श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय २०
मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट. २१९ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीराया ॥भोक्तया षडगुणऐश्वर्या ॥ऐसी सोसूनि अपार माया ॥सकळ कळा तुझेनि
॥१॥
घटपटतन्तु आकाशन्याय ॥सर्व तंवचि ब्रह्म होय ॥ऐसे असूनि निराळा राहे ॥अव्यक्त व्यक्ती पावुनी
॥२॥
कीं अपार घटी अपार तरणी ॥व्यापून ऐक्य दिसे गगनीं ॥त्याचि न्यायें मोक्षदानी ॥व्याप्त असे सर्वांतें
॥३॥
तरी पूर्णब्रह्म नाथवेष ॥करुणानिधि पंढरीचा अधीश ॥माय कनवाळु जगान्निवास ॥भक्तवत्सल नटलासे
॥४॥
तरी हे दीनबंधो भक्तव्यापका ॥पुंडलीकवरदायका ॥आतां पुढें रसना दोंदिका ॥भक्तिसार वदवीं कां
॥५॥
मागिले अध्यायीं रामदर्शन ॥आणि द्वितीयीं अंजनीनंदन ॥गोरक्षालागीं भेटून ॥अदृश्यपणीं मिरविले
॥६॥
असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ ॥येरीकडे अंजनीसुत ॥शृंगमुरडा जाऊनि त्वरित ॥सानवेषें नटलासे
॥७॥
गुप्तवेषें राजसदन ॥पाहता झाला अंजनीनंदन ॥एकांतसदनीं मैनाकिण पदमिण ॥मंचकावर पहुडली
॥८॥
सुखनिद्रा शयनीं असून ॥परिचारिका गेल्या उठोन ॥ऐसी एकांतसंधी पाहून ॥धवळारी तैं संचरला
॥९॥
चपळपणीं तो मंचकाजवळी ॥जाऊनि बैसला प्रतापबळी ॥कीलोतळा पद्मिणी कमळी ॥करपात्रीं धरियेली
॥१०॥
व्यक्त होतां करकमळ ॥सावध झाली कीलोतळा वेल्हाळ ॥तों दृष्टीं देखिला अंजनीबाळ ॥चरणावरी लोटली
॥११॥
कीलोतळा आणि मैनाकिनी ॥तृतीय नाम जिये पद्मिणी ॥यापरी श्रोते बोलती कल्पनीं ॥कवणें अर्थी हीं नामें
॥१२॥
तृतीयं अभिधाना ती दुहिता ॥झाली असे कवण अर्था ॥मग त्या कल्पनीं वाक्सरिता ॥व्यक्ती घेणें मिरवली
॥१३॥
ऐसा पाहूनि श्रोतियां आदर ॥बोलता कवि सादर ॥तृतीय भिन्न भिन्न प्रकार ॥कैशा रीतीं ऐका त्या
॥१४॥
तरी पर्वतांमाजी मंदरगिरी ॥जंबुद्वीप त्याची प्रथम पायरी ॥यापरी सिंहलद्वीपाची दुसरी ॥मेरुमंदार आहे कीं
॥१५॥
यापरी सिंहलद्वीपभुवनीं ॥स्त्रिया जितुक्या असती पद्मिणी ॥त्यांत ही मुख्य मैनाकिनी ॥स्वरुपवंती मिरवतसे
॥१६॥
तों एके दिवशीं अभ्यंग करुनि ॥उभी राहिली धबळारी जाऊनी ॥ते सहज दृष्टीं दिशागमनीं ॥आकाशातें पहातसे
॥१७॥
हस्तीं झगटती कबरीभार ॥तों वर दृष्टी जाऊनि गोचर ॥उपरीचवसु विमानावर ॥आरुढ होऊनि जातसे
॥१८॥
विमानारुढ झाला होता ॥तों वसन एकांगें झालें तत्वतां ॥आवेशें बाहेर लिंग दर्शतां ॥असावध बैसलासे
॥१९॥
विमानावरी गवाक्षद्वार ॥त्यांतूनि दिसे अवयव समग्र ॥तों मैनाकिनी पाहूनि नेत्रें ॥हांसे खदखदां ते काळीं
॥२०॥
तें ऐकूनि वसुनाथ ॥विक्षेपोनि बोलता झाला तीतें ॥म्हणे पापिणी परपुरुषातें ॥पाहूनिया हासलीस
॥२१॥
तरी ऐसी जारिणी वरती ॥धरुनि राहसी स्वगृहाप्रती ॥माझेविषयीं कामशक्ती ॥उदभवली म्हणूनि हांसलीस
॥२२॥
तरी मी नोहें तैसा भ्रष्ट ॥सकळ वसूमाजी श्रेष्ठ ॥इंद्रियदमनीं एकनिष्ठ ॥पूर्णतपा साधीतसें
॥२३॥
तरी मम अभिलाष धरुनी ॥गदगदां हांससी पापिणी ॥तरी पुरुष विनोदे स्वस्थानीं ॥जाऊनियां पडशील
॥२४॥
स्त्रीदेशांत स्त्रीकटकीं ॥वस्ती होईल तुझी शेखी ॥मग कैंचा पुरुष ते लोकीं ॥दृष्टीगोचर होईल
॥२५॥
ऐसें बोलता वसु अंतरिक्ष ॥परम लाजली पद्मिणी सुलक्ष ॥परी पदच्युत शब्द ऐकतां प्रत्यक्ष ॥स्तुतिसंवादा व्यापिली
॥२६॥
म्हणे महाराजा वसुनाथा ॥अपराध झाला विषम आतां ॥अपराधाचें विवरण करितां ॥बोलतां न ये आम्हांसी
॥२७॥
परी हा असो प्रारब्धयोग ॥कदा न सुटे आचरला भोग ॥तरी उश्श्याप देऊनि आतां चांग ॥स्वपदातें स्थापावें
॥२८॥
तुम्ही वसु सर्वप्रकारें ॥भरलां आम्हां शांतिभांडारे ॥परम कनवाळू इंद्रियें साचारें ॥योगदमनीं मिरवला
॥२९॥
तरी उश्श्याप देऊनि मातें ॥करीं महाराजा पदाश्रित ॥मग अंतरिक्ष षाहूनि ढळाळिते ॥उश्शापातें बदलासे
॥३०॥
म्हणे पद्मिणी ऐक वचन ॥स्त्रीराज्यांत कीलोतळा स्वामीण ॥तेथें आयुष्य सरल्या पूर्ण ॥तैं पदीं वससील तूं माये
॥३१॥
परी मज भावें निवेदिलें चित्त ॥तरी महीं मिरवेल माझा सुत ॥तो तुज स्वीकारुनि होईल रत ॥मच्छिंद्रनाथ म्हणोनियां
॥३२॥
तो रत झालिय अंगसंगीं ॥पुत्र लाभसील रेतप्रसंगीं ॥मीननाथ हें नाम जगीं ॥प्रसिद्ध मिरवेल महीतें
॥३३॥
तो पुत्र झालिया तूतें शेवटीं विभक्ती होईल मच्छिंद्र जेठीं ॥मग तूं स्वपदा येऊनि गोरटी ॥भोग भोगीं स्वर्गीचा
॥३४॥
याउपरी बोलली मैनाकिनी ॥पुरुष नाहीं कां तया भुवनीं ॥सकळ स्त्रिय दिसती अवनीं ॥काय म्हणोनी महाराजा
॥३५॥
तरी पुरुषावांचूनि संतती ॥कोठूनि होतसे नसूनि पती ॥येरु म्हणे येऊनि मारुती ॥भुभुःकार देतसे
॥३६॥
उर्ध्वरेता वायुनंदन ॥वीर्य व्यापितसे भुभुःकारेकरुन ॥मग उत्पत्ति उदयजन्म ॥तेथें होतसे शुभानने
॥३७॥
बाळतनु जो पुरुषधारी ॥मृत्यु पावे तो भुभुःकारीं ॥तितुक्याविण अचळनारी ॥महीवरी विराजती
॥३८॥
ऐसें वदता अंतरिक्ष मात ॥मम बोले पद्मिणी जाऊन त्वरित ॥हे महाराजा मच्छिंद्रनाथ ॥येईल कैसा त्या ठाया
॥३९॥
प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ॥ऐसी चर्चा तेथें असून ॥कैसा येईल तव नंदन ॥मम भोगार्थ महाराजा
॥४०॥
अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी ॥तूं कीलोतळेचे उपरी जाऊनि ॥बैसोनि उपरी तपमांडणीं ॥अराधावा मारुती
॥४१॥
प्रसन्न झालीया वायुनंदन ॥मग मुक्त करील त्या भयापासून ॥परी तुज सांगतों ती खूण ॥चित्तामाजी रक्षावी
॥४२॥
प्रसन्न होईल जेव्हां मारुती ॥मागणे करिजे अंगसंगती ॥मग तो संकटीं पडूनि क्षिती ॥मच्छिंद्रातें आणील
॥४३॥
तरी हा रचूनि दृढतर उपाय ॥मिरवत आहे मारुती भय ॥तरी तयाचे हस्तें साधावें कार्य ॥मच्छिंद्रातें आणोनी
॥४४॥
याउपरी बोले पद्मिणी युवती ॥रामचरणीं श्रीमारुती ॥कैसें मातें द्यावी गती ॥ऐसें म्हणावें महाराजा
॥४५॥
परी ऐसिये बोलप्रकरणी ॥मारुतीच मिरवला विषयध्वनी ॥मग तव सुत मच्छिंद्र कोठूनीं ॥येथें येईल महाराजा
॥४६॥
ऐसें अंतरिक्ष ऐकतां वचन ॥म्हणे विषयोपद्रवरहित वायूनंदन ॥ब्रह्मचर्यव्रतातें लोटून ॥रतिसुखातें मिरवेल
॥४७॥
तरी हा संशय सोडूनि गोरटी ॥अर्थ धरिजे इतुका पोटीं ॥मच्छिंद्रा लाहसील येणे कोटीं ॥हनुमंतेकरुनियां
॥४८॥
ऐसें सांगूनिया अंतरिक्ष ॥स्वस्थाना गेला वसु दक्ष ॥येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष ॥स्त्रीराज्यांत प्रवर्तली
॥४९॥
शृंगार मुरडा राजपट्टणीं ॥भ्रमणकरितां ती पद्मिणी ॥तो ते चर्मिकेचे सदनी ॥सहजस्थिती पातली
॥५०॥
सहजस्थितीं जाऊनि ओसरीं ॥बसती झाली शुभगात्री ॥तों ती चर्मिका पाहूनी नेत्रीं ॥बोलती झाली तियेतें
॥५१॥
म्हणे माय वो शुभाननी ॥कोठे अससी लावण्यखाणी ॥येरी म्हणे वो मायबहिणी ॥सिंहलद्वीपीं मी असतें
॥५२॥
परी अंतरिक्षवसूचे शापेंकरुन ॥पाहतें झालें माय हें भुवन ॥आतां माझें संगोपन ॥कोणी करील कळेना
॥५३॥
ऐसी ऐकूनि पद्मिणीवाणी ॥बोलती झाली ती चर्चिणी ॥म्हणे माय वो माझे स्थानीं ॥राहूनि सुख भोगीं कां
॥५४॥
स्वहस्तें करुनि षाक ॥हरीत जा माये तृषभूक ॥मी आपुल्या गृहींची एक ॥तारंबळ होतसे
॥५५॥
तरी माय वो उपेक्षा सोडून ॥सेवीं माय वो माझें सदन ॥कन्येसमान तुज पाळीन ॥सर्व सुख देऊनियां
॥५६॥
ऐसी ऐकूनि तियेची वार्ता ॥परम तोषली हदयीं दुहिता ॥मग तेथोंचि राहूनि बल्लवी हस्ता ॥क्रियेलागी आराधी
॥५७॥
हस्तें करुनि पाकनिष्पत्ती ॥हरीत चर्मिकेचे क्षुधेप्रती ॥शेवटीं भोजनक्रियेसंगतीं ॥आपण सेवी नित्यशा
॥५८॥
यासही लोटतां बहुत दिन ॥कीलोतळा राज्यस्वामीण ॥आयुष्य सरलें जरा व्यापून ॥मग मंत्र्यालागीं बोलतसे
॥५९॥
म्हणे आयुष्य सरलें निकट ॥तरी कोणास हो द्यावा राज्यपट ॥मंत्री म्हणे माळिका चोखट ॥गजशुंडी विराजवावी
॥६०॥
सकळ स्त्रिय पाचारुन ॥गज प्रेरावा माळ देऊन ॥त्यासी भेटेल दैववान ॥माळग्रहणीं ग्रीवेंत
॥६१॥
ऐसें बोलता मंत्रीं तये वेळां ॥परम तोषली कीलोतळा ॥मग सुदिन पाहूनि कार्यमंगळा ॥अर्पिली माळा गजशुंडीं
॥६२॥
समग्र स्त्रियांची सभा करुन ॥मग तो प्रेरिला माळ देऊन ॥तें प्रांतीं मैनाकिनी पाहून ॥माळ ग्रीवेंत ओपिली
॥६३॥
या उपरांतिक भोगितां राणीव ॥आचरली पूर्वोक्त तपपर्व ॥वश केला मनोभावें ॥रामदूत तियेनें
॥६४॥
वश झाला अंजनीनंदन ॥हें पूर्वीच लिहिलें कथन ॥वायुसुतें मच्छिंद्राकारण ॥निवेदलें प्रकरण पूर्वीं
॥६५॥
तरी असो ऐसें कथन ॥सिंहलद्वीपीं मैनाकिनी नाम ॥मातापितरांच्या आवडींकरुन ॥नाम ऐसें विराजलें
॥६६॥
यापरी सिंहलद्वीपींची दारा ॥म्हणोनि सर्वांच्या वागुत्तरा ॥पद्मिणी नाम सर्वोपचारा ॥बोभावती कटकांत
॥६७॥
कीलोतळेचें पावली आसन ॥म्हणोनि कीलोतळा ऐसें नाम असो गुप्तरुपें वायुनंदनें ॥सावध केली कीलोतळा
॥६८॥
सावध करोनि तीतें ॥म्हणे कीलोतळे ऐके मात ॥तुवां मज ठेवूनि वचनांत ॥मच्छिंद्रनाथ आणविला
॥६९॥
तरी तव वचनापासून ॥सुटलों आहें अर्थ करुन ॥परी तव सुखासी पातलें विघ्न ॥मच्छिंद्रशिष्य येतो कीं
॥७०॥
तो मच्छिंद्राहुनि प्रतापवंत ॥नामीं मिरवला गोरक्षनाथ ॥तो अजिंक्य असे तयाचें सामर्थ्य ॥वर्णवेना वाचेसी
॥७१॥
म्यां तुझ्यासाठीं यत्न केला ॥श्रीराम मध्यस्थ घातला ॥परी अवमानूनि उभयतांला ॥मच्छिंद्रा नेऊं म्हणतसे
॥७२॥
तरी तो आतां येईल येथें ॥त्यासी सज्ज करुनि प्रीतातें ॥गोंवूनि घ्यावा कोणे हितार्थे ॥सुखसंपत्ति दावूनियं
॥७३॥
परी तो नोहे मच्छिंद्रासमान ॥विषयीं विरक्त तपोधन ॥कैसा राहील नवलविधान ॥सर्वोपरी विरक्त तो
॥७४॥
परी वाचागौरव द्रव्यगौरव ॥आसनगौरव वसनगौरव ॥भोजनादि नानावैभवें ॥गौरवोनि गोंवावा
॥७५॥
जैसा जतन करी पावक ॥संग्रहीं जे गौरवी राख ॥कीं चिंधीवेष्टणे रक्षणें माणिक ॥होत आहे शुभाननी
॥७६॥
तैसा बहुविध गौरव करुन ॥तुष्ट करावें तयाचें मन ॥ऐसें सांगूनि वायुनंदन ॥गमन करिता पैं झाला
॥७७॥
परी ती चपळ मैनाकिनी ॥मारुति बैसविला कनकासनीं ॥षोडशोपचारें पूजा करोनी ॥बोळविला महाराजा
॥७८॥
स्वस्थाना गेला वायुसुत ॥येरीकडे गोरक्षनाथ ॥वेश्याकटकीं मार्गी येत ॥मुक्काममुक्कामासी साधूनियां
॥७९॥
जैसे पक्षी करिती गमन ॥या तरुडूनि त्या तरुवरी जाऊन ॥तेवीं गोरक्ष मुक्काम करुन ॥श्रृंगमुरडीं पातला
॥८०॥
गांवानिकट पेठेंत ॥धर्मशाळा होती त्यांत ॥वेश्याकटकीं राहुनि तेथ ॥शिबिरापरी योजिलें
॥८१॥
मग ती वेश्या मुख्य नायिका ॥कलिंगा नामें मुख्य दोंदिका ॥साजसरंजाम घेऊनि निका ॥राजसदनीं चालिली
॥८२॥
सर्व वेश्या सात पांच ॥घेऊनि रुपवंत गुणवंत साच ॥ऐसें कटकीं करोनि संच ॥राजांगणी मिरवली
॥८३॥
राजद्वारीं उभी राहून ॥पाठविलें वर्तमान ॥द्वाररक्षके आंत जाऊन ॥वेश्याकटकी सांगितलें
॥८४॥
हे महाराजा राजद्वारीं ॥कलावती कलाकुसरी ॥रुपवती गुणगंभीरी ॥भेटीलागीं पातली
॥८५॥
तरी आज्ञेप्रमाणें वदूं तीतें ॥ऐसी ऐकतां किलोतळा मात ॥म्हणे घेऊनि या सभास्थानांत ॥अवघे समारंभेंमीं
॥८६॥
ऐसें ऐकतां द्वारीं दूतीं ॥सर्वेचि पातली द्वारावती ॥घेऊनि कलिंगा कलावती ॥सभास्थानीं पातली
॥८७॥
तों कनकतगटीं रत्नकोंदणीं ॥मच्छिंद्र मिरवला कनकासनीं ॥निकट बैसली मैनाकिनी ॥निजभारें शोभलीं
॥८८॥
जैसी नभीं उडुगणज्योती ॥मध्यें मिरवला रोहिणीपती ॥त्याचि न्यायें मच्छिंद्राभोंवती ॥सकळ स्त्रिया विराजल्या
॥८९॥
कीं तेजःपुंज हाटकासनीं ॥हिरा मिरवला शुद्ध कोंदणीं ॥नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी ॥तैसा शोभला मच्छिंद्र
॥९०॥
कीं शैल्या नव्हेत त्या रश्मिज्वाला ॥मध्यें मच्छिंद्र अर्कगोळा ॥कनकासनीं ते सदनीं सकळां ॥राजसभेंत मिरवत
॥९१॥
असो ऐसी सभा सघन ॥कलिंगा दृष्टीनें पाहोन ॥मग बोलती झाली सभेवचन ॥मैनाकिनीरायातें
॥९२॥
हे महाराजा शैल्यापती ॥ऐकूनि नामाभिधानकीर्ती ॥सोडूनि आपुल्या देशाप्रती ॥येथें आलें महाराजा
॥९३॥
तरी कीर्तिध्वज फडकत अवनीं ॥तैसी अवलोकनीं आली करणी ॥मही कलावंत राजभुवनीं ॥विराजतसे महाराजा
॥९४॥
बृहद्रथ राजा हस्तिनापुरी ॥कीर्तिध्वज धर्माचारी ॥यचि नीतीं बंगालधरित्रीं ॥गोपीचंद विराजला
॥९५॥
याचि नीतीं कीर्तिध्वज ॥शैल्यादेशीं कीलोतळानाम राज ॥ऐसी वरुनि सत्कीर्तिभाज ॥येथें आलें महाराजा
॥९६॥
ऐसी बोलतां कलिंगा युवती ॥परम तोषला कीलोतळाभूपती ॥मग समुच्चयें विचार करोनि अन्नभुक्ती ॥देऊनि बोले कीलोतळा
॥९७॥
तंव ती कलिंगा येऊनि शिबिरीं ॥मध्यान्हसमया सारोनि उपरी ॥साजसरंजाम सजूनि परी ॥सावध रात्रीं बैसली
॥९८॥
तों येरीकडे मैनाकिनी ॥येऊनि बैसली सभास्थानीं ॥सभामंडप श्रृंगारोनी ॥दीपमाळा रचियेल्या
॥९९॥
लावूनि स्फटिकांची कूपिका ॥मेणबत्ती लावोनि दीपका ॥अगरबत्तीगंध लोकां ॥घ्राणोघ्राणीं मिरवतसे
॥१००॥
तबकीं भरोनि गंगेरी पानें ॥विडे रचिले त्रयोदशगुणी ॥त्यांत फुलें अत्तरदाणी ॥लोकांमाजी मिरवतसे
॥१०१॥
येरी कलिंगा राजसदना जात ॥सवें चालिला गोरक्षनाथ ॥परी कलिंगे पाचारोनि एकांत ॥गुज सांगे तियेसी
॥१०३॥
म्हणे वो ऐक गुणगंभीरी ॥तूं नाट्या करिसील सभेभीतरी ॥तरी मृदंगवाद्य माझे करीं ॥सभास्थानीं ओपीं कां
॥१०४॥
शैल्यासभे कटकस्थानीं ॥रिझवितां माजे वाजवणीं ॥मग द्रव्यलाभ घे ओढोनि ॥मानेल तैसें माग तेथें
॥१०५॥
ऐसें ऐकतां कलिंगा वदत ॥हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ ॥सभेस्थानीं स्त्रिया समस्त ॥पुरुष नसे त्या ठायीं
॥१०६॥
तरी तुम्हांलागीं तेथे नेतां ॥वितर्क वाढेल संशय चित्ता ॥स्त्रीदेशांत पुरुष व्यक्त ॥कोठेंचि नाहीं म्हणोनि
॥१०७॥
ऐसें ऐकूनि तपोद्रुम ॥म्हणे एकें वो सुमध्यमे ॥अंगनावेषे येतों नटून ॥रंग तुझा लुटावया
॥१०८॥
माझी इच्छ होईल पूर्ण ॥तूतेंही मिळेल अपार धन ॥मग ती कलिंगा आवडीने ॥अवश्य नाथा म्हणतसे
॥१०९॥
मग लेवूनि कंचुकीसार ॥परिधानिलें उत्तम चीर ॥जटावियुक्त करोनि भार ॥भांग मुक्तांनी भरियेला
॥११०॥
भाळीं चर्चूनि कुंकुमकोर ॥सोगया अंजनी मिरवले नेत्र ॥कबरीकरुनि चीरपदर ॥नाभिस्थानीं खोंविला
॥१११॥
काढोनि कर्णमुद्रिकाभूषण ॥ताटके केलीं परिधान ॥तेही कोंदणीं जडावरत्नें ॥नक्षत्रांसम झळकती
॥११२॥
कीं एकाग्र करुनि रोहिणीपती ॥करुं पातले श्रवणीं वस्ती ॥मुक्तघोष नासिकाप्रती ॥सरजी नथ शोभतसे
॥११३॥
पाचकंकणजडित भूषण ॥ग्रीवेमाजी अपार हेम ॥नाना नगीं हाटकगुण ॥मुक्तलडा शोभल्या
॥११४॥
असो आतां किती वर्णन ॥अंगनावेषें गोरक्षनंदन ॥परम शोभला चपळेपण ॥वैश्यांगणी तळपतसे
॥११५॥
आधींच पूर्ण हेमकांती अवतारी ॥त्यावरी नटला हेमशृंगारी ॥मग वर्णदशास्वरुपापरी ॥रंभा दासी शोभली
॥११६॥
ऐसिया आव्हानूनि पैंजणी ती ॥मृदंग कवळूनि प्रतिहातीं ॥नटनृत्यस्वरुपी राजपंक्ती ॥जाणूनियां मिरविली
॥११७॥
परी त्या शैल्या शुभाननी ॥पाहती पुरवंडा सुलोचनी ॥एकमेकां बोलती वाणी ॥मदनबाळी हेही असे
॥११८॥
सकळ नाट्यकलावती ॥विकळस्वरुप नीच दिसती ॥म्हणती धन्य विधात्याप्रती ॥रचिली मूर्ति अनुपम्य
॥११९॥
समस्त वदूं जरी उर्वंशी ॥तरी हिच्यापुढें वाटती दासी ॥चपळतेजें सहजेंसी ॥तळपत आहे बाळी हे
॥१२०॥
सहज सोडोनि प्रत्योदक ॥नाद दर्शबी अलौलिक ॥पाहतेपणीं पडूनि टक ॥विस्मयातें पडती त्या
॥१२१॥
वाद्यनादानें व्यक्तींत ॥मेळवीं ताल अति अदभुत ॥परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ ॥एका ठायीं मीनले
॥१२२॥
कलिंगा मुख्य नायकिणी ॥परी पुरवंडा दैन्यवाणी ॥जैसें उदया येतां तरणी ॥सकळ तेजा लोषती
॥१२३॥
असो नाट्यदारा कलिंगेसहित ॥उभ्या राहिल्या करुं नृत्य ॥तैं कटीं कवळूनि मृदंगातें ॥कुशळ वाजवी पुरवंडा
॥१२४॥
संगीत स्वरित गायन ॥शैल्या सकळ तुकावती मान ॥अहा अहा बोलूनि वचन ॥धन्य म्हणती कलिंगा
॥१२५॥
सकळ शैल्या सभांगणीं ॥त्यांत मच्छिंद्रनाथ कनकासनीं ॥कीं पदमाळिके चिंतामणी ॥हिरा चमक दावीतसे
॥१२६॥
पुढारां पाहूनि गुरुनाथ्य ॥मनच्या मनीं नमन करीत ॥परम हेलावे आनंदें चित्त ॥म्हणे कृतार्थ झालों मी
॥१२७॥
आतां श्रीगुरुचे पाहिले चरण ॥सकळ झालों तापहीन ॥मग स्फुरण ये कुशळपणीं ॥वाद्यकळा मिरवीतसे
॥१२८॥
तैं नृत्य गीत संगीत होतां ॥पाहूनि लाजे विधिदुहिता ॥लाजत अप्सरा गंधर्व माथा ॥ठेऊनि पाहती चरणांतें
॥१२९॥
तानमान रंगप्रकार ॥तल्लीन झाले सकळ भार ॥मान तुकावूनि नाथ मच्छिंद्र ॥अहा अहा म्हणतसे
॥१३०॥
मग परिधानावया उंच वस्त्र ॥काढूनि हस्तें देत मच्छिंद्रनाथ ॥तों पुढारा पाहुनि हर्ष बळवंत ॥लाघवकळे वर्तवी
॥१३१॥
मृदंगवाद्य वाजवितां ॥अदभुतपण कुशळता ॥तया नादातें अक्षरव्यक्ता ॥भांतीभांती काढितसे
॥१३२॥
त्या अक्षरांमाजी अक्षर ॥मच्छिंद्रनामे चमत्कार ॥दावूनि पुढें तोचि व्यवहार ॥रंगासमान नाचवी
॥१३३॥
मृदंग अक्षरीं तैसीं चर्या ॥दावीतसे गुरुवर्या ॥'' चलो मच्छिंदर गोरख आया '' ॥पुन्हा अक्षरें आच्छादी
॥१३४॥
परी अक्षरें मच्छिंद्रातें ॥श्रवण होतां पाहे भवतें ॥चित्ती चाकाटूनि म्हणे येथें ॥कोठूनि आला गोरक्ष
॥१३५॥
येरीकडे सहज चालीं ॥गोरक्ष वाजवी गायनपाउलीं ॥रंजीत देखतां गुरुमाउली ॥तीचि अक्षरें आणीतसे
॥१३६॥
आणिता अक्षरें पूर्वव्यक्त ॥होतांचि मच्छिंद्रु दचकत ॥भंवतें पाहूनि गोरक्षनाथ ॥कोठे आहे म्हणतसे
॥१३७॥
शैल्या आणि कलावासिनी ॥तयासी व्यक्त न पाहतां नयनीं ॥कोठूनि पडतसें अक्षरघ्वनी ॥श्रवणीं आमुचे साजणी
॥१३८॥
पिशाचवाणी भंवतीं पाहतसे ॥घडीघडी चित्त दचकतसे ॥थडथडोनी हदय उडतसे ॥आला गोरक्ष म्हणोनी
॥१३९॥
मग न आवडे सभा कनकासन ॥मुख वाळलें झालें म्लान ॥मग कोणी ऐकेना गायन चित्तीं फार व्यापिले
॥१४०॥
'' चलो मच्छिंदर गोरख आया '' ॥जंव जंव अक्षरें हीं ऐकूनियां ॥तंव तंव दचकूनि गेली काया ॥काळिमा तेव्हां येतसे
॥१४१॥
तंव पाहूनि कीलोतळा ॥हदयी पेटूनि चिंतानळा ॥काळिंबी काया म्हणूनि सकळा ॥रोमांच उठती शरीरी
॥१४२॥
तंव पाहूनि कीलोतळा ॥म्हणे महाराजा तपपाळा ॥सुरस रंगीं मुखकमळा ॥काळिंबी कां वरियेली
॥१४३॥
येरी म्हणे वो मैनाकिनी ॥मातें दिसते विपरीत करणी ॥मच्छिंद्रशिष्य गोरक्ष अवनी ॥भय आहे तयाचें
॥१४४॥
तो परम पवित्र भक्तचूडामणी ॥विषया नातळे इंद्रियदमनीं ॥महाप्रतापें तपोखणी ॥बैरागी तो असे हो
॥१४५॥
अगे तो येतां तव पट्टणीं ॥नेईल मातें स्वदेशअवनीं ॥मग तव रतीची सुखयामिनी ॥गोरक्षअंकीं नासेल
॥१४६॥
ऐसें ऐकतां कीलोतळा ॥मारुतिसूचनेचा खूणगरळा ॥हदयीं व्यापूनि जाळूं लागला ॥मुख कोमाविति पैं झाली
॥१४७॥
मग तो रंग नाट्यकृती ॥विरस होऊनि नावडे चित्तीं ॥हदयालयीं ते चिंताभगवती ॥नांदती झाली प्रत्यक्ष
॥१४८॥
नाट्यरंगाचा आनंदवेष ॥बळी आव्हानिला एकाचि भाष ॥मग रंगदेवता पडूनि ओस ॥उठवी आपुल्या ठाण्यातें
॥१४९॥
जैसी पयसैंधवा पडे गांठीं ॥मग विरस होऊनि नासल्या गोष्टी ॥मिरवला हा तन्न्याय पोटीं ॥भय उभयतां आतळे
॥१५०॥
परी ती चतुर मैनाकिनी ॥गायनस्वर आव्हान कानीं ॥तों मृदुंगवाद्यीं उठोनि ध्वनि ॥चलो गुप्त गोरख आया
॥१५१॥
ऐसा नाद अक्षरस्थित ॥कीलोतळा श्रवण करीत ॥मग बोलावूनि कलावंत ॥उत्तरातें आराधी
॥१५२॥
म्हणे तव सारंगी संगीती ॥वाजत आहे उत्तमा गतीं ॥परी आमुच्या साजसंग्रहाप्रती ॥आजी पाहूं वाजवोनी
॥१५३॥
ऐसें ऐकतां कलिंगा पद्मिनी ॥म्हणे आणा पाहूं वाजवोनी ॥मग ती कीलोतळा आज्ञापोनी ॥साज आणूनि ठेवितसे
॥१५४॥
तोंही साज पुढें घेऊनी ॥वाजविती कुशळपणीं ॥परी सुस्वर गाण्यांत अक्षर पूर्ण ॥तेंचि काढी पुन्हां पुन्हां
॥१५५॥
तेही ऐकूनि मैनाकिनी ॥मग सेविका आपुली कलावंतिनी ॥कलिंगाचा साज देऊनी ॥उभी केली पाठीमागें
॥१५६॥
तीतें सांगे रहस्ययुक्ती ॥पुढारां वाद्यें अक्षरें काढिती ॥त्याचि नीतीं अक्षरस्थिती ॥तूंही बोलवीं मृदंगा
॥१५७॥
परी ती वाजवितां कलावंतिणी ॥तैसी अक्षरें न येती कानीं ॥मग पुढें तिचा हात धरोनि ॥एकांतासी पैं गेली
॥१५८॥
सलीलपणीं चरणीं माथा ॥ठेवूनी पुसे तीसी वार्ता ॥माये तूं कोण सांग आतां ॥सकळ संशय सोडूनी
॥१५९॥
जरी ही गोष्ट ठेविसी चोरुन ॥तरी तुज तुझ्या गुरुची आण ॥मातें वदें कीं प्रांजळपण ॥कोण कोणाची तूं अससी
॥१६०॥
ऐसी भूपिणी बोलतां वचन ॥मनांत विचारी गोरक्षनंदन ॥प्रगट होण्याचा समय पूर्ण ॥हाचि सुलक्षण दिसतसे
॥१६१॥
मग बोलता झाला प्रांजळ वचन ॥माये मी नसें सर्वथा कामिण ॥श्रीमच्छिंद्राचा प्रिय नंदन ॥गोरक्षानामें मिरवतसें
॥१६२॥
तरी स्त्रीवेषनटी नारी ॥नटोनि निघीं तव राजद्वारीं ॥ऐसे ऐकतां ती सुंदरी ॥पुन्हा चरणी लोटली
॥१६३॥
मग पुरुषपरिधान आणोनि त्वरित ॥श्रीगोरक्षनाथा नेसवीत ॥म्हणे तूं माझा सुत ॥भेटलासी दैवानें
॥१६४॥
पूर्वी नाथानें नामाभिधान ॥तब रुपीं केलें निवेदन ॥निवेदन होतांचि तनमनप्राण ॥तव भेटी उदेले
॥१६५॥
उदेले परी सांगूं काय ॥जैसें सेवितां कां जगन्याय ॥कीं गृहीं वत्स काननीं गाय ॥परी प्राण वत्सा ठेवीतसे
॥१६६॥
कीं जलावेगळी मासोळी ॥होतां रिघूं पाहे पुन्हां जळीं ॥तन्न्यायें मोहकाजळी लागली ॥तुजसाठीं मज बा रे
॥१६७॥
मग हाटकशृंगार करुनि व्यक्त ॥जडितकोंदणीं लेववीत ॥रत्नमुद्रिका रणबिंदीसहित ॥मुक्ततुरा लाविला
॥१६८॥
भरजरीचे कनकवर्णी ॥परिधानिला चीरभूषणीं ॥मस्तकीं मंदिल नवरत्नी ॥शिरपेंच वरी जडियेला
॥१६९॥
हस्ताग्रीं बाहुवट ॥हेमकोंदणीं लखलखाट ॥सर्व भूषणीं तेजवट ॥शृंगारिला नाथ तो
॥१७०॥
मग हस्त धरुनि कीलोतळा ॥येती झाली सभामंडळा ॥येतांचि मच्छिंद्रें देखिली डोळां ॥पुरुषव्यक्त कामिनी
॥१७१॥
मनांत म्हणे मच्छिंद्रनाथ ॥पुरुष कैंचा आला येथ ॥निकट येतां कीलोतळेतें ॥हस्तें खुणावी कोण तो
॥१७२॥
येरीकडे हस्तखुणे संकेतीं ॥पाहूनि म्हणे गोरक्षजती ॥तुमचा उद्देश धरुनि चित्तीं ॥भेटीलागीं पातला
॥१७३॥
परी आज उदेला दैवआदित्य ॥भेटला माझा प्राणसुत ॥सकळ राज्याचा धैर्यवंत ॥बाळ गोरक्ष माझा हा
॥१७४॥
आतां सकळ कांचणी ॥फिटूनि गेली अंतःकरणीं ॥सकळ वैभव राजमांडणी ॥संगोपील बाळ हा
॥१७५॥
आणि पाठिंबा बळिवंत ॥सहोदर वडील गोरक्षनाथ ॥धाकुटा मीन तुमचा सुत ॥संगोपीलं तयासी
॥१७६॥
म्हणूनि समूळ माझी कांचणी ॥फिटून गेली दूर अवनीं ॥वृद्धापकाळीं चक्रपाणी ॥कृपें वेष्टिला आपणासी
॥१७७॥
ऐसें बोलतां मैनाकिनी ॥गोरक्ष हास्य करी मनीं ॥चित्तीं म्हणे बळेंचि तरणी ॥अंधारचीरी भूषीतसे
॥१७८॥
आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव ॥आम्हां कासयासी वैभव ॥विधवेलागीं कुंकुमटेव ॥खटाटोप कासया
॥१७९॥
कीं परिसालागीम कनक शृंगार ॥कीं तक्रीं तुष्टती देव अमर ॥तैसे आम्ही विरक्त थोर ॥राजवैभव कासया
॥१८०॥
कीं ग्रामगौतमींची कास ॥दुग्ध काढूनि अंजुळीस ॥तें पयोब्धीस पाजूनि सुरस ॥तुष्ट चित्तीं मिरवला
॥१८१॥
कीं सकळ महीचा नृपनाथ ॥अंजुळी धान्याचा गरजवंत ॥कीं मित्र तेजाची भिक्षा मागत ॥काजव्याचें जाऊनि
॥१८२॥
तयाचि न्यायें आम्हांसी वैभव ॥कायसें पद थोर राणीव ॥येरी जल्पतसे आपुला भाव ॥निःसंगा संग जाऊनी
॥१८३॥
परी असो कार्यापुरती ॥ऐकूनि घ्यावी येउती मात ॥श्रीगुरु मर्जी आली करतलांत ॥मारुं लाथ वैभवासी
॥१८४॥
ऐसे गोरक्ष कल्पूनि मनीं ॥येरीकडे मच्छिंद्रमुनी ॥कीलोतळेचे शब्द ऐकूनी ॥आसनाहूनि ऊठिला
॥१८५॥
अतिप्रेमा दाटूनि पोटीं ॥गोरक्षगळां घातली मिठी ॥करीं कवळूनि हदयपोटीं ॥प्रेमे सदगद आलिंगिला
॥१८६॥
मग कलिंगेतें पाचारुन ॥अमूप द्रव्य दिधलेंख वसन ॥गौरवूनि तियेचें मन ॥स्वस्थानातें बोळविलें
॥१८७॥
येरीकडे मंडपांत ॥शैल्यासहित मच्छिंद्रनाथ ॥निकट बैसवूनि गोरक्षातें ॥योगक्षेम पुसतसे
॥१८८॥
बद्रिकाश्रमीं तपोराहाटी ॥तितुकें सांगे गोरक्षजेठी ॥कंटकाग्रीं पादांगुष्ठी ॥द्वादश वर्षे संपादिलीं
॥१८९॥
उपरी तप झालिया पूर्ण ॥माव करी उमारमण ॥सकळ देवां बोलावून ॥आतिथ्यही मिरवलें
॥१९०॥
ऐशी झालिया तपराहाटी ॥परी तव वियोग साहीना पोटीं ॥क्षणाक्षणां होऊनि कष्टी ॥शोक करुं रिघतसें
॥१९१॥
जया पदाचें होता स्मरण ॥अंतीं जठर जाय वेष्टून ॥म्लानवदनीं ओस कानन ॥दाही दिशा दिसतसे
॥१९२॥
मग उदकापासूनि जैसा मीन ॥तरफडून देऊं पाहत प्राण ॥तेवीं माझें अंतःकरण ॥दुःखडोहीं हेलावे
॥१९३॥
परी प्रारब्धयोग दारुण ॥येथें भेटले तुमचे चरण ॥आतां गेलियां प्राण ॥एकाकी कदा न वसें मी
॥१९४॥
ऐसें ऐकतां वचनयुक्तीं ॥पुन्हां धरीतसे हदयाप्रती ॥म्हणे वत्सा तुज मागुती ॥एकांगें कदा न करीं मी
॥१९५॥
मुळींहून बाळपण ॥तुवां न जाणिलें मजविण ॥सकळ करुनि लालन ॥स्थावरपणीं मिरविलें
॥१९६॥
जगावेगळी जळमासोळी ॥विभक्त न होय कवणे काळीं ॥तेवीं मम चित्तदरींत तपोमौळी ॥विभक्त झाला नाहींस
॥१९७॥
परी न व्हावें तें घडूनि आलें ॥श्रीमारुतीनें मज गोविलें ॥गौरविलें परी सदा फोलें ॥वैभव वाटे तुजविण बा
॥१९८॥
बा भोजन करितां षड्रसान्नीं ॥तुझें स्मरण होतसे मनी ॥बा तो ग्रास ठेवितां आननीं ॥विषासमान वाटतसे
॥१९९॥
मग अश्रूने पूर्ण भरती नयन ॥तुजजवळी लागे माझा प्राण ॥मग मूर्तिमंत तूं जठरीं येऊन ॥उभा राहसी माझिया
॥२००॥
मग ताप उपजे मनांत ॥अहा बाळकासी टाकोनि वनांत ॥आलों मी फिरत फिरत ॥हेंचि चिंतन निशिदिनीं
॥२०१॥
बा तुजविण करितां तीर्थभ्रमण ॥परी ओस दिशा बोभावे मन ॥मनांत जल्पें वत्स टाकून ॥कैसा आलों मी पापी
॥२०२॥
ऐसें बोलता मात ॥मग बोलता झाला गोरक्षनाथ ॥हे महाराजा माझी ऐकें मात ॥तूतें सुत बहु असती
॥२०३॥
जया देशीं कराल गमन ॥तेथेंचि सुत कराल निर्माण ॥मग तुमच्या मोहाचें आवरण ॥वांटले जाय महाराजा
॥२०४॥
परी एकचि तूं माझी आई ॥मन माझें एकेच ठायीं ॥मग जैसी पहा गती पाहीं ॥जळाविण मीनातें
॥२०५॥
कीं अर्का कुमुदिनी असती अपार ॥तो मोह करील कोणावर ॥परी कुमुदा तो एकचि मित्र ॥सुखापरी आणाया
॥२०६॥
कीं चंद्रा चकोर असती बहुत ॥परी चकोरा एकचि रोहिणीनाथ ॥त्याचि न्यायें जननी मातें ॥अससी एकचि मातेंख तूं
॥२०७॥
जळांत असती बहुत जळचर ॥परी जळचरा असतें एकचि नीर ॥तन्न्यायें मज माहेर ॥एकचि मच्छिंद्र आराधिला
॥२०८॥
श्लाघ्य पुरुषा अन्य युवती ॥परी युवतीसी एकचि पती ॥तन्न्यायें कृपामूर्ती ॥माझें जीवन तूं अससी
॥२०९॥
घानासी अपार असती चातक ॥परी चातकासी घन तो एक ॥तेवीं तूं मातें जननीजनक ॥एकचि अससी महाराजा
॥२१०॥
ऐसें म्हणूनि गोरक्षनाथ ॥नेत्रीं आणी अश्रुपात ॥तें पाहूनि अंतरिक्षसुत ॥प्रेमें हदयीं कळवळला
॥२११॥
म्हणे तान्हुल्या सत्य वचन ॥तुज कोणी नसे मजविण ॥ऐसें म्हणूनि मुखचुंबन ॥कुरवाळूनि धरीतसे
॥२१२॥
मग सभास्थान विसर्जून ॥पाकशाळेंत उभयतां जाऊन ॥श्रीगोरक्षा ताटीं घेऊन ॥भोजनातें सारिलें
॥२१३॥
भोजन झालिया एकासनीं ॥निद्रा करिती उभय जणीं ॥दिनोदयीं स्नाने करोनि ॥एकासनीं बैसती
॥२१४॥
एका अंकीं मीननाथ ॥एका अंकीं गोरक्षसुत ॥कनकासनीं राजसभेत ॥घेऊनि नाथ बैसती
॥२१५॥
जैसा वक्रतुंड षडानन ॥घेऊनि बैसे उमारमण ॥कीं माय यशोदेजवळी रामकृष्ण ॥उभय अंकीं मिरवती
॥२१६॥
असो आतां हें कथन ॥पुढें सुखें झालें संपन्न ॥तें पुढिले अध्यायीं निरुपण ॥होईल श्रोती श्रवण कीजे
॥२१७॥
तें मच्छिंद्र उभय अंकीं ॥घेऊनि सुतसुताची फेडील बाकी ॥शैल्यांनी वेष्टूनि सुखासनीं हाटकीं ॥नित्य मिरवे मच्छिंद्र तो
॥२१८॥
नरहरिवंशीं धुन्डीसुत ॥नरहरि मालू नाम ज्यातें ॥तो श्रीगुरुकृपें रसाळ कथेतें ॥निवेदील श्रोतियां
॥२१९॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥विंशतितमाध्याय गोड हा
॥२२०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥