श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय १३
जालिंदरनाथ व मैनावतीची भेट, मैनावतीस उपदेश. १७६ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जयजयाजी त्रिभुवनेशा ॥मच्छकच्छवराहनरसिंहवामनवेषा ॥भार्गव राघव द्वारकाधीशा ॥पूर्णब्रह्मा सर्वज्ञा
॥१॥
हे गुणातीता सकळगुणज्ञा ॥अव्यक्तव्यक्ता सर्वज्ञा ॥पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा ॥बौद्ध कलंकी आदिमूतें
॥२॥
मागिले अध्यायीं केलें कथन ॥श्रीजालिंदरा होऊनि जन्म ॥तप आचारोनि अत्रिनंदन ॥संपादिला गुरुत्वीं
॥३॥
तो समर्थ अत्रिसुत ॥प्रसन्न झाला सद्विद्येंत ॥तयावरुतें सकळ दैवत ॥गौरविलें पावकें
॥४॥
स्कंधीं वाहूनि द्विमूर्धनी ॥पृथक् दैवतें स्थानीं स्थानीं ॥सत्य लोकांदि अमरा पाहूनी ॥वैकुंठादि पाहिलें
॥५॥
पाहिलें इंद्र चंद्रस्थान ॥मित्र वरुण गंधर्वा भेटून ॥सुवर्लोक भुवलोंक तपोलोकादि पाहून ॥वरालागीं आणिलें
॥६॥
यक्ष राक्षस किन्नरांसहित ॥गणगंधर्वादि गौरवूनि समस्त ॥वश केला जालिंदरनाथ ॥अस्त्रविद्येकारणें
॥७॥
याउपरी कानिफा कर्णोदय ॥होऊनि शक्ती ॥प्रसन्न केलें वराप्रती ॥उपरी गेले स्वस्थाना निगुती ॥आश्रम बद्रिका सांडूनि
॥९॥
परी उमावर आणि रमावर ॥कानिफा आणि जालिंदर ॥बद्रिकाश्रमीं राहूनि स्थिर ॥करिती विचार तो कैसा
॥१०॥
एकमेकां बोलती हांसून ॥आठवूनि देवतांचें विमुंडमुंडन ॥प्रसन्न झाले विटंबून ॥बुद्धिहीन हे कैसे
॥११॥
परी धन्य जालिंदर मिळाला यांसी ॥अवस्था दारुण महांसी ॥पूर्वी भिडले अपार राक्षसांसी ॥परी ऐसा मिळाला नाहीं त्यां
॥१२॥
उफराटे नग्नदेही ॥अधो पाहत होते मही ॥ऐसे उचित कदा देही ॥मिळाले नाहीं तयांसी
॥१३॥
ऐसें बोलोनि उत्तरोत्तर ॥हास्य करिती वारंवार ॥मेळवूनि करास कर ॥टाळी पिटिती विनोदें
॥१४॥
असो ऐसी विनोदशक्ती ॥यावरी बोले उमापती ॥हे महाराजा जालिंदरा जती ॥चित्त दे या वचनातें
॥१५॥
नागपत्रअश्वत्थस्थानीं ॥पूर्ण यज्ञआहुती करोनी ॥प्रथम कवित्वा रचोनि ॥वरालागीं साधावें
॥१६॥
वेदविद्या मंत्र बहुत ॥अस्त्रिविद्या प्रतापवंत ॥परी ते महीवरी पुढें कलींत ॥चालणार नाहीं महाराजा
॥१७॥
मग मंत्रशक्ती उपायतरणी ॥कांहींच न मिळे लोकांलागुनी ॥मग ते दुःखप्रवाहशमनीं ॥सकळ लोक पडतील
॥१८॥
तरी सिद्ध करुनि आतां कविता ॥आवंतिजे नागाश्वत्था ॥सकल विद्या करुनि हाता ॥कानिफातें ओपिजे
॥१९॥
या कानिफाची उदार शक्तिस्थिती ॥मिरवत आहे दांभिकवृत्ती ॥तरी बरवी आहे कार्याप्रती ॥पुढें पडेल महाराजा
॥२०॥
हा अपार शिष्य करील पुढती ॥विद्या वरितील याच्या हातीं ॥मग ती प्रतिष्ठा लोकांपरती ॥सर्व जगीं मिरवेल
॥२१॥
पूर्वी सांबरी ऋषीनें मार्ग ॥काढिला आहे शुभयोग ॥परी थोडकी विद्या चांग ॥महीलागीं पुरेना
॥२२॥
तरी शतकोटी सांबरीगणा ॥महीतें मिरवावें शुभवचना ॥सकळास्त्रांची आणूनि भावना ॥महीलागी मिरवावी
॥२३॥
तरी या कवितेची वांटणी ॥मिरवावी नवनाथलागुनी ॥कोणती कैसी गतीलागुनी ॥सांगतों मात ते ऐका
॥२४॥
पूर्वी मच्छिंद्रानें धरुनि लक्ष ॥काव्य केलें आहे प्रत्यक्ष ॥तेहतीस कोटी पंचाण्णव लक्ष ॥मंत्रविद्युल्लता मिरविल्या
॥२५॥
यापरी गोरक्षगोष्टी होटीं ॥मिरवेल नव लक्ष बारा कोटी ॥पंच कोटी एक लक्ष शेवटीं ॥मीननाथ मिरवेल
॥२६॥
नव कोटी सात लक्ष ॥चर्पटनाथ करील कीं प्रत्यक्ष ॥सात कोटी चार लक्ष ॥भरतरीनाथ करील कीं
॥२७॥
तीन लक्ष दोन कोटी ॥रेवणनाथ करील शेवटीं ॥एक लक्ष एक कोटी ॥वटसिद्धनाथ करील कीं
॥२८॥
चौतीस कोटी बारा लक्ष ॥श्रीजालिंदरानें करावें प्रत्यक्ष ॥सहा कोटी आठ लक्ष ॥कानिफानें मिरवावें
॥२९॥
अशुभप्रयोग गोरक्षरहाटी ॥स्थापूनि योजावे शतकोटी ॥पुढें लोकां साधनजेठी ॥होणार नाहीं महाराजा
॥३०॥
म्हणूनि ऐसें योजूनि साधन ॥मंत्रप्रयोगीं करावें प्रवीण ॥तें न करितां सकळ जन ॥सुख होईल रोगांतें
॥३१॥
तरी हे जनउपकारासाठीं ॥जीवा करावी आटाआटी ॥तुम्हातें सागावी ऐसी गोष्टी ॥नोहे सर्वज्ञ आम्हांते
॥३२॥
ही कलीची विद्या कलिसंधान ॥मिरवित आहे पूर्वीपासून ॥तुम्ही नवनाथ अवतार घेऊन ॥विद्या वर्तवीत असतां कीं
॥३३॥
तुम्ही जाणणार भविष्योत्तर जाणोनि नाथा ॥तूं देवासीं केली वार्ता ॥कानिफातें वर देतां ॥बोलिलासी हिता महाराजा
॥३५॥
तरी आतां आळस सांडूनि ॥जेवी मिरवावें कवित्वरत्न ॥जारण मारण उच्चाटन ॥कवित्वरचनीं मिरवावें
॥३६॥
ऐसें सांगूनि उमानाथ ॥कानिफाविषयीं आणिक सांगत ॥यासी बैसवूनि पूर्ण तपास ॥समर्थपणें मिरवीं कां
॥३७॥
ऐसें सांगता उमावर ॥अवश्य म्हणे जालिंदर ॥मग वर देऊनि रमावर ॥जाता झाला वैकुंठीं
॥३८॥
मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥द्वादश वर्षे राहूनि तेथ ॥चाळीस कोटी वीस लक्षांत ॥उभें चरित्र रचियेलें
॥३९॥
तें आदिनाथें कवित्व पाहोन ॥पूर्ण झालें समाधान ॥मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन ॥सिद्धीमार्गी पावावें
॥४०॥
मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥जाऊनि पाहिला नागाश्वत्थ ॥पूर्ण आहुती हवन तेथ ॥करुनि तोषवी वीरांतें
॥४१॥
सूर्यकुंडाचें आणुनि जीवन ॥बावन्न वीरा करी सिंचन ॥प्रसन्न करुनि त्यांचें मन ॥वरालागी घेतलें
॥४२॥
यापरी पुनः परतून ॥पाहते झाले बद्रिकाश्रम ॥मग कानिफांते तपा बैसवून ॥लोहकंटकी मिरविला
॥४३॥
श्रीआदिनाथाच्या साक्षीसी ॥कानिफा बैसवून पूर्ण तपासी ॥श्रीजालिंदर तीर्थस्थानासी ॥जाता झाला पुसून
॥४४॥
त्याचि ठायीं बद्रिकाश्रमांत ॥कानिफा आणि श्रीकृष्णनाथ ॥तप करिती भागीरथीतीरांत ॥तीव्र काननी बैसूनियां
॥४५॥
उभय ठाव असे विभक्त ॥एकमेका नसे माहीत ॥असो येरीकडे जालिंदरनाथ ॥नानाक्षेत्रीं हिंडतसे
॥४६॥
परी क्षेत्रीं जातांचि आधीं काननीं ॥भारा बांधिला तृण कापूनी ॥निजमौळी त्वरें वाहुनी ॥क्षेत्रामाजी संचरे
॥४७॥
परी तो मौळी भारा घेतां ॥सुख न वाटे अनिळचित्ता ॥मग संचरोनि भयहतां ॥वरच्यावरी धरीतसे
॥४८॥
म्हणाल पवनासी काय कारण ॥वरचेवरी धरावया तृण ॥तरी जालिंदर अग्निनंदन ॥अग्निपिता तो असे
॥४९॥
परी पौत्राची करुनी ममता ॥म्हणूनि भारा धरी वरुता ॥असो जालिंदर क्षेत्रीं येतां ॥तृण गोधना सोडीतसे
॥५०॥
ऐसें भ्रमण करितां महीं ॥नानातीर्थक्षेत्रयात्राप्रवाहीं ॥तो गौडबंगाल देशाठायीं ॥हेलपट्टणीं पैं आला
॥५१॥
तृणभार मिरवोनि माथीं ॥परी तो मिरवे सर्वांहातीं ॥अधर चाले मस्तकावरती ॥लोक पाहती निजदृष्टी
॥५२॥
हेलापट्टण अति विस्तीर्ण ॥बुद्धिप्रयुक्त तेथील जन ॥जालिंदराचें चिन्ह पाहून ॥आश्वर्य करिती मानसीं
॥५३॥
म्हणती अधर भारा कैसा ॥चालती हा न कळे तमाशा ॥तरी हा सिद्ध अवतारलेशा ॥महीलागीं मिरवीतसे
॥५४॥
मग ते चव्हाट्याचे जन ॥करुं धांवती तैं दर्शन ॥परी तें नाथा समाधान ॥चित्तीं प्रशस्त लागेना
॥५५॥
जे पूर्णपणें झाले निवाले ॥ते प्रतिष्ठेपासूनि दुरावले ॥कदा न जातां जगीं मानवले ॥चित्तीं निःस्पृहता धरुनियां
॥५६॥
बृहस्पतीचे पडिपाडी ॥तया होतसे सर्वार्थजोडी ॥परी तों वेडियांत मारी दडी ॥लोकमहिमाभयास्तव
॥५७॥
जैसें कृपण आपुले धन ॥रक्षी महीचे पाठीलागून ॥तन्न्याय झालिया मन ॥कदाकाळीं आवरेना
॥५८॥
असो मग जालिंदरनाथ ॥अति तोषें तृणभार जमवूनि आणीत ॥पाहुनि गोधनाची अमात ॥तृण सोडी तयांसी
॥५९॥
मग गल्लीकुची गंधमोरी ॥तेथें जाऊनि वस्ती करी ॥भिक्षा मागूनि क्षेत्राभीतरी ॥उदरनिर्वाह करीतसे
॥६०॥
यापरी वर्ततां त्या गांवीचा नृप ॥त्रिलोकचनसुत जैसा कंदर्प ॥तयाचें वर्णिता स्वरुप ॥सरस्वतीसी न सुचे हो
॥६१॥
नाम जयाचें गोपीचंद ॥वरी मिरवला सर्व संपत्तिवृंद ॥दिव्य अमूप अमरभद्र ॥पाहूनि लाजे कुबेर तो
॥६२॥
द्वादश लक्ष अपूर्वशक्ती ॥अश्व मिरवले वाताकृति ॥तेजःपुंज पाहूनि लाजती ॥चपळपणी चपळा त्या
॥६३॥
चीरतगटीं रत्नकोंदणीं ॥पाखरा शोभल्या बालार्ककिरणीं ॥झगमगती झालरी किरणीं ॥हेमगुणीं मिरवल्या
॥६४॥
रश्मी अति शोभायमान ॥झालरी अग्निहेमगुण ॥मुक्त गुंफिले समत्वीं समान ॥नक्षत्रमालिका जेवीं त्या
॥६५॥
हेमतगटी रत्नकोंदणीं ॥ग्रीव मिरवल्या माळा भूषणीं ॥संगीत पेट्या नवरंगरत्नी ॥दीप जैसे लाविले
॥६६॥
मुख शोभलें त्याचिपरी ॥दिव्य मिरवल्या सरोवरीं ॥चातकपिच्छ कर्णद्वयाभीतरीं ॥तुरे खोविले मौळीतें
॥६७॥
आणि पुष्पपृष्ठीं रत्नजडित ॥गेंदा जोडिया तेजभरित ॥चारजामे लखलखीत ॥चपळेहूनि अधिक्ल ते
॥६८॥
द्वादश लक्ष ऐसियेपरी ॥बाजी मिरवती चमूभीतरी ॥प्रत्येक पाहतां संमतसरी ॥उदधिसुत मिरविले
॥६९॥
कीं अर्कहदयी स्पृहा होती ॥मातें लाभली श्यामकर्ण मूर्ती ॥त्या स्पृहेची करावया शांती ॥द्वादश लक्ष प्रगटले
॥७०॥
त्याचिपरी गजसमूह मत ॥पाहूनि लाजे ऐरावत ॥चित्तीं म्हणे क्षोभूनि सर्वत्र ॥रत्नें उपजलीं महीवरी
॥७१॥
विशाळ शुंडा हिरेजाती ॥अधरें द्वैतदंत शोभती ॥तयां वेष्टूनि चुडे पाहती ॥रत्नकोंदणीं मिरविले
॥७२॥
ग्रीवे घंटिका हेमगुणीं ॥तयामाजीं रत्नपाणी ॥हिरे माणिक पाचतरणी ॥नवरंगी शोभले
॥७३॥
यापरी हौदे मेघडंबरी ॥सुवर्ण अंबार्याा शोभल्या वरी ॥त्याहीं कोंदणीं नक्षत्रापरी ॥रत्न मिरवूं लाहिले
॥७५॥
कोणी रिक्त कोणी ऐसे ॥परी ते भासती पर्वत जैसे ॥पृष्ठीं पताका पहा भासे ॥पर्वतमौळी तरु जेवीं
॥७६॥
जैसे गजपृधूतें मिश्र ॥विराजलेती दशसहस्त्र ॥पाईक स्वार दासचक्र ॥रायापुढें धांवती
॥७७॥
छडीदार चोपदार ॥पूर्ण बोथाटे पुकारदार ॥यंत्रधारी अश्वस्वार ॥रायासमोर धांवती
॥७८॥
अति उग्र खडतरणी ॥मिरवल्या जैशा कृतांतमूर्ति ॥की युद्धकुंडींचें पावक होती ॥घेती आरती परचक्र
॥७९॥
यापरी राव तो कृपाळ ॥शोभे जैसा तमालनीळ ॥बरवेपणीं अतिझळाळ ॥कंदर्पपंथी मिरवतसे
॥८०॥
स्वरुपलक्षणी गोपीचंद ॥समता न पावे आणिक गौडवृंद ॥चंद्रचूडमण्यालागीं अबाध ॥कलंक देहीं म्हणोनी
॥८१॥
अर्क दृष्टांता संमत देखा ॥तरी तोही तीव्र दाहकपंथा ॥चपला तेजापरी भ्याडा चित्ता ॥मेघामाजी दडताती
॥८२॥
तैसा नव्हे हा नृपनाथ ॥दिव्यरुपी सदगुणभरित ॥धर्म औदार्य सभाग्यवंत ॥विजयलक्ष्मी मिरवीतसे
॥८३॥
म्हणाल प्रताप नसेल व्यक्त ॥तरी कृतांताचे आसन पाळीत ॥धाकें परचक्र आणूनि देत ॥कारभारातें न सांगतां
॥८४॥
यापरी वर्णितां शरीरपुष्टी ॥तरी म्हणवीतसे महीतें जेठी ॥शतजेठी महीपुटी ॥लावूनियां रगडीतसे
॥८५॥
यापरी आणिक कल्पाल चित्तीं ॥कीं इतुकी स्थावर झाली शक्ती ॥तरी भोगीत नसेल कामरती ॥विषयीं आसक्त नसेल तो
॥८६॥
तरी धर्मपत्नी शुभाननी ॥असती नक्षत्रतेजप्रकरणीं ॥खंजरीटमृगपंकजनयनी ॥चंद्राकृती मिरवल्या
॥८७॥
चित्तज्ञ परम चातुर्यखाणी ॥यापरी षोडशशत शुभाननी ॥भोगांनना जयालागुनी ॥राजांकीं मिरवल्या
॥८८॥
परी ते पाहतां स्वरुपखाणी ॥कीं कामचि सांडावा ओवाळुनि ॥कीं उर्वशीच्या पंक्ती आणुनी ॥दासी मिरवती तिला त्या
॥८९॥
गजगामिनी चपला अबळा ॥तेजें लाजविती पाहूनि चपळा ॥शृंगारभरित असती सकळा ॥चंद्र रात्री नक्षत्री
॥९०॥
असो ऐसा नृपनाथ ॥हेलापट्टणी विराजित ॥जयाची माता सदगुणभरित ॥मैनावती विराजली
॥९१॥
तंव ती सती मैनावती ॥कोणी एके दिवशीं उपरीवरती ॥दिशा न्याहाळी सहजस्थिती ॥जालिंदरातें देखिलें
॥९२॥
तृणभार अधर मौळी ॥मुक्त विराजला हस्तकमळीं ॥पथिकासमान ग्राममेळीं ॥मार्गी - येतसे पुढारां
॥९३॥
परी तेजःपुंज जैसा तरणी ॥मदनाकृति स्वरुपखाणी ॥निःस्पृह निवृत्त योगींद्र मुनी ॥देखियला तियेनें
॥९४॥
मग म्हणे मैनावती ॥अधर भारा मौळीवरती ॥कैसा चाले धैर्यशक्ती ॥काय असे तयातें
॥९५॥
नोंहे आधार करबंधन ॥तेही मिरवती मुक्तमन ॥तरी हा कोणी प्रतापवान ॥महीलागीं उतरला
॥९६॥
गण किंवा गंधर्व सुरवर ॥विरिंची किंवा गंधर्व हरिहर ॥कीं वाचस्पती उशना थोर ॥प्रतापवान हा असे
॥९७॥
परी सुदृढ आराधोनि भक्तीं ॥मिरवूं नरदेहसार्थकगती ॥प्रसन्न करुनि चित्तभगवती ॥अचळपद वरावें
॥९८॥
ऐसा विचार करुनि मनीं ॥परिचारिके पाचारुनी ॥तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी ॥जगामाजी मिरवीतसे
॥९९॥
मन्सुख उभी करसंपुटीं जोडूनि बोले वागवटी ॥कवण अर्थ उदेला पोटीं ॥निवेदावा महाराज्ञी
॥१००॥
येरी म्हणे वो गजगामिनी ॥अर्थ उदेला माझे मनीं ॥परी प्राणजीवित्व रक्षूनी ॥कार्य आपुलें साधावें
॥१०१॥
प्रगट होता ती वार्ता ॥परम पडेल क्षोभ चित्ता ॥मग त्या उदकप्रवाही वाहतां ॥परम संकट मिरवेल
॥१०२॥
म्हणोनि गौप्य धरोनि वचन ॥कार्यमांदुसा सोडिजे संधान ॥मग तें वर्णितां सभाग्यपण ॥अंबर ठेंगणें वाटतसे
॥१०३॥
म्हणोनि तिनें उभवूनि तर्जनि ॥खुणें दाविलें तिजलागुनी ॥कोण येत प्रविष्टतरणी ॥मौळीं तृण वाहोनियां
॥१०४॥
तंव ती खूण परिचारिका ॥पाहती झाली जालंदर विवेका ॥तों मौळीं भारा अधर दिखा ॥सवें सवें चालतसे
॥१०५॥
तें पाहूनियां निजदृष्टीं ॥विस्मय करी आपुले पोटीं ॥म्हणे माय वो परम धूर्जटी ॥योगासिद्ध असे हा
॥१०६॥
कनकवर्ण बालार्ककिरणीं ॥महीं मिरवितसे योगप्राज्ञी ॥तरी हा स्वर्भूवर्लोकप्राणी ॥सहसा येत असे जननीये
॥१०७॥
सत्यलोक भृलोक तपोलोक ॥तयाचे गमनें शोभती देख ॥स्मरारि कीं स्मरजनक ॥महींलागीं उतरला
॥१०८॥
तरी माय वो ऐक वचन ॥सलीलभक्तीं आराधून ॥तैं चित्तभगवती प्रसन्न करुन ॥कल्याणदरीं रिघावें
॥१०९॥
जैसें ध्रुवानें अढळपद ॥जिंकूनि हरिला सकळ भेद ॥जन्ममृत्यूंचे दृढ बंध ॥मुक्त केले जननीये
॥११०॥
तन्न्याय दास दासी ॥ओपूनि ऐशा शत पुरुषांसी ॥चिरंजीव प्रसाद ओपूनि देहासी ॥अचळ महीतें वर्तावें
॥१११॥
ऐसी परिचारिकेची युक्ती ॥ऐकूनि बोले मैनावती ॥म्हणे माय वो तरुनि आर्ती ॥चित्तस्वरुप करावें
॥११२॥
तरी येवढा प्राज्ञीक ज्ञानी ॥वस्तीस राहतो कोणे स्थानीं ॥तितुकें गुज गोचर करुनी ॥लगबगें येईं कां
॥११३॥
अवश्य म्हणोनि परिचारिका ॥जाती झाली सदैविका ॥तंव तो संचारुनि ग्रामलोका ॥गोधनातें पाहतसे
॥११४॥
तंव तीं गोधनें ग्रामवाटीं ॥अपार जात असती चव्हाटीं ॥तृण सोडूनि ते थाटी ॥सुपंथीं तेथ गमतसे
॥११५॥
तंव ती दासी मागे मागे ॥जात असे लगबगें ॥मग गंधगल्लीं कुश्चलयोगें ॥जाऊनियां बैसला
॥११६॥
तेथें क्षण एक उभी राहून ॥पहात त्याचें अचळपण ॥सूर्य पावें तों अस्तमान ॥अचळस्थान रक्षिलें
॥११७॥
मग ती येऊनि वाताकृती ॥पूर्ण झाली सांगती ॥अमुक स्थानीं चित्तभगवती ॥प्रसन्नचित्तीं स्थिरावे
॥११८॥
कुश्वित जागा दुर्गधव्यक्त ॥माये वो असे सर्व एकांत ॥तया स्थानीं पिशाचवत ॥वस्तीलागीं ठिकाण
॥११९॥
जेथे न राहे श्वानसूकर ॥कर्दम कुवेग कुवेग गंध अपार ॥वस्ती विराजून पिशाचसर ॥वल्गना ते वदतसे
॥१२०॥
ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥म्हणे स्थिर वो शुभाननी ॥रहित होतां जनसंबोध यामिनी ॥मग जाऊं दर्शना
॥१२१॥
अवश्य म्हणोनि परिचारिका ॥मग मध्ययामिनीं सद्विवेका ॥उत्तम फळ ठेऊनि तबकां ॥षड्रसानें मिरविलें
॥१२२॥
काळीं कांबळी गुंतूनि बुंथी ॥परिचारिका मैनावती ॥येत्या जाहल्या स्थान एकांतीं ॥लक्षोनियां महाराजा
॥१२३॥
तंव तो सिद्धरायमुनी ॥परमहंसाच्या आव्हानूनि वहनीं ॥मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानीं ॥बैसलासे महाराजा
॥१२४॥
मग त्या उभय सहित युवती ॥जाऊनि लोटल्या पदावरती ॥मूर्ध्नीकमळ प्रेमभरती ॥पदकमळीं ओपिती
॥१२५॥
सन्मुख जोडूनि उभय कर ॥सप्रेम भक्ती वागुच्चार ॥चातुर्यगंध म्लान अपार ॥समर्पिली लाखोली
॥१२६॥
म्हणसी महाराजा सर्वज्ञराशी ॥त्रिविधताप उभय उद्देशी ॥ते तूं दाहिले जीवित्वासीं ॥मोक्षमांदुसा जाणूनियां
॥१२७॥
तरी ऐशिया तपोदरीं ॥समयजलदा लक्षूनि अंतरीं ॥कल्पनासदनाचा पेटला भारी ॥विझवावया पातलों
॥१२८॥
तरी औदार्याचें पाहूनि मुख ॥त्रिविधतापांचा सबळ पावक ॥विझवूनि चित्तमहीतें पिक ॥ब्रह्मकर्णी पिकावें
॥१२९॥
ऐसें तयाचें वागुत्तर ॥प्रविष्ट होतां निशिकर ॥तेणेंकरुनि चित्तसागर ॥आनंदलहरीं दाटला
॥१३०॥
दाटला परी संकोचित ॥चंद्र आकाशीं उदधि महींत ॥तरी भक्तिपंथिका चक्रवात ॥अस्ताचळीं योजावा
॥१३१॥
ऐसें चित्त योजूनि नाथा ॥दाविता झाला तीव्रवार्ता ॥मैनावतीचे सफळ चित्ता ॥किंवा कसोटीं पाहतसे
॥१३२॥
पिशाच चेष्टा उद्दामनीती ॥आव्हानूनि सदृढयुक्तीं ॥महीचे पाषाण हातीं ॥कवळोनिया झुगारी
॥१३३॥
अशुभवाणीं करुनि वल्गना ॥भंगूं पाहे चित्तप्रेमा ॥मेघऔदार्याच्या दुर्गुणा ॥पाषाणकारका ओसांडी
॥१३४॥
परी ते जाया धैर्यवंत ॥निश्वयअर्गळी योजूनि सदृढ चित्त ॥म्हणें याचे हस्तें मृत्य ॥आल्या मोक्ष वरीन मी
॥१३५॥
ऐसें योजूनि सदृढ मांडी ॥बैसली ठाव कदा न सांडी ॥जैसा पर्वत अचळ विभांडी ॥मेघधारा न गणोनि
॥१३६॥
परी तो नाथ जालिंदर ॥ओसंडितां पाषाणपूर ॥परी ती रामा वज्राकार ॥अचळ पाहूनि तोषला
॥१३७॥
मग हस्तें झाडूनि पाषाणद्याडी ॥म्हणे कोण तूं सांग गोरटी ॥किमर्थ आजि माझिये पृष्ठीं ॥लागपाळती केली त्वां
॥१३८॥
दुर्गंधी गल्ली ओंगळींत ॥आहे उगलाचि मी पिशाच येथ ॥तरी तुज पेटला किमर्थ अर्थ ॥कामानळें दाटला
॥१३९॥
कवण कोणाची नितंबिनी ॥वेगीं वद वो शुभाननी ॥आम्ही तपी अलक्ष ध्यानी ॥लक्ष मंगाया कां आलीस
॥१४०॥
यावरी म्हणे ती महाराजा ॥त्रिलोचनराज विजयध्वजा ॥तयाची कांता सर्वज्ञभोजा ॥धर्मपत्नी मी असें
॥१४१॥
असे परी जी योगद्रुमा ॥काळें भक्षूनि पतिउत्तमा ॥मातें केलें प्लवंगमा ॥जगामाजी मिरवावया
॥१४२॥
ऐसेपरी योगजेठी ॥काळचक्र पाहूनि राहटी ॥मग भयार्कउदक पाहूनि पोटीं ॥पश्वात्तापी मिरविलें
॥१४३॥
काळें पतीची केली गती ॥तैसीच करील मम आहुती ॥तरी मानवसन्निपातीं ॥आरुक मातें होई कां
॥१४४॥
येरि म्हणे त्वदभर्ता ॥पावोनि लया त्वरिता ॥कवण आश्रमीं काळचरिता ॥लोटसी तूं जननीये
॥१४५॥
येरी म्हणे वो सदैवभरिता ॥सुत एक आहे प्रपंच ॥येरु म्हणे कवण अर्था ॥प्रपंचराहटी चालवी
॥१४६॥
तंव ती म्हणे गौडबंगाल ॥राज्यसदनीं देश विपुल ॥तयाचा नृप गोपीचंद मूल ॥दास तुमचा विराजे
॥१४७॥
परी असो कर्मराहटी ॥कृतांतउद्देशाचे पाठीं ॥मम मौळींचा भार निवटीं ॥कृपा झणीं करुनियां
॥१४८॥
ऐसें ऐकूनि तियेचें वचन ॥म्हणे कृतांतपाश दृढबंधन ॥कैसें तुटे गे मग पिशाचान ॥तुवां काय जाणितलें
॥१४९॥
तरी आतां क्षण उभी न राहीं ॥वेगीं आपुल्या सदना जाई ॥तव सुता कळतां अनर्थप्रवाहीं ॥मति त्याची मिरवेल
॥१५०॥
ऐसें बोलतां सागोंपांग ॥तों मित्रउदयाचा पाहिला मार्ग ॥मग नमस्कारुनि स्वामी सवेग ॥सदनाप्रती पातली
॥१५१॥
पातली परी अर्थवियोग ॥चित्तसरितीं दाटला भाग ॥अति तळमळे प्रसादमार्ग ॥कृपार्णवीं भेटावया
॥१५२॥
ऐसी तळमळे दुःखव्यथा ॥तों दिनकर लोटला अस्ता ॥होतां चंद्रविकास ती वनिता ॥विकासली आनंदें
॥१५३॥
पुन्हां घेऊनि परिचारिका ॥तेथें आली सदयविवेका ॥दृष्टीं पाहूनि योगिमृगांका ॥चरणीं माथां ठेवीतसे
॥१५४॥
मग सलगभक्तीची करुनि दाटी ॥सदृढ चरणीं घातली मिठी ॥पद कवळोनि हस्तपुटीं ॥पद चुरीत प्रेमानें
॥१५५॥
ऐशी सेवा दोन प्रहर ॥करितां अगम्यलीला प्रभाकर ॥तें पाहूनि नमस्कार ॥स्वामीसी करुणा उठतसे
॥१५६॥
पुन्हां येऊनियां सदनीं ॥आचरे आपुली प्रपंचराहणी ॥अस्त होत्तांचि वासरमणी ॥स्वामीसी जाऊनि लक्षीतसे
॥१५७॥
सद्भावउदय दावूनि प्रेमा ॥सेवा करीतसे मनोधर्मा ॥परी सेवा करितां षण्मासउगमा ॥दिन लोटूनि गेले पैं
॥१५८॥
यापरी कोणे एके दिवशी ॥काळुखी दाटली अपार महीसी ॥परी सेवा करावयासी ॥पातली नित्यनेमानें
॥१५९॥
तंव ती मूर्ध्नीखाली अंक ॥ठेऊनियां देतसे टेंक ॥त्या संधीत योगिनायक ॥काय करिता झाला पैं
॥१६०॥
मायिक सबळ करुनि भ्रमर ॥रुंजी घाली तियेवर ॥न कळतां येऊनि महीवर ॥अंकाखालीं रिघाला
॥१६१॥
ऐसें करुनि अवस्थेंत ॥आपण गाढ झाले निद्रिस्त ॥चलनवलन सांडूनि स्थित ॥कंठीं घोर वाजवी
॥१६२॥
तंव तो पटूपद जानूपरी ॥फोडूनि निघाला नेटें उपरी ॥ग्रीवे डसूनि जांलिदरा परी ॥सुचविलें अर्थातें
॥१६३॥
तंव तो लगबगें अति त्वरित ॥उठोनि हस्तें पाहे ग्रीवेंत ॥ग्रीवा पाहोनि सतीअंकांत ॥दृष्टी करी महाराजा
॥१६४॥
अंक फोडोनि पडे छिद्र ॥रुधिर दाटलें महीं अपार ॥तें पाहूनियां जालिंदर ॥धैर्यबळ ओळखिलें
॥१६५॥
मग सहज कृपेची करोनि दृष्टी ॥मौळी कुरवाळी कृपाजेठी ॥मग तारकामंत्र कर्णपुटीं ॥उपदेशिला तत्काळ
॥१६६॥
मंत्रपउदेश ओपितां कानीं ॥खूण व्यक्त दाविली संजीवनी ॥तेणें खुणें पारायणीं ॥ब्रह्मव्यक्त झालीसे
॥१६७॥
किंबहुना चराचरीं ॥जीव तितुका संगमस्थावरीं ॥अहंब्रह्म भुवनापासुनि आकारीं ॥ब्रह्मदृष्टी हेलावे
॥१६८॥
ऐसा होतां चमत्कार ॥मग मौळी ठेवी चरणावर ॥म्हणे महाराजा सकळ व्यापार ॥आजि मिरवला सुगमत्वें
॥१६९॥
यापरी तो कृपाळू मोक्षदानी ॥आणिक करिता झाला करणी ॥मंत्रप्रयोगें संजीवनी ॥ते देहीं प्रेरीतसे
॥१७०॥
जी निर्जीवित्वा उठवील ॥ती जीवित्वा काय न करील ॥असो मैनावतीसी अमरवेल ॥देहीं होऊनि ठेविलीसे
॥१७१॥
जैसें रामें दानवकुशीं ॥चिरंजीव केलें बिभीपणासी ॥तन्न्यायें मैनावतीसे ॥श्रीजालिंदरें केलें पैं
॥१७२॥
मग नित्यनित्य प्रेमभक्ती ॥विशाल मिरवे भावस्थिती ॥परी आणिक काम उदेला चित्तीं ॥पुत्रमोहेंकरोनियां
॥१७३॥
मनांत म्हणे चमत्कार ॥जानू भेदिली स्थिर भ्रमरें ॥त्या दुःखाचा घाय अनिवार ॥जानू वरी मिरवला
॥१७४॥
घाय पडतां अनिवार ॥अशुद्धाचा लोटला पूर ॥तयावरी स्पर्शतां कर ॥जैसी तैसी मिरविली
॥१७५॥
तरी सध्यां चमत्कार ॥झाला मम दृष्टीं गोचर ॥आणिक केलें सनातनसार ॥ब्रह्मव्यक्तिपरायण
॥१७६॥
तरी चिरंजीवपद देऊनि मातें ॥अचल केलें त्रैलोक्यातें ॥याचि रीतीं माझ्या सुतातें ॥होतें तरी फार बरवें
॥१७७॥
ऐसें योजूनि दृढ मानसीं ॥वियोगव्यथा वरिली देहासीं ॥ती व्यथा नरहरिवंशीं ॥धुंडीसुत मालू सांगे
॥१७८॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥त्रयोदशाध्याय गोड हा
॥१७९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ नवनाथभक्तिसार त्रयोदशाध्याय समाप्त ॥