श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ३५
रेवणनाथास सिद्धिची प्राप्ति; त्याची तपश्चर्या व वरप्राप्ति; सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीं गमन. २४१ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जयजयाजी करुणाकरा ॥पंढरीशा रुक्मिणीवरा ॥दीनबंधो दयासागरा ॥पुढें ग्रंथ बोलवीं
॥१॥
तूं दयाळ विश्वंभर ॥बहुधा अर्थी हें चराचर ॥भरण करिसी जन्म दिल्यावर ॥कामनेतें लक्षुनी
॥२॥
तरी मम कामनेचा अर्थ ॥कीं ग्रंथाक्षरें व्हावीं रसभरित ॥तरी ग्रंथांतरी भराभर उदित ॥विश्वंभरा होई कां
॥३॥
मागिले अध्यायीं उत्तम कथन ॥रेवणनाथाचा झाला जन्म ॥सहनसारुकें कृषिकर्म ॥बोलूनियां दाविलें
॥४॥
दाविलें परी दैवें करुन ॥अवचट देखिला अत्रिनंदन ॥जो शंकरसेवक तयालागून ॥तेंचि प्राप्त होतसे
॥५॥
हिरातेज गूढ स्थानालागुनि ॥दडे तरी तया काढी हिरकणी ॥भेटीलागीं येत धांवोनी ॥लोहालागीं चुंबक
॥६॥
कां हंसपक्षी भक्षणांत ॥कदा न भक्षी मुक्ताविरहित ॥जरी गुंतला पिंजर्यां त ॥परी तेंचि भक्ष्य भक्षीतसे
॥७॥
तेवीं रेवण योगमूर्ती ॥मार्गीच भेटला अवचटगती ॥दुग्धालागीं शर्करा निश्वितीं ॥लवण कांहीं मिरवेना
॥८॥
असो ऐसा अवसर त्यांत ॥घडला परी अबुद्धिवंत ॥सिद्धिकळा घेऊनि चित्तांत ॥अत्रिसुत दवडिला
॥९॥
दत्तें केलें शहाणपण ॥किंचित कळा त्या दाखवून ॥रक्षूनि आपुलें सकळ भूषण ॥गेला निघूनि महाराजा
॥१०॥
जेवीं मर्कटा चणे देऊनि ॥मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी ॥तेवीं अत्रि आत्मज करणी ॥करुनि गेला महाराजा
॥११॥
येरीकडे रेवणनाथ ॥वृषभ ठेवूनि स्वशेतांत ॥येऊनियां सिद्ध आउत ॥करिता झाला महाराजा
॥१२॥
सकळ शेत झाल्यापाठीं ॥नागदोर कवळूनि करसंपुटीं ॥आउतमागीं फिरत जेठी ॥गायनातें आरंभिलें
॥१३॥
आरंभिलें परी दत्तवचन ॥मंत्रप्रयोगें गाय गायन ॥दत्तमहिमा ऐसें म्हणून ॥वृषमातें बोलतसे
॥१४॥
येरी महिमा ऐसें वचन ॥सहज बोले प्रयोगानें ॥परी महिमासिद्धि प्रत्यक्षपणें ॥प्रगट झाली ते ठायीं
॥१५॥
सिद्धि येऊनि आउतापाशी ॥म्हणे कामना कोण तुजसी ॥येरु म्हणे तव नामासी ॥श्रुत मातें करीं कां
॥१६॥
येरी म्हणे मी सिद्धि पूर्ण ॥देहधारी महिमान ॥ऐसें ऐकतां उत्तमोत्तम ॥दत्तबोल आठवला
॥१७॥
जेव्हां सिद्धि दत्त देता ॥ते सिद्धीची सकळ वार्ता ॥सांगोनियां रेवणनाथा ॥गेला होता महाराजा
॥१८॥
कीं हा प्रयोगितां मंत्र ॥महिमा नामें सिद्धि पवित्र ॥प्रत्यक्ष होईल तुजपुढें प्राप्त ॥कामनेते पुरवावया
॥१९॥
मागणें जे आर्थिक कामना मनीं ॥तूं तीस दाखवीं बोलूनी ॥मग तितुके कार्यालागुनी ॥सकळ कामना पुरवील
॥२०॥
म्हणसील काय आहे प्रताप तिचा ॥तरी वदतां न ये आपुले वाचा ॥सकळ भोग जो महीचा ॥प्राप्त करील क्षणार्धे
॥२१॥
कानन तरु पाषाणपर ॥जितुके असतील महीवर ॥तितुके कल्पतरु साचार ॥करुनि देईल क्षणार्धे
॥२२॥
आणि तुळवट जेथ पाषाण खाणी ॥तपाची दावी अपार करणी ॥की परीस तेवीं चिंतामणी ॥करुनि दावी क्षणार्धें
॥२३॥
वसन भूषण धनकनकराशी ॥अपार दावी नगाऐसी ॥जें जें वर्तेल स्वकामनेसी ॥तो तो अर्थ पुरवील बा
॥२४॥
ऐसें सांगूनि अत्रिआत्मजें ॥ओपिलें होतें मंत्रबीज ॥ऐसें श्रुत होतां सहजें ॥दाटला होता गर्वानें
॥२५॥
परंतु निःस्पृह होता आनंदभरित ॥हांकीत होता शेतांत आउत ॥मंत्रप्रयोगीं विचारीत ॥सहजस्थिति केलीसे
॥२६॥
परी महिमासिद्धि भेटतां त्यातें ॥अधिक झाला आनंदभरित ॥म्हणे सत्पंथ सांगोनि दत्त ॥गेला असे महाराजा
॥२७॥
मग हातीचा सोडूनि आउतदोर ॥तीतें बोलता होय उत्तर ॥म्हणे शेतीं पैल असे तरुवर ॥छायेकरुनि वेष्टिला
॥२८॥
तरी त्या शीतळ छायेतें ॥कणाच्या राशी अपरिमित ॥कनक करीं एक क्षणांत ॥चमत्कार दावीं कां
॥२९॥
दृष्टीं पडतां कनकराशी ॥मग मी म्हणेन सिद्धि तुजसी ॥मग जे कामना होईल देहासी ॥ते मी तुजला सांगेन
॥३०॥
तरी हे ऐसें परीक्षावचन ॥आधीं दावीं मजकारण ॥जैसा मोहोरा सूत गुंडोन ॥अग्नि रक्षी परीक्षे
॥३१॥
कीं पक्षिकुळातें हंसदृष्टीं ॥परीक्षे ओपी पयतोयवाटी ॥कीं परिसा पारख पाषाणथाटीं ॥लोह मिरवी कनकातें
॥३२॥
तेवीं आतां परीक्षापण ॥दावी मिरवूनि अपार सुवर्ण ॥तेणें मग संशयविरहित होवोन ॥गोड होईल चित्तातें
॥३३॥
ऐसें बोलतां रेवणनाथ ॥सिद्धि आश्चर्ये हास्य करीत ॥म्हणे महाराजा एक क्षणांत ॥कनकधनें भरीन सकळ मही
॥३४॥
मग सहज आणूनि कृपादृष्टीं ॥विलोकीतसे महीपाठीं ॥तों नगासमान कनकधनथाटी ॥अपार राशी मिरवल्या
॥३५॥
तें पाहूनि रेवणनाथ ॥म्हणे माते तूं आहेसी सत्य ॥तरी आतां संन्निध मातें ॥येथूनियां रक्षीं कां
॥३६॥
तूं सन्निध असतां सर्व काळ ॥पुरविसी सकळ इच्छाफळ ॥ऐसें बोलतां ती वेल्हाळ ॥बोलती झाली तयातें
॥३७॥
म्हणे सन्निध राहीन आतां ॥परी गुप्त वर्तेन जगाकरितां ॥तुवां न धरावी दर्शनस्पृहता ॥कार्य तुझें करीन मी
॥३८॥
मग अवश्य म्हणे रेवणनाथ ॥कार्यसंबंधी असावें उदित ॥मग कनकधनराशी गुप्त ॥अदृश्य सिद्धि मिरवली
॥३९॥
त्यावरी सायंकाळपर्यत ॥शेतीं प्रेरिलें समग्र आउत ॥मग गुरांसवें येऊनि गोठंगणांत ॥वृषभांतें बांधिलें
॥४०॥
रात्रीं करुनी शयनीं शयन ॥तों उदय झाला द्वितीय दिन ॥मग मनांत म्हणे ब्रह्मनंदन ॥व्यर्थ कां कष्टें कष्टावें
॥४१॥
शेतीं सायंकाळपर्यंत ॥संवत्सर हांकावें आउत ॥तरी आतां कष्ट केउतें ॥व्यर्थ शरीरा शिणवावें
॥४२॥
निधान असतां आपुले हातीं ॥दैन्य भोगावें कवणें अर्थी ॥परीस लाधला धनप्राप्ती ॥मेळवूं कां जावें देशांतरा
॥४३॥
सुरसुरभी असतां घरीं ॥तक्र मागावें घरोघरीं ॥चिंतामणी ग्रीवेंमाझारी ॥असतां चिंता कां भोगावी
॥४४॥
ऐशा कल्पना आणूनि चित्तीं ॥सोडोनि दिधलें जाणें शेतीं ॥तो दिन येत प्रहरमिती ॥सहनसारु बोलतसे
॥४५॥
म्हणे वत्सा सोडूनि आउत ॥गृहीं बैसलासी कवणे अर्थे ॥येरू म्हने जाऊनि शेतांत ॥काय ताता करावें
॥४६॥
कष्ट करितां रात्रंदिवस ॥काय मिरवले फळास ॥येरू म्हणे धान्य खावयास ॥पिकवावें पाडसा
॥४७॥
शेत पिकलिया अपार कर्णी ॥मग सुख भोगूनि अवनीं ॥नातरी भ्रांति खावयालागुनी ॥पुढे होईल बाळका
॥४८॥
ऐसें ऐकूनि तातवचन ॥म्हणे कष्टें पिकवावें शेतीं अन्न ॥तरी आपुले गृहीं काय न्यून ॥म्हणोनि आतां कष्ट करावे
॥४९॥
येरु म्हणे बा आपुल्या गृहासी ॥काय आहे न कळे मजसी ॥नित्य स्थापूनि येरयेरा कोरड्यासी ॥दिवसपरी लोटीतसें
॥५०॥
येरु म्हणे बोलसी खोटें ॥सदन भरलेसें कनकवटें ॥जाऊनि पहा खरे खोटे ॥बोल माझे महाराजा
॥५१॥
तंव तो हांसूनि सहजस्थितीं ॥गमन करीतसे धवळाराप्रती ॥तों कनकराशी धन अपरिमिती ॥गृहामाजी मिरवती
॥५२॥
तें पाहूनियां सहनसारुक ॥चित्तीं आश्चर्य मानी दोंदिक ॥म्हणे कैसे झालें कौतुक ॥बाळबोलेकरुनियां
॥५३॥
मग परम होवोनि हर्षयुक्त ॥म्हणे वरदपानी आहे सत्य ॥कोणी अवतारी प्रतापवंत ॥सिद्धमुनि हा असे
॥५४॥
मग तो सहनसारुक ऋषी ॥कदा न सांगे कवण्या कार्यासी ॥प्रमाण मानूनि त्याचे बोलासी ॥तदनुसारें वर्तत
॥५५॥
मग तो रेवण ब्रह्मसुत ॥काय करीतसे नित्यानित्य ॥बुंधल ग्राम तो थोर अत्यंत ॥मार्गावरी नांदतसे
॥५६॥
तैं पांथस्थ येतां मुक्कामासी ॥पाचारुनि नेतसे सदनासी ॥कामनेसमान आहारासी ॥अन्न देतसे नित्यशा
॥५७॥
मग गांवात पडली एक हांक ॥कीं रेवण देत अन्न उदक ॥मग चुंगावर चुंगा लोक ॥पांथिक सत्वर धांवती
॥५८॥
मग जैसी ज्याची इच्छा गहन ॥तैसी पुरवी नाथ रेवण ॥वस्त्रपात्र अपार धन ॥देवोनियां बोळवी
॥५९॥
रोगभोगादि मनुष्यें येती ॥तीं सर्व दुःखांची पावूनि शांती ॥धन्य म्हणूनि गृहासीं जाती ॥यशकीर्ति वर्णीत पैं
॥६०॥
मग जगांत होऊनि प्रसिद्ध ॥सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध ॥देशविदेशीं जनांचे वृंद ॥रेवणसिद्ध म्हणताती
॥६१॥
तों कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ ॥महीं करीत नानातीर्थ ॥बुंधलग्रामीं अकस्मात ॥मुक्कामातें पातला
॥६२॥
वस्तीसी धर्मशाळेंत राहून ॥करीत बैसला श्रीगुरुचिंतन ॥तों त्या गांवीचे कांहीं जण ॥धर्मशाळेंत पातले
॥६३॥
येतांचि त्यांनीं देखिला नाथ ॥म्हणती बाबा उतरलासी येथ ॥तरी सारावया आपुला भक्त ॥रेवणसिद्ध पहावा
॥६४॥
येरु पुसे त्यांतें वचन ॥रेवणसिद्ध आहे कोण ॥मग ते सांगती मुळापासून ॥कृषिकर्मी शोध हा
॥६५॥
ऐसे ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥जाऊनि पाहे अंतरीं गुप्त ॥तो दृष्टी देखतां म्हणे चित्तांत ॥अवतार असे हा एक
॥६६॥
आमुचा सांगाती पूर्णाश ॥हा नारायण प्राज्ञ चमस ॥तरी प्रसन्न कोण झाला यास ॥शोध करुं तयाचा
॥६७॥
पुनः येवोनि धर्मशाळेंत ॥लोकांसी म्हणे गुरु कोण यातें ॥कोण मिरवला जगातें ॥निजदेहाचें नाम सांगा
॥६८॥
तंव ते म्हणती बाबा नाथ ॥आम्हां नाहीं माहीत ॥मग स्तब्ध राहूनि मच्छिंद्रनाथ ॥काय करी महाराजा
॥६९॥
पक्षिकुळांतें पाचारुन ॥घालिता झाला इच्छाभोजन ॥एका करीं बैसवोन ॥तुष्ट करुनि बोळवी
॥७०॥
शिरीं स्कंधीं पक्षिमेळा ॥मच्छिंद्र बैसोनि वेष्टी सकळां ॥जाय म्हणतां उतावेळा ॥अंबरातें जाती पैं
॥७१॥
मग पाचारुनि वनचरांसी ॥त्यांसही देत आहारासी ॥आपुले हस्तें व्याघ्रसिंहांसी ॥ग्रास देत महाराजा
॥७२॥
ऐसे होतां कांहींएक दिवस ॥लोक म्हणती महापुरुष ॥हा ईश्वरचि म्हणूनि यास ॥श्वापद विहंगम स्पर्शिती
॥७३॥
मग धन्य धन्य म्हणूनि ख्याती ॥रेवणसिद्धासी सांगती ॥म्हणती आला आहे एक जती ॥सर्वापरी अदभुत
॥७४॥
विहंगमादि श्वापदगण ॥सहज घेतसे पाचारुन ॥तेही येती संशय सोडून ॥भेटीलागी तयाच्या
॥७५॥
करीं स्कंधीं करुनि आरोहण ॥अन्नोदकातें सेववून ॥जा म्हणतां करिती गमन ॥तृप्त मना मिरवोनि
॥७६॥
म्हणाल बोलणें व्यर्थ चावटी ॥तरी आपण पहावें तया दृष्टी ॥पक्षी श्वापदें कोट्यनुकोटी ॥तयापाशीं येताती
॥७७॥
ऐसें ऐकूनि रेवणसिद्ध ॥पाहूं चालिला प्रतापसिद्ध ॥तों येतां देखिले पक्षियांचे वृंद ॥करीं शिरीं मिरवले
॥७८॥
तें पाहूनि आश्चर्यवंत ॥म्हणे वनचरीं कैसें सांडिलें द्वैत ॥तरी फेडूं या संशयातें ॥प्रत्यक्ष सिद्ध कोण हा
॥७९॥
मग शीघ्र येवोनि आपुले सदनीं ॥जाऊनि बैसले एकांत स्थानीं ॥दत्तमंत्र प्रयोगूनी ॥प्रत्यक्ष करुं सिद्धीतें
॥८०॥
मग होतां प्रत्यक्ष सिद्धी ॥म्हणे महाराजा विशाळबुद्धी ॥कवण कामने काय सिद्धी ॥प्रत्यक्ष केलें तुवां मातें
॥८१॥
येरु म्हणे वो कृपासरिते ॥तुष्ट करिसी सर्व जनांतें ॥तेचि रीतीं पक्षिकुळांतें ॥तुष्ट करी श्वापदें कीं
॥८२॥
तुष्ट करिसी तरी कैसें ॥हरुनि त्यांच्या देहबुद्धीस ॥मम सन्निध स्वअंगास ॥संगोपावें जननीये
॥८३॥
येरी ऐकोन वागुत्तर ॥म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर ॥होणार नाहीत अद्वैतपर ॥ब्रह्मवेत्त्यावांचोनी
॥८४॥
जो स्थावर आणि जंगमांत ॥सर्वाचि नांदे हदयांत ॥तयाचिया गोष्टी ह्या निश्चित ॥जो अद्वैतपणें वसतसे
॥८५॥
हे महाराजा ऐक बोला ॥जो जळरुपीच होऊनि ठेला ॥तो जळामाजी मिळावयाला ॥अशक्य काय उरेल जी
॥८६॥
तेवीं ब्रह्मपरायण होतां ॥मग चराचरीं नुरे द्वैतवार्ता ॥अद्वेष्टा झाला सर्वभूतां ॥चराचरी महाराजा
॥८७॥
मग तो प्राणी सर्वभूत ॥जगातें मानी आप्त ॥आणि मग तेही मानिती त्यातें ॥सखा सोइरा कीं आमुचा
॥८८॥
तरी आतां श्लाघ्यवंत ॥आधीं व्हावें ब्रह्मव्यक्त ॥त्यावरी बोले रेवणनाथ ॥ब्रह्मवेत्ता करीं मातें
॥८९॥
येरी म्हणे चातुर्यखाणी ॥अत्रिनंदन तुझा स्वामी ॥त्यातें स्तवोनि उगमी ॥साध्य करुनि घेई कां
॥९०॥
तुज तो साह्य झाल्या जाण ॥मग पक्षिश्वापदीं अद्वैतपण ॥काय असें तेवढें कठिण ॥देवादिक येतील कीं
॥९१॥
स्वर्लोक भूलोक तपोलोक ॥स्वर्गवासी सुरवर अनेक ॥चरणसेवा दोंदिक ॥वांछितील मग तुझी
॥९२॥
ऐसें सिद्धी बोलतां वचन ॥चित्तीं म्हणे हेंचि करीन ॥मग सर्व त्याग करुन ॥काननांत प्रवेशे
॥९३॥
जयाठायीं भेटला दत्त ॥तेथें जाऊनि बैसला नाथ ॥दत्तस्मरणीं ठेवूनि चित्त ॥वाट पाहे भेटीची
॥९४॥
मनीं दाटला भेटीचा योग ॥तेणें अन्नोदकाचा झाला त्याग ॥मग दिवसेंदिवस शरीरभोग ॥शुष्ककाष्ठ दाहीतसे
॥९५॥
चालले तरुचें पर्णभक्षण ॥येतसे काय जें उडून ॥दत्तवियोगें भेटांकारणें ॥काये वाचे वेला
॥९६॥
मग तें पाहून मच्छिंद्रनाथ ॥म्हणें हा लागला प्रयत्नांत ॥परी कोण गुरु आहे त्यातें ॥समजला नाहीं अद्यापि
॥९७॥
अहा गुरु तो ऐसा कैसा ॥काळरत्ना दृढोत्तर घालूनि फांसा ॥गेला आहे अभ्यासमासा ॥निष्ठुर मन करुनियां
॥९८॥
मग रेवणसिद्धाचा प्रताप ॥पुसूनि घेतला जनमुखें माप ॥ते म्हणती तो आहे जगबाप ॥परोपकारी असे कीं
॥९९॥
कितीएकां घातलें इच्छि अन्न ॥कितीएकां दिधलें अपार धन ॥अपार जगाते अकिंचनपण ॥अर्थाअर्थी हरीतसे
॥१००॥
ऐसी ऐकूनि जनाची गोष्टी ॥चित्तीं म्हणे हा प्रतापकोटी ॥सिद्धी सकळ साधला जेठी ॥कोठेतरी गुरुकृपें
॥१०१॥
तरी आतां सिद्धि कोण ॥झाली आहे या स्वाधीन ॥त्या सिद्धीतें पाचारुन ॥वृत्तांत श्रुत व्हावा कीं
॥१०२॥
मग अणिमा गरिमा लघिमा महिमा ॥ईशित्व वशित्व प्राप्ति प्रकामा ॥ऐशा अष्टसिद्धि नामा ॥पाचारिल्या प्रत्यक्ष
॥१०३॥
प्रत्यक्ष होत त्या शुभाननी ॥श्रीनाथाच्या लागल्या चरणीं ॥नाथ म्हणे त्यातें पाहुनी ॥उत्तर मज सांगावें
॥१०४॥
रेवणसिद्ध हा महापुरुष ॥त्याचे सिद्धि दासत्वास ॥कोणती सांगा आहे आम्हांस ॥गुरुवाक्येंकरुनियां
॥१०५॥
तंव ती बोलती झाली महिमा ॥मातें ओपिलें दास्यनेमा ॥श्रीदत्तात्रेययोगद्रुमें ॥मंत्रसिद्धिकरुनियां
॥१०६॥
मग दत्तात्रेय हा ऐकूनि गुरु ॥म्हणे हा बंधूचि साचारु ॥आहे तरी सर्वापारु ॥हित इच्छिणें तयाचें
॥१०७॥
जैसा अर्धपिंडी भाग ॥मारुतिदेहीं उद्भवला योग ॥परी सीताहरणीं भोगिला भोग ॥साह्य होऊनि तयासी
॥१०८॥
किंवा मागील संगेंकरुन ॥गोपाळ झाले वानरगण ॥सर्व साह्य होऊन ॥माहात्म्यीं कृष्ण वाढविला
॥१०९॥
तेवीं आपुली ऐसी मती ॥चमस नारायण स्वसंगतीं ॥तरी या रेवणसिद्धाप्रती ॥साह्य आपण व्हावें सर्वस्वीं
॥११०॥
मग तेथूनि निघे अतिवेग ॥गिरनारपर्वती आला चांग ॥भेटूनि अत्रिआत्मजयोग ॥रेवणसिद्धाचें वृत्त कथियेलें
॥१११॥
सकालपणीं चरणी माथा ॥ठेवूनि म्हणे अनाथनाथा ॥हे गुरुराजा दयावंता ॥साधकहिता भास्करु
॥११२॥
तरी अवनीं अवतारपूर्ण ॥प्राप्तिक चमसनारायण ॥तो तुम्हांकरितां क्लेश दारुण ॥महीलागीं भोगीतसे
॥११३॥
निर्वाण धरुनि चित्तीं ॥बैसला आहे काननाप्रती ॥तरी कृपाबोध मारुतगती ॥तयावरी सिंचावा
॥११४॥
अहा एक सिद्धी आणूनि त्या भास ॥घालूनि गळां दृढोत्तर फांस ॥तरी तो फांस झाला क्लेश ॥मरणवाट त्या दावी
॥११५॥
जेथें झाली तुमची भेटी ॥तेथेंचि बैसला काननपुटीं ॥आहार त्यजूनि प्राण कंठीं ॥आणूनियां ठेविला तो
॥११६॥
त्वचा झाली अस्थिव्यक्त ॥देहींचें रुधिर आटलें समस्त ॥प्राण कासावीस चक्षु श्वेत ॥कार्पाससम दिसताती
॥११७॥
सरागींच्या शिरा दृश्या ॥ढळढळीत दिसती महापुरुष ॥पोटपाठ ऐक्यलेश ॥हरिकटीसम मिरवत
॥११८॥
तरी महाराजा सदैव माउलें ॥वत्सा करावे काय इतुलें ॥अवकृपा करणें नव्हे भलें ॥महीलागीं मिरवावें
॥११९॥
लोहाचे कनक करी परिस ॥तेणें सांडिला पाकरस ॥तरी परीस ऐसें कोण त्यास ॥म्हणेल दगड मिरवेल
॥१२०॥
कीं एक तमाचा अरि पूर्ण ॥तेणें साडिलें चांगुलपण ॥मग सविताराज तया कोण ॥महीलागीं बोलेल कीं
॥१२१॥
आमुचा वरदपाणी ॥स्पर्शिता जाय मौळीलागुनी ॥मग तो सर्वालागूनि अवनीं ॥ठेंगणेपणीं मानीतसे
॥१२२॥
ऐसी चाल सहजस्थित ॥गुरुची असे कृपा मूर्त ॥तरी रेवणनाथदेहआहुत ॥कष्टानळी न सांडावी
॥१२३॥
पहा जीवनें केली लावणी ॥सुखा आणिलें थोरपणीं ॥ते शुष्क केलिया मोहेंकरुनी ॥बुडवूं न शके जीवन तें
॥१२४॥
त्याचि नीतीं पीयूषाभास ॥सेविल्या ओपी संजीवनपणास ॥तें पुढें कोपल्या मृत्युपदास ॥पाठवील कीं महाराजा
॥१२५॥
तरी त्या पीयूष रसाच्या गांवीं ॥स्वप्नामाजी मृत्यु नाहीं ॥तैसें तुमच्या हदयीं ॥औदार्य बहु वसतसे
॥१२६॥
ऐसे बोल त्या युक्तिवानाचे ॥ऐकूनि दत्तहदयीं प्रेम नाचे ॥डोलवूनि ग्रीवा साचें ॥हास्य करी आनंदें
॥१२७॥
मग तो उदार शांत दाता ॥सवे घेऊनि मच्छिंद्रनाथा ॥व्यान अस्त्र जल्पूनि चित्ता ॥तया ठायीं पातले
॥१२८॥
परी त्या उभय भव्यमूर्ती ॥जैसे उतरले दोन गभस्ती ॥कीं इंद्र वाचस्पती ॥प्राज्ञिकपणीं मिरवले
॥१२९॥
कीं एक हरि एक हर ॥कीं द्रोण मंदराचल किमयागार ॥प्रेममारुता होऊनी स्वार ॥तया ठायीं पातले
॥१३०॥
तों येतांचि देखिला रेवणनाथ ॥कृश शरीर काष्ठवत ॥अस्थिमय प्राण व्यक्त ॥वाट पाहे दत्ताची
॥१३१॥
अतिक्लेशी कंठीं प्राण ॥पाहूनि श्रमला अत्रिनंदन ॥प्रेमें कवळिला सदयपणें ॥माय जैसी बाळकातें
॥१३२॥
कीं वत्सलागीं जैसी गाय ॥हंबरडा फोडी अति मोहें ॥तेवीं अत्रिनंदनें प्रेमहदयें ॥प्रियभावें आलिंगिला
॥१३३॥
तेणेंही चरणीं ठेवूनि माथा ॥होय प्रेमाक्षु ढाळिता ॥म्हणे आजी भेटली माझी माता ॥निढळवाणी वत्सातें
॥१३४॥
मग तो महाराज तपोराज ॥हदयीं धरी अत्रिआत्मज ॥मग साधकहिताचें चोज ॥उल्हासें ओपीतसे
॥१३५॥
जैसें सुतालागीं तात ॥हिता ओपूनि परत्र होत ॥तेवीं दूर्वाससहोदर मोहित ॥होऊनि हिता मोहीतसे
॥१३६॥
परम आराधूनि कृपें न्याहाळी ॥कर्णी ओपिली मंत्रावळी ॥तेणें तदघटी अज्ञानकाजळीं ॥निघूनि गेली सर्वस्वीं
॥१३७॥
मग तो ज्ञानी हदयीं दिवटा ॥नृत्य करीतसे तत्त्वचोहटा ॥तेणें करुनि द्वैतकांटा ॥अंकुरातें खुडियेला
॥१३८॥
मग कृपें आराधूनि वज्रशक्ती ॥भाळीं चर्चिली दिव्य विभूती ॥तेणेंकरुनि देहस्थिती ॥शक्तिवान मिरवली
॥१३९॥
मग सवें घेऊनि रेवणनाथ ॥गिरनारपर्वती गेला दत्त ॥तेथें बैसूनि दिवस अमित ॥विद्यावसन नेसविलें
॥१४०॥
ब्रह्मज्ञानरसायन ॥विपुलपणीं केलें पान ॥तेणेंकरुनि ऐक्यपण ॥चराचरीं मिरवलें
॥१४१॥
ऐसा झाला तयातें आभास ॥कीं मीच स्वामीचा भास ॥मीच व्याप्त चराचरीं असें ॥एकदेहीं मिरवलों
॥१४२॥
मग पक्षिकुळा वनचरां सहित ॥अचलपणी पापाणलता ॥समीप येती पाचारितां ॥रेवणनाथा वंदावया
॥१४३॥
ऐशी अद्वैत दृष्टी होतां ॥मग रसायणादि शीघ्र कविता ॥वेदपाठी ज्योतिषअर्था ॥प्रवीण कळा व्याकरणीं
॥१४४॥
धनुर्धर जळतरणी ॥वैद्य नाटकें चातुर्यगीत गायनी ॥कोकशास्त्रादि अश्वारोहणी ॥चतुर्दशविद्या निरोपिल्या
॥१४५॥
उपरी नानाशास्त्रप्रवीण ॥अस्त्रें सांगितलीं मच्छिंद्रासमान ॥वज्रअस्त्रादि वाताकर्षण ॥संजीवनी सांगितली
॥१४६॥
वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र ॥नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र ॥जलदअस्त्रादि खगेंद्रास्त्र ॥ब्रह्मास्त्रादि निरोपिलीं
॥१४७॥
निर्वाण रुदास्त्र वासवशक्ती ॥देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्रगती ॥असो ऐसे वर्णितां किती ॥अपार अस्त्रीं मिरविला
॥१४८॥
मग नाथपंथीं दीक्षा देऊन ॥उन्मनी मुद्रा फाडिले कान ॥तत्त्वामाजीं दिव्यज्ञान ॥गळां कंथा ओपिली
॥१४९॥
देवविती शुद्ध सारंगी ॥अनुहत वाजे नाना अंगीं ॥कुबडी फावडी देहप्रसंगीं ॥देह विदेही मिरवला
॥१५०॥
ऐसा होऊनि पूर्ण स्थित ॥मग सवें घेऊनि मच्छिंद्रनाथ ॥मार्तडपर्वतीं गेले त्वरित ॥नागेश्वरस्थाना वंदिलें
॥१५१॥
तेथें करुनि देवदर्शन ॥वरद घेतला विद्येकारणें ॥मग साबरीविद्या कवित्वरचन ॥महीवर मिरवीतसे
॥१५२॥
असो सर्व साध्य झाल्यावरी ॥मावदे मांडिले बहुतां गजरीं ॥हरिहरादि साह्यकारी ॥गिरिनारपर्वतीं आणिलें
॥१५३॥
सुवर्लोक भूलोक तपोलोक ॥स्वर्गवासी पुण्यश्लोक ॥गणगंधर्व सुरवर अनेक ॥मावद्यास आणिले
॥१५४॥
ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनीकुमार चंद्र भास्कर ॥सकळ समुच्चय पर्वताकार ॥मावद्याते पातले
॥१५५॥
चार दिवस यथायुक्त ॥सोहळा भोगिला अपरिमित ॥मग प्रसन्न होऊनि सकळ दैवतें ॥पूर्ण वरा ओपिलें
॥१५६॥
वर देऊनि सकळ विद्येसी ॥जात झाले स्वस्थानासी ॥रेवणासिद्धही तीर्थाटनासी ॥अत्रिआत्मजें पाठविला
॥१५७॥
तीर्थे हिंडतां अपार महीसी ॥तों विठग्राम मानदेशीं ॥तेथें येऊनि मुक्कामासीं ॥सहजस्थितीं राहिला
॥१५८॥
तों तेथें सरस्वती ब्राह्मण ॥जान्हविका स्त्री तयालागून ॥लावण्यलतिक स्वरुपवान ॥चंद्रासी वदनें लाजवितसे
॥१५९॥
उभय स्त्रीपुरुष एकचित्ती ॥जेवीं ते लोहचुंबकरीती ॥किंवा जगप्रिय गमस्ती ॥अवियोगप्रीतीं वाहिले
॥१६०॥
कीं मीनतोयाची संगती ॥कीं विवरस्थाची एकनीती ॥कीं भावाअंगी सिद्धभक्ती ॥सदा धवळारीं नांदतसे
॥१६१॥
तन्न्याये उभयतां जाण ॥प्रपंच वहिवाटिता एकप्रमाण ॥परी इतुकें असोनि जठरीं संतान ॥शून्यपणें मिरवत
॥१६२॥
सप्त पुत्र झाले तयासी ॥परी ते बाळपणीं पंचत्व देहासी ॥सातवें आठवे दिवशीं ॥दहावे दिवशीं पंचत्व होय
॥१६३॥
असो षटपुत्र देहान्त पावले ॥यावरी सातवे उदय पावले ॥ते द्वादश दिन वांचलें ॥तेणें हर्षलें विप्रमन
॥१६४॥
कांतेती म्हणे परम वेल्हाळे ॥पंचम षष्ठ भक्षिले काळे ॥हें द्वादश दिन वांचले केवळ ॥काळवेळ लोटली येणें
॥१६५॥
एक आणि चुकल्यापरीस ॥तों दश वर्षांचा होय आयुषी ॥तरी आतां या पुत्रासी ॥भय नसे सर्वथा गे
॥१६६॥
ऐसें कांतेसी बोलून वचन ॥बारसें मांडिलें परम आवडीनें ॥गृहीं करुन पंचपक्कान्नें ॥घाली भोजन विप्रांसी
॥१६७॥
तों ते दिवशीं रेवणनाथ ॥भिक्षा करीत आला तेथ ॥अलक्ष गाजवूनि त्या द्वारातें ॥पुढे पाऊल ठेवीतसे
॥१६८॥
तंव त्या विप्रें देखिलें दुरोनी ॥वाढतें पात्र ठेविलें धरणीं ॥तैसाचि बाहेर येऊनी ॥नाथानिकट लगबगें
॥१६९॥
तंव तेजःपुंज हाटककांती ॥देखतां विप्र म्हणे चित्तीं ॥हा पूर्व तापसी अवतार क्षितीं ॥कोणी तरी आहे कीं
॥१७०॥
तैसाचि सोहळा लगबगेंकरुन ॥नाथचरणीं मस्तक ठेवोन ॥म्हणे महाराजा प्रयोजन ॥माझे घरीं आहे कीं
॥१७१॥
ऐसें असोनि मज दरिद्रियाचे मनोरथ ॥डावलूनि जातां किमर्थ ॥तरी हे तुम्हां नव्हे यथार्थ ॥अनाथा सनाथ करावें
॥१७२॥
मी हीन दीन जाति ब्राह्मण ॥काय करावा उत्तम वर्ण ॥सेवाचोर अतिथिकारणें ॥व्यर्थ संसारीं मिरवतों
॥१७३॥
ऐसें बोलोनि म्लान वाणी ॥माथां वारंवार ठेवी चरणीं ॥आपुला वर्णाश्रम टाकोनि ॥विव्हळ झाला भावार्थे
॥१७४॥
त्यावरी नाथ बोले त्यासी ॥आम्ही शूद्र तूं विप्र मिरविसी ॥मज नमस्कारावया तुजसी ॥अर्थ नाहीं जाणिजे
॥१७५॥
येरु ऐकूनि बोले वचन ॥शूद्र जातीचा ब्राह्मण ॥तो मातंगा करील नमन ॥अन्य वर्ण चुकेल कैसा
॥१७६॥
कडू भक्षिता काय होय गोड ॥होणार नाहीं धडफुढा ॥प्राज्ञिक मानिला जेणें वेडा ॥तरी त्या पंडिता धिक्कार
॥१७७॥
तरी ऐसें वर्म निपुण ॥मज कैसे येईल घडून ॥परी देखावें श्रेष्ठ वचन ॥ऐसी विनंती करीतसे
॥१७८॥
ऐसें बोलतां विप्र त्यातें ॥मनांत म्हणे रेवणनाथ ॥हा विप्र आहे प्रज्ञावंत ॥बोलापरी चालतसे
॥१७९॥
नातरी बोल बोलतां सोपे ॥आचार दावितां टीर कांपे ॥तरी आतां असो यातें स्वल्प ॥सिद्धार्थातें मेळवंच
॥१८०॥
मग विप्राचा धरुनि हात ॥संचार करी त्याचे गृहांत ॥विप्रें नेवोनि स्वसदनांत ॥महाराज बैसविला
॥१८१॥
पात्र लगबगें आणी वाढून ॥सर्व पदार्थ भरी प्रेमेंकरुन ॥पात्रानिकट बैसोन ॥भोजन सारी नाथाचें
॥१८२॥
अन्य विप्रां विप्र नेमून ॥सकळाचें करी संगोपन ॥परी आपण न उठे नाथापासून ॥परमभक्तीसी गुंतला
॥१८३॥
जैसी शर्करेसी पिपीलिका ॥काढूं जातां दडपी मुखा ॥तेवीं भक्तीचा धरुनि आवांका ॥विप्र गुंतला नाथभक्ती
॥१८४॥
असो ऐसे परम भक्तीं ॥नाथाची झाली जठरतृप्ती ॥येरीकडे विप्रपंगती ॥गेले भोजन सारुनियां
॥१८५॥
विप्र गेले आपुले सदनीं ॥येरीकडे नाथालागूनी ॥भोजन झाल्या नम्र वचनीं ॥बोलता झाला विप्र तो
॥१८६॥
म्हणे महाराजा आजिचा दिन ॥वस्तीसी सेवावें माझें सदन ॥उदयिक प्रातःकाळीं उठून ॥जाणें असेल तरी जावें
॥१८७॥
पाहूनि तयाचा परम आदर ॥अवश्य म्हणे विधिकुमर ॥एकांतस्थानीं शयनावर ॥नाथा नेऊनि पहुडविलें
॥१८८॥
नाथ शयनीं होतां निद्रित ॥आपण भोजन सारुनि त्वरित ॥वारासार करुनि येत ॥नाथापाशीं त्वरेनें
॥१८९॥
तों सूर्य गेला अस्तासी ॥मग उठूनि बैसला तापसी ॥पुन्हा वंदूनि नाथचरणांसी ॥उपाहार करवा म्हणतसे
॥१९०॥
तंव नाथ म्हणे आतां भोजन ॥झालें आहे न इच्छी मन ॥मग आपुला नित्यनेम सारुन ॥पुन्हां शयनीं पहुडला
॥१९१॥
सरस्वती ब्राह्मण निकट बैसून ॥नाथाचे चुरीतसे चरण ॥तों मध्यरात्री झाली पूर्ण ॥तेव्हां विपर्यास वर्तला
॥१९२॥
बाळ जें होतें मातेपाशीं ॥सटवीनें झडपिलें त्यासी ॥परम तें झालें कासाविशी ॥शोकसिंधु उचंबळला
॥१९३॥
हांक मारी स्वभर्त्यातें ॥म्हणे बाळ कासाविसी बहु होतें ॥विप्र म्हणे त्या कांतेतें ॥होईल तैसें होऊं दे
॥१९४॥
तूं न करीं आतां कांही अनुमान ॥निद्राभंग होईल नाथाकारण ॥आपुलें प्रारब्ध मुळींच हीन ॥बरवें कैसें होईल गे
॥१९५॥
मागें आचरलों कांहीं पाप ॥तें भोगितों अमूप ॥आतांहि मोडितां स्वामीची झोंप ॥सुलभ पुढें दिसेना
॥१९६॥
ऐसें बोलूनि कांतेतें ॥श्रीनाथाचे चरण चुरीत ॥तों सवितासुताचे येऊनि दूत ॥बाळ पाशीं आकर्षिला
॥१९७॥
काढूनि चैतन्य जीवदशारुप ॥घेऊनि गेले यमासमीप ॥येरीकडे शवस्वरुप ॥बाळदेहीं मिरवलें
॥१९८॥
मग तो मायेचा मोह दारुण ॥हदयीं पेटला विरहअग्न ॥मग मंद रुदन भरतां नयन ॥जान्हवी तेव्हां करीतसे
॥१९९॥
तों प्रातःकाळसमय झाला ॥शयनीं नाथ जागृत झाला ॥तों मंद रुदनार्थ आकर्णिला ॥एकाएकीं तयानें
॥२००॥
नाथें ऐकूनि मंद रुदन ॥विप्रासी म्हणे रडतें कोण ॥येरु म्हणे बाळकाचा प्राण कासावीस होतसे
॥२०१॥
म्हणोनि मोहस्थित नाथा ॥अज्ञानपणीं रडतें कांता ॥ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ॥बाळा आणीं म्हणतसे
॥२०२॥
मग तो विप्र स्वकांतेपाशीं ॥येऊनि पाहे स्वपुत्राची ॥तंव तें मिरवलें प्रेतदशेसी ॥हांका मारुनि तेधवां
॥२०३॥
म्हणे महाराजा प्राणरहित ॥बाळ झालें निश्चित ॥ऐसें ऐकूनि रेवणनाथ ॥परम चित्तीं क्षोभला
॥२०४॥
म्हणे मी या स्थळीं असतां ॥कैसा डाव लाधला कृतांता ॥तरी तो कृतांत पाहीन आतां ॥पाहूनि नाहींसा करीन मी
॥२०५॥
ऐसे दुर्घट शब्द वदोन ॥ब्राह्मणासी म्हने बाळ आण ॥तंव तें शरीर उचलोन ॥नाथालागीं अर्पीतसे
॥२०६॥
तंव तें बाळ परम गोमटें ॥नाथ पाहे आपुले दृष्टीं ॥चित्तीं हळहळूनि म्हणे नष्ट ॥कर्म काय उदेलें
॥२०७॥
विप्रासी म्हणे बाळ तूतें ॥इतुकेचि झाले काय नितांत ॥येरी म्हणे कृपावंत ॥बाळ सातवें हें असे
॥२०८॥
बाळ होतां बाळंतपर्णी ॥मृत्यु पावले पंचसप्तादिनी ॥द्वादशदिन तपः प्राज्ञी ॥बाळ सातवें हें असे
॥२०९॥
तरी आतां असो कैसें ॥हीन प्रारब्ध आहे आम्हांस ॥तें सुफळपणीं कर्मलेश ॥फळा कैसें येईल कीं
॥२१०॥
परी असो होणार तें झाले ॥आमुचे सेवेसी चित्त रंगलें ॥तें पुण्यांश हेंचि इतुलें ॥वारंवार लाधो कीं
॥२११॥
ऐसी बोलतां विप्रहाणी ॥अंतर जाणितलें प्रांजळपणीं ॥मग सरस्वतीविप्रा पाचारुनी ॥बोलता झाला महाराजा
॥२१२॥
म्हणे वत्सा तीन दिवस ॥जतन करीं बाळतनूस ॥मी स्वतः जाऊनि यमपुरी ॥साती बाळें आणितों कीं
॥२१३॥
मग अमरमंत्र मंत्रूनि विभूती ॥चर्चिली बाळशवाप्रती ॥म्हणे विप्रा बाळ हें क्षितीं ॥येणें नासणार नाहीं रे
॥२१४॥
ऐसें सांगूनि त्वरितात्वरित ॥तेथूनि निघता झाला नाथ ॥व्यानअस्त्र जल्पूनि सनाथ ॥अतिवेगेंसीं चालिला
॥२१५॥
भोंवतें अस्त्रांचें करी भ्रमण ॥तेणें हिमालयाचे अंबुकण ॥शीतळ करुनियां जाण ॥यथास्थित मिरवले
॥२१६॥
जैसे शीताचे झुळकेआंत ॥समीप पावक निश्वित ॥तेणेंकरुनि शरीरांत ॥बाधा न करी अंगातें
॥२१७॥
तेवीं आदिनामास्त्र ॥सव्य मेळवूनि योगपात्र ॥व्यानास्त्र मुखीं स्तोत्र ॥जल्पूनि गिरि वेधला
॥२१८॥
सहज चालिला यमपुरीं ॥संचर करी यक्षधवळारीं ॥तो धर्मराज पाहूनि नेत्रीं ॥आसनाहूनि उठालासे
॥२१९॥
बैसवूनि आपुले कनकासनीं ॥षोडशोपचारें पूजिला मुनी ॥सहज करपुटीं नम्र वाणी ॥धर्मराजें आरांधिला
॥२२०॥
म्हणे महाराजा योगदक्ष ॥किमर्थ कामीं योजिला पक्ष ॥तरी तें वदूनि सुढाळ पक्ष ॥मज यक्षातें तुष्टवीं
॥२२१॥
येरु म्हणे यमपुरनाथा ॥मी सरस्वतीविप्राचे घरीं असतां ॥तुवां येऊनि तयाच्या सुता ॥हरण केलें कैसें रे
॥२२२॥
तरी जें घडूं नये तें घडलें ॥परी आतां मागुती देइजे वहिलें ॥आणि षटपुत्र त्याचे कोठें ठेविले ॥तेही आतां देई आणोनी
॥२२३॥
तरी या बोलासी वर्तन ॥तूतें न ये जरी घडून ॥मग मम कोपाचा प्रळयाग्न ॥उरों न देई तुजलांगीं
॥२२४॥
ऐसें बोलतां रेवणनाथ ॥विचार करी तेजोब्धिसुत ॥म्हणे चांगलें बोलूनि यातें ॥शिवधरेतें धाडावा
॥२२५॥
आपुल्या सर्वस्वीं निमित्याकडून ॥अधिकारी करावा उमारमण ॥हा सिद्ध तेथें गेल्यानें ॥दृष्टीं पडेल प्रतापू
॥२२६॥
ऐसा विचार करुनि मानसीं ॥बोलता झाला योगियासी ॥म्हणे महाराजा मम बोलासी ॥चित्त द्यावें यथार्थ
॥२२७॥
हे महाराजा हरिहर ॥आणि तिजा तो नाभिकुमर ॥हे मुख्य यांचा कारभार ॥सकळ करणें तयांचें
॥२२८॥
जरी म्हणाल कैसे रीतीं ॥त्रिवर्ग त्रिकामीं असती ॥शिव क्षयी विधि उत्पत्तीं ॥रक्षणशक्ति विष्णूचि
॥२२९॥
तरी यक्षपति तो तमोगुणविहारी ॥आम्ही त्याची करितों चाकरी ॥मारणें तारणें आमुच्या करीं ॥कांहीं एक नसे जी
॥२३०॥
तरी आतां प्रतापराशी ॥गमन करावें कैलासासी ॥आराधूनि शिवचित्तासी ॥सप्तपुत्र न्यावे जी
॥२३१॥
आणीक खूण सांगतों उत्तर ॥तेथेंचि आहेत सप्तकुमर ॥तरी दावूनि आपुला बुद्धिसंचार ॥कार्य आपुलें करणें जी
॥२३२॥
मजवरी जरी आलां आपण कोपोन ॥तरी मी काय हीनदीन ॥क्षयकर्ता उमारमण ॥प्रसिद्धपणीं मिरवतसे
॥२३३॥
क्षयकर्ता आहे भव चराचरीं ॥शास्त्रादि बोलती साचार ॥आपणही आहांत जाणिव सर्व ॥अंतरंग सर्वाचें
॥२३४॥
ऐसें असोनि महाराज ॥कां कोपानळी योजितां मज ॥सोज्ज्वळतेजीं अर्कराज ॥तमधवळारा नांदवितां
॥२३५॥
तुम्ही सर्वांचे ज्ञानदिवटे ॥कूपीं पडतां अज्ञानवाटे ॥हें योग्य नव्हे तुम्हां हळवटे ॥धोपटपंथीं मिळाना कां
॥२३६॥
ऐसें बोलतां धर्मराज ॥मान तुकावी तेजःपुंज ॥म्हणे हें पंचाननाचे काज ॥तें सत्यार्थ बोलसी तूं
॥२३७॥
तरी आतां कैलासीं जाईन ॥कैसा आहे पंचानन ॥तो सर्व दृष्टीं पाहीन ॥अमित्रपन त्यासुद्धां
॥२३८॥
ऐसें बोलूनि योगधारणी ॥उठता झाला मग तेथुनी ॥व्यानअस्त्र मुखीं स्तवोनी ॥कैलासातें पातला
॥२३९॥
आतां तेथें कथासार ॥होईल तितुकी धुंडीकुमर ॥मूळ काव्य ग्रंथापर ॥नरहरिकृपें वर्णीत
॥२४०॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥पंचत्रिंशाध्याय गोड हा
॥२४१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥