श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय २४
भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापांचा वियोग. १९० ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी निरंजना ॥अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ॥पूर्णब्रह्मा मायाहरणा ॥चक्रचाळका आदिपुरुषा
॥१॥
हे गुणातीता सर्वत्रभरिता ॥गुणरुपा लक्ष्मीकांता ॥मागिले अध्यायीं रसाळ कथा ॥मच्छिंद्रोत्सव दाविला
॥२॥
एका सुवर्णविटेसाठीं ॥कनकगिरी करी गोरक्षजेठी ॥आतां मम वाग्वटी ॥भर्तरी आख्यान वदवीं कां
॥३॥
तरी श्रोते ऐका कथन ॥पूर्वी मित्ररश्मी करितां गमन ॥वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन ॥अस्ताचळा जातसे
॥४॥
तों उर्वशी विमानासनीं ॥येत होती भूलोकअवनी ॥तंव ती दारा मुख्यमंडनीं ॥मदनबाळी देखिली
॥५॥
देखतांचि पंचबाणी ॥शरीर वेधलें मित्रावरुणी ॥वेघतांचि इंद्रियस्थानीं ॥येऊनि रेत झगटलें
॥६॥
झगटतांचि इंद्रिय रेत ॥स्थान सोडूनि झालें विभक्त ॥विभक्त होता पतन त्वरित ॥आकाशाहूनि पैं झालें
॥७॥
परी आकाशाहूनि होतांचि पतन ॥वातानें तें विभक्तपण ॥द्विभाग झालें महीकारण ॥येऊनियां आदळलें
॥८॥
एक भाग लोमश आश्रमा ॥येऊनि पावला थेट उत्तमा ॥घटीं पडतांचि तनू उत्तमा ॥आगस्तीची ओतली
॥९॥
यापरी दुसरा भाग ॥तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग ॥येतांचि कैसा झाला वेग ॥तोचि श्रवण करा आतां
॥१०॥
कौलिक घेऊनि पात्र भर्तरी ॥मिक्षोद्देश धरुनि अंतरीं ॥निघता झाला सदनाबाहेरी ॥वस्तीपर्यटण करावया
॥११॥
परी कौलिक येतांचि बाहेर ॥भर्तरी ठेवूनि महीवर ॥बंद करीतसे सदनद्वार ॥कवीटाळें देऊनियां
॥१२॥
परी भर्तरी ठेविली अंगणांत ॥तों आकाशांतूनि रेत त्यांत ॥येऊनियां अकस्मात ॥भाग एक आदळला
॥१३॥
तों इकडे कौलिक ऋषी ॥टाळे देऊनि गृहद्वारासी ॥येऊनि पाहे भर्तरीसी ॥तों रेत व्यक्त देखिलें
॥१४॥
रेतव्यक्त देखतांचि पात्र ॥अंतःकरणीं विचारी तो पवित्र ॥चित्तीं म्हणे वरुणीमित्र ॥रेत सांडिलें भर्तरीं
॥१५॥
तरी यांत धृमीनारायण ॥अवतार घेईल कलींत पूर्ण ॥तीन शत एक सहस्त्र दिन ॥वर्षे लोटलीं कलीचीं
॥१६॥
इतकीं वर्षे कलीची गेलिया ॥धृमींनारायण अवतरेल भर्तरीं या ॥तरी आतां भर्तरी रक्षूनियां ॥ठेवूं आश्रमीं तैसीच
॥१७॥
मग ती भर्तरी रेतव्यक्ती ॥रक्षिता झाला आश्रमाप्रती ॥त्यास दिवस लोटतां बहुतां ॥पुढें कलि लागला
॥१८॥
मग तो कौलिक ऋषी ॥गुप्त विचारितां प्रगट देशीं ॥भर्तरी नेऊनि मंदराचळासी ॥गृहाद्वारीं ठेविली
॥१९॥
गृहाद्वारीं ठेवूनि पात्र ॥तो अदृश्य विचरे पवित्र ॥तों कलि लोटतां वर्षे तीन सहस्त्र ॥एकशतें तीन वर्षे
॥२०॥
तों द्वारकाधीशअंशें करुन ॥भर्तरींत संचरला धृमीनारायण ॥जीवित्व व्यक्त रेताकारण ॥होतांचि वाढी लागला
॥२१॥
वाढी लागतां दिवसेंदिवस ॥पुतळा रेखित चालिला विशेष ॥पूर्ण भरतां नवमास ॥सिद्ध झाला तो पुतळा
॥२२॥
परी मधुमक्षिकेनें पात्रांत ॥मधूचें जाळें केले होतें ॥तयाचे संग्रहें व्यक्त ॥बाळ वाढी लागला
॥२३॥
वाढी लागतां मधुबाळ ॥नवमास लोटतां गेला काळ ॥परी तो देहें होता स्थूळ ॥भर्तरी पात्र मंगलें
॥२४॥
बहुत दिवसांचे पात्रसाधन ॥झालें होतें कुइजटपण ॥त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन ॥पर्वत कोसळता लोटले
॥२५॥
कोसळतां परी एक पाषाण ॥गडबडीत पातला तें स्थान ॥परी पावतांचि पात्रासी झगडोन ॥भर्तरी भंग पावली
॥२६॥
भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत ॥तेजस्वी मिरवले शकलांत ॥मक्षिकेचे मोहळ व्यक्त ॥तेहीं एकांग जाहलें
॥२७॥
मग त्यांत निर्मळपणीं बाळ विरक्त ॥मिरवों लागलें स्वतेजांत ॥जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त ॥निर्मळपणीं मिरवतसे
॥२८॥
कीं स्थिरावल्या जैसे जीवन ॥तळा बैसलें गढूळपण ॥तें बाळ भर्तरी शुक्तिकारत्न ॥विमुक्त झालें वेष्टणा
॥२९॥
परी कडा कोसळला कडकडीत ॥शब्द जाहले अति नेट ॥तेणेंकरुनि मक्षिका अचाट ॥भय पावोनि पळाल्या
॥३०॥
येरीकडे एकटें बाळ ॥शब्दरुदनीं करी कोल्हाळ ॥तेथें चरे कुरंगमेळ ॥तया ठायीं पातल
॥३१॥
तयांत गरोदर कुरंगिणी ॥चरत आली तये स्थानीं ॥तों बाळ रुदन करितां नयनीं ॥निवांत तृणीं पडलेंसे
॥३२॥
तरी अफाट तृण दिसे महीं ॥त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ॥चरत येतां हरिणी तया ठायीं ॥प्रसूत झाली बाळ पैं
॥३३॥
प्रसूत होतां बाळें दोन्ही ॥झालीं असतां कुरंगिणी ॥पुनः मागें पाहे परतोनी ॥तों तीन बाळें देखिलीं
॥३४॥
माझींच बाळे त्रिवर्ग असती ॥ऐसा भास ओढवला चित्तीं ॥मग जिव्हा लावूनि तयांप्रती ॥चाटूनि घेतलें असे
॥३५॥
परी तो खडतरपणी दोन्ही पाडसें तीतें ॥संध्याअवसरीं झगडलीं स्तनातें ॥परी हें बाळ नेणे पानातें ॥स्तन कवळावें कैसे तें
॥३६॥
मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस ॥चहूंकडे ठेवूनि चौपदांस ॥मग वत्सलोनि लावी कांसेस ॥मुख त्याचें थानासी
॥३७॥
ऐसे लोटतां कांहींएक दिवस ॥तों तें रागूं लागलें महीस ॥मग ते मृगी लावूनी थानास ॥संगोपन करीतसे
॥३८॥
ऐसें करवोनि स्तनपानीं ॥नित्य पाजी कुरंगिनी ॥आपुले मुखींची जिव्हा लावूनी ॥करी क्षाळण शरीरासी
॥३९॥
पाडसें ठेवूनि तया स्थानीं ॥चरूं जातसे विपिना हरिणी ॥घडोघडी येतसे परतोनी ॥जाई पाजूनि बाळातें
॥४०॥
ऐसें करितां संगोपन ॥वर्षे लोटलीं तयातें दोन ॥मग हरिणामध्येंचि जाऊन ॥पत्रें भक्षी वृक्षांची
॥४१॥
परी त्या वनचरांचे मेळीं ॥विचारितां सावजभाषा सकळी ॥स्पष्ट होऊनि त्या मंडळीं ॥त्यांसमान बोलतसे
॥४२॥
हस्तिवर्ग गायी म्हैशी व्याघ्र ॥जंबुक लांडगे हरिण भयंकर ॥शार्दूळ रोही गेंडा सांबर ॥भाषा समजे सकळांची
॥४३॥
सर्प किडे मुंगी पाळी ॥पक्षी यांची बोली सकळी ॥तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं ॥देत असे सकळांसी
॥४४॥
ऐसियापरी वनचर - रंगणी ॥प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ॥जिकडे जिकडे जाय हरिणी ॥तिकडे तिकडे जातसे
॥४५॥
ऐसें पांच वर्षेपर्यंत ॥हरिणीमागें तो हिंडत ॥तों एके दिवशीं चरत ॥हरिणी आली त्या मार्गे
॥४६॥
काननीं चरतां मार्गे नेटें ॥तो बाळही आला ते वाटे ॥तों मार्गी सहस्त्रीपुरुष भाट ॥मग त्या वाटे तीं येती
॥४७॥
त्या भाटा जयसिंग नाम ॥कांता रेणुका सुमध्यम ॥परी उभयतांचा एक नेम ॥एकचित्तीं वर्तती
॥४८॥
प्रवर्तती परी कैसे अलोटीं ॥शत्रुमित्र ऐक्यदृष्टीं ॥कीं धनदघातका मोह पोटीं ॥समानचि वर्ततसे
॥४९॥
तन्न्यायें पुरुषकांता ॥प्रपंचराहाटीं वर्तत असतां ॥तों सहज त्या मार्गे येतां ॥तया ठायीं पातले
॥५०॥
पातले परी मार्गावरती ॥बाळ देखिले दिव्यशक्ती ॥बालार्ककिरणी तेजाकृती ॥लखलखित देखिलें
॥५१॥
कीं सहजासहज करावया गमन ॥महीं उतरला रोहिणीरमण ॥कीं पावकतेजकांती वसन ॥गुंडाळलें वाटतसे
॥५२॥
ऐशापरी तेजःपुंज ॥जयसिंग भाट देखतां सहज ॥मनांत म्हणे अर्कतेज ॥बाळ असे कोणाचें
॥५३॥
ऐसें स्त्रियेसी म्हणतसे ॥ऐसिया अरण्यांत असे ॥बाळ सांडूनि गेली सुरस ॥मातापिता कैसी तीं
॥५४॥
कीं सहजचाली चालतां ॥यांत चुकली याची माता ॥ऐसे अपार संशय घेतां ॥तयापाशीं पातले
॥५५॥
पातले परी बाळ पाहोन ॥भयें व्याप्त झालें मन ॥मग मृग बोलिले आरंबळोन ॥पळूं लागले मार्गातें
॥५६॥
तें पाहूनि जयसिंग भाटें ॥धांवोनि धरिली बाळकाची पाठ ॥पाठीं लागूनि धरुनि मनगट ॥उभा केला बाळ तो
॥५७॥
उभा करुनि त्यातें बोलत ॥म्हणे बाळा सांडीं भयातें ॥तूतें भेटवीन तव मातेतें ॥माता कोण ती सांग
॥५८॥
परी तैं कुरंगभाषेकरुन ॥आरंबळतसे छंदेंकरुन ॥नेत्रा लोटलें अपार जीवन ॥हांक मारी हरिणीतें
॥५९॥
परी ते हरिणी बाळ पाहून ॥कासावीस झाले परम प्राण ॥परी मनुष्यभयेंकरुन ॥निकट येऊं शकेना
॥६०॥
हरिणी आपुले ठायींच्या ठायीं ॥परम आरंबळें महीते देहीं ॥येरीकडे मार्गप्रवाहीं ॥भाट बोले बाळातें
॥६१॥
म्हणे वत्सा व्यर्थ कां रडसी ॥कोण मातापिता आहे तुजसी ॥सोडूनि गेलीं अरण्यासी ॥तरी भेटवूं तुज आतां
॥६२॥
परी कुरंगभाषेकरुन ॥ब्यां ब्यां करुनि करी रुदन ॥मग भाट म्हणे हें वाचाहीन ॥मुखस्तंभ वाटतसे
॥६३॥
मग हस्तखुणेनें पुसे त्यांतें ॥परी खूणही तें नेणे परतें ॥मग जयसिंग म्हणे आपुले मनातें ॥परम अज्ञानी बाळक हें
॥६४॥
तरी आतां असो कैसें ॥यातें आपुल्या न्यावें वस्तीस ॥याची जननी भेटल्यास ॥हस्तगत यातें करुं
॥६५॥
ऐसा विचार करुनि मनासीं ॥उचलूनि घेतला स्कस्कंधासीं ॥परी तें आरंबळोनि हरिणीसी ॥पाचारीत अट्टहास्यें
॥६६॥
परी ती कुरंगभाषा कांहीं ॥जयसिंगातें माहीत नाहीं ॥तैसें वाहूनि मार्गप्रवाहीं ॥घेऊनि जात बाळका
॥६७॥
परी त्या बाळकासी घेऊनि जातां ॥अति आरंबळे हरिणी चित्ता ॥सव्यअपसव्य वेढा भंवता ॥घेऊन हंबरडा मारीतसे
॥६८॥
बाळावरी ठेवूनी दृष्टी ॥धांव घेतसे पाठोपाठीं ॥ठायीं ठायीं महीतटीं ॥उभी राहूनि आरंबळे
॥६९॥
ऐसी हरिणी आरंबळत ॥दुरोनि त्यासी मार्ग गमत ॥परी तो जयसिंग पाहूनि मनांत ॥विचार करी आपुल्या
॥७०॥
म्हणे ही हरिणी कवणे अर्थी ॥हिंडत आहे काननाप्रती ॥पाडस चुकार झालें निगुतीं ॥म्हणोनि हिंडे विपिनी ही
॥७१॥
ऐसियेपरी चित्तीं भास ॥भासूनि गमन करीतसे मार्गास ॥गमन करितां स्वगृहास ॥वस्तीत जाऊनि पोहोंचला
॥७२॥
मग ती वस्ती पाहोनि हरिणी ॥विपिना गेली निराशपणीं ॥परी ठायीं ठायीं उभी राहूनि ॥हंबरडा मारी आक्रोशें
॥७३॥
येरीकडे जयसिंग भाट ॥येतां ग्रामा झाला प्रविष्ट ॥बाळ ओपूनि कांते सुभट ॥वस्ती फिरुं पातला
॥७४॥
सकळ वस्तीची फेरी फिरुन ॥पुन्हां शिबिरा येत परतोन ॥ऐसे करितां मास तीन ॥लोटूनि गेले वस्तीसी
॥७५॥
परी तें बाळ आरंबळतां ॥भयानें राहिली सकळ व्यथा ॥मग थोडी थोडी संवय लागतां ॥हरिणीस विसर पडला
॥७६॥
तेचि नीतीं बाळ विसर ॥शनैक पडला कुरंगापर ॥मग भोजनपानादिक सारासार ॥कळों सविस्तर लागलें
॥७७॥
बोली चाली शनैःशनैक ॥प्रविष्ट जाहलें तें बाळक ॥मग हांका मारी जननी जनक ॥भक्षावया मागतसे
॥७८॥
असो ऐसियापरी अलोट ॥ग्रामोग्रामीं हिंडे भाट ॥हिंडतां हिंडतां भागीरथी तट ॥काशीक्षेंत्रीं पातला
॥७९॥
पातला परी विश्वेश्वरीं ॥दर्शना जात देवालयांतरीं ॥स्नान करुनि भागीरथीतरीं ॥बाळ घेऊनि गेला असे
॥८०॥
विश्वेश्वराचें दर्शन करीत ॥तों लिंगातूनि बोलिला उमाकांत ॥यावें भर्तरीअवतारांत ॥दृश्य झालां तुम्हीं कीं
॥८१॥
ऐसे ऐकूनि नमस्कारितां ॥शब्दोदयीं झाला बोलता ॥त्याचे ते शब्द सहजता ॥जयसिंगें ऐकिले
॥८२॥
मग तो मनांत करी विचार ॥बाळ हें करितां नमस्कार ॥शिवलिंग बोले अति मधुर ॥भर्तरी ऐसें म्हणोनि
॥८३॥
तरी हा आहे कोन अवतारदक्ष ॥स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष ॥परी प्रारब्धयोगें आम्हां सुलक्ष ॥प्राप्त झाला वाटतसे
॥८४॥
जैसा दारिद्रिया मांदुसघट ॥सहज चालतां आदळे वाट ॥तेवीं आम्हां बाळ चोखट ॥प्राप्त झालें दैवयोगें
॥८५॥
कीं चिंतातुरासी चिंतामणी ॥अवचट लाधला मार्गेकरुनी ॥तेवीं मातें अवतारतरणी ॥प्राप्त झाला दैवानें
॥८६॥
कीं दुष्ट काळाची थोर रहाटी ॥प्राण अन्नाविण होतां कष्टी ॥तैं सुरभि येऊनि कृपाहोटीं ॥थान आपुलें ओपीतसे
॥८७॥
तन्न्याय मातें झालें ॥निर्देवा दैवें बाळ लाधलें ॥लाधलें परी पुण्य पावलें ॥अवतारी दिसतो हा
॥८८॥
हें पुण्य तरी वर्णू केवढे ॥जयासाठीं हा स्थूळवट दगड ॥हर्षे पावूनि संस्कारपाड ॥यावें भर्तरी म्हणतसे
॥८९॥
तरी आतां भर्तरी नाम ॥थोर पाचारुं वाचेकारण ॥ऐसीं चित्तीं कल्पना योजून ॥पुन्हां शिबिरा पातले
॥९०॥
पातले परी कांतेलागून ॥सर्व निवेदिलें वर्तमान ॥म्हणे हा पुत्र तुजकारण ॥अवतारदक्ष सांपडला
॥९१॥
तरी हा अवतारदक्ष कैसा ॥म्हणशील तरी वो वाग्रसा ॥तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा ॥यावें भर्तरी म्हणोनी
॥९२॥
अगे हा बाळ करितां नमन ॥ध्वनि हे निघाली लिंगांतून ॥ती म्यां ऐकिली आपुल्या कानें ॥म्हणोनि म्हणतों अवतार हा
॥९३॥
तरी आतां येथूनि याते ॥भर्तरी ऐसें नाम निश्वित ॥पाचारुनि अंतर्भूत ॥पालन करीं बाळाचें
॥९४॥
ऐसें सांगूनि तो युवती ॥टाकूनि गेला फेरीप्रती ॥परी श्रोते चित्तीं कल्पना घेती ॥शिव कां बोलिला भर्तरी
॥९५॥
यावें भर्तरी ऐसें वचन ॥किमर्थ बदला उमारमण ॥तरी तो भर्तरीत पावला जन्म ॥म्हणोनि शिव बोलिला असे
॥९६॥
भर्तरी अवतार सघन ॥यावें भर्तरी ऐसें म्हणोन ॥तरी आतां ऐसें ऐका वचन ॥कथा पुढें परिसावी
॥९७॥
ऐसें जयसिंग रेणुकेसी ॥सांगूनि वर्तमान तियेसी ॥भर्तरी नाम आनंदेसीं ॥पाचारीत उभयतां
॥९८॥
त्या उभयतांचें जठरांतरीं ॥संतति नसे संसारविहारीं ॥म्हणोनि स्नेहाची भोहित लहरी ॥बोलली असे तयातें
॥९९॥
रेणुका नित्य बैसवोनि अंकीं ॥चुंबन घेतले लालनअंकीं ॥नाना पदार्थ मागितले कीं ॥आणूनि देती उमयतां
॥१००॥
आसन वसन भोजन पान ॥देती करिती बहु लालन ॥बाळ खेळतांना पाहून ॥हर्षयुक्त होती ते
॥१०१॥
बाळ भर्तरी पंचवर्षी ॥बोबडे बोले नाचे महीसी ॥नाच नाचोनि धांवोनि कंठासी ॥मिठी घाली मातेच्या
॥१०२॥
मिठी घालितां रेणुका सती ॥उचलूनि घेत अंगावरती ॥चुंबन घेतां उभय तीं ॥हास्यवदन करिताती
॥१०३॥
हांसूनि एकमेकां म्हणती ॥ईश्वर पावला आपणांप्रती ॥उदरीं नसतां स्वसंतती ॥ईश्वरें दिधली कृपेनें
॥१०४॥
दिधली परी आक्षेप चित्तासी ॥घेऊनि म्हणती या बाळासी ॥मातापिता चुकल्यासी ॥शोधित असतील महीतें
॥१०५॥
परी ते शोधितां कोठें ॥अवचित जरी पडली गांठ ॥मग ते आपणां पासूनि नेटें ॥घेऊनि जातील बाळातें
॥१०६॥
ऐसी चिंता उभय तीं ॥नित्य त्निय हदयीं वाहती ॥अहा हें बाळ अलोलिक स्थिती ॥स्वरुपा मिती नसे याच्या
॥१०७॥
ऐसें बाळ हें परम सगुण ॥हें तों नेतील आम्हांपासून ॥ऐसें चिंतिती परी मन ॥घोंटाळत उभयतांचे
॥१०८॥
मग ते उभयतां विचार करिती ॥कीं यास सोडूनि क्षेंप्रत्राती ॥मही हिंडतां कोणे क्षिती ॥गांठी पडेल तयांची
॥१०९॥
मग त्या क्षेत्रीं स्थळ पाहून ॥राहते झाले भिक्षुकपणें ॥भिक्षा मागूनि क्षेत्राकारण ॥निर्वांहातें चालविती
॥११०॥
यापरी तें भर्तरी बाळ ॥मेळ मुलांचे स्थावरमंडळ ॥तयांमाजीं खेळे खेळ ॥राजचिन्हें सर्वस्वीं
॥१११॥
आपण सर्वांचा होऊनि राव ॥मुलांचींच मुलें सर्व ॥काठीचे करुनि अश्व ॥शाळा लाविल्या तयानें
॥११२॥
मंत्री परिचारक पायदळ जन ॥स्वार झुंझार कारकून ॥नाना वेष मुलांस दाखवून ॥राजचिन्हें करीतसे
॥११३॥
तरी खेळ नव्हे भविष्य होणार ॥होय भाग्याचा संस्कार ॥जैसें ज्याचें भाग्य पर ॥चिन्हें उदय पावलीं
॥११४॥
तरी असो राजचिन्हीं ॥खेळ खेळतां बाळपणी ॥तों एके दिवशीं आरोहणोनी ॥काष्ठशालिके पळताती
॥११५॥
पळती ते वाताकृती ॥मुखें हो हो करुनि म्हणती ॥हो हो म्हणूनि थापटिती ॥काष्ठशालिके अश्वातें
॥११६॥
ऐसें खेळतां सोडूनि क्षेत्र ॥धांवती भरले काननीं सर्वत्र ॥एकांत विपिनी खेळ खेळत ॥सान्निध कोणी नसेचि
॥११७॥
परी ते काननचव्हाट्यांत ॥भर्तरी धांवतां शालिका अश्वातें ॥तों पायासी ठेंच लागूनि महीतें ॥उलथोनियां पडियेला
॥११८॥
पडिला महीं कासावीस ॥होऊनि सांडिलें शुद्धबुद्धीस ॥नेत्रें विकासूनि महीतें ॥दाविता झाला तत्क्षणीं
॥११९॥
ते श्वेतवर्ण पाहूनि नयन ॥अर्भकें पळालीं भयेकरुन ॥म्हणती भर्तरी पावला मरण ॥भूत होईल आता हा
॥१२०॥
मग हा आपुल्या लागोनि पाठीं ॥भक्षील सकळ मग शेवटीं ॥ऐसें भय मानूनि पोटीं ॥पळूनि गेलीं अर्भकें
॥१२१॥
जाऊनि भागीरथीघांटावर ॥करीत बैसलीं आहेत विचार ॥म्हणती भर्तरिया भूत थोर ॥होऊनि हिंडे ग्रामांत
॥१२२॥
मग गडे हो आपण गल्लींसी ॥कैसें खेळावें भक्षील आपणांसी ॥तरी आतां आपुले ग्रामासी ॥खेळ खेळूं सदनांत
॥१२३॥
यापरी दुसरा अर्भक बोलत ॥कीं बरवें सांडिलें काननातें ॥मनुष्य कोणी नव्हतें तेथें ॥भक्षिलें असतें आपणांसी
॥१२४॥
ऐसें अर्भक घांटावर ॥करीत बैसले आहेत विचार ॥तों येरीकडे मूर्च्छा अपार ॥भर्तरांतें वेधली
॥१२५॥
महीं पडलासे उलथोन ॥शरीर सुकलें तेणेंकरुन ॥ठायीं ठायीं भेदले पाषाण ॥रुधिर तेणें वाहातसे
॥१२६॥
ऐसे होतां अवस्थेसी ॥मैत्रावरुणें पाहिलें त्यासी ॥मग पुत्रमोह हदयासी ॥परम कळबळा दाटला
॥१२७॥
मग महीस मित्रावरुणी ॥येता झाला स्नेहेंकरुनी ॥अति लगबगें बाळ उचलोनी ॥हदयालागीं कवळिलें
॥१२८॥
त्वरें आणूनि भागीरथीजीवन ॥तयासी करविलें तोयपान ॥हदयालागीं आलिंगून ॥सावध केलें बाळासी
॥१२९॥
आणि पाहूनि स्वयें कृपादृष्टीं ॥मग दुःखलेशाची झाली फिटी ॥पाषाणघांव घसवटीं ॥अदृश्यपणें मिरविले
॥१३०॥
मग तो बाळ सावधपणीं ॥अंकीं घेऊनि मिरवोनी ॥परम स्नेहें मुखावरोनी ॥वरदहस्तें कुरवाळी
॥१३१॥
यापरी विप्राचा वेष धरोनि ॥तेथोनि चालिला मित्रावरुणी ॥भर्तरीचा धरोनि पाणी ॥सदनालागीं आणीतसे
॥१३२॥
तों मार्गी येतां घाबरे ॥पाहते झाले सर्व किशोर ॥पाहतांचि म्हणती भर्तरी थोर ॥भूत होऊन आला रे
॥१३३॥
ऐसें म्हणूनि आरडोनी ॥पळताती अति भयेंकरुनी ॥आपुलाले सदना जाऊनी ॥भयें दडती संधींत
॥१३४॥
येरीकडे मित्रावरुणी ॥सदनीं आला त्यासी घेऊनी ॥माता रेणुकेसी पाचारोनी ॥म्हणे सांभाळी बाळातें
॥१३५॥
मग ते चरणीं ठेवूनि माथा ॥म्हणे महाराजा हे ताता ॥आपण कोण्या ग्रामी असतां ॥परम स्नेहाळू आहां कीं
॥१३६॥
ते रेणुका प्रेमळ सती ॥पाहतां विप्र दिव्य मूर्ती ॥वस्त्रासन टाकूनि निगुती ॥बैसविलें त्यावरी
॥१३७॥
मग म्हणे बाळका करीं कवळून ॥आणिलें तुम्हीं मोहेंकरुन ॥तरी सकळ संशय सोडून ॥नामाभिधान मज सांगा
॥१३८॥
येरी म्हणे वो सती ऐक ॥या बाळाचा मी असें जनक ॥म्हणोनि स्नेहाचें दोंदिक ॥तरी तुजपाशीं मी आलों
॥१३९॥
तरी बाळ तुजकारणें ॥कायावाचा केलें अर्पण ॥परी तूंही आतां संशय टाकून ॥संगोपन करीं याचें
॥१४०॥
तें ऐकून बोलें ऐसें ॥तुम्ही बाळकाचे जनक कैसे ॥येरी म्हणे वो अनायासें ॥कथा ऐक बाळाची
॥१४१॥
अगे मी विप्रवेषें तूतें ॥दिसत आहें परी मी दैवत ॥मित्रावरुणी नाम मातें ॥महीलागीं वदतात
॥१४२॥
मग मूळापासूनि तीतें कथन ॥भर्तरीपात्रव्यक्त जनन ॥हरिणीस्तनीचें संगोपन ॥सकळ निर्णय बदलासे
॥१४३॥
तरी या बाळाचें संभवन ॥अपूर्व आहे महीकारण ॥परी असो पूर्ण दैवानें ॥लाभ झाला तुज याचा
॥१४४॥
झाला परी आर्तभूत ॥जगीं म्हणावीं कां आपुला सुत ॥काया वाचा बुद्धि सुत ॥रक्षण करीं उचित हें
॥१४५॥
ऐसें सांगूनि मित्रावरुणी ॥जाता झाला आपुले स्थानीं ॥येरीकडे नितंबिनी ॥परम चित्तीं तोषली
॥१४६॥
मग भ्रतारासी सांगूनि वर्तमान ॥तोही हर्षे ऐकून ॥मग जननीजनकांचें भय पूर्ण ॥बाळप्रकरणीं फिटलें कीं
॥१४७॥
जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणीं ॥सकळ मळाची होय हानी ॥ठेवी मित्रावरुण वाचेकरुनी ॥सकळ संशय फिटलासे
॥१४८॥
किंवा गढूळ झालें असतां उदक ॥स्थिरावल्या दावी पवित्र मुख ॥तेवीं त्याचा समूळ धाक ॥फिटूनि गेला तत्काळ
॥१४९॥
की दारा सगुणपर ॥गृहीं असतां गरोदर ॥परी प्रसूतीचे भय थोर ॥प्रसूत झालिया फिटतसे
॥१५०॥
कीं अनभ्यस्त कांसे लागतां ॥परम भय मानी पार होतां ॥परी पार झालिया सकळ चिंता ॥फिटोनि जाय सरितेची
॥१५१॥
कीं अचाट काननीं तस्करभयातें ॥मार्ग मिळाला भयव्यक्त ॥परी वस्ती पावल्या स्वस्थचित्त ॥भयापासूनि होतसे
॥१५२॥
तन्नायें मित्रावरुणी ॥वार्ता ऐकतां उभय कर्णी ॥भयमुक्त होती आनंदोनी ॥हेलावे चित्त पूर्णत्वें
॥१५३॥
जैसें दुःख जाऊनि होतां सुख ॥पोसे शरीर दोंदिक ॥तेवीं त्यांचे चित्तीं बलाइक ॥आनंदाचा उदेला
॥१५४॥
मग ते अतिप्रेमेंकरुन ॥आशापाशाचें गुंतले बंधन ॥मग परम स्नेहाचा खुंट उभवोन ॥गरके घालिति त्यासवे
॥१५५॥
ऐसियापरी दिवसेंदिवस ॥परम उदेले लालनपालनास ॥तंव काशीक्षेत्रीं पुण्यवस्तीस ॥पंच वरुषें लोटलीं
॥१५६॥
तों षडदशवर्षी भर्तरीनाथ ॥पूर्ण झाला वयें व्यक्त ॥जयसिंग आणि रेणुकेप्रत ॥लग्नविचार सूचला
॥१५७॥
मग उभयतां बसूनि एकांतीं ॥म्हणती चला जाऊं स्वदेशाप्रती ॥लक्षूनि संबंधा जाती ॥लग्न करुं बाळाचें
॥१५८॥
ऐसा विचार उभयतां करोनि ॥सोडितें झाले क्षेत्रालागोनी ॥माळवादेशीं त्यांचा ग्राम उद्देशोनी ॥मार्ग धरितां तयाचा
॥१५९॥
मार्गी चालतां ग्रामोग्रामीं ॥भिक्षा करिती भिक्षुकधर्मी ॥मार्गी चालता भविष्य वर्मी ॥विकट झगटलें येऊनि
॥१६०॥
मार्गी चालतां काननांत ॥तस्कर येऊनि अकस्मात ॥जयसिंग शस्त्रघातें ॥मुक्त केला प्राणातें
॥१६१॥
जवळी होतें वित्त कांही ॥तें हिरोनि नेलें तस्करीं उपायीं ॥जयसिंगाचें प्रेत महीं ॥निचेष्टित पडियेलें
॥१६२॥
मग तें पाहूनि रेणुका सती ॥प्रेत कवळूनि देहानिगुती ॥परम शोकें देहाप्रती ॥सांडिती झाली तेधवां
॥१६३॥
मग तीं उभयतां स्त्रीपुरुष ॥भर्तरीनें काष्ठें मेळवूनि विशेष ॥अग्नि लावूनि उभयतांस ॥शोकडोहीं बुडाला
॥१६४॥
उभयतांचें करितां दहन ॥परी शोकविशोकें पोळे प्राण ॥म्हणे अहा तात मातेनें ॥कैसें सोडिलें काननीं या
॥१६५॥
अहा तुम्ही जननी जनक ॥पाहते झालां परत्रलोक ॥यापरी महीतें मायिक ॥कोणी नसे मजलागीं
॥१६६॥
अहा जननी रेणुकानाम्नी ॥कैसी गेली मज सोडोनी ॥आतां आई आई म्हणोनि वाणी ॥बोलावूं मी कोणातें
॥१६७॥
अहा जननी तूं परम मायिक ॥जाणत होतीस तृषाभूक ॥आतां निकटपणी लोक ॥परम कैसे पाहतील
॥१६८॥
अहा जननी रात्रींतून ॥तीन वेळां उठोन ॥करवीत होतीस तोयपान ॥तरी मन निष्ठुर कां केलें
॥१६९॥
अहा हदयीं धरुनि करिसी चुंबन ॥वाचे म्हणसी बाळ हें तान्हें ॥ऐसें म्हणोनि उदकपान ॥करवीत अससी नित्यशा
॥१७०॥
ऐसी माय तूं सघन ॥असोनि केलें निष्ठुरपण ॥मज ऐशा वनीं सोडून ॥गेलीस कैसी जननीये
॥१७१॥
अहा ताता जयसिंगनामी ॥कैसा गेलासी मज टाकुना ॥आता पृथ्वीवर दैन्यवाणी ॥कोठे राहूं निराश्वित
॥१७२॥
अहा ताता बाहेर जातां ॥खाऊ मजला आणीत होतां ॥तो मुगुटी खोवूनि सदनीं येतां ॥पाचारुनि मज देशीं
॥१७३॥
ऐसा मोह असतां पोटीं ॥सांडूनि गेलास विपिनीं देठीं ॥ऐसें म्हणूनि करसंपुटीं ॥वक्षःस्थळ पिटीतसे
॥१७४॥
ऐसें रुदन करीत करीत ॥पेटवूनि झाला शांताचित्त ॥परी तो तेथूनि न उठे त्वरित ॥प्राण सोडूं पाहातसे
॥१७५॥
तों मार्गेकरुन व्यवसाइक ॥त्या वंजारें वृषभकटक ॥त्यांनीं पाहूनि त्याचा शोक ॥परम चित्तीं कळबळले
॥१७६॥
मग तयापाशीं येऊन ॥पुसोनि घेतले वर्तमान ॥वर्तमान कळल्या बोलती वचन ॥बोधनीती तयातें
॥१७७॥
म्हणती अगा भटसुता ॥शोक कारसी अति वृथा ॥होणार झालें विषममाथा ॥विधिअक्षरें नेमीत
॥१७८॥
जरी तू आतां करिसी शोक ॥तरी काय मिळतील जननी जनक ॥ईश्वरकरणी प्रारब्ध फुटकें ॥आपुलेंचि म्हणावे
॥१७९॥
तरी आतां धैर्य करुन ॥हित पहावें आपुलें आपण ॥संसार करुनि आपुले मतीने ॥तिन्ही लोकीं मिरवावें
॥१८०॥
ऐसें म्हणूनि बोध अपार ॥उठविला त्याचा धरुनि कर ॥मग संगें घेऊनि मुक्कामावर ॥आणिलासे भर्तरी
॥१८१॥
मुक्कामीं राहूनि सकळ जन ॥रात्रीं देऊनि अन्नपान ॥दुसरें दिवशीं सवें घेऊन ॥पुन्हां जात व्यवसई
॥१८२॥
ऐसेपरी सात पांच दिन ॥शोक करितां गेले लोटून ॥मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण ॥सहजस्थिती वर्ततसे
॥१८३॥
मग त्या व्यवसायिकां सहज ॥करुं लागला तयांचें काज ॥काज होता तेजःपुंज ॥सकळ चाहती आदरानें
॥१८४॥
मग आसन वसन भूषणासहित ॥व्यवसाइक सकळ संपादित ॥ऐसेपरी कांहीं दिवस त्या स्थितींत ॥लोटून गेले तयाचे
॥१८५॥
यापरी व्यवसाइक ॥धान्य भरुनि अति अमूप ॥उज्जनि शहर अवंतिक ॥मार्ग धरिला तयाचा
॥१८६॥
मार्ग सरतां वृक्षमकटका ॥येऊनि पोहोंचला अवंतिका ॥तेथें कथेचा रस निका ॥होईल तो स्वीकारा पुढें
॥१८७॥
म्हणाल पुढिलें अध्यायीं रस ॥उगाचि मानाल स्वचित्तास ॥ऐसें तरी न म्हणावें पीयूष ॥चवी घेतां कळों येईल
॥१८८॥
तरी ती कथा सुधारस थोर ॥वाढी श्रोत्या धुंडीकुमर ॥मालू ऐसा नामोच्चार ॥नरहरिकृपें मिरवतसे
॥१८९॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥चतुर्विशति अध्याय गोड हा
॥१९०॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार चतुर्विशतितमोध्याय समाप्त ॥