श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय १८
गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन; तिचा मृत्यु व गुरुकृपेने पुनः सजीवता. १६२ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी करुणाकरा ॥पंढरीअधीशा रुक्मिणीवरा ॥भक्तपालका चकोरचंद्रा ॥प्रेमपीयूषधारका
॥१॥
हे दीनबंधो दीनानाथ ॥पुढें चालवीं भक्तिसारकथा ॥मागिले अध्यायीं विरागता ॥गोपीचंदा लाधली
॥२॥
असो पुढें आतां श्रोतीं ॥अवधान द्यावें ग्रंथार्थी ॥गोपीचंद सोडूनि ग्रामाप्रती ॥वैराग्य आचरुं चालिला
॥३॥
मार्गी ग्रामोग्रामीं जात ॥अहारापुरती भिक्षा मागत ॥पुढें मार्गी गमन करीत ॥वाचे जप करीतसे
॥४॥
परी गौडबंगाल देश उत्तम ॥समाचार कळला ग्रामोग्राम ॥कीं गोपीचंद राजा नरोत्तम ॥योगींद्रनीति आचरला
॥५॥
गांवोगावींचे सकळ जनीं ॥ऐकतां विव्हळ होती मायापूर्ण ॥कन्येसमान केलें पालन ॥सकळ प्रजेचे रायानें
॥७॥
आतां ऐसा राजा मागुती ॥होणार नाही पुढतपुढती ॥ऐसे म्हणोनि आरबंळती ॥लोक गावींचे सकळिक
॥८॥
असो तो ज्या गांवीं जात ॥त्या गावींचे लोक पुढें येत ॥म्हणती महाराजांनीं राहावे येथ ॥योग पूर्ण आचरावा
॥९॥
नाना पदार्थ पुढें आणिती ॥परी तो न घे कदा नृपती ॥भिक्षा मागुनि आहारापुरती ॥पुढे मार्गी जातसे
॥१०॥
शेटसावकार मोठमोठे ॥बोळवीत येती तया वाटे ॥पुनः परता वागवाटें ॥बोलतती रायासी
॥११॥
हे महाराजा तुम्हांवीण ॥प्रजा दिसत आहे दीन ॥जैसें शरीर प्राणविण ॥नीचेष्टित पडतसे
॥१२॥
तैसी गति प्रजेसी झाली ॥जरी तुम्ही जातां आमुची माउली ॥तरी योग साधुनि पुनः पाउलीं ॥दर्शन द्यावें आम्हातें
॥१३॥
अवश्य म्हणूनी नृपनाथ ॥बोळवीतसे समस्त ॥ऐसें रायासी गांवोंगांवीं होत ॥अति गुंतीं चालावया
॥१४॥
असो ऐसें बहुत दिनीं ॥स्वराज्याची सीमा उल्लंघूनी ॥गौडबंगाल देश टाकूनि ॥कौलबंगाली संचरला
॥१५॥
त्याही कौलबंगाललांत ॥गांवोगांवीं हा वृत्तांत ॥प्रविष्ट झाला लोकां समस्त ॥चकचकिताती अंतरी
॥१६॥
म्हणती गोपीचंद रायासमान ॥होणार नाहीं राजनंदन ॥अहा गोपीचंद प्रज्ञावान ॥धर्मदाता सर्वदा
॥१७॥
असो कौलबंगालींचा नृपती ॥पौलपट्टण ग्रामीं वस्ती ॥तेथें भगिनी चंपावती ॥गोपीचंदाची नांदतसे
॥१८॥
तिलकचंद श्वशुर नामीं ॥महाप्रतापी युद्धधर्मी ॥जैसा गोपीचंद संपत्तीं उत्तमीं ॥तैशाचि नीतीं तो असे
॥१९॥
गज वाजी अपरिमित ॥शिबिका नाना दिव्य रथ ॥धनभांडारें अपरिमित ॥राजसदनें भरलीं तीं
॥२०॥
किल्ले कोट दुर्ग विशाळ ॥कौलबंगाल देश सबळ ॥तया देशींचा तो नृपाळ ॥तिलकचंद मिरविला
॥२१॥
एक लक्ष सहस्त्रशत लक्ष ॥सबळ पृतनेचा असे दक्ष ॥परी ती पृतना नव्हे प्रत्यक्ष ॥काळ शत्रूचा मिरवतसे
॥२२॥
तया गृहीं ती चंपावती ॥सासुरवासिनी परम युवती ॥नणंदा जावा भावांप्रती ॥देवांपरी मानीतसे
॥२३॥
परमप्रतापी गर्जत काळ ॥सासुसासरे असती सबळ ॥तेथेंही वृत्तांत समस्तां सकळ ॥गोपीचंदाचा समजला
॥२४॥
समजला परी करिती टीका ॥म्हणती अहा रे नपुंसका ॥ऐसें राज्य सोडोनि लेकां ॥भीक मागणें वरियेलें
॥२५॥
अहा मृत्यू आला जरी ॥तरी भिक्षाझोळी न वंचावी करीं ॥क्षत्रिय धर्मदाय शरीरीं ॥भीक मागणें नसेचि
॥२६॥
अहा जन्मांत येऊनि काय केलें ॥क्षात्रकुळा दूषण लाविलें ॥आमुचे मुखासी काळें लाविलें ॥पिशुन केलें जन्मांत
॥२७॥
म्हणतील सोयरा तुमचा कैसा ॥नपुंसक झाला वेडापिसा ॥वैभव टाकूनि देशोदेशा ॥भीम मागे घरोघरीं
॥२८॥
तो जन्मतांचि कां नाहीं मेला ॥क्षत्रियकुळातें डाग लाविला ॥आतां स्वमुखा दाविणें कशाला ॥श्लाघ्य दिसेना आमुतें
॥२९॥
ऐसें आतां बहुतां रीती ॥लोक निंदितील आम्हांप्रती ॥अहा कैसी ती मैनावती ॥सुत दवडिला तिनें हा
॥३०॥
अहा पुत्रा देऊनि देशवटा ॥आपण बैसली राजपटा ॥जालिंदर हातीं धरुनि गोमटा ॥भ्रष्ट केलें राज्यासी
॥३१॥
श्रेया सांडूनि रत्नवाटी ॥हातीं घेतली कैसी नरोटी ॥कनक टाकूनि चिंधुटी ॥भाळी बांधी प्रीतीनें
॥३२॥
अहा जालिंदर कोणता निका ॥भिकार वाईट मिरवे लोकां ॥हातीं धरिला समूळ रोडका ॥डोई बोडका शिखानष्ट
॥३३॥
ऐसियाच्या लागूनि ध्यानीं ॥घरासि लाविला आपुल्या अग्नी ॥आतां काळें तोंड करुनी ॥जगामाजी मिरवतसे
॥३४॥
अहा माय नव्हे ती लांब म्हणावी ॥स्वसुत जिनें केला गोसावी ॥लट्टाश्रमाच्या लागूनि पायीं ॥विघ्न आणिलें राज्यांत
॥३५॥
आतां कोण तिचा बाप ॥उभा राहिला बलाढ्य भूप ॥राज्य हरुनि खटाटोप ॥देशोधडी लावील कीं
॥३६॥
ऐसी वल्गना बहुत रीतीं ॥एकमेक स्वमुखें करिती ॥तें ऐकूनि चंपावती ॥क्षीण चित्तीं होतसे
॥३७॥
मनींच्या मनीं आठवूनि गुण ॥बंधूसाठीं करी रुदन ॥नणंदा जावा विशाळ बाण ॥हदयालागीं खोंचिती
॥३८॥
म्हणती भावानें उजेड केला ॥कीर्तिध्वज उभारिला ॥राज्य सांडूनि हात भिकेल ॥ओढवितो लोकांसीं
॥३९॥
मायबंधूंनी दिवटा लाविला ॥तिहीं लोकीं उजेड केला ॥आतां उजेड इचा उरला ॥हेही करील तैसेंचि
॥४०॥
अहा माय ती हो रांड ॥जगीं ओढविलें भांड ॥आतां जगीं काळें तोंड ॥करुनियां मिरवते
॥४१॥
ऐसे दुःखाचे देती घाव ॥हदयीं खोंचूनि करिती ठाव ॥बोलणें होतसे शस्त्रगौरव ॥दुःख विषमारापरी
॥४२॥
येरीकडे गोपीचंद ॥पाहता पाहातां ग्रामवृंद ॥पौलपट्टणीं येऊन शुद्ध ॥पाणवठी बैसला
॥४३॥
हस्तें काढूनि शिंगीनाद ॥वाचे सांगत हरिगोविंद ॥परी स्वरुपामाजी प्रतापवृंद ॥झांकला तो जाईना
॥४४॥
कीं अर्कावरी अभ्र तेवीं तो नृपनाथ ॥पाणवठ्यातें विराजत ॥तों परिचारिका अकस्मात ॥चंपावतीच्या पातल्या
॥४६॥
त्यांनीं येतांचि देखिला नयनीं ॥देखतांचि राव ओळखिला चिन्हीं ॥मग त्या तैशाचि परतोनी ॥राजसदना पैं गेल्या
॥४७॥
सहराया सकळांसी ॥वृत्तांत सांगती त्या युवतींसी ॥कीं गोपीचंद पाणवठ्यासी ॥येवोनियां बैसला
॥४८॥
ऐसा वृत्तांत रायें ऐकून ॥मग चित्तीं झाला क्षीण ॥म्हणे मुखासी काळें लावून ॥आमुचे गांवीं कां आला
॥४९॥
आला परी लोकांत ॥करील आमुची अपकीर्त ॥संचरोनि पट्टणांत ॥भीक मागेल गृहोगृहीं
॥५०॥
कोणी हंबरडा हाणिती बळें ॥कोणी पिटिती वक्षःस्थळें ॥कोणी महीं आपटिती भाळें ॥मूर्च्छागत पडताती
॥१०१॥
कोणी आठवूनि रडती गुण ॥कोणी रडताती चांगुलपण ॥कोणी म्हणती दैवहीन ॥भ्रतार असे इयेचा
॥१०२॥
कोणी म्हणती अब्रूवान ॥चंपावती होती उत्तम ॥निजबंधूचे क्लेश पाहोन ॥दिधला प्राण लज्जेनें
॥१०३॥
एक म्हणे चंपावती ॥किती वर्णावी गुणसंपत्ती ॥मृगनयनी जैसा हस्ती ॥स्त्रियांमाजी मिरवतसे
॥१०४॥
एक म्हणती सदा आनंदी असून ॥पहात होतें हास्यवदन ॥सदा हर्षित असे गमन ॥हस्ती जेवीं पृतनेचा
॥१०५॥
एक म्हणे चांगुलपर्णी ॥घरांत मिरवें जेवीं तरणी ॥एक म्हणे वो शुभाननी ॥किती मृदु कोकिळा
॥१०६॥
एक म्हणती सासुरवास ॥असतां नाहीं झाली उदास ॥ईश्वरतुल्य मानूनि पुरुषास ॥शुश्रुषा करी वडिलांची
॥१०७॥
ऐसें म्हणोनि आक्रंदती ॥अवघे एकचि कोल्हाळ करिती ॥तो नाद अश्वशालेप्रती ॥अकस्मात आदळला
॥१०८॥
अश्वशाळे गौडनाथ ॥अश्वरक्षकालागीं पुसत ॥एवढा कोल्हाळ कां सदनांत ॥झाला आहे कळेना
॥१०९॥
परी तो सर्वांठायी बोभाट ॥झाला आहे गांवांत प्रविष्ट ॥कीं भावाकरितां अति कष्ट ॥जीवित्वातें दवडिलें
॥११०॥
तें अश्वरक्षकांसी होतां श्रवण ॥पुसतां सांगती वर्तमान ॥म्हणती नाथा जीव राणीनें ॥बंधूकारणें दीधला
॥१११॥
नृप म्हणे रे कवण राणी ॥कोण बंधू कवणस्थानीं ॥येरु म्हणती ऐकिलें कानी ॥चंपावती राणी ती
॥११२॥
तियेचा बंधु झाला पिसा ॥सोडूनि गेला राजमांदुसा ॥म्हणोनि वरोनि दुःखलेशा ॥जीवित्व त्यागिलें रांडकीने
॥११३॥
येरु म्हणे बंधु कोण ॥ते म्हणती त्रिलोकचंदनंदन ॥गोपीचंद ऐसें नाम ॥जगामाजी मिरवतसे
॥११४॥
ऐसें ऐकोनि नृपनाथ ॥नयनीं लोटले अश्रुपात ॥चित्तीं म्हणे वो बाई घात ॥मजसाठीं कां केला
॥११५॥
मग चंपावतीचे आठवूनि गुण ॥गोपीचंद मोहें करी रुदन ॥अहा मजसाठीं दिधला प्राण ॥हें अनुचित झालें हो
॥११६॥
तरी आतां महीवरती ॥माझी झाली अपकीर्ती ॥आणिक सोयरे दुःख चित्तीं ॥मानितील बहुवस
॥११७॥
मी येथें आलों म्हणोन ॥चंपावतीनें दिधला प्राण ॥हें दुःखा होईल कारण ॥विसर पडणार नाहीं कीं
॥११८॥
ऐसा विचार करी चित्तांत ॥परी नयनीं लोटले अश्रुपात ॥येरीकडे संस्कारासी प्रेत ॥चितामही चालिलें
॥११९॥
गोपीचंदही प्रेत पाहून ॥करीत चालिला सवें रुदन ॥परी चित्त वेधलें कल्पनेकरुन ॥अपकीर्ति अवघी जाहली
॥१२०॥
तरी आतां असो कैसें ॥उठवावें स्वभगिनीसी ॥आणि चमत्कार सोयर्यांसी ॥दाखवावा प्रतापें
॥१२१॥
आम्हीं जोग घेतला म्हणूनी ॥तृणासमान मानिलें यांनीं ॥तरी नाथपंथाची प्रतापकरणी ॥निजदृष्टीं दावावी
॥१२२॥
जैसा पार्वतीचा गोसावी ॥परी दक्षें हेळितां तो जांवई ॥जीवित्व हरुनि प्रताप महीं ॥गाजविला तयानें
॥१२३॥
कीं अष्टवक्र अष्टाबाळ ब्राह्मण ॥कुरुप म्हणूनि केलें हेळण ॥परी त्यानें प्रताप दाखवून ॥विप्र मुक्त केले पैं
॥१२४॥
कीं वामनरुप असतां सान ॥बळीनें मानिलें तृणासमान ॥परी आपुला प्रताप दाखवून ॥पातालभुवनीं मिरविला
॥१२५॥
कीं अगस्तीचा देह लहान ॥अर्णवें मानिला तृण ॥परी केशव म्हणतां नारायण ॥आचमनातें उरला नसे
॥१२६॥
कीं उदयतरुपोटीं ॥लहान एकादशी गोरटी ॥परी मृदुमान्या न सान दृष्टी ॥पाहतां मृत्य वरियेला
॥१२७॥
तो दशग्रीव राक्षसपाळ ॥तृणतुल्य मानिला अनिलबाळ ॥परी सकळ लंकेचा झाला काळ ॥एकदांचि जाळिली
॥१२८॥
तन्न्यायें आम्हां येथ ॥झालें मानसन्मानरहित ॥तरी आतां यांतें नाथपंथ ॥निजदृष्टीं दाखवावा
॥१२९॥
मग सहजस्थितीसवें ॥स्मशानवटीं गेला राय ॥प्रेतानिकट उभा राहे ॥उभा राहूनि बोलतसे
॥१३०॥
म्हणे ऐका माझें वचन ॥प्रेत करुं नका भस्म ॥श्रीगुरु जालिंदर येथें आणून ॥चंपावती उठवीन की
॥१३१॥
अहा मी येथें समयीं असतां ॥वायां जातसे भगिनी आतां ॥मग व्यर्थ आचरुनि नाथपंथा ॥सार्थक नाहीं मिरविलें
॥१३२॥
कीं पाहा मातुळकुळ ॥आस्तिकें रक्षिलें तपोबळें ॥तेवीं येथें युवती निर्मळ ॥चंपावती उठवीन मी
॥१३३॥
कीं अहिरणी गुंतता हिरा ॥हिरकणी काढी तया सत्वरा ॥तेवीं येथें भगिनी सुंदरा ॥चंपावती उठवीन मी
॥१३४॥
कीं मोहरासवें सुत सगुण ॥कदापि नव्हे भस्म ॥तेवीं येथें सुमधुम ॥चंपावती उठवीन मी
॥१३५॥
ऐसें बोले सकळांकारणें ॥परी अविश्वासी सकळ जन ॥म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण ॥कदा काळी येईना
॥१३६॥
कीं बाळल्या रुखालागी पाला ॥आला ऐसा नाहीं ऐकिला ॥हें तों न घडे कदा बोला ॥धर्मनिष्ठ हा बोलतसे
॥१३७॥
गोपीचंद म्हणे बोलतो सत्य ॥परी मम गुरुचें प्रतापकृत्य ॥वर्णन करितां सरस्वतीतें ॥वाचा अपूर्ण मिरवतसे
॥१३८॥
जेणें कानिफाचे अर्थालागुनी ॥सकळ देव आणिले अवनीं ॥आणिले परी पूर्णपणीं ॥वृक्षालागी गोविलें
॥१३९॥
सध्यां पहा रे मम प्रतापकरणी ॥एकादश वर्षे गर्ती अवनीं ॥अश्वविष्ठेंत राहिला मुनी ॥प्रताप वर्णू केउता
॥१४०॥
तरी धैर्य धरुनि चार दिन ॥करा प्रेताचें संगोपन ॥श्रीजालिंदर येथें आणून ॥उठवीन भगिनीसी
॥१४१॥
परी न ऐकता अविश्वासी ॥शुभा रचिल्या स्मशानमहीसी ॥प्रेत ठेवूनि ते चितेसीं ॥अग्नि लावूं म्हणताती
॥१४२॥
तें पाहूनि गोपीचंद ॥मग आपण चित्तेंत बैसूनि शुद्ध ॥म्हणे अग्नि लावा प्रसिद्ध ॥भस्म करा मजलागीं
॥१४३॥
मी भस्म झालिया पोटीं ॥मग क्रोध न आवरे जालिंदरजेठी ॥नगर पालथें घालूनि शेवटीं ॥तुम्हां भस्म करील कीं
॥१४४॥
ऐसें बोलतां गोपीचंद वचन ॥क्रोधें दाटला तिलकचंद पूर्ण ॥म्हणे गुरुचा प्रताप वर्णून ॥फुगीरपण मिरवतसे
॥१४५॥
तरी आम्हां सांगतोसी ऐसें ॥करुनि दावीं चमत्कारास ॥येरी म्हणे उत्तरासरसें ॥बोलेन तैसें घडेल
॥१४६॥
येरी म्हणे वाम कर ॥काढूनि देतों जाई सत्वर ॥पाहूं दे गुरुचा चमत्कार ॥प्रेत रक्षूं आम्ही हें
॥१४७॥
येरी म्हणे फार फार बरवें ॥चंपावतीचें प्रेत रक्षावें ॥मी हस्त दावूनि गुरुते भाव ॥उपजवीन प्रेमाचा
॥१४८॥
तिलकचंद पुत्रा सांगोनी ॥वाम कर तियेचा दे काढूनी ॥गोपीचंद चितासनींहूनी ॥उठवूनियां बोळविला
॥१४९॥
नाथ गोपीचंद घेऊनि कर ॥पुढें चालिला मार्गावर ॥एक कोस येतां नृपवर ॥काय केलें इकडे
॥१५०॥
चितेमाजी घालूनि प्रेत ॥डावलूनि गेले सकळ आप्त ॥येरीकडे नृपनाथ ॥हेळापट्टणी चालिला
॥१५१॥
मार्गी येतां पांच कोस ॥परी हें कळलें जालिंदरास ॥मनांत म्हणे नव्हे सुरस ॥गोपीचंद आल्यानें
॥१५२॥
पिशुन करितील विचक्षणा ॥नानापरींची होईल वल्गना ॥आणि बाळ पावेल शोकस्थाना ॥आप्तजनांपुढती
॥१५३॥
ऐसा विचार करुनि चित्तीं ॥आपण चालिला कृपामूर्ती ॥प्रयाळअस्त्र मंत्रविभूती ॥चर्चूनियां निजभाळीं
॥१५४॥
तरि ते प्रयाणअस्त्रमंत्र ॥एकचि नैषधराजपुत्र ॥जाणत होता अस्त्र पवित्र ॥येरां माहीत नव्हतेंचि
॥१५५॥
तें अस्त्र जालिंदरापासीं ॥होतें अति उजळपणासीं ॥प्रयाणभस्म लावितां बाळासी ॥वातगती चालिला
॥१५६॥
मग लोटतां एक निमिष ॥धांवोनि आला शतकोश ॥अकस्मात् गोपीचंदास ॥निजदृष्टीनें देखिलें
॥१५७॥
म्हणे वत्सा पुन्हां परतोन ॥किमर्थ केलें आगमन ॥चरणावरी भाळ ठेवोन ॥वृत्तांत सर्व निवेदिला
॥१५८॥
मग तो ऐकोनि वृत्तांत ॥म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा ॥नको करुं कांही चिंता ॥पुनः फीर मागुता
॥१५९॥
अवश्य म्हणोनि दोघे जण ॥मार्गे करिते झाले गमन ॥पौलपट्टणामाजी येवोन ॥राजांगणीं संचरले
॥१६०॥
तंव ते आप्तांसहित मेळा ॥घालूनि बैसले होते पाळा ॥विव्हळ चित्तीं नाना बरळा ॥रुदनशब्दें बोलती
॥१६१॥
तों अकस्मात् देखिले द्वयनाथ ॥महातपी दर्शनयुक्त ॥देखतांचि तिलकचंद यथार्थ ॥धाव पुढें घेतसे
॥१६२॥
परमभक्ती करोनियां नमन ॥त्वरें आणूनि कनकासन ॥त्यावरी बैसवोनि अग्निनंदन ॥पुढें उभा राहिला
॥१६३॥
परी तो नमनादि आदर ॥जैसा शठाचा शृंगार ॥कीं ढिसाळपणीं ओस नगर ॥तेवीं विनयभाव तो
॥१६४॥
कीं अजाकंठींचे लंबस्तन ॥कीं गारोडियाचें शूरत्व पूर्ण ॥कीं वेश्येचें मुखमंडन ॥तेवीं आदर नृपाचा
॥१६५॥
कीं घटामाजी जैसा अर्क ॥कीं हिंबराची सावली शीतळ देख ॥कीं पिशाचबोलणें न सत्यवाक ॥तेवीं दावी विनयभावातें
॥१६६॥
कीं वृंदावनाचें गोमटें फळ ॥कीं अर्कवृक्षी लोंबलें केळ ॥कीं मैंदाचे गळां माळ ॥तेवी विनयभावातें
॥१६७॥
कीं बकाचें दिसे शुद्ध ध्यान ॥परी अंतरी घोकीत वेंचीन मीन ॥कीं तस्कराचें मौनसाधन ॥तेवीं विनयभावातें
॥१६८॥
कीं अर्थसाधक श्रोता पूर्ण ॥परी घातें वेगे घेणार प्राण ॥तयाचें रसाळ भाषण ॥दावी विनयभावातें
॥१६९॥
कीं गोरक्षकाचें ऊर्ध्वगायन ॥तेथें कैंचें पहावें तानमान ॥तेवीं त्या राजाचा सन्मान ॥दावी विनयभावातें
॥१७०॥
कीं उदधीचें द्रोणांत जळ ॥कीं कनकतुल्य पिवळा पितळ ॥कीं विनयाची गोडी बहुरसाळ ॥तेवीं विनयभावातें
॥१७१॥
कीं घररिघेचे सवाष्णपण ॥कीं भोंद्याचें देवतार्चन ॥कीं म्हशाचें गण्या नाम ॥तेवीं विनयभावातें
॥१७२॥
तन्न्यायें तो नृपती ॥तिलकचंद उभा भक्तीं ॥परी भावना सकळ नाथाप्रती ॥कळूनि आली तयाची
॥१७३॥
म्हणे राया चंपावती ॥ज्ञानकळा सगुण युवती ॥ऐसी जाया गृहाप्रती ॥साजेल मातें दिसेना
॥१७४॥
जैसी शिवसाळुंका सुरगणीं ॥परी ती स्थापावी खडकीं नेऊनी ॥तेवीं सत्य या सदनीं ॥चंपावती साजेना
॥१७५॥
गर्दभा काय चंदनलेप ॥मर्कट व्यर्थ गीर्वाण भाष उमोप ॥वायसा जाण कनकपिंजरुप ॥कदाकाळीं घडेना
॥१७६॥
तन्न्यायें चंपावती ॥तुझे गृहीं असे युवती ॥जैसी मैंदगृहा वसती ॥मनहीन मिरवतसे
॥१७७॥
परी आतां असो कैसें ॥काय करावें ब्रह्मतंत्रास ॥मग पाहूनि गोपीचंदवक्त्रास ॥हस्त देई म्हणतसे
॥१७८॥
मग हस्त काढूनि दृष्टी ॥देता झाला करसंपुटी ॥शव जाणूनि पोटीं ॥उच्चार न करी रायातें
॥१७९॥
मग कवळूनि भस्मचिमुटी ॥मंत्रप्रयोग बोले होटीं ॥सकळ संजीवनीची राहटी ॥प्रोक्षीतसे भुजातें
॥१८०॥
भस्म भुजेसी होतां सिंचन ॥हांक मारीत तयेकारण ॥हांकेसरशी त्वरें उठोन ॥चरणीं माथा ठेवीतसे
॥१८१॥
अहा जाज्वल्य संजीवनी ॥क्षणांत उठली राजपत्नी ॥जैसा शुक्रें कच मुखांतूनी ॥दोन वेळां उठविला
॥१८२॥
तोचि न्याय येथें झाला ॥सकळांलागीं भाव ठसला ॥अहा जालिंदरनाथ भला ॥पूर्ण ब्रह्म म्हणवूनी
॥१८३॥
मग लागवेगें सकळ उठूनी ॥श्रीनाथाच्या लोटले चरणीं ॥म्हणती अपार केली करणी ॥शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा
॥१८४॥
मग समस्त म्हणती फार अपूर्व ॥कौतुक दावी गोपीचंदराव ॥धनसंपत्तीतें काय करावें ॥टाकूनि जावें सर्वस्वी
॥१८५॥
मग सर्व जग बोले राया भलें ॥पश्चात्तापें पूर्ण तापलें ॥परी तें स्मशानवैराग्य ठेलें ॥पुन्हां जैसें तैसेंचि
॥१८६॥
कीं करी आव्हानिला अति निर्मळ ॥परि सर्वेंचि गंधमोरी लोळे ॥उकिरड्यांत उतावेळ ॥विष्ठाभक्षण आवडतसे
॥१८७॥
तन्न्यायें सर्व लोक ॥बोलती पश्चात्तापें दोदिक ॥परी त्यांचा सुटे न भोगितां नरक ॥प्रारब्धयोग तयांचा
॥१८८॥
असो ऐसी प्रारब्धकरणी ॥श्रीजालिंदर जाय उठवूनि ॥मग उठता झाला कनकासनीं ॥हेळापट्टणीं जावया
॥१८९॥
मग तो तिलकचंद नृपती ॥अभिमान दवडूनि झाला गलती ॥सलीलपणीं पदावरती ॥मस्तक ठेवी सप्रेम
॥१९०॥
म्हणे महाराजा मी पतित ॥राजवैभवें झालों उन्मत्त ॥लघु मानिला गोपीचंदनाथ ॥तरी क्षमेंतें वरीं आतां
॥१९१॥
तुम्ही दयाळू कनवाळू संत ॥मायेडूनि मायावंत ॥तरी बाळाचे अन्याय यथार्थ ॥उदरामाजी सांठवा
॥१९२॥
ऐसें बोलूनि नम्रोत्तर ॥चरणीं मौळी वारंवार ॥ठेवूनि म्हणे आजची रात्र ॥वस्ती करा या ठायीं
॥१९३॥
ऐसें ऐकूनि तयाचें वचन ॥बोलता झाला अग्निनंदन ॥चंपावतांचे हस्तकरुन ॥पाकनिष्पत्ती करीं कां
॥१९४॥
अवश्य म्हणूनि तिलकचंद ॥चंपावतीसी सांगे सदगद ॥तीतें सांगूनि पाक प्रसिद्ध ॥करविला नेटका
॥१९५॥
मग चंपावती भ्रतारासहित ॥बैसविली स्वपंक्तींत ॥आपुला अनुग्रह देऊनि तीतें ॥नाथपंथीं मिरविली
॥१९६॥
आपुलें मुखींचा उच्छिष्ट ग्रास ॥संजीवनीप्रयोगप्रसादास ॥देऊनि केलें अमरपणास ॥मैनावतांपरी सिंचिली
॥१९७॥
ऐसे रीतीं सारुनि भोजन ॥विडे घेतले त्रयोदशगुण ॥राया तिलकचंदा भाषण ॥करिता झाला मुनिराज
॥१९८॥
म्हणे ऐक बा सर्वज्ञराशी ॥गोपीचंद जातो पूर्ण तपासी ॥तरी सांभाळीं याचे राज्यपदासी ॥बाळ अज्ञान असे याचें
॥१९९॥
तुझा प्रताप महीतें संपूर्ण ॥शत्रु न येती तेणेंकरुन ॥मीही येथें षण्मास राहुन ॥सर्व अर्थ पुरवीन कीं
॥२००॥
परी राया षण्मासांसाठीं ॥मीही जाईन तीर्थलोटीं ॥परी मुक्तचंद पडतां संकटीं ॥धांव घालीं तूं येथें
॥२०१॥
ऐसें बोलतां अग्निसुत ॥अवश्य बोले तो नृपनाथ ॥यावरी राहुनि एक रात्र ॥निघते झाले उभयतां
॥२०२॥
करोनि जालिंदरा नमन ॥गोपीचंद करिता झाला गमन ॥जालिंदरही मार्ग धरोन ॥हेळापट्टणी चालिला
॥२०३॥
तिलकचंद नृपनाथा ॥बोळवोनि आला स्वगृहांत ॥येरीकडे मैनावतीसुत ॥मुक्काम मुक्काम साधीतसे
॥२०४॥
ऐसिया राहणीं मार्ग क्रमोनी ॥राव गेला बद्रिकाश्रमीं ॥बद्रिकेदार भावें नमोनी ॥तपालागीं बैसला
॥२०५॥
लोहकंटकीं पादांगुष्ठ ॥ठेवोनि तप करी वरिष्ठ ॥येरीकडे जालिंदर वाटे ॥येवोनियां पाहोंचला
॥२०६॥
तेथें राहूनि षण्मास प्रीतीं ॥मुक्तचंद उपदेशोनि अर्थाअर्थी ॥कानिफासह शिष्यकटकाप्रती ॥घेवोनियां चालिला
॥२०७॥
नाना तीर्थे करी भ्रमण ॥द्वादश वर्षे गेलीं लोटोन ॥शेवटीं बद्रिकाश्रम पाहोन ॥गोपीचंद भेटला
॥२०८॥
मग तैं तपाचा उचित अर्थ ॥उद्यापना देव समस्त ॥पाचारोनि स्वर्गस्थ ॥गौरविले आदरानें
॥२०९॥
महाविष्णु महेश सविता ॥अश्विनी वरुण अमरनाथा ॥भेटवोनि समस्त दैवतां ॥सनाथपणीं मिरवला
॥२१०॥
सकळ विद्येचा समारंभभार ॥अभ्यासविला तो नृपवर ॥पुन्हां दैवतां आणोनि सत्वर ॥वरालागीं ओपिलें
॥२११॥
असो येथोनि गोपीचंदाख्यान ॥संपलें पुढें करा श्रवण ॥श्रीगोरक्ष स्त्रीराज्याकारणें ॥जाईल गुरु आणावया
॥२१२॥
तरी आतां अत्यदभुत ॥श्रोत्यां सांगेल धुंडीसुत ॥मालू ऐसें नाम ज्यातें ॥नरहरिवंशीं मिरवलें
॥२१३॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥अष्टादशाध्याय गोड हा
॥२१४॥
नवनाथभक्तिसार अष्टादशाध्याय समाप्त ॥