श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय २२
मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट; गोरक्षनाथाची संशयनिवृत्ति. १८९ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी कमळाकांता ॥कमळानाभा कमलोद्भवपिता ॥कमळपत्राक्षा दुःखहर्ता ॥पुढें ग्रंथ रसाळ बोलवी
॥१॥
भक्तिसारग्रंथ हा रत्न ॥बोलवीं श्रोत्यांकारण ॥मागिले अध्यायीं गोरक्षनंदन ॥मच्छिंद्र घेऊनि गेला असे
॥२॥
नेला तरी किलोतळा ॥बुडालीसे सांगडी ॥शोकाब्धींजळा ॥तैं उपरिचवसू तरणि आगळा ॥काढावया पातला
॥३॥
स्थावरबोधाची बांधूनि सांगडी ॥शोकाब्धींत घातली उडी ॥शब्दार्थी मारुनि बुडी ॥धैर्यकांसे धरियेलें
॥४॥
धरिल्यावरी बाहेर काढुनि ॥म्हणे माय वो सावधानी ॥शोक सांडी अशाश्वत गहनी ॥शाश्वत नाहीं कांहींच
॥५॥
पाहतेपणीं जें जें दृश्य ॥तें आभासपणीं पावें नाश ॥तूं शोक करिसी शब्दप्राप्तीस ॥श्लाध्य तूतें लागेना
॥६॥
तूं कोठील मच्छिंद्र कोण ॥स्वर्ग भूमीचा झाला संगम ॥योग तितुका भोगकाम ॥सरुनि गेला जननीये
॥७॥
तूं अससी स्वर्गवासिनी ॥मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥परी प्रारब्धें सहजयोगेंकरुनीं ॥गाठीं पडली उभयतां
॥८॥
पडली परी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥परी प्रारब्धें तूं आपुलें स्वहित निश्चित ॥सांभाळीं कीं जननीये
॥९॥
तूं झालीस पदच्युत ॥तरी तें सांभाळी निश्चित ॥तरी आतां मानूनि व्यक्त ॥होऊनि चाल जननीये
॥१०॥
तूं पातलिया सिंहलद्वीप ॥मग मच्छिंद्रयोगें स्थावरकंदर्प ॥पूर्ण होईल शुद्धसंकल्प ॥मच्छिंद्र दृष्टीं पाहूनियां
॥११॥
द्वादश वर्षे झालिया पूर्ण ॥तूतें भेटवीन मच्छिंद्रनंदन ॥मीननाथादि तपोधन ॥गोरक्ष दृष्टीं पाहसील तूं
॥१२॥
म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन ॥काय पडेल त्या कारण ॥सिंहलद्वीपीं पाकशासन ॥महामख आरंभील
॥१३॥
तेव्हां विष्णु विरेंची रुद्र ॥तया स्थानी येती भद्र ॥सकळ देवादिक मित्र चंद्र ॥एका ठायीं मिळतील
॥१४॥
ते नवनाथादि प्रतापवंत ॥ऐक्य करील शचीनाथ ॥गहिनी गोपीचंद भर्तरि सहित ॥एक्या ठायीं मिळतील
॥१५॥
तरी आतां शोक कां व्यर्थ ॥सांडी प्रांजळ करीं चित्त ॥विमानारुढ होऊन त्वरित ॥सिंहलद्वीपीं चाल कीं
॥१६॥
ऐसें ऐकोनि मैनाकिनी ॥महाराजा श्वशुरप्राज्ञी ॥द्वादशवर्षे मच्छिंद्र नयनी ॥दावीन ऐसें म्हणतसां
॥१७॥
तरी मखमंडप पाकशासन ॥करी अथवा न करो पूर्ण ॥जरी मज दावाल मम नंदन ॥तरी मज भाष्य द्यावी कीं
॥१८॥
भाष्य दिधल्या अंतरपुटीं ॥विश्वासरत्ना रक्षीन पोटीं ॥मग हे शोक दरिद्रपाठी ॥चित्त सांडील महाराजा
॥१९॥
ऐसें बोलतां मैनाकिनी ॥श्वशुर हास्य करी आननीं ॥मग करतळभाष्य देऊनी ॥संतुष्ट केलें सुनेतें
॥२०॥
यावरी बोले कीलोतळा ॥मातें नेतां स्वर्गमंडळा ॥परी नृपपणीं या स्थळा ॥कोणालागी स्थापावें
॥२१॥
येरु म्हणे ऐक वचन ॥सवें सेवेसी आहेत क्रियावान ॥दैर्भामा उत्तम नामानें ॥राज्य तीते ओपीं कां
॥२२॥
मग अवश्य म्हणे मैनाकिनी ॥दैर्भामा राज्यासनीं ॥बैसविली अभिषेक करुनी ॥राज्यपदीं तेधवा
॥२३॥
राज्यीं ओपूनि दैर्भामा ॥मिळती झाली विमानसंगमा ॥परी सकळ देशींच्या शैल्या रामा ॥शोकाकुळ झाल्या कीं
॥२४॥
म्हणती माय वो शुभाननी ॥तुम्ही जातां आम्हांसी टाकुनी ॥आम्हां पाडसांची हरिणी ॥दयाळू माय अससी तूं
॥२५॥
असो ऐशा बहुधा शक्ती ॥शैल्या शोकाकुलित होती ॥मग तितुक्यां समजावूनि युक्तीं ॥विमानयानीं आरुढली
॥२६॥
दैर्भामेसी नीतिप्रकार ॥सांगूनि युक्ती समग्र ॥यथासमान प्रजेचा भार ॥सांभाळी कां साजणीये
॥२७॥
जेथील तेथें हित फार ॥तैसे केलें गोचर ॥मग विमानीं आपण सश्वशुर ॥स्वर्गमागें गमताती
॥२८॥
असो विमान पावे द्वीपाप्रती ॥पदा स्थापिली ते युवती ॥मग तो उपरिचर सहजगती ॥आपुल्या स्थाना सेविती
॥३०॥
त्याचि न्यायें उपरिदक्षें ॥आणि कीलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष ॥शाषमोचन सायंकाळास ॥स्थाना पावली आपुल्या
॥३१॥
कीं अब्धीचें अपार जीवन ॥व्यापी महीतें मेहमुखाने ॥परी तें पुन्हां सरिक्षाओघानें ॥ठायींचे ठायीं जातसे
॥३२॥
त्याचिया न्यायें स्नुषा श्वशुर ॥पावते झाले स्वस्थानावर ॥परी तैं इकडे नाथ मच्छिंद्र ॥गौडबंगाली पातला
॥३३॥
मीननाथ स्कंधीं वाहून ॥मार्गावरी करिती गमन ॥तों शैल्येंदेशसीमा उल्लंघून ॥गौडबंगालीं पातले
॥३४॥
मार्गी लागतां ग्राम कोणी ॥त्या ग्रामांत संचरोनी ॥गोरक्ष भिक्षा आणी मागुनी ॥उदरापुरती तिघांच्या
॥३५॥
ऐसेपरी निर्वापण ॥मार्गी करिताती गमन ॥तों कौलबंगाला सांडून ॥गौडबंगाली पातले
॥३६॥
मार्गी चालता सहजस्थिती ॥तो कनिफा पूर्वी भेटला तयांप्रती ॥तेथें पातल्या त्रिवर्गमूर्ती ॥गमन करितां मार्गातें
॥३७॥
तेथें येताचि गोरक्ष जेठी ॥स्मरण झालें तयाचे पोटीं ॥कीं अच्युतवृक्षापुटीं ॥कानिफाची भेटी झालीसे
॥३८॥
झाली परी हें उत्तम स्थान ॥महायशस्वी पुण्यवान ॥मातें दाबिले श्रीगुरुचें चरण ॥जैसे चुकल्या वत्सासी
॥३९॥
प्रत्यक्ष माझी मच्छिंद्रराणी ॥गेली होती आदिपट्टराणी ॥मी पाडस रानोरानी ॥निढळ्यावाणी लागतसे
॥४०॥
कीं मज वत्साची गाउली ॥सहज रानी चरावया गेली ॥शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ॥ती भेटविली रायानें
॥४१॥
मग स्कंधी होता नाथ मीन ॥तथालागी मही ठेवून ॥दृढ पायीं केलें नमन ॥नेत्रीं अश्रु लोटले
॥४२॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥बोलता झाला गोरक्षातें ॥म्हणे बाळा अश्रुपात ॥निज चक्षूंसी कां आले
॥४३॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥मग सकळ दुःखाचे मंडण ॥तें गोरक्षचित्तीं प्रविष्ट होऊन ॥नेत्रीं नीर अपार लोटलें
॥४४॥
सांगू जातां मुखानें ॥तो कंठ आलासे भरुन ॥मग क्षण एक तया स्थानीं बैसून ॥स्थिर चित्त पैं केलें
॥४५॥
जैसे आकाशीं अभ्र दाटतां ॥पुन्हां निर्मळ होय तत्त्वतां ॥तैसें दुःख मोह चिंत्ता ॥टाकून निर्मळ पैं केले
॥४६॥
मग बद्रीकाश्रमापासूनि कथन ॥दुःखव्यावृत्ति अतिगहन ॥कानिफा भेटीपर्यंत वदून ॥ठाव पशस्वी म्हणतसे
॥४७॥
याचि ठायीं कानिफाभेटी ॥झाली मातें कृपा जेठी ॥तुमची शुद्धी तद्वान्वटी ॥येथेंचि लाधली महाराजा
॥४८॥
तरी हें स्थान पुण्यवान ॥तुमचे दाविले मज चरण ॥तरी हे स्थान धनवंत पूर्ण ॥चुकलें धन मज दिधलें
॥४९॥
दुःखसरिते प्रवाहें वेष्टी ॥बुडतां वांचविले देउनि पृष्ठी ॥कीं दुःख व्याघ्राच्या आसडूनि होटी ॥माये भेटी केली असे
॥५०॥
म्हणे ऐसा राजा आहे नष्ट ॥तरी आतां करीन त्याचें तळपट ॥नगरी पालथी घालीन सुघट ॥महीपालथा मिरवीन तो
॥६०॥
ऐसें बोलोनि विक्षेप चित्तीं ॥पुढें मागें परमगतीं ॥एकदोन मुक्काम साधिती क्षिती ॥हेळापट्टणीं पातले
॥६१॥
ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती ॥त्यांतें वृत्तांत विचारीन जाती ॥ते म्हणती कानिफा येऊनि क्षितीं ॥मुक्त केलें जालिंदरा
॥६२॥
राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी ॥जगीं मिरवला अमरपणीं ॥तेणें गुरुदीक्षा घेऊनी ॥तपालागीं तो गेला
॥६३॥
राया मुक्तचंदा स्थापून ॥राज्यपदीं राज्यासन ॥देऊनियां अग्निनंदन ॥तोही गेला षण्मास
॥६४॥
सकळ कथा मुळाहूनी ॥मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी ॥तें मच्छिंद्राचे पडतां श्रवणीं ॥शांतपणीं मिरवला
॥६५॥
जैसा प्रळयानळावरती ॥घनवृष्टीची होय व्यक्ती ॥मग सकळ उवाळा पाहूनि अती ॥अदृश्य होय पावक तो
॥६६॥
कीं साधक पातला असतां ॥कीं श्रीगुरुचा संसर्ग होतां ॥होतांचि सिद्धकाची व्यथा ॥नासूनि जाय ते क्षणीं
॥६७॥
कीं तम ढिसाळ दाटल्या अवनी ॥उदय होतांचि वासरमणी ॥मग सकळ तम नाश पावूनी ॥दिशा मिरविती उजळल्या
॥६८॥
तन्न्यायें मच्छिंद्रसंताप ॥ग्रामस्थं बोलतां झाला लोप ॥शांति वरुनि मोहकंदर्प ॥चित्तामाजी द्रवलासे
॥६९॥
यापरी तो मच्छिंद्रनंदन ॥ग्रामस्थां विचारी मुख्यत्वकरुन ॥अधिकारी राज्यनिपुण ॥कोण आहे प्राज्ञिक तेथें
॥७०॥
येरी म्हणती योगद्रुमा ॥श्रेष्ठ करणिका राजा उगमा ॥मैनावती शुभानना ॥प्राज्ञिकवंत मिरवतसे
॥७१॥
त्या मातेनें अर्थ धरुन ॥पुत्र मिरविला जी अमरपणें ॥तुष्ट करोनि जालिंदरमन ॥अमर झाली आपणही
॥७२॥
ऐसें बोलतां ग्रामस्थ युक्तीं ॥मनांत म्हणे मच्छिंद्र यती ॥ऐसा प्राज्ञिक आहे सती ॥भेटी घ्याची तियेची
॥७३॥
ऐसिये धृती चित्तीं कल्पून ॥चालते झाले त्रिवर्गजन ॥ग्रामद्वारा शीघ्र येऊन ॥द्वाररक्षकां सांगती
॥७४॥
म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत ॥तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ॥ग्रामद्वारीं आहे तिष्ठत ॥जाऊनि सांगा सतीसी
॥७५॥
हो अहो द्वारपाळ ॥सांगा चला उतावेळ ॥मैनावती लक्षूनि सकळ ॥वृत्तांत तियेतें निवेदावा
॥७६॥
ऐसें द्वारपाळ ऐकून ॥मच्छिंद्रा करिते झाले नमन ॥म्हणती महाराजा आज्ञा प्रमाण ॥श्रुत करुं सतीसी
॥७७॥
म्हणती महाराज मच्छिंद्रजती ॥जालिंदरसहोदर म्हणवितो क्षितीं ॥तो येऊनि ग्रामद्वाराप्रती ॥तिष्ठत आहे महाराजा
॥७८॥
ऐसे ऐकूनि मैनावती ॥म्हणे कैसी वृत्ति कैसी स्थिती ॥कैसी आहे भूषण व्यक्ती ॥अभ्यासानभ्यास दाक्षेतें
॥७९॥
येरी म्हने जी महाराजा ॥कनककांति तेजःपुंजा ॥बालार्ककिरणी विजयध्वजा ॥आम्हालागीं दिसतसे
॥८०॥
माय वो आम्हां दिसतो ऐसा ॥कीं न पावला योनिसंभवसा अवतारदीक्षे स्वर्गवासा ॥करील जनां वाटतसे
॥८१॥
शैली कंथा लेवूनि भूषण ॥शिंगी सारंगी समागम ॥कुबडी फावडी करीं कवळून ॥उभा द्वारीं असे तो
॥८२॥
आणिक एक सच्छिंष्य त्यासी ॥संग्रही आहे सुखसेवेसी ॥परी तो शिष्यासमान अभ्यासी ॥आम्हालागीं भासतसे
॥८३॥
धृति वृत्ति दीक्षेलागून ॥ज्ञानवैराग्यस्वरुपवान ॥आम्हालागीं समसमान ॥गुरुशिष्य वाटती
॥८४॥
त्याचि रीतीं स्वरुप अपार ॥तान्हुलें एक असे किशोर ॥परी त्रिवर्ग स्वरुपसागर ॥नक्षत्रमणी भासती ऐसें सांगतां द्वाररक्षक ॥मंत्रीं पाचारिला प्रत्योदक ॥मग स्वयें घेऊनि सुखासन कटक ॥सामोरी जातसे युवती ते
॥८६॥
कटकासवें द्वारीं येऊन ॥वंदिती झाली मच्छिंद्रनंदन ॥मग त्रिवर्गातें सुखासन ॥ओपूनि नेतसे मंदिरा
॥८७॥
नेतांचि मंदिरा राजभुवनी ॥भावें बैसविला कनकासनीं ॥षोडशोपचारें पुजूनि मुनी ॥नम्रवाणी गौरविलें
॥८८॥
हे महाराजा तपोसविता ॥कोणीकडूनि येणें झालें आतां ॥आम्हां आळशावरी सरिता ॥प्रेमांबु लोटतसे
॥८९॥
कीं दरिद्र्याचें द्रव्यहरण ॥करुं मांदुस धांवली आपण ॥कीं चित्ता बोधी अंतःकरण ॥बुडतां धांवे चिंतामणी
॥९०॥
कीं मृत्युसमयीं हस्तपादास ॥ओढितां परम दुःखक्लेशास ॥तें पाहूनियां अमरपीयूष ॥धांव घेत कृपेनें
॥९१॥
कीं तृषासंकटीं प्राण ॥तों गंगाओघ आला धांवून ॥कीं क्षुधें पेटला जठाराग्न ॥पयोब्धी तों पातला
॥९२॥
तन्न्यायें अभाग्य भागीं ॥येथें पातलेत तुम्ही जोगी ॥परी कोणाच्या वचनप्रसंगीं ॥आम्हां दर्शंवा महाराजा
॥९३॥
येरी म्हणें वो माते ऐक ॥उपरिचरवसू माझा जनक ॥मच्छदेही देहादिक ॥आम्हांलागी मिरवतसे
॥९४॥
यापरी श्रीगुरुज्ञानदृष्टी ॥तो अनुसूयासुत शुक्तिकेपोटी ॥तेणें कवळूनि मौळी मुष्टीं ॥वरदपात्रीं मिरवला
॥९५॥
मज अनुग्रह प्राप्त झाला ॥त्यावरी श्रीजालिंदराला ॥प्राप्त होऊनि वैराग्याला ॥भूषवीतसे जननीय
॥९६॥
धाकटा बंधु गुरुभक्त ॥मज विराजला जालिन्दरनाथ ॥परी या ग्रामीं पापी अवस्थेंत ॥पावला हें ऐकिलें
॥९७॥
म्हणूनि उग्रता धरुनि पोटीं ॥लंधीत आलों महीपाठीं ॥परी उत्तम संग्रह ग्रामजेठी ॥समस्तांनी सांगितले
॥९८॥
तेणें करुनि कोप कंदर्प ॥झाला जननी सर्व लोप ॥तरी तूं धान्य ज्ञानदीप ॥महीवरी अससी वो
॥९९॥
आपुल्या हितासी गृहीं आणून ॥शेवटीं परम प्राज्ञेकरुन ॥तुवां मिळविला स्वानंदघन ॥धन्य धन्य अससी तूं
॥१००॥
धन्य धन्य मही ऐक ॥निवटूनि पूर्वजपातक दोंदिक ॥सनाथपणाची घेऊनि भीक ॥स्वर्गवासा मिरविशी
॥१०१॥
तरी तारक लोकां बेचाळीसां ॥कुळा झालीस भवाब्धिरसा ॥कीं भगीरथभूष पितृउद्देशा ॥मिरवलासे त्रिभुवनीं
॥१०२॥
कीं विनतेचें दास्यपण ॥गरुडें सांठविलें पीयूष देऊन ॥तेवीं तूं कुळांत सकळांकारण ॥तारक झालीस सर्व काळीं
॥१०३॥
ऐसें नाथ बोलतां युक्तीं ॥चरणीं माथा ठेवी सती ॥म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥सदैव केलें तुम्हींच
॥१०४॥
तुमच्या दृष्टीच्या सहज झळकू ॥कृपापात्र वरिला मशकू ॥मम प्रज्ञे मोहशठकू ॥मिरवला हे महाराजा
॥१०५॥
अहा तुमचे पडिपाडें ॥न येती कल्पतरु झाडें ॥परीस वासनेसमान कोडे ॥बरें वाईंट मिरवतसे
॥१०६॥
तैसी तुमची नव्हे स्थिती ॥साधक कल्याण मिरवी मती ॥कीं परीस देतां समानगती ॥बरे वाईट मिरवतसे
॥१०७॥
परीस लोहाचे करी कनक ॥परी स्वदीक्षेची न तुटे भीक ॥तेवीं तुम्हीं नोहेत साधक ॥आपुलेसमान करितां कीं
॥१०८॥
ऐशी उद्धारपूर्ण कोटी ॥तुम्ही मिरवतां महीपाठीं ॥उदार तरी समता होटीं ॥मेघ अपूरा वाटतसे
॥१०९॥
मेघ उदार म्हणती लोक ॥परी तो अपूरा ओसरे उदक ॥तस्मात् तुमचें औदार्य दोंदिक ॥समतापदासी मिरवेना
॥११०॥
तरी तुमची वर्णिता स्तुती ॥अपूर्ण असे माझी मती ॥ऐसें म्हणोनि मैनावती ॥चरणीं माथा ठेवीतसे
॥१११॥
मग आसन वसन भूषणासहित ॥अन्नपानादि अन्य पदार्थ ॥सिद्ध करुनि मनोरथ ॥तुष्ट करीत नाथासी
॥११२॥
तीन रात्री वस्ती करुन ॥सर्त्रा आशीर्वाद देऊन ॥मग निघता झाला मच्छिंद्रनंदन ॥गोरक्षनाथादिकरुनियां
॥११३॥
सकळ कटकासहित ॥बाळवों निघाला चंद्रमुक्त ॥मैनावती आणि ग्रामस्थ ॥एक कोस बोळविती
॥११४॥
सकळी चरणावरी ठेवूनि माथा ॥परतते झाले बोळवोनि नाथा ॥मग आपुले सदनीं येऊनि तत्त्वतां ॥धन्य नाथ म्हणतात
॥११५॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥त्रिवर्गादि गमन करीत ॥ग्रामोग्राम मुक्काम साधीत ॥जगन्नाथीं पातलें
॥११६॥
तेथें करुनि उदधिस्नान ॥जगन्नाथाचें घेऊनि दर्शन ॥तीन रात्रीं तेथें राहून ॥तीर्थविधि सारिला तो
॥११७॥
तेथूनि निघोनि पुनः मार्गी ॥गमन करीत मग योगी ॥तों सौराष्ट्रग्राममुक्कामप्रसंगी ॥जाऊनि तेथें राहिले
॥११८॥
रात्र क्रमोनि जैसी तैसी ॥दुसरे दिनीं मित्रोदयासी ॥गोरक्ष सांवरोनि भिक्षाझोळासी ॥भिक्षेलागीं प्रवर्तला
॥११९॥
भिक्षा मागोनि सदनोसदनीं ॥परम श्रमोनि आला सदनीं ॥तों येरीकडे शिबिरस्थानीं ॥शयनीं असे मीननाथ
॥१२०॥
तो मच्छिंद्रनाथानें उठवोन ॥बैसविला शौचाकारण ॥तों ते संधींत भिक्षा मागोन ॥गोरक्षनाथ पातला
॥१२१॥
ग्रामांत हिंडतां सदनोसदनीं ॥श्रमे विटलासे मनीं ॥तो येतांचि स्थानीं श्रमोनी ॥मच्छिंद्रनाथ बोलतसे
॥१२२॥
म्हणे गोरक्षा मीननाथ ॥शौचास बैसविला आहे गल्लींत ॥तरी तूं त्या तें प्रक्षाळूनि त्वरित ॥घेऊनि येई पाडसा
॥१२३॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥भिक्षाझोळी ठेवूनि तेथ ॥लक्षूनि पातला मीननाथ ॥गल्लीमाजी जाऊनियां
॥१२४॥
तो मीननाथ परम अज्ञान ॥हस्तपाद भरले विष्ठेनें ॥अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन ॥परम चित्ती विटलासे
॥१२५॥
मनांत म्हणे मच्छिंद्रासी ॥कीं परम असे विवसी ॥विषय उपद्रव संन्याशासी ॥व्यर्थ कासया पाहिजे
॥१२६॥
कीं ----- भाराविण बोडकी ॥कुंकूंखटाटोप हुडकी ॥तेवीं मच्छिंद्रमनीं उपद्रव शेखीं ॥काय आज ----
॥१२७॥
जन्मांधासी अवनीं ॥तोचि संभार रक्षी कानीं ॥निगडी मनुष्या षड्रसान्नीं खटाटोप कासया
॥१२८॥
कीं परम भ्याड सोडी सदन ॥शस्त्रसंभारापरी संगोपन ॥ज्याचें काय आसन वसन ॥त्या वस्त्रभूषण कासया
॥१२९॥
कीं रानींचें रानसावज उन्मत्त ॥द्रव्य देऊनि त्या करावें शांत ॥तेवीं निस्पृहताविषय अत्यंत ॥गोड कांहींच वाटेना
॥१३०॥
ऐसें बोलूनि गौरनंदन ॥मीननाथ तें करीं कवळून ॥दृष्ट करी मच्छिंद्राकारणें ॥उचलोनिया तेधवां
॥१३१॥
विष्ठेव्यक्त मीननाथ ॥पाहोनि मच्छिंद्र बोलत ॥म्हणे गोरक्षा सरितेआंत ॥धुवोनि आणि बाळका
॥१३२॥
अवश्य म्हणोनि गोरक्षनाथ ॥तैसाचि उठोनि सरिते जात ॥संचार करितां सरितेंत ॥तों उत्तम खडक देखिला
॥१३३॥
देखिलें परी एकांतस्थान ॥मनांत म्हणे न्यावें धूवोन ॥परी अंतर्बाह्य मळी निवटवून ॥नाथालागीं दाखवूं ऐसें विचारुनि चित्तांत ॥पदी धरिला मीननाथ ॥खडकावरी आपटोनि त्वरित ॥गतप्राण पैं केला
॥१३४॥
सरिते उदक असे अपार ॥त्यांत प्रवेशते झालें रुधिर ॥तें सर्व अपार जळचर ॥भक्ष्य म्हणोनि धावले
॥१३६॥
मच्छ मगरी कबंधदेही ॥मग तळपती त्या प्रवाहीं ॥तैं अपार जळचरें पाहूनि डोहीं ॥मनांत म्हणतसे गोरक्ष
॥१३७॥
म्हणे जीवें गेला मीननाथ ॥तरी याचें घालों सदावर्त ॥एक जीवावरी तृप्त होत ॥आहेत जीव सकळ हे
॥१३८॥
ऐसा विचार करुनि मनीं ॥त्वचा घेतली काढुनि ॥रतिरति मांस तुकडे करोनी ॥जळचरांतें ओपीतसे
॥१३९॥
उरल्या अस्थी त्या जळांत ॥टाकूनि तेथूनि उठला नाथ ॥परी त्या जळा नसे अंत ॥अस्थी तळीं व्यक्त जाहूल्याती
॥१४०॥
ऐसे करिता गौरनंदन ॥मांस तें सकळ गेलें आटून ॥मांस सरल्या आतडें पूर्ण ॥जळचरांतें भक्षविलें
॥१४१॥
एक त्वचेरहित भाग ॥कांहीं न ठेवी वरतें अव्यंग ॥खडकीं पवित्र करुनि चांग ॥त्वचा घेऊन चालला
॥१४२॥
चालला परी तो सदनीं ॥शिबिरीं नसे मच्छिंद्रमुनी ॥शांभवीअर्था बाजारभुवनीं ॥संचारलासे महाराजा
॥१४३॥
तो येतांचि तेथें मच्छिंद्रनाथ ॥मग तान्हा पसरी प्रावणी त्वचेत ॥मित्ररश्मि पाहोनि वात ॥सुकावया घातलें
॥१४४॥
तों येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥शांभवी आलासे घेऊन ॥कंदा कुत्का सिद्ध करुन ॥असनावरी बैसला
॥१४५॥
बैसला परी गोरक्षातें ॥म्हणे बा रे कोठें मीननाथ ॥येरी म्हणे धुवोनि त्यातें ॥स्वच्छ आणिलें महाराजा
॥१४६॥
मच्छिंद्र म्हणे आणिलें परी ॥कोठें ठेविला न दिसे नेत्रीं ॥येरी म्हणे तान्हा प्रावरीं ॥सुकूं घातला महाराजा
॥१४७॥
म्हणे मच्छिंद्र काय बोलसी ॥घातला सुकूं ऐसें म्हणसी ॥येरी म्हणे कीं असत्य तुम्हांसी ॥भाषण माझें वाटतसे
॥१४८॥
तरी बाहेर शीघ्र येवोन ॥स्वचक्षूनें पहावा विलोकून ॥ऐसें बोलता मच्छिंद्रनंदन ॥तेचि क्षणीं बाहेर येतसे
॥१४९॥
म्हणे कोठें रे मीननाथ ॥परी पाहतां म्हणे तान्हा प्रावर्णातें ॥न्याहाळोनि पाहतां देखे त्वचेतें ॥मग धरणी आंग सांडीतसे
॥१५०॥
म्हणे अहा रे काय केलें ॥बाळ माझें कैसें मारविलें ॥अंग धरणीवरी टाकिलें ॥वरी लोळे गडबडां
॥१५१॥
अहा अहा म्हणूनी ॥मृत्तिका उचलोनि घाली वदनीं ॥आणि वक्षःस्थळा पिटूनी ॥शोक करी आक्रोशें
॥१५२॥
परम मोहें आरंबळत ॥उठउठोनि त्वचा कळीत ॥हदयीं लावूनि आठवीत ॥बाळकाच्या गुणातें
॥१५३॥
अहा तुझा मी असें जनक ॥परम शत्रु होतो एक ॥जननींचें तोठूनि बाळक ॥तुज आणिलें कैसें म्यां
॥१५४॥
म्हणे अहा रे मीननाथा ॥मज सांडूनि कैसा गेलासी आतां ॥एकटा परदेशी सोडूनि तत्त्वतां ॥मार्ग मिळाला तुज केवीं
॥१५५॥
आतां तूतें कीलोतळा ॥कोठूनि पाहील मुखकमळा ॥अहा तुझा कापिला गळा ॥कैसा येथें आणूनी
॥१५६॥
बाळका स्त्रियांचे राज्यांत ॥भुभुःकारें पावशील मृत्यु ॥म्हणोनि बा रे तुजसी येथें ॥रक्षणातें आणिलें
॥१५७॥
आणिलें परी तुज निश्वितीं ॥कृत्तांत झाला गोरक्ष जती ॥ऐसें म्हणोनि धरणीप्रती ॥अंग टाकी घडाडून
॥१५८॥
पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन ॥त्वचा हदयी धरा कवळून ॥म्हणे बाळा तुजसमान ॥पुत्र कैंचा मज आतां
॥१५९॥
अहा बाळाचें चांगुलपण ॥मज भासतसे जैसा मदन ॥अहा बाळाचे उत्तम गुण ॥कोणा अर्थी वर्ण मी
॥१६०॥
बाळा लोटलीं वर्षे तीन ॥परी काय सांगू मंजुळ बोलणें ॥हा ताता ऐसें म्हणोन ॥हाक मारीत होतासी तूं
॥१६१॥
बा रे तनू असतां कोवळीं ॥परी शयनीहून उठसी उषःकाळीं ॥माथा ठेवूनि मम पदकमळीं ॥अहो तात ऐसें म्हणसी
॥१६२॥
बा तू वसत होतासी मम शेजारीं ॥मर्यादा रक्षीत होतांसी अंतरीं ॥अरे कठिण वागुत्तरीं ॥शब्द वाहिला नाहीं म्यां
॥१६३॥
बा रे भोजन करितां ताटीं ॥चतुरपणाची परम हातवटी ॥आपुल्या पुढें ठेवूनि दृष्टि ॥ग्रास देसी बाळका
॥१६४॥
अहा रे अहा मीननाथ बाळा ॥परमज्ञानी वाचा रसाळा ॥लिप्त कदा नव्हेसी मळा ॥शुद्ध मुखकमळा मिरवीसी
॥१६५॥
अहा बारे चक्षुघ्राण ॥कधीं न पाहिलें तुझें मळिण ॥आज तुझे अंग विष्ठावेष्ठन ॥कैसें अमंगळ जावया
॥१६६॥
बा रे कधीं मजवांचून ॥न राहसी एकांत पण ॥आजिचे दिनीं शयनीं मज सोडून ॥कैसा परत गेलासी
॥१६७॥
बा रे माय तुझी कीलोतळा ॥तिचा कधीं न पाहसी लळा ॥आसनीं शयनीं मजपासूनि बाळा ॥पैल झाला नाहीस तूं
॥१६८॥
तरी ऐसें असूनि तुझें मनीं ॥आजि मज गेलासी सोडूनी ॥अहा एकदां येऊनि अवनीं ॥मुख दावीं मज बाळा
॥१६९॥
ऐसें म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥हंबरडा गायीसमान फोडीत ॥अहा माझा मीननाथ ॥कोणीं दाखवा म्हणतसे
॥१७०॥
भूमीं लोळे अश्रु नयनीं ॥नेत्रीं ढाळितां न समाये पाणी ॥वक्षःस्थळादि पिटूनि अवनीं ॥दाखवा म्हणे मीननाथ
॥१७१॥
ऐसें म्हणोनि आक्रंदत ॥ते पाहून गोरक्षनाथ ॥मनांत म्हणे अद्यापि भ्रांत ॥गेली नाहीं श्रीगुरुची
॥१७२॥
मग पुढें गोरक्षनाथ होऊन ॥म्हणे महाराजा कां घेतां अज्ञानपण ॥कोण तुम्ही कोणाचा नंदन ॥करितां रुदन त्यासाठी
॥१७३॥
अहो पुरतें पाहतां कोण मेला ॥अशाश्वताचा भार हरला ॥शाश्वत अचळ आहे बोला ॥कदा काळीं न मरे तो
॥१७४॥
अहो तुमचा मीननाथ ॥नामधारी असे त्यांत ॥तो कदा न मरे योजिल्या घात ॥आहे शाश्वत महाराजा
॥१७५॥
तो कदा न मरे शस्त्रघातांनीं ॥त्यातें न जाळी कदा वन्ही ॥अनिळ न शोषी ना बुडवी पाणी ॥शाश्वत चिन्ही नांदतसे
॥१७६॥
ऐसें बोलता गोरक्षक ॥परी कदा न सोडी शोक ॥अहा अहा मीननाथ ॥ऐसें म्हणोनि आक्रंदे
॥१७७॥
ऐशिया आग्रहाचा अर्थ ॥तें पाहूनियां गोरक्षाच्या ॥मग संजीवनीमंत्राप्रत ॥स्मरण करिता पैं झाला
॥१७८॥
करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥संजीवनी मंत्र जपे ओठीं ॥त्वचेप्रती सोडिता झाला मुष्टीं ॥मीननाथ ऊउला
॥१७९॥
उठतांचि मीननाथ ॥मच्छिंद्राचे गळा पडत ॥मच्छिंद्र पाहूनि हदयांत ॥परम मोहें धरीतसे
॥१८०॥
चुंबन घेऊनि म्हणे बाळा ॥कोठें गेला होतासी खेळा ॥मज टाकूनि विनयस्थळा ॥गमन केलें होतें कीं
॥१८१॥
ऐसें म्हणोनि जैसे तैसे ॥तोही अस्त पावला दिवस ॥दुसरे दिनीं मीननाथास ॥घेऊनि ते चालिले
॥१८२॥
मार्गी चालतां त्रिवर्ग जाण ॥गोरक्ष करितां झाला बोलणें ॥हे महाराजा मच्छिंद्रनंदन ॥चित्त द्यावें मम बोला
॥१८३॥
तुमचा प्रताप पाहतां अवनीं ॥निर्जीवा जीववाल वाटे मनीं ॥ऐसें असूनि सुतालागुनी ॥रुदन केलें हे काय
॥१८४॥
तरी हें रुदन करावया कारण ॥काय होतें बोला वचन ॥ऐसे मीननाथ सहस्त्रावधीनें ॥संजीवनीने निर्माल
॥१८५॥
तरी हें आश्वर्य वाटे मनीं ॥स्वामी पडेल शोकरुदनीं ॥कीं चिंताहारक चिंतामणी ॥तो चिंतेमाजी पडियेला
॥१८६॥
ऐसे ऐकोनि मच्छिंद्रनाथ ॥म्हणे तुवां मारिलें किमर्थ ॥येरु म्हणे मोहभावार्थ ॥तो पाहावया तुमचा
॥१८७॥
तुम्ही वेराग्यशील म्हणवितां ॥तरी माया लंघुनि व्हावें परता ॥आशा मनिषा तृष्णा ममता ॥लिप्त नसावी शरीरातें
॥१८८॥
ऐशा परीक्षा भावनेसीं ॥म्यां मारिलें मीननाथासी ॥परी प्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञराशी ॥रुदन कासया केलें जी
॥१८९॥
येरु म्हणे वत्सा ऐक ॥तूं शिष्य माझा अससी एक ॥तरी म्यांही परीक्षेंचे कौतुकें ॥तुझें बाळा पाहिले असे
॥१९०॥
बा रे आशा तृष्णा मनिषा कामना ॥काम क्रोध मद मत्सर वासना ॥हे मोहमांदुसी मायासदना ॥नांदणुकी करितात
॥१९१॥
तरी तुझे ठायीं मायालेश ॥आहे कीं नाहीं महापुरुष ॥हे पहावया रुदनास ॥आरंभिलें म्यां पाडसा
॥१९२॥
आम्ही अलक्षरुपी पाहणें ॥आणि विज्ञानज्ञानानें विवरणें ॥याच कौतुकें जाणपते ॥पाहिलें म्यां पाडसा
॥१९३॥
बा रे शाश्वत अशाश्वत ॥तुज कळलें कीं नाहीं होतों यां भ्रांतीत ॥तयाची परीक्षा रुदननिमित्त ॥तुझी घेतली पाडसा
॥१९४॥
आतां बा रे तुझे वयसपण ॥समूळ आजि झालें हरण ॥पयतोयाचेनि कारण ॥हंसपुरुष मिरविशी
॥१९५॥
ऐसें बोलतां गुरुनाथ ॥गोरक्ष चरणीं माथा ठेवीत ॥म्हणें महाराजा तुम्ही सनाथ ॥या देहासी पैं केलें
॥१९६॥
ऐसें बोलूनि वागुत्तर ॥पुन्हां गमती मार्गापर ॥मुक्काममुक्कामीं ज्ञानविचार ॥गुरुशिष्य करिताती
॥१९७॥
असो यापरी करितां गमन ॥पुढें कथा येईल वर्तून ॥नरहरीवशीं धुंडीनंदन ॥तियांते सागेल
॥१९८॥
तरी पुढील अध्यायीं कथाराशी ॥पुण्यषर्वत पापनाशी ॥श्रोते स्वीकारुनि मानसीं ॥अवधानिया बैसावें
॥१९९॥
तरी नरहरिवंशीं धुंडीसुत ॥तुमचा आहे शरणागत ॥मालू नाम ठेविलें सत्य ॥तो कथा सांगेल तुम्हांसी
॥२००॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥द्वाविंशतितमाध्याय गोड हा
॥२०१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥