक्षत्रें पैं
॥८३॥
शेषमस्तकें हेलावती ॥कूर्म म्हणे त्या अति अदभुती ॥वराह सांवरुनि नेटे दंती ॥महीलागी उचलीतसे
॥८४॥
येरीकडे सप्तजन ॥कवळूं पाहती मच्छिंद्राचे चरणीं ॥कीं चरणीं धरुनि महीकारण ॥मच्छिंद्रनाथ आकळावा
॥८५॥
परी तो नाथ अति चपळ ॥पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ ॥दाही दिक्षा रक्षपाळ ॥ऐसें वज्रास्त्र मिरविलें
॥८६॥
यावरी तो दानवास्त्र जल्पून ॥दानव केले सप्त निर्माण ॥मधु तिल कुंभकर्ण ॥मरु आणि मालीमल
॥८७॥
मुचकुंद त्रिपुर बळजेठी ॥ऐसी सप्त दानवहाटी ॥साती देवतें बळजेठीं ॥लोंवी झोंबी पातले
॥८८॥
झोटिंगातें मधु झगटे ॥खेळताती कुंभक नेटें ॥बाबरातें कुंभकर्ण लोटे ॥झोटधरणी झगडती
॥८९॥
म्हंमदालागीं मरु भिडत ॥मालीमल मुंज्यातें आल्हाटीत ॥म्हैसासुर अति मुचकुंद उन्मत्त ॥त्यातें भिडतसे
॥९०॥
धुळोवान वीर समर्थ ॥त्रिपुर झगटे तया निरत ॥ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य ॥सप्तजन आल्हाटिले
॥९१॥
ऐसे भिडतां अष्टजन ॥महीं उठला अति दणाण ॥एकमेकां महीकारण ॥आकळावया ते जल्पीती
॥९२॥
एक दिन एक रात्री ॥साती जणां न विश्रांती ॥लाथा केवड हुमण्या देती ॥वर्मावर्मी जाणूनियां
॥९३॥
तेणेंकरुनि प्रहार भेदीत ॥भेदितां देह विकळ होत ॥मुष्टिप्रहारें मूर्च्छित होत ॥महीं तडती आदळोनि
॥९४॥
मग साती जणें दानवास्त्र ॥भिडतां केलें त्या जर्जर ॥मग सप्त दानव अदृश्यवर ॥होते झाले एकसरें
॥९५॥
येरीकडे वासवशक्ती ॥भिडतां प्रेमें वेताळाप्रती ॥तों संधान पाहूनि हदयस्थिती ॥वासवशक्ती भेदीतसे
॥९६॥
तेणें घायें अति सबळ ॥मूर्च्छित पडला वेताळ ॥महीं पडतां उतावेळ ॥अदृश्य झाली शक्ती ते
॥९७॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥वाताकर्पणविद्या जल्पत ॥तों सांवरोनि वेताळ मूर्च्छित ॥पुनरपि आला त्वरेनें
॥९८॥
येतां येतां सातीजणीं ॥लगट करिती निकट येऊनि ॥तों सिद्धप्रयोग वाताकर्पणी ॥मच्छिंद्राचा झालासे
॥९९॥
सिद्धप्रयोग होतां नीती ॥संचारतो अष्टदेहांप्रती ॥तेणेंकरुनि वातगती ॥आकर्षण होतसे
॥१००॥
जंव जंव आकर्षणवात होत ॥तंव हस्तपादांचें वलन राहात ॥परम क्लेश उचंबळत ॥मूर्च्छाशक्ती मिरवावया
॥१०१॥
ऐसी होतांचि अष्टमावृत्ति ॥मग एकमेकांप्रती बोलतीं ॥आतां आसडूनि अहवृत्ति ॥शरण वेगीं रिघावें
॥१०२॥
नातरी जोगी आहे कठिण ॥भूतांसह आपुला घेईल प्राण ॥तरी यातें प्रसन्न करुन ॥जगामाजी नांदावें
॥१०३॥
जैसें रामप्रसादेंकरुन ॥लंकाराणीव विभीपण ॥की वालीचे कृतीनें ॥राज्यीं मिरवला सुग्रीव
॥१०४॥
तन्न्यायें येथें करुन ॥वांचवावा आपुला प्राण ॥उपरी जीवलिया संगोपन ॥आश्रय होईल हा एक
॥१०५॥
जैसा दरिद्रियाला परिस ॥कीं चिंतामणी चिंतित्यास ॥कीं पीयूष लाभे रोगियास ॥तैसें होईल आपणासी
॥१०६॥
कीं प्रल्हादाचें नरसिंख दैवत ॥संकटीं झालें साह्यवेंत ॥तन्न्यायें आजही प्रीत ॥वाढवावी महाराजा
॥१०७॥
ऐसें बोलूनि एकमेकां ॥निश्वय करुनि नेटका ॥म्हणती महाराजा तपोनायका ॥सीमा झाली प्रतापा
॥१०८॥
तन्न्यायें सर्वज्ञमूर्ती ॥सोडवीं आम्हां क्लेशपद्धती ॥क्रोधानळें प्राणआहुती ॥योजू नको महाराजा
॥१०९॥
तरी आतां अनन्य शरण ॥आहोंत आमुचा वांचवा प्राण ॥जैसें कचा शुक्रें दान ॥संजीवनीचें पैं केलें
॥११०॥
तूं प्रत्यक्ष अससी नारायण ॥हें नेणोनि रळी तुजकारण ॥केली परी उचित घन ॥प्राप्त झालें सध्यांचि
॥१११॥
जैसा जटायु आणि संपाती ॥प्रताप दावू गेले गभस्ती ॥परी भोगदशाप्राप्ती ॥सध्यांचि झाली लाभावरी
॥११२॥
तन्न्यायें येथें झालें ॥तरी कृपेचीं बसवीं पाउलें ॥चलनवलन अवघोचि राहिलें ॥बोलणें उरलें सांगावया
॥११३॥
आतां क्षणैक करिसी आळस ॥आम्ही जाऊं परठायास ॥तेणें लाभ तव हस्तास ॥काय मिरवेल तुजलागीं
॥११४॥
तरी आमुचा वांचवावा प्राण ॥मग नाम तुझें मिरवू जगाकारण ॥सांगशील तें कार्य करुन ॥भूतांसहित येऊं कीं
॥११५॥
कीं यमें पाळिले यमदूत ॥किंवा विष्णू पुढें विष्णुगण धांवत ॥तन्न्यायें आम्ही भूतांसहित ॥तुजपुढें मिरवूं कीं
॥११६॥
हें जरी म्हणशील खोटें ॥तरी पूर्वजां बुडवू नरककपाटें ॥आणि पंचपातकें महानेटें ॥निजमस्तकी मिरवू कीं
॥११७॥
गोहत्यारी ब्रह्महत्यारी ॥स्त्रीहत्यारी बाळहत्यारी ॥मातृपितृगुरुहत्यारी ॥पंचपातकें मस्तकीं मिरवू कीं
॥११८॥
ऐशी पातकें रौरव क्षितीं ॥भोग मिरवू संवत्सरअयूती ॥यातें साक्ष चित्रगुप्ती ॥लीनमुखपदा मिरवू कां
॥११९॥
ऐसे आमुचे बोल निश्वित ॥काया वाचा धरुनि निश्वित ॥तरी आतां होई कृपावंत ॥दयालहरी मिरवावी
॥१२०॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥साबरीविद्या मम कवित्व ॥त्यातें साह्य भूतांसहित ॥कार्याथीं तुम्हीं असावे
॥१२१॥
जो जो मंत्र जया प्रकरणीं ॥तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी ॥साह्य करावें मंत्रालागुनी ॥कोणीतरी घोकिलिया
॥१२२॥
मग अष्टही म्हणती अवश्य ॥कार्य करुं निःसंशयास ॥मग साधनप्रयोग आपुला भक्ष ॥पृथक् पृथक् सांगितला
॥१२३॥
अष्टकोटी भूतावळीसहित ॥भक्षसाधन सांगितलें समस्त ॥येणें पथें कार्य जगांत ॥निश्वयें आम्ही मिरवू कीं
॥१२४॥
पूजा पुरस्कर अभ्युत्थान ॥मंत्रासहित निर्वाण ॥मंत्र उजळला स्थापूनि ग्रहण ॥पर्वणीतें नेमिलें
॥१२५॥
ऐसा निश्वय सांग होतां ॥मग बळें प्रेरकास्त्र प्रेरितां ॥समूळ नासूनि गेली वार्ता ॥आकर्षण अस्त्राची
॥१२६॥
येरीकडें अष्टकोटी भूतावळ ॥जोगिणी इत्यादि सकळ ॥स्पर्शू पाहती चरणकमळ ॥महीं व्यक्त होऊनिया
॥१२७॥
तेव्हां जल्पूनि विमुक्तास्त्र ॥मुक्त केले पिशाच सर्वत्र ॥मग मच्छिंद्रपद नमूनि पवित्र ॥सन्मुख उभे राहती
॥१२८॥
बद्धांजुळी उभय कर ॥उभे असती ते समोर ॥वाणी वदले जयजयकार ॥धन्य मच्छिंद्र म्हणोनी
॥१२९॥
मग त्या मंडळींत मच्छिंद्र ॥कैसा शोभला मूर्तिमंत ॥जेवीं नक्षत्रांमाजी तेजोमंत ॥शशिनाथ मिरवला
॥१३०॥
कीं रश्मिपालमंडळांत ॥तेजें गहिंवरला प्रभे आदित्य ॥कीं सुरवरगणी शचीनाथ ॥स्वर्गांमध्यें मिरवला
॥१३१॥
कीं शिवगण समुदायीं ॥परम शोभत नगजावई ॥कीं विष्णुगुणांत शेषशायी ॥प्रभुत्वपणीं मिरवला
॥१३२॥
कीं दानवांमाजी उशगनामूर्ती ॥कीं देवामाजी बृहस्पती ॥कीं पृतनेमाजी ऐरावती ॥देवांगणीं मिरवितसे
॥१३३॥
तेवीं पिशाचमंडळांत ॥परम शोभला मच्छिंद्रनाथ ॥मग सकळांच्या मस्तकीं ठेवूनि हात ॥म्हणे क्षेमवंत असावे
॥१३४॥
अष्टजण मुख्य नायक ॥ते बोलति बोलावून सकळिक ॥कीं मच्छिंद्र कार्य श्लोक ॥जगउपकारा वदला असे
॥१३५॥
तरी त्याचा धाक कोणीं ॥तया साह्य पिशाच असावें येऊनीं ॥सांगितलें याचें कार्य द्या करुनि ॥मंत्रोच्चार होतांचि
॥१३६॥
ऐसें ऐकोनियां भूतें ॥अवश्य म्हणती जोडोनि हात ॥यावरी बोलें मच्छिंद्रनाथ ॥आणिक वर मज द्यावा
॥१३७॥
तुमचें आमुचें समरांगण ॥झालें सबळ बळेंकरुन ॥त्या समरांगणाचें कथन ॥लोकीं ऐसें मिरविलें
॥१३८॥
तरी तें आख्यान वाचितां ॥तया न करावी बाधा सर्वथा ॥आणि हें आख्यान संग्रहीं पाळितां ॥प्रिय मानावा तो पुरुष
॥१३९॥
त्यासी जरी संकट येतां ॥निवारण करावें तुम्हीं सर्वथा ॥आणि आपुलेकडूनि सहसा व्यथा ॥जाणूनि त्या पुरुषा करुं नये
॥१४०॥
हें आख्यान राहे जया सदनीं ॥तेथें बसूं नयें सहसा भूतांनी ॥जैसें भाद्रपदशुद्ध चतुर्थीदिनीं ॥चंद्रालागीं न देखती
॥१४१॥
कीं अविंघ जेवीं का सूकर ॥की श्वान मानिती अशुद्ध विप्र ॥अस्पर्श होतां व्यथा किंचित ॥होणार नाहीं भूतांची
॥१४३॥
यावरी प्रशस्तपणें राहन ॥जरी त्या सदना आलें विघ्न ॥तयाचें करावें निवारण ॥सकळ भूतें मिळोनियां
॥१४४॥
आणि तया घरचें मनुष्य व्यर्थ ॥जरी भेटलें जातां मार्गात ॥तरी मार्ग सोडूनी निश्चित ॥दूर मार्ग बैसावें
॥१४५॥
हें आख्यान जो पाळिता ॥त्यासी कदाकाळी न करावी व्यथा ॥हेंचि द्यावें मज सर्वथा ॥कृपा धरुनि सर्वांनीं
॥१४६॥
ऐसी ऐकूनि मच्छिंद्रउक्ती ॥आवश्य करुं सकळ म्हणती ॥त्या सदनातें व्यथा निश्चितीं ॥आम्ही न करुं महमाही
॥१४७॥
ऐसें वदूनि वरदभूत ॥नमिता झाला मच्छिंद्रनाथ ॥सर्व नमूनि पुसून त्यातें ॥स्वस्थानातें चालिलें
॥१४८॥
अष्टकोटी पिशाचांसहित ॥अष्ट विराजे मुख्य दैवत ॥तेंही नमूनि मच्छिंद्राप्रत ॥स्वस्थानासी पै गेले
॥१४९॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर ॥पाहता झाला बारामल्हार ॥तेथीचा विधी करुनि सर्व ॥कुमारी दैवतां चालिला
॥१५०॥
तैसीच पावे कालिका भवानी ॥ते कथा पावेल मच्छिंद्रालागुनी ॥ते पुढिले अध्यायीं अवधान देऊनी ॥कथा श्रोते स्वीकारा
॥१५१॥
अहो ह्या कथासारग्रंथास ॥परिकर पंचम अध्याय घोकिल्यास ॥पिशाचबाधा तयासी खास ॥होणार नाही सहसाही
॥१५२॥
जरी पहिलां बाधा असेल ॥तरी तो पठण करितां जाईल ॥प्रथम अध्याय जो घोकील ॥त्याचा अंगारोग जाईल कीं
॥१५३॥
दुसरा अध्याय घोकिल्यापासून ॥विद्याभ्यास होईल पूर्ण ॥तिसरा अध्याय घोकितां प्रसन्न ॥होईल अंजनीसुत तयांतें
॥१५४॥
चवथा अध्याय घोकिता फळ ॥कार्यं निवटील परम सकळ ॥मान्याता देईल महापाळ ॥मौन पडेल सर्वातें
॥१५५॥
असो ऐसे पंचम प्रसंग ॥मंत्रसंजीवनी अनुराग ॥धुंडीसुत मालूजी सांग ॥वदे नरहरीकृपेकरुनियां
॥१५६॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥पंचमाध्याय गोड हा
॥१५७॥
श्रीकृष्णार्पंमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयर्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ नवनाथभक्तिसार पंचमोध्याय समाप्त ॥