श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ३०
भर्तरीस दत्तात्रेयाचें दर्शन, चौरंगीची व गोरक्ष-मच्छिंद्रनाथाची भेट, पूर्व इतिहास. १८७ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदुद्धारा ॥पंढरीअधींशा रुक्मिणीवरा ॥सर्वसाक्षी दिगंबरा ॥पुढें ग्रंथ बोलवी कां
॥१॥
मागिले अध्यायीं अनुसंधान ॥भर्तरीस आले विरक्तपण ॥गोरक्षजतीचे समागमें करुन ॥गिरनार अचळा पोंचला
॥२॥
पोंचला परी रात्रदिन ॥लेऊनि स्नेहाचें अपार रत्न ॥तेणेंकरुनि उभयतां जाण ॥सुशोभित पैं झालें
॥३॥
यावरी गोरक्ष तीन रात्री ॥राहता झाला गिरनारपर्वती ॥मग पुसूनी श्रीदत्ताप्रती ॥मच्छिंद्राकडे चालिला
॥४॥
चालिला परी अत्रिसुत ॥म्हणे बाळा गोरक्षनाथा ॥मच्छिंद्रवत्स मम देहातें ॥भेटला नाहीं बहुत दिवस
॥५॥
तरी तयाचे भेटी माझे चक्षु ॥परम भुकेले योगदक्षु ॥तरी त्या आणूनि मज प्रत्यक्षु ॥भेटवीं कां जिवलगा
॥६॥
ऐसी ऐकतां दत्तात्रेयवाणी ॥भेटवीन म्हणे गोरक्षमुनी ॥मग श्रीदत्तात्रेयचरणां नमूनी ॥निघता झाला गोरक्ष
॥७॥
श्रीमच्छिंद्रनाथमार्ग धरुन चालता झाला गोरक्षनंदन ॥येरीकडे रायाकारण ॥काय करी महाराजा
॥८॥
नाथदीक्षा देऊनि त्यासी ॥मौळीं स्थायीं वरदहस्तासी ॥चिरंजीवपद देऊनि त्यासी ॥अक्षय केला महाराजा
॥९॥
जोंवरी कल्याण असे धरित्री ॥चिरंजीव केला राव भर्तरी ॥ऐसें वचन वागुत्तरीं ॥प्रसादाते ओपिलें
॥१०॥
याउपरी अभ्यासास ॥प्रारंभी नेमिला भर्तरीदास ॥ब्रह्मज्ञान रसायनास ॥कविता वेद सांगितला
॥११॥
ज्योतिष व्याकरण धनुर्धर ॥जलतरणादि संगीतोत्तर ॥वैद्य अश्व रोहिणी अपार ॥गाढ आधींच होता तो
॥१२॥
कोकशास्त्रादि नारक - कळा ॥चातुर्थभाष्य बोल रसाळा ॥मीमांसादि पातंजला ॥प्रवीण केला महाराजा
॥१३॥
यापरी वैद्यशास्त्र गहन ॥सांगता झाला अत्रिनंदन ॥वातास्त्रादिक जलद पूर्ण ॥अग्निअस्त्र सांगितलें
॥१४॥
कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण ॥वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ति दारुण ॥नागास्त्र खगेंदास्त्र अस्त्रजीवनीं जीवन ॥ब्रह्मास्त्रादि उपदेशी
॥१५॥
देवास्त्र काळास्त्र आणि मोहन ॥रुद्राक्ष विरक्तास्त्र आते निपुण ॥निर्वाण अस्त्रादि दानवप्रवीण ॥रतवनास्त्रादि सांगितली
॥१६॥
कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र ॥विभक्तास्त्रादि मानवअस्त्र ॥विहंगम प्लवंगम कामिनीअस्त्र ॥सकळ अस्त्रादि उपदेशी
॥१७॥
यावरी शस्त्रविद्या सघन ॥पूर्वी होता राव निपुण ॥त्रिशूळ फरश अंकुश मान ॥धनुष्य तोमर असिलता
॥१८॥
परज मुदगर बरसी ॥मांडूक चक्रें गदा उद्देशीं ॥दारुकयंत्रे शस्त्रेंसीं बरसी ॥कुठारादिकीं प्रवीण
॥१९॥
ऐसा शस्त्रविद्येकारण ॥पूर्वीच होता राव प्रवीण ॥त्यावरी अस्त्रविद्यारत्न ॥गुरुमुखें लाधला
॥२०॥
मग ते विद्येसी अर्थ शेवटीं ॥कीं कोंदण विराजे रत्नतगटी ॥मग त्या हेमावटी ॥मोल काय बोलावें
॥२१॥
कीं सुगंधित मलयागार ॥त्या मिश्रित झालें मृगमदकेशर ॥मग त्या गंधातें वागुत्तर ॥कवण अर्थी बोलावें
॥२२॥
असो विद्यासंपन्न ॥भर्तरीतें करुनि अत्रिनंदन ॥उपरी साबरी व्यक्त करुन सदनातें पाठवी
॥२३॥
नाग पन्नग उभय ठायीं ॥सकळ दैवतें तया प्रवाहीं ॥मित्र कुंडासनीं वेढूनी महीं ॥पाठवीत महाराजा
॥२४॥
मग तेथें जाऊनि भर्तरीनाथ ॥साधिलें सकळ बावन्न वीरांतें ॥जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत ॥त्याचि क्लेशा वरियेलें
॥२५॥
मग सकळ देव करुनि प्रसन्न ॥पाहती श्रीगुरुचे चरण ॥मग सवें घेऊनि अत्रिनंदन ॥बद्रिकाश्रमीं पातला
॥२६॥
तेथें बैसवूनि पूर्ण तपासी ॥मग घेऊनि गिरनारपर्वतासी ॥राहते झाले सुखवस्तीमी ॥मच्छिंद्रमार्ग विलोकीत
॥२७॥
तों येरीकडे गोरक्षनाथ ॥पहाता झाला गर्भगिरी पर्वत ॥परम आवडीं आनंदभरित ॥मच्छिंद्रातें भेटला
॥२८॥
उपरी चरणीं ठेवूनि माथां ॥म्हणे महाराजा आनंदभरिता ॥तुमच्यां भेटीची क्षुधा नितांत ॥कामानळू दाटला
॥२९॥
तरी तयाची घेऊं भेटी ॥आनंदें होड दाटला पोटीं ॥जैसी इंदूची अर्णवा गांठी ॥प्रेमें लहरी उचंबळे
॥३०॥
कीं सोमातें कुमुदपती ॥भेटी चुंबक काम वांच्छिती ॥तन्न्यायें त्रिविधमूर्ती ॥कामिनली भेटसी
॥३१॥
ऐसी गोरक्षकाची ऐकतां वाणी ॥तोहि पडला कामवेष्टणी ॥म्हणे वत्सा माझा स्वामी ॥पाहूं ऐसें वाटतसे
॥३२॥
मग कांहीं दिवस तेथें राहून ॥करिते झाले उभय गमन ॥वैदर्भदेशींचा मार्ग धरुन ॥गमत असती उभयतां
॥३३॥
तों कौंडिंण्यपुरीं सहज ग्रामांत ॥करुं गेले उभय भिक्षेतें ॥तों तेथींच शशांगर नृपनाथ ॥कोपलासे स्वसुता
॥३४॥
कोपला परी चौहटआंत ॥दूताहातीं ओपूनी सुत ॥खंडित करुनि पदहस्त ॥चौहटातें टाकिला
॥३५॥
यावरी श्रोते कल्पना घेती ॥राव कोपला सुतावरती ॥तो कोप तया कवण अर्थी ॥सुतावरी पेटला
॥३६॥
तरी हे कविज्ञ महाराजा ॥दावा सकळ निर्णयचोजा ॥गूढत्व ठेवूनि ग्रंथी भोजा ॥प्रांजळपणीं असावा
॥३७॥
ऐसें ऐकतां श्रोत्यांचें वचन ॥कवि म्हणे घ्या अनुसंधान ॥तेथींचा राव शशांगर नाम ॥प्रज्ञावंत धार्मिक
॥३८॥
धैर्य औदार्य बाळ संपत्तीं ॥सत्वस्थ यश करी कांतीं ॥ऐसा असूनि शशांगर नृपती ॥परी संतति नसे त्या
॥३९॥
संतति नसे तेणेंकरुन ॥राव पेटला चित्तीं उद्विग्न ॥न आवडे वैभव राज्यकारण ॥छत्रसिंहासन नावडे
॥४०॥
नावडे आसन वसन शयन ॥नावडे अन्नोदकादि पान ॥नावडे चातुर्यभोगादि गायन ॥कळाकुशळ गुणस्वी
॥४१॥
सदा विराजूनि एकांतस्थानीं ॥वंशलतेची करी घोकणी ॥तों एके दिवशीं मंदाकिनी ॥कांता बोले रायातें
॥४२॥
म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥धाक धरितां संततिकामा ॥परी लल्लाटरेषेच्या विधिउपमा ॥नसल्या व्यर्थ कां धाक
॥४३॥
तरी सर्वज्ञा सहजस्थितीं ॥चित्त मिरवा प्रांजळवृत्तीं ॥व्यर्थ कांचणी शरीराप्रती ॥न भंगूं द्यावें अनलातें
॥४४॥
राया वडवानळ चिंताक्लेश ॥शरीरा साहूनि हरी प्रज्ञेस ॥प्रज्ञेविण संसार ओस ॥होत आहे महाराजा
॥४५॥
ऐसें बोलतां मंदाकिनी ॥परी राया बोध न वाटे मनीं ॥चित्तदरीं व्यग्र कांचणी ॥संसारवल्ली सोडीन
॥४६॥
दिवसानुदिवस अति थोर ॥नावरे चिंतावैश्वानर ॥मग एके दिवशीं अति निष्ठुर ॥शिव आराधूं बैसला
॥४७॥
मंत्रिकातें पाचारुन ॥वैभव केलें त्यां स्वाधीन ॥सवें स्वल्प दूत घेऊन ॥दक्षिण दिशे चालिला
॥४८॥
रामेश्वरा काम वरुन ॥जात शिवातें करुं प्रसन्न ॥तों मार्गी चालतां कृष्णासंगम ॥तुंगभद्रीं भेटला
॥४९॥
तेथें राहता मुक्कामासां ॥शयन करितां निशीसी ॥दशकर पंचानन स्वप्नासी ॥येऊनिया बोलतसे
॥५०॥
म्हणे राया संसारवल्ली ॥तव चिंतदरीं चिंत्ता व्यापिली ॥तरी याचि ठायीं संतानवल्ली ॥प्राप्त होईल तुज राया
॥५१॥
परी कृष्णातुंगभद्रा उभयसरितीं ॥संगम चिमट्यांत तटक्षिती ॥अपर्णेसहित माझी मूर्ती ॥नित्य अची त्या लिंगी
॥५२॥
लिंग अर्चिता सकाम कामा ॥स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा ॥याविण खंती जावया तुम्हां ॥अन्य उपाय नसेचि
॥५३॥
ऐसा स्वप्नी दृष्टांत होतां ॥तेंचि आवडे नरेशचित्ता ॥मग मित्रडोहसंगमसरिता ॥जाऊनियां विलोकी
॥५४॥
तों जुनाट लिंग दिसलें तेथ ॥होतें तटीं प्रतिष्ठेरहित ॥रावें पाहूनि सप्रेमभरित ॥प्रतिष्ठेंत मिरविलें
॥५५॥
मेळवूनि पंचोपचारक ॥तया उभवूनि प्रेम दोंदिक ॥प्राणप्रतिष्ठा करुनि आरचक ॥तया ठायीं मिरवला
॥५६॥
तयालागीं उत्साह थोर ॥भावने रक्षी रामेश्वर ॥परी कीर्तिध्वजे संस्कार ॥अपार लोक मग येती
॥५७॥
करुनि हराचे जयजयकार ॥अखंड होता नामीं गजर ॥जय जय शिव संगमेश्वर ॥ऐसें लोक बोभाती
॥५८॥
परी तयानिकट मध्यक्षिती ॥भद्रसंगम ग्रामवस्ती ॥तयामाजी भूदेव जाती ॥एक असे प्राज्ञिक
॥५९॥
मित्राचार्य तयाचें नाम ॥वेदपाठकी उत्तमोत्तम ॥तयाचि दारा शरयू नाम ॥पतिव्रता आगळीं
॥६०॥
आगळी परी संततीविण ॥दोघे होती अति क्षीण ॥मग ते उभयतां सुलक्षण ॥त्याच शिवा अर्चिती
॥६१॥
ऐसें लोटतां काहीं दिवस ॥तों स्वर्गी वर्तलें काय कथेम ॥सर्व गण मिळूनि सभेस ॥शिवा बैसले वेष्टुनी
॥६२॥
सुधाम अति मनोहारक ॥रत्नजांडत तें हाटक ॥तरी धाम नोहे वेडूर्यविकासिक ॥शिवसभा मिरवतसे
॥६३॥
ऐसिये सभे ते काळीं ॥बैसली असतां गणमंडळी ॥सुरोचना अप्सरा चंद्रमौळी ॥पाचारिता पैं झाला
॥६४॥
तंव ती सुरोचना देवांगना ॥वेगीं येऊनि सिद्धांगणा ॥मदनांतकाच्या लागूनि चरणा ॥नाट्यपरी वहिवटली
॥६५॥
नाट्यें करितां चातुर्यगायन ॥चतुर्थ स्वरीं परम संपूर्ण ॥तानमानीं संकेत दावून ॥नृत्य करी आगळी
॥६६॥
परी नृत्य करितां भावनेंत ॥भावना कल्पी स्वचित्तांत ॥कीं स्मरातीते होऊनि रत ॥कामभावनें निवटावे
॥६७॥
ऐसिये कामनीं पेटूनि कामा ॥परी काम दाटला शरीरउगमा ॥तेणेंकरुनि नाट्यें उत्तम ॥नृत्य करितां चांचरली
॥६८॥
चाचणी पाहूनि अपर्णाकात ॥तियेची भावना आणूनि चित्तांत ॥म्हणे कामीण कामानलातें ॥पेटली ही अप्सरा
॥६९॥
तरी अहंकार विलक्षण ॥योग्य नव्हे ही कामीण ॥तरी ईतें सुलभ जन्म ॥देऊनियां रत व्हावें
॥७०॥
ऐसी कल्पना आणूनि चित्तीं ॥बोलतां झाला पशुपती ॥म्हणे सुरोचने काम चितीं ॥तुझा माते समजला
॥७१॥
तरी तूं ऐसिया भ्रष्टपणीं ॥शीघ्र पावसी मृत्यु अवनीं ॥भद्रसंगमीं जन्म घेऊनी ॥विप्रकुशी मिरवसी
॥७२॥
मित्राचार्य पिता तया नाम ॥माता शरयू परम सुगम ॥तियेचे कुशीं तुज जन्म ॥मानवदेहीं मिरवीं कां
॥७३॥
ऐसें वदता झाला अंत ॥सुरोचना भयभीत ॥चित्तीं म्हणे स्वर्गच्युत ॥हीनदैवें झालें मी
॥७४॥
अहा चित्तीं उदेले दैवमांदुस ॥तेथें उदेला दैवें खईस ॥तेवी इच्छिल्या शिरवतीस ॥अलाभातें मिरवलें
॥७५॥
अहा जी करुं जातां एक ॥प्रारब्ध घडवी अनेक ॥करी कवळिता रत्नमाणिक ॥काचप्रणि निवडिला
॥७६॥
ऐसी सुरोचना चित्तीं चिंतून ॥करिती झाली म्लानवदन ॥उपरी तिनें स्तुतिस्तवन ॥शिवालागीं आरंभिलें
॥७७॥
म्हणे महाराजा कैलासपती ॥नंदीवहना चक्रवर्ती ॥त्रिशूळपाणी सर्वागी विभूती ॥व्यक्ताव्यक्त अससी तूं
॥७८॥
फरशांकुश गदा तोमर ॥डंमरु चक्र कपालपात्र ॥इहीं शोभती दशकर ॥रुंडमुंडभूषणिका
॥७९॥
भाळी इंदू कबरी गंगा ॥श्वेतवर्णा करिती योगा ॥वस्ती सुलक्षें आवडे नगा ॥पूर्ण जोगा साधावया
॥८०॥
तरी हे उमामायाधवा ॥देवा श्रेष्ठा महाभावा ॥विज्ञानधारणीं अनुभवा ॥महादेव तुज म्हणती
॥८१॥
तरी आतां प्रज्ञावंता ॥चुकुर माझी वारी व्यथा ॥भोळेपणीं मानूनि चित्ता ॥उश्शापातें वदावें
॥८२॥
ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥तोषला मृडानीवर मनीं ॥म्हणे सुरोचने तूतें अवनीं ॥प्राप्त होईल निश्चयें
॥८३॥
परी माते तूं अर्चितां ॥प्रत्यक्ष होऊनि तुझिया अर्था ॥मग सहज माझा स्पर्श होतां ॥स्वस्थानातें तूं येशी
॥८४॥
हाचि माझा वरउश्शाप ॥तरी खेदातें करीं लोप ॥ऐसें बोलतां गणाणिवभूप ॥चालती झाली उर्वशी
॥८५॥
भद्रसंगमीं विप्रोत्तम ॥मित्राचार्य पवित्र नाम ॥शरयु कांते वरितां काम ॥दृश्य झाली जठरातें
॥८६॥
पुढें लोटतां दिवसानुदिवस ॥पूर्ण होतां नव मास ॥कन्यारत्नपंकजास ॥उदय झाला वेल्हाळ
॥८७॥
परी ती ठायीची उर्वशी ॥कवणा न वर्णवे स्वरुपासी ॥बालार्ककिरणी सतेजराशी ॥कनकपंकजा मिरवतसे
॥८८॥
चंद्राननी आकर्ण नयन ॥खंजरीटकलिका देदीप्यमान ॥जिचें पाहतां मुखमंडन ॥मदन मूर्च्छा वरीतसे
॥८९॥
जिचे दंत माणिकवर्णी ॥अधर विकासत सुहास्यवदनी दंततेजें पाषाणतरणी ॥रत्नपंकजा मिरवतसे
॥९०॥
पवळदेठी अधरभार ॥सरळ नासिक पदनस्थिर ॥परमतेजवंत वस्त्र ॥पाहूनि चंद्र लाजतसे
॥९१॥
चंपकमालतीसुवासमाला ॥कीं मलयागरें दिधली कळा ॥ऐसें गंधी षटपदमेळा ॥रुंजावया धांवतसे
॥९२॥
एक कोश वनांत ॥तरु होती तैं सुगंधित ॥मृत्तिका करुनि मृगमदास ॥सर सर परतें म्हणविती
॥९३॥
ऐसियेपरी गजगामिनी ॥दिवसेंदिवस वृद्धि होऊनि ॥द्वादश वरुषें पवित्रपणीं ॥कदंबा ऐसें मिरवतसे
॥९४॥
परी ती कदंबा शुभाननी ॥द्वादश वरुषें इंद्रियदमनीं ॥पिता पतीतें पडतां यत्नीं ॥परी ती न वरी भर्त्यातें
॥९५॥
सदा विरक्त शिवस्मरणी ॥शिवध्यान आसनीं शयनीं ॥काया वाचा अंतःकरणीं ॥शिववेधें वेधली
॥९६॥
शिवार्चनीं तात माता ॥जाती नित्य उभयतां ॥तयांसगें लावण्यलता ॥कदंबाही जातसे
॥९७॥
बाळपणीं नित्यनित्य ॥शिवा दर्शन तियेसी होत ॥पुढें होतां वयस्थित ॥शिव स्वतः अर्चीतसे
॥९८॥
ऐशीं लोटतां द्वादश वरुषें ॥तों कोणे एके सुदिन दिनास ॥गृहीं सांडूनि तातमातेस ॥शिवालयी गेली ते
॥९९॥
तंव ते समयीं देवळांत ॥कोणीच नसे एकांतात ॥कदंबा तेथे संचार करीत ॥एकटपणी शुभांगी
॥१००॥
जय जय हर म्हणूनि वाणी ॥मस्तक ठेवी महीलागुनी ॥ते समयीं मृडानीवर तीलागुनी ॥अदृश्य होता त्या ठायीं
॥१०१॥
गुप्त तेथ शिव पंचानन ॥पाहता झाला तियेकारण ॥परी ती दारा सुलक्षण ॥मुखमंडणीं देखिली
॥१०२॥
जैसी चपळा तेजभरित ॥शिवधार्मी लखलखित ॥तीतें पाहतां अपर्णानाथ ॥कामवेष्टणीं पडियेला
॥१०३॥
मग हास्ययुक्त होऊनि कुमारतात ॥मनीं इच्छी व्हावें रत ॥ऐसें योजूनि चपळवंत ॥धरुं पाहे ती चपळा
॥१०४॥
परी तो शिव तेजखाणी ॥धांवतां देखिला जैसा तरणी ॥तेणेंकरुनि भयभीत होऊनि ॥पळूं लागे कदंबा
॥१०५॥
शिवालयातें सोडूनि बाहेरी ॥येती झाली विप्रकुमरी ॥परी तो शिव कामातुर ॥तियेमागें धांविन्नला
॥१०६॥
पुढें कदंबा मागें भव ॥उभयतां महीतें घेती धांव ॥धांव घेतां सदाशिवे ॥जाऊनियां स्पर्शिली
॥१०७॥
परी शिवस्पर्श होतां तीतें ॥सांडी मानवतनूतें ॥सुगेचना अप्सरा होऊनि त्वरित ॥स्वर्गाप्रती चालिली
॥१०८॥
चालिली परी एकीकडे ॥शिवकामाचा उजळिला पाड ॥ठाव सांडूनि इंद्रियपाड ॥द्रव द्रवला महीतें
॥१०९॥
द्रव द्रवतां महीपाठीं ॥पाहतां झाला कृष्णातटी ॥उदक मिळतां एकवटीं ॥सकळ मासे संचरले
॥११०॥
संचरले परी पूर्वीपासून ॥तये समयीं पर्वतघन ॥तेणें प्रवाहीं कृष्णासंगमनीं ॥रेतपात मिरवला
॥१११॥
पर्जन्यकाळी तो अचाट ॥जात होता कृष्णपात्रांत ॥तये संधींत राव सुभट ॥स्नानालागीं मिरवला
॥११२॥
स्नान करुनि शशांगर ॥तटीं बैसला होऊनि स्थिर ॥स्नानसंध्या सारोनि समग्र ॥अर्घ्यप्रदानीं प्रवर्तला
॥११३॥
करीं घेतां कृष्णाजीवन ॥तों रेत दाटले अंजुळींत येऊन ॥मानवदेहाचा स्पर्श होऊन ॥रेतीं पुतळा रचियेला
॥११४॥
रचिला परी न लागतां क्षण ॥सकळ अवयव दैदीप्यमान ॥रायें पाहतां प्रत्यक्ष वदन ॥बाळतनूतें देखिलें
॥११५॥
पाहतांचि राजा हर्षयुक्त ॥म्हणे मज पावला उमाकांत ॥अयोनसंभव सुत ॥प्रतापदक्ष मज झाला
॥११६॥
तरी हा कोणी महीअवतार ॥असेल विरिंचि हरि हर ॥वाचस्पति सहस्त्रनेत्र ॥अवनीवरी उतरला
॥११७॥
ऐसा आनंद मानोनि चित्तीं ॥उठता झाला तो नृपती ॥बाळक कवळोनि हदयाप्रती ॥शिबिरा प्रविष्ट पैं झाला
॥११८॥
मंदाकिनी सुंदर कांता ॥परम सत्त्वस्थ पतिव्रता ॥तिये करीं बाळ ओपितां ॥पाहोनि तेही आनंदें
॥११९॥
रायासी म्हणे मंदाकिनी ॥बाळ कोणाचा आणिला स्वामी ॥राव म्हणे अर्घ्यजीवनीं ॥उदय पावला करपात्रीं
॥१२०॥
तरी हा ईश्वरें पुत्र तूतें ॥दिधला आहे उमाकांतें ॥तरी पालन करुनि महीतें ॥पुत्रवती मिरवें कां
॥१२१॥
ऐसी ऐकूनि नरेंद्र वाणी ॥परम हर्षली मंदाकिनी ॥मग अति स्नेहाचें भरतें आणूनी ॥बाळ हदयीं कवळिला
॥१२२॥
लावितांचि स्तन मुखासी ॥पान्हा आला स्तनासी ॥संस्कारोनि कृष्णागर नामासी ॥द्वादशावे दिनीं स्थापिलें
॥१२३॥
यावरी राव शिवापासून ॥निघतां झाला मग तेथून ॥कौंडण्यग्राम अपूर्व स्थान ॥येऊनियां पोंचला
॥१२४॥
यावरी दिवसानुदिवस ॥कृष्णागर पावला दश वर्षे ॥मग विवाहचिंता शशांगरास ॥स्नुषारुपी दाटली
॥१२५॥
मग कर्दयमंत्री पुरोहित ॥ऐक्य करुनि नृपनाथ ॥देशावरी पाठवीत ॥सुलक्षण कुमारी योजावया
॥१२६॥
परी राव सांगे मंत्रिकांकारण ॥कीं कुमारी पहावी सुलक्षण ॥रुपवती गुणानें समान ॥कृष्णागरासारखी
॥१२७॥
अवश्य म्हणोनि मंत्रिकवृंद ॥जात देशातें समुच्चयवृद ॥पुरोहितादि पाहती संबंध ॥कृष्णागर रायाचा
॥१२८॥
नाना क्षेत्र राज्य पाहूनि ॥कुमारी पाहे मंत्री नयनीं ॥परी कृष्णागराच्या रुप मांडणी ॥एकही कन्या आढळेना
॥१२९॥
सकळ मंत्री देशोदेश ॥पाहूं श्रमले कुमारीस ॥परी सर्वसंपन्न तयांस ॥कोणी एक आढळेना
॥१३०॥
रुप पाहती तों गुण हीन ॥गुण पाहती तों स्वरुप हीन ॥रुप गुण असतां घटित समान ॥उभयतांचें येईना
॥१३१॥
ऐसियेपरी सांगोपांग ॥कोठेंहि दिसेना शुभमार्ग ॥अति श्रमोनि लागवेग ॥स्वस्थानासी पातले
॥१३२॥
रायासी भेटूनि सांगती वृत्तांत ॥कीं कन्यारत्नें अपरिमित ॥गुणरुपघटितार्थ ॥कोणी एक दिसेना
॥१३३॥
आजवरी महाराजा ॥द्विसंवत्सर लोटले काजा ॥परी कन्यारत्न चोजा ॥नातळे ऐसें झालेंसें
॥१३४॥
ऐसें रायातें मंत्री सांगून ॥पाहते झाले आपुलीं स्थानें ॥याउपरी षणभास दिन ॥लोटूनि गेले तयापाशीं
॥१३५॥
याउपरी कोणे एके दिवशी ॥कृतातभृत्य येऊनी महीशीं ॥घेऊनि गेले मंदाकिनीसी ॥परत्रदेशाकारणे
॥१३६॥
मग सुशरीर मंदाकिनी ॥रायें शशांगरें पाहनी ॥परम विव्हळ झाला वियोगेंकरुनी ॥शोकार्णवीं दाटला
॥१३७॥
परी कैसाही असला मायिक देही ॥मेल्यामागें मरत नाही ॥असो उचंबळोनि शोकप्रवाहीं ॥हुंदकिया संपादि
॥१३८॥
उपरी उत्तरक्रिया करुनि ॥राव सेवी सिंहासन ॥त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण ॥श्राद्धदशा उरकली
॥१३९॥
उरकली परी कामिनीविण ॥राया चित्तीं न वाटे कल्याण ॥कामानळीं पंचप्राण ॥व्याकुळ बहु होतासी
॥१४०॥
परी राव तो इंद्रियदमनी ॥कदा न पाहे व्यभिचार मनीं ॥मग मंत्रिकासी बोलावुनी ॥निक्ट बैसवी आपुल्या
॥१४१॥
म्हणे मकरंदा सुलक्षणा ॥तूं करुं गेलासी देशभ्रमणा ॥परी कुमारी रुपवंत आणि सगुणा ॥कोणी तरी आढळली कां
॥१४२॥
मंत्री म्हणे जी नृपनाथ ॥कुमारी आहे स्वरुपवंत ॥आणि गुणही उत्तम दिसत ॥परी घटित दिसेना
॥१४३॥
उपरी मंत्रिका बोलत ॥जरी सुतालागीं न उतरे घटित ॥तरी आमुचे नामीं घटितार्थ ॥शोध शोधूनि पहावा
॥१४४॥
मंत्री म्हणे जी पुरोहितें ॥टिप्पणे आणिली आहेत लिखितें ॥तरी त्यातें पाचारुनि संबंधातें ॥विलोकूनि पाहिजे
॥१४५॥
मग पाचारुनि पुरोहितास ॥सकळ कुमारीची टिप्पणें पहात ॥तों चित्रकुटीचा नृपनाथ ॥घटितार्थ आवडला
॥१४६॥
नाम जया भुजध्वज ॥धार्मिक प्राज्ञिक महाराज ॥तयाची कन्या तेजःपुंज ॥भुजावंती मिरवली
॥१४७॥
रुपवंत गुणवंत ॥तया नामीं आले घटित ॥मग पाचारुनि मंत्रिकातें ॥तया स्थानीं पाठविले
॥१४८॥
मंत्री जाऊनि चित्रकूटासी ॥पुन्हां भेटूनि भुजध्वजासी ॥वृत्तांत सांगूनि सकळ रायासी ॥लग्नपत्रिका काढिली
॥१४९॥
लग्नपत्रिका आणि भृत्य ॥लिहूनि पाठविले अर्जदास्त ॥रायापाशीं येतांचि दूत ॥वर्तमान निवेदिती
॥१५०॥
लग्नपत्रिका आणि दूत ॥पाहूनि राव संतोषत ॥मग सरंजामीं जाऊनि तेथ ॥लग्नसोहळा उरकला
॥१५१॥
मग ती कांता घेवोनि राव ॥पाहता झाला आपुला ठाव ॥उपरी दिवसेंदिवस थोरीव ॥भुजावंती झालीसे
॥१५२॥
त्रयोदश वर्षे व्यवस्थित ॥भुजावंती मही मिरवत ॥येरीकडे सप्तदश वर्षात ॥कृष्णागरु मिरवला
॥१५३॥
परी भुजावंती अंतःपुरांत ॥धाम उभविलें एकांत ॥अगम्य जितुके रायातें ॥तितुके ती मिरवत
॥१५४॥
असो एकांती भुजावंती ॥सापत्नसुताची ऐकीव उक्ती ॥होती परी दृष्टिव्यक्ती ॥एकमेकांतें पाहती तीं
॥१५५॥
तो कोणे एके सुदिनाशीं ॥राव गेला मृगयेसी ॥कृष्णागरु धामासीं ॥वेधोनियां पहातसे
॥१५६॥
सहज वावडी घेवोनि हातीं ॥चित्त रंजवी खेळा निगुतीं ॥तो येरीकडे भुजावंती ॥धामावरी आलीसे
॥१५७॥
राजकिशोर पाहूनि नयनीं ॥दृष्टी वंचली सुतालागूनी ॥तेणें वेष्टूनि पंचबाणी ॥परिचारिके बोलत
॥१५८॥
म्हणे पैल धामाप्रती ॥वावडी उडवी वाताकृती ॥त्यातें पाचारुनि उत्तमगती ॥स्वधामातें आण वेगें
॥१५९॥
ऐसें ऐकूनि दासी वचन ॥पाहती झाली रजनंदन ॥रायासी म्हणे तव मातेनें ॥चित्तीं हेतू वरियेला
॥१६०॥
तरी महाराजा उत्तम जेठी ॥शीघ्र चलावें तियेचे भेटी ॥राव ऐकोनि कर्णपुटीं ॥अवश्य म्हणे येतो कीं
॥१६१॥
भवंडीदोर देत सेवकाहातीं ॥आपण निघे सर्वज्ञमूर्ती ॥सहज चाले सदनाप्रती ॥जात आनंदेंकरोनियां
॥१६२॥
रायें करुनि आणिले लग्न ॥तेव्हां गेला होता दर्शना ॥तयासी लोटले बहुत दिन ॥म्हणे आजि सुदिन उगवला
॥१६३॥
मज आज वत्सातें माउली ॥कोणीकडूनि पान्हावली ॥तरी आज भाग्य साउली ॥सफळ पूर्ण झालीसे
॥१६४॥
ऐसा आनंदोत्साह चित्तीं ॥मानूनि जातसे नृपती ॥सहज चालीं सदनाप्रती ॥जावोनियां पोंचला
॥१६५॥
तंव ती दारा उपरीवरी ॥येतां पाहिलें कृष्णागरीं ॥खालीं उतरुनि शयनगुहारीं ॥पाहती झाली वेल्हाळी
॥१६६॥
शयनसदनाचे धरुनि द्वार ॥उभी राहिली ती सुकुमार ॥तों परिचारिका कृष्णागार ॥घेऊनियां पोचली
॥१६७॥
पोंचली परी हस्तसंकेतें ॥रायाप्रती दावी सदनातें ॥आपुल्या घरीं दासी जात ॥भेट करुनि उभयतां
॥१६८॥
येरीकडे कृष्णागर ॥चालीं चालतां गेला समोर ॥जातांचि करी नमस्कार ॥सापत्न माता म्हणोनि
॥१६९॥
परी ती बाळा मदनबाळी ॥वेष्टिली होती कामानळीं ॥तेणें चित्तदरीं काजळी ॥अज्ञानपणीं मिरवितसे
॥१७०॥
सुतें केला नमस्कार ॥परी ती न वदे यावर ॥तें पाहुनियां कृष्णागर ॥मनामाजी चाकाटला
॥१७१॥
परी निकट झालिया त्या वास ॥येरी जाऊनि धरी हस्तास ॥म्हणे माझे तुष्ट मानस ॥कामानळें विझवीं कां
॥१७२॥
राया तव स्वरुप अर्ककांत ॥द्रवते झालें कामानळांत ॥तरी चितेविण जाळूं पहात ॥शांत करीं महाराजा
॥१७३॥
ऐसें ऐकतां तियेचें वचन ॥राव कोपे क्रोधेंकरुन ॥म्हणे सेवूनि राहसी कानन ॥सावजापरी काय वो
॥१७४॥
तूं प्रत्यक्ष माझी सापत्न माता ॥कुडी बुद्धी वरिसी चित्ता ॥तरी या कृत्या कोण त्राता ॥तूतें होईल पुढारा
॥१७५॥
अहा स्त्रीजाती अमंगळा ॥दुर्गमसरिता परम चांडाळा ॥नेणें अनर्थासह बंडाळा ॥जगामाजी वाढविती
॥१७६॥
ऐसें म्हणूनि कृष्णागर ॥आसडूनि चालिला आपुला पदर ॥सदना येऊनि खेळावर ॥तैसाचि पुन्हां वहिवाटला
॥१७७॥
येरीकडे भुजावंती ॥सुत ऐसे समजतां चित्तीं ॥परम भयाचे व्याप्ती ॥दासीलागीं पाचारी ॥म्हणे बाई वो झालें विघ्न ॥प्रेम भयानक घेईल प्राण ॥तो परपुरुष नव्हता सापत्ननंदन ॥अर्थ ओंगळ झाला गे
॥१७९॥
तरी हा झाला वृत्तांत ॥आतां रायास करील श्रुत ॥श्रुत झालिया प्राणघात ॥मिरवेल सखे मम देहीं
॥१८०॥
तरी आतां विष घेऊन ॥द्यावा वाटते आपुला प्राण ॥प्राण हरल्या सकळ कल्याण ॥मजप्रती वाटतसे
॥१८१॥
विपरीतात विपरीत करणी ॥गुप्त राहील सकळ जनीं ॥नातरी वांचल्या विटंबनी ॥नाना क्लेशां भोगावे
॥१८२॥
तरी यांतचि सारगोष्टी ॥हेत मिरवावे मृत्युवाटीं ॥नातरी वांचल्या राव शेवटीं ॥विटंबोनि मारील गे
॥१८३॥
मारिल्यास सर्व लोकांत ॥बाई गे होईल अपकीर्त ॥म्हणतील रांड परम कुजात ॥भ्रष्टबुद्धि पापिणी
॥१८४॥
असो ऐसा दुर्घट विचार ॥ओढवला तरी सारांत सार ॥गुप्तप्रकरणीं प्राणावर ॥उदार व्हावें आपणचि
॥१८५॥
ऐसी तीतें बोलतां युवती ॥सखी होईल उत्तराप्रती ॥तें पुढील अध्यायीं भक्तिसारग्रंथीं ॥श्रवण करा श्रोते हो
॥१८६॥
तरी हा ग्रंथ भक्तिसार ॥तुम्हींच वदवितां मनोहर ॥निमित्त मात्र धुंडीकुमर ॥मालू नरहरीचा मिरवितसे
॥१८७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥त्रिंशति अध्याय गोड हा
॥१८८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार त्रिंशति अध्याय समाप्त ॥