श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ३६
रेवणनाथानें सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले; नागनाथाची जन्मकथा. २३८ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी भक्तरातका ॥मम पूर्वजा ज्ञानार्का ॥नरहरिनामें पुण्यश्लोका ॥पुढें ग्रंथ बोलवीं
॥१॥
मागिले अध्यायीं कथन ॥रेवणनाथातें अत्रिनंदन ॥वरदचित्तें प्रसन्न होऊन ॥सनाथ चित्तें केला असे
॥२॥
केला तरी प्रतापवंत ॥परी सरस्वतीविप्राचा अभिप्राय हेत ॥चित्तें करुनि केला शांत ॥रेवणनाथ गेला असे
॥३॥
तरी आतां पुढें श्रोतीं ॥परिसावें आवाहना ग्रंथ अर्थी ॥रेवणनाथ कैलासाप्रती ॥कैलासद्वारीं प्रगटला
॥४॥
दिसे जैस भास्कर ॥कीं उदय पावला रोहिणीवर ॥कीं सहस्त्र चपलांचा एकभार ॥अंगकांति मिरवतसे
॥५॥
ऐसा महाराज तेजःपुंज ॥ग्रामद्वारीं येतां भोज ॥तंव ते शिवगण विजयध्वज ॥रक्षणा असती द्वारांत
॥६॥
त्यांनी पाहूनि योगमूर्ती ॥हटकोनि उभा केला क्षितीं ॥म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती ॥जातां कोठें महाराजा
॥७॥
येरु म्हणे रेवणनाथ ॥नाम असे या देहातें ॥विजयकरणीं भवभेटीते ॥आम्हां जाणें आहे कीं
॥८॥
येरु म्हणती कवण कार्ये ॥आम्हांलागीं शीघ्र सांगावें ॥नाथ म्हणे विप्रतनय ॥सत्य चोरिला शिवानें
॥९॥
तरी तयासी शिक्षा करुन ॥घेऊनि जाईन विप्रनंदन ॥ऐसें ऐकतां शिवगण ॥परमचित्तीं क्षोभले
॥१०॥
म्हणती बाबा बोलसी वचन ॥यांत आम्हांसी आलें समजोन ॥तुमचा गुरु गंधर्व जाण ॥आम्हांलागीं वाटतो
॥११॥
परी गंधर्वचा संस्कार ॥पाहूं आला प्रहार ॥तरी तो तेथेंचि करावा आदर ॥फीर माघारा येथोनी
॥१२॥
ऐसें बोलती शिवगण त्यासी ॥परम कोप चढला त्याचे मानसीं ॥म्हणे गुरु गंधर्ववंशीं ॥तरी तुम्हां दावितों
॥१३॥
अरे तुम्ही गंधर्वासमान ॥फिरों नका रानोरान ॥ऐसें म्हणोनि करें भक्तिबंधन ॥भस्मचिमुटी कवळिली
॥१४॥
स्पर्शअस्त्र जपोनि होटीं ॥फेंकिता झाला भस्मचिमुटी ॥तेणें द्वारपाळ महीपाठीं ॥खिळोनियां राहिले
॥१५॥
एक सहस्त्र तीन शत ॥गण महीतें केलें व्यक्त ॥उचलूं जातां स्वपदातें ॥मही पदातें सोडिना
॥१६॥
पद महीपासूनि कदा न सुटति ॥म्हणोनि हस्त धरुनि काढूं जाती ॥तेणें मही तें व्यक्त होती ॥उभय हस्त गणांचे
॥१७॥
ऐसे एक सहस्त्र तीन शत ॥ओणवे केले महीं व्यक्त ॥मग सर्वालागीं बोले नाथ ॥कोण गंधर्व सांगा रे
॥१८॥
ऐसे विपरीत करणी ॥प्रविष्ट होतां त्या शिवगणीं ॥हा वृत्तांत सकळ शिवभुवनीं ॥शिवालागी समजला
॥१९॥
कैलासवासी शिवाचे गण ॥त्यांनीं विपर्यास पाहून ॥परम भयभीत चित्तीं होऊन ॥शिवालागी दर्शविती
॥२०॥
उभे राहोनि शिवानिकट ॥म्हणती महाराजा नीळकंठा ॥एक मानव सुभट ॥ग्रामद्वारीं पातलाहे
॥२१॥
तेणें एक सहस्त्र तीन शत ॥द्वारगण केले महीव्यक्त ॥करचरण दोन्ही ओणवे समस्त ॥आरंबळती महाराजा
॥२२॥
ऐसी ऐकोनि शिवें मात ॥कल्पांतभैरवां आज्ञापीत ॥म्हणे कोण आला येथ ॥शिक्षा त्यातें करा रे
॥२३॥
ऐसें ऐकतां शिववचन ॥अष्टही मैरव प्रळयाग्न ॥सवे घेऊनि शतकोटी गण ॥ग्रामद्वारीं पातले
॥२४॥
तंव ते एक सहस्त्र तीन शत ॥भैरवीं पाहिले महीव्यक्त ॥मग परम कोपोनि पिनाकहात ॥शर भया योजीतसे
॥२५॥
तें नाथें चपळपणीं पाहून ॥पुनः शस्त्रअस्त्रांचे संधान ॥तीव्र कल्पूनि शतकोटिगण ॥तयांसी तेथ खिळियलें
॥२६॥
अष्टभैरव प्रतापदर्प ॥कदा न गणिती अस्त्रप्रताप ॥टणत्कारुनि शरचाप ॥तीव्र अस्त्रे योजिती
॥२७॥
एक योजिती वातास्त्र प्रबळ ॥एक योजिती प्रळयानळ ॥एकीं नागास्त्र परम विशाळ ॥विषधारा योजिलें
॥२८॥
एकीं धूम्रास्त्र योजिलें कठिण ॥एकीं वासवशक्ति केली निर्माण ॥एकीं ब्रह्मास्त्र शापवचन ॥शापादपि योजिलें तें
॥२९॥
एकें वज्रास्त्र योजिलें सबळ ॥जें सकळ अस्त्रां असें अतुळ ॥वीरभैरव तों साधनीं चपळ ॥विभक्त अस्त्र निर्मीतसे
॥३०॥
ऐसी योजूनि सायकमुष्टी ॥शर सोडिते झाले जेठी ॥मग अष्टास्त्रांते प्रतापकोटी ॥अंबरातें मिरवलें
॥३१॥
तें पाहोनियां रेवणनाथें ॥भस्मचिमुटी कवळूनि हातें ॥एकदाचि उत्तीर्ण अष्ट अस्त्रातें ॥मुखेंकरोनि जपिन्नला
॥३२॥
वातास्त्रावरी पर्वतास्त्र ॥अग्निअस्त्रावरी जलदास्त्र ॥नागास्त्रावरी खगेशास्त्र ॥यापरी तो जल्पतसे
॥३३॥
धूम्रास्त्रावरी आदित्यनामी ॥वासवशक्तीतें काळिका निर्मी ॥शापादपि ब्रह्माखाणी ॥स्तवनअस्त्र त्या ओपी
॥३४॥
वज्रास्त्रातें शक्रास्त्रे जपोन ॥विभक्तास्त्र केलें निर्माण ॥मोहन अष्टअस्त्रांचे निवारण ॥एकाचि वचनें केलें तें
॥३५॥
असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रें जाऊन ॥नाहीसें केलें अंबरांत जाण ॥परी ती अष्ट अस्त्रें उकलोन ॥भैरवांवरी पडियेली
॥३६॥
तेणें अष्टभैरव झाले जर्जर ॥शिवालागीं सांगती हेर ॥हे महाराज उमावर ॥भैरव क्षीण झालेती
॥३७॥
तें ऐकोनि शिव चित्तीं ॥सिद्ध गोसुत केला निगुतीं ॥अव्हानोनि रोहिणीपती ॥त्रिशूळ हातीं मिरवला
॥३८॥
चक्र खडग शर सायक ॥अंकुश आणि डमरु देख ॥शंख नरकपाळ हस्तीं एक ॥नंदी वाग्दोर मिरवतसे
॥३९॥
ऐशीयेपरी भूषण ॥कामांतक तो शस्त्र संजोन ॥परम संतापे उभा राहोन ॥बहु त्वरें धांवला
॥४०॥
तें पाहूनि रेवणनाथ ॥चित्तीं म्हणे युद्ध कासया बहुत ॥एकाचि अस्त्रें प्रतापवंत ॥शिवालागीं करावें
॥४१॥
जल्पूनि अस्त्र वताकर्षण ॥फुंकूनि देत भस्म जल्पून ॥तें प्रविष्ट होतां तीव्रपण ॥शिवश्वास आकर्षिला
॥४२॥
तेणेंकरोनि उमास्वामी ॥विकळ झाला नंदीवरोनी ॥धीर न धरवे महीलागुनी ॥उलथोनिया पडियेला
॥४३॥
परम झाला गात्रीं विकळ ॥शस्त्रें मुठीचीं सुटली सकळ ॥मुखीं रुधिर लोटलें तुंबळ ॥सरितापाठीं मिरवलें
॥४४॥
अष्टभैरव अष्टशस्त्रेंकरुन ॥तेही पडले जर्जर होऊन ॥तीव्र प्रहारें मूर्च्छा येऊन ॥महीवरती मिरवती
॥४५॥
सकळ पडले शुद्धिरहित ॥अष्टशस्त्रें तीं झालीं गुप्त ॥परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत ॥युद्ध पाहतां समजला
॥४६॥
मग ते परम तांतडीकरोन ॥विष्णूसी ही जाणविती खूण ॥परम अवस्थेसी ऐकून ॥कमलापति धांविन्नला
॥४७॥
मनोवेगातें मागें टाकून ॥शीघ्र पातला रमारमण ॥नाथासन्मुख निकट येऊन ॥हदयीं प्रीतीनें कवळीतसे
॥४८॥
हदयीं कवळूनि योगमूर्ती ॥म्हणे महाराज तपःपती ॥कवण कारणें विक्षेप चित्तीं ॥कोपानळ पेटला
॥४९॥
येरी म्हणे पंकजाक्ष ॥मी सरस्वतीविप्राच्या गृहीं प्रत्यक्ष ॥असतां शिवें धाडूनि यक्ष ॥पुत्र त्याचा मारिला
॥५०॥
तरी त्या अभिप्रायेंकरुन ॥आतां घेईन शिवाचा प्राण ॥उपरी संजीवनीअस्त्रेंकरुन ॥बाळ उठवीन तयाचें
॥५१॥
नातरी रक्षिणें असेल प्राण ॥तरी सप्तबाळें द्या आणोन ॥ऐसें नाथ बोले वचन ॥विष्णु त्यातें बोलतसे
॥५२॥
म्हणे महाराजा बाळें सप्त ॥आहेत मजपाशीं जीवदशाव्यक्त ॥तरी सप्तही जीव तुम्हांतें ॥हस्तगत करितों मी
॥५३॥
जीवदशा तुम्हां करितां अर्पण ॥पुढें देह तुम्ही करा निर्माण ॥ऐसें नाथें ऐकूनि वचन ॥अवश्य म्हणे तयातें
॥५४॥
मग वातप्रेरक अस्त्र जपूनी ॥सावध केला शूळपाणी ॥उपरी विभक्तअस्त्र जपूनी ॥गण सोडविले सकळिक
॥५५॥
स्थितमंत्र सुखवास सघन ॥अष्टभैरवा लाविलें भस्म ॥तेही झाले सुखरुप पूर्ण ॥अस्त्रप्रहारांवेगळे
॥५६॥
मग सकळ सावध होऊनि प्रीतीं ॥नमिते झाले योगपती ॥मग सप्तजीवदशा देऊनि हातीं ॥बोळविला महाराजा
॥५७॥
व्यानास्त्र मुखीं जपून ॥महीं उतरला तपोधन ॥शीघ्र विप्रग्रामीं येऊन ॥सरस्वतीविप्रा सांगतसे
॥५८॥
म्हणे बा रे पुत्रकलेवर ॥कुटी मेणासम समग्र ॥ऐसें ऐकतां सरस्वतीविप्र ॥उखळीं पुत्र वाहिला
॥५९॥
कुटूनि केला मेणासमान ॥मग समग्र भाग दिला आणून ॥मग तयाचे यथाविभाग करुन ॥सप्त पुतळे बनविले
॥६०॥
सिद्ध पुतळे झालियावर ॥संजीवनीप्रयोगीं वागुत्तर ॥तेणें सजीव झाले समग्र ॥जीवदशा प्रगटुनी
॥६१॥
प्रगटती अट्टहास्य करुन ॥रुदन करिती सप्तही नंदन ॥मग सरस्वतीकांतेसी ओपून ॥म्हणे पाळण करीं याचें
॥६२॥
मग द्वादश दिवसां पालखीं घालून ॥सप्त पुत्रांचे ठेविलें नाम ॥सारंगीनाथ द्वितीयाकारण ॥जोगीबा नाम ठेविलें
॥६३॥
तृतीय बाळक निजानंद दिनानाथ ॥नयननाथ मिरवला चतुर्थ ॥यदुनाथनामीं पंचम समर्थ ॥षष्ठ निरंजननामीं मिरवला
॥६४॥
सातवा महापुरुष गहिनीनाथ ॥असे सप्त पुरुष जगविख्यात ॥पुढें द्वादश वरुषें रेवणनाथें ॥अनुगृहीत केले ते
॥६५॥
मग त्या सप्त शिष्यांकारण ॥सिद्ध केलें विद्या ओपून ॥जगीं मिरवले सिद्ध म्हणून ॥चौर्या यशीं सिद्धांत पैं
॥६६॥
मग तेथेंचि राहूनि योगपती ॥सेवा घेतसे सातांहातीं ॥असो रेवणनाथ विटें प्रांतीं ॥अद्यापपर्यंत नांदतसे
॥६७॥
असो ऐसें कथेचें चांगुलपण ॥जो नित्य करी श्रवण पठण ॥बाळमृतीचा दोष जाऊन ॥पुत्रवान होईल कीं
॥६८॥
बाळें होऊनि दोषें मरती ॥तिने सुस्नात होऊनि कथेप्रती ॥मग बाळें तियेचीं चेवली न जाती ॥हें गोरक्ष बोलिला जाण पां
॥६९॥
तरी ऐशी दोषनिवारण ॥कथा ऐकावी कामिकानें ॥याउपरी वटसिद्धनाथाचें कथन ॥स्वीकारावें श्रोत्यांनीं
॥७०॥
पूर्वी सरस्वतीचे उद्देशेंकरुन ॥ब्रह्मवीर्य गृहातें पडलें खचोन ॥सर्पिणीमस्तकीं अकस्मात येवोन ॥आदळले ते समयीं
॥७१॥
मौळदंडी पडलें रेत ॥तंव ती पाहे अकस्मात ॥चित्तीं म्हणे भक्ष महीतें ॥पडला आहे सुढाळ
॥७२॥
मग ते उचलोनि आननपुटी ॥सांठविती झाली आपुले पोटी ॥परी सांठवल्या रेत शेवटीं ॥गर्भ वाढी लागला
॥७३॥
राहिला परी आस्तिकासी ॥समजूनि आलें अंतरासी ॥कीं ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी ॥प्राप्त झालें तये वेळीं
॥७४॥
झालें परी महासिद्ध ॥उदरा येईंल अवतार प्रसिद्ध ॥जो नवांतील नारायण शुद्ध ॥सिद्धनाथ म्हणतील जो
॥७५॥
ऐसें जाणोनि आस्तिकमुनी ॥पाहता झाला तक्षकनंदिनी ॥समीप तीतें पाचारुनी ॥बोलता झाला महाराजा
॥७६॥
म्हणे माया वो ऐक वचन ॥तव तो भोग नव्हे दुर्बळवान ॥तुज उदरीं नारायण ॥आविर्होत्र येतो गे
॥७७॥
परी हें तूतें सांगावया कारण ॥पुढें आहे दुर्घट विघ्न ॥जनमेजय राजयानें ॥सर्पसत्र मांडिलेंसे
॥७८॥
सकळ ऋषींचा घेवोनि मेळ ॥मखकुंडी ठेविला प्रळयानळ ॥सर्पसमिधा योजूनि सबळ ॥ॠषिमंत्र आव्हानिती
॥७९॥
तरी माया वो सांगों किती ॥बहु फण्यांची होईल आहुती ॥तें अवगमोनि माझिये चित्तीं ॥तुजपाशीं पातलों
॥८०॥
तरी आतां गर्भभरणीं ॥स्वदेहातें बैसा आच्छादुनी ॥येरी म्हणे कवणा स्थानीं ॥राहूं लपोनि महाराजा
॥८१॥
ऐसें बोलतां वागुत्तर ॥तों समीप देखता वटतरुवर ॥तोही जुनाट काष्ठपोखर ॥महीवरी मिरवतसे
॥८२॥
तें पाहूनियां आस्तिकसुनी ॥म्हणे माय वो तक्षकनंदिनी ॥या वटपोखरांत संचरोनी ॥प्राण आपुला रक्षीं पैं
॥८३॥
मग तक्षकात्मजबाळा ॥रिघती झाली वटस्थळा ॥काष्ठपोखरीं तपोवेल्हाळा ॥गरोदरपण भोगीतसे
॥८४॥
परी आस्तिकें अचळ वज्रप्रयोगीं ॥सिंचिला तरु अंबुभागीं ॥अचळ करुनि तरु वेगीं ॥हस्तिनापुरीं चालिला
॥८५॥
जाऊनि मखमंडपांत ॥भेटूनि सकळ ऋषीतें गुप्त ॥तक्षकसुतेचा सकळ वृत्तांत ॥निवेदिला तयांसी
॥८६॥
म्हणे ब्रह्मवीर्य सनाथवंत ॥तें उदरीं आहे नेमस्त ॥तरी तो वटसिद्धनागनाथ ॥प्रगट होईल महाराजा
॥८७॥
ऐसें सांगतसे वर्तमान ॥जो नवांतील आविर्होत्र नारायण ॥सर्पसत्रीं आपण ॥योजूं नये तयासी पैं
॥८८॥
ऐसें साकल्य वर्तमान ॥ऐकूनि ऋषी तुकविती मान ॥आपुले हदयीं शोध करुन ॥अवश्य म्हणती तयातें
॥८९॥
मग तक्षकात्मजा नाम पद्मिणी ॥मंत्रप्रयोगीं देती सोडूनी ॥येरीकडे उरगी गर्भिणी ॥नवमासांतें पुरलीसे
॥९०॥
तिकडे सर्पसत्र झाले समाप्त ॥इकडे दिवस भरले नेमस्त ॥मग प्रकृतिअंड होऊनि उदित ॥प्रसूत झाली पद्मिणी
॥९१॥
असो वटवृक्षपाखरांत ॥अंड राहिलें दिवस बहुत ॥आर्विर्होत्र नारायण त्यांत ॥ईश्वरसत्ते संचरला
॥९२॥
दिवसेंदिवस अंडांत ॥वाढी लागलेसें जीववंत ॥देह होतां सामर्थ्यवंत ॥भग्न झालें अंड तें
॥९३॥
मग त्या तळवटपोखरांत ॥बाळ रुदन करी अत्यंत ॥निढळ वाणी कोणी त्यातें ॥रक्षणातें नसेचि
॥९४॥
जैसी जळांतील जळमासोळी ॥उड्डाण घेतां पडे वेगळी ॥मग तीं अत्यंत चित्तीं तळमळी ॥तैसें झाले बाळका
॥९५॥
अट्टाहास्ये करीतसे रुदन ॥तैं पातला शुचि ब्राह्मण ॥गौडजाती अथर्वण ॥वेदभूषणीं मिरवतसे
॥९६॥
कोशधर्म तयाचें नाम ॥आचारशील विद्यावान ॥सहा शास्त्रीं पारंगत पूर्ण ॥चतुर्विध जाणता तो
॥९७॥
अपर सूर्य तो सर्वज्ञामूर्ती ॥परी दरिद्र प्रारब्धगतीं ॥तेणेंकरुनि संसारक्षितीं ॥परम चित्तीं विटला
॥९८॥
विटला परी पत्रावळीकारण ॥पाहता झाला वटस्थान ॥पत्रें तोडावीं हें मनीं इच्छून ॥तयानिकटीं पातला
॥९९॥
निकट येतां तया तरुतळवटीं ॥बाळ रडे तें कर्णपुटीं ॥ऐकूनि चहूंकडे फिरवी दृष्टी ॥तों कांहीं दिसेना
॥१००॥
मनांत होय साशंकित ॥म्हणे बाळरुदन कोठें होत ॥स्वर्गीचे सुरवर त्यातें पाहात ॥बोलते झाले तयातें
॥१०१॥
म्हणती कोशधर्मा सुशीळा ऐक ॥या वटतरुंत आहे बाळक ॥तरी त्या मांदुसा तूं पाईक ॥दृष्टिगोचर नव्हेसी
॥१०२॥
तरी प्रज्ञावंता ऐक वचन ॥तूं ते मांदुस काढून ॥आपल्या गृहासी ते नेऊन ॥संगोपन करीं त्याचें
॥१०३॥
तव घरीं येतां तें बालक ॥सुदैव दशेचा उगवेल अर्क ॥मग दरिद्रता सकळिक ॥जाईल नासूनि महाराजा
॥१०४॥
जैसे परिसअंगसंगेंकरुन ॥लोहजाती होय सुवर्ण ॥मग षडगुणैश्वर्य तयाकारण ॥दृष्टी पडेना काळिमा
॥१०५॥
तेवीं तूं बाळ गृहीं नेतां ॥सकळ हरेल व्यथा दरिद्रता ॥बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता ॥आविर्होत्र नारायण तो
॥१०६॥
ऐसें बोलोनि साचोकार ॥सुरवरीं पाठविला एक शर ॥तेणें तरु तो महीवर ॥खंडूनियां पडियेला
॥१०७॥
तरु खंड होतां त्वरित ॥तों कोशधर्म बाळ देखत ॥बालार्ककिरणीं तेज अदभुत ॥नक्षत्रपतीतें लाजविता
॥१०८॥
बाळ तेजस्वी मनोहर ॥अंबरीं पाहते झाले सुरवर ॥मग सकळीं घेवोनि कुसुमभार ॥वर्षाव करिती भावार्थे
॥१०९॥
देखतांचि पदपद्मा ॥सकळीं जोडोनि करयुग्मा ॥नमोनियां योगसद्मा ॥कोशधर्मा बोलती ते
॥११०॥
म्हणती महाराजा सभाग्यवंत ॥तूं एक आहेसी भूमंडळांत ॥वटसिद्ध नागेशनाथ ॥तूतें प्राप्त झाला असे
॥१११॥
तरी हा पद्मिणी नागिणीपोटीं ॥रक्षिला गेला तरुच्या तळवटीं ॥आणि सिद्धता पावूनि त्या नागवटीं ॥नाथ मिरवेल योग्यांचा
॥११२॥
ऐसी करणी झाली येथ ॥म्हणोनि नाम वटसिद्धनागनाथ ॥तरी तुम्ही आतां महीतें ॥हेंचि नांव पाचारा
॥११३॥
ऐसें ऐकोनि कोशधर्मे ॥बाळ उचलिले अति प्रेमें ॥परम आनंदें आपुलें धाम ॥सेवोनि कांतेप्रती बोलतसे
॥११४॥
तंव ती कांता सुरादेवी ॥परम प्राज्ञिक सुशील महीं ॥धैर्य औदार्य सच्चपदवी ॥लोकांमाजीं दावीतसे
॥११५॥
बाळ सत्यवतीनें देखतां ॥म्हणे मजकडे द्या लावण्यवंता ॥तंव तें दृष्टिगोचर करितां ॥बाळ अर्कासम दिसतसे
॥११६॥
मग हांसोनि बोले कोशधर्मा ॥म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥बाळ कोणाचें उगमा ॥आणिलें तें मज सांगा
॥११७॥
मज वाटतें कीं बाळ नव्हे ॥सानरुपी यमपिता झाला आहे ॥कीं ईश्वरें सृष्टि पाहें ॥दुजा चंद्र निर्मिला कीं
॥११८॥
कीं विद्युल्लता सकळ लाजिरवाण ॥कीं मेघापरती लपवो स्वरुपानन ॥म्हणोनि ईश्वरें तेज हरुन ॥तुम्हांहातीं दीधलें
॥११९॥
कीं नक्षत्रांचा अपार मेळा ॥नावडे ईश्वरा पृथकपाळा ॥म्हणोनि हें समुच्चयेंकरुनि गोळा ॥तुम्हांलागीं ओपिलें
॥१२०॥
ऐसें म्हणोनि स्नेहभरित ॥बाळ उचलोनि हदयीं लावीत ॥मग कोशधर्मे सकळ वृत्तांत ॥निवेदिला कांतेतें
॥१२१॥
सुरादेवीनें सकळ कथन ॥सुरवरवाक्यासी ऐकोन ॥परम पावोनि समाधान ॥पालखां घालोनि हालवीत
॥१२२॥
हदयीं कवटाळितां बाळ ॥पयानें दाटलें कुचमंडळ ॥पान्हावोनि बाळमुखकमळ ॥पयोधराग्री प्रेरीतसे
॥१२३॥
मग तें बाळ घोटीत क्षीर ॥जठराग्नीचा दाहक उबार ॥शांतवोनि शांतिपर ॥बाळ मिरवे देहस्थ
॥१२४॥
अति लालनें स्नेहभरित ॥मार्जन न्हाणोनि घातला पालखांत ॥नाम ठेविलें वटसिद्धनाथ ॥ओंव्य मंगळें गातसे
॥१२५॥
मग दिवसेंदिवस राहणी घन ॥सिंचन करी मोहसंजीवन ॥सुरा देवीचे पंचप्राण ॥निजांकुरीं लवलवती
॥१२६॥
मग ती पल्लवाकार ॥फळ दावी भक्तिपर ॥परी तीक्ष्ण कटु व्यवहार ॥स्वप्नामाजी दिसेना
॥१२७॥
जैसें तमारीचे गांवीं ॥नांदूं न शके तमाची पदवी ॥कीं कामधेनूचे कांसेठाई ॥क्षुधानळें पीडियेला
॥१२८॥
तेवीं सुरादेवीचें अंतःकरण ॥कदा न दर्शवी भिन्नदर्शन ॥परम मोहें गेली वेष्टोन ॥पाषाण जेवीं शेवाळीं
॥१२९॥
असो ऐसे सुखस्थित ॥बाळा लोटले दिवस बहुत ॥सप्तवरुषी कोशसुत ॥मौंजीबंधना मिरवला
॥१३०॥
याउपरांतिक एके दिवशीं ॥सोडोनियां क्षेत्र काशी ॥नागनाथ सहज खेळावयासी ॥भागीरथीतें पातला
॥१३१॥
ठळटळीत भरले दोन प्रहर ॥काशीविश्वेश्वराचे समोर ॥बाळ क्रीडतसे मनोहर ॥अर्क जेवीं दुसरा
॥१३२॥
तों तेचि समयीं अकस्मात ॥येता झाला अत्रिसुत ॥येतांचि दृष्टी यथास्थित ॥बाळावरी गेलीसे
॥१३३॥
तो बाळ तेजस्वी अर्कनीतीं ॥खेळताहे स्वस्थगतीं ॥बहु मुलें बैसवोनि पंगतीं ॥लटकेंचि अन्न वांटीतसे
॥१३४॥
मुलें गड्या गड्या म्हणोन ॥धालो म्हणती सेवोनि अन्न ॥आतां पुढें वाढणें ॥वाढूं नको आम्हांसी
॥१३५॥
परी तो तयांसी आग्रह करीत ॥घ्या घ्या म्हणोनि वाचें वदत ॥न घे त्याची विनंति करीत ॥रसाळवाणीकरुनिया
॥१३६॥
तें पाहोनियां अनसूयासुत ॥पाहोनि मनीं हास्य करीत ॥चित्तीं म्हणे लटक्या अन्नातें ॥मुलें धालों म्हणताती
॥१३७॥
तरी आतां आपण संचरोन ॥मुलांलागीं द्यावे अन्न ॥मग प्रत्यक्ष बाळतनु धरोन ॥तयांमाजी संचरला
॥१३८॥
बाळ अंगणीं उभा राहोन ॥म्हणे अतिथ आला तुम्हांकारणें ॥अन्न मागतो उदराकारणें ॥तृप्त त्यातें करावें
॥१३९॥
तंव तीं मुलें तीव्रपणें ॥पाठी लागती वसवसोन ॥म्हणती आमुचे मंडळांत कोण ॥आला असे आतां खेळावया
॥१४०॥
कोणी दाटूनि पुढें येती ॥कोणी शेला उगारिती ॥कोणी पाषाण घेती हाती ॥जातोसी कीं मारुं तुज
॥१४१॥
ऐशीं मुलें दाविती चिन्ह ॥तें श्रीनागनाथें पाहोन ॥सकळ मुलांची इच्छा पाहून ॥वारिता झाला स्वहस्तें
॥१४२॥
म्हणे गडे हो ऐका वचन ॥आपण बैसलों सेवूं अन्न ॥त्यांत अतिथ आला जाण ॥त्यासी दवडूं नये कीं
॥१४३॥
पहा आपुले घरीं सांगे पिता ॥विन्मुख कोणी न व्हा अतिथा ॥तैसाचि आपण भिक्षुक मागता ॥आला आहे समयासी
॥१४४॥
काढोनि अंगावरील चीर ॥अंग पुसीतसे आपुले करीं ॥गंध लावी भाळावरी ॥शुष्कपूजा करीतसे
॥१४५॥
तरी अतिथाचें करुनि पूजन ॥पोटभरी घालावें अन्न ॥प्रत्यक्ष नाथ करीं धरोन ॥बाळें अंगणीं बैसविला
॥१४६॥
लटकेंचि कल्पनेचे करुनि जीवन ॥तया अतिथा घालिता स्नान ॥हस्तपादावरी फिरवून ॥करिती क्षालन अंगाचें
॥१४७॥
लटकें मनाचें करुनि सुमन ॥हार गुंफिला कल्पनेकरुन ॥तो अतिथाचे गळां घालोन ॥लटका धूप दाविती
॥१४८॥
भावपूर्वक लावोनि नयन ॥ऐक्य करिती पंचप्राण ॥परी सहजदृष्टीतें ज्ञानपण ॥आरती करिती अतिथीची
॥१४९॥
मग लटकेंचि पात्र पुढें ठेवून ॥कल्पूनि लटकें आणूनि वाढिती अन्न ॥मग उभय हस्त जोडून ॥प्रार्थना करिती अतिथाची
॥१५०॥
नम्र वाचा रसाळ वचन ॥म्हणती स्वामी सेवा अन्न ॥वारंवार नमस्कार करोन ॥आणीक वाढूं म्हणताती
॥१५१॥
ऐसें आदराचें चांगुलपण ॥पाहूनियां अत्रिनंदन ॥चित्तीं म्हणे प्रज्ञावान ॥बाळ सुशीळ आहे हा
॥१५२॥
उदारबुद्धीं तृप्ती करुन ॥वर्तताहे दातृत्वपणें ॥हे तों पूर्वीची योगसृष्टीकरोन ॥योग्यावांचूनि घडेना
॥१५३॥
सुशब्द आणि विवेकशांती ॥विचरे जयाचे देहाप्रती ॥जरी पूर्वीचा योगभ्रष्टगती ॥योग्यावांचूनि घडेना
॥१५४॥
स्नान आणि हरणी स्थिती ॥याचक आर्तवान बहुत युक्ती ॥तरी पूर्वीची योगश्रेष्ठ गती ॥योग्यावांचूनि घडेना
॥१५५॥
उदारबुद्धि धार्मिक स्थिती ॥विचार रसाळ सर्वाप्रती ॥दुःख न देणें परांप्रती ॥हें योग्यावांचूनि घडेना
॥१५६॥
ऐसें चित्तीं अवगमून ॥शोधी तयाचा पूर्वजन्म ॥तों आविर्होत्र नारायण ॥निजमानसीं भासला
॥१५७॥
मग कृपासिद्धि वरुनि युक्तीं ॥देता झाला तयाची हातीं ॥जे जे वदे वाणी निश्विती ॥ते ते पदार्थ मिरवावे
॥१५८॥
मग परम होऊनि हर्षयुक्त ॥म्हणती हा एक उदेला महीनाथ ॥समीप बोलावोनि त्यातें ॥हस्त धरी तयाचा
॥१५९॥
उपरी कर्णी सांगे मात ॥भोजन घालीं सकळ मुलांतें ॥परी तूं न सेवीं सिद्धिअन्नातें ॥कदाकाळीं बाळका रे
॥१६०॥
नाथ आग्रहें त्या वाढीत ॥तरी तें पात्र मिरवे अति अदभुत ॥ज्या पदार्थाचें नाम मिरवे पात्रावरी
॥१६१॥
मग तीं बाळें अज्ञान पणें ॥साचोकारी करिती भोजन ॥ऐसे लोटले बहुत दिन ॥नित्य खेळ खेळताती
॥१६२॥
स्वनाम सांगूनि अत्रिनंदन ॥चालता झाला पुसोनि नाम ॥येरीकडे पंक्तीं बैसवोन ॥भोजन खेळी खेळती
॥१६३॥
आपुलाले गृहीं जाऊन ॥सेविती कांहीं किंचित अन्न ॥तें चाटीबोटीकरुन ॥अन्न नासती विखुरती ते
॥१६४॥
येथें यथेष्ट इच्छेसमान ॥सर्व पदार्थ षड्रसान्न ॥मग तें गृहीचें कदन्न ॥तुच्छपणीं वाटलें त्यां
॥१६५॥
जे ब्रह्मरुप रसातें धाले ॥आपपर सकळ विसरले ॥मायाद्वैतकांचीसी बैसले ॥लाळ घोटीत सेवावया
॥१६६॥
कीं हाटकतगट जडावासी ॥नवरत्नकोंदण त्या भूषणासी ॥ते काय करुनि काचमण्यासी ॥स्पर्शित होतील चित्तांत
॥१६७॥
कीं सुरगरंगी धाममंचकीं ॥कुसुमगंधागरु सवितां थोर कीं ॥तो त्यजूनि दुर्गंध लोकीं ॥गल्लीमाजी पडेल कीं
॥१६८॥
तन्न्याय मुलें सकळ ॥सेविती षड्रसान्नातें अमळ ॥तयां गृहीचें कदन्न केवळ ॥मिष्ट कांहीं लागेना
॥१६९॥
मग ते तयांचें तात मात ॥गृहीं मुलांसी पुसती यथार्थ ॥तेही वदती प्रांजळवंत ॥षड्रस खेळ अन्नाचा
॥१७०॥
म्हणती तुम्ही दरिद्रपणीं ॥सेवितां कदन्न कांजीपाणी ॥आम्ही नित्य सुरनदीवर जाऊनी ॥षड्रस अन्न सेवितों
॥१७१॥
तंव ते असत्य मानूनि चित्तीं ॥गुप्तवेषें दुरुनि पाहती ॥सरितातीरीं बैसवोनि पंक्ती ॥नागनाथ वाढीतसे
॥१७२॥
मग ती चर्चा सर्वागृहीं ॥प्रकट झाली सर्वदेहीं ॥मग कोशधर्मासी सर्वही ॥सुचविती अर्थातें
॥१७३॥
म्हणती विप्रा तव नंदन ॥स्वर्गसरिते नित्य जाऊन ॥अपार पंक्ती बैसवून ॥षड्रसान्न वाढीतसे
॥१७४॥
आम्ही प्रत्यक्ष पाहूनि दृष्टीं ॥बोलतों तूतें वाग्वटीं ॥पात्रेंविण उभय करपुटीं ॥इच्छान्न वाढीतसे
॥१७५॥
नेणों कैशी करितो गती ॥उगला हात ठेवितो क्षितीं ॥पदार्थविवरणा वाचेप्रती ॥होतां पदार्थ मिरवत
॥१७६॥
ऐसें ऐकोनि कोशधर्म ॥आठवीं केलें सुरवरांचें वचन ॥कीं पुढें पावोनि सिद्धकर्म ॥सिद्धनामें मिरवेल हा
॥१७७॥
ऐसी खूण जाणूनि चित्तीं ॥म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती ॥ऐसें कोणासही या क्षितीं ॥घडूनि येत नसे कीं
॥१७८॥
धिक्कार करुनि म्हणे तयांचा ॥बाळ विकारी असत्य वाचा ॥एके दिवशीं हस्त सुताचा ॥धरुनि बैसवीं अंकासनीं
॥१७९॥
घेऊनियां मुखचुंबन ॥आणि कुरवाळी हस्ते वदन ॥म्हणे बा रे मुलांकारणें ॥भोजन घालिसी कैसें तूं
॥१८०॥
ऐसें पुसतां कोडेंकरुन ॥तोही दाटला स्नेहेंकरुन ॥तातासी म्हणे तुज भोजन ॥तैसेंचि घालितों आतां मी
॥१८१॥
अंकीहूनि तत्काळ उठोन ॥क्षितीं हस्त ठेवी पात्र म्हणोन ॥तंव ते प्रत्यक्ष पात्रीं दिसे अन्न ॥कोशधर्म पहातसे
॥१८२॥
उपरी बहुधा प्रत्यक्षपणीं ॥तंव ते पदार्थ दिसती नयनीं ॥खाद्यें उपजलीं हें पाहोनी ॥मनीं आश्चर्य मानिलें
॥१८३॥
मग मान तुकावूनि कोशधर्म ॥म्हणे बाळा होते कैसें कर्म ॥प्रसन्न झालें त्याचें नाम ॥मजलागीं सांगावें
॥१८४॥
यावरी म्हणे ताता ऐक ॥आमुचें खेळीं आलें बालक ॥तेणें सांगितलें कौतुक ॥तें तुजप्रती सांगतों
॥१८५॥
तेणें माझा हस्त धरोन ॥उगाचि कान फुंकोन ॥मौळीं हस्त ठेवोन ॥वाढावया लाविलें
॥१८६॥
परी तें पोर आमुचे मेळीं ॥सहज रीतीं आलें खेळी ॥परी त्या पोरीं करोनि रळी ॥वारिले म्यां सकळांतें
॥१८७॥
उपरी मीं त्या मुलांकारणें ॥तोषविलें मोठ्या गौरवानें ॥जैसे तुम्ही अतिथाकारणें ॥गौरवीतसां महाराजा
॥१८८॥
लटकमटक स्नानभोजन ॥सारुनि तयाचे पूजिले चरण ॥नमस्कारुनि ते देखोन ॥बोळविला महाराजा
॥१८९॥
ऐसें ऐकोनि कोशधर्म ॥आल्या अतिथा धरोनि नेम ॥बाळाहातीं अतिथापूजा करोन ॥तुष्टचित्तें बोळवी
॥१९०॥
ऐसा पाहोनि विप्रनेम ॥परम संतोषला दत्तात्रेयनाम ॥चित्तीं म्हणे मार्ग सुगम ॥बाळालागीं लाधला
॥१९१॥
तेणेंकरुनि सकळ क्षेत्रांत ॥कीर्ति वाढली असंभावित ॥महासिद्ध नारायणनाथ ॥कितीकांनीं आराधिला
॥१९२॥
मग शतानुशत सहस्त्र पंक्ती ॥षड्रस अन्नें सेवोनि जाती ॥बहुतांचीं कार्ये होतीं ॥कनक धन वसना पावती ते
॥१९३॥
मग जिकडे तिकडे नागेशसिद्ध ॥कीर्ति वानिती जन प्रसिद्ध ॥पंचविषयां संतोषोनि ॥इच्छिले कामा फळतसे
॥१९४॥
मग अंगीं आलें शहाणपण ॥देहाचें गेलें अज्ञानपण ॥एके दिवशीं ब्रह्मनंदन ॥ताताजवळी बैसला
॥१९५॥
तातासी म्हणें महाराज ॥मम हातें पुरे जगाची चोज ॥तरी कवणे अर्थी जगाचें काज ॥कवण्या अर्थे फळतसे
॥१९६॥
दत्तात्रेय नामें बाळवेष ॥बाळपणीं भेटला आम्हांस ॥तरी कोण महापुरुष ॥प्रतापी बळें आगळा
॥१९७॥
तात म्हणे तो दत्तात्रेयमुनी ॥त्रयदेवांचा अवतार भुवनीं ॥सुफळ प्रारब्धें गेला भेटोनी ॥तुजलागीं पाडसा
॥१९८॥
नागेश म्हणे आतां परतोन ॥कैसा भेटेल अत्रिनंदन ॥हें सांगें मजलागून ॥निवेदन करी महाराजा
॥१९९॥
याउपरी बोले कोशधर्म ॥बाळा तयाची भेटी दुर्गम ॥तो एके ठायीं नसे नेम ॥अनेक क्षेत्रीं हिंडतसे
॥२००॥
कोल्हापुर पांचाळेश्वर ॥काशीक्षेत्र मातापुर ॥ऐसीं हिंडतां अनेक क्षेत्रें ॥कोठें पाहसी पाडसा
॥२०१॥
परी प्रारब्धयोगेंकरोनी ॥भेटतसे दत्तात्रेय मुनी ॥यत्न केल्या भेटीलागुनी ॥आतुडेना बाळका
॥२०२॥
जैसा कल्पतरु चिंतामणी ॥निधीपरीस लावण्यखाणी ॥बा रे नातुडे यत्नेंकरोनी ॥अवचटपणीं मिळती ते
॥२०३॥
तेचि रीतीं अत्रिनंदन ॥प्राप्त नव्हे यत्नेंकरुन ॥ऐसें सांगूनि कोशधर्म ॥बाहेर गेला कार्यासी
॥२०४॥
येरीकडे नागनाथ ॥हदयीं आपुले विचारीत ॥कीं ऐसा रवि सनाथवंत ॥निजदृष्टीनें पहावा
॥२०५॥
परी पांचाळेश्वरीं मातापुरीं ॥जाऊनि शोधावें कोल्हापुरीं ॥जेथें जेथें वास धरित्रीं ॥तेथें तेथें शोधावें
॥२०६॥
मग पुसोनि मातेसी ॥निघता झाला मुनिशोधासी ॥मातापुरादि पांचाळेश्वरासी ॥पाहूं पातला कोल्हापुरीं
॥२०७॥
क्षेत्र कोल्हापुरीं संचरोन ॥पुसता होय जनाकारणें ॥कीं येथें तो अत्रिनंदन ॥कोणे ठायीं राहातसे
॥२०८॥
ऐसें ऐकोनि लोक हांसती ॥वेड लागलें तूतें म्हणती ॥अवधूत येतसे क्षेत्राप्रती ॥तो कोणा प्रगट नव्हे रे
॥२०९॥
कोण्या स्वरुपीं येथें येऊन ॥जात आहे भिक्षा मागोन ॥ऐसे जनाचे बोल ऐकोन ॥प्रत्युत्तर त्यां देतसे
॥२१०॥
म्हणे येथें भिक्षेकारणें ॥येत आहे अत्रिनंदन ॥तरी अन्य क्षेत्रीं भिक्षा मागणें ॥तया पडन नाही कीं
॥२११॥
येर म्हणती त्यासी ॥भिक्षा मागावी कोल्हापुरासी ॥याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी ॥अन्न न सेवी मागोनी
॥२१२॥
अन्य क्षेत्रीं तया अन्न ॥चित्तीं न वाटे सुढाळपण ॥यासम कैसें ग्राम आन ॥पुण्यक्षेत्र हें असे
॥२१३॥
ऐसें क्षेत्र पुण्यपावन ॥जरी या गांवीं न मिळे अन्न ॥तरी उपवास करी अत्रिनंदन ॥परी अन्य क्षेत्रीं सेवीना
॥२१४॥
अरे या गांवीचें शाकपत्र ॥मानीत आहे परम पवित्र ॥परी अन्य गांवींचे पक्कान्न स्वतंत्र ॥विटाळापरी मानीतसे
॥२१५॥
जैसें एकपत्नी नरा ॥कुरुप असेल जसे दारा ॥तरी तीच भोगी व्यभिचारा ॥लावण्यलतिका आकळीना
॥२१६॥
कीं विप्रकरीचें कदन्न ॥सोडूनि शूद्राचें षड्रस अन्न ॥सेवील काय प्रसिद्ध ब्राह्मण ॥मनें देवता न वरीच
॥२१७॥
तेवीं दत्त क्षेत्र हें सोडून ॥कदा न पाहे अन्य ग्राम ॥ऐसे त्या जनाचे बोल ऐकोन ॥विचार करी मग नाथ
॥२१८॥
चित्तीं म्हणे करोनि पाकाग्नी ॥ग्रामांत पेटूं न द्यावा अग्नी ॥सकळ क्षेत्रा भोजन घालोनी ॥पाठवावें गृहीं गृहीं
॥२१९॥
मग तो स्वामी येतां भिक्षेसी ॥कोठोनि अन्न वाढिती त्यासी ॥मग सहजचि स्वकीर्तीसी ॥आपणापासीं येईल कीं
॥२२०॥
येईल परी सिद्ध अन्न ॥घेणार नाहीं भिक्षेलागून ॥हेची ओळखी जाणोनि खूण ॥पाय वंदावे तयाचे
॥२२१॥
आणिक माझे विचारुनि नाम ॥गेला आहे योगद्रुम ॥तरी तोही भेटेल कृपेंकरोन ॥नामाभिधान ऐकोनी
॥२२२॥
आणि मजही गेला सांगोनि जाण ॥कीं सेवूं नको सिद्धान्न ॥आणिकांतें घालीं भोजन ॥तुष्ट करी क्षुधार्थी
॥२२३॥
ऐसी सांगूनि गेला मात ॥तो सेविणार नाहीं सिद्धान्नातें ॥ऐसा उपाय योजूनि चित्तांत ॥लक्ष्मीदेउळी संचरला
॥२२४॥
भेटूनि पुजारियासी ॥ओवरी एक रहावयासी ॥मागूनि घेत अति प्रीतीसीं ॥बंदोबस्तीं नेटकी
॥२२५॥
परी तो पुजारी भक्तिवान ॥अतिथपूजाकरोन ॥नित्य पंक्तीसी घेवोन ॥भोजनातें सारीतसे
॥२२६॥
ऐसे लोटतां कांहीं दिवस ॥पाचारुनि पुजार्या स ॥म्हणे माझे आहे मनास ॥ग्रामभोजन घालावें
॥२२७॥
परी तुम्हीं साह्य होवोनि मातें ॥खटपटीसह सारावें कृत्य ॥तंव तो हांसूनि बोलें त्यातें ॥फार बरें आहे जी
॥२२८॥
आम्ही खटपट करुं सघन ॥परी तुम्हांपासीं कोठें अन्न ॥उगेंचि कैसें ग्रामभोजन ॥सबळ सामर्थ्य असावें
॥२२९॥
नाथ म्हणे ऐका वचन ॥सर्व सामग्री ठेविली करोन ॥परी खटपटीची आंगवण ॥करा कार्य सिद्ध हें
॥२३०॥
मग तो अवश्य म्हणोनि त्यातें ॥बोले आमुचें काय जातें ॥पुण्यासाठीं धर्मकृत्य ॥घडोनि येतें आम्हांसी
॥२३१॥
ऐसें बोलोनि नाथातें ॥पुजारी गेला स्वकार्यातें ॥येरीकडे ओवरींत ॥काय करी महाराजा
॥२३२॥
कोरडे अन्नाचे घेवोनि नाम ॥क्षितीसी ठेवी करपदम ॥तो कनकराशीं पर्वतासमान ॥तया ठायीं बैसल्या
॥२३३॥
ऐशापरी अपार राशी ॥निर्मिता झाला स्वकरेंसी ॥घृतस्नेहादि सांठवणासी ॥ओवरीमाजी विराजवीत
॥२३४॥
मग येवोनि पुजार्यााचे सदनीं ॥आणिला करीं कवळोनी ॥ओवरीमाजी शीघ्रगती नेवोनी ॥सिद्धाश्रम दाविला
॥२३५॥
यावरी आतां पुढें कथन ॥अन्नछत्रीं इच्छेसमान ॥श्रीनागेंद्र सिद्ध करोन ॥भेट घेईल दत्ताची
॥२३६॥
तरी ती कथा सुधाकर ॥पुढें सेवा श्रवणद्वारें ॥धुंडीसुत मालू सुरस ॥हरिकृपें सांगेल कीं
॥२३७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥षटत्रिंशतितमोऽध्याय गोड हा
॥२३८॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥