श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ३
मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट; मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन. १५६ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीशा ॥रुक्मिणीवरा आदिपुरुषा ॥पुंडलीकवरदा पुंडरीकाक्षा ॥सर्वसाक्षी जाणता तूं
॥१॥
हे जगत्पालका जगन्नायका ॥ब्रह्मांडावरी यादवकुळाटिळका ॥आतां भक्तिसारीं दीपिका ॥ग्रंथार्थदृष्टी मिरवावी
॥२॥
मागिले अध्यायीं सिद्धसाधन ॥श्रीमच्छिंद्रनाथा आलें घडोन ॥उपरांतिक भस्मदान ॥सरस्वतीतें तेणें केलें
॥३॥
केले परी दैवहत ॥तिनें टाकिलें गोमहींत ॥परी फार ठकली अदैववंत ॥अतिहीन प्रारब्धीं
॥४॥
घर पुसत लाभ आला ॥तो निर्दैवपणें पदीं लोटिला ॥कीं पुढें मांदुस येतां वहिल ॥अंध होय आवडीनें
॥५॥
कीं अवचट लाधला चिंतामणी ॥तो आवडी गोवी गोफणी ॥कीं खडा म्हणोनि देतो झोंकोनी ॥कृषिशेतीं टाकीतसे
॥६॥
कीं अवचट लाधतां पीयूषघट ॥विष म्हणोनि करी वीट ॥तेवीं विप्रजाया अदैवें पाठ ॥नाडलीसे सर्वस्वीं
॥७॥
सहज काननीं फिरतां फिरतां ॥जाऊनि बैसे कल्पतरुखालता ॥परी दैवइच्छे भूत खाईल आतां ॥तन्न्यायें नाडली
॥८॥
कीं कामधेनु गृहीं आली ॥ती बाहेर बळेंचि दवडिली ॥तन्न्यायें परी झाली ॥नाडलीसे सर्वस्वें
॥९॥
किंवा बाण ढाळितां खेळींमेळीं ॥निधान लाधला हस्तकमळीं ॥तो गार म्हणोनि सांडिला जळीं ॥महाडोहीं निर्दैवें
॥१०॥
कीं सहज आतुडे हातीं परीस ॥खापर म्हणोनि टाकितसे त्यास ॥कीं घरा आला राजहंस ॥वायस म्हणोनि दवडिला
॥११॥
कीं हार देऊं देव उदित ॥परी त्यासी भासलें परम भूत ॥तन्न्यायें विप्रकांतेस ॥घडोनि आलें महाराजा
॥१२॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥पूर्वसमुद्रीं जगस्त्राथ ॥करोनि सेतुबंधा येत ॥रामेश्वरदर्शनीं
॥१३॥
तो श्वेती येऊनि करी स्नान ॥अवचट देखिला वायुनंदन ॥क्लेशशरीरा जरा व्यापून ॥सान शरीरी बैसला
॥१४॥
तया संधींत मेघ वर्षाव ॥करिता झाला सहजस्वभाव ॥दरडी उरकोनि गुहा यास्तव ॥करिता झाला मारुती
॥१५॥
वरुनि वर्षाव पर्जन्य करीत ॥येरु इकडे दरडी उकरीत ॥तें पाहोनि मच्छिंद्रनाथ ॥विस्मयातें पावले
॥१६॥
पावला परी हटकोनि बोलत ॥म्हणे मकंटा तूं मूर्ख बहुत ॥आतां करिसी सदन निश्वित ॥स्वशरीर रक्षावया
॥१७॥
पर्जन्य वर्षे विशाळधार ॥यांत कधीं करसील घर ॥जैंसे तस्करीं लुटलियावर ॥दीपा तेल भरीतसे
॥१८॥
कीं बाईल गेलिया झोंपा केला ॥तैसा न्याय घडोनि आला ॥कीं स्वसदनातें पावक लागला ॥कूप खणी विझवावया
॥१९॥
कीं ग्रीवे पडतां काळफांस ॥मग वाचिता होय अमरस्तोत्रास ॥कीं परम पीडितां तृषार्तास ॥कूप खणूं म्हणतसे
॥२०॥
कीं हदयीं पेटला जठरानळ ॥कामधेनूचें इच्छिती फळ ॥किंवा मेघ ओसरल्या बीजें रसाळ ॥महीलागीं पेरीतसे
॥२१॥
तन्न्यायें पर्जन्यकाळ ॥सदन करिसी उतावीळ ॥तस्मात् मूर्ख मर्कट वाचाळ ॥मिरवूं आलासी पुढागं
॥२२॥
ऐसें ऐकोनि वायुनंदन ॥म्हणे चतुर आहेस कोण ॥येरु म्हणे जती पूर्ण ॥मच्छिंद्र ऐसें मज म्हणती
॥२३॥
येरु ह्नणे तूतें जती ॥कोणे अर्थी लोक म्हणती ॥नाथ म्हणे प्रतापशक्ती ॥आहे म्हणोनि वदतात
॥२४॥
यावरी बोले वायुसुत ॥आम्ही आयिकतों जती हनुमंत ॥तुम्ही नूतन जती महींत ॥एकाएकीं उदेलां
॥२५॥
तरीं आतां असो कैसें ॥मी मारुतीच्या शेजारास ॥भावें राहोनि एक वेळेस ॥वरिलें आहे महाराजा
॥२६॥
तेही कला सहस्त्रांशीं ॥मातें लाधली महापरेशी ॥ते तुज दावितों या समयासी ॥तयापासाव जे प्राप्त झाली
॥२७॥
तरी त्या कळेचें निवारण ॥करोनि दावीं मजकारण ॥नातरी जती ऐसें नाम ॥सोडोनियां जाई बां
॥२८॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥कोणती कळा ती दावीं मातें ॥तिचें निवारण श्रीगुरुनाथ ॥करी जाण निश्वयें
॥२९॥
जैसा श्रीराम असतां शयनीं ॥पाहे मारुती वृक्षावरोनी ॥नाना पर्वत टाकी उचलोनी ॥रामशरीरा योजोनियां
॥३०॥
परी रामें न सोडितां शयन ॥सज्ज करुनि चापबाण ॥सकळ पर्वतांकारण ॥निवारण करी तो
॥३१॥
तन्न्यायें श्रीगुरुराज ॥सकळ अर्थी पुरवील चोज ॥सकळ ब्रम्हांडाचें ओझें ॥नखाग्रीं धरील तो
॥३२॥
तेथें तुझी मर्कटा कथा ॥किती असे दावी आतां ॥फार करिसील पाषंडता झोकसील कवळीनें
॥३३॥
तरी आतां कां करिसी उशींर ॥मर्कटा दावीं चमत्कार ॥ऐसें ऐकतां वायुकुमर ॥पूर्ण चित्तीं क्षोभला
॥३४॥
उड्डाण करोनि जाय एकांता ॥तेथें धरी भीमरुपता ॥न कळतां त्यातें सात पर्वतां ॥उचलोनिया फेकिले
॥३५॥
नभमंडपीं ढगासमान ॥पर्वत येतसे पंथीं गगन ॥तें मच्छिंद्रनाथें दृष्टी पाहोन ॥स्थिर स्थिर म्हणतसे
॥३६॥
वातप्रेरक मंत्रशक्ति ॥वाटेंत कोंदली पर्वतीं ॥तो येरीकडे आणिक मारुती ॥दुसरा पर्वत फेकितसे
॥३७॥
तो दुसरा म्हणतां तिसरा येत ॥चवथा पांचवा शतानुशत ॥मग एकचि मंत्रे करोनि वात ॥ठायींचे ठायीं रोधिला
॥३८॥
जैसे कंदुक बाळ खेळती ॥मध्ये अटकतां परते पंथी ॥तन्न्याय झाला पर्वती ॥ठायींच्या ठायीं जाती ते
॥३९॥
येरीकडे वायुनंदन ॥पर्वत परतता दृष्टी पाहोन ॥पूर्ण क्षोभला जेवीं कृशान ॥महाप्रळयकाळींचा
॥४०॥
मग महापर्वत एक विस्तीर्ण ॥उचलोनि बाहुमस्तकीं अर्पून ॥फेंकावा तो मच्छिंद्रनाथानें ॥निजदृष्टीने देखिला
॥४१॥
मग अब्धिउदक घेऊनी ॥वायुआकर्षणमंत्र म्हणोनि ॥सबळ झुगारोनि पाणी ॥वायुनंदन सिंचिला
॥४२॥
तेणें भरोनि शरीरीं वात ॥चलनवलन सर्व सांडीत ॥ऊर्ध्व झाले दोन्ही हात ॥मौळीं पर्वत राहिला
॥४३॥
मग ते जैसी स्तंभावरी ॥रचिली म्हणती द्वारकापुरी ॥तेवी मारुती शिरावरी ॥पर्वतातें मिरवीतसे
॥४४॥
खाली टाकावया न चले बळ ॥जेवीं विरला हस्त विकळ ॥पदीं चालावयाही बळ ॥कांही एक न चाले
॥४५॥
तें पाहोनियां दीन बाळ ॥हदयीं कवळी तात अनिळ ॥मग प्रत्यक्ष होऊनि रसाळ ॥सोडीं सोडीं बाळातें
॥४६॥
तैं अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ वातशक्ती ॥संगीत झाली देइस्थिती ॥मग समीप येऊनि नाथाप्रती ॥धन्य धन्य म्हणतसे
॥४८॥
यावरी बोलता झाला अनिळ ॥बा मारुती तुझे न चले बळ ॥तुज मज आतीनिर्बळ ॥बांधोनि केलें सिद्धानें
॥४९॥
जेणें तुझियां बापा बांधिलें ॥त्यासी तुझें भय काय आले ॥त्याचें आचरण तैसें झालें ॥भक्तिशक्ति अघटित
॥५०॥
म्हणसी सिद्धाची मंत्रस्थिती ॥अघटित असे बदतां उक्ती ॥तरी माझी भक्ति गुरुची शक्ती ॥ईश्वरी वाचा म्हणतात
॥५१॥
येतुल्या पांच शक्ती क्रियावंतासि ॥सकळ देवता होती दासी ॥ऐसें ऐकोनि अंजनीसुतासी ॥परम आनंद मिरवला
॥५२॥
यउपरांतिक मच्छिंद्रनाथ ॥मारुत मारुती यांच्या चरणीं लागत ॥म्हणे येथोनि तुमचें सख्य उचित ॥मजवरती असो कां
॥५३॥
मग प्रसन्न चित्तीं समीर मारुती ॥म्हणती बारे त्वत्कार्यार्थी ॥आम्ही वेंचोनि आपुली शक्ती ॥सुखसंपत्ती तुज देऊं
॥५४॥
जैसे दानवांच्या काजा ॥कविमहाराज उशना वर्ते वोजा ॥तेवीं त्वत्कार्यार्थ मोजा ॥शक्ती आपुली वेचूं आम्ही
॥५५॥
कीं सागरीं टिटवी अंड्यांकरिता ॥आपुल्या शक्ती झाला वेंचिता ॥तेवीं महाराजा त्वतकार्यार्था ॥शक्ती आपुली वेचूं कीं
॥५६॥
कीं विधीच्या संकटांत ॥विष्णु मत्स्यावतार घेत ॥तन्न्याये त्वत्कायार्थ ॥शक्ती आपुली वेचूं की
॥५७॥
की अवश्य ऋषींचे शापपृष्ठीं ॥स्वयें विष्णु झाला कष्टी ॥तन्न्यायें तुजसाठी ॥शक्ती आपुली वेचूं कीं
॥५८॥
कीं रामाच्या उपयोगासी ॥कपि गेले सीताशुद्धीसी ॥तन्न्यायें तुजसी ॥शक्ती आपुली वेंचूं कीं
॥५९॥
ऐसें वरदवाग्रत्न ॥ओपूनि प्रीतीं वायुनंदन ॥म्हणती बा रे तीर्थागमन ॥जती नाम मिरवी कां
॥६०॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥जती नामें होईन विख्यात ॥परी एक कल्पना तुझे चित्तीं ॥नाथ म्हणे तूं सर्वज्ञमूर्ती ॥आयुष्यभविष्य जाणसी
॥६२॥
ऐसी सर्वज्ञा असोनि नीती ॥विवाद केला कां मजप्रती ॥आणि भेटी झाली नागाश्वत्थीं ॥तुझी माझी पूर्वीच
॥६३॥
तें शाबरी विद्येचें कवित्य ॥करवोनि वर दीधला त्यांत ॥ऐसें असोनि सखया माहीत ॥रळी व्यर्थ कां केली
॥६४॥
यावरी बोले वायुनंदन ॥बा तूं करितां श्वेतीं स्नान ॥तेव्हां तूतें ओळखोन ॥तुजपासीं मी आलों
॥६५॥
तूं कविनारायणाचा अवतार ॥जननीं भेदिलें मच्छोदर ॥हे माहीत परी त्या त्या कल्पनेवर ॥चित्त कांहीं उदेलें
॥६६॥
कीं नागपत्रीं अश्वत्थासीं ॥वर ओपिला देवें तुजपासीं ॥परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी ॥पाहूं ऐसें वाटलें
॥६७॥
यावरी पुढें कार्य ॥आणिक ॥पडलें तूतें अलोलिक ॥तेथें टिकाव धरणें कौतुक ॥म्हणोनि शोध शोधिला
॥६८॥
तरी बा आतां येथोनि गमन ॥स्त्रीराज्यासी करावें मज लक्षोन ॥तेथें नातळे पुरुषप्रवेश पूर्ण ॥परत्रभुवनीं तो पावे
॥६९॥
बा रे झालें तुझें दर्शन ॥तुजसीं आहे माझें कारण ॥मज मस्तकीचें ओझें उतरणें ॥तुझे हातें होईल
॥७०॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥कैसा झालासी ऋणी व्यक्त ॥सर्व कामातें वायुसुत ॥सांगोपांग निरोपी
॥७१॥
येरु म्हणे योगद्रुमा ॥रामाचें घडलें दास्य आम्हां ॥सिताशुद्धि पाहोनि उगमा ॥लंकापति मारविला
॥७२॥
तैं सीता घेऊनि अयोध्यें जातां ॥परी सीतेच्या कामना वेधली चित्ता ॥आहे दासत्व मारुती करिता ॥महीलागी हा एक
॥७३॥
तरी हा असो बा संपूर्ण संपन्न ॥कांता धन सुत एक सदन ॥जरी वितुळे सुख संसारीं साधन ॥कांतेमागें होतसे
॥७४॥
तरी या मारुतीसी कांता करोन ॥भोगवूं सर्वसुखसंपन्न ॥परी ब्रह्मचारी मम भाषण ॥मान्य करील कीं नाहीं
॥७५॥
तरी यातें वचनीं गोंवून ॥गृहस्थाश्रमीं करावा वायुनंदन ॥ऐसें सीतेनें कल्पोन ॥पाचारिलें आम्हांतें
॥७६॥
जवळीं बैसवोनि स्नेहानें ॥स्वकरें मग मुख कुर्वाळोन ॥म्हणे बा मारुति तूं धन्य ॥तिहीं लोकीं अससी पै
॥७७॥
तरी बा माझें एक मागणें ॥देसील तरी उत्तम मानीन ॥यावरी तूंही नकार मजलागोन ॥देणार नाहीं सहसाही
॥७८॥
उदार वेंचिती आपुला प्राण ॥परी नकार न देती वाचेकरोन ॥शिबीरायानें कपोताकारणें ॥मांस दिधलें रती रती
॥७९॥
पाहें श्रियाळ उदारकीर्ती ॥बाळ दिधलें याचकाहातीं ॥तन्न्यायें त्याच पंक्तीं ॥तूंही अससी कपींद्रा
॥८०॥
ऐसें ऐकतां जननीवचन ॥परम तोषला वायुनंदन ॥म्हणे माय वो कामना कोण ॥उदित करीं देईन मी
॥८१॥
येरी म्हणे करतलभाप ॥देसी आपुल्या सदभावास ॥तरी मम कामनेची हौस ॥दृश्य करीन तुज बा रे
॥८२॥
मग करीं कर वोपोनि शेवटीं ॥म्हणे मागाल ते कामना होटीं ॥ते मी देऊनि चित्तसंतुष्टीं ॥मिरवीन जननीये
॥८३॥
येरी म्हणे मम कामना ॥तुवां आचरावें गृहस्थाश्रमा ॥कांता करोनि संसारउगमा ॥सर्व सुख भोगावें
॥८४॥
ऐसी ऐकतां वागवटी ॥सप्रेम खोंचला आपुल्या पोटीं ॥म्लानवदन चित्त हिंपुटी ॥परम संकटीं पडियेला
॥८५॥
मग न देतां मातेसी कांहीं उत्तर ॥येऊनि बैसला रामासमोर ॥परी चित्तवृत्ति कोमीत मुखचंद्र ॥रघूत्तमें पाहिला
॥८६॥
मग जवळी पाचारोनि हदयीं ॥धरीत आली दयाळ आई ॥म्हणे बा रे तुझा व्यर्थ केवीं ॥मुखचंद्र वाळला
॥८७॥
मग प्रांजळीं सर्व कथन ॥श्रीरामातें निवेदन ॥नेत्रीं अश्रू म्लान वदन ॥मी करोनियां बसलों
॥८८॥
परी अंतःसाक्ष रघुकुळटिळक ॥म्हणे वायां न मानीं दुःख ॥स्त्रीराज्याच्या स्त्रिया सकळिक ॥कांता असती तुझ्याचि
॥८९॥
तरी बा याचें ऐक कथन ॥कृत त्रेत द्वापार कलि पूर्ण ॥या चोहों युगातें म्हणती निपुण ॥चौकडी एक ही असे
॥९०॥
तरी बा ऐशा चौकड्या किती ॥तीनशें शहाण्णव बोलती मिती ॥तूतें मातें चोहों चौकड्यांप्रती ॥जन्मा येणें आहेचि
॥९१॥
मी नव्याण्णवावा राम क्षितीं ॥तूंही नव्याण्णवावा मारुती ॥आणि लंकाधीश याच नीतीं ॥नव्याण्णवावा असे ती
॥९२॥
यावरी चौदा चौकड्यांचें राज्य रावण ॥करील ऐसें बोलती वचन ॥परी चौदा अंकींचा आकडा मागोन ॥आंख नेला विधीनें तो
॥९३॥
मग उरला वरील एक चतुर्थ ॥तितुक्या चौकड्या राज्य करीत ॥परी सांगावया कारण त्यांत ॥आपण मारोनि येतसे
॥९४॥
मग आल्यावरी स्त्रीराज्यांत ॥जाणें लागे मारुती तूतें ॥तरी बा पाळी तुझी निश्वित ॥आली आहे ती भोगीं कां
॥९५॥
ऐसें म्हणतां श्रीराम वहिला ॥मग म्यां त्यातें प्रश्न केला ॥कीं दृढ कासोटी आहे मजला ॥भेटी केवीं कामरती
॥९६॥
मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती ॥आजपासोनि असे मारुती ॥तयाच्या भुभुःकारें श्वाससंगतीं ॥गरोदर होती त्या स्त्रिया
॥९७॥
तरि तूं सकळ संशय सांडोन ॥शैल्यदेशीं करी गमन ॥तुझें ब्रह्मचारीपण ॥ढळत नाहीं महाराजा
॥९८॥
ऐशी वार्ता होता निश्वितीं ॥मग म्यां स्वीकारिलें शैल्यदेशाप्रति ॥यावरी तेथेंही स्त्रिया नृपती ॥मेनका नामें विराजली
॥९९॥
तीतें पृथ्वीची देशवार्ता ॥ऐकीव झाली कीं पुरुषकांता ॥देशोदेशीं उभयतां ॥रमत आले स्वइच्छें
॥१००॥
देवदानवमानवांसहित ॥पशुपक्षीनागजात ॥सकळ स्त्रीपुरुष उभयतां ॥इंद्रियसुखें सुखावती
॥१०१॥
कामरती मंथनाकार ॥रतीसी अर्पिती कामिक नर ॥ऐसा जाणोनि मनीं विचार ॥परम चित्तीं क्षोभली
॥१०२॥
मग तिनें मांडिलें अनुष्ठान ॥मनामाजी काम वरोन ॥कीं प्रत्यक्ष होऊनि वायुनंदन ॥रतिरत्न अर्पू त्या
॥१०३॥
ऐसा काम वरोनि चित्तीं ॥बैसलीसे दृढ तपापरती ॥मांसा तोडोनि यज्ञकुंडी आहुती ॥मम नामीं अर्पीतसे
॥१०४॥
ऐसे लोटले द्वादशवर्ष ॥सकळ आटिलें शरीरमांस ॥मग ती पाहोनि अति कृश ॥प्रसन्न झालों मी तीतें
॥१०५॥
परि तीतें होतां माझी भेटी ॥पदी मौळी घालोनि मिठी ॥म्हणे अर्थ जो उदभवला पोटीं ॥तो सिद्ध करीं महाराजा
॥१०६॥
मग मी विचारिता झालों तीतें ॥कीं कवण कामनासरिता भरिते ॥मज सांगोनि अर्थरसातें ॥सुखसमुद्रा मेळवीं
॥१०७॥
ऐसें ऐकतां वचनोत्तर ॥म्हणे महाराजा वायुकुमर ॥तुझेनि स्त्रिया गर्भिणी समग्र ॥होऊनि मिरवती महाराजा
॥१०८॥
तरी तूं सकळांचा प्राणेश्वर ॥स्मरा ओपी भुभुःकार ॥तरी ते नादें रतिनार ॥सुख पावे सकळांसी
॥१०९॥
तरी नादबुंदा सुखासना ॥मैथुनरती घरीं कामना ॥हे मार्ग सकळ देशकारणा ॥स्वर्गमृत्युपाताळीं
॥११०॥
तरी कां कर्म आमुचेचि ओखट ॥स्वप्नीं दिसेना ऐसा पाठ ॥तरी तूं स्वामी आमुचा अलोट ॥तें सुख आम्हां मिरवी कां
॥१११॥
ऐसें वदतां स्त्रिया भूषणीं ॥मग मी बोलिलों तिये लागोनी ॥कीं ऊर्ध्वरेता जन्माहूनी ॥दृढकासोटी विराजिलों
॥११२॥
जेथें उदय झालों जठरीं अंजनी ॥ते उदरां दृढकौपिनी ॥मातें प्राप्त शुभाननी ॥कनककासोटी ती असे
॥११३॥
तस्मात् दृढ इंद्रियसंपत्ती ॥ढाळे लागले भांडारग्रंथीं ॥तेणें इंद्रियव्यवहारशक्ती ॥जगामाजी मिरवेना
॥११४॥
म्हणूनि कामा ऊर्ध्वगमन ॥श्वासोक्त रतिकामद्रुम ॥तुम्हां स्त्रियांचा रतिआश्रम ॥शांत तेणें पावतसे
॥११५॥
तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा ॥मच्छिंद्र नगरीं विराजवूं ओजा ॥तें चित्तदैव रतिराजा ॥कामभक्ती तुष्टेल
॥११६॥
म्हणोनि मच्छिंद्र आहे कोण ॥तरी तो प्रत्यक्ष कविनारायण ॥त्वत्तपाच्या कामीं बैसोन ॥फलद्रुम होईल कीं
॥११७॥
ऐसें बोलोनि तीर्थावतीं ॥तुष्ट केली सकाम अर्थी ॥तरी तूं जाऊनि मनोरथीं ॥तुष्ट करीं महाराज
॥११८॥
येरु म्हणे ऊर्ध्वरेता ॥मातें कार्य हें निरोपितां ॥तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृथा ॥आंचबळें जाईल
॥११९॥
मी तों उदास कामशक्ती ॥नोहे म्हणतील नाथपंथी ॥जती नामीं जगविख्याती ॥जगामाजी मिरवलों
॥१२०॥
तरी ऐसी कुकर्मराहटी ॥मातें घडोनि येतां जेठी ॥मग वाभ्देवतानिंदादिवटी ॥येऊनि जगीं मिरवेल
॥१२१॥
यावरी आणिक सिद्ध जगीं ॥नाथपंथी आहेत योगी ॥तेही योगपंथ ते प्रसंगीं ॥विटाळ माझा करतील
॥१२२॥
एवं स्त्रीसंग अश्लाघ्य फार ॥अपकीर्तीचें दृढ भांडार ॥सर्वविनाशी मोहनास्त्र ॥स्वीकारावें हें वाटेना
॥१२३॥
स्त्रियांसगें बहु नाडले ॥अपकीर्ती जगी मिरवले ॥आणि सर्व सुकृता आंचवले ॥रितें पोतें तें वाताचें
॥१२४॥
पाहें अमरेंद्र झाला भग्न ॥चंद्र मिरवला कलंकेंकरुन ॥समूळ राज्यविनाश रावण ॥स्त्रीलोभें नाडला तो
॥१२५॥
विधिसुताची ब्रह्मकासोटी ॥तीही क्षणमात्रें झाली सुटी ॥साठ पोरें निर्मूनि पोटीं ॥दैन्यभाजा वरियेली
॥१२६॥
याचि नीतीं तदा तात ॥अकर्मप्रवाही कन्ये रत ॥विधि ऐसें नाम उचित ॥अविधिपणें बुडविलें
॥१२७॥
पहा तपी तो त्र्यंबक ॥तपियांमाजी असे अर्क ॥परी कामदरीं अस्तोदक ॥भिल्लिणीउदथीं लुब्धला
॥१२८॥
तन्न्याय तपोजेठी ॥काम रंभेच्या करोनि पोटीं ॥आंचवोनि तप घे नरोटी ॥तन्न्यायचि मिरवतसे
॥१२९॥
ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला ॥याची नीतीं वदसी मला ॥तरी वन्ही कामदरीला ॥व्याघ्रमया नांदविसी
॥१३०॥
ऐसें ऐकोनि मच्छिंद्रवचन ॥म्हणे बा रे योगद्रुमण ॥ही अनादि राहटी पूर्ण ॥भोग भोगितां निर्दोष
॥१३१॥
जैसें रामें मजला कथिलें ॥नव्याण्णव मारुती असे वदले ॥तन्न्यायें तुम्ही भले ॥नव्याण्णवावा अससी तूं
॥१३२॥
तरी अनादि राहटी ॥भोगिता झाला भामिनी वीस कोटी ॥मौनिनाथ येऊनि पोटीं ॥कीर्तिअर्क मिरवेल
॥१३३॥
तव तात जो उपरिचर वसु ॥तो तव उदरीं येईल वसु ॥कीर्ति ते महीप्रकाशु ॥महाप्रचंड मिरवेल
॥१३४॥
ऐसें सांगोनि वायुसुत ॥प्रसन्न केलें चित्त दैवत ॥मग वरप्रदानवाणीं रुकारवंत ॥मच्छिंद्रनाथा देतसे
॥१३५॥
जैसें शुक्रें अमित्रसुता ॥प्रसन्न होऊनि चित्तसविता ॥देऊनि मंत्रसंजीवनी अर्था ॥प्रभूलागीं मिरवल
॥१३६॥
तेवीं अमित्रकुळजा ॥राज्य स्थापिलें भक्तिकाजा ॥नेणूं विभीषण शत्रु अनुजा ॥केला सरता चिरंजीव
॥१३७॥
तन्न्यायें घातक वसु ॥नेणोनि कामशरा पासु ॥रुकार तैं समयासु ॥अंजनीसुत पैं केला
॥१३८॥
मग करोनि नमनानमन ॥अवश्यपणें करितां गमन ॥अदृश्य पाहोनि वायुनंदन ॥मच्छिंद्रनाथ चालिला
॥१३९॥
सहज चालिला महीपाठीं ॥अर्थी हिंगळा द्यावी भेटी ॥ऐसें गमोनि तया वाटीं ॥येऊनियां पोचला
॥१४०॥
तवं ते शक्तिद्वारीं ॥रक्षक असती दक्षाचारी ॥अष्टभैरव कृतांत संगरीं ॥जिंकूं पाहती कृतांता
॥१४१॥
आणि शतकोटी चामुंडा ॥शंखिनी डंखिनी प्रचंडा ॥त्याही तीव्र ब्रह्मांडा ॥ग्रासूं पाहती कृतांतपणीं
॥१४२॥
यावरी अर्णव बहु कर्कश ॥नाना पर्वत विशेष ॥त्यांत व्याघ्रादि साबजें रीस ॥येऊं येऊं म्हणताती
॥१४३॥
म्हणे ते अर्णव सहज बोली ॥परी नोहे कृतांताची बैसे पाली ॥कीं पूर्वी दानवांनीं आणोनि ठेविली ॥भयें माय त्या ठायीं
॥१४४॥
कीं तें अर्णव पाहतां सहज ॥तैंचि देवतांचे तेज ॥विरुनि जाय मोडे माज ॥नको नको म्हणवूनी
॥१४५॥
कंटकवन जाळिया संधी ॥भयानक सावजें अपार मांदी ॥पाहतांक्षणीं कामनाबुद्धी ॥विरोनी जाय तत्काळ
॥१४६॥
तेथें न पावे वायुनंदन ॥परम भयभीत मन ॥कृतांतपत्नीचें कानन ॥भक्षील म्हणोन पळतसे
॥१४७॥
असो ऐशी वातगोष्टी ॥मित्र उदेल परम पाठीं ॥कीं येथें संचरतां रश्मिदाटी ॥ग्रासील मग काय करुं
॥१४८॥
येऊनि ते परी कानन पाहतां ॥रश्मी संचारुं न देई सवित ॥असो ऐशी काननवार्ता ॥संकट भयाचे स्थान चित्तातें
॥१४९॥
तेथें सिद्धमुनी राव ॥संचरेल आपुल्या प्रतापें गौरव ॥ती कथा रसज्ञ ज्ञानदेव ॥श्रीगुरु माझा वदेल कीं
॥१५०॥
तरी स्मृतीं ठेवोनि हेत ॥प्राशन करा कथामृत ॥मग भवरोगाचे अपार भरितें ॥दुःखक्लेश नांदेना
॥१५१॥
हा ग्रंथ केवळ चिंतामणी ॥हरेल चित्ताची काळजी मुळींहुनी ॥जैसें वृश्श्र्विकदंशालागोनी ॥विष शोषी महाराजा
॥१५२॥
तरी होऊनि सद्विवेक ॥सांडा कुटिलपणी तर्क ॥निंदा दोष विघ्न भातुक ॥सेवूं नका सहसाही
॥१५३॥
निंदाशक्ती परम पापिणी ॥अतिरंजक नीचवदनी ॥परी आमुची मायबहिणी ॥पवित्र करील आमुतें
॥१५४॥
जो या निंदेसी प्रतिपाळील ॥तो सखा अदभुत आमचा स्नेही विपुळ ॥पातकमळाचें क्षालन करील ॥वारंवार इच्छीतसे
॥१५५॥
धुंडीसुत नरहरिवंशीं ॥मालू स्नेह करी निंदकासी ॥बहुत आयुष्य इच्छी त्या मानवासी ॥उपकारी म्हणोनी
॥१५६॥
तरी असो आदर श्रोतीं ॥तुम्हीं न बैसावें तया पंगतीं ॥मालू तुम्हातें हीच विनंती ॥वारंवार करीतसे
॥१५७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥तृतीयोध्याय गोड हा
॥१५८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार तृतीयोध्याय समाप्त ॥