श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ३२
त्रिविक्रमराजाची कथा, राजाच्या मृत्युनंतर त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाचा संचार. १९२ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजय जगदुद्धारा ॥जगदाश्रिता रुक्मिणीवरा ॥दीनबंधो दयासागरा ॥वीरा सुरवरा तूं एक
॥१॥
तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा ॥सुरवरांप्रती जैसा मघवा ॥तरी आतां कृपार्णवा ॥ग्रंथादरीं येईं कां
॥२॥
मागिले अध्यायीं कथन ॥चौरंगी बैसे तपाकारण ॥उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन ॥गिरनारगिरीं पोचले
॥३॥
पोचले परी आनंदभरित ॥प्रेमें वंदिला मच्छिंद्रनाथ ॥पुढें पाहतांचि अत्रिसुत ॥आनंदडोहीं बुडाला
॥४॥
मच्छिंद्रातें कवळूनि हदयीं ॥म्हणे माझी आलीस गे आई ॥चक्षु मीनले तुझे ठायीं ॥मार्ग पाहें पाडसापरी
॥५॥
जैसें इंदूचें आगमन ॥तिकडेचि हेलावे समुद्रजीवन ॥तेवीं तुझे मार्गेकरुन ॥चक्षू वेधले माझे बा
॥६॥
तरी आतां असो कैसें ॥माझें मला भेटलें पाडसें ॥तरी वत्सा सांडूनि आम्हांस ॥जाऊ नको पुढारां
॥७॥
ऐसी धृति वृत्ति मती ॥ऐक्य झाली उभयव्यक्ती ॥जैसें जळ जळाप्रती ॥ऐक्य होय मेळवितां
॥८॥
मग नाना गोष्टी विचारप्रसंग ॥तीर्थगमनादि योगसंयोग ॥दुःखसुखादि सकळ प्रयोग ॥एकमेकां निवेदिले
॥९॥
आसन वसन भोजन शयनीं ॥सदा सन्निध मच्छिंद्रमुनी ॥जैसें अर्भका तान्हूले मनीं ॥माय नातळती होईना
॥१०॥
ऐसे मोहाचिये परी ॥षण्मास लोटले तैं गिरीं ॥यापरी गोरक्ष सदनांतरीं ॥तीर्थस्थानीं जल्पतसे
॥११॥
मग तो श्रीदत्ताकारण ॥म्हणे महाराजा अत्रिनंदन ॥तीर्थ केलें साधुदर्शन ॥करावया महाराज
॥१२॥
तरी आम्हां आज्ञा द्यावी ॥आतां लंघूनि येतों मही ॥मही धुंडाळल्या संगमप्रवाहीं ॥साधु मिरवती महाराजा
॥१३॥
तरी याचि निमित्ताकारणें ॥आम्ही घेतला आहे जन्म ॥सकळ जगाचें अज्ञानपण ॥निवटावया महाराजा
॥१४॥
ऐसें बोलतां गौरसुत ॥दत्त ग्रीवा तुकावीत ॥आणि पुढील जाणूनि भविष्यार्थ ॥अवश्य म्हणे पाडका
॥१५॥
मग परमप्रीतीं स्नेहेंकरुन ॥बोळविता झाला उभयांकारण ॥येरीं उभयें करुनि नमन ॥पर्वताखाली उतरले
॥१६॥
मार्गी चालती उभय जण ॥परी त्या पर्वता क्षणोक्षण ॥पाहे मच्छिंद्रनंदन ॥म्हणे प्राण अंतरला
॥१७॥
प्रेमाक्षु ढाळी नयनीं ॥पुढें ठेवी पदालागुनी ॥ऐसें चालतां तया अवनीं ॥दुरदुरावा पडला असे
॥१८॥
मग मार्ग धरुनि काशीपुरी ॥चालते झाले ते अवसरीं ॥मुक्कामोमुक्काम लंघितां धरित्री ॥प्रयागस्थानीं पातलें
॥१९॥
तों त्या गांवीं मूर्तिमंत ॥औदार्यराशि प्रतापादित्य ॥त्रिविक्रम नामें नृपनाथ ॥धर्मप्राज्ञी नांदतसे
॥२०॥
गज वाजी रथ संगतीं ॥जयाची सेना अपरिमिती ॥तरी अधर्मनाशार्थ निगुतीं ॥सैन्यसिंधू मिरवला
॥२१॥
भद्रासनी तो राजेश्वर ॥जयाची संपत्ति औडंबर ॥पाहूनि लाजती अमर ॥हा एक प्रभू म्हणती ते
॥२२॥
ऐसियेपरी राजसंपत्ती ॥परी उदरी नाहीं संतती ॥तैशांत देहीं जरा निगुती ॥प्राप्त झाली बळत्वें
॥२३॥
परी तो राजा सुगम प्राज्ञ ॥परोपकारी अपार ज्ञान ॥मूर्तिमंत जयाचें संधान ॥पाळीत असे नेटका
॥२४॥
तयाचे राज्यांत बावन्न वर्ण ॥कोणी न देखों अकिंचन ॥संत आलिया करिती पूजन ॥सकळ जगीं मिरवतसे
॥२५॥
चौदा विद्यांमाजी कुशल ॥जैसा दुसरा मूषकपाळ ॥हीनदीनांची माय कनवाळ ॥आणि काळ तत्काळ शत्रुचा
॥२६॥
सकल गृहीं देशावर ॥त्या राजाचा परोपकार ॥त्यामुळे मिरवती सकळ नर ॥चिंताविरहित सुखानें
॥२७॥
असो ऐसे तेजस्थिती ॥तया देशीं पावले निगुती ॥तेथें सकळ नारीनर क्षितीं ॥विजयवचनीं गर्हिवरले
॥२८॥
यापरी तयाची गृहस्वामिनी ॥जिये मिरवती ज्ञानखाणी ॥पतिव्रता सौदामिनी ॥षडर्णवगुणी गुणस्वी
॥२९॥
कीं राव तो उत्तम धवळार ॥तैं दिसती ती स्तंभाकार ॥कीं संसारमहीचा हांकणार ॥अनंतरुपीं नटलासे
॥३०॥
ऐसेपरी राजयुती ॥परी जरा पाहूनि रायाप्रती ॥तेणें भयार्त होऊनि चित्तीं ॥चिंतेमाजी पडली असे
॥३१॥
म्हणे रायाचे सकळ अवसान ॥जिंकूनि नेलें आहे जरेनें ॥नेणों दिवस येईल कोण ॥संगतीसी सोडावया
॥३२॥
ऐसीं चिंता व्यापिली चिंत्तीं ॥तों रायासी भरली आयुष्यभरती ॥तप्त शरीरी पाहूनि वृत्ती ॥गमन करी परत्र
॥३३॥
प्राण सांडूनि शरीरातें ॥गेला असें निराळपंथें ॥महीं उरलें असे प्रेत ॥झाला आकांत राज्यांत
॥३४॥
पवित्रनामी रेवती ललना ॥अट्टहास करी शोकरुदना ॥तेचि रीतीं इतर जनां ॥दुःखप्रवाह लोटला असे
॥३५॥
आठवूनि त्रिविक्रमरायाचे गुण ॥परम आक्रंदती जन ॥म्हणती पुनः या रायासमान ॥होणार नाहीं दूसरा
॥३६॥
ऐसे अट्टहास्यें घरोघरीं जन ॥नारीनरादि दुःखसंपन्न ॥तये संधींत गांवी येऊन ॥नाथ तेथें पातले
॥३७॥
तें क्षेत्र महान प्रयागस्थान ॥उभय संचरती त्याकारण ॥तो गृहोगृहीं दुःखनिमग्न ॥शोकाकुलित मिरवले
॥३८॥
कोणी शरीर टाकीत अवनीं ॥कोणी पडले मूर्च्छा येऊनी ॥कोणी योजूनि हदयीं पाणी ॥धबधबा पिटिती ते
॥३९॥
कोणी येऊनि पिशाचवत ॥इकडून तिकडे धांव घेत ॥अहां म्हणूनि शरीरातें ॥धरणीवरी ओसंडिती
॥४०॥
कोणी धरणीवरी आपटिती भाळ ॥रुधिरव्यक्त करुनि बंबाळ ॥अहा त्रिविक्रमराव भूपाळ ॥सोडूनि गेला म्हणताती
॥४१॥
ऐसियेपरी एकचि आकांत ॥नारीनरादि बोलती समस्त ॥तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥परमाचित्तीं कळवळला
॥४२॥
सहज चालतां तेथ पथ ॥ठायीं ठायीं उभा राहात ॥त्या रायाचे गुण समस्त ॥आठवूनि रडताती
॥४३॥
धर्मज्ञानिक रायाचे गुण ॥मोहकपणीं होतां श्रवण ॥तंव ते वेळीं तो मच्छिंद्रनंदन ॥मोहदरींत रिघतसे
॥४४॥
मनांत म्हणे धन्य पुरुष ॥जयासाठीं जग पिसें ॥जाहलें आहे तस्मात यास ॥राव उपकारी वहिवाटला
॥४५॥
तरी हा ऐसा भलेपणीं ॥राव मिरवला आहे अवनीं ॥तरी यातें पुनः आणोनी ॥देहंगत करावा
॥४६॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥पाहें रायाचें आयुष्य भरत ॥तंव तो राव तितुकियांत ॥निरामयीं पोंचला
॥४७॥
राव नुरलासे जिवितपणीं ॥मिळाला ऐक्यें ब्रह्मचैतन्यीं ॥ऐसें देखतां अजीवितपणीं ॥मग उपाय ते हरले
॥४८॥
कीं मुळींच बीजा नाहीं ठाव ॥मग रुखपत्रीं केवीं हेलाव ॥तेवीं जीवितपणीं राणीव ॥नातुडपणीं उतलीसे
॥४९॥
मग स्तब्ध होऊनि मच्छिंद्रनंदन ॥परतता झाला ग्रामातून ॥परी मच्छिंद्राहूनि गौरनंदन ॥कळवळला स्वचित्तांत
॥५०॥
राज्यभागीं जगाचें बोलणें ॥ऐकूनियां गौरनंदनानें ॥मोहें चित्तस्फोट होऊन ॥अश्रु ढाळी नयनातें
॥५१॥
ऐसें स्थिती ग्रामांतून ॥निघते झाले उभय जण ॥तों ग्रामाबाहेर निवांत काननीं ॥शिवालय देखिलें
॥५२॥
तें पाहूनि एकांतस्थान ॥जाते झाले तयाकारण ॥तों पलीकडे मोहक जन ॥प्रेतसंस्कार मांडिला
॥५३॥
प्रेत स्कंधीं वाहूनि चतुर्थ ॥येते झाले शिवालयांत ॥सवें अपार जन वेष्टित ॥शोकसिंधु उपासिती
॥५४॥
परी आकळीकपणें वंचना ॥शोकसिंधूची दावी भावना ॥परम आटूनि आपुल्या प्राणा ॥प्रेतालागीं कवटाळिती
॥५५॥
यापरी गांवोगांवीचे जन ॥तेही ऐकूनि वर्तमान ॥धांव घेती आक्रोशपणें ॥आप्तजनांसारिखे
॥५६॥
तें पाहूनियां गोरक्षनाथ ॥परम कळवळूनियां चित्तांत ॥बोलतां झाला मच्छिंद्रातें ॥ऐशा पुरुषा उठवावें
॥५७॥
मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी ॥उगाचि बैसें म्हणे तयालागुनी ॥परी स्थिर नोहे गोरक्षमुनी ॥पुन्हां वागुत्तर देतसे
॥५८॥
म्हणे जरी तुम्ही न उठवाल यातें ॥तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये ॥मच्छिंद्र म्हणे तुझें सामर्थ्य ॥त्यास उठवावया नसे की
॥५९॥
ऐसें ऐकूनि गोरक्ष वदत ॥म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित ॥परी सुखी करीन सकळ जनांते ॥निश्चयेंसीं महाराजा
॥६०॥
जरी न उठवें माझेनि राजा ॥तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा ॥हाचि सिद्धार्थ पण माझा ॥निश्चयेंसीं वरिला असे
॥६१॥
जरी ऐसिया बोला संमत ॥जरी माते न घडे नाथ ॥तरी रौरव भोगीन कोटि वर्षांत ॥कुंभीपाक महाराजा
॥६२॥
ऐसें बोलतां दृढोत्तरवचन ॥मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन ॥अहा वत्सा शोधाविण ॥व्यर्थ काय वदलासी
॥६३॥
सारोखपणे केलासी पण ॥राव उतरला जीवित्वेंकरुन ॥ब्रह्मरुपीं सनातन ॥ऐक्यरुपीं मेळ झालासे
॥६४॥
ऐसें बोलतां वसुआत्मज ॥मग तो गोरक्षमहाराज ॥हदयीं शोधितां तेंचि ओज ॥लक्षापरी भासलें
॥६५॥
मग म्लान करुनि आपुलें वदन ॥म्हणे आतां अग्नि घेईन ॥मग प्रत्योदक तेथूनि उठून ॥काष्ठांलागीं मेळविलें
॥६६॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥परम झाला भयभीत ॥चित्तीं म्हणे हा प्राणातें ॥चुकणार नाहीं द्यावया
॥६७॥
जेणें वडे आणायाकरितां ॥चक्षु काढूनि आपुले हाता ॥तोषविली विप्रदुहिता ॥निबरगट्ट हा असे
॥६८॥
मग पाचारुनि गोरक्षातें ॥बोलता झाली प्रांजळवत ॥म्हणे बा रे सुखी करावें जनातें ॥यालागीं वदलासी
॥६९॥
तरी जनांचे उपकारास ॥उदार झालासी प्राणास ॥चित्तीं तुझे समाधानास ॥विचार एक ऐकावा
॥७०॥
मी याचे देहस्थित ॥होतों रक्षाया तुझा हेत ॥परी बा माझिया शरीरास ॥द्वादश वर्षे सांभाळीं
॥७१॥
द्वादश वर्षे जाहलिया पूर्ण ॥पुन्हां देहात देहांतर्गत होऊन ॥सकळ जगाचें करुं कल्याण ॥उपकारीं मिरवेन बा
॥७२॥
ऐसे बोलतां मच्छिंद्रनाथ ॥अवश्य गोरक्षक म्हणत ॥मग शीघ्र सांडूनि शरीरातें ॥रायशरीरीं संचरला
॥७३॥
संचरला परी स्मशानहीं ॥उठोनि बैसला राजदेहीं ॥तें पाहोनियां लोक सर्वही ॥आनंदसरिते मिरवले
॥७४॥
जैसा पक्षियें मांडिला ठाव ॥मिरवे वृक्षा अन्य वाव तेवीं देहातें सांडूनि बरवें ॥रावदेहीं संचरला
॥७५॥
लोक म्हणती आम्हां प्रजेकारण ॥मोहें वेष्टिलें हरिहरांचे मन ॥म्हणोनि होऊनि सुप्रसन्न ॥रायालागीं जीवविलें
॥७६॥
एक म्हणती आयुष्य होतें ॥काळें हरण केलें जीवंत ॥चुकारपणीं समजूनि मागुतें ॥जीवविलें रायातें
॥७७॥
असो ऐशा बहुधा प्रकरणीं ॥आनंद वदतसे जगाची वाणी ॥मग ते परम हर्षेकरुनी ॥स्वस्थानातें पावले
॥७८॥
विधिवत् कनकाचा पुतळा करुन ॥स्मशानक्रिया संपादून ॥पाहते झाले आपुलें स्थान ॥आप्तजनांसमवेत
॥७९॥
येरीकडे शिवालयांत ॥सच्छिष्य महाराज गोरक्षनाथ ॥रक्षावया गुरुचें प्रेत ॥स्थानालागीं विचारी
॥८०॥
तों तितुक्यांत आली पूजारणी ॥होती शैवगुरविणी ॥तियेलागी पाचारुनी ॥वृत्तांतातें निवेदी
॥८१॥
म्हणे माये रायाकरितां ॥आणि प्रजेची धरुनि ममता ॥मम गुरु मच्छिंद्र केला सरता ॥राजदेहाकारणें
॥८२॥
तरी आतां श्रीगुरुचें प्रेत ॥कवणा ठायीं रक्षूं यातें ॥जरी तुजला आहे माहीत ॥ठात मातें सांग कीं
॥८३॥
ठाव तरी म्हणसील कसा ॥गुप्त जगांत न कळे लेशा ॥पूर्ण झाली द्वादश वर्षे ॥पुनः श्रीगुरु उठेल वो
॥८४॥
तरी तूं ठाव ऐसा मनांत ॥सांगूनि दृढ रक्षीं प्रेत ॥आणि स्वचित्तीं रक्षुनियां मात ॥गुप्त जगीं वर्ते वो
॥८५॥
तरी या कर्मासी साक्षभूत ॥तुझें माझें उभय चित्त ॥ही गोष्ट कळतां जनांत ॥परम परम विक्षेप वाटेल गे
॥८६॥
तरी आतां चिंतार्णवीं ॥झालें कर्म वडवानलदेहीं ॥धैर्यजळाचे प्रवाहडोहीं ॥गुप्त यातें रक्षावें
॥८७॥
ऐसें बोलतां तपःप्राज्ञी ॥अवश्य म्हणत शैवराणी ॥मग त्या शिवालयामध्यें नेऊनी ॥गुप्त गुहार दावीतसे
॥८८॥
तेंही गुप्त गुहार जगांत ॥माहीत नव्हतें किंचितार्थ ॥तें दावूनि गोरक्षनाथ ॥तुष्ट केला स्वदेहीं
॥८९॥
मग तें गुहाग्रामींचें मुख ॥मही विदारुनि पाहे देख ॥उत्तम ठाव लक्षूनि तेथ ॥प्रेत त्यांत ठेवीतसे
॥९०॥
प्रेत ठेवोनि गुहागृहांत ॥मुख आच्छादिलें त्वरितात्वरित ॥गृह लक्षूनि पुन्हां आलयांत ॥येवोनियां बैसला
॥९१॥
बैसे परी शैवकांता ॥म्हणे महाराजा गोरक्षनाथा ॥द्वादश वर्षे रक्षीन प्रेता ॥निश्चय त्वां केला असे
॥९२॥
केला परी बोलें शरीर ॥कैसें राहील साचोकार ॥एकदिन नव्हे संवत्सर ॥द्वादश निश्चय केला असे
॥९३॥
ऐशी ऐकूनि तियेची वाणी ॥गोरक्ष म्हणे वो शुभाननी ॥चिरंजीवपद देहालागूनी ॥मच्छिंद्रनाथ मिरवीतसे
॥९४॥
तरी हा देह नाशरहित ॥आहे मायाप्रळयवंत ॥परी ऐसी जगांत मात ॥प्रविष्ट न करीं जननीये
॥९५॥
ऐसें उत्तर सांगूनि तीतें ॥उभय चित्तीं मिरवले शांत ॥तों इकडे नृपनाथ ॥अंतःपुरीं पातला
॥९६॥
परी तो त्रिकाळज्ञानी ॥चांचरा न घे प्रज्ञेलागुनी ॥जेवीं माहितगार पूर्वीचें सदनीं ॥राज्यभुवनीं वर्ततसे
॥९७॥
असो गेलिया अंतःपुरांत ॥रेवती कांता प्रज्ञावंत ॥मंचकीं नेवोनि आपुला नाथ ॥प्रीतीं आदरें आदरिला
॥९८॥
स्नान भोजन झालियाउपरी ॥राव बैसला मंचकावरी ॥अंकीं बैसवोनि सदगुणालहरी ॥अनंत वल्गने वदतसे
॥९९॥
परी जें कांता पुसे त्यातें ॥तेंही प्राज्ञिक प्रांजळ सांगत ॥गुप्त प्रगटला वृत्तांत ॥उत्तरा उत्तर देतसे
॥१००॥
व्यंगरहित बोले वचन ॥करी कांतेचें समाधान ॥यावरी द्वितीय दिनीं मंगलस्नान ॥करुनि सभे बैसला
॥१०१॥
तेथेंही राजवैभवाकारणें ॥अचूक वर्ते सकळ प्रकरणीं ॥मंत्रीं आणि सकळ जन ॥भिन्न कांहीं दिसेना
॥१०२॥
न्यायनीतीं झाला वहिवाट ॥माहितासमान वर्तती पाठ ॥स्नेहक्रूरता समान लोट ॥रायासमान वर्तती
॥१०३॥
यापरी नित्य चतुर्थ प्रहरीं ॥सकळ वैभवें वना करी स्वारी ॥शिवदर्शना ग्रामाबाहेरी ॥त्याचि देवालय येतसे
॥१०४॥
प्रथम दिवशीं येतां राव ॥शिवालयीं उमाधव ॥वंदितां देखोनि गोरक्ष प्राज्ञ अतीव ॥संपादणी पुसतसे
॥१०५॥
म्हने नाथ जी आदेशवंत ॥किती दिवस आलां येथ ॥कवण स्थळीं वास्तव्य करीत ॥कवण नाम मिरवतसे
॥१०६॥
उभा राहोनि ऐसे नीतीं ॥गोरक्षातें पुसे नृपती ॥संपादणी ती जगाप्रती ॥दृढा दावी महाराजा
॥१०७॥
परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ ॥संपादनीचें उत्तर देत ॥मग उत्तराउत्तर करुनि महीतें ॥शिवालयीं संचरले
॥१०८॥
संचरले परी गोरक्षकातें ॥घेवोनि गेला स्वसांगातें ॥शिवालयीं नेमिला एकांत ॥राव पुसे गोरक्षनाथा
॥१०९॥
हस्तसंकेतें खुणेंकरुन ॥म्हणे देहातें बंधनसाधन ॥कैसे रीतीं केलें रक्षण ॥ठाव लक्षोनि नेटका
॥११०॥
मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ ॥बरबरभाषा सांगत ॥सवें घेवोनि खूण दावीत ॥गुहागृह रायातें
॥१११॥
असो ऐसें केलियापाठीं ॥गोरक्षें केलिया खूणदृष्टी ॥मग क्षणें बैसोनि तळवटीं ॥राव स्थाना पैं गेला
॥११२॥
गेला परी प्रतिदिनीं ॥राव येतसे शिवभुवनीं ॥आपुला शरीरठाव लक्षोनी ॥शिवा नमोनि जातसे
॥११३॥
क्षण एक बैसोनि गोरक्षाजवळी ॥दावीत भक्ती प्रेमनव्हाळी ॥आणि चित्ताची संशयकाजळी ॥फेडूनि जात स्वस्थाना
॥११४॥
ऐसियेपरी वहिवाटतां ॥तीन मास लोटले पंथा ॥यापरी एके दिवशीं बैसतां ॥गोरक्षक पुसें रायातें
॥११५॥
आम्ही जातों तीर्थाटनासी ॥आपण असावें योगक्षेमसीं ॥दृष्टी ठेवोनि स्वहितासी ॥स्वशरीरासी रक्षावें
॥११६॥
अवश्य त्यातें भूप म्हणत ॥स्वधर्मे ठेवूं स्वशरीरातें ॥आपण जावे स्वस्थचित्तें ॥तीर्थाटनी गमावे
॥११७॥
ऐसें वदोनि गोरक्षकातें ॥भूप पातला स्वस्थानात ॥येरीकडे गोरक्षनाथ ॥तीर्थस्थाना वहिवाटला
॥११८॥
साही लोटले षण्मास ॥रेवती कांता रतिसुखास ॥ऋतुमंधी रेतगर्मास ॥गरोदर पै ते झाली
॥११९॥
दिवसेंदिवस नव मास ॥लोटोनि गेले गर्भास सुदिनदिनीं प्रसूतीस ॥रेवती कांता होतसे
॥१२०॥
प्रसूत झाल्या मदनाकृती ॥बाळ पाहे माय रेवती ॥बाळककर्णी तेजोत्पती ॥बाळ दृष्टीं देखिला
॥१२१॥
त्यासी लोटले द्वादश दिवस ॥आनंदउत्सव पालखास ॥बाळ पहुडोनि नाम त्यास ॥धर्मनाथ ठेविलें
॥१२२॥
त्यासही लोटली पांच वरुषें ॥तों एके दिवशीं शिवालयास ॥घेवोनि पूजेचे तबकास ॥राजा राणी पातलीं
॥१२३॥
सवे परिचारिका पंचशत ॥लावण्यलतिका चपळवंत ॥कीं राजार्णवींच्या लहरी अदभुत ॥रेवतीसवें मिरवल्या
॥१२४॥
असो रेवती दासीसहित ॥संचरोनि शिवालयांत ॥प्रेमें पूजीतसे उमाकांत ॥शुद्धभावेंकरोनिया
॥१२५॥
पूजा सांग जाहलियावरी ॥शिवा प्रार्थीतसें वागुत्तरीं ॥हे महाराज त्रिपुरारी ॥उमापती महानुभावा
॥१२६॥
तरी ऐसें करावें कृपानिधी ॥श्रीराया त्रिविक्रमाआधीं ॥मातें मरण देऊनि साधीं ॥सुवासिनीत्व माझें हें
॥१२७॥
ऐसें वदतां वाकसुगरिणी ॥गदगदां हांसे शैवराणी ॥तें रेवतीनें पाहोनिं ॥तियेलागीं पुसतसे
॥१२८॥
म्हणे माय वो शैवदारा ॥तुज हांसूं कां आलें वागुत्तरा ॥म्हणे हास्य तव उत्तरा ॥सहज आननी आले वो
॥१२९॥
रेवती म्हणे आश्चर्येविण ॥न यावें विकासीपणा मन ॥तरी तूं माये प्रांजळ वचन ॥सांग संशय सोडोनी
॥१३०॥
तंव ती बोले शैवराणी ॥म्हणे माय वो हास्यचिन्हीं ॥तूतें वदतां कहाणी ॥विपर्यास होईल गे
॥१३१॥
तरी माये माझें चित्त ॥वदावया होतें भयभीत ॥नेणो कैसी पुढील मात ॥घडोनि येईल कर्मातें
॥१३२॥
आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ ॥सहज कोपल्या होईल घात ॥पतंग स्पर्शतां प्रळयानळांत ॥जीवित्वातें उरेना
॥१३३॥
कीं केसरीगृही अन्याय ॥केलिया जंबुक जीवें जाय ॥कीं नगर पेटतां कोणें वांचावें ॥जीवित्वातें हे माते
॥१३४॥
ऐसें बोलतां शैवराणी ॥रेवती म्हणे माय बहिणी ॥निर्भय होवोनि तुवां मनीं ॥रहस्यार्थ निरोपीं
॥१३५॥
राव आणि माझे कांहीं ॥भय असेल तुझे देहीं ॥तरी आम्ही सहसा कोपप्रवाहीं ॥तुजवरी न करुं
॥१३६॥
ऐसें बोलोनि करतळभावास ॥रेवती देत शैवकांतेंस ॥सकळ हरुनि संशयास ॥म्हणे वार्ता वद आतां
॥१३७॥
तरी ती प्रांजळ बोले वाणी ॥मग परिचारिका बाहेर काढूनी ॥म्हणे सांगेन वो एकांतभुवनी ॥एकांतस्थानीं पैं गेल्या
॥१३८॥
एकांतालया गेलियावरी ॥बोलती झाली शैवनारी ॥म्हणे माये तूं सुवासीण स्वदेही ॥कांही नाहींस जाण पां
॥१३९॥
राव त्रिविक्रम मृत्यु पावला ॥तयाचे देही मच्छिंद्र संचरला ॥आपला देह येथें सांडिला ॥शिवालयामाझारीं
॥१४०॥
मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ ॥गुहागृहा ठेवूनि गेला प्रेत ॥द्वादश वर्षे नेमस्त ॥नेम केला उभयतांनीं
॥१४१॥
द्वादश वर्षे सरल्या शेवटीं ॥मच्छिंद्र वर्तेल स्वदेहराहाटी ॥ऐसिये कथा माझिये दृष्टी ॥झाली असे जननीये
॥१४२॥
तरी तुज वैधव्यपण ॥असोनि बोलसी सुवासिण ॥म्हणोनि हास्य आलें मजलागून ॥जाण जननी निश्चयें
॥१४३॥
ऐसें ऐकुनि रेवती सती ॥म्हणे दावीं कां मच्छिंद्रप्रेताप्रती ॥येरी अवश्य म्हणोनि उक्ती ॥गृहेमध्यें नेतसे
॥१४४॥
म्हणे माय वो येचि ठायीं ॥आच्छादिला मच्छिंद्रदेहीं ॥तरी मही विदारुनि गुहागृहीं ॥निजदृष्टीनें पाहें कां
॥१४५॥
ऐसें बोलोनि दावोनि तीतें ॥शिवालयीं गेली त्वरित ॥येरीकडे संशयवंत ॥रेवती स्थाना गेलीसे
॥१४६॥
गेलीसे परी एकांतासीं ॥विचार करी आपुले मानसीं ॥चित्तीं म्हणे पतिव्रतानेमासी ॥दैवेंकरुनि नांडिले
॥१४७॥
नाहिसें परी संचितार्थ ॥घडणार घडूनि आलें निश्चित ॥परी पुढती आपुलें हित ॥विलोकावें आपणचि
॥१४८॥
पति निवर्तल्यापाठीं ॥लाधली मच्छिंद्रवीर्यकोटी ॥परी पाहतां पातकदृष्टीं ॥वंशवेली दिसेना
॥१४९॥
पूर्वी भरतवंश काढून ॥व्यासवीर्ये केला उत्पन्न ॥त्याही पुढें कुंतीरत्न ॥त्याच नीतीं आचरली
॥१५०॥
पंचदेवाचें वीर्य घेवोन ॥निर्माण केले पांचहि जण ॥तस्मात् वंशवेलीकारणें ॥शिष्टदेह अर्पावा
॥१५१॥
तरी हा विचार पातकरहित ॥घडोनि आला यत्नातीत ॥परी द्वादश वर्षे होतां भरित ॥पुन्हां अनर्थ होईल हा
॥१५२॥
मच्छिंद्र जाईल स्वदेहाकारणें ॥सुत धर्मनाथ अति सान ॥राज्यवैभवीं आसरा धरोन ॥कवण रतीं राहील कीं
॥१५३॥
त्रिविक्रमदेहीं तपोबल ॥आहे म्हणूनि विवतें बाळ ॥तो गेलिया सावली शीतळ ॥मजलागीं मिळेना
॥१५४॥
तरी आतां करावें कैसें ॥दृष्टीं पाहें मच्छिंद्रदेहास ॥दृष्टीं पाहिल्यावरी विनाश ॥करोनियां सांडावा
॥१५५॥
देह झालिया छिन्नभिन्न ॥मग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदन ॥मुळींच बीज केलिया भस्म ॥बाहेर कांहीं उगवेना
॥१५६॥
ऐसा विचार करुनि चित्तीं ॥एक परिचारिका घेवोनि सांगाती ॥गांवाबाहेर मध्यरात्रीं ॥येवोनियां पोंचली
॥१५७॥
आणिक एक गुप्तराहाटी ॥दोन सबळ घेतले होते कामाठी ॥त्वरें येऊन्नि शिवालयापाठीं ॥गुहाद्वार विदारिलें
॥१५८॥
मोकळें केलें गुहाद्वार ॥करिते झाले आंत संचार ॥जातांचि तें कलेवर ॥मच्छिंद्राचें देखिलें
॥१५९॥
परी तें कलेवर तेजःपुंज ॥कीं सजीवपणीं दिसे सहज ॥माणिकवर्णी सविताराज ॥तियेलागी भासलें
॥१६०॥
असो ऐसिये तेजोराशी ॥मग शस्त्र घेवोनि अस्थिमांसासी ॥रती रती छेदोनियां तयासी ॥बाहेर तई काढिलें
॥१६१॥
मग भाग टाकोनि कान नांत ॥विखरुनि दिधले पृथक् पृथक् तेथ ॥तरी समान रज समस्त ॥ठाई ठाई टाकिले
॥१६२॥
टाकिले परी पातळपणी ॥रजरजाची होय मिळवणी ॥ऐशापरी त्यासी करुनी ॥स्वस्थानीं गेली ते
॥१६३॥
गुहागृहाचें मुख आच्छादून ॥जैसें होतें तैसे करुन ॥येरी घडल्या कारण ॥उमा जागृत झालीसे
॥१६४॥
मग प्रत्यक्ष होऊनि बोलत ॥म्हणे महाराजा कैलासनाथा ॥जागृत व्हावें विपरीतपंथा ॥अघटित झालें महाराजा
॥१६५॥
तुमचा मच्छिंद्रनंदन ॥गेला आहे स्वदेह सांडून ॥परी रेवतीदारा येऊन ॥विध्वंसिलें शरीरासी
॥१६६॥
ऐसी ऐकतां उमेची मात ॥खडबडूनि उठला कैलासनाथ ॥हदयीं पाहे तों विपरीत ॥मच्छिंद्रदेही वर्तलें
॥१६७॥
मग अंबेसी बोलता झाला शिव वचन ॥म्हणे माझा आज गेला प्राण ॥परी उमे यक्षिणी बोलावून ॥सकळ शरीर वेंचीं कां
॥१६८॥
अस्थि त्वचा मांसासहित ॥रती रती भाग वेंचूनि समस्त ॥एकत्र करुनि कैलासांत ॥यक्षिणीहस्तीं पाठवीं
॥१६९॥
अवश्य म्हणूनि नगात्मजा ॥यक्षिणी पाचारी विजयध्वजा ॥कोटी चामुंडा विभागकाजा ॥महीलागीं उतरल्या
॥१७०॥
त्यांतें पाहूनि माय भवानी ॥येतांचि सांगे कार्यालागुनी ॥मच्छिंद्रशरीर समस्त वेंचोनी ॥स्वर्गा न्यावें म्हणतसे
॥१७१॥
कैलासगिरी शिवगण बहुत ॥त्यांत वीरभद्र मम सुत ॥तयाहातीं ओपोनि समस्त प्रेत ॥रक्षण दृढ सांगावें
॥१७२॥
ऐसें सांगूनि क्षणिक वार्त ॥महीं संचरल्या मांसशोधार्था ॥सकळ शरीर वेंचूनि तत्त्वतां ॥कैलासभुवनीं चालिल्या
॥१७३॥
कोटी चामुंडा प्रतापवंत ॥यक्षिणीसह झाल्या स्वर्गस्थित ॥कैलासगिरीं मग जात ॥वीरभद्रातें निवेदिलें
॥१७४॥
म्हणती परम हर्षेकरुनी ॥हे महाराज शिवगणी ॥राजेश्वर भद्रासनी ॥वृत्तांतातें ऐकावें
॥१७५॥
आमचा तुमचा शत्रु पूर्ण ॥अवचट पावला आहे मरण ॥रती रती देहाचे भाग जमवून ॥आम्हीं आणिले महाराजा
॥१७६॥
तरी तो शत्रु म्हणशील कोण ॥या भूमंडळा मच्छिंद्रनंदन ॥त्यानें आम्हांसी नग्न करुन ॥परम लज्जे विटंबिलें
॥१७७॥
अष्टभैरव पाहोनि धरणीं ॥विटंबिलें दशा करुनि ॥रुधिरपूर लोटूनि अवनीं ॥विगतकळा वरियेली
॥१७८॥
आणि तुम्हांसवें घेतले कटक ॥मौळीं पर्वत देऊनि देख ॥वायुसुत करुनि आदिक ॥विटंबिले महाराजा
॥१७९॥
सकळ देवांचा शत्रु कुजात ॥बरा दैवें पावला घात ॥तरी आतां प्रतापवंत ॥दृढोत्तरीं शरीर रक्षावें
॥१८०॥
या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष ॥तो परम प्रतापवंत दक्ष ॥तो जिंकूनि नेईल शरीर प्रत्यक्ष ॥तरी सावध राहावें
॥१८१॥
सहजस्थितीतें दैवेंकरुन ॥शत्रु पावला आहे मरण ॥हालावांचूनि फेडविलें हर्षेकरुन ॥तुम्हां आहां दैवानें
॥१८२॥
ऐसें सांगूनि हर्षयुक्त ॥परी वीरभद्र तोषला आपुले चित्तांत ॥मग भैरवादि समस्त ॥अहा अहा म्हणताती
॥१८३॥
मग चौर्याूयशी कोटी बहात्तर लक्ष ॥शिवगण प्रतापी महादक्ष ॥मच्छिंद्रशरीर वेष्टूनि प्रत्यक्ष ॥रक्षणार्थ बैसविले
॥१८४॥
कोटी यक्षिणी चामुंडांसहित ॥डंखिनी शंखिनी पातल्या समस्त ॥अस्त्रशस्त्रादि होऊनि उदित ॥रक्षण करिती शरीराचें
॥१८५॥
येरीकडे त्रिविक्त्रमदेहात ॥प्रतापशीळ जो मच्छिंद्रनाथ ॥नित्य येऊनि शिवालयांत ॥गुहागृहीं लक्षीतसे
॥१८६॥
परी तो ठाव जैसा तैसा ॥दिसुनि येत दृष्टिभासा ॥मग स्वस्थ भोगी संपत्तिविलासा ॥राज्यासनीं बैसूनियां
॥१८७॥
परी शरीरा झाला जो प्रयास ॥हें माहीत नव्हतें कांहीं देहास ॥सदा भोगी संपत्तिविलास ॥राजभुवना जातसे
॥१८८॥
ऐसे नित्य राजविलास ॥लोटूनि गेलीं वर्षे द्वादश ॥तों येरीकडे तीर्थाटनास ॥गोरक्ष सावध झाला असे
॥१८९॥
तरी तो गोरक्ष पुढील अध्यायीं ॥काय करील तो प्रतापप्रवाहीं ॥तरी श्रोते अवधान देहीं ॥सिद्ध करा पुढारी
॥१९०॥
अवधान पाहूनि अर्थ बहुत ॥कथा वदेल धुंडीसुत ॥मालू नरहरीचा शरणागत ॥दास संतांचा असे कीं
॥१९१॥
स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिसार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥द्वात्रिंशति अध्याय गोड हा
॥१९२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार द्वात्रिंशतिअध्याय समाप्त ॥