श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ३७
नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट. १८८ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंकजाक्षा ॥आदिपुरुषा सर्वसाक्षा ॥अव्यक्तव्यक्ता सर्वपरीक्षा ॥महादक्षा रमावरा
॥१॥
मागिले अध्यायीं कथन ॥करविलें वटसिद्धनागनाथजन्म ॥उपरी सिद्धकळा पावून ॥कोल्हापुरीं पातला
॥२॥
तेथें राहूनि लक्ष्मीआलयांत ॥पुजारी करुनि हस्तगत ॥सर्व सामग्री ओवरींत ॥ऊनियां दाखविली
॥३॥
दाखवूनि म्हणें पुजार्यां सी ॥सबळ पडल्या कनकराशी ॥तरी ह्या सरतील ज्या दिवशीं ॥तंववरी संतर्पण योजावें
॥४॥
योजावें तरी अन्यवर्ण ॥कांहींच धरुं नये भिन्न ॥सकळांलागीं करुनि पक्कान्न ॥पंक्तीतें वाढावें
॥५॥
गांवामाजी सकळांकारणें ॥पेटूं न द्यावा पाकीं अग्न ॥द्विवेळा त्रिवेळा घालूनि भोजन ॥तुष्ट करावें सकळातें
॥६॥
शेट सावकार राजा रंक ॥सकळांसी आणूनि ओपावा पाक ॥अंत्यजादि भुदेव लोक ॥तुष्ट करावें सर्वांसी
॥७॥
ऐसें सांगूनि पुजार्याातें ॥शीघ्र कामाठी आणवीत ॥कार्ययोगें अपरिमित ॥सकाम कामीं योजिले
॥८॥
उत्तम तिथी नेम करुन ॥मांडव मंडप उभारुन ॥पाकालागीं सज्ज करुन ॥सर्व काम चालविलें
॥९॥
मग शिष्टाशिष्ट गृहीं धाडून ॥तया दिधलें आमंत्रण ॥येरीकडे पाक निर्माण ॥करावया लाविलें
॥१०॥
आणि ग्रामद्वारीं टिळा लावून ॥भोजनदवंडी ग्रामीं पिटून ॥सर्व सामग्री सज्ज करुन ॥काम चालीं चालविलें
॥११॥
शैव श्रावक आणि ब्राह्मण ॥भेद चौर्याटयशीं देशांसमान ॥देवाग्नी विप्र ऋषि ब्राह्मण ॥पाक भिन्नभिन्न निर्मिती
॥१२॥
पंच द्राविड देश मुलतानी ॥मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी ॥हुसेनी पौंड्र मिळोनी ॥देशजाती मिळाल्या
॥१३॥
असो भेदाभेद अन्यजाती ॥षड्र मार्गानीं पाकविती ॥खाज्या करंज्या कचुर मालती ॥शिरा बुंदी करिताती
॥१४॥
पुरी पोळी क्षिप्रा बहुत ॥चमचमीत भाज्या वरणभात ॥पंचमधु त्यांत अपार घृत ॥इच्छेसमान मिरवलें
॥१५॥
असो पाकाग्नि सिद्ध करुन ॥चालते पंक्तीं सेविती अन्न ॥पुन्हां क्षुधा लागल्या परतून ॥येऊनि अन्न सेविती
॥१६॥
प्रथम पाक जातजाती ॥तेथें नसे कांहीं अरुती ॥कितीक वाढूनि गृहासी नेती ॥भोजन करुनि मन माने
॥१७॥
कोणी कोरडेंचि उपटूनि नेती अन्न ॥नेऊनि भरिती आपुलें सदन ॥मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न ॥सर्व झालें गांवांत
॥१८॥
राव रंक कुटुंबासहित ॥अन्न सेवूनि होती तृप्त ॥मग वन्ही इतुका दीपानिमित्त ॥गृहोगृहीं मिरवला
॥१९॥
असो यापरी एक मास ॥ग्राम सेवी सिद्धअन्नास ॥यावरी कथा अत्रिसुतास ॥कैसी वर्तली ती ऐका
॥२०॥
प्रथम दिनीं भिक्षेकारण ॥गांवांत संचरे अत्रिनंदन ॥कुश्वितरुपी विरुपवान ॥भिक्षा मागे गृहोगृहीं
॥२१॥
तंव ते घरोघरींचे जन ॥म्हणती गांवांत प्रयोजन ॥होतें तेथे आम्हां जाणें ॥कुटुंबादि भोजना
॥२२॥
तरी तूं सत्वरगती ॥जाऊनि सारी कां आपुली भुक्ती ॥व्यर्थ शीण कासायाप्रती ॥वाईट कदन्न इच्छूनी
॥२३॥
उत्तम पक्क अन्न टाकून ॥व्यर्थ कां शिणसी दरिद्रवान ॥कामधेनूचे कासे आनन ॥कांडणकोंडा कां भक्षावा
॥२४॥
कीं कल्पतरु बैसल्या ठायीं ॥इच्छेसमान पदार्थ देई ॥मग कां शिणावें धांवूनि पायीं ॥मेळवावया भुक्तीते
॥२५॥
परीस असतां गृहालागून ॥मच चाकरी कासया करावी हेमाकारण ॥भाग्यें आतुडतां पीयुषपान ॥मग वल्लीरसायण कां इच्छावें
॥२६॥
तेवीं तूं प्रकरण करिसी येथें सोडूनि सुधारसअन्नातें ॥कदन्नाकरितां या गांवात ॥हिंडतोसी मतिमंदा
॥२७॥
येपरी असों आम्ही गृहासी ॥भोजना जातों आम्ही कुटुंबेंसीं ॥पाक करावा कवणें अर्थेसीं ॥तुजलागीं ओपावया
॥२८॥
ऐसीं घरोघरीं भाषणें ॥होती दत्तात्रेयाकारणें ॥मग मनांत म्हणे प्रयोजन ॥जाऊनि पाहूं निजदृष्टीं
॥२९॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥तेथें पातला तपोनाथ ॥उभा राहूनि पाकशाळेंत ॥पाक लक्षांत आणीतसे
॥३०॥
तंव तो महाराज योगकारण ॥देखतां ओळखी सिद्धिअन्न ॥थोडें करितां नगसमान ॥होय अपार न पचवितां
॥३१॥
एक पोळी पडतांचि लागली ॥परी सहस्त्रही वाढियेली ॥ऐशा चिन्हें ओळखिली ॥सिद्धिकळा महाराजें
॥३२॥
मग तेथींच्या जनालागीं पुसत ॥हें प्रयोजन एवढें कोण करीत ॥येरु म्हणती महासमर्थ ॥वटसिद्धनागनाथ करितो कीं
॥३३॥
ऐसें ऐकोनि अत्रिसुत ॥खूण जाणली स्वचित्तांत ॥कीं म्यां मुलासी सिद्धपदार्थ ॥काशीक्षेत्रीं ओपिले
॥३४॥
तरी त्याचें नांव होतें यथार्थ ॥वटसिद्धनागेश नागनाथ ॥तरी तोचि काय आहे तेथें ॥मोठेपणा मिरवावया
॥३५॥
त्यासी वर्षे लोटली वीस ॥तरी झाला असेल स्थूळ देहास ॥तरुणपणीं महंतीस ॥वाढवावया टेकला
॥३६॥
टेकला परी मजकारणीं ॥गोचर व्हावें ही इच्छा मनीं ॥या गांवींचें संधान धरुनी ॥संतर्पण मांडिलें
॥३७॥
हें गावीचें भिक्षास्थान ॥भ्रष्ट करावें सिद्धिअन्न ॥सकळ गांवींचा पाक वर्जून ॥केला अर्थ मजकरितां
॥३८॥
तरी आतां असो कैसें ॥आजिचा दिन करुं उपवास ॥ऐसें योजूनि स्वचित्तास ॥स्वामी तेथूनि चालिला
॥३९॥
चालिला परी आणिक जन ॥पाचारिती बाळाकारण ॥आपण जावें भोजन करुन ॥तूं ऐसा कां जातोसी
॥४०॥
ऐसें म्हणोनि हातीं धरिती ॥पुन्हां पाकशाळे आणिती ॥परी तो नायके योगपती ॥गांवामाजीं संचरे
॥४१॥
मग कणधान्याची भिक्षा करीत ॥लोक पुसतां त्यांतें वदत ॥कीं आमुचा नेम भिक्षारहित ॥अन्न सेवीत नाहीं जी
॥४२॥
ऐसें वदूनि सकळ लोकांत ॥शुष्क अन्न मागूनि घेत ॥काशीक्षेत्रीं जाऊनि त्वरित ॥भोजनातें सारीतसे
॥४३॥
ऐसें रीतीं एक मास ॥लोटूनि गेला सहजस्थितीस ॥परी नागनाथ स्वचित्तास ॥विचार करितां पैं झाला
॥४४॥
म्हणे लोटला एक मास ॥स्वामी न दिसे आम्हांस ॥मग बोलावूनि ग्रामस्थांस ॥पुसतां झाला महाराज
॥४५॥
म्हणे गांवात कोणी येत ॥अतिथ आहे भिक्षावंत ॥तंव ते म्हणती सिद्धनाथ ॥एक अतिथ येतो की
॥४६॥
तो येथींचें तुमचें अन्न ॥न सेवी मागतो भिक्षाकदन्न ॥आम्ही पुसतां म्हणतो नेम ॥माझा ऐसा आहे कीं
॥४७॥
आम्ही सारितो येथें भोजन ॥म्हणोनि न मिळे त्या पक्कान्न ॥यास्तव कोरडे मागूनि धान्य ॥नेत आहे महाराजा
॥४८॥
ऐसें बोलतां सकळ ग्रामस्थ ॥त्यांसी म्हणे नागनाथ ॥मागूं येतील जे गांवांत ॥करा श्रुत मजलागीं
॥४९॥
त्यांसीं कांहीं न टाकून ॥श्रुत करावें मजकारण ॥मग मी जाऊनी ग्लानित वचनें ॥भोजन घालीन तयांसी
॥५०॥
परी आणिक एक अर्थ ॥कोरडें अन्न न्या गृहांत ॥येरु येईल जंव भिक्षेतें ॥तेंचि अन्न वाढावें
॥५१॥
त्याणंर हें अन्न घेतल्या पदरीं ॥मग प्रयोजन आहे सांगा यापरी ॥न घेई मग तुम्ही येऊनि झडकरी ॥श्रुत करा मजलागीं
॥५२॥
ऐसें पांच पन्नासांसी ॥नाथें सांगितलें भाविकांसी ॥जे कदाकाळी कार्यासी ॥ढळणार नाहींत निश्चयें
॥५३॥
ऐसें सांगूनि सिद्धिअन्न ॥त्यातें दिधलें वस्त्रीं बांधून ॥मग आपुल्या गृहीं जाऊन ॥वाट पहात बैसले
॥५४॥
तों श्रीदत्तात्रेय अत्रिसुत ॥भिक्षेसी आले अकस्मात ॥तंव ते सिद्धिअन्न घेऊनि हातांत ॥सन्मुख येती घालावया
॥५५॥
म्हणती महाराजा आम्ही दीन ॥आमुचें गृहीं कैचें अन्न ॥परी नागनाथ ॥कृपा करुन ॥देतो अन्न आम्हांसी
॥५६॥
तरी त्या भिक्षेंत भिक्षा चोज ॥तुम्हां वाढावें धर्मकाज ॥ऐसें बोलती तें सहज ॥श्रुत कराया दत्तासी
॥५७॥
परम चतुर विचक्षण ॥परीक्षा घेती श्रुत करुन ॥परी तो त्रैदेवांचा अंश हें ऐकून ॥भिक्षेतें आकळेना
॥५८॥
मागें पाऊल तत्काळ ठेवून ॥जात होय अत्रिनंदन ॥मग तें आपुलें गृहीचें अन्न ॥घेऊनियां धांवती
॥५९॥
म्हणती महाराजा नागनाथाचें अन्न ॥आपणा न वाटे चित्तीं प्रसन्न ॥तरी आमुचे कष्टा चित्त देऊन ॥विन्मुख होऊं नका जी
॥६०॥
ऐसें सांगूनि भिक्षा देती ॥तो घेत नाहीं प्रांजळ चित्तीं ॥मग लगबगें हेर जाती ॥श्रुत करिती नाथासी
॥६१॥
नाथासी होतां श्रुत मात ॥शीघ्र चपळत्वें येत धांवत ॥निकट येतां हस्तसंकेतें ॥हेर दाविती तयासी
॥६२॥
तोही हस्तसंकेतखुणें ॥अत्रिसुताच्या निकट जाऊन ॥प्रथम करें कर कवळून ॥चरणीं माथा ठेवीतसे
॥६३॥
म्हणे महाराजा योगपती ॥माय तूं माउली दयाळ कितीं ॥तरी डावलूनि पाडसाप्रती ॥गुप्त कैसा विचरसी
॥६४॥
मज करुनियां निढळवान ॥दैन्यवंत बहुत काननीं ॥तेथें सांडूनि निष्ठुरपणीं ॥जासी कैसा वो माये
॥६५॥
मज बाळपणी आपुलें चोज ॥दावूनियां तपोभोज ॥गेलासी टाकूनि महाराज ॥मागें दृष्टि न करितां
॥६६॥
तरी मी सखया तुजबांचुनी ॥पडलों आहे घोर वनीं ॥मार्ग लक्षितां सूक्ष्मनयनीं ॥प्राण कंठीं उरला असे
॥६७॥
जैसा चातक दृष्टीकरुन ॥वाट पाहे अंबुद सघन ॥कीं उखली हरिणीलागून ॥वाट पाहे पाडस
॥६८॥
वीस संवत्सर गेला काळ ॥परी चिंतावन्ही दाही तळमळ ॥तैं शांत करावया जळ ॥तुझें कांहीं दिसेना
॥६९॥
आपावेगळी आपमासोळी ॥तेवीं तव भेटी जीव तळमळी ॥परी माये त्वां हदयगतकमळीं ॥निष्ठुर कैसें सांठविलें
॥७०॥
ऐसें म्हणोनि आरंबळत ॥नेत्रअश्रूंनी पाद क्षाळीत ॥म्हणे अंतर देऊनि मातें ॥गेलासी कैसा महाराजा
॥७१॥
ऐसी वदूनि ग्लानित वाणी ॥पूर लोटवी नेत्रजीवनीं ॥मग त्रयदेव परीक्षानयनीं ॥अंतरातें ओळखी
॥७२॥
चित्तीं म्हणे प्रांजळवंत ॥तापे तापला आहे नाथ ॥मग मस्तकाखाली घालूनि हस्त ॥उठविलें महाराजें
॥७३॥
प्रेमस्नेहें कवळूनि पाणी ॥हदयीं कवळीला प्रेमेंकरुनी ॥वामहस्ते कवळुनि मूध्नी ॥नेत्रअश्रु पुसीतसे
॥७४॥
मग धरुनि शीघ्र हस्त ॥नेत स्वामी एकांतांत ॥कृपें मौळीं ठेवूनि हस्त ॥कर्णी मंत्र ओपीला
॥७५॥
देऊनि स्वमुखें आत्मखून ॥केला ब्रह्मपरायण ॥अपरंपार अज्ञानपण ॥मुळाहूनी नाशिलें
॥७६॥
ऐसी होतां ब्रह्मस्थितकोटी ॥तत्काळ गुरुकृपें पडली दृष्टी ॥जैसें अभ्र वितुळतां शेवटीं ॥सुढाळ अर्क दिसतसे
॥७७॥
तेवीं पाहतां दत्तस्वरुप ॥मग उचंबळला आनंदकूप ॥अहा म्हणोनि बाप बाप ॥पदीं मौळी अर्पीतसे
॥७८॥
मग परम प्रिय अत्रिनंदन ॥कीं घेतला स्नेहेंकरुन ॥करे मुख कुरवाळून ॥मागील कथा निवेदी
॥७९॥
आविर्होत्र नारायण ॥आहेसी बा तूं महीकारण ॥उरगीकुशीं विधिवीर्यवान ॥जन्म तुझा होय बा
॥८०॥
तरी ही ऐसी मूळकथा ॥मज आतुडली हदयीं शोधिता ॥म्हणूनि बाळा तुझ्या हाता ॥सिद्धिकळा ओपिली
॥८१॥
तरी तुज भेटी द्यावयाकारण ॥इच्छित होतें माझें मन ॥परी प्रारब्धयोगें करुन ॥आजि घडूनि आलें बा
॥८२॥
जें प्रकरण समयोचित ॥लोहचुंबका भेटी होत ॥कीं समुद्रक्षारऐक्यवंत ॥नगआवळी होतसे
॥८३॥
तेवी बापा तुज मज भेठी ॥झाली प्रारब्धयोगंकाठीं ॥ऐसें म्हणोनि हदयपुटीं ॥नाथालागीं धरीतसे
॥८४॥
मग उभय प्रतापवंत ॥निघतां सांडूनि ते एकांत ॥ग्रामाबाहेर निघोनि त्वरित ॥काशीक्षेत्रीं चालिले
॥८५॥
चालिले परी ऐसें रीती ॥यानमंत्र प्रयोगी विभूतीं ॥नाथभाळीं चर्चुनि निगुतीं ॥गमन दोघे करिताती
॥८६॥
मग पवनवेंगाचे गमन थकिता ॥वाटे ऐसे गमती उभयतां ॥लवतां नेत्रपातिये पातां ॥काशीक्षेत्रीं पातले
॥८७॥
तेथे कांहींसे टेंकूनि क्षण ॥सारिला आपुला नित्यनेम ॥मग बद्रिकेदार चित्तीं धरुन ॥गमन करिती त्या मागें
॥८८॥
भाळीं प्रयोग दिव्य विभूती ॥यानरुपाची महाशक्ती ॥क्षणें बद्रिकाश्रमाप्रती ॥जाऊनिया पोंचलें
॥८९॥
संचार करिती शिवालयांत ॥प्रत्यक्ष झाला उमाकांत ॥मग प्रेमआवडीं उभवूनि पर्वत ॥एकमेकां भेटती
॥९०॥
यापरी तो उमाकांत ॥श्रीदत्तातें विचारीत ॥दुसरा कोण आहे भृत्य ॥मेळविला सेवेसी
॥९१॥
ऐसें बोलतां अनसूयासुत ॥म्हणे महाराजा नाम या नागनाथ ॥आविर्होत्र प्रतापवंत ॥नारायण अवतार
॥९२॥
ऐसें बोलतां उमारमण ॥दत्तासी म्हणे ऐक वचन ॥यातें सद्विद्या अभ्यासून ॥नाथपंथीं मिळवावा कीं
॥९३॥
मग अवश्य म्हणोनि अत्रिसुत ॥राहता झाला षण्मास तेथ ॥सांगूनि सकळ अस्त्रविद्येप्रत ॥चवदा कळा चौसष्टी
॥९४॥
उपरी नागपत्रीं अश्वत्थीं नेऊन ॥केलें सकल सिद्धार्थ साधन ॥उपरी बद्रिकाश्रमीं जाऊन ॥तपालागी बैसविलें
॥९५॥
नाथदीक्षा तत्काळ देऊनी ॥उन्मनी मुद्रा लेववी कानीं ॥शिंगी शैली सिद्ध करुनी ॥नाथालागीं ओषिली
॥९६॥
असो ऐशा दीक्षारुपें ॥द्वादश वर्षे केलें तप ॥मग स्वर्गदेव मेळवूनि अमूप ॥वरालांगीं दीधलें
॥९७॥
मावदें करुनि देदीप्यमान ॥तुष्ट करुनि स्वर्गीचें जन ॥बोळविलें स्थानोस्थान ॥नाथा वर देऊनियां
॥९८॥
यावरी पुढें तो अत्रिसुत ॥नागनाथा बोळवीत ॥म्हणे बा रे महीचें तीर्थ ॥सांगोपांग करीं कां
॥९९॥
तीर्थे अति मळीण ॥तयांचा मळ सांडिती संतजन ॥तस्मात् बा रे तीर्थाटन ॥संतमेळीं करीं कां
॥१००॥
मग अवश्य म्हणूनि नाथ प्रेमळ ॥वंदूनि श्रीगुरुचें पदकमळ ॥तीर्थे कराया उतावेळ ॥महीवरी संचरला
॥१०१॥
अत्रिसुत गेला गिरनारपर्वतीं ॥येरीकडे नागनाथ जती ॥तीर्थे करीन नाना क्षिती ॥क्षिती बालेघाटीं पातला
॥१०२॥
तेथें पाहूनि शुद्ध कानन ॥वस्तीसी राहिला मनोधर्म ॥परी तो प्रतापी तपी सघन ॥गांवोगांवीं समजला
॥१०३॥
मग अपार लोक येती दर्शना ॥दिवसानुदिवस वाढे महिमा ॥मग भक्तिपुरस्करांची वाढली महिमा ॥तुम्ही येथेंचि वस्ती करावी
॥१०४॥
मग अपार धर्म करुन ॥वस्तीसी राहिले अपार जन ॥वडवाळ ऐसें ग्राम नाम ॥नागनाथें ठेविलें
॥१०५॥
यापरी कोणे एके दिवशीं ॥मच्छिंद्र आला त्या ठायासी ॥सहज राहता झाला वडवाळासी ॥नाथकीर्ती ऐकिली
॥१०६॥
म्हणोनि मच्छिंद्र दर्शना जात ॥तो मठद्वारीं येऊनि त्वरित ॥सदृढ चालतां द्वाराआंत ॥स्वशिष्यांनीं हटकिलें
॥१०७॥
म्हणती नाथबोवा ऐका वचन ॥पुढें नका करुं गमन ॥श्रीनागनाथातें सांगून ॥तुम्हां नेऊं दर्शना
॥१०८॥
तयाच्या परवानगीवांचून ॥होत नाहीं कोणाचें गमन ॥तस्मात् थांबावें एक क्षण ॥आम्ही विचारुनि येतों कीं
॥१०९॥
ऐसें मच्छिंद्रें ऐकता वचन ॥कोपानळीं चढलें मन ॥चित्तीं म्हणे हा संतजन ॥कैंचा राववत दिसतसे
॥११०॥
देवद्वार साधुद्वार ॥मुक्त असावें निरंतर ॥तरी कपटपणींचा संत वेव्हार ॥संग्रहातें न ठेविती
॥१११॥
तरी येथें आहे बंड ॥जग भोंदावयाचें केले प्रचंड ॥तरी शिक्षा आतां उदंड ॥दाखवावी या नरा
॥११२॥
ऐसें क्रोधें चित्तीं आणून ॥त्या शिष्यांसी केलें ताडण ॥ताडण करितां बहुत जन ॥सप्तशत शिष्य धांवले
॥११३॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ ॥स्पर्शकळा त्वरें प्रेरीत ॥तेणें झाले महीव्यक्त ॥सातशें शिष्य सकळिक
॥११४॥
महीव्यक्त सकळ होतां ॥नाथमुखवटा ताडण ॥करितां ॥तंव ते आरंबळती आक्रोशवंत ॥एक आरडा उठला
॥११५॥
तों येरीकडे मठांत ॥सदा ध्यानीं भरुनि नागनाथ ॥कोल्हाळ आरडा ऐकूनि प्रांजळवंत ॥देहावरी पातला
॥११६॥
ध्यान भंगिले कोल्हाळेंकरुन ॥तेणे कोपानळीं पेटलें मन ॥मग उपरी वरी शीघ्र जाऊन ॥निजदृष्टीं पहातसे
॥११७॥
तैं सातशें शिष्य महीव्यक्त ॥झाले ते चलनवलनरहित ॥एकटा तया गणीं नाथ ॥मुखावरी मेदीतसे
॥११८॥
ऐसें नागनाथें पाहून ॥अत्यंत कोपला कोपानळानें ॥म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन ॥परी भ्रष्टबुद्धी आहे कीं
॥११९॥
शांति क्षमा दया पूर्ण ॥पाळिजे साधूचें हेंचि लक्षण ॥स्वप्नामाजी तीव्रपण ॥ठेवूं नये निजवृत्तीं
॥१२०॥
तरी हा यातें नाहीं योग्य नाथ ॥नाथपंथा लाविला डाग ॥कोणता साधू होता मांग ॥उपदेशिलें ऐशासी
॥१२१॥
तरी यातें शिक्षा करुन ॥दीक्षा घ्यावी हिरोन ॥ऐसें कोपोंचि जल्पून ॥धुनीभस्म कवळिलें
॥१२२॥
प्रथम गरुडबंधनविद्या जल्पून ॥स्वर्गी गरुडाचें केलें बंधन ॥सकळ नुरे चलनवलन ॥स्वर्गी व्यक्त केला असे
॥१२३॥
मग विभक्तास्त्र जल्पून ॥शिष्य मुक्त केले महीकारण ॥मुक्त होतांचि सकळ जन ॥नाथपृष्ठीं दडाले
॥१२४॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ ॥म्हणे चूर्ण करावे हे समस्त ॥मग जल्पूनि अस्त्रपर्वत ॥महानग निर्मिला
॥१२५॥
तो पर्वत विशाळपणीं ॥येता झाला पंथगगनीं ॥तें नाथें पाहूनि नयनीं ॥शक्रवज जल्पिलें
॥१२६॥
मग तो शीघ्र पाकशासन ॥अंतराळीं वज्र देत सोडून ॥तेणें पर्वत झाला चूर्ण ॥मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला
॥१२७॥
मग जल्पूनि वाताकर्षण ॥शक्र पाडिला महीकारण ॥वज्रकाळीविद्या जल्पून ॥वज्रालागीं निवटिलें
॥१२८॥
तें पाहूनियां नागनाथ ॥मनीं क्षोभला अति अदभुत ॥मग वातप्रेरक विद्या त्वरित ॥मेघास्त्रावरी टाकिली
॥१२९॥
तेणें शक्र सावध होऊन ॥पळूं लागला भयेंकरुन ॥म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण ॥आपुलें काम नसे येथें
॥१३०॥
ऐसें म्हणोनि भयस्थित ॥शक्र स्थाना पळूनि जात ॥येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥काय करितां पैं झाला
॥१३१॥
मग वासवशक्ति अति दारुण ॥जल्पूनि मंत्रप्रयोगानें ॥सिद्ध करुनि देदीप्यमान ॥नागेशभागा पाठविली
॥१३२॥
परी ती शक्ति महादारुण ॥सहस्त्रमित्रतेजेंकरुन ॥प्रलयकाळींचा जैसा अग्न ॥शब्द करीत येतसे
॥१३३॥
शब्द करितां कडकडाट ॥खचूनि पडती गिरिकपाट ॥धरा कांपे जळजळाट ॥द्विभाग होऊ पाहातसे
॥१३४॥
श्वापदें पळती रानोरान ॥दिग्गजां न मिळे कोठे ठिकाण ॥पाताळभुवनीं शेष दचकून ॥मूर्धनीते सरसावी
॥१३५॥
एकाचि झाला हलकल्लोळ ॥महींचे जीव चराचर सकळ ॥घाबरोनि झाला हडवळ ॥क्षमेंत स्थळ पाहती
॥१३६॥
ऐसा पाहुनि महा आकांत ॥काय करी नागनाथ ॥सकळ दैवतें बंधनविद्येंत ॥जल्पता झाला महाराजा
॥१३७॥
तेणें दैवतांचें बंधन समस्त ॥मग न धावती स्फुरल्या विद्येंत ॥ऐसी केली गती कुंठित ॥सकळ अस्त्रशस्त्रांची
॥१३८॥
मग हेमाद्रिपर्वत दारुण ॥अस्त्र योजिलें महादारुण ॥हेमाद्रि अस्त्र पावोन ॥नाथें वासवी शक्ती टाकिली
॥१३९॥
तें पाहोनियां मच्छिंद्रनाथ ॥शक्रवज्रालागीं स्तवीत ॥वरी बंधन झालें सकळ दैवत ॥अस्त्रविद्या फळेना
॥१४०॥
मग नाना अस्त्रांचें प्रयोग युक्तीं ॥जपें परी ते सकळ व्यर्थ जाती ॥मग निःशक्त मच्छिंद्र होवोनि जगती ॥स्तब्धदृष्टीं पहातसे
॥१४१॥
तों येरीकडे नागनाथ ॥नाना अस्त्रें जल्पोनि त्वरित ॥पर्वतासमान तक्षक तेथें ॥अस्त्रविद्येसीं धावले
॥१४२॥
मग मच्छिंद्रातें दंशूं धांवती ॥शतानुशत नाहीं गगती ॥ते पाहोनि मच्छिंद्रजती ॥गरुडास्त्र तेव्हां जपतसे
॥१४३॥
परी नागनाथें पूर्वप्रकरणीं ॥केलें होतें गरुडबंधन ॥तेथें मच्छिंद्राचा योग पूर्ण ॥व्यर्थ झाला गरुडास्त्रीं
॥१४४॥
मग ते सर्प उन्मत्त ॥येवोनि डंखिती ठायीं नाथ ॥तेणें मच्छिंद्र हडबडीत ॥प्राण सोडूं पाहतसे
॥१४५॥
मग अंतकाळींचा समय जाणून ॥चित्त बुद्धी अंतःकरण ॥काया वाचा तन मन ॥गुरुचे चरण स्तवीतसे
॥१४६॥
स्तवीतसे परी कैशा रीतीं ॥ऊर्ध्वशब्द उद्धभटगति ॥म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥अत्रिसुता धांव रे
॥१४७॥
मी बाळक लडिवाळ जाण ॥वेष्टलो असें सर्पबंधनें ॥तरी माये तुजवांचून ॥कोण सोडवील मज आतां
॥१४८॥
हे त्रयदेवअवतारखाणी ॥मज पाडसाची तूं हरिणी ॥व्याघ्र बैसला मम प्राणहरणी ॥ये धांवोन लगबगें
॥१४९॥
परम संकटीं पडलों येथें ॥कैसी निद्रा लागली तूतें ॥सर्वसाक्षी असोनि जगातें ॥नेत्र झांकिले मजविषयीं
॥१५०॥
दत्त दत्त ऐसें म्हणोन ॥शब्द फोडिला अट्टाहस्येंकरुन ॥नेत्र झाले श्वेतवर्ण ॥मुखीं हुंदका येतसे
॥१५१॥
परी दत्तात्रेयनामेंकरुन ॥बाहे अट्टहस्यें वचन ॥ते नागनाथें शब्द ऐकून ॥साशंकित होतसे
॥१५२॥
चित्तीं म्हणे मम गुरुचें ॥स्मरण हा करितो किमर्थ वाचे ॥तरी हा कोणाचा शिष्य याचें ॥नांव विचारुं जावोनी
॥१५३॥
मग निकट येवोनि वटसिद्धनाथ ॥पुसता झाला स्नेहभरित ॥म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत ॥गुरु कोण तुमचा
॥१५४॥
येरु म्हणे आदश नाथा ॥नाम मच्छिंद्र तत्त्वतां ॥प्रसन्न करोनि अत्रिसुता ॥अनुग्रह घेतला
॥१५५॥
तरी यासी नाथपंथ मूळ ॥मी प्रथमभागीं दत्ताचें बाळ ॥मजमागें जालिंदर सबळ ॥दत्तानुग्रहीं मिरवला
॥१५६॥
तयामागे भर्तरीनाथ ॥दत्तशिष्य झाला जगविख्यात ॥जोंवरी अवनी तोंपर्यत ॥चिरंजीव मिरवला
॥१५७॥
तयामागें रेवणनाथ ॥दत्तानुग्रहीं प्रतापवंत ॥जेणें जिंकोनि देव समस्त ॥विप्रबाळें उठविलीं
॥१५८॥
तरी महाराजा नाथपंथांत ॥मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ॥ऐसें ऐकोनि वटसिद्धनाथ ॥मनामाजी कळवळला
॥१५९॥
मग सुपर्णाचें सोडून बंधन ॥गरुडअस्त्र जपे वाचेकारण ॥ऐसें होतां तत्काळ सुपर्ण ॥महीवरी उतरले
॥१६०॥
उतरोनि नागकुळ समस्त ॥होवोनियां भयभीत ॥तत्काळ विष शोषूनि त्वरित ॥अदृश्य ते पावले
॥१६१॥
असो नागकुळ विष शोषून ॥अदृश्य झालिया भयेंकरुन ॥गरुडही उभयतां नमून ॥स्वर्गाप्रती तो गेला
॥१६२॥
येरीकडे नागनाथ ॥मच्छिंद्रचरणीं माथा ठेवीत ॥म्हणे तातासमान वडिल भ्रात ॥गुरु माझा तूं होसी
॥१६३॥
मग नेवोनियां स्वस्थानासी ॥बैसविला आपणापाशीं ॥गौरवोनि उदार मानसीं ॥एक मास ठेविला
॥१६४॥
यावरी मच्छिंद्र एके दिवशीं ॥बोलता झाला नागनाथासी ॥तुवा बंधन द्वारापाशीं ॥ठेविलें काय म्हणोनियां
॥१६५॥
भाविक येती दर्शनातें ॥तव शिष्य येवों न देती त्यातें ॥तुज मज कळी याचि निमित्तें ॥झाली असे महाराजा
॥१६६॥
यावरी बोले नागनाथ ॥मी असतों सदा ध्यानस्थ ॥जन हे येवोनि अपरिमित ॥ध्यान माझें भंगिती
॥१६७॥
म्हणोनि द्वारीं ठेवितो रक्षण ॥उपरी बोले मच्छिंद्रनंदन ॥नाथा हें नव्हे चांगुलपण ॥भूषणिक आपणासी
॥१६८॥
कोण जन ते हीन दीन ॥व्हावया येती पवित्र पावन ॥तरी ते द्वार अटक पाहोन ॥विन्मुख मागें जाताती
॥१६९॥
तरी मुक्तद्वार आतां येथून ॥ठेवीं जगाचें अकिंचनपण ॥हरोनियां मनोधर्म ॥रुढमार्गा वाढवीं
॥१७०॥
ऐसें सांगोनि नागनाथासी ॥मच्छिंद्र जाती तीर्थासी ॥येरीकडे वडवाळगांवासी ॥काय करी नाथ तो
॥१७१॥
मुक्तद्वार अगार टाकोन ॥मग दर्शना येती अपार जन ॥नाना जगाचें अकिंचनपण ॥फिटोनि मागे जाताती
॥१७२॥
ऐसें असतां कोणे एके दिवशीं ॥चांगुणा संतशिष्य होता त्यासी ॥तयाची स्त्री पुण्यराशी ॥मृत्यु पावली मठांत
॥१७३॥
तें पाहोनि वटसिद्धनाथ ॥उठविती तयाचे कांतेतें ॥तेणें बोभाट वडवाळ्यांत ॥घरोघरीं संचरला
॥१७४॥
मग जयाचे घरीं होत मृत ॥आणूनि टाकिती मठा प्रेत ॥उठवूनि नागनाथ ॥सदना धाडी तयाच्या
॥१७५॥
ऐसें होतां बहुत दिवस ॥संकट पडलें यमधर्मास ॥मग तो जाऊन सत्यलोकास ॥विधीलागीं निवेदी
॥१७६॥
मग तो मूर्तिमंत चतुरानन ॥वडवाळांत शीघ्र येवोन ॥श्रीनाथाचा स्तव करोन ॥राहविले त्या कर्मा
॥१७७॥
यापरी सहा शिष्य त्यातें ॥सिद्धकळा लाधली नवांतें ॥ते जगामाजी प्रसिद्धवंत ॥सिद्धनामीं मिरवले
॥१७८॥
चांगुलसिद्ध धर्मसिद्ध ॥देवसिद्ध भोमसिद्ध ॥देवनसिद्ध भोमनसिद्ध ॥कोकिळ सुंदरचक्षू तो
॥१७९॥
ऐशा नवसिद्धांमाझारीं ॥विद्या ओपिली कवित्व साबरी ॥देव जिंकोनि सत्वरीं ॥विद्यावरु मिरवले
॥१८०॥
बावन वीरांचे करोनि बंधन ॥केल्या साबरी विद्या स्वाधीन ॥ते साबरी विद्या कवित्वरत्न ॥नवसिद्धांत मिरवती
॥१८१॥
एक कोटी एक लक्ष ॥नागनाथाची विद्या प्रत्यक्ष ॥परोपकारी सौम्य दक्ष ॥पीडाकारक नव्हती
॥१८२॥
धांवरें खांडुक उसण ॥टिके किरळ अहिरानैम ॥वृश्चिकसर्पविषहरण ॥ऐसी विद्या परोपकारीं
॥१८३॥
असो ऐसी विद्या साबरी कवित ॥नवांनीं प्रगट केली जगांत ॥यापरी दिवस लोटले बहुत ॥कथा वर्तली विप्राची
॥१८४॥
समाधियोग सरला शेवट ॥तैं उद्धरिला बहिरंभट ॥आणि रामाजी भक्त सुभट ॥हेमकारक उद्धरिला
॥१८५॥
तरी त्या कथा पूर्ण भागांत ॥वदलों भक्तिकथामृतग्रंथांत ॥या उपरी चरपटीनाथ ॥श्रवण करावें श्रोते हो
॥१८६॥
धुंडीसुत नरहरिवंशीं ॥मालू तो संतकृपेसी ॥अवधान विद्ये सावकाशीं ॥श्रोते तुम्ही अवधारा
॥१८७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥सप्तत्रिंशत्तमोध्याय गोड हा
॥१८८॥
श्रीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार सप्तत्रिंशतितमऽध्याय समाप्त ॥